उरूस, विवेक, 17 सप्टेंबर 2017
सार्वाजनिक गणेश उत्सव कुणी सुरू केला? टिळकांनी का भाऊ रंगारींनी? असा एक क्षुल्लक वाद उकरून काढण्यात आला. तांत्रिकदृष्ट्या तो भाऊ रंगारींनी सुरू केला हे जरी मान्य केले तरी त्याचा प्रचार आणि प्रसार टिळकांमुळेच झाला यात चर्चा/वाद करण्याचे काही कारणच नाही.
ज्ञानेश्वरांच्यापेक्षा नामदेव वयाने मोठे होते. ज्ञानेश्वरांचे गुरू असलेले निवृत्तीनाथ तर त्यांचे थोरले बंधुच होते. ज्ञानेश्वरांच्याही आधी मुकूंदराजांनी ‘विवेकसिंधू’ ग्रंथ लिहीला. असे असले तरी सर्वांनी वारकरी संप्रदायाचे आद्यत्व आणि मोठेपण ज्ञानेश्वरांनाच बहाल केलेले आढळते. त्यामुळे गणेश उत्सवाचे श्रेय जास्त टिळकांनाच जाते. पण आज जे स्वरूप सार्वजनिक गणेश उत्सवाला आले आहे ते पाहता टिळक म्हणाले असते आमचे चुकलेच.
हा महोत्सव पूर्णत: राजकीय नेत्यांनी कब्ज्यात घेतला आहे. 1990 पर्यंत सार्वजनिक गणेश उत्सवाचे स्वरूप वेगळे होते. प्रचंड मोठे गणपती, त्यांच्यासमोर दिमाखदार मांडव, रोषणाई, खर्चिक आकर्षक देखावे असला प्रकार नव्हता. या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जायचे. शालेय पातळीवर विविध स्पर्धा व्हायच्या. व्याख्यानं, गाण्याचे कार्यक्रम असायचे. बर्याच ठिकाणी या निमित्ताने नाटकं व्हायची. एरव्ही ज्या गावात नाटक पहायला मिळायचे नाही त्या गावात गणपतीच्या काळात होणारे नाटक ही पर्वणी असायची. काही मोठे गायक नेमके याच काळात सर्वसामान्य रसिकांना ऐकायला मिळायचे.
गल्लीच्या पातळीवरील कलाकारांना आपली कला दाखवायला संधी याच व्यासपिठांवर मिळायची.
1990 नंतर दोन गोष्टीत बदल झाला. कॉंग्रेसची एकाधिकारशाही संपून विविध पक्षांना छोटे मोठे सत्तेचे तुकडे अनुभवायला मिळू लागले. परिणामी विविध स्तरातील विविध गटांतील लोकांची महत्त्वाकांक्षा जागृत झाली. त्यांना सार्वजनिक गणेश मंडळाचे सर्वव्यापी स्वरूप खुणावायला लागले.
1990 नंतर जागतिक पातळीवर व्यापार खुला होण्यासोबत भारतात आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी गुंतवणूक वाढवायला सुरूवात केली. या मोठ्या कंपन्या जाहिरात म्हणून गणेश उत्सवांना प्रायोजकत्व द्यायला तयार व्हायला लागल्या. परिणामी कालपर्यंत सर्वसामान्यांच्या जेमतेम वर्गणीवर चालणार्या गणेश मंडळांना जास्तीचा पैसा मिळायला लागला.
चित्रपटांमध्ये 1991 नंतर कार्पोरेट पातळीवर भांडवल यायला लागले. याचा परिणाम म्हणजे करमणुक उद्योग हा लॉटरी/मटक्या सारखा नशिबाचा खेळ न राहता हक्काची गुंतवणूक आणि हक्काचे उत्पन्न असा उद्योग म्हणून वाढत गेला. याचा परिणाम असा झाला की कलाकारांना स्थिर उत्पन्न सुरू झाले. मग या कलाकारांचे भाव प्रचंड वाढत गेले. असे कलाकार गणेश उत्सवात बोलवायचे म्हणजे खर्च मोठ्या प्रमाणात करणे सुरू झाले. असे कलाकार आले की गर्दी गोळा होते हे पाहून प्रायोजकही हात सैल सोडवायला लागले.
