Saturday, November 5, 2016

सांस्कृतिक सभागृहे : सांस्कृतिक चळवळीची केंद्रे


सामना दिवाळी 12016, औरंगाबाद

सांस्कृतिक चळवळ असा शब्द आपण वापरतो तेंव्हा पहिल्यांदा डोळ्यासमोर येतात ती सांस्कृतिक सभागृहेच. कारण सादर होणार्‍या सर्व कला (परफॉर्मिंग आर्टस्)  या मंचावरूनच सादर व्हाव्या लागतात. परिणामी सांस्कृतिक सभागृहांचा विचार करणे गरजेचे आहे.

मराठवाड्याचा जर विचार केल्यास आठही जिल्ह्यात मिळून पाचशे किंवा त्यापेक्षा जास्त क्षमता असलेली दहापण सांस्कृतिक सभागृहे नाहीत. शिवाय जी आहेत त्यांची अवस्था काय आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.

सांस्कृतिक चळवळ चालवायची असेल, तिचा विकास होऊ द्यायचा असेल तर त्यासाठी स्थानिक पातळीवरील कलाकारांचा सहभाग असणे जास्त आवश्यक आहे. तसेच त्यांच्या कलेच्या वाढीसाठी, एकूणच समाजाच्या अभिवृद्धीसाठी पोषक वातावरण तयार होणे गरजेचे आहे. 

नुकताच संभाजीनगर मध्ये घडलेला प्रसंग आहे. वेरूळ अजिंठा महोत्सवात अजय-अतूल व अदनान सामी या प्रसिद्ध कलाकारांना आमंत्रित करण्यात आले होते. खरं तर या व्यवसायीक कलाकारांना शासनाच्या महोत्सवांमध्ये आमंत्रित करण्याची काही गरज नव्हती. कारण कलेचा व्यवसाय करणे हे शासनाचे काम नाही. शिवाय या कलाकारांना प्रोत्साहन देण्याची काहीच गरज नाही. या कलाकारांनी तयार साउंड ट्रॅकवर गाणी सादर केली. वेळेवर ही यंत्रणा बंद पडली व या कलाकारांच्या नुसत्या ओठ हालविण्यावरून हे पितळ उघडे पडले. 

हा कार्यक्रम सोनेरी महलच्या परिसरात खुला रंगमंच उभारून संपन्न झाला होता. मूळ मुद्दा असा आहे की या व्यवसायीक कलाकारांना आमंत्रित करावेच का? त्यांना प्रचंड मोठी बिदागी द्यायची, त्यासाठी भला मोठा रंगमंच उभा करायचा, खर्चिक ध्वनीयंत्रणा उभी करायची आणि हे सगळं करून हे सादर करणार काय तर तयार साउंड ट्रॅकवरची गाणी. मग हा आटापिटा शासनाने का करायचा? एखाद्या खासगी संस्थेने करणे हे समजण्यासारखे आहे. तो त्यांच्या व्यावसायीकतेचा भाग असू शकतो. 

खुल्यातील सांस्कृतिक कार्यक्रम हे अतिशय थोडे असतात. एकूण सांस्कृतिक चळवळ चालते ती बंदिस्त सभागृहांमधून. मग या सभागृहांचा पहिल्यांदा विचार करण्याचे सोडून अशा खुल्या भल्या मोठ्या खर्चिक उपक्रमांना आपण प्राधान्य का देतो? शासकीय अधिकारी दबाव टाकून प्रायोजकांकडून पैसे वसुल करतात. कागदोपत्री दिसायला अशा मोठ्या उपक्रमांसाठी परस्पर पैसा उभा झालेला दिसतो. पण त्यामागचे इंगित शासकीय यंत्रणेचा दबाव हेच असते. 

याचा फार मोठा तोटा असा होतो की शहरात एरव्ही वर्षभर साजरे होणारे छोटे मोठे सांस्कृतिक सोहळे रोडावतात. कारण त्यांना मग प्रायोजक मिळत नाही. एक ठराविक रक्कम दरवर्षी विविध सांस्कृतिक सामाजिक उपक्रमांसाठी बँका, मोठ्या आस्थापना, मोठे उद्योग यांनी राखीव ठेवलेली असते. या रकमेतील मोठा वाटा हा शासनाने आयोजित केलेल्या महोत्सवांमध्ये खर्च होता. मग वर्षभर इतर खासगी संस्थांना निधी मिळत नाही.

