Monday, July 29, 2013

आम्ही जाणारच की कवातरी पट्दिशी....

दैनिक कृषीवल च्या उरूस सदरातील माझा शेवटचा लेख. १४ मार्च २०१२ पासून ते २७ जुलै २०१३ पर्यंत मी हे सदर लिहिले. कृषीवल चे संपादक संजय अवटे, त्यांचे सर्व सहकारी आणि या लिखाणाला प्रतिसाद देणारे सर्व वाचक या सर्वांचे मनपुर्वक आभार! हे सदर याच नावाने दैनिक "पुण्य नगरी" मध्ये ४ ऑगस्ट पासून चालू होते आहे.

आम्ही जाणारच की कवातरी पट्दिशी....


वसंत बापटांची मोठी सुंदर कविता आहे
तूमी जीव लावला मैत्र आपुलं जूनं
तूमी माफ केल्याती शंभर आमूचं गुन्हं
ही मैफल तूमची अखंड चालो अशी
आम्ही जाणारच की कवातरी पट्दिशी....
एखाद्या मैफिलीचा शेवट करताना मी आवर्जून ही कविता सांगायचो. समोरच्या श्रोत्यांकडे पाहून ‘ही मैफल तुमची अखंड चालो अशी...’ असं म्हणायचं.  मंचावर बसलेले सर्व कवी किंवा गायक वादक त्यांच्याकडे बोट दाखवून ‘आम्ही जाणारच कवातरी पट्दिशी’ असं म्हणायचं. फार जणांना ही कविता आवडते.
मग ग.दि.माडगुळकरांची एक कविता सापडली. म्हणजे चारच ओळी माहित झाल्या. मैफल संपल्यानंतरचे वातावरण त्यात सुचित केले होते.
कोन्यात झोपली सतार सरला रंग
पसरली पैंजणे सैल टाकूनी अंग
गालिच्या दुमडला तक्के झुकले खाली
तबकात राहिल्या देठ लवंगा साली.
या ओळींना तर श्रोत्यांची दाद हमखास ठरलेली असायची. मला या ओळी एखाद्या कवितेच्या शेवटच्या ओळी आहेत असं वाटायचं. नंतर कळालं की ग.दि.माडगुळकरांच्या ‘जोगिया’ या सुंदर कवितेच्या या सुरवातीच्या ओळी आहेत.
कुठल्याही गाण्याच्या कार्यक्रमात गायक वादकांना शेवटची भैरवी म्हणायचा आग्रह मी करायचो. सुप्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अमजद अली खान औरंगाबादला जवाहरलाला नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयात 20 वर्षांपूर्वी कार्यक्रमासाठी  आलेले होते. त्यांनी त्यांचे वादन अतिशय सुंदररित्या सादर करून कार्यक्रम संपवत असल्याची घोषणा केली. त्यांची सुंदर भटियाली धून मी कॅसेटवर ऐकली होती. ती ऐकायची इच्छा होती. वाद्य संगीतात भैरवीच्या सुरावटीच्या धुनने समारोप केला जातो. बर्‍याचजणांना कार्यक्रम संपवू नये असे मनोमन वाटत होते. पण इतक्या मोठ्या कलाकाराला कोण सांगणार? मी मोठ्या धैर्याने उठून उभा राहिलो आणि त्यांना भटियाली धून वाजविण्याची विनंती केली. आश्चर्य म्हणजे अमजद अलींनी ती मान्यही केली. आणि 45 मिनीटे अप्रतिम अशी भटियाली धून वाजवली. त्या निरोपाच्या सुरावटीत श्रोते अक्षरश: नाचत होते.
भैरवीचा महिमाच मोठा विलक्षण. माझा अधिक्षक अभियंता मित्र शशांक जेवळीकर शास्त्रीय संगीताचा मोठा दिवाना. नुसताच दिवाना नाही तर त्याचा त्या विषयावरचा अभ्यास अतिशय चांगला व नेमका. त्याचा वाढदिवस होता त्या दिवशी मी त्याच्या घरी जावून रात्री उशीरा गप्पा मारत  बसलो होतो. किराणा घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका गंगुबाई हनगल यांचा अप्रतिम बागेश्री त्यानं ऐकलवला. गंगुबाईंचा आवाज अप्रतिम लागलेला. कुठल्याही सप्तकात स्थिर लागलेले स्वर. त्यांच्या गाण्यानंतर काय ऐकावं तेच कळेना. किशोरी अमोणकरांची भैरवी त्यानं ऐकवली. त्या भैरवीच्या सुरावटीतच आधीच्या गाण्यातून आम्हाला बाहेर काढण्याची ताकद होती. 
