Tuesday, September 19, 2017

ललीमावशी गेली......



(लेख श्रीकृष्णचा माझ्या मोठ्या भावाचा, कविता माझी)
 
ललीता कमलाकरराव  भंडारी, माझ्या आईची मावशी काल (१८ सप्टेंबर) वयाच्या ८२ व्या वर्षी गेली. असामान्य कर्तुत्वाची स्त्री होती ती. आजोबा लवकर गेले. त्यांच्या माघारी हिने दोन मुली आणि एक मुलगा वाढवले, शिकवले, मोठे केले. तिची नातवंडे, सुना, नातसुना, जावाई, लेक, लेकी सगळे उच्चशिक्षित उच्च पदस्थ आहेत. 

ती छोट्या खेड्यात ग्रामसेविका होती. अंधूक होत होत तीची दृष्टी गेली. तेव्हा मामा, मावशी शिकत होते. हिने न डगमगता तशाही परिस्थितीमधे नोकरी चालूच ठेवली. ईतर कर्मचारी रिपोर्ट्स वाचायचे. ते हिला पाठ असायचे. स्वतःच्या कामाचे अहवाल ती म्हणून दाखवायची. तिच्या गावात झालेल्या अधिकार्‍यांच्या बैठकित तिने कोण कुठे बसले आहे याची चौकशी करून रिकाम्या खुर्चीत जावून बसली आणि तिला विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत बैठकिचे काम पार पडले. तिला दिसत नाही अशी शंकाही कुणाला आली नाही!

ती दिसत नसले तरी सगळा स्वैपाक करायची. तिच्या हातून कधी तिखट मिठ कमी जास्त झाले नाही ना कधी सांडलवंड झाली ना दुध उतू गेले.

मी तीच्या घरी गेलो की तीच्या बाजूला न बोलता बसून रहायचो. ती विचारायची कोण आहे म्हणून. मी उत्तर देत नसे. ती चाचपडून पहायची. माझा हात सापडला की तो हातात घेवून स्पर्शावरून ओळखायची. जाड झालास, बारीक झालास म्हणायची. निघताना हातात पैसे ठेवायची. मला मुले झाली तरीही. 'अगं मी काय लहान आहे का आता?' असं म्हटलं तर म्हणायची माझ्यापेक्षा मोठा झालास? तीने कधिच मला शिरा न खाउ घालता वापस पाठवले नाही! 

अद्वितिय जिद्द तिच्या अंगी होती. त्या जिद्दीमुळेच ती ईथवर आली. तीचे पाठांतर, तीची स्वच्छता, काय काय सांगू? स्वतःच्या शारिरिक मर्यांदांवर मात करून संपन्न, समृध्द, समाधानी जिणे जगली ती.

गेली अनेक महिने ती अंथरूणावर होती. समज नव्हती. नूसता श्वास चालू होता. बाकी त्रास असा नव्हता काही. मामालाच ओळखायची शेवटी शेवटी. दिवाळीत तीच्या घरी गेलो तर तीच्या खोलीत गेलोही नव्हतो. त्या करारी जिद्दी आज्जीला अंथरूणावर गोळा होवून पडलेलं पहावत नव्हतं. तिचे आयुष्य केंव्हाच संपले असावे. केवळ जिद्दीपोटी ती जगत होती. मला खात्री आहे शेवटी आसपास घोटाळणार्‍या यमाची दया येवून तीने जगण्याची जिद्द सोडली असावी. आणि मगच त्याला तीचे प्राण ताब्यात घेता आले असतील.
त्या असामान्य आज्जीला तीच्या जिद्दीला कोटी कोटी प्रणाम


तू अष्टभुजा

परिस्थितीचा कठीण  कातळ फोडून तू
सळसळत्या उर्मीचा 
जगण्याचा जिवंत झरा शोधून काढलास बाई
आयुष्याच्या  छोट्या छोट्या लढाईत 
आम्ही हतबल होवून बसतो
सगळी शस्त्र बोथट झाली
असं मानतो
अन् तू तर काहीच हाती नसताना
अक्राळ विक्राळ काळाशी
दोन हात करत गेलीस

तूझे दोन आणि तूझ्या तीन लेकरांचे सहा हात
तू अष्टभुजा बनून 
समस्येच्या  महिषासुराचा वध केलास बाई
 
शंकर तर निघून गेला होता अर्ध्यातूनच
तू महाकाली बनून पचवलेस सगळे विष
आणि हसत राहिलीस 
बोळक्या झालेल्या चेहर्‍याने
निरागसपणे

बये तूझी ही चिवट झुंजणारी वृती
दे थोडी थोडी 
आम्हा नातवंडांमध्ये वाटून

आता घटस्थापनेला 
तूझाच बनवून चांदीचा टाक
पूजा करावी म्हणतो आहे..

मला खात्री आहे
तू पावशील नक्की...

- श्रीकांत उमरीकर 

Sunday, September 17, 2017

ना टिळकांचा ना रंगारींचा! गणेशोत्सव फक्त बुंगारींचा !


