Monday, June 22, 2015

डाळींची आयात ! शेतकर्‍याचा घात !!


उरूस, दैनिक पुण्य नगरी,  21 जून 2015 

देशात डाळींचे भाव कडाडले, डाळ 100 रूपयांच्या पुढे गेली की लगेच शासकीय पातळीवर डाळींची आयात करणार असल्याची आवाई उठवली गेली. सर्वसामान्य माणसांना असे भासविले जाते की हे शासन त्यांची किती काळजी करते. याचा थोडा शांततेने विचार केला की लक्षात येईल की ही घोषणा प्रचंड फसवी आहे. याचा सामान्य माणसांशी काहीही संबंध नाही. आणि शेतकर्‍यांचा तर ही घातच करणारी बाब आहे.
सर्वसामान्य ज्याला ग्राहक म्हणून संबोधल्या जाते त्यातील बहुतांश वर्ग हा शेतकरीच आहे. स्वाभाविकच हा शेतकरी आपल्याला लागणारे बरड धान्य आपल्या शेतातच पिकवितो. महाराष्ट्राचा आपण विचार केला तर असे लक्षात येईल की  शेतकरी त्याला लागणार्‍या डाळीही आपल्या शेतातच पिकवितो. म्हणजे साधा हिशोब आहे की ज्याला गरीब सामान्य म्हणून गणल्या जातो त्यातील बहुतांश हा शेतकरी किंवा शेतीशी संबंधीत आहे. मग तो आपल्याला लागणारे वर्षाचे धान्य, डाळी यांची साठवणूक एकदाच करून ठेवतो. त्याचा बाजारातील चढउताराशी संबंध येतच नाही. राहता राहिला शेतकरी नसलेला इतर शहरी मध्यमवर्गीय ग्राहक. आपण परत महाराष्ट्राचा विचार करू. हा मध्यमवर्गीय ग्राहक नेहमी बरड धान्य व डाळी यांची वार्षिक खरेदी करतो. अगदी फार मोठी शहरं सोडली तर दर महिन्याच्या महिन्याला जावून डाळ, गहु, तांदूळ आणण्याची पद्धत मध्यमवर्गात नाही. अगदी गव्हाचे तयार पीठही खरेदी केले जात नाही. वर्षाचे जे धान्य साठवले असले ते निवडुन गरजे प्रमाणे त्याचे पीठ दळून आणले जाते. बाजरी सारख्या धान्याची तर अशी समस्या आहे की जास्त दिवस हे पीठ टिकत नाही. ते कडून बनते. परिणामी ते दळून आणले की लगेच वापरून टाकावे लागते. 
मग या डाळींचे/बरड धान्यांचे भाव वाढतात किंवा घसरतात याचा परिणाम नेमका कोणावर पडतो?  असा उच्च मध्यमवर्ग आहे ज्याचे वार्षिक उत्पन्न किमान दहा लाख रूपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे. चार माणसांच्या एका कुटूंबाचा धान्य, डाळी यांच्यावरील खर्च हा साधारणत: पंधरा हजार इतका आहे. आता जर हा खर्च वाढून वीस हजार झाला तर त्याच्या एकूण बजेट  मध्ये असा काय फार मोठा फरक पडतो? डाळींची धान्याची खरेदी उन्हाळ्याच्या आधी केली जाते. उन्हाळ्यात त्यांना वाळवून कोठ्यांमध्ये भरले जाते. आता पावसाळ्याच्या तोंडावर जर डाळींचे भाव वाढले तर त्याची इतकी चिंता करण्याचे कारणच काय?  

मग ही बोंब का केली जाते? त्याचे साधे कारण म्हणजे कृषीमालाची आंतराष्ट्रीय बाजारपेठ. यात ऑस्ट्रेलिया मधून मोठ्या प्रमाणात डाळ येते. या डाळीचा व्यापार करणारे मोठमोठे व्यापारी दिल्लीत किंवा विविध देशांच्या राजधानीत डेरे देवून बसलेले असतात. त्यांच्याशी संधान साधून आयात करण्यासाठी वातावरण निर्मिती केली जाते. या सगळ्यातून अशी ओरड केली जाते की सामान्य माणसाचे जीवन भरडून निघत आहे. डाळी खाल्ल्या नाहीत तर मोठ्या प्रमाणात शाकाहारी असलेला हा हिंदू भारत प्रथिने कुठून मिळवणार? मग यावर उपाय काय तर परदेशातून डाळी आयात करा.