बंदिस्त सभागृहांमध्ये जे काही उपक्रम होतात त्यात स्थानिक कार्यक्रमांचा सिंहाचा वाटा असतो. संभाजीनगर शहरातील एकनाथ रंग मंदिराचे उदाहरण बोलके आहे. 2014 सालात या सभागृहात एकूण 312 कार्यक्रम वर्षभरांत साजरे झाले. त्यातील 245 इतके स्थानिक कार्यक्रम होते. केवळ 67 बाहेरची व्यवसायीक नाटकं किंवा इतर तिकीट शो सादर झाले. 

स्थानिक संस्था ह्याच सांस्कृतिक सभागृहांसाठी खर्‍या आधार आहेत. त्यांच्या जिवावरच या सभागृहांचे अर्थकारण आणि अर्थातच सांस्कृतिक चळवळ चालू असते. मग असे असताना त्यांचा अग्रक्रमाने विचार का नको करायला? 

आज सगळ्यात मोठी अडचण आहे ती आर्थिक. स्थानिक स्वराज्य संस्थांना (महानगर पालिका, नगर पालिका) स्वत:ची उत्पन्नाची साधने शिल्लक राहिली नाहीत. घरपट्टी आणि नळपट्टीचे मिळणारे उत्पन्न अतिशय तोकडे आहे. अशा स्थितीत या महानगर/नगर पालिका सभागृहांची देखभाल कशी काय करणार?

खासगीकरण हा यावर उपाय असू शकत नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कितीही व्यावसायीक पातळीवर ही सभागृहं चालविली तरी सांस्कृतिक कार्यक्रमांतून (नाटके, गाण्याचे कार्यक्रम, कॉमेडी शो) पुरेसे उत्पन्न मिळणं अवघड आहे. मग यांचा कसाही वापर कंत्राटदारांकडून व्हायला सुरवात होते. याचा परिणाम म्हणजे काही दिवसांतच सभागृहाची अवस्था वाईट होऊन जाते. 

महानगर पालिका/नगर पालिका यांच्या ताब्यात ही सभागृहं ठेवली तरी अडचण आहेच. कारण शहराच्या ज्या मुलभूत समस्या आहेत त्यांच्या साठीच पुरेसा निधी/मनुष्यबळ/इच्छा शक्ती यांच्याकडे शिल्लक राहिलेली नाही. मग या संस्था ही सभागृहं चांगली कशी काय ठेवू शकतील? 

संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर स्थानिक स्वराज्य संस्थांनी जी सभागृहं चांगली चालविली आहेत, ज्यांची अवस्था चांगली आहे आणि त्यांची देखभाल त्या करू शकतात अशी सभागृहे वगळून एक कृती आराखडा आखावा लागेल. त्याची चौकट अशी असू शकते.

चित्रपट निर्माते त्यांच्या चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी आता मल्टीप्लेक्स मध्ये गुंतवणूक करीत आहेत. जूनी एक पडदा चित्रपट गृहे बदलून त्या ठिकाणी कमी आसन क्षमतेची (200 ते 400) मल्टीप्लेक्स उभी रहात आहेत. यासाठी पैसा याच निर्मात्यांनी लावला आहे. याच धर्तीवर नाट्य निर्माते, मराठी नाट्य परिषद यांनी पुढाकार घेवून महाराष्ट्र भरची 500 किंवा त्यापेक्षा जास्त आसन क्षमता असलेली सभागृहे चालविण्यासाठी ताब्यात घ्यावीत. त्यासाठी महाराष्ट्र पातळीवर किंवा विभागीय पातळीवर स्वतंत्र व्यावसायिक आस्थापना निर्माण केल्या जाव्यात. 

या सभागृहांच्या उभारणीसाठी/ देखभालीसाठी शासनाने स्वतंत्र निधी मराठी नाट्य परिषदेकच्या  स्वाधीन करावा. जेणे करून त्यांचे काम सोपे होईल. ही नाट्यगृहे जर स्थानिक पातळीवर चालविण्यासाठी दिली तर त्याचा गैरवापर फार होतो हा वारंवार आलेला अनुभव आहे. स्थानिक नेते, प्रभावशाली व्यक्ती या सभागृहांचा हवा तसा वापर करून घेतात. त्यावर कुणाचेच नियंत्रण रहात नाही.

