Friday, October 21, 2011

शेतात वीज, सरकारला नीज


......................................
२१ ऑक्टोबर २०११ शेतकरी संघटक मधील अग्रलेख
......................................


विजेच्या टंचाईने महाराष्ट्रच नाही तर अख्खा देश हैराण झाला आहे. ही टंचाई खरी असो कृत्रिम असो, नियोजनाची असो, की अजून कशाची असो... टंचाई आहे हे मात्र खरं! वेगवेगळी कारणे, या टंचाईसाठी दिली जातात. आपण ती सारी खरी मानूत. प्रश्र्न असा उभा राहतो, ही टंचाई दूर करण्यासाठी काय करायचं? भरपूर प्रमाणात झालेल्या पावसामुळे, सध्या सर्वत्र शेतात मोठ्या प्रमाणात पीक उभे आहे. ऊर्जेचं हे जे हिरवं रूप मोठ्या प्रमाणात शेतात उभं आहे त्याच्याबद्दल काहीही विचार करण्यास सरकार तयार नाही.

महाराष्ट्रापुरतं बोलायचं झाल्यास. उसाचे उत्पादन प्रचंड प्रमाणात होण्याची शक्यता आहे. आतापासूनच या उसाच्या भावाचा प्रश्र्न गंभीर बनत चालला आहे. शेतकर्‍यांनी केलेली मागणी पुरवणं कदापीही शक्य नाही. हे कारखानदारांना पक्कं माहीत आहे. खरं तर उसापासून साखर न काढता, इथेनॉल काढून त्यापासून ऊर्जेचे पर्यायी स्त्रोत किती निर्माण होतात हे पाहणे जास्त गरजेचे आहे. पेट्रोलचे दर प्रचंड वाढलेले आहेत. मग, पेट्रोलमध्ये तुलनेने स्वस्त आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेले इथेनॉल मिसळण्यास परवानगी का नाही? सध्या फक्त इथेनॉल (5%) मिसळण्यास परवानगी आहे; ही मर्यादा वाढवली का जात नाही. नेमकी कुठली आडकाठी यामध्ये आहे. 

पाण्यासाठी जे पंप चालवले जातात. ज्या मोटारींचा उपयोग होतो, यासाठी डिझेलचा वापर होतो. मग आतापर्यंत असे संशोधन की ज्याद्वारे या मोटारी इथेनॉलवर चालतील का पुढे येऊ दिले गेले नाही. यावर का संशोधन होत नाही किंवा करू दिले जात नाही. ज्या पद्धतीने छोट्या मोठ्या गोष्टींसाठी शहरी भागात प्रचंड प्रोत्साहन देऊन मदत केली जाते. याच्या नेमकं उलट ग्रामीण भागात या सगळ्या गोष्टी का मारल्या जातात. 

आज तर परिस्थिती अशी आहे, पिकांच्या रूपाने शेतामध्ये हिरवी वीज उभी आहे आणि इकडे प्रचंड वीजटंचाईला तोंड द्यावे लागते आहे. साखरेचा भाव घसरलेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला किंमत नाही. साखर तयार झाली तरी, तिला किंमत मिळण्याची शक्यता आज तरी नाही. मग कशाच्या आधारावर उसाला भाव मिळू शकतो. दुसरीकडून ऊसतोड कामगारांसाठी नेते आंदोलन करीत आहेत. ऊसतोड कामगारांचे प्रश्र्न जर सोडवायचे असतील, तर त्यासाठी परत उसाच्या भावाशी येऊन थांबावं लागतं. ऊसतोडणीसाठी यंत्रांचा उपयोग करून घ्यावा, असं आता सगळ्यांनाच वाटत चाललं आहे. ऊसतोडणी ही अतिशय जिकीरीची बाब आहे. ऊसतोडणी करणारा मजूरही हे काम नाखुशीनेच स्वीकारतो. आपले घरदार सोडून चिल्ल्यापिल्ल्यांना पाठीशी घेऊन ऊसतोडणीसाठी भटकत राहणे हे कोणालाच नको आहे. त्यामुळे जर ऊसतोडणीची यंत्रं आली, तर ती सगळ्यांनाच हवी आहेत. बरं ज्याला ऊसतोड कामगार म्हणतात, तो तरी कोण आहे? तर तो अल्प भूधारक शेतकरीच आहे. जमिनीचे तुकडे होत आकार छोटा झाला. जमीन कसणं परवडेनासं झालं. सिंचनाची कुठलीही सोय आजही महाराष्ट्राच्या सत्तर टक्के शेतजमिनीला उपलब्ध नाही. मग हे सगळे शेतकरी शेतमजूर बनतात आणि त्यातलाच एक वर्ग ऊसतोड कामगार म्हणून गणल्या जातो. स्वाभाविकच हा प्रश्र्न अप्रत्यक्षरीत्या परत शेतीचाच होऊन बसतो. मग शेतीचा प्रश्र्न न सोडवता ऊसतोड कामगाराचा प्रश्र्न सुटणार कसा? 