खरं तर सामान्य माणसाला प्रथिनांसाठी सध्या अंडे परवडत आहेत. उन्हाळा आणि पावसाळ्यात अंड्याचा भावही उतरता राहतो. किंवा फार चढला तरी तो पाच सहा रूपयांच्या पुढे जात नाही. कोंबड्यांवर कुठलीही बंदी नाही. कारण कोंबड्यांच्या पोटात देव नाहीत. कोंबड्यांचा उपयोग खाण्यासाठी होतो, अंडी मिळतात म्हणून त्यांची पैदास मोठ्या प्रमाणात केली जाते. परिणामी बाजारात अंडी स्वस्त उपलब्ध आहेत. इतकेच नाही तर खेड्यात सर्रास कोंबड्या पाळल्या जातात. शेळीवरही कुठली बंदी नाही. शेळीच्याही पोटात देव नाही. परिणामी खेड्यांमधून घराघरात शेळ्याही पाळल्या जातात. ज्यांचा व्यवहारीक उपयोग होतो त्यांच्या वंशाच्या वृद्धीसाठी कुठलाही कायदा करावा लागत नाही. लोक त्यांचे पालनपोषण ममत्वाने करतात. त्यांच्या वंशाची अमर्याद वृद्धी होते. यातून सामान्य माणसाची प्रथिनाची गरज भागते. मग हा सामन्य माणूस महाग झालेल्या डाळीकडे वळत नाही.

सामान्य ग्राहक असे विचारतो की जर आम्हाला परदेशातून स्वस्त डाळ मिळत असेल तर आम्ही ती का घ्यायची नाही? याचेही उत्तर शेतकरी चळवळीने शास्त्रशुद्ध पद्धतीने दिले आहे. ‘जर का भारतातील सामान्य ग्राहकाला ऑस्ट्रेलियातील डाळ त्याच्या दारात भारतातील डाळीपेक्षा स्वस्त मिळत असेल तर त्या ग्राहकाचा स्वस्त परदेशी डाळ खरेदी करण्याचा हक्क आम्ही मान्य करतो. आमच्या शेतकरी बांधवांना आम्ही सांगू की तूम्ही डाळीचे पीक घेवू नका. कारण बाजारपेठीय व्यवस्थेत ग्राहक हा राजा आहे हे तत्त्व शेतकरी चळवळीला मान्य आहे. पण जर का शासन परदेशी डाळ जास्त किमतीत आणून इथल्या बाजारपेठेत स्वस्तात ओतण्याचा आततायी धंदा करणार असेल तर मात्र आम्ही त्याला विरोध केल्या शिवाय राहणार नाही.’

आज जी डाळ आयात केली जाणार आहे तिचा भाव काय? ती किती भावाने आणणार आणि भारतातल्या बाजारपेठेत ती किती भावाने विकणार? म्हणजे हा सगळा खटाटोप सामान्य ग्राहकाचे नाव पुढे करून शेतमालाची बाजारपेठ उद्धस्त करून टाकण्याची आहे बाकी काही नाही. समजा जर डाळींचे भाव चढले. त्यात शासनाने काहीही हस्तक्षेप केला नाही. तर जास्तीत जास्त शेतकरी या वाढलेल्या भावाने आकर्षित होतील. पुढच्या मोसमात डाळींचे उत्पादन वाढलेले असेल. परिणामी डाळींचे भाव बाजारपेठेत घसरतील. यासाठी वेगळं काहीच करण्याची गरज नाही. 

पण शेतमालाच्या बाजारपेठेत हस्तक्षेप करून ही बाजारपेठ मोडून काढण्याचा जूना खेळ सोडायला अजूनही सरकार नावाची यंत्रणा तयार नाही. बरं हे नेमकं शेतमालासाठीच का होते? औषधं ही जीवनावश्यक गोष्ट आहे. मग काही मोजक्या जीवनावश्यक औषधांची घावूक खरेदी करून ती बाजारपेठेत आणण्याची योजना शासन का आखत नाही? 

पोटाच्या भुकेनंतर वस्त्राची गरज असते. मग सामान्य माणसांना स्वस्त कापड मिळावं म्हणून कापडगिरण्यांवर शासन नियंत्रण का आणत नाही? उलट हेच शासन या कापडगिरण्यांना शेतकर्‍यांच्या शेतातला कापूस स्वस्त भेटावा म्हणून त्यावर निर्यातबंदी मात्र लादते. कापसाचे भाव पाडले जातात. परिणामी कापडगिरण्यांना कापूस स्वस्त मिळतो. पण हा स्वस्त कापूस वापरून तयार केलेले कापड स्वस्त आहे का महाग हे मात्र बघण्याची तोशीश सरकार स्वत:ला लावून घेत नाही. 

