Tuesday, February 20, 2018

तरूणांच्या लेखणीतून उमटत आहेत बुद्ध कबीर तुकाराम


उरूस, सा.विवेक, फेब्रुवारी 2018

निळा रंग म्हणजे बुद्ध नव्हे 
प्रत्येक रंगातलं निळेपण बुद्ध आहे

ही अप्रतिम ओळ आहे रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात शिकणार्‍या विजयकुमार बिळूर या विद्यार्थ्याची. त्याही ही कविता प्रतिभा संगम साहित्य संमेलनात पहिल्या क्रमांकाची ठरली. 
आजच्या तरूणांबद्दल सतत तक्रार करणार्‍यांनी विजय सारख्यांच्या कविता त्यांची संवेदनशीलता खरंच प्रमाणिकपणे समजून घ्यावी. म्हणजे त्यांना कळेल आजचे तरूणही किती प्रगल्भ असा विचार आपल्या कवितेतून मांडत आहेत. विजयने आपल्या कवितेचा शेवट जो केला आहे तोही असाच आहे ...

बुद्ध तुमच्यात माझ्यात 
आपल्यात नक्कीच आहे
गरज आहे ती फक्त
आपापल्या देवळांची 
रचना बदलण्याची
तुम्हाला तुमच्या देवळातही
बुद्ध दिसेल..

बामियानाच्या बुद्ध मुर्ती तालिबान्यांनी पाडल्या त्याची तीव्र प्रतिक्रिया आज विजय सारख्या तरूणांच्या कवितेतून शांतपणे उमटताना दिसत आहे. केवळ विजयच नव्हे तर दुसरा क्रमांक पटकावलेला एम.जे. महाविद्यालय जळगांवचा गोपाल बागुल नामदेव ढसाळच्या कवितेशी आपले नाते सांगत लिहून जातो

गटारीत फेकुन मारलेली कविता
कुणाच्या कविसंमेलनात वाचायची?
ती जन्मजात होती
अभिजात 
मुक्तछंदात 
मग कुणी कापले 
तिचे स्तन, 
कुणी कापले तिचे हात
आकलनाने रचलेले शब्द
कसे बिथरले? 

या तरूणांचा विचारांचा आवाका बघितला की खरंच आवाक व्हायला होतं. विजय किंवा गोपाल सारख्यांच्या कवितांना सामाजिक संदर्भ आहेत तसेच स्वप्निल चव्हाण सारख्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी अलगदपणे लिहून जातो उबदार माया करणार्‍या घराची कविता

ज्या घरांच्या भिंतीनाही जाणवतो स्पर्श
आपुलकी आणि जिव्हाळ्याचा
ज्या घरांतली माणसं आसुसलेली असतात
माणसांना आपल्यात सामावून घेण्यासाठी
ज्या घरांच्या स्पंदनांच्या लयीत
सहज विरघळत जातो गडद एकटेपणा
ज्या घरांतली माणसं परस्परांशी
माणसांसारखी वागतात
प्रेमाचा अभिनय न करता
एकमेकांवर नितांत प्रेम करतात

अशा घरांचे ‘ऍड्रेस’
‘बॅटरी डेड’ होईस्तोर
शोधत राहतो ‘गुगल मॅप्स’वर
कुणीतरी...

गेली 25 वर्षे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रतिभा संगम साहित्य संमेलन भरवित आहे. 16 वे प्रतिभासंगम नुकतेच पुण्यात संपन्न झाले. त्यात सहभागी तरूण कविमित्रांच्या या पारितोषिक प्राप्त प्रातिनिधीक कविता. 

मुलं वाचत नाहीत असा सर्रास आरोप केला जातो. पण अशा संमेलनांमधुन समोर येणारं चित्र य आरोपाच्या विपरीत अतिशय आशादायी आहे. मुलांना चांगलं वाचायचं आहे, ते आजूबाजूचे वर्तमान आपली नाजूक भावना, आपल्या तरूण मनाची स्पंदनं तरलपणे टिपू पहात आहेत. पण आपणच त्यांची योग्य दखल घेण्यास अपुरे पडत आहोत. 

