Showing posts with label Indian Republican. Show all posts
Showing posts with label Indian Republican. Show all posts

Wednesday, August 3, 2011

मूठभरांचे ‘मजा’सत्ताक । सामान्यांचे ‘सजा’सत्ताक


हे स्वातंत्र्य कुण्या प्रजासत्ताकाचे?


.............................................................
६ ऑगस्ट २०११ शेतकरी संघटक मधील अग्रलेख
.............................................................


14 ऑगस्ट 1947 ला मध्यरात्री 12 वाजता लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकला. आपल्या देशात प्रत्यक्ष घटना लागू झाली ती 26 जानेवारी 1950 ला. तेव्हापासून आपण प्रजासत्ताक झालो. 15 ऑगस्ट 2011 च्या पार्श्र्वभूमीवर असं विचारावंसं वाटतं, ‘हे कुणाचे प्रजासत्ताक आहे?’ एकमय राष्ट्र या अर्थाने नेशन कुठे अस्तित्वात आहे असा प्रश्र्न महात्मा फुले यांनी विचारला होता. त्याच पातळीवर आज कुणाचे प्रजासत्ताक हे विचारावं वाटतं आहे. देशाची वाटणी 4 रंगांमध्ये झालेली स्वच्छपणे दिसते आहे. आपल्या तिरंग्यातले रंग घेऊनच याचं विश्लेषण करता येईल.

हिरवा रंग : मातीतील पोषक द्रव्ये घेऊन झाडाला हिरवेपण प्राप्त होते. त्याचप्रमाणे देशातही मूठभर राजकीय नेते, सरकारी नोकरशहा, त्यांच्याभोवतीचे लाभार्थी, उद्योगपती, व्यापारी, ठेकेदार, दलाल आदींनी या देशाचं पुरेपूर शोषण करून घेतलं आणि स्वत:ला समृद्धी मिळवून घेतली. प्रत्यक्ष देशाच्या प्रति कर्तव्य करायची वेळ आली, की आजही हे लोक कचरतात. सगळे नियम कायदे हवे तसे मोडून, वाकवून आपल्या सोयीने सगळी व्यवस्था यांनी करून घेतली आहे. स्वीस बँकेतल्या काळ्या पैशांबाबत जी चर्चा चालते तो सगळा पैसा याच वर्गाचा आहे. हे लोक नेहमीच सर्वसामान्यांचा कळवळा दाखवतात आणि प्रत्यक्षात कृती करत असताना सर्वसामान्यांचं शोषण केल्यावाचून राहत नाहीत. आजही हजारो कोटींचे गैरव्यवहार इतक्या सहजपणे घडत आहेत, की जणू काही या लोकांनी देशच विकायला काढला आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तथाकथित सर्व राजकीय पक्ष समाजातील बहुतांश धुरीण यांमध्ये सारखेच दोषी आहेत.

