Wednesday, March 19, 2014

कुठे शेतकर्‍यांचा राजा, कुठे दिल्ली-लाचार फौजा



     प्रसंग आहे बरोबर 340 वर्षांपूर्वीचा आहे. महाराष्ट्रात धुमश्चक्री चालू होती. शेती पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होती. कुठलेही अस्मानी संकट म्हणजे पाऊस, पूर, दुष्काळ आलेले नव्हते, तर संकट सुलतानी होते. (अस्मानी संकट म्हणजे आभाळातून प्रचंड पडलेला किंवा न पडलेला पाऊस, गारपीट किंवा भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्ती आणि सुलतानी संकट म्हणजे राज्य करणार्‍या सुलतानाने लहरीप्रमाणे केलेला अन्याय. हे यासाठी सांगितले की एका प्रतिष्ठित दैनिकाच्या संपादकाला अस्मानी आणि सुलतानी यातील फरकच माहीत नव्हता. परिणामी, त्यांच्या लेखनात या शब्दांची गल्लत होत गेली. )  मोगलांच्या सैन्याने मराठी मुलखाला पुरते कोंडीत पकडले होते. पेरणीचे दिवस तोंडावर आलेले होते. गनिमी काव्याचा आधार घेऊन शिवाजी महाराज मोगलांना अजून कितीही काळ या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर करत फिरवत बसू शकले असते; पण महाराजांच्या लक्षात आले की हा पेरणीचा काळ वाया गेला, तर पूर्ण शेती उद्ध्वस्त होईल. महाराजांनी मिर्झा राजे जयसिंग यांच्याशी तह केला. ही तारीख होती 12 जून 1665. 
       आजचे शेतकर्‍यांचे पुत्र असलेले राज्यकर्ते, 'जाणते राजे' सकाळ-दुपार-संध्याकाळ तिन्ही त्रिकाळ शाहू फुले आंबेडकर हा जप करतात. शिवाजी महाराजांच्या नावाने जयजयकार करतात; पण आपल्या कृतीत यांची धोरणे येवू नये याची काळजी घेतात. शिवाजी महाराजांनी सगळे राजकारण बाजूला ठेवून शेतकर्‍यांच्या हितासाठी मिर्झा राजे जयसिंगांशी तह केला.
तेव्हा पेरणी तोंडावर होती. आज सुगी संपून धान्य हाती येण्याच्याच नेमक्या काळात अस्मानी गारपिटीने शेतकर्‍यांच्या ताटात माती कालवली आहे. शेती पूर्ण उद्ध्वस्त झाली आहे. दिल्लीच्या निवडणुका तोंडावर आहेत. एकही राज्यकर्ता अजून असं म्हणाला नाही की, शेतीची अतिशय दयनीय अवस्था पाहता महाराष्ट्रातील निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात. पुढे होणार्‍या विधानसभा निवडणुकांबरोबर या निवडणुका घेतल्या जाव्यात. सध्या आपण सगळे मिळून शेतकरी राजा पुन्हा उभा कसा राहील, यासाठी कंबर कसून प्रयत्न करूत.
     'जाणते राजे' म्हणवले जाणारे शरद पवार केंद्रात कृषिमंत्री आहेत. पंचनामे झाल्याशिवाय शेतकर्‍यांना मदत मिळू शकत नाही, हे त्यांनी सांगितले. एखादा रुग्ण अतिशय आजारी आहे. त्यातच त्याचे देहावसान झाले. त्याचे शव विच्छेदन अजून व्हावयाचे आहे. डॉक्टरांनी त्याला अजून मृत घोषित केले नाही. तोपर्यंत त्याला जिवंत समजायचे काय? दिल्लीचे पंचनामे अजून झाले नाहीत, तोपर्यंत शेतकर्‍यांना काय वार्‍यावर सोडायचे? मागच्या वेळी झालेल्या गारपिटीची मदत आजतागायत शेतकर्‍यांपर्यंत पोहचली नाही. आजही ही मदत देण्यासाठी आताच  आजच्या जाणत्या राज्यांनी खळखळ सुरू केली आहे. कुठल्या दृष्टीने यांना शिवाजी महाराजांचे वारसदार म्हणायचे?
    आजचे राज्यकर्ते म्हणजे 'जाणते राजे' नसून या दिल्ली दरबारातील लाचारांच्या फौजा आहेत. शिवाजी महाराज आग्र्‍यात गेले, तेव्हा त्यांचे वर्तन कसे होते? आग्रा येथील किल्ल्यात शिवाजी महाराजांची पाऊले पडली तेव्हा त्या मातीला काय वाटले असेल याचे कुसुमाग्रजांनी आपल्या कवितेत फार छान वर्णन केले आहे.