हेच जर या सभागृहांच्या देखभालीसाठी स्वतंत्र व्यवस्था असेल, त्याची नियमावली समान असेल, स्वच्छता असेल, कलाकारांसाठी सोयीसवलती असतील तर त्याच्या उत्पन्नाची साधने योग्य पद्धतीनं उभी राहतील. आणि यांचा गैरवापर टळेल.

मोठ्या नाट्यसंस्था जेंव्हा गावोगावी प्रयोग लावतात तेंव्हा त्यांचा पसारा फार मोठा असतो. तो सगळा बरोबर घेवून फिरणे अवघड असते. जर संपूर्ण महाराष्ट्रात एक सामायिक अशी यंत्रणा उभी राहिली तर हे नाट्य  निर्माते त्यांना सातत्याने लागणार्‍या ध्वनी यंत्रणा, प्रकाश योजना, स्टेज प्रॉपर्टी अशा बर्‍याच गोष्टी स्थानिक पातळीवरच सज्ज ठेवतील. 

नाटकासोबत किंवा मोठ्या कार्यक्रमासोबत सेलिब्रिटी मोठ्या कलाकारां शिवाय मोठ्या संख्येने तंत्रज्ञ (बॅक स्टेज आर्टिस्ट) येत असतात. त्या सगळ्यांची राहण्याची किमान बरी सोय रंग मंदिराच्या आवारात होणे गरजेचे असते. बहुतांश नाट्यगृहांमध्ये हे होत नाही. जर महाराष्ट्रभर सभागृहांचे नियंत्रण करणारी समायिक  यंत्रणा काम करत असेल तर ती या गोष्टींचा प्रामुख्याने विचार करून यावर उपाय शोधून काढू शकेल. 

एखाद्या नाटकाला महाराष्ट्रभर दौरा करायचा तर सध्या मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागते. सभागृहांच्या तारखा मिळणे, त्यासाठी स्थानिक नियंत्रण करणार्‍या अधिकार्‍यांचे उंबरठे झिजवणे, मग सगळं जूळून आल्यावर रंग मंदिरात सगळी सोय करणे. चित्रपटांप्रमाणे जर नाट्य सभागृहांचे नियंत्रण करणारी एखादी यंत्रणा असेल तर या सगळ्या अडचणींवर मात करता येईल.  

रंगभूमी जिवंत ठेवायची तर स्थानिक कलाकारांचा सहभाग असणे आवश्यक आहे.  राज्य नाट्य स्पर्धांमधून मोठ्या प्रमाणात हे कलाकार आपला कलाविष्कार सादर करीत असतात. पण ह्या स्पर्धा केवळ काही केंद्रामध्येच संपन्न होतात. ज्या नाटकांना क्रमांक मिळाले आहेत त्यांचे सादरीकरण महाराष्ट्रात सर्वत्र का केले जात नाही?  यातून फार मोठ्या प्रमाणावर स्थानिक कलाकारांना संधी मिळू शकेल.

जर महाराष्ट्रभर सांस्कृतिक सभागृहांची उभारणी चांगली झाली, त्यांची देखभाल चांगली झाली तर त्या ठिकाणी राज्य नाट्य स्पर्धेत क्रमांक मिळविलेल्या नाटकांचे प्रयोग सादर करणे शक्य होईल. याचा दुसरा एक फार मोठा फायदा म्हणजे जागोजागीच्या रसिकांच्या कला अभिरूचिचा विकास होईल.

संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केल्यास मुंबई-पुणे-ठाणे पट्ट्यातील दहा महानगर पालिका वगळता उर्वरीत महाराष्ट्रात 16 महानगर पालिका आहेत. (नाशिक, धुळे, जळगांव, मालेगांव, अकोला, अमरावती, नागपुर, चंद्रपुर, संभाजीनगर, परभणी, नांदेड, लातुर, सोलापुर, सांगली, कोल्हापुर, नगर) या ठिकाणी किमान एक तरी सभागृह चांगल्या अवस्थेत असणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात एकूण 226 नगर पालिका आहेत. त्यापैकी किमान 50 नगर पालिकांची स्थिती उत्तम आहे. असा सगळा विचार करून मुंबई-ठाणे-पुणे, उर्वरीत महाराष्ट्रातील 16 महानगर पालिकांची गावं, नगर पालिकांची 50 गावं अशी सगळी मिळून किमान 100 सभागृहं अतिशच चांगली अशी तयार केली गेली पाहिजेत.  (यातील काही सध्याच आहेत)