उरूस, विवेक, 17 सप्टेंबर 2017

सार्वाजनिक गणेश उत्सव कुणी सुरू केला? टिळकांनी का भाऊ रंगारींनी? असा एक क्षुल्लक  वाद उकरून काढण्यात आला. तांत्रिकदृष्ट्या तो भाऊ रंगारींनी सुरू केला हे जरी मान्य केले तरी त्याचा प्रचार आणि प्रसार टिळकांमुळेच झाला यात चर्चा/वाद करण्याचे काही कारणच नाही. 

ज्ञानेश्वरांच्यापेक्षा नामदेव वयाने मोठे होते. ज्ञानेश्वरांचे गुरू असलेले निवृत्तीनाथ तर त्यांचे थोरले बंधुच होते. ज्ञानेश्वरांच्याही आधी मुकूंदराजांनी ‘विवेकसिंधू’ ग्रंथ लिहीला. असे असले तरी सर्वांनी वारकरी संप्रदायाचे आद्यत्व आणि मोठेपण ज्ञानेश्वरांनाच बहाल केलेले आढळते. त्यामुळे गणेश उत्सवाचे श्रेय जास्त टिळकांनाच जाते. पण आज जे स्वरूप सार्वजनिक गणेश उत्सवाला आले आहे ते पाहता टिळक म्हणाले असते आमचे चुकलेच.

हा महोत्सव पूर्णत: राजकीय नेत्यांनी कब्ज्यात घेतला आहे. 1990 पर्यंत सार्वजनिक गणेश उत्सवाचे स्वरूप वेगळे होते. प्रचंड मोठे गणपती, त्यांच्यासमोर दिमाखदार मांडव, रोषणाई, खर्चिक आकर्षक देखावे असला प्रकार नव्हता.  या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जायचे. शालेय पातळीवर विविध स्पर्धा व्हायच्या. व्याख्यानं, गाण्याचे कार्यक्रम असायचे. बर्‍याच ठिकाणी या निमित्ताने नाटकं व्हायची. एरव्ही ज्या गावात नाटक पहायला मिळायचे नाही त्या गावात गणपतीच्या काळात होणारे नाटक ही पर्वणी असायची. काही मोठे गायक नेमके याच काळात सर्वसामान्य रसिकांना ऐकायला मिळायचे. 

गल्लीच्या पातळीवरील कलाकारांना आपली कला दाखवायला संधी याच व्यासपिठांवर मिळायची. 

1990 नंतर दोन गोष्टीत बदल झाला. कॉंग्रेसची एकाधिकारशाही संपून विविध पक्षांना छोटे मोठे सत्तेचे तुकडे अनुभवायला मिळू लागले. परिणामी विविध स्तरातील विविध गटांतील लोकांची महत्त्वाकांक्षा जागृत झाली. त्यांना सार्वजनिक गणेश मंडळाचे सर्वव्यापी स्वरूप खुणावायला लागले. 

1990 नंतर जागतिक पातळीवर व्यापार खुला होण्यासोबत भारतात आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी गुंतवणूक वाढवायला सुरूवात केली. या मोठ्या कंपन्या जाहिरात म्हणून गणेश उत्सवांना प्रायोजकत्व द्यायला तयार व्हायला लागल्या. परिणामी कालपर्यंत सर्वसामान्यांच्या जेमतेम वर्गणीवर चालणार्‍या गणेश मंडळांना जास्तीचा पैसा मिळायला लागला. 

चित्रपटांमध्ये 1991 नंतर कार्पोरेट पातळीवर भांडवल यायला लागले. याचा परिणाम म्हणजे करमणुक उद्योग हा लॉटरी/मटक्या सारखा नशिबाचा खेळ न राहता हक्काची गुंतवणूक आणि हक्काचे उत्पन्न असा उद्योग म्हणून वाढत गेला. याचा परिणाम असा झाला की कलाकारांना स्थिर उत्पन्न सुरू झाले. मग या कलाकारांचे भाव प्रचंड वाढत गेले. असे कलाकार गणेश उत्सवात बोलवायचे म्हणजे खर्च मोठ्या प्रमाणात करणे सुरू झाले. असे कलाकार आले की गर्दी गोळा होते हे पाहून प्रायोजकही हात सैल सोडवायला लागले. 

गर्दी गोळा होते म्हणून राजकीय नेत्यांचा रस वाढत गेला. त्यांची पकड घट्ट होत गेली. 

बघता बघता समाज प्रबोधनाचा स्वातंत्र्यपूर्व काळातील उद्देश मागे पडला. स्वातंत्र्योत्तर काळातील माफक करमणुक, स्थानिक कलाकारांना संधी, मान्यवर कलाकारांची कला ऐकण्याची पाहण्याची संधी हे सगळे मागे पडले. आता गणेश उत्सव मोठा ‘इव्हेंट’ बनत गेला. 

