Thursday, March 30, 2017

भाजपची राजकारणी गाय आणि दुधाचे राजकारण


रूमणं, गुरूवार 30 मार्च 2017  दै. गांवकरी, औरंगाबाद
उत्तरप्रदेश मध्ये भाजप प्रचंड बहुसंख्येने निवडून आला. सुरवातीच्या काही धडाकेबाज निर्णयामध्ये अनधिकृत कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची घेतला. आणि या प्रश्‍नाची जोरदार चर्चा भारतभर सुरू झाली. बावचळलेले पुरोगामी तर यावर काय प्रतिक्रिया द्यावे यानेच गोंधळलेले आहेत. भारतातील एकूण नऊ हजार कत्तलखान्यांपैकी जवळपास अर्धे कत्तलखाने (साडेचार हजार) उत्तरप्रदेश मध्येच आहेत. त्याचे कारणही साधे सोपे आहे. हा प्रदेश म्हणजे शेकडो एकर सुपिक जमिनीचा प्रदेश. येथील शेती म्हणजे पाण्यावरची बागायती शेती. शेकडो नव्हे तर हजारो वर्षांपासून हा प्रदेश धनधान्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे इथे गोधन विपूल प्रमाणात आहे. मग याचाच दुसरा भाग समोर येतो तो म्हणजे भाकड जनावरे. आणि भाकड जनावरे म्हटले की कत्तलखाने आलेच. 

त्यामुळे एकीकडे गाय गोमाता म्हणायचे आणि दुसरीकडे उत्तरप्रदेशात सगळ्यात जास्त कत्तलखाने आढळणार. यात तसा व्यवहारिकदृष्ट्या काही विरोधाभास नाही. बीफ निर्यात करण्यात सगळ्यात जास्त वाटा उत्तर प्रदेशाचाच आहे. राजकारणापोटी भाजपने कसलाही विचार न करता गो हत्या बंदी चे पुढचे पाऊल म्हणून गोवंश हत्या बंदी आणली. त्यावर भावनिक दृष्टीनं होणारी अभिनिवेशी चर्चा तुर्तास सध्या बाजूला ठेवू. त्याचे राजकारण करून भाजपने प्रचंड यश मिळवले आहेच. पण आता दुधाचा दुसरा पैलू जो की महत्त्वाचा आहे त्याचा विचार करू. 

डॉ. अशोक गुलाटी हे कृषी अर्थशास्त्राचे जाणकार अभ्यासक आहेत. त्यांनी समोर आणलेली आकडेवारी चकित करणारी आहे. ज्या ठिकाणी दुधाचं उत्पादन प्रचंड होतं त्या ठिकाणीच दुधावर प्रक्रिया करणारे उद्योग अतिशय कमी आहेत. डॉ. गुलाटी यांच्या आकडेवारीनं इतरांचे नाही तरी भाजप-संघ परिवार यांचे डोळे उघडण्याची गरज आहे. आणि ही सगळी तुलना भाजपचचेच राज्य असलेल्या गुजरातशी त्यांनी करून दाखवली आहे. 

भारतातील 12 राज्यं दुध उत्पादनात महत्वाची आहेत. ज्यांचे वार्षिक उत्पादन पन्नास लाख टन पेक्षा जास्त आहे. (इंग्रजीत समजून घ्यायचे असेल तर पाच मिलीयन टन्स). ही राज्यं क्रमानं अशी आहेत उत्तरप्रदेश (250 ला.ट.), राजस्थान (170 ला.ट.), गुजरात (120 ला.ट.), मध्यप्रदेश (110 ला.ट.), पंजाब (100 ला.ट.), आंध्र प्रदेश (90 ला.ट.), महाराष्ट्र (85 ला.ट.) हरियाणा (75 ला.ट.), बिहार (70 ला.ट.), तामिळनाडू (65 ला.ट.), कर्नाटक (60 ला.ट.) पश्‍चिम बंगाल (50 ला.ट.)

डॉ. अशोक गुलाटी यांनी पुढची जी आकडेवारी सादर केली आहे ती खरी विचार करण्यासारखी आहे. उपलब्ध किती टक्के दुधावर प्रक्रिया केली जाते? प्रक्रिया केलेले दुध म्हणजे काय? आणि यामुळे शेतकर्‍याला काय फायदा मिळतो? इथेच खरी मेख आहे.

जे दुध उपलब्ध आहे ते नाशवंत आहे. नुसतं दुध म्हणून त्याचा वापर दुधाला जास्त दर मिळवून देवू शकत नाही. पण याच दुधाचे दही, तुप, श्रीखंड, लोणी, ताक, लस्सी, आईसक्रिम, दुध भुकटी तयार केली तर त्याला जास्तीची किंमत मिळू शकते. मग हे करण्याचे उद्योग नेमके कुठे आहेत? 

ज्या प्रदेशात सगळ्यात जास्त दुध तयार होते त्या उत्तर प्रदेशात दुधावर प्रकिया करणण्याचे उद्योग अतिशय कमी आहेत. म्हणजेच उपलब्ध दुधाच्या केवळ 11 टक्के दुधावर  प्रक्रिया करण्याचे कारखाने उत्तर प्रदेशात सध्या आहेत.  हा आकडा जातो 27.5 ला.ट. इतका. आता हेच ज्या राज्यात सर्वात जास्त प्रक्रिया केली जाते ती राज्यं पहा. गुजरात एकुण उपलब्धतेच्या पन्नास टक्के प्रक्रिया केली जाते. म्हणजे हा आकडा मिळतो 60 ला.ट. गुजरातच्या खालोखाल दुसरी दोन राज्य आहेत. महाराष्ट्र (40 टक्के प्रक्रिया म्हणजे  34 ला.ट.) आणि कर्नाटक ( 40 टक्के प्रक्रिया म्हणजे  24 ला.ट.)