प्रत्येकवेळी यासाठी शासनाकडे हात पसरला जातो आणि शासन निधी नाही म्हणून नकारघंटा वाजवतो. हे टाळण्यासाठी खासगी उद्योगांनी मदतीचा हात पुढे केला पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर आता कुणाचा विश्वास उरला नाही. तेंव्हा स्वतंत्र अशी सांस्कृतिक समिती महाराष्ट्र पातळीवर स्थापन करून तिच्याकडे हे काम सोपविले पाहिजे. 

मोठ्या शहरांमध्ये ज्या नविन वसाहती आहेत त्या ठिकाणी सर्व लोक एकत्र येवून गृहनिर्माण संस्था स्थापन करतात. या संस्था वर्षभर आपले विविध कार्यक्रम राबविते. पैसे गोळा करून एखादे छोटे सांस्कृतिक सभागृह उभारले जाते. छोटे मंदिर स्थापन केले जाते. अशा यंत्रणा मोठ्या शहरांमध्ये गेल्या 25 वर्षांपासून व्यवस्थित राबत आहेत. मग हेच प्रारूप (मॉडेल) आपण सांस्कृतिक सभागृहांसाठी राबविले तर काय हरकत आहे? 

खरं तर मार्ग सापडणे शक्य आहे. फक्त इच्छाशक्ती हवी. नविन काळात मंचावरून सादर होणार्‍या ‘लाईव्ह’ कार्यक्रमांची मोहिनी परत एकदा लोकांना पडत आहे. साउंड ट्रॅकवरून गाणारे नावाने मोठे असणारे कलाकार याच भावनेचा गैरफायदा घेतात आणि व्यवसायीक हीत साधतात. मग हे ओळखून या सांस्कृतिक सभागृहांचीच म्हणून एक चांगली यंत्रणा महाराष्ट्रभर उभारली आणि चालविली तर महाराष्टाच्या सांस्कृतिक चळवळीला मोठी गती लाभेल. 
       
            
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, संभाजीनगर मो. 9422878575

दिवाळी अंक वाचण्यासाठी की पाहण्यासाठी की जाहिरातीसाठी?


उरूस, सांजवार्ता, 4 नोव्हेंबर 2016 

दिवाळी संपली आणि आता दिवाळी अंकांची चर्चा चालु झाली आहे. मराठीत दिवाळी अंकांची परंपरा तशी जवळपास 100 वर्षांपासूनची आहे. आत्तापर्यंत ही बाजारपेठ चांगली सुस्थिर व्हायला हवी होती. 

महाराष्ट्रात 500 बस डेपो  आणि जवळपास 200 रेल्वेची मोठी स्टेशन्स आहेत. या ठिकाणी वर्तमानपत्रे मासिके यांच्यासाठी बर्‍यापैकी मोठे स्टॉल्स लागलेले असतात. इथेच दिवाळी अंकांची विक्री इतर दैनिकं, साप्ताहिकं,मासिकं यांच्या सोबत होते. मग असं असताना चांगल्या दिवाळी अंकांचा खप किमान दहा वीस हजार प्रतींचा असायला हवा. पण तसं प्रत्यक्षात दिसत नाही.

नेमके कोणते दिवाळी अंक खपले किंवा खपवले जातात? याचे उत्तर सरळ आहे. मोठ मोठ्या दैनिकांचे दिवाळी अंक जास्त खपतात. त्याचे कारणही सरळच आहे. वर्तमानपत्रं वितरणाची महाराष्ट्रभर एक यंत्रणा वर्षभर काम करतच असते. शिवाय जाहिरात गोळा करण्याची सक्षम यंत्रणा पण वर्तमानपत्रांकडे असतेच. छपाईची यंत्रणा तर असतेच. अशा पद्धतीनं वर्तमानपत्रांच्या दिवाळी अंकांची कहाणी सफल संपूर्ण होते. यातील कित्येक अंक तर जाहिरातींसाठीच निघालेले असतात. बहुतांश वर्तमानपत्रांचे अंक मोफत वाटले जातात. कारण पैसे आधीच वसुल झालेले असतात. तेंव्हा त्यांच्या मजकुराबाबत चर्चा करण्याचे काही कारणच नाही. बर्‍याचदा तर आधी जाहिराती गोळा केल्या जातात. आणि पुरेशा जाहिराती असल्यावरच दिवाळी अंकासाठी मजकुर गोळा करण्याची धावाधाव सुरू होते.