या जमिनीवर
या जमिनीवर असेल तेव्हा
प्रिय माझ्या त्या शककर्त्याचे
पडले पाऊल
या भूमीच्या सुगंधसिंचित धूलिकणांना
सह्याद्रीवर अवतरलेल्या
ऊर्जस्वल स्वातंत्र्य उषेची
इथे लागली पहिली चाहूल

याच ठिकाणी-
मावळ खोर्‍यामधले वादळ
इंद्रसभेवर या आदळले
कृष्णेचे जळ खडकांमधले
यमुनेच्या श्रीमंत तटावर येथे वळले
इथे तमाच्या अधिराज्याला
तेजाचे बळ प्रथमच कळले

मखमली गाद्यांवर सळसळ
संतापाची असेल उठली
माळ करांतील या तख्तावर असेल तुटली
काच बिलोरी ऐश्वर्याची
पोलादाच्या त्या तुकड्यावर इथेच फुटली
(पृ.10-11, स्वगत,  पुनर्मुद्रण 86, कॉन्टिनेंटल प्रकाशन- पुणे)
    
     सध्याचा अनुभव मात्र उलटा आहे. महाराष्ट्रातला नेता दिल्लीत जातो आणि अजूनच लाचार होतो. महाराष्ट्रासाठी कुठलीही मदत मागायची असो आणि त्यातही परत शेतकर्‍यांसाठी काही मागायचे असो. यांचे शब्द तोंडातल्या तोंडातच जिरतात.  दिल्लीच्या इंद्रसभेवर यांच्या पोलादाचे तुकडे जाऊन आदळत नाहीत, कारण हे रबराचे तुकडे आहेत. रे रबरी चेंडू आपले आपणच उड्या मारत राहतात. आपलेच प्रतिबिंब तिथल्या आरशात पाहण्यात गुंग होतात.
     आग्र्‍यावरून परतल्यावर पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी स्वराज्याची व्यवस्था लावणे, जमिनीची मोजणी करून घेणे, शेतसार्‍याची नीट मांडणी करणे या मोहिमा हाती घेतल्या होत्या. शिवाजी महाराजांची जयंती तिथीप्रमाणे 19 मार्च रोजी आहे. सरकारी जयंती तारखेप्रमाणे 20 फेब्रुवारीला पार पडली आहे. शिवाजी महाराज असते, तर निश्चितच कडाडले असते आणि पहिल्यांदा गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्यासाठी सरसावले असते.
     महाराष्ट्रातील शेतकरी सुलतानी जाचातून शिवाजी महाराजांनी मुक्त केला तेंव्हा मोगलाईतील जाट शेतकरी अन्यायाने त्रस्त होवून औरंगजेबाविरूद्ध बंड करत होता. या बंडाचा वणवा इतका होता की औरंगजेबाचा सरदार अब्दुलनबी याला सामान्य शेतकर्‍यांनी ठार केले. आजच्या राज्यकर्त्यांना शेतकरी निवडणुकीत गार करेल म्हणजे त्यांचे डोळे उघडतील 
     ‘शेतकर्‍यांचा राजा शिवाजी’ या पुस्तकात शरद जोशी यांनी शिवाजी महाराजांच्या या पैलूचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला आहे. श्रीकांत देशमुख यांनी नुकतेच याच विषयावरील ‘कुळवाडीभुषण शिवराय’ हे पुस्तक सिद्ध केले आहे. या पुस्तकाला मसापचा म.भि.चिटणीस साहित्य पुरस्कारही प्राप्त झाला आहे. आजच्या राज्यकर्त्यांनी हे लिखाण निदान नजरेखालून तरी घालावे.  
 श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Friday, March 14, 2014

भटां नंतरची मराठी गझल: शाब्दिक बुजगावणे


सुरेश भट यांचा आज ११ वा स्मृतीदिन. ( जन्म १५ एप्रिल १९३२ - मृत्यू १४ मार्च २००३ )  त्यांच्यानंतर मराठी गझल खरेच पोरकी झाली. गझलेचे वृत्त आणि वृत्ती जाणून घेणारा त्यांच्या इतका समर्थ मराठी गझलकार कोणी नंतर झाला नाही. नंतरची मराठी गझल अतिशय पोरकट, शब्दांचे खेळ करणारी, उथळ सिद्ध झाली आहे. अनेकांना हे मत आवडत नाही. एका नवीन गझलकाराला माझ्या मताचा आतिशय राग आला. त्याच्या गझलामधील चुका मी दाखवून दिल्या तर त्याने मला चक्कं शिव्याच घातल्या. कोणीही मला सुरेश भट यांच्या नंतर लिहिल्या गेलेल्या १०० गझला सांगा. मी त्यांची चिकित्सा करायला तयार आहे. कुठलेही पुस्तक आसेल तर विकत घेऊन वाचायला तयार आहे. कृपया कोणीही मला भीमराव पांचाळे किंवा आजून कोणी गावून दाखवलेली गझल सांगू नये. मी लेखी स्वरूपातील गझल वाचायला तयार आहे. गायल्या गेलेली गझल हा गाण्याचा भाग झाली. तिचा विचार आपण संगीताच्या क्षेत्रात करूत. भट यांच्या नंतर लिहिल्या गेलेल्या १०० गझला आणि त्यांचा अभ्यास हीच भट यांना खरी श्रद्धांजली. कृपया कोणीही उथळ शेरेबाजी नं करता लिखित स्वरूपातील मजकूर सांगावा.

