Friday, February 16, 2018

शारंगदेव समारोह : समृद्ध संगीत परंपरांचा विलोभनिय अविष्कार


उरूस, सा.विवेक, 4-10 फेब्रुवारी 2018

विद्वान चर्चा करत होते की तेराव्या शतकात देवगिरी किल्ल्यावर यादवांच्या दरबारातील महान संगीतकार शारंगदेव याच्या संगीत रत्नाकर ग्रंथात वर्णन केलेली ‘किन्नरी विणा’ आता अस्तित्वात आहे का? कुणी ती वाजवत असेल का? आणि आश्चर्य म्हणजे तेलंगणातील सुदूर खेड्यात असा एक दलित वादक सापडला जो की आजही ही किन्नरी वीणा वाजवतो. या महान कलाकाराचे नाव दर्शनम मोगुलैय्या. या कलाकाराला तेलगु शिवाय कुठलीही भाषा येत नाही. संगीत अभ्यासक डॉ. इंद्राणी चक्रवर्ती यांनी हा कलाकार शोधून काढला. औरंगाबाद येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ‘शारंगदेव समारोह’ मध्ये दर्शनम मोगुलय्या यांच्या ‘किन्नरी वीणा’ सादरीकरणाने रसिक थक्क झाले. या वाद्यावर विदुषी डॉ. इंद्राणी चक्रवर्ती यांनी आपला निबंध वाचला तेंव्हा त्यावर चर्चा करताना इतर अभ्यासकांना प्रश्‍न पडला की या वाद्यावर सा रे ग म हे स्वर कसे वाजतात. ते वाजवून दाखविण्याचा आग्रह सगळे दर्शनम मोगुलय्या यांना करत होते. पण दर्शनम यांना इतरांची भाषा कळेना. त्यांना खुणेने जेंव्हा वाद्य वाजवून दाखविण्या सांगितले तेंव्हा त्यांनी ते खालून वर वाजवायला सुरवात केली. विद्वान सगळे चकित झाले की एरव्ही वरतून खाली तंतू वाद्य वाजविले जाते. त्याची सरगम तशी आरोहात्मक सांगितलेली आहे. मग हा कलाकार असे खालून वर का वाजवित आहे? 

राजस्थान मधील असेच एक वाद्य ‘रावणहत्था’ याचा अभ्यास करणार्‍या डॉ. सुनीरा कासलीवाल यांना हा प्रकार  लक्षात आला. त्यांनी शारंगदेवाच्या संगीत रत्नाकर ग्रंथाचा संदर्भ देत अवरोहात्मक वादनाचा उल्लेख केला आहे. हे लोककलाकार शिक्षीत नाहीत, त्यांना वाचता येत नाही पण परंपरेने त्यांनी 700 वर्षांनपासून  हे ज्ञान पक्कं आत्मसात केलं आहे. 

गेली 8 वर्षे औरंगाबादला महागामी गुरूकुल ‘शारंगदेव समारोह’ आयोजीत करते आहे. यात संपूर्ण भारतातील विविध नृत्य प्रकार, लोककला, लोकवाद्य, अभिजात कलाप्रकार, विविध वाद्य प्रकार यांचे सादरीकरण होते. याहून महत्त्वाचे म्हणजे या महोत्सवाचाच एक अतिशय मोलाचा भाग म्हणजे ‘शारंगदेव प्रसंग’. म्हणजेच संगीतातील विविध विषयांवर विद्वानांची भाषणं, निबंध वाचन, वाद्यांच्या निर्मितीवर कलेच्या विकासावर चर्चा घडवून आणली जाते. 


या गंभीर चर्चेचा परिणाम म्हणजे ‘किन्नरी वीणा’ सारखे वाद्य सापडणे आणि अवरोहात्मक संगीत व्याख्येचे कोडे उलगडणे. ही एक अतिशय मोठी उपलब्धी या समारोहाची आहे. 

संगीताची लिखीत जवळपास एक हजार वर्षांची मोठी परंपरा आपल्याकडे आहे. त्यातील ज्या नोंदी आहेत त्या प्रमाणे सादर होणार्‍या कला, वाजविली जाणारी वाद्य यांचे सादरीकरण हे अतियश अवघड काम आहे.