‘लालबागचा राजा’ गणपतीचे प्रस्थ तर इतके वाढले की त्याच्या दर्शनाचा ‘व्हि.आय.पी.’ पास मिळावा म्हणून आमदार खासदार मंत्र्यांपर्यंतची शिफारस लागू लागली. या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रभरातून लोक येवू लागले. त्यातून इतरही काही विकृती तयार झाल्या. याच काळात पुणे-मुंबई सारख्या शहरात वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून यायला लागला. 

गणेश उत्सवात रस्त्यावर मांडव टाकून रस्ता अडवणे, मोठ्या आवाजात डिजे लावून धांगडधिंगा घालणे, विसर्जनाची मिरवणून म्हणजे तर धिंगाण्याला अधिकृत परवानगीच असे स्वरूप सध्या आले आहे. कार्यकर्ते सांभाळायचे तर हे सगळं करावेच लागते असं राजकीय नेते सर्रास सांगतात. औरंगाबादला तर खा. चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांमधून उघडपणे गणपतीच्या मूर्तीसमोर कार्यकर्त्यांना पत्ते-जुगार खेळू देण्याचे समर्थन केलं आहे. 

गणेश उत्सवाचा एक विचित्रच परिणाम टिव्ही मालिकांमधून पहायला भेटत आहे. जसे की हिंदी चित्रपटात एकेकाळी ‘सरसों का साग, मक्केदी रोटी, गाजर का हलवा’ म्हणजे राष्ट्रीय पदार्थ असावेत अशी वर्णनं असायची. जसे काही भारतातील लोक केवळ इतकेच खातात. तसे आता गणेश उत्सवाच्या काळात प्रत्येक मालिकांमधून गणपतीची पूजा, आरती, मोदक यांचा मारा सुरू झालेला आढळून येतो. जसे की मराठी माणूस म्हणजे गणेश उत्सवच केवळ. 

नुकतेच जिकडे तिकडे गाजणारे वरूण धवन या हिंदी अभिनेत्याचे गाणे तर कमाल आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, परेशान करे मुझे छोरिया’ आता हे काय बोल झाले? नशिब ऍनिमेशन केलेला गणपती वरूण धवन सोबत नाचताना दाखवला नाही.

 काय विरोधाभास आहे पहा. महाराष्ट्रभर गणपतीच्या नावाने दहा दिवस रस्त्यावर सांस्कृतिक गोंधळ घातला जातोय. लाखो करोडो रूपयांची वर्गणी/खंडणी गोळा होते आहे. आणि नेमके याच्या काही दिवसच आधी सुमीत राघवन सारख्या अभिनेत्याने नाट्यगृहांची अवस्था कशी वाईट झाली याची चित्रफित काढून सर्वत्र फिरवली होती. म्हणजे रस्त्यावर सांस्कृतिक गोंधळासाठी आम्ही दौलतजादा उधळत आहोत आणि आमची रंगमंदिरं मात्र निधी अभावी मोडक्या तुटक्या अवस्थेत हलाखीचे जिणे जगत आहेत. 

आता लगेच नवरात्रात सर्वत्र दांडिया/गरबा असाच रस्त्यावर खेळला जाईल. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होतील. नोटाबंदीचे सगळे दडपण आता संपले आहे. तेंव्हा नविन कोर्‍या करकरीत नोटा बाहेर येतील. 200 ची नविन नोटही आता बाजारात येते आहे. 

नवरात्र संपल्यावर आपल्या लक्षात येईल की नाट्यगृहांची अवस्था तशीच बिकट आहे. नगर पालिका, महानगरपालिका, राज्य सरकारचे सांस्कृतिक खाते यांच्या नावाने माणसे बोटे मोडताना दिसतील. पण ते हे कबूल करणार नाहीत की गणेश उत्सव किंवा नवरात्रात जी उधळपट्टी झाली ती यांच्याच खिशातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष झाली होती. हाच सगळा पैसा सलग 2 वर्षे महाराष्ट्रभरच्या रसिकांनी नाट्यगृहांच्या दूरूस्तीसाठी द्यायचे ठरवले तर सांस्कृतिक क्षेत्रात भरिव अशी कामगिरी ठरू शकेल. 

महाराष्ट्रभरच्या कलाकारांसाठी ही नाट्यगृहं अतिशय महत्वाची आहेत. गणपती व नवरात्रीचे 20 दिवसच नाही तर वर्षभर सांस्कृतिक उपक्रम इथे चालविता येऊ शकतात. रस्त्यावर तात्पुरता मंच उभारणे, ध्वनी-प्रकाश व्यवस्था यांची सोय करणे, खुर्च्या मांडणे यापेक्षा कायमस्वरूपी अशी व्यवस्था कलेच्या विकासासाठी नेहमीच पोषक असते. 

