---------------------------------------------------------------
२१ ऑगस्ट २०१२ पाक्षिक शेतकरी संघटक मधील अग्रलेख
---------------------------------------------------------------
शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी दि. 3 सप्टेंबर रोजी वयाची सत्त्याहत्तर वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यांनी उभारलेली शेतकरी चळवळ 32 वर्षांची झाली आहे. नुकत्याच झालेल्या अण्णा हजारेंच्या आंदोलनानिमित्ताने पत्रकारांनी शेतकरी संघटना आणि टीमअण्णा यांची तुलना करून काही विचित्र निष्कर्ष मांडले आहेत. खरे तर शेतकरी चळवळीचे मूल्यमापन करीत असताना शरद जोशींनी मांडलेला शेती संदर्भातला विचार हा महत्त्वाचा मानायला पाहिजे आणि तसा तो मानून काही एक तुलनात्मक अभ्यास इतर चळवळींशी केला पाहिजे; पण माध्यमांमधील उठवळ पत्रकारांना आणि बाष्कळ विचारवंतांना इतका आचपेच कुठला? शेतकरी चळवळीतील शेतकर्यांचे प्रश्र्न राहिले बाजूला, अण्णांच्या चळवळीने चर्चेला आणलेला भ्रष्टाचाराचा मुद्दा तो राहिला बाजूला आणि तुलना व्हायला लागली राजकीय भूमिकांची.
कुठल्याही चळवळी या समाजाच्या विशिष्ट गरजेतून तयार झालेल्या असतात. समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला म्हणूनच तर त्या फोफावत असतात किंबहुना समाजाच्या प्रतिसादाशिवाय चळवळ होऊच शकत नाही. त्यामुळे शेतकरी चळवळीला मिळालेला सर्वसामान्य शेतकर्यांचा प्रतिसाद असो किंवा गेल्या वर्षभरापासून अण्णा हजारे आणि बाबा रामदेव यांना सामान्य जनतेने दिलेला प्रतिसाद असो हा उत्स्फूर्त होता हे मान्य करायला पाहिजे. इतकंच काय राम मंदिराच्या प्रश्र्नावरून भाजपाने जी रथयात्रा काढली तिलाही मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनतेने प्रतिसाद दिला होता आणि तोही त्या विषयापुरता आणि त्या काळापुरता उत्स्फूर्तच होता; पण हे समजून न घेता जेव्हा प्रतिसाद कमी झाल्याचे दिसले की लगेच माध्यमांनी अण्णा हजारेंवरती टीकास्त्र सोडायला सुरुवात केली. अण्णांनी राजकीय पक्षाची स्थापना करण्यासंदर्भात काही एक हालचाली सुरू केल्या आणि मग तर मोठाच गहजब झाला. जेव्हा अण्णांच्या या निर्णयाची तुलना शरद जोशींनी स्थापन केलेल्या स्वतंत्र भारत पक्षाशी केल्या गेली आणि निष्कर्ष काढताना आत्मघाताकडे नेणारा मार्ग असा केला गेला हा तर फारच अन्यायकारक आणि बेजबाबदारपणाचा आहे. मुळातच एका विशिष्ट टप्प्यामध्ये चळवळी या राजकारणापासून अलिप्त राहू शकत नाहीत हे आम्हाला मान्यच होत नाही. राजकीय भूमिका ही घ्यावीच लागते. अन्यथा लाठ्या-काठ्या खाणारे, रास्तारोको करणारे, तुरुंगात जाणारे यांनी हालअपेष्टा सहन करायच्या, तोशिष लावून घ्यायची, व्यावहारिक पातळीवरील सर्व फायदे दूर लोटायचे आणि भलत्याच उपटसूंभांनी पाच वर्षांतून एकदाच येऊन सगळी मलई खाऊन जायचं हे नेहमी नेहमी का घडावं? त्यामुळे बर्याचदा चळवळींमधून राजकीय पक्ष स्थापन होणे किंवा या चळवळींमुळे राजकीय पक्षांना धक्के बसणे स्वाभाविक आहे. इतकं नाही, चळवळींच्या रेट्यामुळे राजकारणाचा पोत बदलणे, दिशा बदलणे किंबहुना एकूणच राजकीय संस्कृतीत बदल होणे हे घडून आलेले आहे. जयप्रकाश नारायण यांची चळवळ ही नंतर राजकीय पक्षात रूपांतरीत झालीच. विश्वनाथ प्रतापसिंग यांनी जनमोर्चा स्थापन करून चळवळ सुरू केली होती. तिलाही राजकीय यश लाभले. देशभर पसरलेल्या रा. स्व. संघाच्या विस्तारातून राजकीय यश मिळत नाही हे पाहिल्यावर भारतीय जनता पक्षाने रामजन्म भूमीच्या माध्यमातून लोकांच्या भावनेला स्पर्श करणारी जी हाक दिली होती. तिच्यातूनही चळवळच तयार झाली आणि तिचाही परिणाम राजकीय यशामध्ये झाला. चळवळीतून आलेले मुलायम सिंग यादव, लालूप्रसाद यादव ही मंडळी सत्ताकारणात मुख्य भूमिका निभावत आहेत ती कशामुळे? म्हणजेच चळवळी या राजकीय पक्षात रूपांतरीत होऊन राजकीय यश मिळवतात हेही घडत आलेलं आहे.
