वातावरणात असह्य उकाडा असतो. जिवाची तगमग तगमग होत असते. काय करावे सुधरत नाही. बोरकरांच्या कवितेत एक ओळ येते तसे काहीसे सर्वत्र वातावरण असते
जिथल्या तेथे पंख मिटूनीया
निमूट सारी घरे पाखरे
राख माखुनी पडून आहे
लूत लागले सुणे बिचारे
यात सुणे म्हणजे कुत्रे पण हा शब्द असा आला आहे की तो जिणे असावा असे वाटते. आणि असे लूत लागले जिणे पडून आहे. काय करावे म्हणजे ही स्थिती पालटेल? मर्ढेकर लिहीतात त्याप्रमाणे हे सारे पालटेल फक्त आणि फक्त पाऊस पडू लागल्यावरच.
शिरेल तेव्हा शिरो बिचारे
हवेत असल्या पाउस-पाते
जगास तोवर वैशाखाच्या
मृगाविनाही मृगजळ चढते !
पावसाची वाट सगळे पहात आहेत. आदिम काळापासून पावसाची वाट माणूस पहात आहे. आज इतकी परिस्थिती बदलली. विज्ञानाने नवे नवे शोध लावले. वातावरणातील तापमानाला विरोध करीत ऐसी शोधून काढला. पण पावसाची वाट पाहण्याची जी तीव्रता आहे ती मात्र कमी झालीच नाही.
पावसाचे महत्त्व माणसाला होतेच पण ते केंव्हा जास्त वाटायला लागले? शेतीचा शोध लागला आणि पाऊस मानवी संस्कृतीचा एक अविभाज्य घटक बनला. भारतासारख्या देशात आजही बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. सिंचन घोटाळ्यातील आकडेवारी बाजूला ठेवली तरी एक विदारक सत्य आजही समोर आहे. आणि ते म्हणजे शेतीला पाणी पुरविण्याची वेगळी व्यवस्था आम्ही करू शकलेलो नाही. त्यामुळे एक वाकप्रचार आपल्याकडे आलेला आहे, ‘अस्मानी आणि सुलतानी’. लहरी पाऊस आणि सुलतानी म्हणजे शासनव्यवस्था ह्या दोन्ही बेभरवश्याच्या आहेत.
जूनच्या पहिल्या आठवड्यात मृगाच्या पावसाची मोठ्या आशेने शेतकरी वाट पहातो. मृगाआधी रोहिणी नक्षत्रात पावसाच्या सरी कोसळतात. त्यावरची जात्यावरची ओवी मोठी सुरेख आहे
मृगाआधी पाऊस । पडतो रोहिणीचा ॥
भावाआधी पाळणा । हलतो बहिणीचा ॥
मांगाच्या बाण्यामध्येही मृगाच्या पावसानंतर शेतकर्याची कशी लगबग सुरू होते. पेरणीची मोठी धांदल उडते याचे वर्णन आले आहे.
सुताराच्या नेहावर एक नवल घडले
समरत सोईर्याने सोनं मोडून चाडं केलं
इंद्रजीत भालेराव यांनी जात्यावरच्या ओव्यांचे संपादन केले आहे. त्यात पावसाच्या-पेरणीच्या ज्याओव्या आलेल्याआहेत त्या आपली पारंपरिक मानसिकता स्पष्ट दाखवतात. परभणी परिसरातील या ओव्या असल्यामुळे तसे संदर्भही आले आहेत.