आज सगळ्यात पहिल्यांदा गरज आहे - महाराष्ट्राच्या छातीवरती बसलेल्या सहकार नावाच्या राक्षसाला उठवून लावायची! दसर्‍याच्या मुहूर्तावर ज्या रावणाचा पुतळा जाळल्या जातो, तसं आता शेतकर्‍यांवर अन्याय करणार्‍या आणि त्यांच्या नावाखाली शासनाची प्रचंड सबसिडी लुटणार्‍या सहकाररूपी रावणाचे शिल्लक अवशेषही जाळून टाकण्याची नितांत गरज आहे. जेव्हा शेतीतून शासन आणि पर्यायाने सहकार पूर्णपणे हद्दपार होईल तेव्हाच, मोठ्या प्रमाणावर शेतीत भांडवल येईल. शेती ही फक्त अन्नधान्याची न राहता, इतरही गोष्टींसाठी म्हणून सिद्ध होईल. विजेसाठी शेती ही वेगळी कल्पनाही रावबल्या जाईल. ज्याच्यातून खर्‍या अर्थाने शेतीचा म्हणजेच पर्यायाने ग्रामीण भागाचा आणि एकूणच महाराष्ट्राचा समप्रमाणात आणि समतोलपणे विकास साधल्या जाईल! 

ज्या शहरांना प्रचंड प्रमाणात वीज लागते, त्यांतील कवडीचाही भाग त्या शहरात तयार होत नाही आणि याच शहरांना अतिशय कमी प्रमाणात विजेच्या टंचाईला तोंड द्यावे लागते. याच्या नेमके उलट ज्या ठिकाणी ऊर्जेची निर्मिती होऊ शकते. त्या सगळ्या ग्रामीण भागाला ऊर्जा निर्माण करण्याचं पाप म्हणून अंधाराला तोंड द्यावं लागतं. ऊर्जेच्या बाबतीत जर खेडी स्वयंपूर्ण होऊ शकली, तर फार वेगळे चित्र स्पष्ट होईल. आज एक मोठा भ्रम असा पसरविला जातो आहे, की सगळे शेतकरी फुकट वीज वापरतात, त्यांच्या वीज पंपांना मीटर नाही. आकडे टाकणे हा खेड्यातल्या लोकांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. शेतकरी आणि सगळाच ग्रामीण भाग म्हणजे सरकारचे जावई आहेत. असं शहरातल्या लोकांना वाटते. हा भ्रम दूर करण्यासाठीही ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण खेड्यांचा निर्णय योग्य ठरेल. जर शेतीतील हिरव्या ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करून त्याचा वापर शेतकरी करू लागला किंवा त्याला करू दिल्या गेलं तर ती एक फार मोठी क्रांती ठरेल. आज शेतकर्‍याला त्याच्या जवळील संसाधनांचा वापर पुरेसा करू दिल्या जात नाही. त्याच्या मार्गात येणारे अडथळे हे प्रचंड आहेत. इतकंच नाही, तर आज देखील शेतकर्‍याला सूडबुद्धीने वागवले जाते.

