Sunday, March 18, 2018

तिसऱ्या आघाडीचे रणशिंग


उरूस, सा.विवेक, मार्च 2018
भारताच्या राजकीय अवकाशात विरोधी पक्ष ही संकल्पनाच मुळात कॉंग्रेस विरोधातून तयार झाली. साहजिकच या पक्षांचे गुणसूत्र कॉंग्रेस विरोध असेच आहे. पण आणिबाणीच्या काळात एक मोठा गुंता तयार झाला. प्रचंड प्रमाणात संघाचे कार्यकर्ते आंदोलन करून तुरूंगात गेले. स्वाभाविकच पुढे जेंव्हा जनता पक्ष तयार झाला तेंव्हा संघाचा राजकीय चेहरा असलेल्या जनसंघाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जनता पक्षा कडून निवडून आले.

मधु लिमये सारख्या समाजवाद्यांनी इथूनच राजकीय घोळ घालायला सुरवात केली. राम मनोहर लोहिया यांनी मांडलेली कॉंग्रेसविरोधी दिशा बदलून ती संघ-जनसंघ विरोधी होण्यास सुरवात झाली. यातील पंचाईत अशी की कॉंग्रेस विरोधाच्या घुटीवर वाढलेल्या पक्षांना ही नविन घुटी पचणार कशी. पुढे जनता पक्षाची वाताहत झाल्यावर अटल बिहारी वाजपेयी-अडवाणी यांनी ‘भारतीय जनता पक्ष’ स्थापन केला आणि कॉंग्रेंस विरोधाची लोहियांची भूमिका स्वच्छपणे निभवायला सुरवात केली. 

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर जी सहानुभूतीची लाट आली त्यात इतर सर्व पक्ष वाहून गेले पण यातूनही आपल्या कॉंग्रेस विरोधी धोरणात वाजपेयींनी काहीही बदल केला नाही. कॉंग्रेसमधून विश्वनाथ प्रताप सिंह बाहेर पडून त्यांनी जनमोर्चा स्थापन केला. पुढे इतर सर्वांना बरोबर घेवून ‘जनता दल’ स्थापन केला. पण या कुठल्याही प्रयोगाला वाजपेयी-अडवाणी बळी पडले नाहीत. त्यांनी त्यांची वाटचाल चालूच ठेवली. कॉंग्रेसच्या विरोधी सरकार यावे म्हणून व्हि.पी.सिंह यांच्या जनता दलाला पाठिंबा दिला. अडवाणींची रथयात्रा लालूप्रसाद यादव यांनी रोकताच पाठिंबा काढून घेतला. पण चुकूनही कॉंग्रेसशी चुंबाचुंबी केली नाही. 

एकेकाळचे तरुणतुर्क समाजवादी नेते चंद्रशेखर यांना मात्र खुर्चीचा मोह आवरता आला नाही. त्यांनी कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले. मधु लिमये यांनी सुरू केलेल्या राजकीय गोंधळाचा पुढचा अध्याय लिहीला गेला. संघाच्या आंधळ्या द्वेषापोटी कॉंग्रेसशी जवळीक करायला हे तयार झाले. 

1991 पासून सुरू झालेला हा राजकीय पेच आजतागायत भाजप-कॉंग्रेसेतर पक्षांना सोडवता येत नाहीये. यांनी सांप्रदायिक म्हणून भाजपला कडाडून विरोध सुरू केला. मंडल विरूद्ध कमंडल असे शब्दप्रयोग वापरायला सुरवात केली. याची योग्य ती दखल घेत भाजपने जाणिवपूर्वक आपले ओबीसी नेतृत्व पुढे आणले. इतके की देशाचा पंतप्रधानच आज एक ओबीसी करून दाखवला. 

भाजप-संघाच्या विरोधा सोबतच कॉंग्रेसशीही कडाडून विरोध केला पाहिजे हे मात्र विसरल्या गेले. याचा परिणाम असा झाला की भाजप-संघाची भिती दाखवत बुडत चाललेल्या कॉंग्रेसने परत संजीवनी मिळवली. 2004 पासून 2014 पर्यंत बहुमत नसतांनाही निर्धोक सत्ता कॉंग्रेसने उपभोगली. याच काळात होईल तेवढे इतर पक्षांचे खच्चीकरण केले. भाजप विरोधातील मतांवर इतर पक्षांचा असलेला हक्क कधी आणि कसा कॉंग्रेसने मिळवला यांना लक्षातच आले नाही. महाराष्ट्रात शरद पवारांनी शिवसेनाच नाही तर जनता दलही फोडला होता हे पुरोगामी विद्वान सोयीस्कररित्या विसरतात. 

पश्चिम बंगालच्या मागील विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसोबत मार्क्सवाद्यांनी युती केली आणि आपली दयनीय अवस्था करून घेतली. 

या पार्श्वभूमीवर प्रकाश करात यांनी कॉंग्रेस सोबत न जाण्याचे जे धोरण ठरविले आहे ते राजकीय दृष्ट्या अतिशय योग्यच आहे. त्याला पोषक अशी भूमिका तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतली आहे. 

तिसरी आघाडी म्हटले की सगळे नाकं मुरडतात. डॉ. राम मनोहर लोहिया हयात राहिले असते तर ही आघाडी केवळ एक आघाडी न राहता सक्षम पक्ष म्हणून समोर आली असती. तिने केंव्हाच कॉंग्रेसला हटवून देशाची सत्ता काबीज करून दाखवली असती. लोहियांचा गुरूमंत्र संघ-भाजपला समजला पण त्यांच्या शिष्यांना नाही. 
आज भाजपची 31 % मते आणि कॉंग्रेसची 19 % मते आहेत. मग इतर 50 % मते कुठे आहेत? याचा कुणी विचारच करत नाही. शरद पवारांसारखे जाणते राजे कॉंग्रेसची तळी उचलताना दिसत आहेत आणि याचवेळी ममता बॅनर्जी, के. चंद्रशेखर राव, नविन पटनाईक, प्रकाश कारत, अखिलेश यादव, मायावती, नविन पटनायक हे कॉंग्रेस-भाजप विरोधी फळी उभारताना दिसत आहेत याचा विचार केला पाहिजे. निवडणुकांचे निकाल लागल्यावर सत्ता स्थापनेची सगळ्यात जास्त संधी आपल्या पक्षाला असताना ज्या पक्षाचा अध्यक्ष बेजबाबदारपणे परदेशात आजोळी निघून जातो त्या पक्षाच्या पदराखाली कशासाठी जायचे? त्रिपुरात मार्क्सवाद्यांनी भाजपच्या बरोबरीने मते राखली आहेत. आज त्यांना जागा जरी कमी मिळाल्या तरी त्यांचा जनाधार फारसा घटला नाही. हेच जर त्यांनी इतरांचे ऐकून कॉंग्रेसशी युती केली असती तर त्यांची अवस्था पश्चिम बंगाल सारखी झाली असती. गुजरातेत कॉंग्रेसला अल्पेश ठाकुर, जिग्नेश मेवाणी, हार्दिक पटेल  यांचा जास्त फायदा झाला स्वत:च्या नेत्यांपेक्षा हे समजून घेतले पाहिजे. 

सत्ताधारी भाजपला विरोध करणे हे तर इतर पक्षांचे कर्तव्यच आहे. पण सोबतच कॉंग्रेसची बुडती नौका वाचवायचे काहीच कारण नाही. जर ती वाचवली तर आपल्याच जीवावर बेतते याचा अनुभव आता इतर पक्षांना आला आहे. म्हणूनच तर कर्नाटकात जनता दल (सेक्युलर) च्या कुमार स्वामी यांनी आधीच मतदारांसमोर जाहिर केले आहे की कुठल्याही परिस्थितीत कॉंग्रेस सोबत जाणार नाही. त्यांना माहित आहे की असे केले तरच आपल्याला आपली असणारी हक्काची मते मिळतील. 

केरळात तर डावी आघाडी कॉंग्रेसची विरोधीच आहे. मग त्यांनी काय म्हणून कॉंग्रेस सोबत युती करावी? असे केले तर तिथे तर भाजपच्या पदरात आयतेच विरोधी मतांचे घबाड पडेल.  तामिळनाडूत करूणानिधींच्या डि.एम.के. ला सोबत घेण्याचे संकेत आत्ताच ममता दिदींनी दिले आहेत. आंध्र प्रदेशातील जगमोहन रेड्डी यांचा वायएसआर कॉंग्रेस मुळात कॉंग्रेसच्या विरोधात तयार झालेला पक्ष आहे. तो भाजप विरोध करताना कॉंग्रेस सोबत कसा जाणार? 

मुलायम, मायावती, लालुप्रसाद यांना राजकीय अपरिहार्यतेतून एकत्र येणे भाग आहे. आणि यांना कॉंग्रेस सोबत जाणे परवडत नाही हे वारंवार सिद्ध झाले आहे. तेंव्हा हे पण आपले वजन कॉंग्रेस विरोधी आघाडीतच टाकू शकतात. केजरीवाल यांना नुकताच पंजाब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत फटका बसला आहे. तेंव्हा त्यांनाही भाजप सोबतच कॉंग्रेस विरोध तीव्र करण्यावाचून गत्यंतर नाही. कश्मिर मध्ये ओमर अब्दूल्ला राजकीय वनवासात आहेत. त्यांना बाहेर येण्यासाठी आता कॉंग्रेसचा आधार पुरेसा नाही. झारखंड मुक्ती मोर्चा सध्या बेदखल आहे. 