कांद्याचे भाव चढले की लगेच ओरड चालू होते. खरं तर पावसाळ्यात कांदा फार कमी खाल्ला जातो. चातुर्मासात कांद्याचा वापर टाळला जातो. जैन समाज तर कांदा वर्षभर खात नाही. आणि कांदा जिवनावश्यक वस्तूही नाही. हेच साखरे बाबत. साखरेचे भाव उतरले की लगेच शेतकर्‍यांच्या विरोधात सगळे सांगतात, ‘हे मुर्ख शेतकरी भावासाठी आंदोलन करत आहेत. यांना कळत नाही की साखरेचे भाव भारतातच नाही तर जगता उतरले आहेत.’ मग या अर्थशास्त्रज्ञांना हे विचारले पाहिजे की जर साखरेचे भाव कोसळले की लगेच उसाचे भाव कोसळतात तसे भाव चढले की मग शेतकर्‍यांना चढे भाव का नाही दिले जात? 

आज डाळींचे भाव चढले की सगळ्यांच्या डोळ्यात येते आहे. पण जेंव्हा भाव कोसळतात तेेंव्हा कोणी विचारायला येत नाही. डाळींचे पीक तसे किचकट आहे. शेतात पिकली की लगेच डाळ बाजारात आणता येत नाही. तिच्यावर प्रक्रिया करावी लागते. डाळी भरडणे, त्यांना पॉलिश करणे, त्यांचे पॅकिंग करणे आणि मग एक उत्पादन म्हणून तीला बाजारात आणणे. या सगळ्यात शेतकरी एक हिस्सा आहे केवळ. डाळीवर प्रक्रिया करणारे किती उद्योग शेतकर्‍यांनी स्वत: चालविले आहेत? मग ही भावाची ओरड करून कोणाचा फायदा करून दिला जात आहे? मूळात सध्या जो शेतकरी जीवतोडून पेरणीच्या लगीनघाईत गुंतला आहे त्याच्या घरात डाळीचा कण तरी आहे का विकायला? असं म्हणतात की पेरणीच्या काळात शेतकर्‍याच्या बायकोच्या गळ्यात सोन्याचा पिवळा मणीही उरत नाही मग डाळीचा पिवळा दाणा विक्रीसाठी त्याच्या घरात उरणार कसा? 

शेतकरी चळवळीने सातत्याने मागणी केली आहे की शेतीमालाच्या बाजारपेठेत हस्तक्षेप करण्याचे सोडा. ही बाजारपेठ योग्य त्या किंमतीवर स्थिर होवू शकते. साधी मोबाईलची बाजारपेठ स्वस्तात येवून स्थिरावते मग जीवनावश्यक असणार्‍या अन्नधान्याच्या बाजारपेठेची काय कथा. पण दिसते असे आहे की ही बाजारपेठ स्थिर होवू न देण्यातच काही जणांचे हित गुंतले आहे. मग असे असेल तर शेतकर्‍यांसाठी ‘अच्छे दिन’ येणार कधी?             

 श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Sunday, June 14, 2015

काव्यप्रेमी पुल आणि सुनिताबाई देशपांडे

 उरूस, दै. पुण्य नगरी 14 जून 2015 

नवरा बायकोला लक्ष्मी नारायणाचा जोडा असे आपल्याकडे संबोधले जाते. इंग्रजीमध्ये ‘मेड फॉर इच अदर’ असेही म्हणतात. काही नवरा बायको एकमेकात इतके गुंतून गेले असतात की एकमेकांशिवाय त्यांच्या अस्तित्वाची कल्पनाही करता येत नाही.  सुप्रसिद्ध मराठी लेखक पु.ल.देशपांडे त्यांच्या पत्नी सुनीता देशपांडे हे असेच जोडपे. त्यांचे एकमेकांशी 100 % पटत होते का? तर तसे मुळीच नाही. सुनीताबाईंनी ‘आहे मनोहर तरी’ या आपल्या पुस्तकात अतिशय विस्तृतपणे त्यांच्या सहजीवनाबद्दल तटस्थपणे लिहीले आहे. त्यात मतभेदाचे, मनभेदाचे अनेक मुद्दे आहेत प्रसंग आहेत. पण या सगळ्या लिखाणातून समोर जे काही येते ते त्या दोघांचे एकमेकांच्या सहवासात फुलून आलेले आयुष्य. पु.ल.नी कधीच सुनीबाईंबद्दल फार काही लिहीलं नाही. पु.ल.गप्पच राहिले. या गप्पपणातूनच त्यांनी खुप काही सांगितले आहे. पु.ल. म्हणायचे, ‘आमच्या घरात मी एकटाच देशपांडे, ही उपदेशपांडे आहे.’