शेतकर्‍यांचे पुत्र म्हणवून घेणारे दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले, सध्या केंद्रात मंत्री असलेले विलासराव देशमुख आपल्या लातूरच्या कृषि उत्पन्न बाजारसमितीमधील हमाल, अडते आणि व्यापार्‍यांच्या दादागिरीला अजूनही रोखू शकलेले नाहीत. आमच्या माहितीप्रमाणे, विलासराव देशमुखांचे वडील दगडुजीराव देशमुख हे आडते किंवा व्यापारी नसून शेतकरीच होते. बाभूळगावला त्यांची आडत नसून शेतीच होती. कदाचित ही माहिती विलासराव देशमुखांनाच सांगायची गरज आहे. हा प्रश्र्न फक्त लातूरचाच नसून अख्ख्या महाराष्ट्राचीच हीच परिस्थिती आहे. ज्याच्यावरती अन्याय आपण करत आहोत त्याच्याच हातात आपल्या समस्यांची गुरूकिल्ली आहे हे कदाचित इतर नागरिकांना कळत नसावे.

Wednesday, October 5, 2011

सरकारला कुठली भाषा कळणार आहे?




.............................................................
६ ऑक्टोबर २०११ शेतकरी संघटक मधील अग्रलेख
.............................................................



कांद्याचं वाटोळं करून झालं. आता उसाचं वाटोळं करण्याचं सरकारने ठरवलं आहे. कापसाच्या पट्‌ट्यात प्रचंड प्रमाणात आत्महत्या करून आपला निषेध शेतकर्‍यांनी नोंदवला होता. रस्त्यावरची आंदोलनं किमान गेली 30 वर्षे सातत्याने चालू आहेत. कांदा प्रश्र्नी 13 दिवस आंदोलन करून झालं आणि आता उसासाठी शेतकरी रस्त्यावर आला आहे. आजही शासनाला ही भाषा कळत नसेल तर कुठली भाषा शेतकर्‍यांनी वापरली पाहिजे? गव्हाच्या प्रश्र्नाबाबत केलेला खेळखंडोबा इतका टोकाला पोहोचला, की त्यातून खलिस्तानवाद्यांचा भस्मासूर उदयाला आला. खरे तर हा प्रश्र्न गंभीर बनलेला असतानाही पंजाबातील शेतकर्‍यांनी तेव्हाही रस्त्यावर उतरून शांतपणे निदर्शने केली होती; पण ही भाषा शासनाला कळली नाही. पंतप्रधानांची झालेली हत्या आणि त्यानंतर अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावरची लष्करी कारवाई या मार्गानेच हा प्रश्र्न शासनाने सोडवला.
जर साधी भाषा शासनाला कळत नसेल, तर आता काय शेतकर्‍यांनी गावागावात सत्ताधारी आमदार-खासदार-मंत्र्यांचे खून पाडायचे का? त्याशिवाय या प्रश्र्नाची तीव्रता शासनाला कळणारच नाही असे दिसते आहे. बहुसंख्य शेतकरी समाज हा निमूटपणे कष्ट करत आपले जीवन जगत आहे. त्याच्या या शांतपणाचा सातत्याने गैरफायदा सत्ताधार्‍यांनी घेतला आहे. जेव्हा खुली बाजारपेठ उपलब्ध झाली. तेव्हा ती सोयीच्या क्षेत्रात फक्त खुली करण्यात आली. शेतीला मात्र खुलीकरणाचा वारा लागू दिला गेला नाही. याचा परिणाम म्हणूनच अजूनही खेड्यांची अवस्था साचलेल्या डबक्यांसारखी झालेली आहे. तो सगळा लोंढा शहराकडे आला. शहरी व्यवस्थेला हे सगळे ताण असह्य होत गेले. आता शहरांचीही व्यवस्था पाणी