ज्या प्रदेशात दुधाचे सगळ्यात जास्त उत्पादन होते त्या ठिकाणी दुधावर प्रक्रिया करून तयार होणारे पदार्थ जितके मिळतात त्यापेक्षा गुजरात आणि महाराष्ट्रात जास्त मिळतात. आणि उत्पादन कैकपट कमी असून कर्नाटक उत्तर प्रदेशााच्या बरोबरीने दुधावर प्रक्रिया करून आपल्या शेतकर्‍याला भाव मिळवून देतो. 

आता साधा मुद्दा पुढे येतो. उपलब्ध दुधावर प्रक्रिया करण्याचे कारखाने वाढू दिले, त्यातून तयार होणार्‍या उत्पादनांचे भाव कृत्रिमरित्या आयात करून पाडले नाहीत, तर आहे त्या परिस्थितीत शेतकर्‍यांचे उत्पन्न उत्तर प्रदेशात आहे त्याचे किमान दुप्पट होवू शकते. आणि नेमके हेच आहे दुधाचे राजकारण. एकेकाळी परदेशातून दुध भुकटी आणून भारतात ओतली गेली. परिणामी भारतीय बाजारपेठेत दुधाचे भाव कोसळले. गुजरातमधील दुध प्रक्रिया उद्योगांमध्ये प्रचंड प्रमाणात राजकारण खेळल्या गेलं. दुध सहकारी संघाचे जाळे सगळ्यात जास्त तिथेच विणल्या गेले. अमुलचा प्रयोग तिथलाच.

भाजप आणि दुधाची प्रक्रिया यांचे जवळचे नाते आहे. सध्या सगळ्यात जास्त दुध उत्पादन देणार्‍या 12 राज्यंपैकी 6 राज्यं (उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा) भाजपकडे आहेत.  उत्पादनाचा विचार केला तर महत्वाच्या राज्यातील 1245 ला.ट. दुध उत्पान्नांपैकी सध्या 65 टक्के इतके दुध भाजप शासीत राज्यांमध्ये आहे. कर्नाटकाचा निकालही जर भाजपच्या बाजूनं लागला आणि आंध्रचे चंद्राबाबू नायडू असेच भाजपच्या गुडबुक मध्ये राहिले तर 77 टक्के दुधाचा प्रदेश भाजपच्या ताब्यात येतो. 

म्हणजेच दुध हा भाजपसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा मुद्दा बनतो. याकडे लक्ष दिले पाहिजे. या दुधावर प्रक्रिया केली तर शेतकर्‍याला जास्त भाव मिळू शकतो. प्रक्रिया केलेल्या दुधाबाबत अजून एक मुद्दा आहे. नुसते दुध उत्पादनंच नाहीत तर प्रक्रिया केलेल्या दुधालाही जास्त भाव मिळतो. नुसते दुध आणि प्रक्रिया केलेले दुध (शहरात प्लास्टिकच्या पिशव्यातून मिळते ते) यात जवळपास दुप्पट फरक आहे. साधे दुध 19 रूपये लिटर पर्यंत घावूक बाजारात विकले जाते. तर प्रक्रिया केलेल्या दुधाला 52 रूपये (विकास गोल्ड, म्हशीचे दुध) भाव मिळू शकतो. 

सध्याच्या बाजाराला कुठलाही हात न लावता, कुठलेही नविन धोरण न राबविता, कसलीही ढवळाढवळ न करता या दुधाच्या प्रदेशात क्रांती घडविल्या जावू शकते. त्यासाठी दुधावर प्रक्रिया करण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणावर उभारले गेले पाहिजेत. 

परत दुसरा गंभीर मुद्दा. हे सगळे प्रक्रिया उद्योग खासगी क्षेत्रातले आहेत. सरकारी दुध योजना कधीच बुडाल्या आहेत. तेंव्हा याकडे लक्ष देवून ‘मेक इन इंडिया’चा नुसता कोरडा नारा न देता दुध प्रकिया उद्योगांना चालना दिली पाहिजे. यासाठी खासगी उद्योजक आकर्षित होतील असे वातावरण निर्माण केले पाहिजे. 

दुधाचे जे आकडे उपलब्ध आहेत ते नोंदणीकृत आकडे आहेत. ज्यांची नोंद होत नाही असे दुधाचे प्रमाण याच्या जवळपास 40 टक्के तरी किमान आहे असे तज्ज्ञांचा अभ्यास सांगतो. 

गोहत्या बंदी, गोवंश हत्या बंदी, अवैध कत्तलखान्यांवर बंदी यावर जास्तीची चर्चा करण्यापेक्षा आणि यावर वेळ खर्च करण्यापेक्षा आता दुधावर प्रक्रिया हा विषय जर केंद्र शासनाने मनावर घेतला तर त्यांच्या मतांची शेती तर पिकेलच पण त्याहीपेक्षा शेतकर्‍यांच्या पदरी चार पैसे जास्तीची पडतील. मोदींवर टिका करण्यारीनीही हे लक्षात घ्यावे की 35 टक्के दुध भाजपेतर राज्यांमध्ये उपलब्ध आहे (पंजाब, आंध्र प्रदेशत, बिहार, तामिळनाडू, कर्नाटक, पश्‍चिम बंगाल). या राज्य सरकारांनीही आपल्या राज्यांत दुधावर प्रक्रिया करणारे उद्योग वाढीस कसे लागतील हे पहावे. जेणे करून त्यांनाही आपल्या शेतकर्‍यांची समृद्धी साधता येईल.