टिळकांच्या काळातला गणेश उत्सव विविध संस्थांना जन्म देणारा ठरला. पुणेच काय पण महाराष्ट्रभर विविध संस्था या निमित्ताने उभ्या राहिल्या. मी ज्या गावात लहानाचा मोठा झालो ते परभणी गाव आणि संपूर्ण मराठवाडा 1948 पर्यंत निजामी (निजामशाही नाही) राजवटीत होते. या गावच्या कार्यकर्त्यांनी लोकमान्य टिळकांची इ.स. 1900 मध्ये लातूर येथे भेट घेतली. त्यांना टिळकांनी राजकिय सामाजिक कार्य करण्यासाठी गणेश उत्सवाच्या काळात वाचनालयाची स्थापना करण्याचा सल्ला दिला. 1901 मध्ये ‘गणेश वाचनालय’ याच नावाने हे वाचनालय तेंव्हा स्थापन झाले. आज 117 वर्षांचे हे ग्रंथालय शहराचे सांस्कृतिक भुषण म्हणून कार्यरत आहे. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. 

याच्या उलट आत्ताचे गणेश उत्सव पाहता अशा काही कायमस्वरूपी संस्था, सभागृहे, उपक्रम चालताना दिसतात का? म्हणूनच वैतागून म्हणावेसे वाटते की हा गणेश उत्सव ना टिळकांचा, ना रंगारींचा.. हा उरला फक्त बुंगारींचा!! 

  
          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Monday, September 4, 2017

आठवण द्रष्ट्या शेतकरी नेत्याची शरद जोशींची !


उरूस, विवेक, 10 सप्टेंबर 2017

स्व.शरद जोशी यांचा 3 सप्टेंबर हा जन्मदिवस. आज शरद जोशी हयात असते तर ते 82 वर्षांचे झाले असते. पण शरद जोशींची आठवण येण्याचे कारण त्यांची जयंती नाही. तर नुकतेच झालेले शेतकरी आंदोलन आहे. 

जूनच्या पहिल्या आठवड्यात आत्तापर्यंत कधी शेतकर्‍यांकडे ढुंकूनही न पाहिलेल्या डाव्या समाजवादी चळवळीतील नेत्यांनी शेतकरी संपाची हाक दिली. शरद जोशींच्या शेतकरी संघटनेपासून फुटून निघालेल्या काही लोकांनीही त्या लोकांच्या सुरात सूर मिसळला. शेतकर्‍यांच्या मूळ प्रश्‍नापासून दिशाभूल करत हे आंदोलन छेडण्यात आले. शेतकर्‍यांच्या आंदोलनाला अपशकून नको म्हणून शरद जोशींना मानणारी शेतकरी संघटना सावधपणे या आंदोलनात उतरली. आणि मतभेदाचे मुद्दे समोर येताच तातडीने बाजूलाही सरकली.  सुकाणू समिती सोबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. तोडगा काढला. पण त्यावर मतभेद होत संप चालू ठेवण्याचे काही लोकांनी ठरवले. काहींनी संप मागे घेतला. काहींना इतरांनी काळे फासले. काही सत्तेच्या मोहात फुटले. बघता बघता शेतकरी आंदोलनाचा पोरखेळ होवून गेला. 

सगळ्यांनाच शरद जोशींची आठवण झाली. शरद जोशी असते तर असला विचका झाला नसता यावर शेतीशी संबंधीत नसलेल्यांचेही एकमत झाले. आंदोलनाचा असा विचका का झाला? 

त्याला मुख्य कारणीभूत म्हणजे शेती प्रश्‍न न समजणारे डावे समजावादी नेते आणि त्यांच्या वळचणीला आलेले इतर सर्व. मूळात शेतकर्‍यांचा संप कधीही पेरणीच्या काळात म्हणजेच जून जूलै मध्ये करायचा नाही असे तत्त्व शरद जोशींनी पाळले होते. 

कारण भारतात मूख्य शेती आहे तीच मूळी खरीपाची. ही पेरणी हातची गेली तर वर्षभर हात हलवत रहावं लागतं. अगदी शिवाजी महाराजांच्या काळातला दाखला शरद जोशी यांनी आपल्या ‘शेतकर्‍यांचा राजा शिवाजी’ या पुस्तकात दिला आहे. मिर्जा राजे जयसिंग यांच्यासोबत जो तह झाला तो जूनचा महिना होता. आधी दोन वर्षे दुष्काळ होता. आता चांगला पाऊस सुरू झाला होता. तेंव्हा जर आपले मावळे युद्धात अडकून पडले तर त्यांना पेरणी करता येणार नाही. परिणामी खायला भेटणार नाही. महाराजांनी धोरणीपणाने शेतकर्‍यांचे सगळ्या रयतेचे हित डोळ्यापुढे ठेवून तह केला. परिणामी पेरणीसाठी मावळ्यांना उसंत भेटली. 

अस्मिता म्हणून सतत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणारे मात्र आजच्या काळात शिवाजी महाराजांची ही शिकवण विसरले. आणि यांनी नेमका पेरणीच्या काळातच संप पुकारला. सततच्या दुष्काळातून आत्ताच कुठे जरा परिस्थिती सावरत होती. मागच्या वर्षीच्या पावसातून जरा तरी आशा निर्माण झाली होती. आणि त्याच काळात नेमका हा चुकीचा निर्णय घेतला गेला. 

