----------------------------------------------------------------------
६ ऑक्टोबर २०१२ पाक्षिक शेतकरी संघटक मधील अग्रलेख
----------------------------------------------------------------------
एफडीआयच्या निमित्ताने शेतीमधील आर्थिक गुंतवणुकीचा मुद्दा प्रकर्षाने समोर येतो आहे. या मुद्द्यावर गेल्या 60 वर्षांपासून चर्चा करायची आस्था कधीही शासनाने दाखविली नाही. 1991च्या आर्थिक उदारीकरणाच्या निर्णयापर्यंत ही व्यवस्था पूर्णपणे नेहरूंच्या समाजवादी नियोजनाने साधली तरीही अपेक्षित विकास होऊ शकला नाही. इतकंच नाही शेतकर्यांचं प्रचंड प्रमाणात शोषण झालं. हे सर्व सत्य गॅटसमोर दिलेल्या आकडेवारीतून समोर आलं. म्हणजे शासनानेच आपल्या पापाची कबूली दिली. आता एफडीआयच्या निमित्ताने शेतीक्षेत्रात काही एक गुंतवणूक येण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि पुन्हा एकदा या विषयावर जाणीवपूर्वक गोंधळ उडवून दिल्या जात आहे.
शेती हे तोट्याचं कलम आहे, असं स्पष्ट अभ्यासाद्वारे शेतकरी संघटनेने मांडलं होतं. जनआंदोलनाची मोहोरही या अभ्यासावर उमटवली होती. तोट्याचं कलम असल्यामुळे साहजिकच शेतीत गुंतवणूक करायला कोणीच तयार नव्हतं. शासन, तथाकथित देशी दुकानदार, मोठ्या भांडवलदारी कंपन्या कोणीच शेतीमधल्या गुंतवणूकीला तयार झालं नाही. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शेतीचं जाणीवपूर्वक शोषण नेहरू व्यवस्थेने केलेले होते. उद्योगांना मोठमोठ्या सवलती दिल्या. उद्योगांचे लाड केले. मोठ्या कोडकौतुकाने मोठमोठे उद्योग म्हणजे आधुनिक भारतातील तीर्थस्थळे आहेत, असे उद्गार जवाहरलाल नेहरू यांनी काढले; पण शेती म्हणजे पुण्यस्थळ आहे असं काही कधी जवाहरलाल नेहरूंच्या जीभेवर आलं नाही. लाल बहादूर शास्त्री यांनी पहिल्यांदा शेतीकडे लक्ष पुरवलं, पण शेतकर्यांचं दुर्दैव ‘जय जवान, जय किसान’ म्हणणार्या आमच्या या पंतप्रधानाला अतिशय अल्प असा कालावधी मिळाला. त्यांच्यानंतर परत एकदा शेतीच्या दुस्वासाचं धोरण नेहरूकन्या इंदिरा गांधींनी मन:पूर्वक पुढे चालवलं. या प्रचंड मोठ्या कालावधीमध्ये शेतीत गुंतवणूक व्हावी, शेतीचा विकास व्हावा शेतमालाच्या भावाचा प्रश्र्न सुटावा यासाठी कोणी रोखलं होतं. ज्या आर्थिक उदारीकरणाच्या नावाने सर्व डावे बेंबीच्या देठापासून बोंब मारतात हे सगळे आर्थिक उदारीकरण पूर्व काळात कुठे गायब झाले होते. या काळातलं शेतीचं शोषण यांनी काय म्हणून खपवून घेतलं?