गर्दी गोळा होते म्हणून राजकीय नेत्यांचा रस वाढत गेला. त्यांची पकड घट्ट होत गेली.
बघता बघता समाज प्रबोधनाचा स्वातंत्र्यपूर्व काळातील उद्देश मागे पडला. स्वातंत्र्योत्तर काळातील माफक करमणुक, स्थानिक कलाकारांना संधी, मान्यवर कलाकारांची कला ऐकण्याची पाहण्याची संधी हे सगळे मागे पडले. आता गणेश उत्सव मोठा ‘इव्हेंट’ बनत गेला.
‘लालबागचा राजा’ गणपतीचे प्रस्थ तर इतके वाढले की त्याच्या दर्शनाचा ‘व्हि.आय.पी.’ पास मिळावा म्हणून आमदार खासदार मंत्र्यांपर्यंतची शिफारस लागू लागली. या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रभरातून लोक येवू लागले. त्यातून इतरही काही विकृती तयार झाल्या. याच काळात पुणे-मुंबई सारख्या शहरात वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून यायला लागला.
गणेश उत्सवात रस्त्यावर मांडव टाकून रस्ता अडवणे, मोठ्या आवाजात डिजे लावून धांगडधिंगा घालणे, विसर्जनाची मिरवणून म्हणजे तर धिंगाण्याला अधिकृत परवानगीच असे स्वरूप सध्या आले आहे. कार्यकर्ते सांभाळायचे तर हे सगळं करावेच लागते असं राजकीय नेते सर्रास सांगतात. औरंगाबादला तर खा. चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांमधून उघडपणे गणपतीच्या मूर्तीसमोर कार्यकर्त्यांना पत्ते-जुगार खेळू देण्याचे समर्थन केलं आहे.
गणेश उत्सवाचा एक विचित्रच परिणाम टिव्ही मालिकांमधून पहायला भेटत आहे. जसे की हिंदी चित्रपटात एकेकाळी ‘सरसों का साग, मक्केदी रोटी, गाजर का हलवा’ म्हणजे राष्ट्रीय पदार्थ असावेत अशी वर्णनं असायची. जसे काही भारतातील लोक केवळ इतकेच खातात. तसे आता गणेश उत्सवाच्या काळात प्रत्येक मालिकांमधून गणपतीची पूजा, आरती, मोदक यांचा मारा सुरू झालेला आढळून येतो. जसे की मराठी माणूस म्हणजे गणेश उत्सवच केवळ.
नुकतेच जिकडे तिकडे गाजणारे वरूण धवन या हिंदी अभिनेत्याचे गाणे तर कमाल आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, परेशान करे मुझे छोरिया’ आता हे काय बोल झाले? नशिब ऍनिमेशन केलेला गणपती वरूण धवन सोबत नाचताना दाखवला नाही.
काय विरोधाभास आहे पहा. महाराष्ट्रभर गणपतीच्या नावाने दहा दिवस रस्त्यावर सांस्कृतिक गोंधळ घातला जातोय. लाखो करोडो रूपयांची वर्गणी/खंडणी गोळा होते आहे. आणि नेमके याच्या काही दिवसच आधी सुमीत राघवन सारख्या अभिनेत्याने नाट्यगृहांची अवस्था कशी वाईट झाली याची चित्रफित काढून सर्वत्र फिरवली होती. म्हणजे रस्त्यावर सांस्कृतिक गोंधळासाठी आम्ही दौलतजादा उधळत आहोत आणि आमची रंगमंदिरं मात्र निधी अभावी मोडक्या तुटक्या अवस्थेत हलाखीचे जिणे जगत आहेत.
