रूमणं, गुरूवार 27 एप्रिल 2017 दै. गांवकरी, औरंगाबाद
घटना सत्य आहे. आमच्या एका मित्राचे वडिल शेतीसोबत छोटी मोठी गुत्तेदारी करायचे. गुत्त्तेदारी वाढली मोठं काम भेटलं म्हणून मूळ गाव सोडून जिल्ह्याच्या मोठी गावी आहे. छोटंसं घर बांधून बायको दोन मुलं एक मुलीसह रहायला लागले. मुलं मोठी होत गेली तशी तशी त्यांना काही प्रश्न पडायला लागले. आपल्या वडिलांसारखेच आजूबाजूच्या मित्रांचे वडिल कमावतात, आपल्या सोबतच त्यांनी जागा घेतली. त्यांनीही असेच हळू हळू घर बांधले. पण त्यांच्याकडे दिसणारी समृद्धी आपल्याकडे का नाही? पाहूणा आला तर बसायला चार धड खुर्च्या नाहीत. धान्याच्या पोत्यांवर सतरंजी टाकून आपण बसतो. पोरं अजून मोठी झाली. कमावायला लागली आणि त्यांना लक्षात आलं की वडिलांनी गुत्तेदारीत कमावलेला बराचसा शेतात गडप होतो. बहिणीचं लग्न आलं तेंव्हा शेतीचा तुकडा विकायला लागला. दोन्ही कमावत्या भावांनी ठरवलं कुठल्याही परिस्थितीत वडिलांना शेतीत पैसा ओतू द्यायचा नाही. आत्तापर्यंत वडिलांना साथ देणार्या आईनंही पोरांना साथ दिली. वडिलांचा नाईलाज झाला. वय वाढलं तसं गुत्तेदारी कमी झाली. पण आश्चर्य म्हणजे शेतीत पैसा घालणं बंद झालं तशी घरात बरकत सुरू झाली. रंगरंगोटी, नवीन बांधकाम, सुबक साधं फर्निचर. शेतात काहीच पेरायचं नाही हे काही मनालं पटेना. तसं पोरांनी गावच्या चुलत भावाशी करार केला. तूला तूझ्या शेतासोबत जे काही पेरायचं ते आमच्या शेतात पेरायचं. आलेल्या उत्पन्नाचा ठराविक वाटा द्यायचा. पण एक पैसाही मागायचा नाही.
दोनच वर्षांत पोरांच्या लक्षात आलं की शेती नाही केली तरच फायदा होतो. कारण अधून मधून शेतीचे विविध योजनांखाली थोडेफार पैसे येतात. सुशिक्षीत कमावत्या पोरांमुळे लाल्या रोगाचे, दुष्काळाचे आलेले पैसे बुडवायची कुणाची हिंमत होत नाही.
वडिलांना सुरवातीला हे कटू सत्य पचवायला जड गेलं. पण घरच्या रेट्यामुळे मान्य करणं भाग पडलं. गेली पाच वर्षे हे कुटूंब शेतीत एक दाणाही पेरत नाही. जे काही थोडंफार उत्पन्न होतं ते घरी खायला होतं. घरचं धान्य म्हणून समाधानही मिळतं. आता रान रिकामं ठेवून जनावरांसाठी चराई म्हणून ठेवण्याचं त्यांनी निर्णय घेतला. आजूबाजूचे गुराखी, दुभती जनावरं सांभाळणारे त्यांना त्यासाठी वर्षासाठी बर्यापैकी भाडं देतात.
हे सगळं आठवायचं कारण म्हणजे नुकतीच झालेली शेतकरी संपाच्या आंदोलनाची घोषणा.
सगळ्यांना सध्या हा प्रश्न पडला आहे की खरंच शेतकरी संपावर जाईल का? शेतकरी संपावर जावो किंवा न जावो पोटात गोळा यासाठी उठला आहे की पर्यायी व्यवस्था काय? जे कुणी थोडाफार विचार करू इच्छितात त्यांना हा प्रश्न सतावतो आहे.