खरं तर गंभीर प्रश्‍न निर्माण झाला होता तुरीचा. आणि आंदोलन केल्या गेले ते मुंबई सारख्या शहराचा फळे-दुध-भाजीपाला रोकण्याचे. आता याला काय म्हणावे? फळे-दुध-भाजीपाला यांच्यासाठी कधीही हमीभाव ठरत नाहीत. हमीभाव आणि त्याप्रमाणे खरेदी हे अन्नधान्याच्या बाबतीत आहे. 

शरद जोशींनी जेंव्हा कांद्याचे आंदोलन केले, मुंबई आग्रा रस्ता बारा दिवस रोकून धरला त्यामागे एक तत्त्व होते. की कांद्याची बाजारपेठ ही संपूर्णत: नाशिक परिसरातील शेतकर्‍यांच्या उत्पादनावर अवलंबून होती. निपाणीला तंबाखूचे उत्पादन सगळ्यात जास्त होते म्हणून तिथे आंदोलन केल्या गेले. अंबाजोगाईला ज्वारी परिषद घेतली. पंढरपुरला दुधाचे आंदोलन केले. परभणी-हिंगोली पट्ट्यात कापसाचे आंदोलन केल्या गेले. हे सगळे करण्यात एक विशिष्ट परिस्थिती, त्या पिकाचा अभ्यास, राजकीय स्थिती, जागतिक बाजारपेठेचा अभ्यास होता. एका एका पिकात आंदोलन करून शक्ती खर्च करायची नाही म्हणून मग हमी भावाचा आणि नंतर खुल्या बाजारपेठेचा विषय लावून धरला. 

पण असला काहीच विचार न करता अतिशय वेडगळ पद्धतीनं शेतकर्‍यांचा संप जून महिन्यात पुकारला गेला. हा संप फसला तेंव्हा सगळ्यांना शरद जोशींची आठवण तीव्रतेनं आली.

शरद जोशींची हमी भावाची मागणी 1980 ते 1990 या काळात सातत्याने पुढे रेटली. 1990 नंतरच्या जागतिकीकरण पर्वात जागतिक बाजरपेठेत संधी मिळण्याची शक्यता निर्माण होताच हमी भावाची मागणी बाजूला ठेवून खुल्या बाजारपेठेची मागणी लावून धरली. त्यातील द्रष्ट्येपण आताही अनुभवायला मिळत आहे. कांद्याचे भाव मागच्या वर्षी कोसळले होते. शासनाने कृषी उत्पन्न बाजार नियमन मुक्ती केली. केवळ एका वर्षातच त्याचे परिणाम कांद्याच्या शेतकर्‍याला पहायला भेटत आहेत. ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात निर्यात कांद्याला जास्तीचा 10 रू. भाव भेटला. 20 लाख टन कांद्याचे जास्तीचे 2 हजार कोटी रूपये कृषी बाजारात आले. 

शरद जोशींनी हमी भावा ऐवजी खुला बाजार मागितला होता. याचा शेतकर्‍याला कसा फायदा होवू शकतो याचा अजून एक पुरावाही हाती आला आहे. तुरीला हमीभाव सरकारने जाहिर केला होता 5050 रू. त्यात 50 टक्के नफा मिळवला तर त्याची किंमत जाते 7525 रूपये. आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तुरीला जो भाव मिळाला तो होता 10 हजार रूपये. मग आता सांगा शेतकर्‍याला काय परवडेल हमी भाव की खुला बाजार? 

हमी भाव देवून सगळी तूर खरेदी करणं शासनाला शक्य नाही हे कुणीही सांगू शकतं. किंबहूना जगातले कुठलेच शासन ठराविक भाव देवून सगळा शेतमाल खरेदी करू शकत नाहीत. मग अशावेळी हमी भाव मागायचाच कशाला? 

शरद जोशींच्या द्रष्टेपणाचा अजून एक पुरावा कृषी अर्थतज्ज्ञ अशोक गुलाटी यांनी नुकत्याच आपल्या मांडणीतून आकडेवारीसगट पुढे ठेवला आहे. 

2014-15 या काळात गहू आणि तांदूळ यांच्यासाठी जगभरातील सगळ्यात कमी हमी भाव (एम.एस.पी.) भारत सरकारने दिले. ज्या चीनशी उठसूट आपली तुलना चालते त्या चीननेही भारताच्या दीडपट भाव दिले होते. समजण्यासाठी हे आकडे असे आहेत- जर भारतात तांदळाला 330 रूपये मिळत असतील तर तेवढ्याच तांदळाला चीनमध्ये 504 रूपये मिळतात. गव्हाच्या बाबतीतही हे आकडे भारत 226 रूपये तर चीन 384 रूपये आहे. अगदी आपले शत्रू राष्ट्र पाकिस्तानही गव्हाला 319 रूपये देते. म्हणजे आपला शेतकरी आतंकवादी दहशतवादी बनून त्याने आपला गहू आणि तांदूळ देशद्रोह करून चीन-पाकिस्तान सारख्या देशाला विकण्याचे आंदोलन केले असते तर त्याला फायदा मिळाला असता. 

