"समर्थ भारत" स्वप्न - विचार - कृती (साप्ताहिक विवेक हीरक महोत्सवी विशेष ग्रंथ)
बरोबर 50 वर्षांपूर्वी सर्वंकष सत्ता भोगणार्या कॉंग्रेसचा पराभव करता येऊ शकतो, त्यासाठी आपसातले मतभेद मिटवून एकत्र येणं शक्य आहे अशी मांडणी एका लोकनेत्याने केली होती. आणि महत्त्वाच्या 9 राज्यांमध्ये कॉंग्रेसचा पराभव करून संयुक्त विधायक दलाची सरकारं स्थापूनही दाखवली होती. दुर्दैवाने या लोकनेत्याचे लगेच निधन झाले आणि कॉंग्रेस विरोधाचे राजकारण बारगळले. त्याच्या शिष्यांनी आपल्या गुरूची शिकवण लक्षात ठेवली नाही. पण त्यांचे शिष्य नसलेल्या, त्या विचार परंपरेतील नसलेल्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी कॉंग्रेसचा निर्णायक पराभव करून दाखवला. आधी लोकसभा 2014 मध्ये आणि नंतर 2017 मधील उत्तर प्रदेशातील विधानसभेत. जवळपास 50 वर्षांनी घडलेली ही घटना म्हणजे त्या नेत्याच्या कॉंग्रेसविरोधी राजकारणाला वाहिलेली आदरांजलीच म्हणावी लागेल. त्या महान लोकनेत्याचे नाव होते डॉ. राम मनोहर लोहिया.
चरित्र :
लोहियांच जन्म 23 मार्च 1910 चा. लोहियांचे वडिल कॉंग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते. त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळात तुरूंगवासही भोगला. लोहिया तरूणपणी शिक्षणासाठी जर्मनीत गेले आणि तेथेच त्यांच्यावर समाजवादाचे संस्कार झाले. लोहियांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कोरडेपणाने कधीच समाजवादाची शिकवण अंगिकारली नाही. भारतीय परंपरा अतिशय डोळसपणे समजून घेवून, भारतीय दर्शनांचा अभ्यास करून, भारतीय मानसिकतेची जाण ठेवूनच त्यांची समाजवाद आपल्या देशात रूजवायचा प्रयत्न केला. साहजिकच बाकिच्या समाजवाद्यांपेक्षा लोहिया नेहमीच वेगळे आणि लक्षणीय वाटत राहिले.
लोहियांनी ‘मीठ कर व सत्याग्रह’ या विषयावर जर्मनीत प्रबंध लिहून हुम्बोल्ट विद्यापीठात सादर केला. अर्थशास्त्राची डॉक्टरेट त्यांना मिळाली व ते भारतात 1933 मध्ये परतले.
भारतात तेंव्हा कॉंग्रेस सोशालिस्ट पार्टिच्या स्थापनेच्या हालचाली आचार्य नरेंद्र देव यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाल्या होत्या. अगदी सुरवातीपासूनच लोहिया त्यात सहभागी झाले. कलकत्याहून प्रकाशित होणार्या ‘कॉंग्रेस सोशलिस्ट’ या मुखपत्राचे ते संपादक राहिले. अगदी सुरूवातीपासून लोहियांनी आपल्या समाजवादी साथींसमोर दोन धोके अधोरेखित करून ठेवले होते. एक म्हणजे खुद्द कॉंग्रेस. नेहरूंच्या समाजवादी भूलाव्याला लोहिया कधीच बळी पडले नाहीत. त्यांनी आपला बिगरकॉंग्रेसवाद नेहमीच धगधगता ठेवला. आणि दुसरा धोका म्हणजे कम्युनिस्ट. जयप्रकाश नारायण यांनी कम्युनिस्टांना पक्षात घेतले ही फार मोठी चुक होती अशीच त्यांची आधीपासून धारणा होती. लोहियांसारखीच टीका अच्युतराव पटवर्धन, मिनू मसानी, अशोक मेहता आदींनीही केली होती.
दुसर्या महायुद्धात युद्ध विरोधी भूमिका घेत आपण तिसरी आघाडी उघडावी अशी जोरदार मागणी लोहियांनी महात्माजींकडे केली. इतकेच नाही तर याच काळात ब्रिटीशांविरूद्धही लढा उभारण्याचा लकडा गांधीमागे लावला. पुढे 1942 च्या चले जाव लढ्यात त्यांनी हिरीरीने सहभाग नोंदवला.
