लोकसत्ता "लोकरंग" पुरवणी रविवार १ जुन २०१४
(आशयही महत्वाचा आसतो राव )
मराठी साहित्यात सदाशिवपेठी साहित्यावर एक जळजळीत प्रतिक्रिया म्हणून दलित साहित्य पुढे आले. त्याची अतिशय चांगली दखल समीक्षकांनी, गंभीर वाचकांनी घेतली. मग ग्रामीण साहित्य, स्त्रीवादी साहित्य, आदिवासी साहित्य हे प्रवाह सुरू झाले. याचे समर्थन करताना अभ्यासक असे म्हणायला लागले की विविध स्तरातील जीवन मराठी साहित्यात यायला हवे. याचा एक अर्थ नंतरच्या काळात सामान्य वकुबाच्या लेखकांनी असा घेतला की आपल्या आपल्या भोवतालचे विश्व साहित्यात आत्तापर्यंत फार आले नसेल तर पाडा त्यावर एखादी कादंबरी. असे केल्याने निर्माण होणारे साहित्य हे किमान दर्जाचे तरी असते का? याचे उत्तर मात्र नाही असेच द्यावे लागेल.
पत्रकारितेवर मराठीत फारश्या कादंबर्या नाहीत. म्हणून पत्रकार आणि त्याच्या भोवतीचे राजकारण अरूण साधू यांनी सिंहासन मध्ये रंगवले नव्हते. अरूण साधू हे मुळात दर्जेदार लेखक आहेत. त्यांनी आपल्या भोवतालच्या सामग्रीचा उपयोग करून घेतला. रिक्शावाल्यांचे जग मराठीत आणलं म्हणून मनोहर तल्हार मोठे नाहीत तर ‘माणूस’ ही कादंबरी मानवी मनाच्या मुलभूत भावभावनां लक्षात घेवून काही कलात्मक मांडणी करते म्हणून महत्त्वाची आहे.
समीरण वाळवेकर यांच्या मनात ‘चॅनल फोर लाईव्ह’ लिहीताना काही गैरसमजूती आहेत असे दिसते आहे. ही कादंबरी लिहीताना त्यांच्यासमोर अरूण साधूंची 'सिंहासन' होती हे तर स्पष्टच जाणवते. व्यक्तिरेखा परिचय सुरवातीलाच देऊन त्यांनी हे सिद्धही केलं आहे. शिवाय सगळी मांडणीही सिंहासन सारखीच ते करतात. साधुंचा दिगु आणि यांचा सलील देसाई हा पत्रकार हे सारखेच आहेत. मुख्यमंत्री मदनराव पाटील असो किंवा इतर व्यक्तीरेखा असोत यांवर सिंहासनचाच पगडा आहे. फक्त साधू छापिल माध्यमाचा पत्रकार रंगवताहेत आणि वाळवेकर इलेक्ट्रॉनिक. पण वरवरच्या साम्यासोबतच सारं संपून जातं. (सिंहासनही ग्रंथालीनेच छापली होती. सिंहासन पासून चानेल ४ पर्यंतचा ग्रंथालीच आलेख भलताच उतरता आहे आसे म्हणावे लागेल) संपूर्ण कादंबरीचा आराखडा आखताना मुख्यमंत्री मंत्रीमंडळ बदलाची घोषणा करतात आणि ती बातमी रेडिओवरून येते यासारखा अप्रतिम शेवट जसा साधूंनी केला आहे त्याचा मोह होवून वाळवेकरही बातमीवर येवून कादंबरी संपवतात. इथे तर ते अशोक चव्हाण प्रकरणासारखेच ‘श्रीया सोसायटी’ प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा राजीनामा व केंद्रात राज्यमंत्री असलेल्या राजवर्धन मोहिते यांना राज्यात मुख्यमंत्री म्हणून पाठविले जाते असे पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे प्रकरण रंगवतात. पण साधुंनी राजकीय प्रक्रिया जवळून अभ्यासली असल्यामुळे ते शेवट अर्थपूर्ण करतात. सत्तेचे राजकारण कुठल्या दिशेने जाते याचा अंदाज साधूंना आहे. परिणामी तशी मांडणी ते करतात. नंतरही महाराष्ट्रच कशाला देशातल्या कित्येक राज्यात हे सिद्ध झाले आहे. याउलट वाळवेकरांना काय सांगायचे आहे तेच शेवटपर्यंत समजत नाही.