दुध प्रक्रिया उद्योगांवर केलेली गुंतवणूक ही सरळ ग्रामीण भागासाठी लाभदायक ठरणारी गुंतवणूक आहे. याचा सरळ संबंध गरिबी निर्मूलनासाठी होतो. राष्ट्रीय उत्पादनात सरळ वाढ ही गुंतवणुक नोंदवू शकते.  

शेतकर्‍यांची जमिनी बळजबरीने कमी भाव देवून हिसकावून ‘समृद्धी’ मार्ग बांधल्यानेच समृद्धी येते असे नाही. त्यासाठी दुधावर प्रक्रिया आणि एकूणच शेतमालावर प्रक्रिया होणे जास्त गरजेचे आहे. 
       
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. 9422878575

Thursday, March 16, 2017

कर्जमाफी का कर्जमुक्ती? शब्दांत काय फरक?


रूमणं, गुरूवार 16 मार्च 2017  दै. गांवकरी, औरंगाबाद
 
उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकांत शेतकर्‍यांची ‘कर्जमाफी’ हा विषय भाजपाने पुढे आणला होता. महाराष्ट्राच्या विधानसभेत सत्ताधारी शिवसेनेसह कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांनीही शेतकर्‍यांची ‘कर्जमाफी’ झालीच पाहिजे असा आग्रह अर्थसंकल्पिय अधिवेशनात लावून धरला आहे. त्यामुळे परत एकदा शेतकर्‍यांची ‘कर्जमाफी’ हा विषय ऐरणीवर आला आहे. 

एखाद्या उद्योगपतीने आपल्या उद्योगासाठी कर्ज काढले असते. त्याचा तो उद्योग बुडतो. त्याचे कर्ज थकित होते आणि तो मग बँकेकडे नादारीसाठी अर्ज करतो. कर्जबाजारीपणा जाहिर करण्याची पण एक रीत उद्योगांसाठी उपलब्ध आहे. या कर्जदाराची सर्व मालमत्ता (त्या उद्योगासंबंधीत. इतर नाही.) गोठवली जाते. तिची विक्री करून ही कर्जाची रक्कम काही प्रमाणात परत मिळवली जाते. अगदी एखादी चारचाकी दोन चाकी गाडी कर्जाने घेतली. ते कर्ज थकवले गेले. तर ती गाडी बँकेकडून उचलून नेली जाते. आणि तिची विक्री करून उर्वरीत किंमत वसूल केली जाते. 

ही सगळी कर्ज ज्याने घेतले त्याला सर्व परिस्थितीची जाणीव असते. त्याने ज्यासाठी कर्ज घेतले तो उद्योग असो किंवा ती गाडी कशी आणि काय चालवावी यावर कुठलेही बंधन शासनाकडून घातले जात नाही. किंवा जी वस्तू तयार केली जाते तिची किंमत काय असावी? ती कशी विकावी? यावर शासन कसल्याही अटी घालत नाही. 
म्हणजेच जे कर्ज घेतले ते फेडण्यासाठी कुठलेही अडथळे आणले जात नाही. परिणामी त्या कर्जाची जबाबदारी पूर्णत: ज्याने घेतले त्यावर अवलंबून राहते. परिणामी हे कर्ज म्हणजे त्याचेच ‘पाप’ असते. मग अशावेळी या कर्जाला माफी देणे किंवा काय हा विषय समोर येतो. 

पण शेतीच्या बाबत मात्र ही परिस्थिती नाही. शेतकरी जे उत्पादन घेतो त्याचा बाजार हा पूर्णत: शासनाने आपल्या हातात ठेवला आहे. बाजार कसा असावा, किंमती काय असाव्यात, माल कुठल्या दराने खरेदी केला जावा यावर शासनाचे पूर्णत: नियंत्रण असल्याने शेतकर्‍याचे जे कर्ज आहे ते शेतकर्‍याचे नसून शासनाचे ‘पाप’ ठरते. 

तुरीचे उदाहरण ताजे आहे. केवळ दहा महिन्यांपूर्वीच तुरीचे भाव 200 रूपयांपर्यंत गेले होते. आता ते शासनाने ठरविलेल्या 50 रूपयांच्या हमीभावापेक्षाही खाली कोसळले आहेत. शिवाय शासनाने डाळीची आयात करूनही हे भाव पाडण्यास मदतच केली आहे. मग जर शासन शेतकर्‍याला त्याची डाळ विकण्यात अडथळे आणत असेल, भाव पाडत असेल तर या शेतकर्‍याने आपले कर्ज फेडायचे कसे? 

ज्याने कर्ज दिले तोच अशी परिस्थिती निर्माण करतो की ते कर्ज फेडता येवू नये. म्हणजेच शेतकरी कर्जबाजारी रहावा ही जर शासनाची, शेती विषयक धोरणाचीच मनोमन इच्छा असेल तर अशा परिस्थितीत काय करणार? 
मग इथे मुद्दा निर्माण होतो की हे कर्ज नैतिक की अनैतिके? 