आता लगेच नवरात्रात सर्वत्र दांडिया/गरबा असाच रस्त्यावर खेळला जाईल. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होतील. नोटाबंदीचे सगळे दडपण आता संपले आहे. तेंव्हा नविन कोर्या करकरीत नोटा बाहेर येतील. 200 ची नविन नोटही आता बाजारात येते आहे.
नवरात्र संपल्यावर आपल्या लक्षात येईल की नाट्यगृहांची अवस्था तशीच बिकट आहे. नगर पालिका, महानगरपालिका, राज्य सरकारचे सांस्कृतिक खाते यांच्या नावाने माणसे बोटे मोडताना दिसतील. पण ते हे कबूल करणार नाहीत की गणेश उत्सव किंवा नवरात्रात जी उधळपट्टी झाली ती यांच्याच खिशातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष झाली होती. हाच सगळा पैसा सलग 2 वर्षे महाराष्ट्रभरच्या रसिकांनी नाट्यगृहांच्या दूरूस्तीसाठी द्यायचे ठरवले तर सांस्कृतिक क्षेत्रात भरिव अशी कामगिरी ठरू शकेल.
महाराष्ट्रभरच्या कलाकारांसाठी ही नाट्यगृहं अतिशय महत्वाची आहेत. गणपती व नवरात्रीचे 20 दिवसच नाही तर वर्षभर सांस्कृतिक उपक्रम इथे चालविता येऊ शकतात. रस्त्यावर तात्पुरता मंच उभारणे, ध्वनी-प्रकाश व्यवस्था यांची सोय करणे, खुर्च्या मांडणे यापेक्षा कायमस्वरूपी अशी व्यवस्था कलेच्या विकासासाठी नेहमीच पोषक असते.
टिळकांच्या काळातला गणेश उत्सव विविध संस्थांना जन्म देणारा ठरला. पुणेच काय पण महाराष्ट्रभर विविध संस्था या निमित्ताने उभ्या राहिल्या. मी ज्या गावात लहानाचा मोठा झालो ते परभणी गाव आणि संपूर्ण मराठवाडा 1948 पर्यंत निजामी (निजामशाही नाही) राजवटीत होते. या गावच्या कार्यकर्त्यांनी लोकमान्य टिळकांची इ.स. 1900 मध्ये लातूर येथे भेट घेतली. त्यांना टिळकांनी राजकिय सामाजिक कार्य करण्यासाठी गणेश उत्सवाच्या काळात वाचनालयाची स्थापना करण्याचा सल्ला दिला. 1901 मध्ये ‘गणेश वाचनालय’ याच नावाने हे वाचनालय तेंव्हा स्थापन झाले. आज 117 वर्षांचे हे ग्रंथालय शहराचे सांस्कृतिक भुषण म्हणून कार्यरत आहे. अशी कितीतरी उदाहरणं आहेत.
याच्या उलट आत्ताचे गणेश उत्सव पाहता अशा काही कायमस्वरूपी संस्था, सभागृहे, उपक्रम चालताना दिसतात का? म्हणूनच वैतागून म्हणावेसे वाटते की हा गणेश उत्सव ना टिळकांचा, ना रंगारींचा.. हा उरला फक्त बुंगारींचा!!
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
उमरीकर अगदी बरोबर, मुझे अच्छा याद है 1983/85 आम्ही नारेगाव येथील जि.प शाला मध्ये शिकायल होतो, नारेगाव हा एरिया MIDC चिकलठाना आहे प्रत्येक कारखाना मध्ये गंणपती आसाय्चा.
ReplyDeleteबचपन के दिन भी क्या दिन थे स्कूल मे गणंपती उठाने कि मान मुझे मिलता था. मुझे बहुत सारी आरती भी पाठ थी. लेकिन