अशा भैरवीच्या कितीतरी सुंदर आठवणी आहेत. ‘उरूस’ या सदराची आज भैरवी सादर करताना माझ्याही मनात आर्त सुर दाटून आले आहेत. मे महिन्यात माझे जवळचे स्नेही असलेल्या दिवाकर कुलकर्णींच्या मुलीचे लग्न होते. त्या लग्नात मला अलिबागचे डॉ. कुमठेकर भेटले. ‘उरूस’ सदरातील माझ्या लेखनाची आठवण करून देऊन, ते सदर लिहीणार्‍याशी माझी प्रत्यक्ष भेट झाली याचा किती आनंद वाटतो आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांची पत्नी जया ही मला लहानपणापासून ओळखते. अनोळखी अशा वाचकांनीही खुप चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 
माझे हे लिखाण मी सातत्याने माझ्या ब्लॉगवर देत आलो. त्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद लाभला. माझ्या ब्लॉगला भेट देणार्‍या वाचकांची संख्या 7000 चा टप्पा पार करून गेली. त्यात मोठा वाटा ‘उरूस’ सदरातील लेखांचा आहे. सहित्य-संस्कृती-कला या क्षेत्रातील घडामोडींवर लिखाण करावं अशी अपेक्षा संपादक संजय आवटे यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार विविध विषयांवरील लेख या सदरात मी लिहीले. बर्‍याचदा ‘सदर’ लिखाण हे मोठी अडचण किंवा अवघड जबाबदारी वाटते असं मत माझ्या काही लेखक मित्रांनी व्यक्त केलं आहे. काही मित्रांनी यामूळे  चालू असलेली सदरं बंदही केली आहेत. किंवा काही जणांची सदरं रखडत चालली. माझ्याबाबत मात्र हे घडलं नाही. या लिखाणातून मला खुप आनंद  मिळाला. मला कुठलाही त्रास या लिखाणाचा झाला नाही. मनात विषयाची जूळणी तयार असायची. लिहीताना हे सगळं जुळून यायचं. आणि सलग कागदावर उमटायचं.
साहित्य संस्कृती कला यांचं जीवनात काय स्थान आहे? या गोष्टी हव्यातच कशाला? असे प्रश्न व्यवहारिक पातळीवर काहीजणांना पडत असतात. कशाला लिहायचं? कोण वाचणार आहे? काही अडलं आहे का? अशी भावना  बळावताना दिसते. पण याचं अतिशय सुंदर उत्तर ज्ञानेश्वरांनी दिले आहे
जैसे भ्रमर भेदी कोडे । छेदी कठीण काष्ट कोरडे ।
पै कलिकेमाजी सापडे । कोवळीया ॥
अतिशय कठीण लाकूड पोखरणारा भुंगा कोवळ्या कमळाच्या कळीत मात्र अडकून पडतो. त्याला काय ती कळी पोखरून बाहेर पडता येत नाही? पण ती पोखरायीच नसते. कलेचे तसेच आहे. हे जे आपल्या भोवती कोवळं सुंदर जग कला तयार करते त्यात अडकूनच त्याचा आनंद घ्यायचा असतो. असा आनंद मला स्वत:लाही घेता आला आणि मला खात्री आहे माझ्या वाचकांनीही तो घेतला असावा.