शेतकरी चळवळीने राजकीय पक्षाचा प्रयोग अचानक केलेला नाही. शेतकरी संघटनेच्या सटाणा येथे झालेल्या पहिल्या अधिवेशनात 1982 सालीच सर्व राजकीय पर्याय खुले असल्याच ठराव मान्य केला होता. इतकंच नव्हे 1984, 1989 या दोन्ही लोकसभेच्या निवडणुका तसेच 1985 व 1990 या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका यात सक्रीय भूमिका घेतली होती. 1990 साली शेतकरी संघटनेचे पाच कार्यकर्ते जनता दलाच्या चिन्हावरती महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडूनही आले होते. त्याच वेळी शरद पवारांच्या नेतृत्वाखालील एकत्रित कॉंग्रेसचे बहुमत हुकले होते. तेव्हापासून आजपर्यंत एकाही पक्षाला किंवा आघाडीला महाराष्ट्राच्या विधानसभेत बहुमत मिळवता आलेले नाही. शरद जोशींनी 1994 ला स्थापन केलेला स्वतंत्र भारत पक्ष हा जर आत्मघाताकडे नेणारा मार्ग असेल तर 1978 पासून उलटसुलट उड्या मारून विविध आघाड्या करूनही आपल्या पक्षाला किंवा कॉंग्रेसला एकदाही बहुमत मिळवू न देणारे शरद पवार यांचा मार्ग राजकीय चातुर्याचा आहे असं मानायचं का? गेल्या तीस वर्षांमध्ये भारतात स्वत:च्या जीवावर बहुमत मिळवण्याची ताकद एकाही राजकीय पक्षात शिल्लक नाही आणि याचं श्रेय निश्र्चितच चळवळींना द्यावं लागेल. आज अण्णा हजारेंची तुलना शरद जोशींशी करणारे हे विसरतात की शेतकरी संघटनेला एक भक्कम असा वैचारिक पाया आहे. इतकंच नव्हे तर राजकीय अपयशाचा कुठलाही परिणाम शेतकरी चळवळीवरती होऊ शकलेला नाही. आज वयाच्या सत्त्याहत्तराव्या वर्षीही शरद जोशी परकीय गुंतवणुकीबाबत (एफडीआय) अतिशय ठाम अशी भूमिका घेतात. ही भूमिका बांधावर उभ्या असलेल्या त्यांच्या शेतकरी अनुयायाला अतिशय सुयोग्यपणे समजते आणि तोही ही मागणी जोर लावून करताना दिसतो. असं अण्णा हजारेंच्या बाबतीत घडलेलं नाही. गेल्या 32 वर्षांच्या काळात एक मोठी वैचारिक घुसळण शेतीप्रश्र्नावरती शरद जोशींनी घडवून आणली. ती इतकी परिणामकारक होती, अगदी या वेळेसच्या 15 ऑगस्टच्या भाषणातही शेतकर्यांच्या कर्जाचा प्रश्र्न अर्थतज्ज्ञ असलेल्या पंतप्रधानांना उपस्थित करावा लागला आणि शेतकरी संघटनेची भूमिका जाहीररीत्या मान्य करावी लागली. हे अण्णा हजारेंच्या बाबतीत घडलेलं नाही. काळाचा वेध घेणारा कुठलाही विचार अजूनही अण्णांनी मांडलेला नाही. अण्णांच्या मांडणीमध्ये वैचारिक पातळीवर कुठलीही सुसूत्रता नाही, अण्णांचं बोलणं, अण्णांचा विचार त्यांच्या तथाकथित कार्यकर्त्याला कळत असेल अशीही शक्यता नाही. अशा परिस्थितीत अण्णांची तुलना शरद जोशींशी करणे आणि टीमअण्णा व शेतकरी संघटनेला एकाच पारड्यात तोलणे हे शरद जोशींवर आणि शेतकरी संघटनेवर अन्याय करणारे आहे.
शरद जोशी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वैचारिक पातळीवरील चळवळींचा गांभीर्याने विचार देशातील पत्रकार, विचारवंत आणि राजकीय नेत्यांनी करावा ही किमान अपेक्षा!