तेंव्हा केरळ (20),  कर्नाटक (28), तामिळनाडू (39), तेलंगणा (17), ओडिशा(21), आंध्रप्रदेश (25), पश्चिम बंगाल (42), बिहार (40), झारखंड (14), उत्तर प्रदेश (80), दिल्ली (7), पंजाब (13), जम्मु कश्मिर (6) या राज्यांमधुन (एकुण 352 जागा)  भाजप-कॉंग्रेसेतर पक्ष एक महत्त्वाची राजकीय ताकद म्हणून या दोघांच्या विरोधात स्पष्ट भूमिका घेतली तरच उभे राहू शकतात. (पश्‍चिम बंगालात मार्क्सवादी-ममता असा तिढा आहे. तो व्यवहारिक दृष्ट्या सोडवायचा तर मार्क्सवाद्यांना सोडून ममतादिदींना सोबत घ्यावे लागेल.) 

महाराष्ट्राचा घोळ शरद पवारांनी घालून ठेवला आहे. 1987 ला विश्वनाथ प्रताप सिंह कॉंग्रेसमधून बाहेर पडले आणि शरद पवार मात्र 1986 ला कॉंग्रेसमध्ये गेले. राजकीय दृष्ट्या व्हि.पि. सिंहच बरोबर होते हे सिद्ध झाले. 1999 ला सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा करून शरद पवार कॉंग्रेस बाहेर पडले पण त्याच वेळी राज्य सभेत विरोधीपक्ष नेते असलेले मनमोहन सिंग सोनिया गांधींचा नूर बघून शांत बसून राहिला. याचा फायदा म्हणजे पुढे चालून 10 वर्षे त्यांना पंतप्रधान पदाची लॉटरी लागली. आपल्या आधीच्या विचारांना पूर्ण फाटा देवून त्यांनी सोनिया प्रणित नेहरू समाजवादी धोरणं राबवित का असेना राजकीय फायदा करून घेतला. परत शरद पवार राजकीय दृष्ट्या चुक ठरले. 

आता कॉंग्रेसची नाव बुडत चालली आहे. हे बरोबर ओळखून चंद्रशेखर राव- ममता यांनी बरोबर तिसर्‍या आघाडीचा फासा टाकला आहे. यात केंद्रातील सत्तेचे त्यांना फारसे काहीच देणे घेणे नाही. पण आपल्या आपल्या राज्यातील सत्ता राखायची तर भाजप इतकाच कॉंग्रेस विरोध केल्याशिवाय पर्याय नाही. नव्हे आपले अस्तित्वच त्या शिवाय शक्य नाही हे यांना कळून चुकले आहे. महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकरांना हे बरोबर कळले आहे. (महाराष्ट्रातील 48 जागांचा विचार केला तर भाजप-कॉंग्रेसतर पक्षांची किमान ताकद असलेले 400 मतदार संघ होतात. हा आकडा मोठा आहे. 1989 च्या तिरंगी निवडणुकीत जनता दलाचे 6 खासदार निवडून आले होते. तेंव्हा प्रकाश आंबेडकरांची साथ नव्हती. शरद पवार तर कॉंग्रेसचे मुख्यमंत्रीच होते.)  

तेंव्हा कुणी कितीही नावं ठेवो, कितीही हिणवो, पुरोगामी कितीही गळे काढून कॉंग्रसच्या पदराखाली सगळ्यांनी एकत्र येण्याचा धावा करो, भाजप-कॉंग्रेसला कडाडून विरोध करत तिसरी आघाडी हाच योग्य राजकीय व्यवहार्य पर्याय या पक्षांना राहणार आहे. 

       श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575  

(हा लेख प्रसिद्ध झल्यावर उत्तरप्रदेश पोटनिवडणुकीचे निकाल आले. गोरखपुर आणि फुलपुर मध्ये समाजवादी पक्षाचा उमेदवार विजयी झाला. या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला या सोबतच लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे कॉंग्रेसचा उमेदवार रिंगणात होता. बिहारमध्येतरी त्यांनी राजदला पठिंबा दिला होता. मायावती यांनी ऐनवेळी आपला पाठिंबा समाजवादी पक्षाला दिला पण मायावती प्रचारात कुठेही नव्हत्या. निकाल लागल्यावर अखिलेश यादव मायावती यांना भेटायला स्वत: त्यांच्या घरी गेले. पण या सगळ्यात कॉंग्रेसची कुणी दखलही घेतली नाही. 

सोनिया गांधी यांनी आदल्याच दिवशी रात्री विरोधी पक्षाच्या नेत्यांना भोजनासाठी बोलावले होते. पण शरद पवार व ओमर अब्दूल्ला यांच्याशिवाय इतर विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्याने स्वत: न जाता दुय्यम नेत्यांना पाठवणे पसंद केले. शिवाय चंद्राबाबूंनी सरकारमधून बाहेर पडणे पसंद केले. शिवाय सरकारवर अविश्वास प्रस्तावही संसदेत दाखल केला. या घडामोडीतही कॉंग्रेसशी कुणी आपणहून चर्चा केली नाही. 
यावरून परत हेच सिद्ध होते की भाजप सोबतच कॉंग्रेसचा विरोध करत तिसरी आघाडी उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.) 


Tuesday, March 13, 2018

पोटनिवडणुक निकाला आधीच लिहून ठेवतो..



आपल्याकडे निकाल जसे लागतील त्याप्रमाणे मत प्रदर्शन करणार्‍या विद्वानांचे  प्रमाण प्रचंड वाढलं आहे. हे लोक बर्‍याचदा वस्तुस्थिती काय आहे याकडे लक्षच देत नाहीत. आता उद्या पोटनिवडणुकीची मतमोजणी होत आहे. यातील उत्तरप्रदेशचे उदाहरण मोठं मासलेवाईक आहे.

गोरखपुर आणि फूलपूर  हे दोन्ही मतदारसंघ भाजपकडे होते. येागी आदित्यनाथ आणि केशवप्रसाद मौर्य यांनी राजिनामा दिल्याने इथे पोटनिवडणुक होत आहे. आता जर इथे भाजपच जिंकला तर निश्‍चितच पुरोगामी म्हणणार त्यांच्या जागा होत्या त्यांनीच जिंकल्या. मग या निवडणुकीत मिळालेली मते मोजली जातील. याची तुलना आधी मिळालेल्या मतांशी केली जाईल आणि भाजपचा हा खरा तर पराभवच कसा आहे हे आग्रहाने सांगितले जाईल.

दुसरी शक्यता आहे की उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचा उमेदवार विजयी होईल. असे झाले तर काही विचारायची सोयच नाही. मग अगदी भारतभर मोदींचा प्रभाव कसा संपला. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. असली कर्कश ओरड सुरू होईल. समाजवादी पक्ष म्हणजे कसा बहुजनांचा तारणहार आहे. मायावती यांनी पाठिंबा दिल्याने अखिलेश मायावती यांचे एकत्र छायाचित्र माध्यमांमधून झळकेल. मायावती त्यांच्या चिरपरिचीत अशा आवाजात ‘एक दलित की बेटी को इन मनुवादीयोंने अपमानित किया था. आजकी इस चुनाव ने इसका बदला लिया है. अब दिल्ली दूर नही.’ वगैरे वगैरे सुरू होईल..

हीच परिस्थिती बिहारची. निदान बिहार मध्ये कॉंग्रेस ने आर जे डी ला पाठींबा तरी दिला आहे

पण आश्चर्य म्हणजे या तीनही ठिकाणी कॉंग्रेस कुठे आहे याची कुणी चर्चाच करत नाही. कॉंग्रेसचा विजय तर सोडाच पण त्यांची दखलच कुणी घेतली नाही. इकडे भाजप विरोधी आघाडी तयार करण्यासाठी महाराष्ट्रात शरद पवारांसारखे जाणते राजे राहूल गांधींच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसचा कसा योग्य पर्याय आहे हे सांगत आहेत. आणि दुसरीकडे भारतभर भाजप सोबतच कॉंग्रेसलाही दूर ठेवले पाहिजे यावर ममता-मायावती-अखिलेश-लालू- चंद्रशेखर राव- एम.के.स्टालिन-केजरीवाल- नविन पटनायक-देवेगौडा यांची एकी होताना दिसत आहे.
उद्याच्या पोटनिवडणुकीचे निकाल काहीही लागो कॉंग्रेसला भाजपेतर विरोधी पक्षांनीच बेदखल केल्याचे दिसत आहे. पुरोगामी आघाडी उघडायचीच असेल तर कॉंग्रेस कशाला पाहिजे आहे? हीच कॉंग्रेस आहे की जिला विरोध करून आपण  राजकीय पक्ष म्हणून उभे राहिलो. भाजप तर आत्ता आत्ता तयार झालेली ताकद आहे. तिच्या सेाबतच या कॉंग्रेसलाही विरोध केला पाहिजे. भाजप-कॉंग्रेस मिळून 50 टक्के मते होतात. पण उरलेली 50 टक्के इतकी प्रचंड मते तर आपल्याकडे आहेत ना. असा विश्वास या कॉंग्रेस-भाजपेतर विरोधी पक्षांना दिसतो आहे.
राजकीय अभ्यासकांनी याची नोंद घ्यावी. 2019 च्या निवडणुकीत कॉंग्रेस-भाजतेतर तिसरी आघाडी उभी राहण्याची शक्यता जास्त आहे. यात सगळ्यात जास्त नुकसान कॉंग्रेसचेच होईल. भाजपाची-संघाची भिती दाखवत आपल्या पोळीवर तुप पाडून घेण्याची कॉंग्रेसची निती आता इतर पुरोगामी पक्ष किती चालू देतील याची शंकाच आहे.