मोदी-अंबानी, तात्या खामकर-अण्णा हजारे, श्रीकांत सबनीस-अविनाश धमाधिकारी, खामगाव-राळेगण सिद्धी, दादा सामंत-नारायण राणे, आरती बेणारे-मेधा पाटकर (कट्टर कम्युनिस्ट विचारांची कार्यकर्ती-खरं तर वाळवेकर यांना पत्रकार म्हणून समाजवादी आणि मार्क्सवादी यातला फरक कळायला पाहिजे होता. तो बहुतेक कळत नाही) लेण्याद्री-सह्याद्री असा कितीतरी साम्य दर्शविणारा खेळ करून लेखक म्हणून आपला कमकुवतपणा वाळवेकर सिद्ध करतात.
पैसा आणि वासना यांचा खेळ म्हणजे सत्ता असं एक सुत्र वाळवेकर मांडतात. बरं मग जेंव्हा मोठ मोठ्या वाहिन्या बंद पडल्या त्यांचे प्रसारण कमी झाले, इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून कित्येक दर्जेदार पत्रकार बाहेर पडले हे त्यांच्या लिखाणात कुठेच येत नाही हे कसे? आज घडीला निखिल वागळे, राजदीप सरदेसाई, राजीव खांडेकर अशी मोजकीच नावे इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांत आहेत ज्यांचा दर्जा पत्रकार म्हणून वरचा आहे. बाकी गावोगावचे किमान दर्जा असलेले पत्रकार परत वर्तमानपत्रांकडे वळले आहे.
वासनेबाबत तर वाळवेकरांचे काय गैरसमज आहेत तेच जाणो.जवळपास प्रत्येक पुरूष किंवा स्त्री एकमेकांकडे वासना शमवायचे साधन म्हणूनच पाहते आहे अशी वर्णनं त्यांनी केली आहेत. सलील रावी (पृ. 10), सलील-मसाज करणारी पोरगी (पृ.30), मदनराव पाटील-व्हेनेझुएलन ब्युटी क्वीन (पृ.31) कनकलाल रामजी झवेरीचा मुलगा युवराज- कित्येक मुलींशी संबंध (पृ. 109) अँकर अनिमिष-प्रिति ठुकराल (पृ. 75). इशा-युवी (पृ. 135), गिरीश-बिन्नी (153), मोगरा बोरगावकर-मुख्यमंत्री (पृ.179)
बरं ही वर्णनं करताना वाळवेकर केवळ खाज म्हणून हे लिहीताहेत असा आरोप करता यावा इतका पुरावाही त्यांनी सोडला आहे. नताशाच्या फ्लॅटवर पार्टीसाठी सलील-रावी-नताशा जमतात. रावीला गोळ्या देवून नताशा झोपी घालते. सलील आणि नताशा संभोग करतात. त्याला थोड्या वेळात फोन येतो. मिताली आनंदात न्हाउन निघाली. असं वर्णन येतं. आता ही मिताली कोण? नताशा कुठे गेली. परत पुढे नताशाला बाजूला सारून सलील ताडकन उठला. पुढे पृ. 127 वर मितालीनं जो काही धिंगाणा घातला असं वाक्य येतं. काय सांगायचं आहे वाळवेकरांना?
चॅनल फोरचा अँकर अनिमिष आणि मिताली यांची एटीएम सेंटर मधील संभोगाची सीडी चॅनल फोरच्या मालकाला दाखवून कुणी मार्केटिंग अधिकारी युनायटेड बँकेत खाते उघडायला लावतो. साडेतीन हजार कर्मचारी असलेली मोठी मिडिया कंपनी केवळ आपल्या एका कर्मचार्याचा संभोग करतानाचा व्हिडीओ सापडला म्हणून असं करेल? वाटलं तर त्या दोघांही कर्मचार्यांना काढून टाकेन. मोठ्या समुहांची आर्थिक व्यवहार करण्याची पद्धत वाळवेकरांना इतकी बाळबोध वाटते का?