पांढरा रंग : अख्ख्या अमेरिकेची लोकसंख्या जितकी आहे. तितका जवळपास भारतात उच्चवर्ग, उच्च मध्यमवर्ग, मध्यम वर्ग आहे. संख्येने हा वर्ग कमी असला तरी याची ताकद प्रचंड आहे. हा वर्ग कधीही स्वत: भ्रष्टाचार करत नाही; पण हे नेहमीच भ्रष्टाचाराला साथ देत आले आहेत. त्याचे मूक साक्षीदार राहिलेले आहेत. तसेच त्याचे अप्रत्यक्षरीत्या लाभार्थीही आहेत. अगदी पैशांच्या स्वरूपातला भ्रष्टाचार सोडा; पण साधी गॅस सिलेंडरची बाब विचारात घेतली तरी पन्नास लाखांचा फ्लॅट खरेदी करणारा या वर्गातला माणूस गरिबांसाठी असलेली गॅसवरची सबसिडी तशीच राहावी म्हणून आग्रही असतो. कमकुवत आर्थिक गटासाठी शासनाच्या गृहनिर्माण योजना बहुतांश याच वर्गाने गिळंकृत केल्या आहेत. पेट्रोलचा सगळ्यात जास्त वापर हाच वर्ग करतो; परिणामी पेट्रोलमधली दरवाढ यांच्याच क्षोभाला कारणीभूत ठरते. एकीकडे 200 रुपयांचं सिनेमाचं तिकीट काढताना 350 रुपयांचं गॅस सिलेंडर महाग आहे म्हणण्याची यांना लाजही वाटत नाही. यांची मुलं चुकूनही जिल्हा परिषद अथवा महानगर पालिकांच्या शाळांमध्ये शिकत नाहीत, तर ती खासगी शाळांमध्ये शिकतात. ज्या शाळांना शासनानं अनुदान दिलेलं असतं. बोटावर मोजता येतील इतक्या शाळा विनाअनुदानित आहेत, त्यांनाही अनुदान द्यावं असा आग्रह याच वर्गाने धरलेला असून राज्यकर्त्यांना कायम विनाअनुदानित यातील ‘कायम’ हा शब्द काढायला लावला आहे. हिरव्या गटातल्या लोकांशी यांचे हितसंबंध पूर्णपणे अडकलेले आहेत. सर्वसामान्य म्हणवणारे हे लोक अण्णा हजारेंच्या आंदोलनात मेणबत्त्या घेऊन सहभागी होतात; पण हे कधीही शेतकरी, गिरणी कामगार, आदिवासी यांच्यासाठी रस्त्यावर उतरून मोर्चा काढत नाहीत.

भगवा रंग : हिंदू संस्कृतीमध्ये भगवा रंग हा त्यागाचं प्रतिक आहे. भारतातल्या तमाम गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी वर्गाने आतापर्यंत किमान सूखसुविधांचा त्यागच केलेला आहे. तळागाळातल्या वर्गांचं तर काही विचारायलाच नको. शिवाय आपली संस्कृतीही त्यागच आपल्याला शिकवते आणि ही संस्कृती टिकवण्याचं ओझं पूर्णपणे याच वर्गावर लादल्या गेलेलं आहे, परिणामी या वर्गाला भगवा रंग या कप्प्यात टाकणं योग्य होईल.

निळा रंग : प्रशासकीय यंत्रणा नावाची एक निगरगट्ट संवेदनाहीन अशी व्यवस्था आम्ही तयार केलेली आहे. झेंड्यावरती निळं अशोक चक्र असावं तशी ही व्यवस्था आपला निळा शिक्का या देशाच्या सगळ्याच घटकांवर करकरीतपणे उमटवून उभी राहिलेली दिसते. हिला कुणाशीही देणं घेणं नाही. ज्या हिरव्या घटकाशी तिचे हितसंबंध अडकलेले असतात तिच्यावरही प्रसंगी उलटायला ती कमी करत नाही. पदावरून उतरलेला एखादा मंत्री अथवा आमदार, खासदार समोरून गेला तर एरवी सलामीसाठी झुकणार्‍याची पापणीही हलत नाही.

1991 पासून आपण नवीन अर्थव्यवस्थेचे धोरण अवलंबायला सुरुवात केली त्यालाही आता 20 वर्षे उलटून गेली. आपली जी पारंपरिक मानसिकता होती, ज्या अडचणी होत्या, त्यावर शोधण्यासाठीचे जे उपाय होते, जी धडपड होती ते सगळं आता केव्हाच बदलून गेलंय. जागतिक पातळीवर युद्धखोरी आणि बढाईची भाषा करणार्‍या अमेरिकेचे हातसुद्धा प्रचंड मोठ्या कर्जाखाली दबलेले आहेत. यातच सर्व काही आलंय. आपल्याला आता खूप वेगळ्या पद्धतीने विचारा करावा लागेल. या आव्हानांना तोंड देण्यासाठी नवीन काळाला सुसंगत अशी नीती आखावी लागेल तरच आपल्या स्वातंत्र्याचा खरा अर्थ आपल्याला गवसेल, अन्यथा स्वातंत्र्य दिवस म्हणजे लाल किल्ल्यावर झेंडा या पलीकडे काहीही सांगता येणार नाही.