हे मुद्दाम उद्याच्या निकालाच्या आधीच लिहून ठेवतो. 

Saturday, March 10, 2018

संमेलनाचिये नगरी । भाषणांचा सुकाळू । ग्रंथविक्रीचा दुष्काळू । जाहलासे ॥


उरूस, सा.विवेक, फेब्रुवारी 2018

साहित्य संमेलनात ग्रंथविक्रीची हेळसांड होते ही तक्रार वारंवार केल्या गेली होती. याहीवेळी हेच घडले. पण तिकडे दुर्लक्ष करण्यातच साहित्य महामंडळाने धन्यता मांडली. लक्ष्मीकांत देशमुख हे ‘राजा तू चुकतोस’ असं ठामपणे सांगू शकले पण ‘महामंडळा तू चुकतोस’ असं मात्र म्हणायची त्यांची हिंमत झाली नाही. त्यांच्या डोळ्यासमोर ग्रंथ विक्रीचा उडालेला बोजवारा दिसत होता. पण समोर जे दिसते आहे त्याबद्दल जाहिर भूमिका घेणं सोयीचं नसतं. त्यापेक्षा बाकीच्या अभासी गोष्टींबाबत भूमिका घेतलेली बरी. निदान त्याची इतिहासात दखल तरी होते. 

हेच लक्ष्मीकांत देशमुख 1995 साली परभणीला संपन्न झालेल्या 68 व्या साहित्य संमेलनाचे कार्यध्यक्ष होते. यांनी आपल्य अधिकारात सरकारी पातळीवर जिल्हा परिषद, सार्वजनिक ग्रंथालये, महाविद्यालये यांना ग्रंथ खरोदी साठी संमेलन काळात निधी प्राप्त व्हावा अशी सोय केली होती. परभणी जिल्हा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील सार्वजनिक संस्थांशी आधी संपर्क करून ग्रंथ खरेदीसाठी वातावरण निर्माण केले होते. याचा परिणाम असा झाला की परभणीच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात पहिल्यांदाच ग्रंथविक्रीने कोटीच्या कोटी उड्डाण केले. 

पुढे नगरला यशवंतराव गडाख यांनीही ग्रंथ विक्री जास्त कशी होईल यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न केले. हे वारंवार सिद्ध झाले आहे की ग्रामिण भागात जिथे पुस्तक विक्रीची नियमित दुकाने नाहीत त्या ठिकाणी साहित्य संमेलन घेताना व्यवस्थित नियोजन केले की ग्रंथविक्री तडाखेबंद होऊ शकते. 

साहित्य संमेलनच कशाला महाराष्ट्रभर ग्रंथ यात्रा काढणार्‍या ढवळे आणि पुढे अक्षरधाराच्या राठिवडेकर यांनीही हा प्रयोग छोट्या प्रमाणावर सिद्ध करून दाखवला आहे. 

मग हे सगळं माहित असताना बडोद्याच्या साहित्य संमेलनात पुस्तकांची विक्री व्हावी म्हणून आधीपासून प्रयत्न का नाही झाले? आज गुजरातमध्ये ज्या मराठी शाळा चालु आहेत, जी मराठी ग्रंथालये कशीबशी तग धरून आहेत, जिथे जिथे मराठी कुटूंबं आहेत त्यांच्यापर्यंत पोचून त्यांना ग्रंथखरेदीसाठी उद्युक्त का नाही केल्या गेले? साहित्य संमेलनास निधी अपुरा पडतो असे दिसल्यावर संमेलन रद्द होवू नये म्हणून विविध प्रयोजकांकडून निधी मिळविण्यासाठी धडपडणारे ग्रंथ विक्री व्हावी म्हणून का नाही धडपडले? 

गेली काही वर्षे सातत्याने असं घडत आलं आहे की संमेलनास जोडून भरणारे ग्रंथप्रदर्शन ही दुय्यम बाब समजली गेली आहे. ग्रंथ प्रदर्शनाचा परिसर धुळमुक्त नसणे, पुस्तकांच्या सुरक्षेची व्यवस्था नसणे, पुस्तकांच्या गाळ्यांमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांना किमान सोयी न पुरवणे, उन्हापासून संरक्षण नसणे, प्रदर्शनाची जागा रसिकांसाठी सोयीची नसणे, प्रदर्शन परिसरात शांतपणे बसून पुस्तकं चाळता येतील अशी जागा नसणे हे वारंवार तक्रार करूनही का घडते? 

नॅशनल बुक ट्रस्ट च्या व्यववस्थेत महाराष्ट्र-गुजरात-गोवा या तिन्ही राज्यांना एकत्र करून त्याचा पश्‍चिम विभाग प्रशासनाच्या दृष्टीने केला जातो. ही संस्था दरवर्षी राज्य पातळीवर मोठं पुस्तक प्रदर्शन भरवते. तेंव्हा हे प्रदर्शन अखिल भारतीय साहित्य संमेलन जिथे असेल तेथेच भरविण्यात यावे असा प्रस्ताव आजतागायत साहित्य महामंडळाकडून त्यांच्याकडे करण्यात आला नाही. ही अनास्था कशासाठी? पुस्तक प्रदर्शनासाठी एनबीटी लाखो रूपये खर्च करते. साहित्य संमेलनात पुस्तक प्रदर्शनासाठी भाडं भरून प्रकाशकांना गाळे घ्यावे लागतात. मग या दोन्ही संस्थांनी एकत्र येवून यावर व्यवहारिक मार्ग का काढू नये? 

इ.स. 2010 पासून महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात ग्रंथ प्रदर्शन भरविले जाते. इ.स. 2016 चा अपवाद वगळता प्रत्येक वर्षी प्रत्येक जिल्ह्यात हे प्रदर्शन संपन्न झाले आहे. सुरवातीला यासाठी एक लाख रूपये निधी होता आता हा निधी दोन लाखापर्यंत गेला आहे. मग हाच उपक्रम थोडासा पुढे वाढवून साहित्य संमेलनात जे ग्रंथ प्रदर्शन भरविले जाते त्याला का दिला जात नाही? 

प्रकाशक परिषदेचे अधिवेशन गेल्या कित्येक वर्षांत भरलेले नाही. राज्य ग्रंथालय संघाचीही अधिवेशने कशीबशी उरकली जातात. मग अखिल भारतीय साहित्य संमेलनाला जोडून प्रकाशक परिषदेचे अधिवेशन, राज्य ग्रंथालय संघाचे अधिवेशन असा एक मोठा ‘माय मराठी महोत्सव’ का नाही भरविला जात? 

मूळात तक्रार अशी आहे की साहित्य संमेलन हे ग्रंथकेंद्री नाही. हे निव्वळ उत्सवी झगमगाटी होवून बसले आहे. जो साहित्य संमेलनाचा अध्यक्ष आहे त्याचीही पुस्तके संमेलनात उपलब्ध असतील असे नाही. सगळ्या पाहूण्यांचे स्वागत करण्यासाठी मोठ मोठी स्मृतीचिन्हं, शाल आणि बुके यांच्यावर प्रचंड पैसा खर्च करणारे आयोजक यासाठी पुस्तकांचा विचार का नाही करत? ज्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे त्यावर्षीच्या साहित्य संमेलनात ते पुस्तक भेट म्हणून का नाही दिलं जात? तसेच संमेलनाच्या अध्यक्षाचे एक पुस्तक निवडून त्याच्या प्रती दिल्या जाव्यात हे का नाही सुचत? कालबाह्य विषय घेवून संमेलनात चर्चा करणारे लोक कधीच पुस्तकांवर चर्चा का नाही करत? 

‘राजा तू चुकतोस’ म्हणणारे लक्ष्मीकांत देशमुख राज्यातील ग्रंथालय चळवळीबाबत, प्रकाशकांच्या प्रश्‍नांबाबत मौन बाळगुन का बसतात? क्रिडा खात्याचे संचालकपद असो की गोरेगांव चित्रनगरीचे संचालकपद असो मागून घेणार्‍या देशमुखांनी ग्रंथालय संचालकाचे पद मुद्दाम मागून का नाही तिथे काही सुधारणा करून दाखवल्या? 

बडोद्याला रसिक पुस्तकांकडे फिरकले नाहीत.  साहित्य महामंडळ आणि अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी तातडीने या प्रश्‍नावर लक्ष घालून वर्षभर सुयोग्य नियोजनाची आखणी करावी. वर्षभर महाराष्ट्रातील विविध संस्थांना हाताशी धरून ग्रंथविषयक उपक्रम राबवून दाखवावेत. असे उपक्रम राबवतांना जिथे जिथे सरकारी अडथळे येतील तिथे तिथे लालफितशाहीतून मार्ग काढून मात करावी आणि पुढच्या वर्षी ही तक्रार संमेलनात राहणार नाही याची व्यवस्था करावी.  संत समर्थ रामदास यांनी ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’ असे म्हटले होते. मग केवळ ‘राजा तू चुकतो आहेस’ म्हणून भागणार नाही. त्यासाठी निश्‍चितपणे ठोस अशी कृतीच करावी लागेल. 

साहित्य महामंडळाच्या चार मुख्य घटक संस्था आहेत. मुंबई साहित्य संघ-मुंबई, महाराष्ट्र साहित्य परिषद-पुणे, मराठवाडा साहित्य परिषद-औरंगाबाद, विदर्भ साहित्य संघ-नागपुर यांच्या कार्यक्षेत्रात आज 12 हजार सार्वजनिक ग्रंथालये आहेत. शाळा आणि महाविद्यालयांची ग्रंथालये मोजली तर ही संख्या जवळपास 25 हजार इतकी प्रचंड आहे. ज्या महाराष्ट्रात 25 हजार सार्वजनिक ग्रंथालये आहेत त्या महाराष्ट्रात जेंव्हा एखाद्या ललित/वैचारिक मराठी पुस्तकाची आवृत्ती निघते तेंव्हा ती फक्त 500 प्रतींची असते. ही लाजिरवाणी बाब आहे असे आपल्याला का नाही वाटत?