शेतकरी संघटनेने असा मुद्दा मांडला होता की जर या शासनाने बाजार मोकळा ठेवला असता, नियंत्रण केले नसते, भाव पाडले नसते तर आमच्या मालाला चांगला दर मिळाला असता. परिणामी आम्ही जास्त पैसे मिळवू शकलो असतो. ही केवळ सांगोवांगीची गोष्ट नाही. सध्याचे जे राष्ट्रपती आहेत प्रणव मुखर्जी हे जेंव्हा व्यापार मंत्री होते त्या काळात गॅट करारावर सह्या करताना भारतीय सरकारने हे कबूल केले होते की भारतातील शेतकर्‍यांना त्यांना मिळू शकणार्‍या भावापेक्षा 72 टक्के इतकी कमी रक्कम दिल्या गेली आहे. म्हणजेच जिथे शंभर रूपये मिळायचे तिथे केवळ 28 रूपयेच दिल्या गेले आहेत. म्हणजेच शेतकर्‍याची ही रक्कम शासनाने गिळून टाकली.
या सगळ्याचा अर्थ असा होतो की गेली कित्येक वर्षे शासनाच्या खरेदीत किंवा शासनाने भावाचे नियंत्रण केल्यामुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले. परिणामी शेतकर्‍याच्या डोक्यावरचे कर्ज हे शेतकर्‍याचे नसून शासनाचेच पाप आहे. या पापातून मुक्ती मिळवायी असेल तर शासनाने या कर्जाचा बोजा शेतकर्‍याच्या डोक्यावरून तातडीने हटवला पाहिजे. त्यामुळे ‘कर्जमाफी’ नव्हे तर शेतकर्‍यांना ‘कर्जमुक्ती’हवी आहे. कारण माफी म्हटलं की त्याचा अर्थ असा होतो की कसला तरी गुन्हा केला आहे. परिणामी त्यापांसून माफी मिळाली पाहिजे. 

महिला चळवळीने ‘हुंडाबळी’ असा शब्द रूढ केला. कशामुळे तर ज्या महिलेने आत्महत्या केली ती हुंड्यामुळे केली आहे. त्यामुळे त्याला आत्महत्या न म्हणता ‘हुंडाबळी’ म्हटले जावे. कारण बळी म्हटले की त्याची जबाबदारी ती घेण्यार्‍यावर येते. गुन्हा त्याच्यावर दाखल केला जातो. त्याचप्रमाणे शेतकरी चळवळ असे आग्रहाने सांगत आहे की शेतकर्‍यांच्या आत्महत्यांना ‘कर्जबळी’ म्हटले जावे. म्हणजेच ही जबाबदारी धोरण ठरविणार्‍यावर येते. मग हे धोरण ठरविणार्‍यांवर गुन्हे नोंदववावे लागतील. 

त्यामुळे शेतकर्‍यांनी कधीही कर्जमाफी मागितली नाही. तर शेतकर्‍यांची मागणी ही ‘कर्जमुक्ती’ची राहिली आहे. शेतकर्‍यांची कर्जमुक्ती ही  धोरण ठरविणारे आणि राबविणारे या दोघांचीही नैतिक जबाबदारी आहे. आणि ती त्यांनी पार पाडलीच पाहिजे. 

शेतकरी गरीब आहे. तो ‘बिच्चारा’ आहे त्यामुळे त्याला मदत ही करावीच लागणार. असा सगळ्यांचा समज आहे. प्रत्यक्षात असे समोर आले आहे की शेतकर्‍याला ‘मदत’ करण्यात फार जणांचे हितसंबंध गुंतले आहे. तो गरीब राहिला तरच यांचे पोट भरणार आहे. त्याच्या नावाने विविध योजना चालविणे हाच फायदेशीर धंदा आहे. तेंव्हा शेतकर्‍याच्या नावाने आपली पोळी भाजून घ्यायची असेल तर शेतकर्‍याला ‘कर्जमाफी’, ‘सुट’, ‘सबसिडी’ विविध योजना यांचा खेळ खेळावाच लागेल. याचा शेतकर्‍याशी काहीच संबंध नाही. 

एक साधे उदाहरण आहे. शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या म्हणून शेतीला वीज सवलतीच्या दरात देण्यात येते. किंवा ही वीजबीलं वारंवार माफ केली जातात. खरं चित्र हे आहे की शेतकर्‍यांच्या आत्महत्या कापसाच्या पट्ट्यात म्हणजेच विदर्भ मराठवाड्यात झाल्या. आणि कृषीपंपाची सगळ्यात जास्त (80 टक्के) सबसिडी पश्‍चिम महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांनी खावून टाकली. कापूस हे पूर्णत: कोरडवाहूचे पीक आहे. मग जर कापसाला सिंचन वापरलेच जात नसेल तर त्यासाठी असलेली सबसिडी कोणाला दिली जाते? कापसाच्या नावाने कोण सबसिडी खावून टाकतो? शेतीला वीज देताना मोजून दिली जात नाही. म्हणजे त्याला मिटर नाही. आता साधा प्रश्न आहे. ही कोणाची सोय आहे? पश्चिम महाराष्ट्रातील उद्योग आणि विदर्भ मराठवाड्यातील उद्योग ह्यांना सारख्याच दराने वीज आहे. शेतीवरची विजेचा तोटा यांच्यावर क्रॉस सबसीडी लावून भरून काढला जातो. मग परत प्रश्न येतो की पश्चिम महाराष्ट्रातील शेकार्यानी वीज वापरली तर त्याचा भार विदर्भ मराठवाड्यातील उद्योगांनी का उचलावा? या सगळ्यातून लक्षात येते की नाव शेतकऱ्याचे पुढे करून भलतेच लोक आपली पोळी भाजून घेतात.
ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेन आग्रहाने मागणी केली आहे की शेतकर्‍यांना तातडीने सर्व कर्जातून मुक्ती मिळालीच पाहिजे. शेतीवरील सर्व सुट सबसिडी सर्व योजना रद्द केल्या जाव्यात. मुख्य मागणी ही आहे की शेतकर्‍यांना बाजार मोकळा मिळावा. त्याच्या मालाला जेंव्हा जास्त किंमत मिळेल तेंव्हा तो ते जास्तीचे पैसे साठवून ठेवेल. जेंव्हा बाजार कोसळेल तेंव्हा त्याला ते पैसे कामा येतील. खुला बाजारच न्याय देवू शकतो.  इतरांनी त्यात लुडबुड करण्याची गरजच नाही. 