हे आठवायचे कारण म्हणजे 12 जून हा पु.ल.देशपांडे यांचा स्मृती दिन. या दिवसाची कहाणी मोठी विलक्षण आहे. पु.ल. अतिशय गंभीर आजारी पडले. आजार त्यांना आयुष्याच्या अगदी अंतिम टप्प्यात घेवून गेला. आता ते जाणार हे निश्चित झाले. त्यांचा भाच्चा दिनेश ठाकूर जो की त्यांचा अत्यंत लाडका होता, ज्याला त्यांनी मुलगाच मानले त्याला अमेरिकेतून बोलावणे पाठवले. तो येईपर्यंत पु.ल. यांना कृत्रिमरित्या जिवंत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. हे सगळं चालू असताना सुनीताबाईंच्या लक्षात आले की आपल्या लग्नाचा वाढदिवस 12 जून जवळ येत आहे. त्यांनी हाच दिवस निश्चित केला. तोपर्यंंत दिनेश भारतात परतला. बरोब्बर 12 तारखेला पु.लंना दिलेला कृत्रिम आधार काढून घेतला आणि पु.ल. यांना आपल्या लग्नाच्या 54 व्या वाढदिवशी सुनीताबाईंनी निरोप दिला. ही कहाणी मोठी विलक्षण आहे. 

ज्यांना वाटायचं की आहे मनोहर तरी मध्ये सुनीताबाईंनी ज्या नवर्‍याच्या इतक्या तक्रारी किंवा आपसातले मतभेद वाचकांसमोर मांडले त्या आपल्या नवर्‍यावर खरेच किती प्रेम करतात? पण सुनीताबाईंनी आपल्या आचरणातून दाखवून दिले की त्या पु.ल.मध्ये किती गुंतून गेल्या होत्या. पुढे त्याही फारश्या जगल्या नाहीत.

कविता हा पु.ल. आणि सुनीताबाईंमधला समान दुवा. बा.भ. बोरकर, आरती प्रभू, मर्ढेकर हे दोघांचेही आवडते कवी. यांच्या कवितांचे कार्यक्रम ते मिळून सादर करायचे.
30 नोव्हेंबर 1987 ला पु.ल.व सुनीताबाई यांनी औरंगाबादला बोरकरांच्या कवितांचा कार्यक्रम ‘आनंदयात्री’ सादर केला होता. स.भु. संस्थेच्या जालान सभागृहातील या कार्यक्रमास औरंगाबादकर रसिकांनी  तुडूंब गर्दी केली होती. आमच्या सारख्या शाळकरी विद्यार्थ्यांना तिथे बसायला जागाच उरली नव्हती. शिवाय आमच्या खिशातही तिकीटासाठी पैसे नव्हते. मग आम्ही खिडकीच्या गजाला लटकून उभा राहण्याचा फुकटचा अफलातून पर्याय निवडला. आनंदयात्री हे नाव खरे तर पाडगांवकरांच्या कवितेचे आहे. 

आनंदयात्री मी आनंदयात्री
अखंड नुतन मला ही धरीत्री
प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री

अशा त्या ओळी आहेत.

हे वर्णन बोरकरांना चपखल लागू पडते असे वाटून पुल व सुनीताबाईंनी हे नाव बोरकरांच्या कवितेच्या कार्यक्रमासाठी निवडले. या कार्यक्रमाचे नेपथ्य अगदी साधे पण प्रभावी होते. मागे काळा पडदा लावलेला. पांढर्‍या शुभ्र चादरींची बैठक मंचावर केलेली. त्यावर साध्या पांढर्‍या गुरूशर्ट झब्ब्यात पु.ल. व  फिक्क्या निळ्या जांभळ्या फुलांच्या पांढर्‍या सुती साडीत सुनीताबाई बसलेल्या. पु.ल.समोर हार्मोनियम. काही कविता पु.ल. गाऊन म्हणत आहेत. बोरकरांच्या आठवणी सांगत श्रोत्यांना हसवत आहेत, स्वत: हसत आहेत.