'एल्गार' कविता संग्रहाच्या दुसर्‍या आवृत्तीत सुरेश भटांनी ‘गझलेची बाराखडी’ नावाचे एक परिशिष्ट जोडले आहे. गझलेबाबतच्या त्यांनी सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतल्यास गझलेच्या नावाने शब्दांचे बुजगावणे मराठी कवितेत उभे आहे असे दिसेल. आणि ते करणारे किती पोरकट आहेत हे वाचकांच्या लक्षात येईल. मी इथे रसिक हा शब्द वापरला नाही. कारण बहुतांशवेळा तो श्रोत्यांसाठी प्रेक्षकांसाठी वापरला जातो. इथे मला वाचकच अपेक्षीत आहे. गझल वाचून नव्हे तर ऐकून समजावून घेणार्‍यांनी  यापासून दूरच रहावे. त्यांना मला इथे काहीच सांगायचे नाही.

भटांनी नोंदवलेल्या महत्त्वाच्या गोष्टी

1. गझल लिहिण्यासाठी निर्दोष वृत्तात लिहिता येतणे आवश्यक आहे. शक्यतोवर गणवृत्तात लिहावे. अगदी आवश्यक असल्यासच मात्रावृत्तांचा (जातीचा) उपयोग करावा

2. प्रत्येक शेर म्हणजे एक संपूर्ण कविताच असते. गझल उलगडत नसते. कोणताही शेर सुटा वाचला तरी तो संपूर्ण अभिव्यक्ती असलेली कविता वाटणे हे गझलेचे गमक आहे. नुसत्या आकृतिबंधाने गझल ठरत नसते.

3. यमक, अन्त्ययमक आणि वृत्तांचे बंधन पाळूनसुद्धा शेर अगदी सहज व सोपा पण तितकाच गोटीबंद असावा. फालतू शब्दांना जागा नसावी. अनावश्यक शब्दांनी वृत्ताची मात्रापूर्ती करू नये.

4. शेरातील दोन्ही ओळींचा परस्परांशी संबंध असलाच पाहिजे.

आजच्या गझलेबाबतच्या सर्वात आक्षेपार्ह दोन गोष्टी म्हणजे वृत्त आणि यमक. बहुतांश गझल ही वृत्तात लिहीलेली नसते. आणि बहुतांश वेळेला यमक पाळल्या गेलेले नसते. वृत्ताच्या अभ्यासासाठी मराठी व्याकरण हे मो.रा.वाळिंबे यांचे पुस्तक कुणीही संदर्भ म्हणून वापरावे किंवा अजून कुठलेही काव्यशास्त्रावरचे पुस्तक वापरावे.

यमकासाठी भटांनीच नोंदवलेल्या गोष्टी इथे देतो. त्यांचीच एक गझल त्यासाठी पाहूत

चंद्र आता मावळाया लागला
प्राण माझाही ढळाया लागला

काय तो वेडा इथेही बोलला?
हा शहाणाही चळाया लागला

ओठ ओठांना सतावू लागले...
श्वास गालाला छळाया लागला

हालते भिंतीवरी छाया तूझी...
दीप हा कैसा जळाया लागला

हाक दाराने मला जेव्हा दिली
उंबरा मागे वळाया लागला

मी खरे बोलून जेव्हा पाहिले

हा टळाया... तो पळाया लागला


गझलेच्या पहिल्या शेरात तिचा आकृतिबंध स्पष्ट झाल्यानंतर, तिची ‘जमीन’ निश्चित झाल्यावर मग यमक उर्फ काफिया आपल्या वैशिष्ट्यांसह शेवटपर्यंत तोच कायम राहतो. काफियाचे शब्द बदलतात, पण त्याच्या अंमलबजावणीचा कायदा गझलेच्या शेवटापर्यंत तोच कायम राहतो. उदाहरणार्थ- मावळाया, ढळाया, चळाया, छळाया, जळाया, वळाया

या गझलेत अन्त्ययमक रदिफ हे ‘लागला’ म्हणून आलेले आहे. ते शेवटपर्यंत तेच राहते. यमकाच्या ऊर्फ काफियाच्या शेवटच्या न बदलणार्‍या एका अक्षराआधी किंवा एकाहून अधिक अक्षरांआधी येणार्‍या एका विशिष्ट अक्षरात जो न बदलणारा स्वर असतो, त्यालाच स्वरचिन्ह किंवा ‘अलामत’ समजावे. जसे येथे व, ढ, च, ज यामध्ये अ हाच स्वर आहे. म्हणजे अन्त्ययमक रदिफ ‘लागला’ हे तर कायम आहेच, पण काफिया मध्ये ळाया ही दोन अक्षरेही कायम असून त्याआधी येणारा अ हा स्वरही कायम आहे.