मागे भाव चढले तेंव्हा शेतकर्‍याकडे दाळच नव्हती. आता डाळ आहे तर आयात करून भाव पाडले गेले आहेत. तेंव्हा आता मात्र शासनाने तातडीने खरेदी करून दिलासा दिला पाहिजे. पण आत्ताच पुढच्या वर्षी हस्तक्षेप न करण्याचे ठाम धोरण ठरविले पाहिजे. म्हणजे डाळ पेरायची की नाही याचा विचार शेतकरी आत्ताच करेल. 

तेंव्हा शेतकर्‍यांसाठी ‘कर्जमाफी’ नसून ‘कर्जमुक्ती’ ची व्यापक योजना शासनाने तयार करावी. आणि तातडीने राबवावी. तसेच भविष्यात शेतमालाच्या बाजारात हस्तक्षेप न करण्याची हमी द्यावी. जे गोरगरीब आहेत त्यांच्यासाठी अन्नधान्य खरेदी न करता त्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्याची योजना तयार करावी. म्हणजे शेतमालाचा बाजार नासला जाणार नाही. 
      
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. 9422878575

Sunday, March 5, 2017

सुफीवर कट्टरपंथी इस्लामचा हल्ला


उरूस, रविवार, 5 मार्च, 2017 (सामना, उत्सव पुरवणी) 

‘‘इस्लाम मधील कट्टरपंथी म्हणजेच सलाफी हे सुफींचा घात करायला टपले आहेत. कारण त्यांना सुफी संगीत, दर्गे नकोच आहेत. दोन धर्मांना जोडणारी प्रेमाचा संदेश देणारी सुफीची भाषा नको आहे.’’ हा आरोप कुणा हिंदूत्वावादी म्हणून समजल्या जणार्‍या नेत्याने केला नाही. ब्रिटीश पत्रकार, इतिहासकार लेखक विल्यम डार्लिंपल याने ही मतं व्यक्त केली आहेत. ही मतं भारतात घडलेल्या कुठल्याही घटनेवर आधारीत नाहीत. पाकिस्तानात 16 फेब्रुवारी रोजी सिंध विभागातील सेहवान येथील लाल शहबाज कलंदर यांच्या दर्ग्यात आत्मघातकी बॉंबस्फोट घडविण्यात आला. त्यात 88 लोक तात्काळ मृत्यूमुखी पडले. जखमींची संख्या 200 पेक्षा जास्त आहे. त्यावर आपली जळजळीत प्रतिक्रिया डार्लिंपल यांनी दिली आहे. 

1656 मधील हा दर्गा सुफी संस्कृतीचे एक जिवंत असे केंद्र आहे. अतिशय सुप्रसिद्ध असे ‘दमा दम मस्त कलंदर’ हे सिंधी भजन याच दर्ग्यातील संत लाल शहबाज कलंदर यांच्यावर रचलेले आहे. 

यापूर्वीही पाकिस्तानात सुफींवर हल्ले झाले आहेत. मागच्याच वर्षी 22 जूनला ‘भर दे झोली मेरी या मोहम्मद’ कव्वाली गाणारे कराचीचे कव्वाल अमजद साबरी यांची हत्या करण्यात आली. तेंव्हाही डार्लिंपल यांनी निषेधाचा आवाज जागतिक पातळीवर उठवला होता. आणि आताही तेच पाकिस्तानातील या हल्ल्याबाबत बोलत आहेत. 

इतर कुणीही आणि विशेषत: भारतातील जे तथाकथित पुरोगामी आहेत, जे की उठता बसता हिंदू मुसलमान एकतेच्या गप्पा करतात, भारतात जे दर्गे आहेत त्यांच्या बाबत उमाळे दाखवतात. या ठिकाणी भरणारे उरूस म्हणजे कसे हिंदू मुसलमान राष्ट्रीय एकतेचे प्रतिक आहेत हे सांगतात. ते काही बोलायला तयार नाही. कट्टरपंथी इस्लामचे अनुयायी आपल्या मुसलमान भावांची क्रुरपणे हत्या करत आहेत. आणि त्याचे कारण म्हणजे ही सुफी संस्कृती. 

लाल शहबाज कलंदर यांचा जो दर्गा आहे ते शैवांचे पवित्र तीर्थक्षेत्र होते. आजही या दर्ग्याचे पुजारी हे हिंदूच आहेत. वारसाहक्काने त्यांच्याकडे या दर्ग्याची पूजा अर्चा चालत आली आहे. या दर्ग्यात शहबाज कलंदर यांच्या मजारीवर हिंदू पद्धतीप्रमाचे मातीचा दिवा (पणती) पेटवला जातो. तिथे ज्योत  सतत तेवत ठेवली जाते. 1970 पर्यंत या दर्ग्यात शिवलिंग होते. चौथ्या शतकातील संस्कृत कवी संत झुले लाल म्हणजेच शहबाज कलंदर.