साहित्य महामंडळाच्या घटक संस्था दरवर्षी त्यांचे स्वतंत्र असे विभागीय साहित्य संमेलन घेतात. त्याच्या अध्यक्षपदाची निवडणुक होत नाही. तिथे अध्यक्ष सहमतीने एकमताने निवडला जातो. या विभागीय साहित्य संमेलनाला जोडून मोठा ग्रंथ महोत्सव भरवावा असे का नाही यांना वाटत? पुस्तकांची उपेक्षा करून वाङ्मय व्यवहार सुरळीत चालेल अशी भाबडी स्वप्नं महामंडळाला, अध्यक्षांना, घटक संस्थांना दिवसाढवळ्या पडतात की काय?  

प्रचंड व्यवसायीक झालेल्या खासगी शाळांबाबत एक व्यंगचित्र होते. शाळेचा गणवेश, वह्या-पुस्तके, इतर शालेय साहित्य, खेळाचे सामान या सगळ्याचे मिळून प्रचंड शुल्क पालकांना सांगितले जाते. हे सगळे इथूनच कसे खरेदी करावे हेही पटवले जाते. पण जेंव्हा पालक शिक्षणाबाबत विचारतो तेंव्हा ‘शिक्षण काय तूम्हाला बाहेर कुठेही मिळून जाईल...’   असा उपहास त्या व्यंगचित्रात केलेला आहे. तसे संमेलनात सगळा झगमगाट, उद्घाटनाला मंत्री संत्री, खाण्यापिण्याची सोय, जवळपासच्या पर्यटन स्थळांचे दर्शन, ट्रॉली कॅमेर्‍यांतून शुटींग, चित्रपट-नाट्य कलावंतांचा सहभाग, संमेलन फेसबुकवर लाईव्ह सगळे सगळे असेल पण तुम्ही जर वाचन संस्कृतीबद्दल विचाराल, चांगल्या पुस्तकांबद्दल प्रश्‍न कराल तर ‘ते तूम्हाला बाहेरच कुठेतरी मिळेल’.. असे उत्तर महामंडळाकडून मिळते. 

आता काय करावे सांगा? 
 
       श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Friday, March 9, 2018

पार्वती दत्ता आणि महागामी : नृत्य गुरूकुलाचा वेगळा प्रयोग


उरूस, सा.विवेक, ११-१८ मार्च  2018

कलाकारांच्या चारित्र्यात नेहमी आढळणारी बाब म्हणजे त्यांनी मेहनतीने कला कशी आत्मसात केली. गुरूकडे राहून कष्टानेज्ञान मिळवले. प्रचंड रियाझ केला. आणि त्यांच्या कलेला रसिकांनी कसा प्रचंड प्रतिसाद दिला. विविध पुरस्कार कसे प्राप्त झाले. 

पण आपल्या वैयक्तिक कर्तृत्वासोबतच कलेबाबत प्रशिक्षण देणारी, डोळसपणे अभ्यास करणारी, या क्षेत्रातील विद्वानांना सन्मानाने आमंत्रित करून त्यांच्या ज्ञानाचे भांडार रसिकांसाठी अभ्यासकांसाठी खुले करणारी एखादी संस्था स्थापन करणे आणि ती चिवटपणे दीर्घकाळ चालवणे ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. 

औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशन शिक्षण संस्थेत असा प्रयोग ‘महागामी’ गुरूकुलाच्या रूपाने सुप्रसिद्ध नृत्यांगना पार्वती दत्ता गेली 21 वर्षे चालवित आहेत. 

मुळच्या पश्चिम बंगालच्या असलेल्या पार्वती दिदी (त्यांना त्यांच्या शिष्या आणि या गुरूकुलाशी संबंधीत सर्व याच नावाने ओळखतात) वडिलांच्या नौकरीनिमित्त भोपाळला आल्या. भोपाळच्या वास्तव्यात एक फार चांगली गोष्ट त्यांच्या बाबतीत घडली. त्यांची हिंदी भाषा अतिशय वळणदार, शुद्ध, माधुर्यपूर्ण बनली. अन्यथा बंगाली भाषिक किंवा हिंदी खेरीज अन्य भाषिकांची हिंदी कानाला इतकी गोड वाटत नाही. सुप्रसिद्ध नर्तक पद्मविभुषण गुरू केलूचरण महापात्रा यांच्याकडून त्या ओडिसी आणि नर्तक गुरू पं. बिरजू महाराज यांच्याकडून त्या कथ्थक शिकल्या.

आपले शिक्षण चालू असतांनाच त्यांच्या मनात संगीत शिक्षण देणारी आगळी वेगळी संस्था असावी असे विचार चालू झाले. संगीताचे आद्य ग्रंथ अभ्यासत असताना त्यांच्या हातात शारंगदेवाचा ग्रंथ ‘संगीत रत्नाकर’ लागला. मुळचे कश्मिरचे असलेले शारंगदेव देवगिरीच्या यादवांच्या दरबारात संगीतज्ज्ञ म्हणून होते. देवगिरी किल्ल्यावर या ग्रंथाची रचना झाली. या परिसरांतील वेरूळ, अजिंठा लेण्यांमधील मूर्तींच्या नृत्यमुद्रा पार्वती दिदींना मोहवत होत्याच. औरंगाबाद शहराला लागून विद्यापीठ परिसरात ज्या लेण्या आहेत त्यात आम्रपालीचे नृत्य-वादन-गायन असे एक शिल्प आहे. भारतातातील नृत्य-गायन-वादनाचा हा सगळ्यात जूना शिल्पांकित पुरावा मानला जातो. हा जवळपास दोन हजार वर्षांपूर्वीचा आहे. 

या सगळ्या वातावरणांने भारून जावून पार्वती दिदींना असे वाटले की ज्या परिसरात गेली दोन हजार वर्षे संगीताचे वातावरण राहिलेले आहे, जिथली सांगितीक परंपरा खुप समृद्ध आहे त्याच परिसरात संगीत शिक्षण देणारे आगळे वेगळे गुरूकुल स्थापन केले पाहिजे. त्या अनुषंगाने त्यांनी चाचपणी सुरू केली. महात्मा गांधी मिशन शिक्षण संस्थेच्या अंकुशराव कदम यांना त्यांचा प्रस्ताव पसंद पडला. त्यांच्या परिसरात त्यांनी ‘महागामी’ गुरूकुलाला जागा दिली शिवाय सर्व सहाय्य केले. 

वारली चित्रांनी सजलेल्या आकर्षक भिंती, उंचच उंच वाढलेल्या वृक्षांची घनदाट छाया, प्लास्टिक सारख्या कृत्रिम  वस्तुंचा वापर न करता लाकुड, धातू यांपासून तयार केलेले फर्निचर, नृत्य करतांना वापरावयाची सुती वस्त्रे, जून्या परंपरेतील दागिने, केशभुषेचे अस्सल भारतीय बाज अशा कितीतरी बाबींतून या गुरूकुलाचे वैशिष्ट्य न सांगताही पाहणार्‍यांच्या डोळ्यात मनांत ठसते. इथल्या विद्यार्थ्यांची सुंदर संस्कृत मिश्रीत शुद्ध हिंदी हे पण एक वैशिष्ट्यच आहे. 

ओडिसी आणि कथ्थक शिकवत असतांना केवळ नृत्यच नाही तर एकूणच वागण्यांत सुसंस्कृतपणा  रूजविण्यात दिदींचा कल असतो. या परिसरांत एक बंदिस्त आणि एक खुले असे दोन रंगमंच आहेत. जेंव्हा रसिकांना कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाते तेंव्हा सगळ्या परिसरात पणत्या पेटवल्या जातात. दगडी बाकांवर सुती सतरंज्या अंथरल्या जातात. पुरूषांसाठी कपाळाला गंध आणि स्त्रियांसाठी फुलांचे गजरे यांची व्यवस्था केली जाते. मंचावर कधीही कुठलेही भडक बॅनर पाठीमागे लावले जात नाही. नृत्याच्या मोठ्या कार्यक्रमांसाठी रेकॉडेड संगीत न वापरता वादकांना खास आंमंत्रित केले जाते. कथ्थकसाठी सारंगी-तबला तर ओडिसी साठी बांसरी-पखावज वादकांना सन्मानाने बोलावून प्रत्यक्ष वादनाचा आस्वाद रसिकांना नृत्यासोबत दिला जातो. 

केवळ मनोजरंजनाच्या हेतूने अथवा शृंगाराचा उद्देश समोर ठेवून सादर केल्या जाणार्‍या कलांना आणि कलाकारांना इथे बोलाविले जात नाही. तर आपल्या प्रदिर्घ तपश्चर्येने रियाझाने ज्यांनी कलेची जोपासना केली आहे, अभ्यास केला आहे अशा कलाकारांनाच ‘शारंग देव समारोहा’त आमंत्रित केले जाते. मग यात बाऊल संगीतासाठी आयुष्य वाहून घेतलेल्या पार्वती बाऊल असो, की दुर्मिळ अशा वीणा वाजविणार्‍या ज्योती हेगडे असो की मार्गनाट्यसारखा हजार वर्षापूर्वीचा कलाप्रकार जपणारे पियल भट्टाचार्य असो. 