आता साखरेचा प्रश्‍न गंभीर आहे. ‘ऊस नव्हे काठी आहे, कारखानदारांच्या पाठी आहे’ म्हणत आता आंदोलन केल्या जाईल. परत ऊसवाले शेतकरी रस्त्यावर उतरतील. परत उसाचा भाव काय असावा याची चर्चा करण्यासाठी शासनाची समिती बसेल. पण या सगळ्या समस्येच्या मूळाशी जो तिढा आहे तो काही सोडवला जाणार नाही. 

शरद जोशींची स्वच्छपणे मागणी केली होती की साखर उद्योग नियंत्रण मुक्त केला पाहिजे. त्याशिवाय साखरेचा प्रश्‍न सुटणार नाही. घरगुती वापरासाठी जी साखर वापरली जाते तिचे प्रमाण केवळ 32 टक्के इतकेच आहे. इतर सर्व साखर औद्योगिक वापरासाठी (औषधी -मिठाया- आईसक्रिम-शीतपेये) वापरली जाते. मग अशा परिस्थितीत ही साखर काय म्हणून कृत्रिमरित्या स्वस्त करायची? साखर काही जीवनावश्यक वस्तू नाही. साखर खायला भेटली नाही म्हणून शेकडो लोकांचा मृत्यू अशी बातमी आजतागायत वाचायला भेटली नाही. 

शरद जोशींची तीव्र आठवण समृद्धी महामार्गावरील जमिनींचे अधिग्रहण करताना निर्माण झालेला गोंधळ, अधिकार्‍यांचे निलंबन या प्रसंगी झाली. शेतजमिनी बाबत जमिन अधिग्रहण कायदा, जमिन धारणा कायदा हे सगळे जाचक कायदे इंग्रज काळांपासून आहेत. हे सगळे तातडीने बरखास्त केले पाहिजेत. शेत जमिनीची बाजारपेठही खुली केली पाहिजे असे शरद जोशींनी आग्रहाने सांगितले होते. समृद्धी महामार्गाबाबत असे लक्षात आले की बाजारभावापेक्षा जास्त किंमत मिळाली की लगेच शेतकरी जमिनी विकायला तयार झाले. म्हणजे उद्योगांना ज्या प्रमाणे शेकडो एकर जमिन बाळगता येते किंवा गरज नसेल तर विकता येते तर याच पद्धतीनं शेतकर्‍याला का करता येवू नये? आणि जर ही संधी त्याला मिळाली तर तोही खुशीनं शेती करू शकेल किंवा शेतीतून बाहेर पडू शकेल. जबरदस्तीनं शेतीशी बांधील राहण्याचे काही कारण नाही. 

शरद जोशी काळाच्या पुढचे पाहणारा नेता होता हे परत परत सिद्ध होते आहे. शेतमालाला जस जसा खुला बाजार मिळत जाईल तस तसा शरद जोशींचा आत्मा स्वर्गात सुखी होईल.         
          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Friday, September 1, 2017

राजू शेट्टींची शरद जोशींना गुरूदक्षिणा !



संबळ, दिव्य मराठी, शुक्रवार 1 सप्टेंबर 2017

अखेर राजू शेट्टी यांनी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा बुधवारी 30 ऑगस्ट रोजी पुण्यात केली. आपल्याकडे फोडणीत कढीपत्ता टाकला जातो. त्यानं एक खमंग अशी चव पदार्थाला येते. पण प्रत्यक्ष जेंव्हा पदार्थ खायला घेतला जातो तेंव्हा हा कढीपत्ता मात्र बाहेर काढून टाकला जातो. त्या प्रमाणे निवडणुकीच्या वेळेस भाजप-मोदी लाटेचा खमंगपणा हवा म्हणून राजू शेट्टी रा.लो.आ. बरोबर गेले. याचे फळ म्हणजे त्यांना खासदारकीची लॉटरी लागली. अगदी पाच लाखांच्याही पुढे मते मिळाली.

पण लगेच चार महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टींचा एकही आमदार निवडून आला नाही. गंमत म्हणजे नेमक्या किती जागा त्यांनी तेंव्हा लढवल्या हे त्यांनाही सांगता यायचं नाही. कारण सरळ आहे की त्यांनी कुठल्याही वैचारिक आधारावर ही युती केली नव्हती. ही राजकिय सौदेबाजीच होती हे नंतर स्पष्ट झाले. जनता सवाल विचारते आहे म्हणून आता सत्तेबाहेर पडले आहेत.