या दर्ग्यात रोज संध्याकाळी ‘धमाल’ नावाने एक नृत्य सादर केले जाते. मावळत्या सुर्यप्रकाशात सुफी संत, दरवेशी, फकिर हे नृत्य करतात. नेमकी हीच संध्याकाळची वेळ बॉंब हल्ल्यासाठी निवडली गेली. आश्चर्य म्हणजे हल्ल्याच्या  दुसर्‍या दिवशी पहाटे चार वाजल्यापासून परत दर्ग्यातील नियमित पूजा अर्चा सुरू झाली. इतका रक्तपात होवूनही इथे जमलेले सर्व फकिर, भक्त, दरवेशी यांनी दुसर्‍या दिवशी संध्याकाळीही ‘धमाल’ नृत्य सादर करून हल्लेखोरांना सणसणीत चपराक लगावली. 
या नृत्याच्यावेळी जे संगीत सादर होते ते अद्भूत असून त्यामूळे मनाची शुद्धता होते, रोग बरे होतात अशीच भक्तांची समजूत आहे. 16 फेब्रुवारीचा हल्ला याच समजूतीवर घाला घालण्यासाठी करण्यात आला. पण शहबाज कलंदर यांच्या भक्तांनी तो हाणून पाडला. शंभराच्या जवळपास मृत्यू आणि त्याच्या दुप्पट जखमी होवूनही ही परंपरा थांबली नाही. 

कट्टरपंथी ‘सलाफी’ ज्यांनी हा हल्ला घडवून आणला ते समाजाला तोडण्याचे काम करत आहेत असा स्पष्ट आरोपच विल्यम डार्लिंपल यांनी केला आहे. सलाफी विचाराचे लोक सुफी पंथाला कडाडून विरोध करतात. ही परंपरा इस्लामच्या विरोधातील आहे. ही नष्ट केली पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी सुफी संदर्भातील चित्रे, संगीत, साहित्य, दर्गा असेल त्या त्या ठिकाणांवर हल्ले करण्याची निती त्यांनी अवलंबिली आहे.

इस्लाममध्ये सुफी बद्दल ही अढी का निर्माण झाली? त्याचे महत्वाचे कारण म्हणजे सुफी तत्त्वज्ञानावर असलेला उपनिषदांचा आणि बौद्ध मतांचा प्रभाव. डॉ. मुहम्मद आझम यांनी आपल्या ‘सूफी तत्त्वज्ञान : स्वरूप आणि चिंतन’ (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) ग्रंथात या विषयाबाबत सविस्तर विवेचन केले आहे. त्यांनी काढलेला निष्कर्ष असा आहे, ‘सूफींच्या परम उद्दिष्टांसंबंधी धारणेस बौद्धांच्या निर्वाण आणि उपनिषदांच्या मोक्ष या धारणेशी जोडले जाऊ शकते आणि याची शक्यता अधिक आहे की या दोहोंचा प्रभाव या दृष्टिकोणानातून सूफींवर पडलेला असावा.’

डॉ. आझम यांनी बृहदारण्योकोपनिषद (4/5/15), छांदोग्योपनिषद (6/8), मुंडकोपनिषद (3/1/1), कठोपनिषद (1/2/18) अशा कित्येक श्‍लोकांची उदाहरणे देवून सूफीवर भारतीय तत्त्वज्ञानाचा कसा प्रभाव होता हे विविध विचारवंतांच्या मतांचा आधार घेत दाखवून दिले आहे. 

सूफी तत्त्वज्ञानाचा विरोध मांडणीतून समजू शकतो. पण प्रत्यक्ष हत्या करणे, तीर्थस्थळे उद्ध्वस्त करणे ही कुठली संस्कृती? सूफी जे चार प्रमुख संप्रदाय आहेत ते सर्व आपले आदी गुरू म्हणून प्रेषित मुहम्मदसाहेब यांनाचा मानतात. हे चार प्रमुख संप्रदाय म्हणजे 1. चिश्ती 2. कादरी 3. सुहरवर्दी 4. नक्शबंदी. 

अजमेरचा जो अतिशय प्रसिद्ध दर्गा आहे तो चिश्ती संप्रदायाचा आहे. त्या परंपरेतील ख्वाजा मोईनोद्दीनी चिश्ती हे 17 वे संत. त्याच परंपरेत दिल्लीचे हजरत निजामोद्दीन औलिया येतात. खुलताबाद येथील औरंगजेबाचे गुरू ख्वाजा जैनोद्दीन चिश्ती हे पण याच परंपरेतील आहेत. आगर्‍याचे संत सलिमोद्दीन चिश्ती पण याच परंपरेतील आहेत. (औरंगाबाद शहरातील प्रसिद्ध शाहनूर मिया दर्गा हा सुफी मधील कादरी संप्रदायाचा आहे.)

मुळात गुरू करणे ही भारतीय परंपरा. इस्लाममध्ये सुफी शिवाय कुठल्याच संप्रदायात गुरू आढळत नाहीत. एकमेव सर्वशक्तिमान अल्लाशिवाय कुणालाच मानायचे नाही असा एक अतिरेकी वेडेपणा कट्टरपंथियांमध्ये आहे. याचा कडेलोट होवून आता प्रत्यक्ष हमलेच सुरू झाले आहेत. 

बामियानाच्या बुद्धमूर्ती याच कट्टरपंथियांनी रॉकेट लावून पाडल्या होत्या. जगभरचे विचारवंत हा कट्टरपंथीयांचा कठोर शब्दांत निषेध करत आहेत. आणि आपल्याकडचे तथाकथित पुरोगामी मात्र बोटचेपी भूमिका घेत चुपचाप बसून आहेत.
  