समुद्र बिलोरी आयना
सृष्टीला सातवा महिना

ही बोरकरांची कविता पु.लनी झोकात साजरी केली. ‘निळ्या जळावर कमान काळी’ या कवितेत दुधावर आली शेते या शब्दाचा अर्थ समजावून सांगताना भाताचा शेताचा संदर्भ ते सहज देत होते. पु.ल.च्या विरूद्ध सादरीकरण सुनीताबाईंचे होते. त्या साध्या संथ स्वरात हळूवारपणे बोरकरांच्या कविता म्हणत आहेत. श्रोत्यांच्या हळू हळू लक्षात येत गेले की आपण सर्वात जास्त दाद पुलंना देत आहोत. पण सुनीताबाई जेंव्हा कविता वाचतात तेंव्हा आपण कशात तरी हरखून जातो. अगदी दाद देण्याचेही आपल्या लक्षात रहात नाहीत. कारण सुनीताबाईंनी बोरकरांची संपुर्ण कविता आपल्यात जिरवून घेतली आहे.

एखाद्या साध्या स्वरात आवाजात किती ताकद असू शकते, प्रभाव असू शकतो हे मला तरी त्या दिवशी पहिल्यांदाच जाणवले. पुलंपेक्षा सुनीताबाईंच्या या वाचनाने प्रभावी होवून पुढे कायमस्वरूपी बोरकरांच्या कवितांचे गारूड माझ्या मनावर पडून राहिले.

मर्ढेकरांची कविता 

अभ्रांच्या गे कुंद अफूने 
पानांना ये हिरवी गुंगी
वैशाखाच्या फांदीवरती
आषाढाची गाजारपुंगी

ही वाचत असताना सुनीताबाई थबकल्या. त्यांनी ती पुलंना म्हणून दाखवली. मग पुलंही त्यात अडकून गेले. बोलता बोलता कित्येक तास हे दोघे नवरा बायको मर्ढेकरांच्या कवितांमध्ये गुंतून पडले. एकमेकांना कविता चढाओढीने वाचून दाखवत राहिले. त्यांना असे वाटले की आपल्याला इतका आनंद एकमेकांना वाचून दाखवताना मिळतो आहे तर आपण तो मराठी रसिकांना का नाही द्यायचा? म्हणून त्यांनी मर्ढेकर, बोरकर, आरती प्रभूंच्या कवितांचे कार्यक्रम करण्यास सुरवात केली.

आरती प्रभूंच्या कवितेचे एक उदाहरण पुल व सुनीताबाई आपल्या कार्यक्रमात द्यायचे

तेंव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा
घरदार टाकूनी मी जाईन दूर गावा

पाण्यात ओंजळीच्या यावा चुकून मीन
चमकून हो तसाच गाण्यात अर्थ जावा

तारांवरी पडावा केंव्हा चुकून हात
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा

सुनीताबाई या कवितेवर बोलताना सांगायच्या, ‘अचानक काहीतरी हाती लागते, ज्यासाठी कितीही मेहनत केली तरी मिळेल याची शाश्वती नसते. कलेचे तर असेच आसते. मग अशावेळी आपली भावना काय होते? सर्वस्व सोडून निघून जाण्याचीच होते. कारण हे कलासक्त मन भौतिक वस्तूंमध्ये अडकलेलेच नसते. ते दूर कुठेतरी काही तरी शोधत असते.’
पुल स्वत: अतिशय प्रतिभावंत लेखक होते. त्यांची कथाकथनाचे, एकपात्री असे कित्येक प्रयोग त्यांनी केले. नाटकात सिनेमात कामं केली, गाण्या बजावण्यात बुडून गेले पण आपल्याला आवडलेल्या इतरांच्या कवितांसाठी त्यांनी जीव पाखडला.

सुनीताबाई याही प्रतिभावंत लेखिका. ‘सोयरे सकळ’ सारखे त्यांचे व्यक्तिचित्रंाचे पुस्तक मोठे विलक्षण आहे. पं. मल्लीकार्जून  मंसूर किंवा पं. कुमार गंधर्व यांच्या सारख्या अलौकिक प्रतिभेच्या गायकांवर त्यांनी अतिशय सुंदर लिखाण केले आहे. मण्यांची माळ मधील ललित लेखन वाचकांना असेच खिळवून ठेवते. त्यांनीही आपले साहित्य बाजूला ठेवून बोरकर, आरती प्रभू, मर्ढेकर यांच्या कवितांवर जिवापाड प्रेम केले. त्यांच्या कवितांचा आनंद स्वत:ला मिळाला तसा इतरांना मिळावा म्हणून त्याचे कार्यक्रम महाराष्ट्रभर केले.

या कार्यक्रमांमधून जमा झालेले पैसे किंवा इतरही कार्यक्रमांचे पैसे, पुस्तकांचे मानधन या सगळ्यांतून या जोडप्याने अक्षरश: लाखो रूपये विविध साहित्यीक संस्थांना दान केले. विविध सामाजिक संस्थांना देणग्या दिल्या.