आजच्या गझलेले हे सारे नियम लावून पहावेत म्हणजे ती गझल आहे की नाही हे समजून येईल. असे खुप बारकावे भटांनी सांगितले आहेत आणि मुख्य म्हणजे याचे प्रात्यक्षिक म्हणून अतिशय चांगली निर्दोष मराठी तोंडवळ्याची गझल लिहून ठेवली आहे. त्यांच्या नावाने गळे काढणारे, त्यांनी पाठीवरून हात फिरवला म्हणून सांगणारे, त्यांनी पत्र पाठवले, त्यांच्या सोबत कसा जेवलो वगैरे वगैरे ‘ष्टोर्‍या’ सांगणारे दोन शेरही निर्दोषपणे लिहू शकत नाहीत हीच शोकांतिका आहे. भटांच्या वैयक्तिक आठवणी सांगणार्‍यांना सक्त ताकीद आहे की माझ्यापाशी अशा आठवणींचा भरपूर खजिना आहे. आठवणींचे पीठ दळू नये. ही चर्चा साहित्यिक आहे. ती तशीच राहावी. संदर्भ लेखी द्या म्हणजे दाखल घेता येते.

(वर दिलेली भटांची गझल उत्कृष्ठ कविता आहे म्हणून दिलेली नसून गझलेचे व्याकरण समजून घेण्यासाठी सोपी आहे म्हणून वापरली आहे. संदर्भ- एल्गार- सुरेश भट, आ.दुसरी 30 मार्च 1987, सुपर्ण प्रकाशन, पुणे) 



बरोबर १ वर्षापूर्वी मी हा लेख लिहिला होता आणि बरेच गझल लिहिणारे भडकले होते. नवीन गझल लिहिणाऱ्याच्या १०० गझला निवडून द्या मी त्याची चिकित्सा करायला तयार आहे असे आवाहन मी केले होते. पण उथळ गझल लिहिणारे भटानंतरचे कोणी तयार झाले नाही. आता साहित्य अकादमी ह्या मान्यवर प्रकाशन संस्थेने "मराठी गझल-अर्धशतकाचा प्रवास" हे पुस्तक प्रकाशित केले आहे. राम पंडित ह्या गझलेच्या अभ्यासकाने ह्याचे संपादन केले आहे. राम पंडित यांचाच निष्कर्ष मी तुमच्या समोर ठेवतो "..... पण प्रतिभेच्या दृष्टीने अध्याप तरी मराठी गझलने भटांच्या गझलेला मागे सारले असे म्हणवत नाही. अनुभावाधिष्टीत शेर कमी व उधार आणलेले दु:ख वेदनांचा  भडीमार अनेक गझलात आढळतो यामुळे गझलेची कलात्मक गुणवत्ता बऱ्याचदा संशयास्पद ठरते." एकूण ४१ जणांच्या गझला राम पंडित या पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत.  त्यांची नवे अशी १. मंगेश पाडगावकर, २. सुरेश भट ३. वा.न. सरदेसाई ४. खावर ५. घनश्याम धेंडे ६. संगीता जोशी ७. ललिता बांठीया ८. मनोहर रणपिसे ९. सदानंद डबीर १०. इलाही जमादार ११. ए के शेख १२. अप्पा ठाकूर १३. रमण रणदिवे १४. बबन सराडकर१५. शोभा तेलंग १६. दीपक करंदीकर १७. श्रीकृष्ण राउत १८. शिवाजी जवरे १९. प्रशांत वैद्य २०. मधुसूदन नानिवडेकर २१. अरुण सांगोळे २२. क्रांती साडेकर २३. दिलीप पांढरपट्टे २४. संतोष कुलकर्णी २५. सिद्धार्थ भगत २६. प्रतिभा सराफ २७. गौरवकुमार आठवले २८. अनंत नांदुरकर २९. वैभव जोशी ३०. चित्तरंजन भट ३१. प्रमोद खराडे ३२. नितीन भट ३३, समीर चव्हाण ३४. रुपेश देशमुख ३५. अनंत ढवळे ३६. विजय आव्हाड ३७. वैभव देशमुख ३८. जनार्दन केशव म्हात्रे ३९. सतीश दराडे ४०. ज्ञानेश पाटील ४१. अमित वाघ
संगीतकार विश्वनाथ ओक यांनी व्यक्त केलेले मत.

"भटां नंतरची मराठी गझल: शाब्दिक बुजगावणे" हा आपला लेख वाचला. मी बव्हंशी सहमत आहे. मी संगीतकार असल्याने आणि कवितेची आवड असल्याने काव्याचे अनेक प्रकार रसिकतेने वाचत असतो. त्यातच गझल सुद्धा असतेच. गझल आणि त्यातही मराठी गझल यांना मी कमी दर्जाच्या मानतो असे नाही . पण मराठी गझलांचे पीक उदंड झाल्यासारखे दिसते. सकस असते तरी चालले असते. पण त्यातल्या अनेक रचना एकसुरी वाटतात. त्यातून प्रत्येक शेर ही स्वतंत्र कविता. त्यामुळे अनेक शेर असलेल्या एका गझलेतून नेमका व एकसंध असा भाव हाती लागतच नाही. अजून एक धुमाकूळ - - - - - गझल गायन हा "संगीताचा" एक प्रकार असे का मानतात हे कळतच नाही. स्वरबद्ध करून गायिली गेली की ती एक गीतच बनते- त्यातून अनेकांकडून तिच्या गायकीमध्ये केली गेलेली गुलाम अली किंवा मेहदी हसन किंवा जगजित सिंग यांची भ्रष्ट नक्कल. या तिघांनी केलेले प्रयोग व्यावसायिक स्तरावर यशस्वी झाल्यानेच त्याची लागण या गझल गायन प्रकाराला झाली. असो. हे माझे वैयक्तिक मत आहे. त्याचे खंडन मंडन होऊ शकते.
 