पार्वती दिदींनी स्वत:चा कलात्मक विकास करत असताना या परिसरांतील कलेचा जो अभ्यास सुरू ठेवला आहे तो पण फार महत्त्वपूर्ण आहे. ओडिसा आणि महाराष्ट्र यांच्यात हजारो किमी चे अंतर. पण वेरूळमधील शिल्पांत मूर्त्यांमध्ये ज्या मुद्रा आहेत त्या ओडिसी नृत्य प्रकारातील मुद्रांशी कशा जूळतात याचा त्या बारकाईने अभ्यास करत आहेत. या दोन ठिकाणच्या राजवटींतील कलाकारांमध्ये आदानप्रदान होत असणार असे त्यांचे प्रतिपादन आहे. 

जगप्रसिद्ध कैलास लेण्यात शिवाची नटराज मुर्ती आहे. ही मूर्ती सर्वत्र पूजल्या जाणार्‍या तंजावरच्या या ‘उल्लोलीतपाद नटराज’ मुर्तीपेक्षा जूनी आहे. ही मुर्ती ‘लोलीतपाद’ नटराज असून आपण याचीच पुजा कलेच्या सादरीकरणापूर्वी कशी केली पाहिजे. अशा बाबी त्या अभ्यासाने अग्रहपूर्वक ठासून सांगतात तेंव्हा त्यांचा या प्रदेशाबद्दलचा अभिमान जाणवत राहतो.

शिष्यांना ओडसी व कथ्थक शिकविण्याची त्यांची पद्धतही अभिनव अशीच आहे. पहिल्यांदा आलेल्या सर्व विद्यार्थ्यांची परिक्षा घेवून त्यांतून त्यांची निवड केली जाते. त्यांना काय शिकवायचे कथ्थक की ओडिसी याचा निर्णय गुरूकुलाच्यावतीनेच घेतला जातो. गुरूपौर्णिमेला या गुरूकुलाच्या शैक्षणिक वर्षाची सुरवात होते. वर्षभर शिष्यांना शिकवत असताना पालक सभा म्हणून पालकांसमोर त्यांना सादरीकरण करायला सांगितले जाते. स्वत: पार्वती दिदी प्रत्येक शिष्याचे नृत्य पाहून पालकांसमोरच सुचना करतात. उणिवा दाखवून देतात. पालकांनाही आपण वर्षभर काय आणि कसे शिकवले हे समजावून सांगतात. त्या स्वत: उत्कृष्ट नृत्यांगना आहेतच पण शिष्यांना शिकवताना त्या ज्या पद्धतीनं स्वत: मुद्रा करून दाखवतात ते फारच परिणामकारक ठरते. शिवाय वर्षांतून किमान दोन तरी मोठे वाटणारे सादरीकरण त्या आमंत्रित हजारो रसिकांसमोर करून एक वस्तुपाठच शिष्यांसमोर ठेवतात.

या वर्षी शारंगदेव समारोहात त्यांनी ‘धृपदांगी कथ्थक’ हा स्वत: शोधून काढलेला विकसित केलेला अभ्यासलेला नृत्य प्रकार सादर करून रसिकांना अभ्यासकांना आणि शिष्यांना चकित केले. कथ्थक हे केवळ मोगलांच्या दरबारातून पुढे आले विकसित झाले असे नसुन त्याचे धागे पूर्वीच्या ग्रंथांत परंपरात कसे सापडतात, इतकेच नाही तर महाभारत कालीन संदर्भही कथ्थकचे कसे आहेत हेही त्यांनी अभ्यासातून उलगडून दाखवले आहेत. 

लोककलांच्या बाबतीतही दिदी जागरूक आहेत. शारंगदेवाच्या संगीत रत्नाकर मध्ये उल्लेख असलेल्या ‘किन्नरी विणा’ या वाद्याचा शोध घेत त्यांनी तेलंगणातील एकमेक कलाकार शोधून काढला. त्याचे सादरीकरण या जानेवारीत रसिकांसमोर करण्यात आले. याच पद्धतीनं डवरी गोसावी वाजवतो त्या छोट्या सारंगीचा शोध या गुरूकुलाला नुकताच लागला आहे. त्याचेही सादरीकरण इथे आता होणार आहे. 

संगीत परंपरा डोळसपणे अभ्यासत असताना आपल्या या परंपरांचा प्रभाव इतरांवर कसा पडतो याचाही शोध पार्वतीदिदी घेतात. चीनमध्ये भरतनाट्यम शिकवणार्‍या इशा दिदी (जीन शान शान) यांच्या परदेशी छोट्या शिष्यांचे भरतनाट्यमचे सादरीकरण नुकतेच या गुरूकुलात झाले. मलेशियाचे ओडिसी नर्तक रामली इब्राहीम यांनी या वर्षी त्यांची कला शारंगदेव महोत्सवात सादर केली आणि दुसर्‍याच दिवशी त्यांना भारत सरकारने पद्मश्री जाहिर केले. देश परदेशांत आपल्या संगीत परंपरेचा धागा गुंफत जागतिक पातळीवर एक कलात्मक वस्त्र विणण्याचे मोठे कामही पार्वती दिदी करत आहेत. स्वत:ची कला जपताना विकसित करताना याच कलेचा सम्यक विचार करत प्रत्यक्ष कृती करण्यातही शक्ति खर्च करावी ही वृत्ती खरेच गौरवास्पद आहे.  

       श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Monday, February 26, 2018

गारपीटीचा झटका ग्रामीण भागालाच का?


उरूस, सा.विवेक, फेब्रुवारी 2018

मराठवाडा आणि विदर्भात फार मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. दुष्काळ/ गारपीट म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा समोर जे चित्र उभे राहते ते ग्रामीण भागाचे. कोरडा दुष्काळ असेल तर भेगा पडलेली जमीन, आभाळाकडे टक लावून बसलेला सुरकुतलेल्या भकास चेहर्‍याचा दाढीचे खुंट वाढलेला शेतकरी. दुसरे चित्र ओल्या दुष्काळाचे. सर्वत्र साचलेले पाणी. त्यात बुडालेल्या झोपड्या. झाडांवर बसलेली काही माणसे शेळ्या बकर्‍या वासरं. आणि चत्र आहे ते सर्वत्र पांढर्‍या गारांचा खच पडलेला. रब्बीचे उभे पीक झोपलेले. शेतकर्‍यांचे हुंदकेही गारांसारखेच गोठून गेलेले. 

गारपीट दुष्काळ ही काय फक्त ग्रामीण भागाची समस्या आहे? शहरी भागात गारपीट होत नाही का? दुष्काळ असत नाही का? या प्रश्नातच या समस्या मानव निर्मित किती आणि निसर्ग निर्मित किती याचे उत्तर मिळते. आजतागायत गारपीटीत गारठलेले शहर असे चित्र आपल्याला दिसले नाही. शहरात गारा पडल्याच्या बातम्या येतात. गारा वेचणारी मुले दाखवली जातात. एखाद्या दिवसांत काय कांही तासांत परिस्थिती परत पूर्वपदावर येते. खेड्यात मात्र असे होताना दिसत नाही. गारांच्या माराने तकलादू झोपड्या जमिनदोस्त होतात. शेतातील पीकांचे तर आतोनात नुकसात होते. नुकताच मोहोर लागू लागलेली आंबराई सगळा मोहोर झडून आख्खीच्या आख्खी ‘गार’ होवून जाते. वेलींना लगडलेली द्राक्षेही पूर्णपणे झोपतात. गारपीटीने झालेल्या नुकसानीचे काय करावे? त्याचे पंचनामे कधी होणार? त्यातून बाहेर येण्यासाठी तातडीची मदत कधी मिळणार? खेडे लवकर पूर्वपदावर येत नाहीत. कारण मुळात तिथली व्यवस्थाच कोलमडून पडलेली आहे.

तेंव्हा सगळ्यात पहिल्यांदा जो मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागतो तो हा की गारपीट/दुष्काळ हा निसर्ग निर्मित जेवढा आहे तसाच मानव निर्मितही आहे. आपली व्यवस्थाच अशी आहे की गारपीट/दुष्काळाची झळ बसली की ग्रामीण भाग होरपळून जावा. म्हणजे ज्या काही सोयी सवलती उपलब्ध आहेत त्या प्रामुख्याने शहरी भागासाठी आहे. पिण्याचे पाणी, चांगले रस्ते, चोवीस तास वीज, नियोजनाचा किमान आराखडा या बाबी सगळ्या शहरांसाठी आहेत. चारचाकी वाहनांसाठी कमी दराने कर्ज, कुठल्याही व्यवसायासाठी कर्जपुरवठा, विम्याचे संरक्षण, घर बांधणीसाठी कर्ज या सगळ्यांतून शहरातील उद्योग व्यवसाय नौकरी करणार्‍यांना आपत्ती पासून एक सुरक्षा कवच लाभते. पण याच्या उलट ग्रामीण भागाचा विचार केला तर या सगळ्यांतून त्यांना वगळलेले दिसून येते. याचा परिणाम असा होतो की जेंव्हा केंव्हा अशा आपत्ती येतात त्याची तीव्रता याच ठिकाणी जास्त जाणवते. आधीच कुठले संरक्षण नाही. मग आपत्तीत  सगळेच उघडे पडते. 

नैसर्गिक आपत्तीसाठी आधीपासून नियोजन करायला पाहिजे. पण आपण हे लक्षात घेत नाही. मग आपत्ती प्रत्यक्ष अंगावर कोसळला की ओरड सुरू होते. काही तरी जूजबी मदत दिली जाते. ज्यातून फारसे काहीच साधत नाही.