केंद्रात तर कुठलेच मंत्रिपद राजू शेट्टींच्या पक्षाला मिळाले नाही. महाराष्ट्रातही दोन वर्षांनंतर सदाभाऊ खोतांच्या रूपाने एक राज्यमंत्रीपद पदरात पडले. सदाभाऊ काही विधानसभेत निवडून आले नव्हते. मग त्यांना विधानपरिषदेवर निवडून आणावे लागले. मगच मंत्रिपदाची झुल त्यांच्या पाठीवर पडली.

सोयरिक मोडण्याची घोषणा मुलीच्या बापाने करावी, सगळे वर्‍हाडी परत निघून जावेत. आणि नवरीनं मात्र हट्ट करून नवर्‍यासोबत निघून जावे अशी गंमत घडली. जो एकमेव सत्तेचा तुकडा स्वाभिमानी पक्षाच्या पदरात पडला होता त्या सदाभाऊ खोतांनी मात्र मंत्रीपद सोडण्यास नकार दिला. त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्या गेली. स्वाभिमानी सत्ताधारी आघाडीतून बाहेर पण सदाभाऊ मात्र सगळा स्वाभिमान गुंडाळून सत्तासुंदरीच्या मोहात खुर्चीला चिटकून राहिले.

या सगळ्या घडामोडी गुरूपौर्णिमा (9 जूलै) ते राजू शेट्टी- सदाभाऊ यांचे गुरू शरद जोशी यांची जयंती (3 सप्टेंबर) या दरम्यान घडल्या.

सत्तेचा त्याग करून राजू शेट्टींनी आपल्या गुरूला मरणोपरांत गुरूदक्षिणाच दिली असे म्हणावे लागेल.

मग आता प्रश्‍न निर्माण होतो की मूळात राजू शेट्टी काय म्हणून भाजप सोबत गेले होते? सदाभाऊ खोत यांना जिल्हा परिषदेसाठी आपल्याच मुलाला तिकीट द्यावं वाटलं, त्याच्या विजयासाठी त्यांनी जिवाचं रान केलं. मग ते त्यांच्या गुरूपासून काय शिकले?

राजू शेट्टी यांनी शेतकरी संघटना सोडताना शरद जोशी जातियवादी पक्षांसोबत गेले असं सांगितलं होतं. मग मधल्याकाळात राजू शेट्टी यांनी भाजप आघाडीला गोमुत्र शिंपडून पवित्र करून घेतलं होतं की काय?

राजू शेट्टी-सदाभाऊ हे तरूण सळसळत्या रक्ताचे पश्‍चिम महाराष्ट्रातील कार्यकर्ते शेतकरी संघटनेला लाभले तेंव्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष होते रघुनाथ दादा पाटील. याच कार्यकर्त्यांच्या बळावर 11,12 नोव्हेंबर 2000 ला शेतकरी संघटनेचे सहावे अधिवेशन मिरजला संपन्न झाले. त्यासाठी राजू शेट्टी- सदाभाऊंनी प्रचंड मेहनत घेतली होती. तेंव्हा केंद्रात वाजपेयी सरकार होते. या सरकारने शरद जोशींना कृषी कार्यबलाचा अध्यक्ष म्हणून नेमले होते. त्यांना केंद्रिय मंत्रिपदाचा दर्जा होता. शरद जोशी लाल दिव्याच्या गाडीतून अधिवेशनाला आले होते. तेंव्हा ते असे म्हणाले होते अधिवेशनात ‘‘मी तूमचा प्रतिनिधी म्हणून हे पद स्विकारले आहे. हा अहवाल तयार करून मी शासनाला सादर करेन. पण त्या शिफारशी अमलात आणण्यासाठी पाठपुरावा करण्याची जबाबदारी संघटनेच्या तूम्हा कार्यकर्त्यांची आहे. तूमची शक्ती पाठीशी आहे म्हणून हा लाल दिवा माझ्या डोक्यावर आहे.’’

याच वेळी पाशा पटेल भाजप मध्ये गेले होते. शंकर धोंडगे राष्ट्रवादीत गेले होते. शंकर धोंडगें अधिवेशनाकडे फिरकलेच नाहीत. पण पाशा पटेल मात्र आले. त्यांचा भ्रम होता की आपण संघटनेचे माजी अध्यक्ष आहोत. आपण भाजपमध्ये गेलो ते शेतकर्‍यांच्या भल्यासाठीच. तेंव्हा आपल्याला या अधिवेशनात मंचावरून सहज भाषण करता येईल. पण शेतकरी संघटनेच्या सामान्य कार्यकर्त्यांनी पाशा पटेलांचा निषेध केला. त्यांनी भाषण केले तर दगडं फेकून मारू असा संताप व्यक्त केला. विधानसभेचे उप-सभापती राहिलेले मा.आ. मोरेश्वर टेंमूर्डे यांनी कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेवून पाशा पटेलांना मंचावरून भाषण करण्याची परवानगी नाकारली.

हे सगळं राजू शेट्टी-सदाभाऊ यांच्या समोर घडत होतं. शरद जोशींनी ठरलेल्या मुदतीच्या दीड वर्षे आधीच आपला अहवाल तयार करून शासनाला सादर केला. लगेच पदाचा राजीनामा दिला. त्या पदाच्या अनुषंगाने येणारे सगळे फायदे बंगला-गाडी-भत्ते सगळं ताबडतोब सोडलं.