विद्यापीठाच्या पातळीवर युवम महोत्सव भरवला जातो. पण त्याचे स्वरूप एक मोठ्या स्नेहसंमेलनासारखे गोंगाटी होवून गेले आहे. यात वाङ्मयीन उपक्रमांना फारसा वाव मिळत नाही. उदा. कवितेचाच विचार करावयाचा तर तरूणांनी आपल्या कविता लिहून आणल्या असतात. त्यांना त्या वाचायच्या असतात. त्यातील विषयांवर चर्चा करायची असते. अगदी प्राथमिक वाटतील अशा बाळबोध शंका विचाराच्या असतात. पण या सगळ्यासाठी मोठ्या झगमगाटी कार्यक्रमांत उसंतच मिळत नाही. मग अशा विद्यार्थ्यांना ‘प्रतिभा संगम’ हे हक्काचे व्यासपीठ वाटते.

या आयोजनाचे वेगळेपण म्हणजे इथे एक संपूर्ण दिवस गटचर्चा ठेवलेल्या असतात. 20-25 विद्यार्थ्यांचे गट केले जातात. हे विद्यार्थी आपल्या कविता प्रथितयश साहित्यीकांसमोर वाचतात. एकमेकांच्या कविता ऐकतात. चर्चा करतात. रात्री कविसंमेलनात मान्यवरांसोबतच निवडक विद्यार्थ्यांना कविता वाचण्याची संधी मिळते. प्रेमाच्या अवथर नाजूक तरल अशा कवितांपासून दाहक समाज वास्तवाचा अंगार शब्दांतून व्यक्त करणार्‍या कवितांपर्यंत सगळ्या प्रकारच्या कविता सादर होतात. आयोजकांनी राखलेल्या शिस्तीमुळे कवितेचे गांभिर्य राखले जाते परिणामी चांगली कविता तरूणांच्या मनापर्यंत व्यवस्थित पोचते. 

प्रतिभा संगमचे सगळ्या मोठे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण आयोजन हे महाविद्यालयीन तरूणच करतात. विजय सुतार सारखा तरूण चांगला कवी यावेळीस संमेलनाचा प्रमुख कार्यकर्ता होता. येवेळसचा विजेता पुढच्या वेळी संयोजकाच्या भूमिकेत जातो. ही एक चांगली प्रथा आयोजकांनी निर्माण केली आहे. 

काही उणीवांचा विचारही आता इतकी वर्षे झाल्यानंतर आयोजकांनी करायला हवा. अतिशय चांगले लिहीणारे कवि जसे आढळून आले तसे किमान दर्जाही नसलेली कविता फार मोठ्या प्रमाणावर आढळून आली. यासाठी विद्यापीठ पातळीवर काहीतरी गाळणी लावली गेली पाहिजे. मुळात महाविद्यालयीन पातळीवर वाचक मंच स्थापन करून निदान मराठीतील महत्त्वाची 100 पुस्तके उपलब्ध करून दिली गेली पाहिजेत. ही पुस्तके नीट वाचून त्यावर चर्चा घडवून आणल्या गेल्या पाहिजेत. ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत वाचक मंचचे उपक्रम जोरकसपणे महाविद्यालयीन पातळीवर चालले पाहिजेत. मग दिवाळी नंतर प्रतिभासंगम चे आयोजन साधारणत: डिसेंबर-जानेवारी महिन्यात जेंव्हा होणार असेल तेंव्हा या वाचक मंडळातील निवडक विद्यार्थ्यांना सहभागी करत हे साहित्य संमेलन महाराष्ट्र पातळीवर भरविण्यात यावे. 

दुसरी एक त्रूटी जाणवते ती म्हणजे विदर्भातील विद्यार्थी यात सहभागी झालेले दिसत नाहीत. विद्यार्थी परिषदेच्या रचनेत विदर्भ हा वेगळा प्रांत आहे हे इतर कार्यक्रमांसाठी समजल्या जावू शकते. पण साहित्य संमेलन सगळ्या मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी असल्याने विदर्भातील विद्यार्थ्यांचा प्रतिभा संगम मध्ये सहभाग आवश्यक वाटतो. 

कवितेसोबतच वैचारिक लिखाण, ब्लॉग, कथा कथन या स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. सगळ्या आयोजनात तरूण मुलं मुली ज्या खेळकर पद्धतीनं एकमेकांशी वागत बोलत होती ती खुपच आशादायी बाब जाणवली. सध्याच्या वातावरणात मुलं मुली एकमेकांत मिळून मिसळून काही एक सकारात्मक सांस्कृतिक काम करत आहेत ही खुपच दिलासा देणारी बाब आहे. 

विद्यार्थी परिषदेच्या लोकांनी आता या संमेलनाच्या आयोजनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली पाहिजे. 

   श्रीकांत उमरीकर, जशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575

No comments:

Post a Comment