शहरांतल्या बहुतांश लोकांचा असा समज आहे की शेतकरी मुर्ख आहे. त्याने विम्याचे संरक्षण घ्यायला पाहिजे. पीकविमा ही अतिशय किचकट आणि भिषण गोष्ट आहे ही बाब यांना माहितच नसते. आता फेब्रुवारी महिना आहे. विम्याच्या पॉलिसी काढा म्हणून एजंट अक्षरश: पिच्छा करताहेत असे चित्र शहरात पहायला मिळते. गाडीचा विमा करायचा आहे किंवा दुकानाचा विमा करायचा आहे किंवा वैयक्तिक विमा करायचा आहे. सगळ्यासाठी ग्राहकाकडे चकरा मारणारे एजंट असे चित्र पहायला मिळते.

याच्या नेमके उलट ग्रामीण भागात आहे. शेतकरी विमा भरण्यासाठी बँकांमध्ये दिवसेंदिवस रांगा लावून उभे आहेत. पण त्यांचे काम होताना दिसत नाही. आणि अशी आपत्ती जेंव्हा येते तेंव्हा त्या विम्याचा फायदा मिळालेलाही दिसत नाही. याचे सरळ साधे कारण म्हणजे शेतमाल विमा हा पूर्णपणे तोट्यात जाणारा व्यवसाय आहे. तो करण्यास कुणीही तयार होत नाही. कारण आपल्याकडची बहुतांश शेती आभाळाखालची शेती आहे. तिला कुठलेही संरक्षण नाही. ती रामभरोसे असल्याने अशा शेतीच्या विमा व्यवसायात कुठल्या कंपनीला रस असणार? 

मुळात शेती तोट्यात आहे याचा सगळ्यात मोठा पुरावा हाच आहे की कुठलीही विमा कंपनी शेतमालाच्या विम्यासाठी पुढे येत नाही. मग आपण परत मूळ विषयापाशी येवून थांबतो. जर शेती तोट्याचीच राहिली किंवा ती तशीच रहावी म्हणून धोरणे राबविली तर नैसर्गिक आपत्तींपासून शेतीला वाचवायचे कसे? 

शेती तोट्यात जाणं ही वेगळी गोष्ट आहे आणि शेतीत तोट्यातच रहावी म्हणून प्रयत्न करणे ही वेगळी गोष्ट आहे. तेंव्हा हे लक्षात घेतले पाहिजे की शेतीला तोट्यात ठेवण्याचा उद्योग आता बंद केला पाहिजे.
सर्व पर्यावरण तज्ज्ञ सातत्याने सांगत आहेत की निसर्गाचे आचरण बदलत चालले आहे. चार महिने नियमित पाऊस, चार महिने थंडी आणि चार महिने ऊन असे चक्र आता नाही. वर्षभराचा पाऊस केवळ काही दिवसांतच पडून जातो आहे. अचानक थंडी वाढत आहे. अचानक उनाचा कडाका जाणवत आहे. मग या सगळ्यांना तोंड देणारी यंत्रणा शेतीत उभी करणार की नाही? 

पहिली गोष्ट आता उघड्या आभाळाखालची शेती शक्य नाही. शेती बंदिस्त अशा  पॉलि हॉऊसमधून करावी लागणार आहे. त्यासाठी त्याची मोठी किंमत आम्हाला मोजावी लागणार आहे. दुसरी गोष्ट हवामान बदलाला टिकून राहणारे बियाणे आम्हाला तयार करावे लागेल. म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाची  कास धरावी लागेल. पाऊस लांबला तरी कोरड्या मातीत टिकून राहणारे बियाणे तयार करावे लागणार आहे. म्हणजे पावसाने ओढ दिली तरी दुबार पेरणी करण्याची गरज पडणार नाही. बंदिस्त शेतीत गारपीटीसारखे धोके कमी संभवतात किंवा किमान नुकसान होते.

बंदिस्त शेतीचा मोठा फायदा म्हणजे नियंत्रित हवामान. पिकांवर परिणाम करणार्‍या सगळ्याच घटकांचे नियंत्रण करणे शक्य होते. फळं, भाज्या, फुलं यांच्यासाठी बंदिस्त असे पॉलि हाऊस जास्त परिणामकारक ठरू पहात आहेत. यांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. या बंदिस्त व्यवस्थेत खते, किटकनाशके, जंतू नाशके, पाणी सगळ्याचे प्रमाण मोजून पुरवठा करणे शक्य होते. याचा परिणाम म्हणजे उत्पादन जास्त प्रमाणात मिळते, त्याचा विशिष्ट दर्जा राखणे शक्य होते. विशेषत: जेंव्हा आपण निर्यात करतो तेंव्हा शेतमालाचा विशिष्ट दर्जा राखणे अतिशय आवश्यक असते. ही गोष्ट आभाळाखालच्या शेतीत अवघड असते. 

अवकाळी पाऊस किंवा गारपीटीने मोठे नुकसान होते ते उघड्यावर साठवलेल्या शेतमालाचे. आपल्याकडे जवळपास कुठल्याच बाजार समित्यांमध्ये शेतमाल साठवणुकीची अत्याधुनिक यंत्रणा अस्तित्वात नाही. या दृष्टीने फारसे प्रयत्नही केल्या गेले नाहीत. बहुतांश शेतमाला व्यापार हा उघड्यावर होतो. हे चित्र बदलावे लागेल. 

गरपीट ही सहसा फेब्रुवारी महिन्यात होते. म्हणजेच रब्बीच्या हंगामात गारपीट होते. ही पिकं पाण्यावरची पिकं समजली जातात. ही पिकं जास्त नाजूक असतात. कोरडवाहू पिकांसारखी चिवट नसतात. यांना किंमतही जास्त मोजावी लागते. या पिकांच्या संरक्षणासाठी हवामान खात्यांकडून धोक्याची पूर्व सुचना मिळाल्यास काही अंशी यंत्रणा उभी करता येते. द्राक्षांच्या बाबतीत असे काही प्रयोग केल्या गेले आहेत. पण त्यांची व्याप्ती फारच मर्यादीत आहे.

गारपीट-दुष्काळ-पूर या न टाळता येणार्‍या नैसर्गिक आपत्ती आहेत. पण त्यांच्यावर मानवी बुद्धीचा वापर करून मात करता येवू शकते. वारंवार माणसाने हे सिद्धही करून दाखवले आहे. पण हतबलता तेंव्हा येते जेंव्हा या माणसाचे हात बांधले जातात. त्याला मुक्तपणे आपला व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य बहाल केले जात नाही. 

कायमस्वरूपी शहरी लोकांना स्वस्त द्यायचे, उद्योगांना कच्चा माल स्वस्त द्यायचा म्हणून आपण शेतीची जाणीव पूर्वक उपेक्षा करत राहू तर शेतीची समस्या आपल्याच मानगुटीवर येवून बसल्याखेरीज राहणार नाही. शेतीकडे उपेक्षेने पाहणार्‍यांनी लक्षात ठेवावे इतकी सगळी परवड होवूनही शेतीकर्जाची सगळी मिळून रक्कम जेमतेम तीन लाख कोटी पेक्षाही कमी आहे. पण तेच नागरी बँकांचे एन.पी.ए.चे प्रमाण तीन लाख कोटींचा टप्पा पार करून गेले आहे. म्हणजे ज्याला लूटले त्याच्यावर अन्यायाने लादलेल्या रक्कमेपेक्षाही ज्यांनी लुटले त्यांची अधिकृत दरोडेखोरीची रक्कम जास्त आहे. ग्रामीण भागात म्हण आहे ‘सतीच्या घरी बत्ती अन_ शिंदळीच्या घरी हत्ती’.. त्यातलाच हा प्रकार झाला.  

       श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, February 20, 2018

तरूणांच्या लेखणीतून उमटत आहेत बुद्ध कबीर तुकाराम


उरूस, सा.विवेक, फेब्रुवारी 2018

निळा रंग म्हणजे बुद्ध नव्हे 
प्रत्येक रंगातलं निळेपण बुद्ध आहे

ही अप्रतिम ओळ आहे रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात शिकणार्‍या विजयकुमार बिळूर या विद्यार्थ्याची. त्याही ही कविता प्रतिभा संगम साहित्य संमेलनात पहिल्या क्रमांकाची ठरली. 
आजच्या तरूणांबद्दल सतत तक्रार करणार्‍यांनी विजय सारख्यांच्या कविता त्यांची संवेदनशीलता खरंच प्रमाणिकपणे समजून घ्यावी. म्हणजे त्यांना कळेल आजचे तरूणही किती प्रगल्भ असा विचार आपल्या कवितेतून मांडत आहेत. विजयने आपल्या कवितेचा शेवट जो केला आहे तोही असाच आहे ...

बुद्ध तुमच्यात माझ्यात 
आपल्यात नक्कीच आहे
गरज आहे ती फक्त
आपापल्या देवळांची 
रचना बदलण्याची
तुम्हाला तुमच्या देवळातही
बुद्ध दिसेल..

बामियानाच्या बुद्ध मुर्ती तालिबान्यांनी पाडल्या त्याची तीव्र प्रतिक्रिया आज विजय सारख्या तरूणांच्या कवितेतून शांतपणे उमटताना दिसत आहे. केवळ विजयच नव्हे तर दुसरा क्रमांक पटकावलेला एम.जे. महाविद्यालय जळगांवचा गोपाल बागुल नामदेव ढसाळच्या कवितेशी आपले नाते सांगत लिहून जातो

गटारीत फेकुन मारलेली कविता
कुणाच्या कविसंमेलनात वाचायची?
ती जन्मजात होती
अभिजात 
मुक्तछंदात 
मग कुणी कापले 
तिचे स्तन, 
कुणी कापले तिचे हात
आकलनाने रचलेले शब्द
कसे बिथरले? 