2004 च्या निवडणुकीत फार मोठ्या प्रमाणात डाव्या पक्षाचे खासदार संसदेत निवडून आले होते. इतकी मोठी संख्या डाव्यांची असण्याची ही पहिली वेळ. तेंव्हा त्यांना वैचारिक तोंड देण्यासाठी तूमची आम्हाला आवश्यकता आहे असे म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांनी शरद जोशींना राज्यसभेतील खासदारकी दिली. आपल्या पक्षाला मिळणार्‍या वेळेतला वेळ शरद जोशींना त्यांची मांडणी करण्यासाठी दिला. या पदाची मुदत संपताच दुसरी टर्मही देण्याची तयारी भाजपने दाखवली होती. पण शरद जोशींनी ती सपशेल नाकारली.

हे सगळं उदाहरण समोर असताना शरद जोशींचे शिष्य म्हणूवन घेणारे सदाभाऊ सगळा स्वाभिमान सोडून सत्तेला चिटकून राहतात, आपल्याच मुलाला तिकीट देवून घराणेशाहीचे विकृत दर्शन घडवतात, पोराच्या लग्नात डोळ्यात भरावी अशी उधळपट्टी करतात याला काय म्हणावे?

राजू शेट्टींनी उशीरा का होईना सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला हे बरे झाले. पण ते ज्या मागण्या समोर ठेवत आहेत त्या मोठ्या विचित्र आहेत.

‘सरकार समस्या क्या सुलझाये सरकार खुद समस्या है’ अशी शेतकरी संघटनेची घोषणा आहे. शिवाय ‘भीक नको हवे घामाचे दाम’ ही दुसरी घोषणा आहे. मग राजू शेट्टी काय म्हणून परत स्वामिनाथन आयोगाच्या रूपाने सरकारी हस्तक्षेपाची हमी भावाची मागणी पुढे रेटत आहेत?

डॉ. अशोक गुलाटी यांनी नुकतेच आकडेवारीसह हे सिद्ध केले आहे की किमान हमी भावाच्या नावाखाली भारतीय सरकारने गहु आणि तांदुळाच्या शेतकर्‍यांचे शोषण केले आहे. हे हमी भाव जागतिक बाजारपेठेतील भावापेक्षा कमीच राहिलेले आहेत. म्हणजे सरकारी हमी भाव कमीच राहतात. इतकेच काय तर तूरीच्या बाबतीत तर असेही सिद्ध झाले आहे की हमी भाव अधिक 50 टक्के नफा ही रक्कमही जागतिक बाजारातील भावापेक्षा कमी राहिलेली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचे भाव वाढून काही एक नफा मिळण्याची संधी निर्माण होताच हे शासन परत कांद्याला  निर्यात बंदी लावणे आणि कांदा आयात करून भाव पाडण्याचा अघोरी खेळ सुरू करत आहे. मग हा मुद्दा राजू शेट्टींना का नाही उचलावा वाटत?

राजू शेट्टी सत्तेतून बाहेर पडले याला खरे कारण समोर येणारा उसाचा हंगाम आहे. उसाचे पीक या वर्षी भरपूर आहे. त्यामुळे उसाचा प्रश्‍न गंभीर बनणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे भाव पडले आहेत. त्यामुळे यावेळी उसाला भाव मिळण्याची अजिबात शक्यता नाही. अशावेळी जर सत्तेत राहिलो तर हे आपले शेतकरी आधी आपल्याच टाळक्यात ऊस हाणतील ही भिती आहे. उसाचे आंदोलन छेडताना आता राजू शेट्टींना आपल्या गुरूची शिकवण समजून घ्यावी लागेल. शरद जोशींनी मूळ मागणी केली होती साखर उद्योग नियंत्रण मुक्त करा. सहकारी साखर कारखानदारीच्या निमित्ताने सरकारचा होणारा हस्तक्षेप तातडीने संपवा. साखर काही जिवनावश्यक वस्तू नाही. तेंव्हा या साखरेला जिवनावश्यक वस्तू यादीतून पहिले बाहेर काढा.

राजू शेट्टी तूम्ही सत्ता त्यागून शरद जोशींना  गुरूदक्षिणा दिली आहेच. पण आता साखर उद्योग नियंत्रण मुक्त करा अशी दीर्घ मूदतीत फायदेशीर ठरणारी मागणी आग्रहाने करा. तरच तूम्ही शरद जोशींचे खरे वारसदार ठराल. बिल्ल्याचा लाल रंग आणि नावात शेतकरी संघटना इतकं ठेवल्याने शरद जोशींचा वारसा मिळाला असं होत नाही. पंचा नेसला म्हणजे कुणी गांधी ठरत नाही हे लक्षात घ्या.

श्रीकांत उमरीकर, जशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575