जयपूर घराण्याचे महान गायक पंडित मल्लिकार्जून मन्सूर हे बसवेश्वरराचे एक सुंदर भजन गायचे. त्यात गायकाने देवाकडे एक अपेक्षा व्यक्त केली आहे. माझ्या मस्तकाचा भोपळा बनू दे, देहाचा दांडा बनव, शिरांच्या तारा बनवून आपल्या बोटांनी त्या छेडत हे परमेश्वरा तू मला हृदयी जवळ घेवून गा. या ओळींचा अर्थ ज्येष्ठ विचारवंत कार्यकर्ते साहित्यीक विनय हर्डीकर यांनी त्यांच्या लेखात दिला होता. मला कानडी येत नाही. या अर्थावरून मी त्याचा मराठीत भावानुवाद केला
मस्तक भोपळा । शिरा जणू तारा ।
दांडी या शरिरा । बनव गा ॥
बोटांनी छेडित । अशी एकतारी ।
लावुनिया उरी । गा तू देवा ॥
ही झाली एका गायकाने व्यक्त केलेली भावना. एक लेखक काय भावना व्यक्त करेल? मी आज या भैरवीत माझ्या वाचकांप्रती ही भावना व्यक्त करतो आणि तूम्हा सर्वांचा निरोप घेतो.
जगण्याचा आशय
शब्दांत मांडून ठेवला आहे तूमच्या समोर
डोळ्यांतून तो शिरो तूमच्या मेंदूत
   माझ्या शब्दांतील कंपने जुळू देत
   तूमच्या हृदयातील कंपनांशी
आणि उमटू देत झंकारांचा पदन्यास
तरच पूर्ण होईल
माझ्या काळजापासून
तूमच्या काळजापर्यंतचा हा प्रवास

Saturday, July 13, 2013

पंढरीची वारी । ब्राह्मण/जैनही माळकरी ॥

दै. कृषीवल दि. 13 जूलै 2013 मधील लेख


सध्या सगळ्या महाराष्ट्राचे डोळे विठोबाच्या चरणी लागले आहेत. लाखो पाय पंढरपुरच्या वाटेने निघाले आहेत. सातशेहून अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या वारकरी संप्रदायाने अनेक विचारवंतांची मोठी गोची करून ठेवली आहे. महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणत असताना ‘फुले-शाहू-आंबेडकर’यांचा महाराष्ट्र म्हणायची पद्धत आहे. असं म्हणण्यानं त्यातून ब्राह्मण जातीत जन्मलेले पण ब्राह्मण्य नाकारणारे समाजसुधारक आपण जाणिवपूर्वक वगळतो. ही प्रतिक्रिया आपल्या शेकडो वर्षांच्या इतिहासातील सामाजिक घटनांवरची प्रतिक्रिया आहे हे सहज समजून येते. पण सामान्य माणसांच्या पातळीवर काय वस्तूस्थिती आहे हा विचार केल्यास मात्र अगदी वेगळेच चित्र पहायला मिळते. कुणी कितीही विरोध केला, निषेध केला, अतिशय वाईट शब्दांत टिका केली तरी उभ्या महाराष्ट्राने आणि तमाम जाती जमातींनी विठ्ठलाची भक्ती सोडली नाही. ‘ग्यानबा-तुकाराम’ हा नामघोष महाराष्ट्राच्या मुखातून अटला नाही.
खरे आश्चर्य तर हे आहे की ज्या ब्राह्मणी वैदिक धार्माविरूद्ध ही प्रतिक्रिया उमटली होती त्याच ब्राह्मण जातीतही मोठ्या प्रमाणात विठ्ठलाची भक्ति सुरू झाली. बाकीच्या देवांबरोबरच विठ्ठल रूक्मिणीची मुर्तीही ब्राह्मणांच्या देवघरात स्थानापन्न झाली.
वारकरी संप्रदायाची सुरूवात लौकीक अर्थाने ज्ञानेश्वरांपासून झाली असे मानण्यात येते. ज्ञानेश्वरांची गुरू परंपरा ही नाथपंथाची आहे. आदीनाथ-मत्सेंद्रनाथ-गोरक्षनाथ-गहिनीनाथ-निवृत्तीनाथ अशी ही गुरूपरंपरा आहे. या नाथ परंपरेतील बरेच सिद्ध पुरूष हे ब्राह्मण नाहीत. म्हणजे ज्ञानेश्वरांसारख्या ब्राह्मणाने आपल्या जातीपुरता संकुचित विचार न करता व्यापक अशा बहुजनांच्या परंपरेला स्विकारले. नाथपरंपरेचा जो योगमार्ग आहे तो सामान्य लोकांसाठी उपयुक्त नाही हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी भक्तीचा सोपा मार्ग सामान्य लोकांना दाखवला. त्यासाठी ‘ज्ञानेश्वरी’ सारखी त्यांच्या भाषेत ग्रंथरचना करून दिली.