लोहियांचा गांधींवर प्रचंड विश्वास होता. गांधी आहेत तोपर्यंत कॉंग्रेसमध्ये समाजवादी विचारांना, त्या विचारांच्या लोकांना न्याय भेटेल असे त्यांना वाटत होते. पण गांधी हत्येनंतर चित्र पूर्णपणे पलटल्याचे त्यांना जाणवले. नेहरूंची सत्तालालसा लक्षात यायला लागली. पुढे 1948 ला नाशिकच्या संमेलनात समाजवादी पक्ष कॉंग्रेसमधून बाहेरच पडला. पुढे नेहरूंनी तटस्थ राष्ट्रांची जी आघाडी आंतरराष्ट्रीय पातळीवर उघडली ती खरे तर लोहियांची संकल्पना. लोहिया दुसर्या महायुद्धाच्या आधीपासूनच युद्ध विरोधी तिसर्या आघाडीचे हिरीरीने समर्थन करत आले होते.
लोहियांचे वेगळेपण आणि द्रष्टेपण हे की 1949 लाच पाटण्याच्या आधिवेशनात समाजवादी पक्ष कॉंग्रेसचा पुरक पक्ष आहे का सक्षम विरोधी पक्ष आहे असे विचारून कडव्या विरोधी पक्षाची भूमिका निभावण्याची गरज त्यांनी आग्रहानी मांडली.
1952 च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत समाजवादी पक्षाला मोठे अपयश पचवावे लागले. पण तरीही लोहियांनी आपल्या विचारांचा पाया हलू दिला नाही. पराभवानंतर भरलेल्या अधिवेशनात समाजवादी विचारांचे नवदर्शन त्यांनी कार्यकर्त्यांना घडवले. कम्युनिझम व भांडवलशाही दोघांनाही आपला विरोध असल्याचे स्पष्ट प्रतिपादन केले.
नेहरूंनी 1955 मध्ये आवाडी येथे कॉंग्रेस अधिवेशनात समाजवादी धर्तीचा समाज निर्माण करण्याचा ठराव मंजूर करून घेतला. पण त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कसलीही हालचाल केली नाही. यामुळे समाजवाद्यांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात फुट पडली. नेहरूंच्या समाजवादाच्या कृत्रिम प्रेमात अशोक मेहता सारखे अडकले. जयप्रकाश नारायण मऊ पडले. याचा परिणाम एकच झाला की लोहियांना बाहेर पडून दुसरा पक्षच स्थापन करावा लागला. 1956 ला हैदराबाद येथे नविन पक्षाचे पहिले अधिवेशन झाले. तेंव्हा अध्यक्ष म्हणून लोहियांची निवड करण्यात आली.
1962 च्या लोकसभा निवडणुकीत लोहिया पं. नेहरूंच्या विरोधात उभे राहिले. अर्थात लोहियांचा पराभव झाला पण त्यांनी कॉंग्रेसला आणि विशेषत: नेहरूंना विरोध करता येवू शकतो हे आपल्या कृतीने सिद्ध केले. याच वर्षी चीनने भारतावर आक्रमण केले आणि नेहरूंनी उभ्या केलेल्या वैचारिक भूलाव्याचा डोलारा कोसळला. पुढे 1963 च्या पोटनिवडणुकीत लोहिया निवडून आले आणि लोकसभेत पोंचले. त्यांच्या पहिल्याच भाषणाने नेहरू हादरले. नेहरूंना जाणीव झाली असणार की आपण जो समाजवाद मांडतो आहोत तो नकली आहे. खरा समाजवाद तर लोहिया मांडत आहेत.
1964 च्या नेहरूंच्या मृत्यूनंतर शास्त्रींची अल्प राजवट संपून इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या आणि घराणेशाहीचा एक विकृत नमूना समोर आला. लोहिया जो कॉंग्रेस विरोध स्पष्टपणे मांडत होते त्याला एक प्रकारे या घटनेने पाठिंबाच मिळाला. लोहियाच काळावर खरे ठरले. पुढे 50 वर्षांनी आज जेंव्हा राहूल गांधींच्या निर्नायकी कारभारामूळे कॉंग्रेस लयाला चालली आहे याची बीजं इंदिरा गांधींच्या राजकारणातच आहेत.