आजपर्यंत शासनाने/शहरी मध्यमवर्गाने हे गृहीत धरले होते की कुठलाही पर्याय नसल्याने शेतकरी शेती करतच राहतो. पर्यायाने आपल्या अन्नधान्याची सोय होते. त्याचे भाव चढले की परत बोंब मारता येते. जिवनावश्यक वस्तूचा कायदा करून त्या नावाखाली धान्य सतत पडत्या भावाने मिळत राहते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्पादन वाढविण्याचे आव्हान शेतकर्याला केले होते. तीन वर्षे शेतकरी दुष्काळात पिचला होता. पण तरीही शेतकर्यांनी यावर्षी चांगला पाऊस पडला की उभारी धरली. खरीपाची पेरणी उत्साहात केली. तुरीचे बंपर पिक घेऊन दाखवले. उत्पादन प्रचंड वाढले.
आणि जेंव्हा हे तूरीचे बंपर पीक बाजारात आले तेंव्हा काय चित्र दिसले? तुरीचे भाव पाच पटीने कोसळलेले. 250 रूपयांपर्यंत गेलेली तूर 40 रूपयांपेक्षाही खाली कोसळलेली. शासनाने खरेदी करावी (कारण तूर जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत आहे) म्हणून आग्रह धरण्यात आला. शासनाने हमी भाव कबूल केला होता 5050 रूपये क्विंटलला. पण प्रत्यक्षात चार हजारापेक्षाही कमी भावाने खरेदी झाली. आता तर तूर खरेदी अधिकृतरित्या बंदच करण्यात आली. अजून शेतकर्यांपाशी तूर शिल्लक आहे.
या ठिकाणी पहिल्यांदा संपाचा विषय समोर येतो. कितीही उत्पादन वाढलं तरी फायदा नाही. दुष्काळात होरपळून निघत असतानाही आपल्या देशाला डाळ आयात करावी लागते म्हणून शेतकरी मर मर करून थोडीशी जरी अनुकूलता मिळाली तरी प्रचंड उत्पादन केवळ पावसाच्या पाण्यावर आणि आपल्या घामाच्या मेहनतीच्या बळावर घेवून दाखवतो. पण त्याच्या मेहनतीची किंमत आम्ही करत नाही. सगळं मातीमोल होतं.
मग असंच जर राहणार असेल तर शेतकर्याने पेरावं तरी का?
दुष्काळाचा विषय निघाला की सगळे उसाच्या शेतीकडे बोट दाखवतात. आपल्या आपल्या गावात छोटी मोठी जलसंधारणाची कामं केलेली माणसं पाण्यावरची पिकं घेणं कसे योग्य नाही हे मांडत राहतात. या सगळ्या मंडळींची तोंडं यावेळी गप्प झाली. कोरडवाहू तूर, कापूस, सोयाबीन सगळ्यांचेच भाव पडले. मग आता शेतकर्याला काय म्हणून तोंड द्यायचे? त्यांनी तर पाण्यावरची पिकं घेतली नव्हती.
दुसरीकडे ज्या साखरेचं कौतूक केलं जातं. आणि टिकाही केली जाते त्या साखरेच्या भावाचंही असंच झालं. मागच्या लेखात गुजरातेत मिळालेले जास्तीचे भाव पाहून आमचे शेतकरी चिडले. इतकं सहकाराचे कौतूक केले जाते. मग हा सहकार आमच्या उसाला गुजरात इतका भाव का नाही देवू शकत? याचेही परत कुणाकडेच उत्तर नाही.
पाण्याचे पीक असो की बीनपाण्याचे त्यातून तोटाच जन्माला येणार असेल तर शेती करायचीच कशाला?
शेती करणार्या घरातले एखादे दुसरे मुल शिकून सवरून शहरात जाते. नौकरी करते. त्याला सुरवातीला सांगितला तसा अनुभव येत राहतो. शेतीत कितीही टाका बरकत येतच नाही. मग तोही हळू हळू शेतीत पैसे द्यायला नकार द्यायला सुरवात करतो.
आमच्या दुसर्या एका मित्राने तर गावाकडच्या आईवडिलांना शेती न करण्याच्या अटीवरच महिन्याला खर्चाचे पैसे पाठवणे सुरू केलंय. त्याचं म्हणणं शेतीत पैसा घालून तोटा करून घेण्यापेक्षा त्यांना जो काही जगायला थोडाफार पैसा लागतो तोच सरळ देणं परवडतं. बाकी दुखणे खुपणे दवाखाने तर आपण सांभाळतच असतो. आणि यामुळे गेली दहा वर्षे आपली कशी बचत होते आहे. आणि त्यामुळे शहरातल्या संसाराचीही आर्थिक घडीही चांगली बसत चालली आहे हेही त्याने आकडेवारीसह दाखवलं.