Tuesday, March 11, 2014

मराठी-हिंदी साहित्यातील ‘पाटील’की

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 11 मार्च 2014


ज्येष्ठ मराठी साहित्यीक डॉ. चंद्रकान्त पाटील यांना मराठवाडा साहित्य परिषदेने आपला सर्वोच्च सन्मान ‘‘जीवनगौरव’’ देऊन गौरविले. प्रा.निशिकांत ठकार यांनी हा सन्मान करताना ‘‘सेतू चंद्रकान्त पाटील’’ असा त्यांचा उल्लेख केला. आपल्या एका शब्दातूनच ठकारांनी पाटीलसरांचे नेमके वैशिष्ट्य सांगितले.
सारा भारत सांस्कृतिकदृष्ट्या एक आहे असं आपण म्हणतो; पण आपल्या शेजारच्या राज्यात काय लिहिलं जातंय याची आपल्याला खबर नसते. मराठीमध्ये इंग्रजीतून मोठ्या प्रमाणात साहित्य अनुवादित झाले; पण त्याच्या दसपटही इतर भारतीय भाषांमधून आले नाही. जे आले त्यातही परत अडचण म्हणजे विविध भारतीय भाषांमधून आधी सर्व साहित्य इंग्रजीमध्ये येणार. मग इंग्रजीतून मराठीत किंवा इतर भारतीय भाषांमध्ये जाणार. ही एक मोठीच त्रुटी आहे. खरं तर दोन भारतीय भाषा चांगल्या जाणून त्यातील साहित्य दोन्ही दिशांनी अनुवादित होण्याची गरज आहे. अशा वेळी मराठी-हिंदी हा सेतू चंद्रकान्त पाटील यांनी बांधला. म्हणून त्यांच्या गौरवार्थ इतर बाबींवर बोलत असताना ठकार सरांनी या कामाचा आवर्जून उल्लेख केला.
स्वत: एक अव्वल दर्जाचे कवी असताना, समीक्षेची चिकित्सक दृष्टी असताना अनुवादासारख्या ‘हमाल्या’ सरांनी केल्या हे महत्त्वाचे आहे. अन्यथा हे आपले काम नाही म्हणत मोठमोठे साहित्यिक जबाबदारी झटकताना आढळतात. खरं तर ‘चंदू म्हणे उरलो फक्त अनुवादापुरता’ अशी त्यांची टिंगलही झाली; पण सरांनी हिंदीपुरतंच स्वत:ला मर्यादित न ठेवता जागतिक कविता इंग्रजीतून समजून घेत ‘कवितान्तरण’ नावाचा सव्वापाचशे पानाचा भलामोठा ग्रंथच सिद्ध केला.  भारतासह जगभरातल्या 29 देशातील शंभर कवींच्या चारशे कविता मराठीत अनुवादित केल्या. या अनुवादाची दखल घेत साहित्य अकादमीने या ग्रंथाला पुरस्कार प्रदान केला. सरांची टिंगल करणार्‍यांची दातखिळीच बसली. अनुवाद करताना सरांनी नोंदविलेली निरीक्षणेही मोठी विलक्षण आहेत. ‘ज्या प्रदेशातील सामाजिक-सांस्कृतिक विकास तुलनेने कमी, तिथल्या समकालीन स्त्रीकवितेत विद्रोहाची तीव्रता अधिक असल्याचे जाणवते.’ किंवा ‘जगभरच पुरुषांची कविता भावनिकतेकडून बौद्धिकतेकडे प्रवास करताना दिसते. याउलट स्त्रीकवितेला अजूनही हा प्रवास पारखाच आहे.’ अशा नेमक्या आणि महत्त्वाच्या गोष्टी सरांनी नोंदवल्या आहेत. ‘अनुवाद म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या आवश्यक अशी तडजोड’ म्हणत सरांनी त्यांच्यावरील टीकेला सडेतोड उत्तर देऊन ठेवले आहे.
अनुवादाच्या बाबतीतही आपल्याकडे सहसा इतर भाषांमधून मराठी असाच ‘वन वे’ प्रवास आढळतो; पण सरांनी ‘सूरज के वंशधर’ या नावाने 21 दलित कवींच्या 50 कवितांचे हिंदी अनुवाद करून पुस्तक सिद्ध केले. भालचंद्र नेमाडे यांच्या ‘तुकाराम’ या इंग्रजी पुस्तकाचा तसेच गो.पु.देशपांडे यांच्या दोन नाटकांचा हिंदी अनुवाद केला. शिवाय कित्येक मराठी कवितांचे हिंदी अनुवाद केले. यामुळेही मराठी कविता हिंदी आणि मग त्या माध्यमातून इंग्रजीत पोहोचली.
समकालीन तसेच नंतरच्या पिढीच्या लेखकांसाठी अपार कष्ट सोसून त्यांच्या वाङ्मयाची योग्य दखल घेण्याचे महत्त्वाचे आणि वेगळे कामही सरांनी मोठ्या निष्ठेने पार पाडले. ना.धों.महानोर यांच्या कवितांचा नीट क्रम लावून, पुस्तकाची सगळी आखणी करून ते पॉप्युलरच्या भटकळांकडे पोहचविण्याचा तरुणपणीचा सरांचा उत्साह अगदी आजही ट़िकून आहे. म्हणूनच साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार पटकाविणारा रवी कोरडे असो की शासनाचा पुरस्कार मिळवणारा अभय दाणी असो, यांच्या कवितांसाठीही तीच मेहनत सर आजही घेताना दिसतात.
लघु अनियतकालिकांची चळवळ मोठ्या निष्ठेने समकालीन मित्रांसोबत सरांनी चालविली. चळवळ चालवताना हळूहळू माणसं प्रस्थापित होत जातात. श्री.पु.भागवत यांनी मोठं बोलकं निरीक्षण नोंदवलं होतं, ‘‘सत्यकथेची होळी करणारे हळूच मागच्या दाराने आपली कविता आमच्याकडे पाठवायचे.’’  सर याला अपवाद राहिले. लघु अनियतकालिकांची चळवळ चालविताना अलगदपणे ‘भागवत संप्रदायात’ शिरण्याचा दुट्टपीपणा त्यांनी केला नाही . त्यांनी आपली पुस्तके पॉप्युलर नंतर इतर अगदी नवख्या प्रकाशकांनाही दिली.
मराठी-हिंदी नियतकालिके/अनियतकालिके ,वर्तमानपत्रांच्या वाङ्मयीन पुरवण्या यांची बाळंतपणं सरांनी मोठ्या उत्साहानं केली. प्रकाश घोडकेच्या कवितेत एक ओळ आहे, ‘येणा काळजाला गेल्या कशा पांगल्या सुईणी’. पाटील सरांच्या बाबतीत उलट घडलं आहे. या नियतकालिकांना विशेष अंकाच्या ‘येणा’ सुरू झाल्या, की सगळ्यांना सरांसारख्या सुईणीची आठवण येते. अशा वेळी हक्काची मोठी माणसे पांगतात; पण सर मात्र मदतीला धावून येतात असाच सगळ्यांचा अनुभव आहे.
सरांचे वाचन हे एक स्वतंत्र प्रकरण होईल. ‘विषयांतर’ या त्यांच्या पुस्तकात स्वत:च्या वाचनावर दीर्घ लेख आहे. ‘‘मानवी सभ्यतेच्या इतिहासात वाचन ही गोष्ट बरीच उशिरा आली आणि मानवाच्या बौद्धिक विकासातला तो टप्पा झाल्यामुळे वाचन ही सांस्कृतिक प्रक्रिया झाली. त्यामुळे वाचन हे बौद्धिक उन्नयनाशी जोडता आलंच पाहिजे, असं मला वाटतं.’’ अशा स्पष्ट शब्दांत सरांनी आपली भूमिका मांडली आहे.
निशिकांत ठकारांनी म्हटलं त्याप्रमाणे हिंदी-मराठी असा सेतू बांधण्याचे काम सरांनी केलं हे खरं आहे; पण त्याहीपेक्षा जास्त लेखक-वाचक-साहित्य संस्था-नियतकालिके या सगळ्यांना जोडणारे सेतू ते बांधत राहिले. एक सर्जनशील कवी म्हणून त्यांनी आपल्या कवितेत लिहून ठेवलंय