राजकारणाची नेमकी काय समज लेखकाला आहे हे कळत नाही. मंत्र्यांचे अनैतिक संबंध कळले म्हणजे राजकारण कळते का? यांचा मुख्यमंत्री स्वत: ‘लोकमानस’ चे संपादक राजाभाऊ पानसेंना फोन करतात, आणि ‘सांस्कृतिक मंत्री सापडले लोककलावंतीणी बरोबर’ अशी बातमी देतात. राजाभाऊ पानसे त्यांना बाणेदारपणे ‘काय छापायचे ते मला शिकवू नका’ हे सांगतात. मोठे नेते संपादक इतक्या बालिशपणे एकमेकांशी बोलतील का? किंवा हा प्रसंग कादंबरीत एखादा प्रतिभावंत असा बाळबोधपणे घेईल का?
नांदेडच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची इमारत जळाली हे प्रकरण जशाला तसे परभणी बँकेची इमारत म्हणून लेखकाने घेतले आहे. लोककलावंत जनार्दन नांदूर्डीकरांना मृख्यमंत्री भेटतात, मीरचंदानी बिल्डींग अतिक्रमण असे प्रत्यक्ष घडलेल्या घटनांशी संपूर्णत: साधर्म्य असलेले प्रसंग नाव बदलून दाखवले म्हणजे वाङ्मयाची निर्मिती होते का?गोपाळराव दामले -गोविंदराव तळवलकर (पृ. 83), गॅलेक्सी ग्रुप-रिलायन्स, इंदूभाई-धिरूभाई (पृ. 87) त्यांची आशिष-अमीत ही मुलं म्हणजेच अनिल अंबानी-मुकेश अंबानी. असे साधर्म्य दाखविल्याने काय साध्य होते?
चॅनेल फोरच्या स्टुडिओतील चंकी व सलीलची मारामारी, दादा सामंतांचा स्टुडिओतील राडा, पोलिस इन्सपेक्टर सुजीत वळसे गुंड धोत्रेचे एन्काउंटर करतो हे सगळे प्रसंग बाबा कदमांची कादंबरी किंवा राम गोपाल वर्मा यांच्या चित्रपटात शोभावे असे लिहून काय मिळवले?
परळीच्या डॉक्टरांनी स्त्रीभ्रृणहत्या केल्या त्याच्याशी साधर्म्य सांगणारा आख्खा प्रसंग यात आहे. बरं हा लिहीताना किमान स्थळाच्या, नावाच्या चुका तरी करू नयेत. विनिता काळे ही सामाजिक कार्यकर्ती हा विषय मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून हाती घेते. परभणीच्या डॉक्टर्सचे पत्ते आपली वर्ग मैत्रिण वल्लरी कर्दळेला फोन करून ती विचारते, ‘तूला डॉ.धनाजी भोंगळे माहित आहे का?’ आणि वरच्या परिच्छेदात लिहीले आहे की तीला डॉ.रमेश भोंगळेची चौकशी करायची असते. रमेश की धनाजी? हे काय प्रकरण आहे. एकाच पानावर नाव बदलले. परभणीच्या सोनोग्राफी करणार्या डॉक्टरकडे एमटीपी करून घ्यायला जवळच्या पाच पंचविस गावातून नागपुर, चंद्रपुर, अकोल्यापासून माणसं येतात. ही गावं परभणी जवळ आहेत? पुढे पृ. 182 वर अमरावतीपासून विनिताची गाडी 40-50 कि.मी.वर थांबते. स्टिंग ऑपरेशन करायचे आहे. सोनोग्राफी होते परभणीत. आणि स्टींग ऑपरेशन अमरावतीत. गाव कुठले परभणी का अमरावती? हे स्त्री गर्भाचे लहान गोळे कुत्र्यांना खावू घातले जातात. परत मूळ घटनेशी साम्य. म्हणजे लेखकाला या विषयाचे गांभिर्य नाही. केवळ खरी घडलेली एक घटना उचलली आणि पुस्तकात चिटकवली.