पुल यांच्या पंच्चाहत्तरी निमित्त एक स्मरणिका प्रकाशित झाली होती. तिच्या मलपृष्ठावर इंद्रजीत भालेराव यांची पुलंवरची एक कविता छापलेली आहे

शब्द मिठी मारलेले
तुम्ही ओठ सोडविले
एक अभयआरण्य
त्यांच्यासाठी घडविले

तुम्ही म्हणाला वाहवा
तुम्ही वाजविली टाळी
तेच भाग्य मिरविते 
आज कविता कपाळी

मराठी कवितेच्या घट्ट मिठी मारलेल्या शब्दांचे अर्थ उलगडून दाखविणारे हे विलक्षण प्रतिभावंत जोडपे. 12 जून हा त्यांच्या लग्नाचा वाढदिवस. त्या निमित्त पुल आणि सुनीताबाईंचे हे स्मरण. 
           
 श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Sunday, June 7, 2015

नर्गीस-सुनील दत्त : धर्मापलिकडचे शुद्ध प्रेम फक्त


उरूस, पुण्य नगरी,  7 जून 2015 

तीचा जन्म 1 जून 1929 चा. त्याचा जन्म तिच्या बरोबर पाच दिवसानंतरचा 6 जून 1929 चा. तिचे मूळ गाव रावळपिंडी, पश्चिम पंजाब (आताचा पाकिस्तान) त्याचेही मूळ गाव झेलम पश्चिम पंजाब. तिचे वडिल पंजाबी. तोही पंजाबी. तिचे चित्रपट गाजले ते परत त्याच परिसरातील असलेल्या नटासोबत. ती राज्यसभेवर खासदार होती. तिचा नवराही खासदार होता. केंद्रात मंत्री होता. तिची मुलगीही खासदार होती. तीचे खरे नाव फातिमा राशिद.  इतकं सांगितलं तर वाचकांना फारसा उलगडा होणार नाही. पण नर्गीस इतके शब्द उच्चारले की बाकी काही सांगायची गरजच उरत नाही. 

अभिनेत्री नर्गिसचा जन्म कोलकत्त्याचा. तिचे कुटूंब मूळचे पाकिस्तानात गेलेल्या पंजाब प्रांतातले. तिने लग्न केले सुनील दत्तशी. त्याचेही गाव त्याच परिसरातले. फाळणी नंतर सुनील दत्तचे कुटूंब भारतात आले. त्यांना आश्रय दिला तो त्यांच्या वडिलांचे मुस्लीम मित्र याकुब यांनी. हरियानातल्या एका छोट्या गावात ते राहिले. पुढे लखनौला स्थलांतरीत झाले. 

इकडे आपण हिंदू मुस्लीम एकतेच्या गप्पा मारत राहतो. पण कित्येक कलाकार आपल्याकडे असे आहेत की त्यांनी त्यांच्या आयुष्याची किंमत यासाठी मोजली आहे. आपले आयुष्यच या सगळ्याचे उदाहरण म्हणून समोर ठेवले आहे. भारतात कलेला पोषक वातावरण आहे हे हिंदू इतकेच मुस्लीम कलाकारांनाही माहित होते. बडे गुलाम अली असो की साहिर लुधियानवी असो असे कित्येक कलाकार इथेच राहिले. आणि त्यांनी आयुष्यभर भारतातील कला रसिकांच्या पोटी आपली कृतज्ञता व्यक्त केली. 

नर्गीसने 1935 पासूनच चित्रपटात काम करायला सुरवात केली. पण तिचा खरा बोलबाला झाला तो राज कपुर सोबतच. राज कपुर परत त्याच पंजाब प्रांतातला. फाळणीचे चटके त्याच्याही कुटूंबाला भोगावे लागले. पाकिस्तानात गेलेल्या पंजाबच्या मातीतच काहीतरी कलेचे गुण असावेत.

नर्गीसचे चित्रपट गाजले ते राज कपुर सोबत. ‘आह’ मध्ये लताचा कोवळा सुर नर्गीसला मिळाला आणि ‘आजा रे अब मेरा दिल पुकारा’ हे आर्त अवीट गोडीचं गाणं रसिकांच्या कानावर पडलं. तिथेच लता-नर्गीस-शंकर/जयकिशन-राजकपुर हे समिकरण जूऴून आलं. नंतर राज कपुरच्या चित्रपटात इतरही नायिका आल्या. नर्गीसनेही इतर ठिकाणी काम केलं. पण जी प्रतिमा राज-नर्गीस या जोडीची तयार झाली ती कधीच पुसली गेली नाही. आर के बॅनरचे बोधचिन्ह मोठे सुचक आहे. एका हातात व्हायोलिन व एका हातावर नायिका घेवून उभा असलेला नायक. यात नायक अर्थातच राज कपुर तर नायिका नर्गीस आहे हे वेगळं सांगायची गरजच नाही. 