अंगभूत आकार टाकून
आखडून बसणारी अक्षरं नकोत
अनुभवाचं ओलेपण न चिकटताच
उमटलेले शब्द नकोत
आतलं आत बाहेरचं बाहेर
मधोमध पहारा देणारी भाषा नकोय
आजूबाजूचा उजेड ओरबाडून
काळवंडलेली कविता नकोय
असण्यात फसून नसणं नाकारणारं
अनाठायी जगणं नकोय

चांगलं साहित्य टिकावं यासाठी विविध मार्गांनी सरांनी धडपड केली, सेतू बांधले, ही फार मोठी गोष्ट आहे; पण हे सगळं होताना स्वत:ला प्रस्थापित करणं त्यांनी नाकारलं. त्यांच्या आवडत्या चंद्रकांत देवतालेंच्या भाषेत सांगायचं तर...

जो रास्ता भुलेगा
मै उसे भटकावों वाले रास्ते ले जाऊँगा


जो रास्ता नही भुलते
उनमें मेरी कोई दिलचस्पी नही

मराठी साहित्यातील प्रस्थापित रस्ते सरांनी नाकारले. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही त्यांनी लेखन, वाचनाचे संस्थात्मक कामाचे ‘भटकाव वाले’ रस्ते दाखवून दिले. वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक असलेल्या सरांनी वनस्पतींच्या पेशींसोबतच वाङ्मयीन पेशींचा सुक्ष्म अभ्यास केला. त्यांच्या अभ्यासाचा, प्रतिभेचा गौरव मराठवाडा साहित्य परिषदेने ‘‘जीवनगौरव’’ देऊन केला हे अतिशय योग्य झाले.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, March 4, 2014