    श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, 9422878575

Friday, March 3, 2017

सौर शेतीच्या नावे शेतकऱ्यांची फसवणूक


रूमणं, गुरूवार 2 मार्च 2017  दै. गांवकरी, औरंगाबाद
 
उन्हाळा सुरू झाला की शेतीचा विषय जवळपास थंड पडतो. कारण आपल्याकडे खरीपाचा हंगाम हाच खरा हंगाम गृहीत धरला जातो. त्याचे कारणही आहे. जवळपास सर्वच शेती पावसावर अवलंबून. तेंव्हा मृगाच्या पावसात जून महिन्यात पेरणी झाली की परत बहुतांश ठिकाणी पेरणी होत नाही. ज्या थोड्या ठिकाणी सिंचनाची सोय आहे त्या ठिकाणी दुसरा हंगाम म्हणजेच रब्बीचा हंगाम घेतला जातो. तिथे दिवाळीच्या मागेपुढे पेरणी होते. याही हंगामाचे सर्व पीक हे शिवरात्र ते होळी या दरम्यान हातात पडते. इथून पुढे रानं मोकळी होतात. आता शेतीत तसे मुख्य काहीच काम शिल्लक राहिलेले नसते. 

हे तरी वहितीखाली असणार्‍या जमिनीबाबत झालं. पण ज्या जमिनी पडिक आहेत त्यांच्यात तर या काळात काहीच हालचाल नसते. एरव्ही पडिक जमिनीत हिरवा चारा असतो परिणामी जनावरांची चराईची सोय होते. पण उन्हाळा जवळ येऊ लागतो. तसं सगळं गवत वाळून जातं. आता जनावरांनाही खायला काही शिल्लक राहत नाही. 

पडिक जमिनींचे काय करावे हा मोठा गहन प्रश्‍न आहे. वहितीखालची जमिन काही काळ तशीच राहू देण्यात फायदा असतो. कारण त्यातील कस वाढतो. पण पडिक जमिनीबाबत मात्र तसे नाही. ती मूळात वहितीखालीच आणली गेली नाही. परिणामी त्यात जो काही कस शिल्लक असेल तो वर्षानुवर्षे तसाच शिल्लक राहिलेला आहे. 

ही जमिन वहितीखाली आणावी असा सल्ला काही विद्वान देत असतात. मग ते काही आकडेवारी आपल्यासमोर फेकतात. जेणे करून आपल्या देशाचे धान्योत्पादन कसे वाढेल. मग त्यामुळे कसा फायदा होईल वगैरे वगैरे. 

मूळ प्रश्‍न असा आहे की सध्या ज्या जमिनी वहितीखाली आहेत त्यात जो माल तयार झाला आहे त्याच मालाला जर योग्य भाव भेटत नसेल तर पडिक जमिनी वहितीखाली आणून शेती करण्याचा आतबट्ट्याचा धंदा करणार कोण?  मूळात ही पडिक जमिन काही कुणाच्या मालकीची नाही. ती आहे सरकारी जमिन. मग अशा जमिनीचे करणार काय? 

नुसती हीच जमिन नव्हे तर शासनाने विविध प्रकल्पांसाठी, सरकारी कामांसाठी अधिग्रहीत केलेली जमिनही जवळपास दोन तृतिआंश तशीच शिल्लक आहे. जिचा कुठलाही वापर करण्यात येत नाही. 

उन्हाळ्यात तापमान वाढत जाते. आणि अशा वेळी या पडिक जमिनी, तापलेली हवा आणि आपल्याला जाणवणारी उर्जेची कमतरता हे विषय डोळ्यासमोर येतात. 

वीज क्षेत्रात सध्या जास्तीत जास्त उत्पादन होते ते औष्णिक वीज निर्मिती केंद्रांतून. जलविद्यूत तर आता विसरूनच जावे अशी परिस्थिती आहे. कारण पाणीच शिल्लक नसेल, प्यायलाच पाणी मिळणार नसेल, शेतीला पाणी मिळणार नसेल तर जलविद्युत प्रकल्पासाठी पाणी आणणार कुठून? दुसरा पर्याय समोर असतो तो आण्विक विजेचा. पण त्यावर पर्यावरणवाद्यांनी इतका गदारोळ माजवला आहे की यावर काही बोलणेही मुश्किल होवून बसले आहे.  गैरसमजाचाच मोठा गुंता निर्माण करून ठेवण्यात आला आहे. 

मग साहजिकच समोर विषय येतो तो सौर उर्जेचा. यासाठी आता सगळेच गांभिर्याने विचार करू लागले आहे. आणि याच अनुषंगाने ही जी पडिक शेती आहे त्यावर सौर उर्जेची शेती करता येईल का ही चाचपणी सध्या चालू आहे.

सध्या बर्‍याचठिकाणी सौर उर्जेची जाहिरात दिसते. छोटे दिवे, घरांतीत विविध उपकरणे सौर उर्जेवर कसे चालतात हे हिरीरीने दाखविले जाते. यामुळे बचत कशी होते हेही सांगितले जाते. 

पण यातील खोच अशी आहे की सौर उर्जेच्या उपकरणांचा उभारणीचा खर्च हा अवाच्या सव्वा आहे. त्यातून मिळणारी वीज ही तूलनेने कमी आहे. या उपकरणांची कार्यक्षमता सध्यातरी अतिशय कमी आहे. 

आणि याच ठिकाणी सौर उर्जेची शेती ही संकल्पना अडकून बसली आहे. एखादा शेतकरी आपल्या शेतात जे काही पिकवतो, त्याला जर योग्य भाव मिळाला नाही तर हळू हळू त्याचा शेती करण्यातला रस संपून जातो. कोरडवाहू शेतीत भांडवली गुंतवणूक कमी असल्याने नुसतेच श्रम वाया जातात. मालाला भाव नसला तरी लोक शेती करत राहतात. शेतकरी दुसरा पर्याय नाही तोपर्यंत कोरडवाहू शेतीत खपत राहतो. पण सौर शेतीत भांडवली गुंतवणूक प्रचंड आहे. तेंव्हा सगळ्यात पहिल्यांदा प्रश्‍न समोर येतो तो हा की ही गुंतवणूक कोण करणार? सौर शेतीतून निर्माण झालेली वीज सरकार कोणत्या भावाने खरेदी करणार या बाबीचा समाधानकारक खुलासा अजून शासन करू शकलेले नाही. परिणामी या विषयाला गती भेटत नाही. 