'आह' मधील ‘जाने न जिगर पहचाने नजर’ किंवा ‘आवारा’ मधील ‘मै तूमसे प्यार कर लूंगी’ किंवा ‘श्री 420’ मधील ‘प्यार हुआ इकरार हुआ’ किंवा ‘चोरी चोरी’ मधील ‘ये रात भिगी भिगी’ अशी कितीतरी सुंदर गाणी राजकपुर-नर्गीस यांच्यावर चित्रीत झालेली आहे. भारतीय चित्रपटात प्रेम करणार्‍या जोडप्याचे प्रतिक म्हणून राज-नर्गीस यांचेच नाव घ्यावे लागते. देखण्या देव आनंद आणि स्वरूप सुंदरी मधुबालाचे चाहते खुप आहेत. पण त्यांचे एकत्र चित्रपट मात्र लोकांना तेवढे भावले नाहीत. 

नर्गीसला सुरैय्या किंवा नुरजहां सारखा गोड गळा नव्हता. वैजयंती माला किंवा वहिदा रहमान सारखी नृत्यनिपुणता नव्हती. मधुबाला सारखे सौंदर्य नव्हते. पण गीता बाली, नुतन यांच्यासारखी एक सहजता तिच्यात होती. खाली गुडघ्यापर्यंत येणारी काळी पँट, वरती पांढरा अर्ध्या बाह्यांचा शर्ट, छोट्या केसांच्या दोन सुंदर वेण्या, त्याला लावलेल्या रिबीनी आणि समोरच्या तरूण देखण्या राजकपुरला ‘मै तूमसे प्यार करू लूंगी’ असं म्हणणारी नर्गीस. 1952 मध्ये एखादी नायिका नायकाला सरळ सरळ प्रेमाची कबूली देते आहे. हे अतिशय वेगळं होतं. तिचा वेशही वेगळा होता. तिचे आविर्भावही वेगळे होते.
स्वातंत्र्यानंतर सारंच बदललं होतं. 1950 नंतर जगाचे संदर्भ बदलले. जगभरातील अर्ध्याहून अधिक देश नेमके याच काळात स्वतंत्र झाले. मोकळेपणाचे वारे सगळीकडे वाहू लागले. मग स्वाभाविकच नायक आणि नायिकाही आपल्या प्रेमाची उघड उघड कबूली द्यायला लागले. आपले प्रेम जाहिर व्यक्त करू लागले. याच काळात वैजयंतीमालाचे गाणे ‘सैय्या दिल मे आना रे’ बघणार्‍या एैकणार्‍या प्रेक्षकांना राज-नर्गीस जोडीच्या गाण्यांमधून वेगळं आपल्या जवळचं असे काही  मिळत होतं. ‘सैय्या दिल मे आना रे’ हे शमशादचे गाणे. राज कपुरच्या पहिल्या चित्रपटात ‘आग’मध्ये नर्गीस साठी शमशादचाच आवाज वापरला होता. पण नर्गीस, मधुबाला, वैजयंतीमाला, गीताबाली, वहिदा रहमान यांच्यासाठी शमशादचा आवाज शोभत नव्हता. आता लता, गीता, आशा यांचे सुर त्यांच्या तोंडी असलेले लोकांना जास्त भावत होते.
नर्गीसने पडद्यावर राजकपुर सोबत भूमिका निभावल्या पण पडद्यामागे सुनील दत्त सोबत संसार रंगवला. 1958 ते मृत्यूपर्यंत सुनील दत्त सोबत एकनिष्ठ राहून तिनं पत्नीची भूमिका निभावली. पण पडद्यावर मात्र या दोघांची जोडी जमली नाही.
सुनील दत्तचे चित्रपट नर्गीसची कारकीर्द संपल्यावरच्या  काळात जास्त गाजत गेले. विशेषत: बी. आर. चोप्रा सोबत ‘गुमराह’, ‘वक्त’, ‘हमराज’ हे चित्रपट जास्त लोकप्रिय झाले. साहिर सारखा गीतकार, रवी सारखा संगीतकार असल्याने महेंद्रकपुरचा पडेल निर्जीव आवाजही लोकांनी सहन केला. इतकेच नाही तर या गाण्यांना लोकप्रियता लाभली. ‘चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो’,  ‘इन हवाओ मे इन फिजाओ मे’ (गुमराह), किंवा वक्त मधील गद्य कविता वाटावी असे गाणे ‘मैने देखा है फुलो की वादी मे’ किंवा हमराज मधील ‘तुम अगर साथ देने का वादा करो’ हे गाणे. ही सगळी सुनील दत्तची गाणी लोकांना आजही आठवतात.