पहिल्यांदाच असे दिसते आहे की खेड्यातील शेतकरी घरातली शहरात राहणारी पोरंही आता बापानं शेती न केली तरच चांगलं या निर्णयाला आलेली दिसत आहेत. त्यामुळे शेतकरी संपासाठी अतिशय अनुकूल वातावरण तयार झाले आहे.
जर हा संप निदान अन्नधान्याच्या उत्पादनाबाबत यशस्वी झाला तर पहिल्यांदा शासनाला/शेती न करणार्या मध्यमवर्गाला जाणीव होईल अन्नधान्याची किंमत काय ते. बाहेरून अन्नधान्य आणताना त्यासाठी खर्च होणारी रक्कम पाहून लक्षात येईल की यापेक्षा शेतकरी जे मागत होता ते किती कमी आहे.
अशोक गुलाटी यांनी आकडेवारीने सिद्ध करून दाखवले आहे की गेल्या चार वर्षांत उत्तर प्रदेशात किमान हमी भावापेक्षाही कमी भावाने शेतीमालाची खरेदी करणे, किंवा त्यांच्या ‘फसल बीमा’ योजनेचा हप्ता न भरणे या सगळ्या मुळे शेतकर्यांचे झालेले नुकसान (फक्त उत्तर प्रदेशातील) 41 हजार कोटी रूपये आहे. आणि त्या बदल्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहिर केलेली कर्जमाफी (शेतकरी चळवळीचा शब्द आहे कर्जमुक्ती) आहे फक्त 36 हजार कोटींची.
महाराष्ट्राचाही असा आकडा काढला तर लक्षात येईल की शेतकर्यांचे जे आणि जेवढे थकित कर्ज आहे त्याच्या कित्येक पट रक्कम आपणच शेतकर्यांना देणं लागतो.
मग अशा वातावरणात शेतकरी संपावर जातील नाही तर काय करतील? सर्व शेतकरी भावांना कळकळीची विनंती एकदा सगळे मिळून संपावर जाच जा. या खरीपात एकही दाणा पेरू नका. तूमच्या कुटूंबाला लागेल तेवढं धान्य आत्ताच साठवून ठेवा. प्रत्यक्षात शेती तोट्यात घालणारे आणि वरकरणी शेतकर्याचे गोडवे गाणार्यांना बसू दे बोंबलत!
इंद्रजीत भालेराव यांच्या कवितेत ही भावना अतिशय नेमकेपणाने आली आहे.
सांगा माझ्या बापाने
सांगा माझ्या बापानं नाही केला पेरा
तर तुम्ही काय खाल ? धत्तुरा !
असं म्हणायची खरं तर माझी इच्छा नाही
पण माझ्या बापानं आत्महत्या करूनही
आमच्या आयुष्याला तुमची सदिच्छा नाही
तसं असतं तर तुम्ही आमच्या धानाचं मोल केलं असतं
मग आम्हीही आमचं काळीज
तुमच्यासाठी आणखी खोल केलं असतं
पेरा करणार्या माझ्या बापाचा घास
मग अपुरा राहिला नसता
ऐतखाऊंच्या ताटात तुपाचा शिरा रहिला नसता
रस पिऊन माझ्या बापाचा तुम्ही ठिवलाय फक्त चुर्रा
आकाश माती पाणी उजेड वारा
यासारखाच शेतकरीही सृष्टीचं सहावं तत्त्व आहे
पण तुम्हाला कुठं त्याचं महत्त्व आहे !
हवापाण्यासारखीच तुम्हाला ज्वारीही फुकट हवी आहे
रोज भाजी ताजी आणि निकट हवी आहे
कारखान्यात ज्वारी पिकत नाही
अन् कारखान्यातला माल तुम्हीही फुकट विकत नाही
आम्हालाही वाटत्रं जगावरउपकार करावेत
पुस्तकात नसलेलेही काही चमत्कार करावेत
पण उडून गेलाय सगळा आमच्या आयुष्याचा पारा
-इंद्रजीत भालेराव (सारे रान, पृ.267, प्रकाशक : जनशक्ती वाचक चळवळ.)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. 9422878575
No comments:
Post a Comment