या वर्षी पियल भट्टाचार्य यांच्या कलकत्ता स्थित कलामंडळाने ‘मार्ग नाट्य’ हा एक हजार वर्षांपूर्वीचा नाट्याविष्कार मंचावर सादर केला. आधुनिक कलाविष्काराचा कोणताही प्रभाव न पडू देता भरताच्या नाट्यशास्त्राच्या आधारे रंगमंच सादरीकरण करणे हे अतिशय अवघड आहे. पण पियल भट्टाचार्य यांच्या तरूण सहकार्यांनी सादर केलेले हे ‘संकीर्ण भाणक’ (विविध भाषांचा उपयोग केलेले जसे की संस्कृत, पाली, बंगाली, मागधी इ.) रसिकांना खिळवून ठेवणारे होते.

राजस्थान येथील सुगना राम आणि त्यांचे सहकारी यांनी पारंपारिक ‘रावणहत्था’ या वाद्याचा प्रमुख वापर करून ‘झुमर’ हा लोककलेचा प्रकार सादर केला जो की रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला. व्हायोलीन हे आधुनिक पाश्चिमात्य वाद्य जे की गज फिरवून वाजवले जाते त्याची प्रेरणा या ‘रावणहत्था’तून आलेली असल्याचे आता विद्वानांनी संशोधनाने सिद्ध केले आहे. हे वाद्य वाजविणारे हे कलाकार जन्मजात वादक आहेत. त्यांच्या घराण्यात हे वाद्य 700 वर्षांपासून चालू आहे. हे वाद्य ते स्वत:च तयार करतात. लुप्त होत जाणारी ही कला आता शासनाच्या आणि कलाप्रेमींच्या आश्रयामुळे जागरूकतेमुळे वाचली आहे. या वाद्याचा वैशिष्ट्य म्हणजे याच्या गजाला घुंगरू बसविलेले असतात. म्हणजे तंतू वाद्य वाजविताना नादही आपोआप प्राप्त होतो. 

भारतीय कलांचा प्रभाव भारतीय उपखंडातील इतर देशांवरही पडलेला आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मलेशिया येथील प्रसिद्ध उडिसी नर्तक ‘रामली इब्राहीम’. त्यांना ओडिसी नृत्याचे विविध विभ्रम मंचावरून सादर करताना पाहून विश्वासच बसत नव्हता की यांचे वय 65 आहे. ओडिशी गुरू देवप्रसाद दास यांच्या नृत्य परंपरेचे गुरूकुल ते मलेशियात मोठ्या चिकाटीने चालवत आहेत. 

महागामी गुरूकुलाच्या संचालिका ओडिसी व कथ्थक नृत्यांगना सुश्री पार्वती दत्ता यांनी या महोत्सवात ‘धृपदांगी कथ्थक’ हा ऊर्जापूर्ण नृत्यप्रकार सादर करून रसिकांना संमोहित केले. कथ्थक म्हणजे वाजिद अली शाहच्या दरबारातून विकसित झालेला नृत्य प्रकार. हीच प्रतिमा सर्वत्र ठसलेली आहे. असं असताना कथ्थकला धृपदाशी जोडून त्याचे विविध अविष्कार रंगमंचावर सादर करणे हे फार अवघड आव्हान आहे. हे आव्हान पार्वती दत्ता यांनी लिलया पेलले. त्यांनी या प्रकारात सादर केलेली जगदंबा स्तूती नृत्य अभ्यासकांसाठी पर्वणीच होती. 

ग्वाल्हेर घराण्याचे गायक पंडित सत्यशील देशपांडे यांना गाण्यासोबतच या विषयातील अभ्यासू विद्वान म्हणून ओळखले जाते. शेवटच्या सत्रात त्यांचे गायन आणि दुसर्‍या दिवशी त्यांचे ख्याल गायनावर व्याख्यान असा दुहेरी लाभ रसिकांना मिळाला.