या तरूणांचा विचारांचा आवाका बघितला की खरंच आवाक व्हायला होतं. विजय किंवा गोपाल सारख्यांच्या कवितांना सामाजिक संदर्भ आहेत तसेच स्वप्निल चव्हाण सारख्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी अलगदपणे लिहून जातो उबदार माया करणार्‍या घराची कविता

ज्या घरांच्या भिंतीनाही जाणवतो स्पर्श
आपुलकी आणि जिव्हाळ्याचा
ज्या घरांतली माणसं आसुसलेली असतात
माणसांना आपल्यात सामावून घेण्यासाठी
ज्या घरांच्या स्पंदनांच्या लयीत
सहज विरघळत जातो गडद एकटेपणा
ज्या घरांतली माणसं परस्परांशी
माणसांसारखी वागतात
प्रेमाचा अभिनय न करता
एकमेकांवर नितांत प्रेम करतात

अशा घरांचे ‘ऍड्रेस’
‘बॅटरी डेड’ होईस्तोर
शोधत राहतो ‘गुगल मॅप्स’वर
कुणीतरी...

गेली 25 वर्षे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रतिभा संगम साहित्य संमेलन भरवित आहे. 16 वे प्रतिभासंगम नुकतेच पुण्यात संपन्न झाले. त्यात सहभागी तरूण कविमित्रांच्या या पारितोषिक प्राप्त प्रातिनिधीक कविता. 

मुलं वाचत नाहीत असा सर्रास आरोप केला जातो. पण अशा संमेलनांमधुन समोर येणारं चित्र य आरोपाच्या विपरीत अतिशय आशादायी आहे. मुलांना चांगलं वाचायचं आहे, ते आजूबाजूचे वर्तमान आपली नाजूक भावना, आपल्या तरूण मनाची स्पंदनं तरलपणे टिपू पहात आहेत. पण आपणच त्यांची योग्य दखल घेण्यास अपुरे पडत आहोत. 

विद्यापीठाच्या पातळीवर युवम महोत्सव भरवला जातो. पण त्याचे स्वरूप एक मोठ्या स्नेहसंमेलनासारखे गोंगाटी होवून गेले आहे. यात वाङ्मयीन उपक्रमांना फारसा वाव मिळत नाही. उदा. कवितेचाच विचार करावयाचा तर तरूणांनी आपल्या कविता लिहून आणल्या असतात. त्यांना त्या वाचायच्या असतात. त्यातील विषयांवर चर्चा करायची असते. अगदी प्राथमिक वाटतील अशा बाळबोध शंका विचाराच्या असतात. पण या सगळ्यासाठी मोठ्या झगमगाटी कार्यक्रमांत उसंतच मिळत नाही. मग अशा विद्यार्थ्यांना ‘प्रतिभा संगम’ हे हक्काचे व्यासपीठ वाटते.

या आयोजनाचे वेगळेपण म्हणजे इथे एक संपूर्ण दिवस गटचर्चा ठेवलेल्या असतात. 20-25 विद्यार्थ्यांचे गट केले जातात. हे विद्यार्थी आपल्या कविता प्रथितयश साहित्यीकांसमोर वाचतात. एकमेकांच्या कविता ऐकतात. चर्चा करतात. रात्री कविसंमेलनात मान्यवरांसोबतच निवडक विद्यार्थ्यांना कविता वाचण्याची संधी मिळते. प्रेमाच्या अवथर नाजूक तरल अशा कवितांपासून दाहक समाज वास्तवाचा अंगार शब्दांतून व्यक्त करणार्‍या कवितांपर्यंत सगळ्या प्रकारच्या कविता सादर होतात. आयोजकांनी राखलेल्या शिस्तीमुळे कवितेचे गांभिर्य राखले जाते परिणामी चांगली कविता तरूणांच्या मनापर्यंत व्यवस्थित पोचते. 

प्रतिभा संगमचे सगळ्या मोठे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण आयोजन हे महाविद्यालयीन तरूणच करतात. विजय सुतार सारखा तरूण चांगला कवी यावेळीस संमेलनाचा प्रमुख कार्यकर्ता होता. येवेळसचा विजेता पुढच्या वेळी संयोजकाच्या भूमिकेत जातो. ही एक चांगली प्रथा आयोजकांनी निर्माण केली आहे. 

काही उणीवांचा विचारही आता इतकी वर्षे झाल्यानंतर आयोजकांनी करायला हवा. अतिशय चांगले लिहीणारे कवि जसे आढळून आले तसे किमान दर्जाही नसलेली कविता फार मोठ्या प्रमाणावर आढळून आली. यासाठी विद्यापीठ पातळीवर काहीतरी गाळणी लावली गेली पाहिजे. मुळात महाविद्यालयीन पातळीवर वाचक मंच स्थापन करून निदान मराठीतील महत्त्वाची 100 पुस्तके उपलब्ध करून दिली गेली पाहिजेत. ही पुस्तके नीट वाचून त्यावर चर्चा घडवून आणल्या गेल्या पाहिजेत. ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत वाचक मंचचे उपक्रम जोरकसपणे महाविद्यालयीन पातळीवर चालले पाहिजेत. मग दिवाळी नंतर प्रतिभासंगम चे आयोजन साधारणत: डिसेंबर-जानेवारी महिन्यात जेंव्हा होणार असेल तेंव्हा या वाचक मंडळातील निवडक विद्यार्थ्यांना सहभागी करत हे साहित्य संमेलन महाराष्ट्र पातळीवर भरविण्यात यावे. 

दुसरी एक त्रूटी जाणवते ती म्हणजे विदर्भातील विद्यार्थी यात सहभागी झालेले दिसत नाहीत. विद्यार्थी परिषदेच्या रचनेत विदर्भ हा वेगळा प्रांत आहे हे इतर कार्यक्रमांसाठी समजल्या जावू शकते. पण साहित्य संमेलन सगळ्या मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी असल्याने विदर्भातील विद्यार्थ्यांचा प्रतिभा संगम मध्ये सहभाग आवश्यक वाटतो. 

कवितेसोबतच वैचारिक लिखाण, ब्लॉग, कथा कथन या स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. सगळ्या आयोजनात तरूण मुलं मुली ज्या खेळकर पद्धतीनं एकमेकांशी वागत बोलत होती ती खुपच आशादायी बाब जाणवली. सध्याच्या वातावरणात मुलं मुली एकमेकांत मिळून मिसळून काही एक सकारात्मक सांस्कृतिक काम करत आहेत ही खुपच दिलासा देणारी बाब आहे. 

विद्यार्थी परिषदेच्या लोकांनी आता या संमेलनाच्या आयोजनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली पाहिजे. 

   श्रीकांत उमरीकर, जशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575

Friday, February 16, 2018

शारंगदेव समारोह : समृद्ध संगीत परंपरांचा विलोभनिय अविष्कार


उरूस, सा.विवेक, 4-10 फेब्रुवारी 2018

विद्वान चर्चा करत होते की तेराव्या शतकात देवगिरी किल्ल्यावर यादवांच्या दरबारातील महान संगीतकार शारंगदेव याच्या संगीत रत्नाकर ग्रंथात वर्णन केलेली ‘किन्नरी विणा’ आता अस्तित्वात आहे का? कुणी ती वाजवत असेल का? आणि आश्चर्य म्हणजे तेलंगणातील सुदूर खेड्यात असा एक दलित वादक सापडला जो की आजही ही किन्नरी वीणा वाजवतो. या महान कलाकाराचे नाव दर्शनम मोगुलैय्या. या कलाकाराला तेलगु शिवाय कुठलीही भाषा येत नाही. संगीत अभ्यासक डॉ. इंद्राणी चक्रवर्ती यांनी हा कलाकार शोधून काढला. औरंगाबाद येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ‘शारंगदेव समारोह’ मध्ये दर्शनम मोगुलय्या यांच्या ‘किन्नरी वीणा’ सादरीकरणाने रसिक थक्क झाले. या वाद्यावर विदुषी डॉ. इंद्राणी चक्रवर्ती यांनी आपला निबंध वाचला तेंव्हा त्यावर चर्चा करताना इतर अभ्यासकांना प्रश्‍न पडला की या वाद्यावर सा रे ग म हे स्वर कसे वाजतात. ते वाजवून दाखविण्याचा आग्रह सगळे दर्शनम मोगुलय्या यांना करत होते. पण दर्शनम यांना इतरांची भाषा कळेना. त्यांना खुणेने जेंव्हा वाद्य वाजवून दाखविण्या सांगितले तेंव्हा त्यांनी ते खालून वर वाजवायला सुरवात केली. विद्वान सगळे चकित झाले की एरव्ही वरतून खाली तंतू वाद्य वाजविले जाते. त्याची सरगम तशी आरोहात्मक सांगितलेली आहे. मग हा कलाकार असे खालून वर का वाजवित आहे? 

राजस्थान मधील असेच एक वाद्य ‘रावणहत्था’ याचा अभ्यास करणार्‍या डॉ. सुनीरा कासलीवाल यांना हा प्रकार  लक्षात आला. त्यांनी शारंगदेवाच्या संगीत रत्नाकर ग्रंथाचा संदर्भ देत अवरोहात्मक वादनाचा उल्लेख केला आहे. हे लोककलाकार शिक्षीत नाहीत, त्यांना वाचता येत नाही पण परंपरेने त्यांनी 700 वर्षांनपासून  हे ज्ञान पक्कं आत्मसात केलं आहे. 