ज्ञानेश्वरांनंतरचे वारकरी संप्रदायातील दुसरे ब्राह्मण संत एकनाथ. एकनाथांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार करून घेतली हे बर्‍याच जणांना माहित नसते. आजूबाजूला पसरलेल्या शेकडो हस्तलिखित पोथ्यांमध्ये पाठभेद होते. चुका होत्या. त्या सगळ्या दुरूस्त करून ज्ञानेश्वरीची प्रमाण प्रत कुठल्याही विज्ञापीठाची फेलोशीप न मिळवता, विद्यापीठातील ‘ज्ञानेश्वर’ अध्यासनाची खुर्ची न मिळवता एकनाथांनी तयार केली. त्यासाठी 10 वर्षे इतका मोठा कालावधी लागला. एकनाथांनी ‘एकनाथी भागवत’ नावाचा जो ग्रंथ सिद्ध केला तो वारकरी संप्रदायात प्रमाण मानला जातो.
वारकरी संप्रदायाने ज्या तीन ग्रंथांना ‘प्रस्थान त्रयी’ म्हणून मानाचे स्थान दिले आहे त्यातील ‘ज्ञानेश्वरी’ आणि ‘एकनाथी भागवत’ हे दोन ग्रंथ ब्राह्मणांनीच लिहीले आहेत. तिसरा ग्रंथ म्हणजे ‘तुकाराम गाथा’.
महाराष्ट्राच्या इतिहासातील मोठी नावे आणि घटना जवळपास सगळ्यांनाच माहित असतात. काशीहून गंगेची कावड घेवून नाथ निघाले. पैठणला आपल्या गावी आले. ही कावड रामेश्वरला नेउन महादेवाच्या पिंडीवर घातली की महान पुण्य लाभते अशी अख्यायिका. त्यांनी ही कावड तहानेने तडफडणार्‍या गाढवाच्या मुखात रिती केली व खुळचट अख्यायिकेचा अंत केला. ही कथा बर्‍याचजणांना माहित आहे.
पण आजच्या काळात एका घराण्याने काशीची यात्रा सोडून पंढरपुरची यात्रा सुरू केली व त्याचा संप्रदायच तयार केला हे मला कळाल्यावर आश्चर्य वाटले. गोपजी पंडित गोसावी हे काशी क्षेत्रातील अत्यंत विद्वान पंडित. यांच्या घराण्यात काशीची यात्रा असायची. औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालूक्यात अनवा या गावी त्यांच्या वंशजांनी ‘विठ्ठल रूक्मिणी संस्थानाची’ स्थापना केली. (श्री विठ्ठल दादामहाराज चातुर्मास्ये हे या संस्थानच्या आद्य महाराजांचे नाव) माघ शु. 10 शके 1655 मध्ये (सध्या शके 1935 चालू आहे) म्हणजे जवळपास 280 वर्षांपूर्वी विठ्ठल रूक्मिणी यांच्या मूर्तीची स्थापना केली. काशीची वारी सोडून दिली. पंढरपुरची वारी सुरू केली. चातुर्मासाचे चार महिने या संस्थानचे महाराज हे पंढरपुरला असतात. त्यामुळे यांना चातुर्मासे महाराज अशीच उपाधी आहे. हे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण घराणे. यांच्याकडे गळ्यात तुळशीची माळ घालणे ही अट आहे. दर महिन्यातील एकादशीला उपवास करण्याचा नेम आहे. अगदी बाळंतिणबाईलाही हा उपवास करावा लागतो. घरात आलेल्या प्रत्येक सुनेला तुळशीची माळ घालूनच घरात घेतले जाते. या संस्थानच्या संप्रदायात ‘तुकाराम गाथे’चे पारायण करण्याची परंपरा आहे. एरव्ही ब्राह्मणांच्या संस्थानात बहुजनांचे ग्रंथ निषिध्द मानले जातात असा समज आहे. हा समज खोटा ठरविणारे हे उदाहरण.