वर्तमानपत्रांच्या दिवाळी अंकात त्यांच्याच संपादकीय विभागातील लोक बर्‍याचदा लिहितात. म्हणजे रोजच्या अंकात लिहिणाराच विविध विषयांवर दिवाळी अंकातही लिहीतो. कर्मचारीच असल्याने त्याला मानधान द्यायचा काही प्रश्नच येत नाही. बाहेरून मागवलेल्या मजकुरासाठी जे मानधन दिले जाते ते अतिशय तोकडे असते. वर्तमानपत्रांचे दिवाळी अंक म्हणजे भरपुर जाहिराती, अत्यल्प मानधन, भरपुर उत्पन्न आणि वरती परत ‘आम्ही दिवाळी अंकांची थोर परंपरा कशी टिकवून ठेवली’ हा टेंभा. नुसत्या जाहिराती छापता येत नाही म्हणून अधून मधून ते मजकूर छापतात.

मोठ्या वर्तमानपत्रांचे दिवाळी अंक नुसते मोफत वाटले जात नाहीत. ते घसघशीत किंमतीत विकले जातात. पुस्तकांवर जशी सुट मिळते तशी सुट दिवाळी अंकांच्या किंमतीवर मिळत नाही. शिवाय हा व्यवहार रोखीचा असल्याने विक्रेत्यांनाही हे अंक रोख रक्कम देवूनच खरेदी करावे लागतात. हे अंक विकले गेले नाही तर परत करण्याची सोय नाही.

वर्तमानपत्रांचे दिवाळी अंक हे जाहिरातीसाठीच असतात. 

काही वर्तमानपत्रांनी आता गुळगुळीत कागदांवर संपूर्ण रंगीत छपाई असलेले वैशिष्ट्यपूर्ण मांडणीचे वेगळे ‘डिलक्स’ अंक प्रकाशीत करायला सुरवात केली आहे. या अंकांमध्येही जाहिराती असतात पण त्या मर्यादीत असतात. यात प्रथितयश लेखकांचे लिखाण चांगले मानधन देवून मागवले जाते. पण या अंकांची अडचण म्हणजे हे अंक ‘दिखाऊ’करण्याकडेच सगळा कल असतो. म्हणजे या अंकांची मांडणी करणारे जे कलाकार आहेत त्यांना भलेमोठे मानधन दिले जाते. अंकांची छपाई अतिशय सुबक केली जाते. या तुलनेत यातील मजकुराचा दर्जा फार चांगला असतोच असे नाही. बर्‍याचदा मोठ्या लेखकाचे अतिशय जुजबी लिखाण चांगल्या चित्रांसह, मांडणीसह समोर येते. 

हे अंक केवळ पाहण्यासाठीच असतात. मोठे लेखक, चांगला मजकुर या नावाखाली यातील जाहिरातींचे दर खच्चून असतात. किमतीही भरमसाठी ठेवलेल्या असतात. वाचण्यासाठी यात फारसं काही मिळत नाही.

वर्तमानपत्रांचे नसलेले बरेच दिवाळी अंक प्रसिद्ध होतात. यातील काही अंकांना पन्नास एक वर्षांची मोठी परंपराही आहे. त्यांचा विशिष्ट वाचक वर्ग ठरलेला आहे. त्यांना काही जाहिराती हमखास मिळतात. पण यातही आता एक मोठी अडचण जाणवते आहे. आत्ता आत्ता पर्यंत मोठ्या देशी परदेशी कंपन्यांच्या अधिकारी पदावर मराठी माणसं होती. विशेषत: जाहिरात व जनसंपर्क खात्यात ही माणसं कार्यरत होती तोपर्यंत मराठी दिवाळी अंकांना जाहिराती मिळायच्या. आता परिस्थिती अशी आहे या जागांवर अमराठी माणसे एम.बी.ए. झालेली कार्यरत आहेत. त्यांच्या दृष्टीने दिवाळी अंक ही दखल घेण्याजोगी बाबच नाही. मोठ मोठे सांगितीक ‘इव्हेंट’ त्यांना जास्त महत्त्वाचे वाटतात. मग या कंपन्यांच्या जाहिरातीचे भले मोठे बजेट या कार्यक्रमांवर खर्च होवून जाते. खुल्या मैदानात होणार्‍या, चित्रपट तारे तारकांच्या साक्षीने बड्या चित्रपट गायकांच्या आवाजाने संपन्न होणार्‍या या कार्यक्रमांमध्ये यांचे हितसंबंध अडकलेले आहेत. मग ते दिवाळी अंकांसाठी जाहिरात कशाला देतील.