ही कादंबरी दूरदर्शन वाहिन्यांशी संबंधीत आहे. साहजिकच या वाहिन्यांचे जे बलस्थान आहे, ग्रामीण भागातील निरक्षर वर्ग, किंवा आता नव्याने साक्षर असलेला पण फारसा विचार करू न शकणारा वर्ग याला काहीच तोशीस न लागता हे मनोरंजन आयते मिळते. साहजिकच अतिशय थोड्या काळात वाहिन्यांचा प्रभाव वाढला. याची कुठे जाणीवच लेखकाला नाही.
पत्रकारीतेला जोडून यात राजकारण आणि थोड्याप्रमाणात उद्योग विश्व येते. सारे काही सरकारने करायचे या भूमिकेमूळे सत्तेचे महत्त्व वाढले. आणि उदारीकरणाच्या काळातही मोकळी हवा काही उद्योगांनाच लाभली. यातून धिरूभाऊ अंबानी, सुब्रोतो रॉय, विजय मल्ल्या यांची साम्राज्य उभी राहिली. यांच्या दोर्या परत सत्ताधार्यांच्या हाती एकवटल्या. यातून ही भ्रष्ट युती तयार झाली. याची खोलवर चिकित्सा न करता लेखक वरवर बायका, दारू, पैसा यांच्या वर्णनात अडकून पडतो.
यात पत्रकारितेच्या बाजूने केवळ कोकण रेल्वेच्या अपघाताची बातमी (पृ.35-44) येते तितकाच तो काय अपवाद. एरवी कुठेही या क्षेत्राबद्दल त्या क्षेत्राच्या दृष्टीने काही मांडल्या जात नाही. मंत्रालयात अद्यायावत सभागृह पत्रकार परिषदेसाठी उभारल्या गेले म्हणजे पत्रकारिता क्षेत्राची माहिती दिली असं होतं का? या वाहिनीच्या उंच इमारतीवर हेलिकॉप्टर उतरायची सोय कशी आहे याचे वर्णन केलं म्हणजे पत्रकारितेने किती उंची गाठली हे सांगणं आहे का?
लहान पोराला एखादा नविन शब्द मिळाला की ते त्याचाच वापर करत राहतं. किंवा एखादं नविन खेळणं मिळालं की त्याच्याच मागे ते दिवसभर असतं. त्याप्रमाणे चॅनल हा एक नविन शब्द आणि खेळणं लेखकाला त्या क्षेत्रात असल्यामुळे मिळालं असं वाटतंय. कारण त्याची दृष्टी त्या पलिकडे जाऊन काही मुलभूत सांगू पाहण्याची दिसत नाही.
मुखपृष्ठ हे चंद्रमोहन यांचे असून त्यांच्या ‘माणूस व खुर्ची’ या मालिकेतून घेतले आहे. खुर्चीच्या हाताची चौकट आणि त्यात अडकलेला माणूस, त्याचा हात हे सगळे अतिशय कलात्मक आहे. पण लेखकाला या माध्यमाची सत्ताच नीट कळलेली नसल्यामुळे त्यात अडकून पडलेला माणूस तो रंगवू शकला नाही. मजकुराची मांडणी करताना दोन दोन तीन तीन ओळींचे परिच्छेद करत उगीच तूकडे पाडले आहेत. परिणामी मजकुर बेढब वाटतो. नेमाडे किंवा पठारे यांच्या मोठ्या कादंबर्यांची सलग मोठ मोठ्या परिच्छेदात मांडणी करून एक सौंदर्यदृष्ट्या आणि आशयदृष्ट्या चांगला परिणाम अक्षर जुळणी करताना साधला गेला आहे. त्याच्या नेमके उलट इथे होते आहे. या मांडणीचा विपरीत परिणाम होऊन वाचकाची एकाग्रता भंगते.
मजकुरावरून कुठल्याच संपादकाचा हात फिरला नाही असे दिसते आहे. हा संपादक बाहेरचाच असला पाहिजे असे नाही. लेखक स्वत:ही हे काम स्वप्रेमातून थोडा बाहेर येवून करू शकतो. आशय महत्वाचा. नुसती वर्णने करून कादंबरी कशी तयार होणार?
(चॅनल फोर लाईव्ह, लेखकःसमीरण वाळवेकर, प्रकाशकः ग्रंथाली, पृष्ठेः386, मुल्यः400 रू.)