औरंगाबाद जिल्ह्यात आणि जवळपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर इतर बहुजन समाजाबरोबरच देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण समाज या संस्थानचा शिष्य आहे. माझे लेखक मित्र धनंजय चिंचोलीकर (बब्रुवान रूद्रकंठावार) यांच्या गावी चिंचोलीला (ता. कन्नड) मी गेलो असताना त्यांच्या घरात या संस्थानचे नाव असलेलो पांडुरंगाचा फोटो मला दिसला. तो फोटोही वैशिष्ट्यपूर्ण आहे. विठ्ठलाची दसर्‍याच्या दिवशी धनगराच्या वेशात पुजा मांडली जाते. खांद्यावर घोंगडी, हातात काठी, डोक्याला शिंदेशाही पगडी असा खास बहुजनांच्या जिवनाशी निगडीत पोशाख असतो. धनंजयच्या वडिलांना मी या संस्थानाबाबत विचारले. त्यांनी त्यांच्या मोठ्या वहिनींशी माझी गाठ घालून दिली. त्या 90 वर्षांच्या काकूंनी खणखणीत आवाजात संस्थानच्या परंपरांची माहिती दिली. मी त्या गादीवरील महाराजांचीही भेट घेतली. संप्रदायाची माहिती करून घेतली.
या संस्थानचे अनुग्रहित पालोदकर कुटूंबियांनी मोठी वेगळी माहिती दिली. धनंजयच्या मोठ्या बहिणीचे (ऍड. प्रभाकरराव पालोदकर) यमजान हे पालोदचे (ता सिल्लोड, जि. औरंगाबाद)  मोठे जमिनदार. ही सगळी ब्राह्मण घराणी पारंपारिक वैष्णवपंथाची अनुयायी. या संप्रदायात तप्त मुद्रा शरिरावर उमटून दिक्षा घेण्याची परंपरा आहे. या घराण्याला गुरूस्थानी असलेल्या मध्वाचार्यांनी अनव्याच्या महाराजांची गाठ घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. द्वैत विचारांना मानणार्‍या या वैष्णव मध्वाचार्यांनी आपल्या या परिसरातील अनुयायांना सांगितले की तूम्ही सगळे आता यांचे अनुग्रहीत व्हा. तप्त मुद्रा घेउन दिक्षा घेण्याची आता आवश्यकता नाही. हे सांगतात त्याप्रमाणे दीक्षा म्हणून माळ धारण करत जा.
तेंव्हापासून ही सगळी मंडळी इतर बहुजनांप्रमाणे माळ धारण करतात. एकादशीचे उपवास करतात. मला हे सगळे फार महत्त्वाचे वाटले. शंकराचार्यांनी शैव व वैष्णव हे भांडण मिटवले व अद्वैतवादाचा हिरीरीने पुरस्कार केला. हे आपण इतिहासात ऐकलेेले असते. आपल्या कर्मठपणाने सगळ्या समाजाला विभागणार्‍या ब्राह्मणांच्या कथा दंतकथा बनून आपल्या जिभेवर नाचत असतात. पण याच जातीतील मोठावर्ग हा कुठलीही कट्टरता न बाळगता समाजातील मुख्य धारेचा भाग बनतो नव्हे त्यातच सामावून जातो हे लक्षात घेतले जात नाही.  वै.धुंडामहाराज देगलुरकरांसारखी मोठी नावं माहित असतात. पण महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पसरलेली छोटी मोठी संस्थाने आणि त्यांच्यातील वारकरी परंपरा परिवर्तनवाद्यांच्या लक्षात येत नाहीत.