पडिक जमिनी खरं तर खासगी मालकीच्या नाहीतच. तेंव्हा शासनाने पहिल्यांदा हे प्रकल्प आपल्या जमिनीत स्वत: गुंतवणुक करून यशस्वी होतात हे सिद्ध करून दाखवले पाहिजेत. जेंव्हा या प्रकल्पांची यशस्वीता दिसेल तेंव्हाच सामान्य शेतकरी आपल्या मोकळ्या जागेत सौर शेती करण्यासाठी पुढे येतील. 

शेतीत उत्पादन अधिक चांगले कसे घ्यावे, आधुनिक तंत्रज्ञान कसे वापरावे, विज्ञानाची कास कशी धरावी असले सल्ले शेतकर्‍याला दिले जातात. हे सगळं करून शेतकरी जेंव्हा बंपर पीक घेतो, त्याचा शेतमाल बाजारात येतो  तेंव्हा नेमके त्या शेतमालाचे भाव पडलेले असतात. सध्या ज्याप्रमाणे तुरीचे भाव पडलेले आहेत. मग साहजिकच हा शेतकरी विचार करतो आपण जास्तीचं पीक घ्यावं म्हणून मरमर कशाला करा? त्यापेक्षो जे आहे ते जसं आहे तसं धकवत नेवू. आपल्या पोराबाळांना होता होईल तेवढं या खातेर्‍यातून बाहेर काढूत. मग या शेतीचं जे व्हायचं ते होवो. असा विचार प्रबळ झाल्यावर त्या शेतकर्‍याला शेतीत विविध प्रयोग करण्यासाठी आपण काय आणि कसं सांगणार? 

वीज हा जगभरातील सध्याचा चिंतेचा विषय आहे. जी वीज सध्या तयार होते आहे तिचे वितरण, तिचा दर ठरवणे आणि ठरवलेल्या दराने तिची वसूली ही मोठी किचकट बाब बनली आहे. राजकीय हस्तक्षेपाने या सगळ्यांचा नासडा होवून बसला आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या मराठवाडा आणि विदर्भात सर्वात जास्त आहे आणि शेतीवरील वीजेचा वापर ज्या सहा जिल्ह्यांमध्ये ज़वळपास 80 टक्के होतो त्यात एकही जिल्हा मराठवाडा आणि विदर्भातील नाही. म्हणजे शेती तोट्यात आहे या नावाखाली शेतीला सवलतीच्या दरात वीज द्यायला पाहिजे असं सांगायचं. आणि जे शेतकरी प्रत्यक्ष संकटग्रस्त बनून आत्महत्या करतात त्यांचा वीजेचा वापर जवळपास शुन्यच आहे असं आढळून येतं. हे काय गौडबंगाल आहे? कोरडवाहू प्रदेशात शेतकर्‍यांच्या आत्महत्या मोठ्याप्रमाणावर आहेत. म्हणजे तिथे केवळ पावसाच्या पाण्यावर शेती पिकते. मग जर तिथे सिंचनाची सोयच नाही तर पाणी उपसा करण्याची गरजच नाही. म्हणजेच वीजेचा काही प्रश्‍नच येत नाही. मग वीजेची ही सबसिडी कोण आणि कशासाठी खावून टाकतो आहे? 

ज्या प्रदेशातील शेतपंपाला वीजेची सबसिडी दिली आहे त्या प्रदेशातील उद्योगाने तो भार उचलावा (क्रॉस सबसिडी) म्हणजेच पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनी वीजेची सबसिडी जवळपास सगळीच खावून टाकली असेल तर त्याची भरपाई त्याच प्रदेशातील उद्योगांनी करावी. असा प्रस्ताव पुढे आल्यावर सबंध उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. हा सगळा ढोंगीपणा आहे त्यामुळे हे प्रश्‍न किचकट जटील बनले आहेत. 

उद्या सौर उर्जेची शेती करायची म्हटले तर असेच त्यावरची सबसिडी कोणीतरी खावून टाकेल, काही दिवसांनी ही सगळी उपकरणे निष्क्रिय बनतील. त्यांची देखभाल करण्यासाठी पैसे शिल्लक राहणार नाहीत. त्यातून वीज निर्मिती होणार नाही. आणि सगळं परत जैसे थे. तेंव्हा पडिक जमिनीवर सौर उर्जेची शेती करा असा शाहजोग सल्ला देवून स्वप्न दाखवणार्‍यांनी पहिल्यांदा शासनाच्या मोकळ्या जमिनींवर हे प्रकल्प उभारून चालवून दाखवावेत. शासनाचाच प्रकल्प असल्याने कुठल्या भावाने वीज खरेदी करायची हा प्रश्‍नही निर्माण होणार नाही.

सल्ला देणार्‍यांनी स्वत: सौर उर्जेचे प्रकल्प उभारावेत. त्यासाठी जी जमिन लागेल ती शासन देणार नसेल तर शेतकर्‍यांना मागावी. शेतकरी काही काळापुरता करार करून विशिष्ट भाडे घेवून ती देण्यास खुशीत तयार आहे.      
      
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. 9422878575