1967 च्या निवडणुकीत लोहिया कनौज मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. त्यांच्या बोलण्याला इंदिरा गांधी वचकून असत. त्या फारशा बोलतच नसत. म्हणून त्यांना लोहियां ‘गुंगी गुडिया’ म्हणत. याच निवडणुकांत 9 राज्यांमध्ये कॉंग्रेसचा पराभव करत संयुक्त विधायक दलाची सरकारनं स्थापन झाली. दुर्दैवाने यानंतर लगेच लोहियांचे निधन झाले (12 ऑक्टोबर 1967) आणि कॉंग्रेसतर राजकारणातील एक सशक्त हस्ती काळाच्या पडद्याआड गेली.
विचार :
लोहियांनी भारताबाबत अतिशय स्पष्टपणे स्वतंत्र प्रतिभेने विचार मांडले आहेत. दुसर्या महायुद्धाच्या काळात लोहिया जर्मनीत होते. त्यांना आंतरराष्ट्रीय परिस्थितीची पूर्ण जाणीव होती. परराष्ट्र संबंधात त्यांचा अभ्यास दांडगा होता. मार्क्सवाद आमच्या देशात चालणार नाही. हे लोहियांनी सुरवातीपासूनच मांडले आहे. नेहरू ज्या पद्धतीनं समाजवादी धोरणं मांडत आहेत त्याच्याही मर्यादा लोहियांनी सुरवातीपासूनच स्पष्ट केल्या होत्या.
भारतासारख्या मागास राष्ट्रासाठी अल्पप्रमाण यंत्रांच्या वापराचा विचार ते मांडत होते. युरोप-अमेरिकेच्या अगदी उलट हा विचार होता. मनुष्यबळाचा जास्तीत जास्त बुद्धिमत्तापूर्ण उपयोग करत अल्पप्रमाण यंत्राचा वापर असा तो विचार होता.
मार्क्सवादातील हुकूमशाही ही अतिशय वाईट गोष्ट आहे असे त्यांनी नोंदवले आहे. मार्क्सवाद हे आशियाई देशांविरूद्धचे हत्यारच आहे या महत्त्वपूर्ण निष्कर्षाची नोंदही लोहियांनी घेतली होती.
मार्क्सवादाची चिकित्सा करतानाच लोहियांनी त्यांना प्रिय असलेल्या गांधीवादाचीही चिकित्सा केली आहे. गांधीवाद देशात अपुरा सिद्ध झाला आहे. ‘आज देशात जे काही चालले आहे, तो गांधीवाद नाही, तर गांधीवाद आणि मार्क्सवाद यांचे एक प्रकारचे निकृष्ट प्रतीचे पेय आहे.’ असं लोहिया म्हणतात.
लोहिया स्वत:ला उदारमतवादी म्हणत. गांधींच्या तत्त्वातील अहिंसा त्यांना प्रिय होती. ‘अहिंसा माझा जवळपास ध्रुवतारा राहिला आहे.’ असं त्यांनी लिहून ठेवलंय.
महात्मा गांधी आणि अणू बॉंम्ब यांबाबत लिहिताना लोहिया म्हणतात, ‘महात्मा गांधी आणि अणुबॉंब या दोनच आपल्या शतकातील मौलिक गोष्टी आहे आणि हे शतक संपण्यापूर्वी यांपैकी एक दुसरीचा पराभव करील.’
लेहियांना भारतीय परंपरांचे विलक्षण आकर्षण होते. त्यांनी राम कृष्ण आणि शिव यांच्यावर फार सुरेख लिहिले आहे. लोहिया लिहितात, ‘हे भारतमाते, आम्हाला शिवाची बुद्धी दे, कृष्णाचे हृदय दे आणि रामाचा एकवचनीपणा व कर्मशक्ती दे. असीमित बुद्धी, उन्मुक्त हृदय आणि मर्यादायुक्त जीवन यांनी आमचे सृजन कर!’
पुराणाकालीन भारतावर चिंतन करताना त्यांनी अनेक पैलू समोर आणले आहेत. पण त्याहीपेेक्षा हजार वर्षांतील भारताच्या बाबतीत त्यांची जी निरिक्षणे मांडली आहेत ती जास्त मार्मिक आणि महत्त्वाची आहेत. त्यातून लोहियांची भारताच्या प्रश्नांबाबतची जाण किती सखोल आहे हे लक्षात येते.