मदर इंडिया मध्ये नर्गीसने सुनील दत्तच्या आईची भूमिका केली होती. त्यासाठी तिला अभिनयाचे राष्ट्रीय पारितोषिकही मिळाले. मदर इंडियाची गाणीही विलक्षण गाजली. पण या दोन कलाकारांची पडद्यावरची कारकीर्द रेल्वेच्या रूळांसारखी स्वतंत्रपणे समांतरपणे चालत राहिली. आणि उलट संसारिक आयुष्यात मात्र ते एकरूप होवून गेले होते.
सुनील दत्तने एक वेगळाच चित्रपट रसिकांना दिला. एकपात्री प्रयोग नाटकात केलेला आपणांस माहित असेल. पण एकपात्री सिनेमा असू शकतो का? सुनील दत्तचा ‘यादे’ नावाचा असा चित्रपट आहे. त्यात त्याने एकपात्री भूमिका केली आहे. अजूनही असे धाडस कोणी केले नाही.
सुनील दत्त यांचा 1961 मध्ये ‘छाया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. सलिल चौधरी यांनी यात एक सुंदर गाणे दिले आहे. ‘इतना ना मुझसे तू प्यार बढा के मै एक बादल आवारा’. तलत महमुद/लता  यांच्या आवाजतील या गाण्याचे शब्द आहेत राजेंद्रकृष्ण यांचे. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे जगप्रसिद्ध संगीतकार मोझार्टच्या 40 नंच्या सिंफनीचे संगीत या गाण्याच्या सुरवातीला वापरले आहे. भारतीय वा पाश्चिमात्य संगीताचा असा सुंदर संगम फार कमी ठिकाणी ऐकायला मिळतो. हे गाणे सुनील दत्त व आशा पारेख यांच्यावर चित्रित आहे.  
नर्गीस-सुनील दत्त यांच्या आयुष्यातील एक शोकांतिका मोठी विलक्षण आहे. नर्गीस-सुनील दत्त यांचा मुलगा संजय दत्त. त्याचा पहिला चित्रपट रॉकी 1981 मध्ये प्रदर्शित झाला. त्याचा प्रिमिअर 7 मे रोजी होता. नर्गीस कॅन्सरन आजारी होती. 2 मेला ती कोमात गेली. आणि 3 मे 1981 ला तिचे निधन झाले. मुलाच्या पहिल्या चित्रपटाचा प्रिमिअर तिला पाहता आलाच नाही. या प्रिमिअर साठी सुनील दत्तच्या बाजूची एक सीट नर्गीस साठी रिकामी ठेवण्यात आली.
सुनील दत्त यांनी राजकीय क्षेत्रात पदार्पण केले. कॉंग्रेसच्या वतीने ते मुंबई मधून खासदार म्हणून निवडून आले. मनमोहनसिंग यांच्या पहिल्या मंत्रीमंडळात ते मंत्रीही राहिले. पुढे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची मुलगी प्रिया दत्त ही पण खासदार म्हणून निवडून आली होती.
‘प्यार हुआ एकरार हुआ’ या गाण्यात शैलेंद्रने याने असे लिहीले आहे

रातो दशोदिशाओसे कहेगी अपनी कहानिया
गीत हमारे प्यार की दोहरायेगी जवानीया
हम ना रहेंगे तूम ना रहेंगे फिर भी रहेंगी निशानिया...

हे गाणे चित्रित करतान राज कपुर-नर्गीस हे पावसात भिजत आहेत. आणि रस्त्यावरून तीन लहान मुले एकमेकांचा हात धरून जात आहेत. लहानपणीचे शशी कपूर, रणधीर कपूर आणि ऋषी कपुर अशी ही लहान मुले आहेत.
पण याचा ढोबळ अर्थ आपले वारस असा नाही. रहेंगी अपनी निशानिया म्हणजे या कलाकारांनी मागे ठेवलेल्या कलाकृती. नर्गीस-सुनील दत्त यांनी आपल्या मागे कितीतरी सुंदर गाणी, चित्रपट ठेवून दिले आहेत. शिवाय दोघांनी धर्मापलिकडे जाणारी प्रेमाची एक सुंदर निखळ गोष्ट आपल्यासाठी मागे ठेवून दिली आहे हे विशेष. नर्गीस आणि सुनील दत्त या दोघांच्याही जयंती निमित्त त्यांची ही आठवण.  
           
 श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575