माझी आजी आणि नंतर आई परभणीचे सत्पुरूष रंगनाथ महाराज यांच्याबद्दल सांगायची. माझ्या आजोबांच्या काळातील हे सत्पुरूष. त्यांना आजोबा गुरूस्थानी मानायचे आणि वयाने लहान असूनही त्यांच्या पाया पडायचे. हे रंगनाथ महाराज हे आर्यवैश्य (कोमटी) समाजातील होते. महाराष्ट्रातल्या परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर परिसरात हा समाज फार मोठ्या प्रमाणावर आहे. हे मुळचे जैन धर्मिय. ते परत वैदिक धर्माकडे वळले आणि त्यांनी वारकरी संप्रदायाचा स्विकार केला. वारकरी संप्रदायाची खुण अशी तुळशीची माळ गळ्यात धारण केली. पण मुळच्या गोमटेश्वराला ते विसरले नाहीत.  परिणामी गोमटेश्वर-गोमटी-कोमटी असे नाव या समाजाला पडले. (संदर्भ- मध्ययुगीन धर्मसंकल्पनांचा विकास, डॉ. सुधाकर देशमुख, पद्मगंधा प्रकाशन)   रंगनाथ महाराज हे या समाजातील वारकरी परंपरेतले मोठे नाव. आज खाण्यापिण्याबाबत आणि आपल्या परिसरात दुसर्‍या जातीधर्माच्या लोकांना राहू न देण्याबाबत जैन ओळखले जातात. त्यांच्यातही जूना वैदिक धर्म परत स्विकारण्याची उदारमतवादी परंपरा होती. या समाजातील रंगनाथ महाराजांना गुरू मानण्यात ब्राह्मण जातीतील माझ्या आजोबांना कमीपणा वाटला नाही. याचे साधे कारण म्हणजे आपल्याकडे ज्ञानाची परंपरा ही नेहमीच उदारमतवादी राहिली आहे.
ज्या शेतकरी चळवळीत मी काम करतो, या चळवळीत बहुतांश लोक हे वारकरी संप्रदायाचेच आहेत. गंमत म्हणजे शरद जोशींनी जेंव्हा पढरपुरच्या वारीची ‘भीकमाग्यांची दिंडी’ असे म्हणून संभावना केली ती या लोकांनी शांतपणे ऐकून घेतली. संघटनेच्या सभांना गर्दी केली. शरद जोशींचा जयजयकार केला. ‘शेतकरी संघटनेचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या. पण कार्यकर्त्यांनी आषाढीची वारी काही सोडली नाही. तीन वर्षांपूर्वी मी नगर जिल्ह्यात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग यांचे बरोबर दौर्‍यावर होतो. असेच आषाढीचे दिवस होते. त्या कार्यकर्त्याच्या घरात शरद जोशींचा मोठा फोटो लावलेला. आणि शेजारीच विठ्ठलाचा फोटो त्याला तुळशीची माळ घातलेली. सारे घरदार आषाढीचा उपवास करत होते. मला या विरोधाभासाची गंमत वाटली.
आपली परंपरा मोठी विचित्र आहे. फुले शाहू आंबेडकरचा महाराष्ट्र म्हणताना या महापुरूषांनी देव देवतांबद्दल काही म्हटलं तरी ते आम्ही फारसं मानलं नाही. कितीही टिका केली तरी आमच्यावर तसा फारसा फरक पडला नाही. ब्राह्मणी धर्माविरूद्ध प्रतिक्रिया म्हणून भक्तिमार्गावरील वारकरी पंथ आम्ही स्विकारला इतकंच नाही तर ब्राह्मणांनाही हा स्विकारायला भाग पाडलं. आज सगळ्या टिका टिपण्या करून ‘फुले-शाहू-आंबडकरां’चा महाराष्ट्र थकला पण सर्वसामान्यांच्या पायाला लागलेली पंढरीची ओढ आम्हाला नाही कमी करता आली. हिंदू धर्मावर प्रखर टिका करणार्‍या बाबासाहेबांना सगळा समाज सोडाच पण सर्व दलितही बौद्ध धर्माच्या झेंड्याखाली आणता आले नाहीत. इतकंच काय तर हिंदू धर्मानेच गौतम बुद्धाला नववा अवतार म्हणून आपल्यात सामावून घेतले.
शंकराचार्यांना अतिशय कमी आयुष्य भेटले. जर अजून जास्त आयुष्य भेटले असते आणि थोडे नंतरच्या काळात त्यांचा जन्म झाला असता तर माझी खात्री आहे की महावीर जैन 11 वा अवतार, येशु ख्रिस्त 12 वा अवतार, महंमद पैंगबर 13 वा अवतार असं काहीतरी करून टाकलं असतं.  
अतिशय प्रामाणिकपणे असं वाटतं की आता पूर्णपणे उलटे फिरून या पंढरीच्या वारीकडे आणि वारकरी संप्रदायाकडे डोळसपणे पाहण्याची वेळ स्वत:ला परिवर्तनवादी म्हणून घेणार्‍यांवर आलेली आहे.