लोहियांचे हे विचार फार महत्त्वाचे आहेत. ‘खोटे समाधान बाळगणार्या मुसलमानांना किंवा यातनांचे मूळ कशात आहे, हे न जाणणार्या हिंदूंना दीर्घकाळपर्यंत शासनसंस्थेच्या अभावाची जाण आली नाही. गेल्या दहा शतकांहूनही अधिक काळ हिंदूस्थानचा इतिहास ज्यांनी आत्मसात केला ते जाणातत, की शासनसंस्था ही जवळ जवळ भौतिक गरज आहे. इतर सर्व गोष्टी दुय्यम दर्जाच्या आहेत. अगदी माणूस आणि मानवतादेखील. मध्यवर्ती शासन संस्थेच्या अभावामुळे हिंदुस्थानात माणसे नव्हे तर उंदरांची पैदास झाली. माणसांतील गुलामी वृत्तीच्या किंवा लोभी वृत्तीच्या व्यक्तिवादाची दुर्गंधी झाकण्यासाठीचे, सर्वोच्च मानवता हे एक अमूर्त आवरण होते. अजूनही लोक धोका पत्करण्यास तयार नाहीत. ते आपल्या शासनसंस्थेसाठी प्रणांची बाजी लावायला तयार नाहीत. शासनव्यवस्था ज्यांनी दीर्घकाळ अनुभवली अशा लोकांजवळ रग आणि सर्व प्रकारच्या सुरक्षिततेसाठी सुप्त शक्ती असते.’ आज प्रबळ केंद्र सरकार हा विषय समोर येतो आहे त्या पार्श्वभूमीवर लोहियांचे हे विचार तपासून पाहण्यासारखे आहेत.
लोहिया फाळणीच्या कट्टर विरोधी होते. ‘अंग्रेजी हटाव’ सारखे धोरण त्यांनी हिरीरीने मांडले. भारतातील तीर्थक्षेत्रे एकतेची प्रतिकं आहेत असंही लोहिय मानायचे. त्यांचे हे विविध पैलू असलेले बंडखोर विचार झापडबंद समाजवादी पठडीतही बसणं मुश्किल होतं. आपले विचार आपल्या काळातही बर्याच जणांना पचू शकत नाहीत हे त्यांना जाणवत होते.
लोहियांनी समग्र मानवजातीचा विचार आपल्या भारतीय समाजवादी चौकटीत केला हे विशेष. लोहिया लिहितात
‘.... युरोपिय देशात अत्युच्च समाजिक समता आढळत असली तरी तेथील मनुष्य जीवन आज चिंता, मानसिक ओढाताण व एकप्रकारची शून्यमनस्कता यांनी ग्रस्त झाले आहे. अध्यात्मिक समतेच्या अभावी व ताणावाच्या ओझ्यामुळे आधुनिक संस्कृती युरोपात विव्हळत आहे, कोलमडत आहे. पाश्चिमात्य माणसाचे मन शांत नाही. स्वत:साठी घर शोधीत तो घराबाहेर भटकत आहे.
माणसाचा हा वनवास आणि स्वत:लाच हरवून बसण्याची भावना यांचा अंत करणे हाच समाजवादाच्या प्रदीर्घ यात्रेचा उद्देश आहे. आज सर्वत्र व आपल्या देशातही या यात्रेला नवी दिशा मिळवून द्यावी अशी समाजवाद्यांकडून अपेक्षा केली जात आहे. मानवी पूर्णत शोधण्याच्या परंपरेशी केवळ इमान राखता यावे म्हणून नव्हे तर ती परंपरा जिवंत राहवी यासाठी समाजवादाला अशी नवी दिशा देणे आवश्यक आहे....’ (लोहिया विचार दर्शन, पृ. 87)
जनता पक्षाचा प्रयोग फसल्यानंतर त्यातून बाहेर पडून जनसंघाने ‘भारतीय जनता पक्ष’ची निर्मिती केली. त्याच्या सुरवातीच्या उद्दीष्टांतच ‘गांधीवादी समाजवादा’ची विचारसरणी अंगिकारल्याचे अटल बिहारी वाजपेयी यांनी म्हटले होते. कदाचित त्यांच्या डोळ्यांसमोर लोहियांचेच विचार असावेत.
आज कॉंग्रेसचा निर्णायक राजकीय पराभव करून मोंदींनी लोहियांचे एक स्वप्न पूर्ण केले आहे. आता त्यांच्या विचार सरणीला अनुसरून पावले उचलून कॉंग्रेसेतर इतर राजकीय पक्षांनी बाकी स्वप्न पूर्ण करावे. त्यांच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी वर्षा निमित्त हीच लोहियांना खरी श्रद्धांजली ठरेल.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575