ख्यालाचे संदर्भ राजस्थानी संगीतातून आधीपासून सापडतात हे त्यांनी सोदाहरण दाखवून दिले. तसेच ‘खयाल’ पासून ख्याल शब्द आला असेच नसून तालाशी लयीशी केलेली क्रिडा म्हणजेच खेळ यापासूनही हा ‘खयाल’ शब्द आला असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. आपले गुरू कुमार गंधर्व यांच्या गायकिची उदाहरणे देत त्यांनी ग्वाल्हेर घराण्याच्या पारंपरिक बंदिशीही सादर केल्या.


ज्येष्ठ हिंदी कवी अशोक वाजपेयी यांनी आपल्या व्याख्यानातून परंपरा आणि शास्त्र यांच्यातील नाते उलगडून दाखवले. अशोक वाजपेयी यांनी आपल्या देशातील विविधांगी परंपरांचा मागोवा घेत शास्त्राचे जाणकार शास्त्राच्या मर्यादा उल्लंघून कसे पुढे जातात हे पं. कुमार गंधर्व यांचे उदाहरण देवून स्पष्ट केले. 

शारंगदेव समारोहात दरवर्षी एका संगीत विद्वान कलाकार व्यक्तिमत्वाचा गौरव ‘शारंगदेव सन्मान’ देवून केला जातो.  कथ्थक गुरू पद्मविभुषण पं. बिरजू महाराज, धृपद गायक उस्ताद झिया फरिद्दुन्नीन डागर, पं. हरिप्रसाद चौरसिया, भरतनाट्यम गुरू पद्मा सुब्रमण्यम आदींना यापूर्वी हा सन्मान देवून गौरविण्यात आले होते. या वर्षी हा सन्मान संस्कृत तज्ज्ञ, संगीतकार, अभ्यासक पद्मश्री डॉ. मुकुंद लाठ यांना देण्यात आला. मराठी लोकांसाठी अभिमानाची बाब म्हणजे डॉ. लाठ यांनी नामदेवांच्या हिंदी रचनांचा समीक्षात्मक अभ्यास केला असून त्यांचा ग्रंथ संदर्भ म्हणून अतिशय मोलाचा आहे. 

‘शारंगदेव समारोह’ एका वेगळ्या पद्धतीनं आयोजीत केला जातो आहे. संगीत रत्नाकर हा महान ग्रंथ शारंगदेवांनी जिथे लिहीला त्या देवगिरीच्या परिसरात हा समारोह साजरा होतो आहे याला एक वेगळे महत्त्व आहे. मकर संक्रांतीनंतर उत्तरायण सुरू होते त्या मुहूर्तावर या समारोहाचे आयेाजन केले जाते. महागामीचा सगळा परिसर गुरू पार्वती दत्ता यांनी अतिशय कलात्मक रितीने सजवला आहे. या परिसरात प्लास्टिकचा तुकडाही आढळत नाही (खुर्च्याही नाहीत. बसायचा लाकडी लोखंडी अथवा दगडी बाक आहेत. गवताच्या चटया आहेत. सुती सतरंज्या आहेत.). कलाकारांचे कपडे सुती-रेशमीच असतात. कृत्रिम धाग्यांना इथे बंदीच आहे. एकूणच काय तर सगळ्याच कृत्रिमतेला बंदी आहे. 


या महोत्सवाला शासकीय पातळीवर पाठिंबा मिळणे अतिशय आवश्यक आहे. युनेस्कोने गौरविलेले महाराष्ट्रातील हे एकमेव गुरूकुल आहे. या महोत्सवाला परदेशी पर्यटक सुद्धा मोठ्या संख्येने हजेरी लावतात. कारण त्यांना आपल्या परंपरा समजून घेण्यात रस आहे. ‘रावणहत्था’ वाद्याच्या अभ्यासक सुनीता कासलीवाल यांनी सांगितले की परदेशी अभ्यासक जेंव्हा हे वाद्य शिकतात तेंव्हा ते अगदी शाकाहारच घेतात आणि आवर्जून गंगेत स्नान करणे, मंदिरात जावून दर्शन घेणे हे पण करतात. परंपरा समजून घेताना आपणही परंपरेचा आदर करावा याचे भान ते बाळगून असतात.     

आपल्यालाच हे भान बाळगायची गरज सद्यकाळात निर्माण झाली आहे. 

     श्रीकांत उमरीकर, जशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575

No comments:

Post a Comment