वर्तमानपत्रांशिवायच्या या अंकांमध्ये भरगच्च वाचनिय मजकूर असतो. पण यांचे वितरण नीट होत नाही. जाणकार वाचकांपर्यंत हे अंक पोचत नाहीत. काही जिज्ञासू वाचकच धडपड करून हे अंक मिळवतात. 

हे अंक वाचण्यासाठी असतात.  

आज चित्र असे आहे की जवळपास सर्व महत्त्वाचे वाचनिय अंक मुंबई पुण्याहून निघत आहेत. आणि त्यांचा वाचक वर्ग सुदूर महाराष्ट्रात पसरला आहे. या वाचकापर्यंत हे दिवाळी अंक योग्य पद्धतीनं पोचत नाहीत. आणि तिकडे या अंकांचे संपादक मालक तक्रार करतात आमचा अंक खपत नाही. त्याचा खर्च निघत नाही. लेखकांची तक्रार असते वाचकांच्या प्रतिक्रिया येत नाहीत.

अजून एक बारकासा प्रकार दिवाळी अंकांचा आहे. हे अंक स्थानिक पातळीवर स्थानिक नवोदित लेखकांना संधी द्यायची या नावाखाली प्रसिद्ध होतात. आता सर्वत्रच छपाई बर्‍यापैकी होत असल्याने दर्जा ठीक असतो. मांडणीच्या नावाने बोंब असते, मजकूर यथा तथा असतो. पण स्थानिक हितसंबंधातून जाहिराती मिळतात. जाहिरात देणाराही जाऊ दे आपलीच माणसे आहेत. द्या यांनाही थोडेफार पैसे या भावनेने हात सैल सोडतो. 

तालूक्याच्या ठिकाणाहून संपूर्ण रंगीत अंक काढणार्‍या एका संपादक मित्राला विचारले की छपाईचा दर्जा इतका चांगला आहे, इतके पैसे खर्च केले आहेत तर चांगल्या मजकुरासाठी प्रयत्न का करत नाही? अंक सर्वत्र पोचावा म्हणून का धडपड करत नाही? त्याने हो हो केले. जुजबी उत्तर दिले. परत पुढच्या वर्षी त्याचा अंक तसाच आणि त्याच स्वरूपात प्रसिद्ध झाला. त्याने फक्त काळजी एकच घेतली की आता तो मला मजकुरही मागत नाही, सल्लाही मागत नाही आणि अंकही पाठवत नाही.

चांगले वाचनिय दिवाळी अंक पोचत नाहीत, जाहिरातींच्या अंकांत मजकूर नसतो, सुळसुळीत अंकांचा भर दिखाव्यावर असतो. या अडचणींवर मात करण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. एस.टी. बस स्टँड व रेल्वे स्टेशन  या ठिकाणच्या बुक स्टॉल्सशी संपर्क करून विभागवार रचना करून आखणी करावी लागेल. वर्तमानपत्रांचाच आधार घेवून त्यांच्या अंकांत सकस मजकूर येणे, चांगल्या अंकांची त्यांनी दखल घेवून जाहिरात करणे, दिखावू अंकांमधून दर्जेदार  लिखाण येणे अशा काही उपाययोजना कराव्या लागतील.

सगळ्यात पहिल्यांदा वाचकांनी त्यांना दिवाळी अकांबद्दल जे काही वाटतं आहे ते सोशल मिडीयावर स्पष्टपणे रोखठोक पद्धतीनं मांडलं पाहिजे. तरच यात काही बदल होवू शकेल. नसता परत पुढच्या दिवाळीत आपण ‘दिवाळी अंक वाचले का जात नाहीत?’ यावर अंबट तोंड करून चर्चा करत राहूत.    
             
                  श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575