मराठी भाषा दिन तुपाशी । मराठी ग्रंथालये उपाशी

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 4 मार्च 2014


मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा करण्यात आला. कविवर्य कुसुमाग्रजांचा वाढदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शासनाचे वाङ्मयीन पुरस्कार या दिवशी मुंबईमध्ये वितरीत करण्यात आले.  सगळ्यांनी मराठीचे गोडवे गायले. हे एक बरं असतं एखादा दिवस शोधून काढायचा आणि तेवढ्या दिवसापुरतं ‘‘मराठी मराठी’’ करायचं. बाकी मग ‘मराठीच्या पाठीत घाला काठी’.
मराठी दिनाचा समारंभ साजरा होताना मराठी पुस्तकांची काय अवस्था आहे? ही पुस्तके बारा हजार ग्रंथालये महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील वचकांपर्यंत नेतात त्यांची काय अवस्था आहे? अतिशय किरकोळ कारणे सांगून पाच हजार ग्रंथालयांचे अनुदान शासनाने रोकून ठेवले आहे. दहा हजार कर्मचार्‍यांचे पगार थांबले आहेत. पटपडताळणी महसुल विभागाने केली. त्यांना या विषयाची काही फारशी माहिती नाही. त्यांनी जी ग्रंथालये बंद करा अशी शिफारस केली त्यांच्याबद्दल कोणी आक्षेप घेणार नाही. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पण जी ग्रंथालये एक दोन नाही तर शंभर शंभर वर्षे झाली चालु आहेत. त्यांच्यावर किरकोळ चुका दाखवत कारवाईचा दंडा का उगारला गेला?
माजी आमदार गंगाधर पटणे यांनी मुंबईला उपोषण केलं. राष्ट्रवादीचे राजेश टोपे हे या खात्याचे मंत्री आहेत. त्यांनी पाच फेब्रुवारी रोजी होणार्‍या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा विषय ठेवून प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिले व पटणे यांना उपोषण सोडावे लागले. पटणे पडले परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते. आमदार राहिले तरी त्यांना राजकीय कावा कुठून कळणार. आज महिना उलटून गेला पण कुठेच काही हालचाल झाली नाही. आता सगळ्यांच्या पायात निवडणुकांची घुंगरं वाजायला लागली. त्यात ग्रंथालय चळवळीचा क्षीण आवाज ऐकू येणार कसा.
महाराष्ट्रात बारा हजार सार्वजनिक ग्रंथालये आहेत. वीस पंचेवीस वर्षापुर्वीपर्यंत अशी परिस्थिती होती की गावोगावचे ग्रंथप्रेमी निष्ठेने पदरमोड करून ग्रंथालये चालवायचे. बघता बघता ग्रंथालयांची मान्यता हा राजकीय चळवळीत कार्यकर्ता जगविण्याचा एक मार्ग झाला आणि चळवळीची पुरती वाट लागली. जे लोक निष्ठेने हे काम करत होते ते बाजूला राहिले. आज राजकीय वजन वापरून आपले वाचनालय सोडवून घेण्यात बरेचसे राजकीय कार्यकर्ते यशस्वी ठरले. आणि निष्ठेने काम करणार्‍या कित्येक वर्षांची परंपरा असलेल्या ग्रंथालयांवर मात्र कारवाईची कुर्‍हाड कोसळली.
आज महाराष्ट्रात परिस्थिती अशी आहे की शासनाची स्वत:ची म्हणजेच जिल्हा ग्रंथालये, नगर पालिका, महानगर पालिका यांची ग्रंथालये आहेत. त्यांच्या कर्मचार्‍यांना शासकीय नियमाप्रमाणे व्यवस्थित पगार मिळतो. या ग्रंथालयात ग्रंथ खरेदी होत नाही. कारण काय तर सगळा पैसा पगारात आणि आस्थापनेच्या इतर बाबींवरच खर्च होऊन जातो. या ग्रंथालयातील वाचन कक्ष शासकीय वेळेप्रमाणे म्हणजे दहा ते पाच चालू असतो. शिवाय सुट्ट्यांच्या काळात तो बंदच असतो. शासकीय ग्रंथपालाचा किमान पगार छत्तीस हजार आहे. याच्या नेमके उलट सार्वजनिक ग्रंथालयांची स्थिती आहे. येथील वाचन कक्ष जास्तीत जास्त काळ चालू ठेवला जातो. मुलांना हवं ते पुस्तक उपलब्ध करून देण्यासाठी ग्रंथपालाला झटावे लागते. सर्वात मोठ्या जिल्हा ‘अ’ वर्ग ग्रंथालयाच्या ग्रंथपालाला दहा हजार मानधन (पगार नाही) मिळते. म्हणजे शासकीय ग्रंथपालाच्या एक चतुर्थांश पगार घेवून हा ग्रंथपाल त्याच्या कित्येकपट काम करतो. आपल्याकडे एक म्हण आहे ‘‘सतीच्या घरी बत्ती आणि शिंदळीच्या दारी हत्ती ’’ अशीच ही स्थिती आहे.