खरे तर चित्र आता स्पष्ट झालं आहे. किरकोळ उद्योगातले जे व्यापारी आहेत त्यांच्यात मोठ्या प्रमाणात हितसंबंध राजकीय पक्षांचे अडकले आहेत. खरे तर अगदी छोट्या व्यापार्यांना कुठलाही धक्का बसेल अशी शक्यता अजिबात नाही. ही सगळी कारणमीमांसा या अंकातील लेखांमधून वाचकांना स्पष्ट होईल. डाव्यांची मोठी गंमत आहे. व्यापारी हा भाजपचा हितचिंतक राहिलेला आहे. त्यामुळे भाजपाने त्यांची बाजू घेणे समजून घेता येते; पण डाव्यांचं काय चालू आहे. ते नेमकी कुणाची बाजू घेतात. त्यांची भीती वेगळीच आहे. आजपर्यंत त्यांना संघटीत क्षेत्रातील कामगारांच्या जीवावर राजकारण करायची चटक लागलेली होती. हे सर्व संघटीत क्षेत्र प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या शासनाशी बांधील होतं. सरकारी उद्योग असोत, निमसरकारी उद्योग असोत. राष्ट्रीयीकृत बँका असोत. यातील कर्मचार्यांचे लढे उभारणे हे तंत्र डाव्या चळवळीने सहजपणे आत्मसात केलं होतं. तसेच शासनाच्या लायसन्स-कोटा-परमीट सूज आलेला उद्योग व्यवसाय असो यांच्या कामगारांमध्ये युनियनबाजी करणं याचंही तंत्र डाव्यांना चांगलच अवगत झालेलं होतं. या वातावरणात चटावलेले हे डावे कधीही चुकूनसुद्धा असंघटित क्षेत्रातल्या कामगारांचे लढे उभारताना दिसले नाहीत. पगाराच्या दिवशी कारखान्याच्या गेटवर उभं राहून कामगारांकडून युनियनची सक्तीची पावती फाडणे ही सोपी गोष्ट होती. आता मात्र मोठाच प्रश्र्न समोर उभा राहिला आहे. 1991 नंतर आलेले उद्योग असोत, अथवा मोठ्या प्रमाणात आलेलं परकीय भांडवल असो किंवा आता एफडीआयच्या निमित्ताने येऊ घातलेलं भांडवल असो. या सगळ्याला तोंड द्यायची कुठलीच तयारी डाव्यांची नाही. नवीन भांडवलाने स्थापन झालेल्या उद्योगांचं स्वरूपही निराळं राहिलं आहे आणि भविष्यातही त्यांच्या दिशा पारंपारिक संकल्पनांना छेद देणार्या आहेत. या परिस्थितीत काय करावं यानं डावे पूर्णपणे बावचळून गेले आहेत. एखादी कंपनी मोठ्या प्रमाणात आपल्या कामाचं आऊटसोर्सिंग करते. विविध ठिकाणांहून सुटे भाग तयार करून त्यांची जोडणी एखाद्या ठिकाणी केली जाते. कामगारांची संख्या जी आधी प्रचंड मोठ्या प्रमाणात होती तिला तर आळा बसलाच आहे; पण कामगारांच्या कामाचं स्वरूपही बदललेलं आहे. कामगारांच्या कामाच्या वेळा हीपण मोठी गुंतागुंतीची गोष्ट होऊन बसली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीने कामाचं स्वरूप बदलून गेलेलं आहे आणि या परिस्थितीत कामगार हिताच्या गोंडस नावाखाली स्वत:च राजकारण चालवणे डाव्यांना अवघड होऊन बसलं आहे.
एफडीआयमधील गुंतवणुकीच्या निमित्ताने ही सगळी डाव्या आणि उजव्यांमधली अस्वस्थता उघडपणे समोर येऊन दोघांचेही बिंग फुटले आहे. 70% शेतकर्यांच्या हितासाठी ही गुंतवणूक योग्य ठरण्याची शक्यता आहे. तिच्यात अडचणी तर आहेतच; पण आधीच्या व्यवस्थेने पूर्णपणे नाडल्या गेलेल्या या वर्गाला ही गुंतवणूक काही आशा दाखवते आहे. अशाप्रसंगी या गुंतवणुकीला अपशकून करण्याचं पाप डावे-उजवे हातात हात घालून करत आहेत. या विचित्र काळामध्ये शेतकरी संघटनांची जबाबदारी अजूनच वाढली आहे. आता उभी राहावी लागणारी आंदोलनं अतिशय वेगळ्या प्रकारची असणार आहेत. खरे तर 1991च्या जागतिकीकरणानंतर आंदोलनांचं स्वरूपही बदललं पाहिजे, हे बर्याच चळवळींच्या लक्षातही नाही आलं. शेतकरी संघटनेने मात्र ही दखल घेऊन सातत्याने नवीन मागण्या शासनाकडे केल्या आहेत. इतकंच नाही तर त्यासाठी आंदोलन परिणामकारक होण्याच्या पद्धतीही शोधून काढल्या आहेत. आता एफडीआयच्या निमित्ताने आंदोलनाला पहिल्यांदाच व्यापक अशी अर्थव्यवहाराची जोड मिळण्याची शक्यता आहे. ज्या स्थितीमध्ये भारतीय शेतकरी काम करतो ती अवस्था मोठी कष्टाची, त्रासाची आणि दयनीय आहे. शेतकर्याचा बांध ओलांडून त्याच्या मातीत उतरून त्रास करून घ्यायला परदेशी उद्योग तर सोडाच देशी उद्योगपतीही कधी जायला तयार नाहीत. इतकंच कशाला शेतकर्याची थोडीफार शिकलेली पोरंही स्वत:ला मातीत मळून घ्यायला तयार नाहीत. शेतकर्यांच्या हिताच्या बाता करणारे शेतकर्यांच्या पाण्याच्या नावाखाली आर्थिक सिंचन करून स्वत:चेच तळे भरून घेणारे चुकूनही स्वत:चे हात मातीने मळून घेत नाहीत. यांच्या कपड्यांना चुकूनही घामाचा वास येत नाही. यांची कातडी इथल्या उन्हाने जरादेखील करपत नाही. अशा परिस्थितीत गरजेचा भाग म्हणून परकीय भांडवल जर शेतीत येणार असेल तर ही एक आल्हाददायक वार्याची झुळूक भारतीय शेतकर्यासाठी ठरू शकते.