पाण्या बाई पावसाचं
आभाळ आलंय मोडा
आभाळ आलंय मोडा
तिफनीचे नंदी सोडा
पड पड रे पावसा
व्हवू दे रे वल्ली माती
बईलाच्या चार्यासटी
कुणबी आले काकूळती
पाण्याबाई पावसाचं
आभाळ आलंय कोट
सख्या परभणी गाठ
माल आडतीत लोट
जात्यावरच्या ओव्या किंवा आधुनिक मराठी कविता असो या सगळ्यात पावसाचे, त्याची वाट पाहण्याचे जे काही वर्णन आले आहे त्या सगळ्याचा धागा पार वेदकाळात जाऊन पोंचतो. ऋग्वेदात 1028 सूक्ते आहेत. विश्वनाथ खैरे यांनी यातील पंधरा निसर्गवर्णनपर सूक्तांचा मराठीत सुंदर असा अनुवाद केला आहे. ‘वेदांतील गाणी’ या नावाने हे छोटे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. वीस वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेली या पुस्तकाची अजून पहिलीच आवृत्ती चालू आहे. वाचन संस्कृतिवर भरमसाठ बडबड करणार्यांनी ही वस्तुस्थिती समजून घ्यावी. वेदांचा प्रचार मौखिक पंरपरेत झाला. लेखी स्वरूपात वेद अगदी अलिकडच्या काळात आले. त्यांचा सविस्तर शास्त्रार्थ सायणाचार्यांनी पहिल्यांदा मांडला ज्याच्या आधारावर इतर विद्वानांनी वेदांतील मंत्रांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. सायणाचार्य हे तेराव्या शतकातील विजयनगरच्या राजाचे प्रधान होते. सायणाचार्यांच्या भाष्याचा आधार खैरेनी घेतला. आपल्या लोकसाहित्यात ज्या चालिरीती, परंपरा यांचा निर्देश आलेला आहे. त्यालामिळत्या जूळत्या वेदांतील सुक्तांचा त्यांनी अनुवाद केला.
पर्जन्यसूक्त ही एक मुक्त अशी कविता आहे. पावसाने सारी समृद्धी येते. या पावसात औषधी वनस्पती वाढतात. पोटासाठी अन्न मिळते. निसर्गाचे चक्र या पावसामुळेच गतिमान आहे अशी भावना या सूक्तात आहे.
पावसाच्या थोर देवा मंत्र गावे
नमन करावे आणि सेवाभावे
बैल डरकत यावा तसा येतो
पाण्याने औषधी बीजे वाढवीतो
सुसाटती वारे वीजा कडाडती
झरता हे आकाश औषधी वाढती
भूमी सारे जग पोसाया समर्था
पावसाचा देव पाणी तिला देतो
दहा कडव्यांच्या या छोट्या प्रार्थनेत धो धो वाहणार्या पावसाला आता थांब आणि पुढे कोरड्या प्रदेशात जा अशी विनंती करण्यात आली आहे. खाण्यासाठी अन्न आणि पिण्यासाठी पाणी देणार्या पावसाचे मोठ्या तृप्त मनाने आभार मानले आहेत.
धो धो धो आलास ओढून घे धारा
कोरड्या देशांना जाई तू पुढारा
खाण्यापिण्या झाले मोप अन्नपाणी
वाहिली तुला ही आभाराची गाणी
वेदांचा काळ जवळपास पाच हजार वर्षांपूर्वीचा मानल्या जातो. वादाखातर तो थोडा कमी जरी केला तरी किमान तीन हजार वर्षांपूर्वीचे हे साहित्य आहे यात वादच नाही. वेद, उपनिषदे यांच्यावर आधुनिक काळातील विद्वान टिका करतात. त्यांना सोवळ्यात बांधून आधुनिक काळात वैचारिक अस्पृश्यता बाळगतात. असं करण्यानं या वाङ्मयातील किमान सौंदर्यालाही आपण मुकतो हे त्यांच्या लक्षात येत नाही.
शंकराचार्यांच्या नर्मदाअष्टकांत असं वर्णन आहे
अलक्ष्य लक्ष किन्नरामरासुरादि पूजितं ।
सुलक्ष्य नीर तीर धीर पक्षि लक्षमकूजितम् ।
त्वदीयपादपंकजं नमामि देवि नर्मदे ॥
दृष्टिला न दिसणार्या लक्षावधी किन्नर, देव दैत्य यांनी तूझ्या पायाची पूजा केली आहे. तूझ्या काठावर धीर धरून राहणारे लक्षावधी पक्षी आपल्या मंजूळ आवाजाने तूझा काठ रम्य करीत आहेत. अशा नर्मदे तूझ्या मी पाया पडतो. या वर्णनात कुठे काय देव देवता सोवळे ओवळे असे धर्माचे अवडंबर आले आहे? पण आपण ते समजून घेत नाही.
पावसाची चातकासारखी वाट पाहण्याची आजची आपली मनोवृत्ती वेदकालीन आपल्या पूर्वजांसारखीच आहे. आजही आपल्यावर आपल्या पूर्वजांइतकी निसर्गाची जबरदस्त मोहिनी आहे हेच खरे.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575