गेली 8 वर्षे औरंगाबादला महागामी गुरूकुल ‘शारंगदेव समारोह’ आयोजीत करते आहे. यात संपूर्ण भारतातील विविध नृत्य प्रकार, लोककला, लोकवाद्य, अभिजात कलाप्रकार, विविध वाद्य प्रकार यांचे सादरीकरण होते. याहून महत्त्वाचे म्हणजे या महोत्सवाचाच एक अतिशय मोलाचा भाग म्हणजे ‘शारंगदेव प्रसंग’. म्हणजेच संगीतातील विविध विषयांवर विद्वानांची भाषणं, निबंध वाचन, वाद्यांच्या निर्मितीवर कलेच्या विकासावर चर्चा घडवून आणली जाते. 


या गंभीर चर्चेचा परिणाम म्हणजे ‘किन्नरी वीणा’ सारखे वाद्य सापडणे आणि अवरोहात्मक संगीत व्याख्येचे कोडे उलगडणे. ही एक अतिशय मोठी उपलब्धी या समारोहाची आहे. 

संगीताची लिखीत जवळपास एक हजार वर्षांची मोठी परंपरा आपल्याकडे आहे. त्यातील ज्या नोंदी आहेत त्या प्रमाणे सादर होणार्‍या कला, वाजविली जाणारी वाद्य यांचे सादरीकरण हे अतियश अवघड काम आहे.

या वर्षी पियल भट्टाचार्य यांच्या कलकत्ता स्थित कलामंडळाने ‘मार्ग नाट्य’ हा एक हजार वर्षांपूर्वीचा नाट्याविष्कार मंचावर सादर केला. आधुनिक कलाविष्काराचा कोणताही प्रभाव न पडू देता भरताच्या नाट्यशास्त्राच्या आधारे रंगमंच सादरीकरण करणे हे अतिशय अवघड आहे. पण पियल भट्टाचार्य यांच्या तरूण सहकार्यांनी सादर केलेले हे ‘संकीर्ण भाणक’ (विविध भाषांचा उपयोग केलेले जसे की संस्कृत, पाली, बंगाली, मागधी इ.) रसिकांना खिळवून ठेवणारे होते.

राजस्थान येथील सुगना राम आणि त्यांचे सहकारी यांनी पारंपारिक ‘रावणहत्था’ या वाद्याचा प्रमुख वापर करून ‘झुमर’ हा लोककलेचा प्रकार सादर केला जो की रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला. व्हायोलीन हे आधुनिक पाश्चिमात्य वाद्य जे की गज फिरवून वाजवले जाते त्याची प्रेरणा या ‘रावणहत्था’तून आलेली असल्याचे आता विद्वानांनी संशोधनाने सिद्ध केले आहे. हे वाद्य वाजविणारे हे कलाकार जन्मजात वादक आहेत. त्यांच्या घराण्यात हे वाद्य 700 वर्षांपासून चालू आहे. हे वाद्य ते स्वत:च तयार करतात. लुप्त होत जाणारी ही कला आता शासनाच्या आणि कलाप्रेमींच्या आश्रयामुळे जागरूकतेमुळे वाचली आहे. या वाद्याचा वैशिष्ट्य म्हणजे याच्या गजाला घुंगरू बसविलेले असतात. म्हणजे तंतू वाद्य वाजविताना नादही आपोआप प्राप्त होतो. 

भारतीय कलांचा प्रभाव भारतीय उपखंडातील इतर देशांवरही पडलेला आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मलेशिया येथील प्रसिद्ध उडिसी नर्तक ‘रामली इब्राहीम’. त्यांना ओडिसी नृत्याचे विविध विभ्रम मंचावरून सादर करताना पाहून विश्वासच बसत नव्हता की यांचे वय 65 आहे. ओडिशी गुरू देवप्रसाद दास यांच्या नृत्य परंपरेचे गुरूकुल ते मलेशियात मोठ्या चिकाटीने चालवत आहेत. 

महागामी गुरूकुलाच्या संचालिका ओडिसी व कथ्थक नृत्यांगना सुश्री पार्वती दत्ता यांनी या महोत्सवात ‘धृपदांगी कथ्थक’ हा ऊर्जापूर्ण नृत्यप्रकार सादर करून रसिकांना संमोहित केले. कथ्थक म्हणजे वाजिद अली शाहच्या दरबारातून विकसित झालेला नृत्य प्रकार. हीच प्रतिमा सर्वत्र ठसलेली आहे. असं असताना कथ्थकला धृपदाशी जोडून त्याचे विविध अविष्कार रंगमंचावर सादर करणे हे फार अवघड आव्हान आहे. हे आव्हान पार्वती दत्ता यांनी लिलया पेलले. त्यांनी या प्रकारात सादर केलेली जगदंबा स्तूती नृत्य अभ्यासकांसाठी पर्वणीच होती. 

ग्वाल्हेर घराण्याचे गायक पंडित सत्यशील देशपांडे यांना गाण्यासोबतच या विषयातील अभ्यासू विद्वान म्हणून ओळखले जाते. शेवटच्या सत्रात त्यांचे गायन आणि दुसर्‍या दिवशी त्यांचे ख्याल गायनावर व्याख्यान असा दुहेरी लाभ रसिकांना मिळाला.

ख्यालाचे संदर्भ राजस्थानी संगीतातून आधीपासून सापडतात हे त्यांनी सोदाहरण दाखवून दिले. तसेच ‘खयाल’ पासून ख्याल शब्द आला असेच नसून तालाशी लयीशी केलेली क्रिडा म्हणजेच खेळ यापासूनही हा ‘खयाल’ शब्द आला असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. आपले गुरू कुमार गंधर्व यांच्या गायकिची उदाहरणे देत त्यांनी ग्वाल्हेर घराण्याच्या पारंपरिक बंदिशीही सादर केल्या.


ज्येष्ठ हिंदी कवी अशोक वाजपेयी यांनी आपल्या व्याख्यानातून परंपरा आणि शास्त्र यांच्यातील नाते उलगडून दाखवले. अशोक वाजपेयी यांनी आपल्या देशातील विविधांगी परंपरांचा मागोवा घेत शास्त्राचे जाणकार शास्त्राच्या मर्यादा उल्लंघून कसे पुढे जातात हे पं. कुमार गंधर्व यांचे उदाहरण देवून स्पष्ट केले. 

शारंगदेव समारोहात दरवर्षी एका संगीत विद्वान कलाकार व्यक्तिमत्वाचा गौरव ‘शारंगदेव सन्मान’ देवून केला जातो.  कथ्थक गुरू पद्मविभुषण पं. बिरजू महाराज, धृपद गायक उस्ताद झिया फरिद्दुन्नीन डागर, पं. हरिप्रसाद चौरसिया, भरतनाट्यम गुरू पद्मा सुब्रमण्यम आदींना यापूर्वी हा सन्मान देवून गौरविण्यात आले होते. या वर्षी हा सन्मान संस्कृत तज्ज्ञ, संगीतकार, अभ्यासक पद्मश्री डॉ. मुकुंद लाठ यांना देण्यात आला. मराठी लोकांसाठी अभिमानाची बाब म्हणजे डॉ. लाठ यांनी नामदेवांच्या हिंदी रचनांचा समीक्षात्मक अभ्यास केला असून त्यांचा ग्रंथ संदर्भ म्हणून अतिशय मोलाचा आहे. 

‘शारंगदेव समारोह’ एका वेगळ्या पद्धतीनं आयोजीत केला जातो आहे. संगीत रत्नाकर हा महान ग्रंथ शारंगदेवांनी जिथे लिहीला त्या देवगिरीच्या परिसरात हा समारोह साजरा होतो आहे याला एक वेगळे महत्त्व आहे. मकर संक्रांतीनंतर उत्तरायण सुरू होते त्या मुहूर्तावर या समारोहाचे आयेाजन केले जाते. महागामीचा सगळा परिसर गुरू पार्वती दत्ता यांनी अतिशय कलात्मक रितीने सजवला आहे. या परिसरात प्लास्टिकचा तुकडाही आढळत नाही (खुर्च्याही नाहीत. बसायचा लाकडी लोखंडी अथवा दगडी बाक आहेत. गवताच्या चटया आहेत. सुती सतरंज्या आहेत.). कलाकारांचे कपडे सुती-रेशमीच असतात. कृत्रिम धाग्यांना इथे बंदीच आहे. एकूणच काय तर सगळ्याच कृत्रिमतेला बंदी आहे. 


या महोत्सवाला शासकीय पातळीवर पाठिंबा मिळणे अतिशय आवश्यक आहे. युनेस्कोने गौरविलेले महाराष्ट्रातील हे एकमेव गुरूकुल आहे. या महोत्सवाला परदेशी पर्यटक सुद्धा मोठ्या संख्येने हजेरी लावतात. कारण त्यांना आपल्या परंपरा समजून घेण्यात रस आहे. ‘रावणहत्था’ वाद्याच्या अभ्यासक सुनीता कासलीवाल यांनी सांगितले की परदेशी अभ्यासक जेंव्हा हे वाद्य शिकतात तेंव्हा ते अगदी शाकाहारच घेतात आणि आवर्जून गंगेत स्नान करणे, मंदिरात जावून दर्शन घेणे हे पण करतात. परंपरा समजून घेताना आपणही परंपरेचा आदर करावा याचे भान ते बाळगून असतात.     

आपल्यालाच हे भान बाळगायची गरज सद्यकाळात निर्माण झाली आहे. 

     श्रीकांत उमरीकर, जशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575