शासकीय ग्रंथालयांमध्ये वाचन कक्ष लावयचा असेल तर राजपत्रित अधिकार्‍याची सही लागते, शिवाय हवे ते पुस्तक मिळत नाही. या सगळ्यातून त्रस्त झालेला सामान्य माणुस आपल्या मुलाला सार्वजनिक ग्रंथालयांकडे पाठवितो. आश्चर्य म्हणजे शासकीय कर्मचार्‍यांची मुलंही अभ्यासासाठी शासकीय ग्रंथालयात जात नाहीत. ती येतात परत याच सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये.
शासनाने सामान्य लोकांसाठी शाळा काढल्या, दवाखाने उभारले, वाहतुकीची व्यवस्था केली, सहित्य संस्कृती मंडळ काढले, वाचनालयांना अनुदान द्यायला सुरवात केली. आज या सगळ्याची काय परिस्थिती आहे? जगदिश भगवती सारख्या अर्थतज्ज्ञांने असा आरोप केला होता की ‘‘गरीबांसाठी चालविल्या गेलेल्या सुविधा या कालांतराने गरीब सुविधा बनतात.’’ आज शासनाने इतर गोष्टींसारखीच सार्वजनिक ग्रंथालयांचीही स्थिती अशीच करून ठेवली आहे.
आज हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की सार्वजनिक ग्रंथायाच्या पाठीशी सामान्य जनता उभी राहणार आहे का? हा प्रश्न सोडविण्याची राज्यकर्त्यांची मुळीच इच्छा नाही हे तर स्पष्ट आहे. फक्त देखावा करण्यात सरकारला रस आहे. एकीकडे वाङ्मयीन पुरस्काराची रक्कम वाढवायची. दुसरीकडे 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन म्हणून साजरा करायचा. प्रत्येक जिल्ह्यात ग्रंथ महोत्सव भरवायचा. जिल्हा परिषदेच्या वतीने सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत वेगळा ग्रंथ महोत्सव भरवायचा. आणि हे सगळं चालु असताना सार्वजनिक ग्रंथालये मात्र अनुदानाअभावी उपाशी ठेवायची.
अकबर बिरबलाची एक गोष्ट आहे. की एक शेळी महिनाभर सांभाळायची. पण अट अशी की तीचे वजन वाढले नाही पाहिजे. शिवाय कमीही झाले नाही पाहिजे. मग नेहमीप्रमाणे बिरबल युक्तिने ते घडवून आणतो. तो काय करतो तर शेळीला भरपुर खाऊपिऊ घालतो पण तिच्या समोर वाघाचे चित्र टांगून ठेवतो. परिणामी तिचे वजन वाढतही नाही किंवा कमीही होत नाही.
सार्वजनिक ग्रंथालयाबाबत शासनाने बिरबलाची युक्ति केली आहे. पण त्यात एक साधी माणुसकीही दाखविण्यास शासन विसरले. वाघाचे चित्र समोर ठेवले तरी बिरबलाने शेळीला चारा घातला होता. इथे नियमांचे उग्र चित्र नसून प्रत्यक्ष कृतीच आहे.  शिवाय ग्रंथालयांचे अनुदानही बंद करून टाकले आहे. म्हणजे उपासमारी व समोर प्रत्यक्ष वाघ-मग शेळी हमखास मरणारच.
ग्रंथालय टिकावीत ही तळमळ सर्वांना वाटली तरच ती टिकतील. काही मोजक्या कार्यकर्त्यांनी धडपड केली म्हणजे पुरेसे आहे असे नाही. पूर्वी मराठी शाळांमध्ये ग्रंथालय असायचे. शाळांचे वेतनोत्तर अनुदान बंद झाल्यावर सगळ्यात पहिल्यांदा या शालेय ग्रंथालयांना घरघर लागली. आज तर महाराष्ट्रातील कुठल्याही माध्यमिक शाळेत जा. त्यांच्या ग्रंथालयात जुनीपुराणी पुस्तके आढळतील. कारण नवीन पुस्तके घ्यायला पैसाच नाही. शालेय ग्रंथालय चळवळ शासनाने पुर्णपणे मारून टाकली. महाविद्यालयातील ग्रंथालये एकेकाळी ललित-वैचारिक साहित्याने समृद्ध होती. पण विद्यापीठ पातळीवरच्या राजकारणाने अभ्यासक्रम सतत बदलत राहतो. मग ग्रंथालयांचा पैसा अभ्यासक्रमाची पुस्तके खरेदी करण्यातच खर्च होतो. परिणामी त्यांच्याकडेही ललित-वैचारिक साहित्याच्या खरेदीला निधी उरत नाही. म्हणजे हाही मार्ग गेल्या काही वर्षांत बंद झाला आहे.
सार्वजनिक ग्रंथायांमधुन ललित- वैचारिक साहित्याची भुक काही प्रमाणात भागविली जात आहे. आणि आज शासन या ग्रंथालयांची उपेक्षा करते आहे. हागणदारी मुक्त महाराष्ट्र लवकरच ग्रंथमुक्त महाराष्ट्र होईल असे प्रयत्न शासनाचे चालू आहेत.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575