नाही, वीज नाही, रस्ते भरले खड्‌ड्यांनी अशी झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण करताना लोकशाही तळागाळापर्यंत पोहोचावी अशी योजना होती; पण गेल्या 65 वर्षांत जे काही प्रयत्न झाले त्यातून स्थानिक स्वराज्य संस्था जवळपास उद्ध्वस्त झाल्या. राज्याच्या राजधानीत तसेच देशाच्या राजधानीत सगळी सत्ताकेंद्रे एकवटली. या सत्ताकेंद्रांतील लोक मुजोर बनले. सर्वसामान्यांकडे त्यांनी पूर्णत: पाठ फिरवली. सत्तेची गणितं व्यवस्थितरीत्या जुळवून वर्षानुवर्षे सत्तेच्या चाव्या स्वत:कडेच ठेवण्यात यश मिळवले. जसं वर्षानुवर्षे कॉंग्रेस सत्ता उपभोगत आहे. आता त्याच पद्धतीने इतर पक्षांनीही आपली छोटीमोठी स्थानं पक्की केली आहेत. एखाद्या छोट्या गावाची नगरपालिका वर्षानुवर्षे ठराविक माणसांच्या हातात राहते. याला काय म्हणावं? खरे तर अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर सर्वसामान्यांचा जो उद्रेक शांतपणे सामोरा आला. त्यापासून काही एक धडा घ्यायची गरज होती. कांद्यासाठी शेतकरी शांतपणे रस्त्यावर बसले आणि आता उसासाठीही याच मार्गाने ते रस्त्यावर आले आहेत; पण आजही सर्वसामान्यांची ही भाषा शासनाला समजते आहे, असे दिसत नाही.
शाळांच्या पटपडताळणीची मोठी मोहीम महाराष्ट्रात हाती घेण्यात आली आहे. मोहीम चालू असतानाच मोठ्या सुरस कथा सामोर्‍या येत आहेत. विद्यार्थी तर सोडाच औरंगाबाद जिल्ह्यात सुमारे शंभरावर शाळाच बोगस निघाल्या आहेत. या सगळ्यांमुळे सर्वसामान्यांवरचा बोजा वाढतच चालला आहे आणि त्या खाली हे नागरिक पिचून निघत आहेत. शेकडो वर्षांच्या शोषणातून शेतकरी समाज पूर्णपणे दुर्बळ झाला आहे. त्यामुळे टोकाला जाऊन आपला विरोध तो व्यक्त करू शकत नाही. फार तर सहन झालं नाही तर तो आत्महत्या करतो; पण ही बाब इतर समाजाला लागू होत नाही. जर मोठ्या प्रमाणात अन्याय करणारी परिस्थिती अशीच राहिली, भ्रष्टाचार असाच फोफावत राहिला तर ही सामान्य जनता जे काही आंदोलन हाताळेल ते शेतकरी समाजासारखे अहिंसक निश्र्चितच असणार नाही. आजही जेव्हा जेव्हा शहरात दंगे उसळतात तेव्हा तेव्हा मोठ्या प्रमाणात जाळपोळ, मोडतोड आणि वित्त हानी होते. या सगळ्याला हाताळण्यासाठी फार मोठ्या प्रमाणता पोलिस यंत्रणा शासनाला उभारावी लागते. तिच्यावर प्रचंड प्रमाणात खर्च करावा लागतो आणि एवढं करूनही परिस्थिती आटोक्यात येत नाही. म्हणूनच सगळ्यात कठोरपणे आपली धोरणं गैरप्रकारांच्या विरोधात राबवावी लागतील; पण दुर्दैवाने असं काही करताना शासन दिसत नाही. पंतप्रधान मनमोहन सिंग हे सगळ्यांत भ्रष्ट अशा नोकरशाही प्रवर्गातूनच आलेले आहेत. नोकरशाहीचे हे सगळे भ्रष्ट कारनामे त्यांना अतिशय व्यवस्थितरीत्या समजतात, त्यामुळे त्या संदर्भात नेमकी कारवाई काय करायची? हे त्यांना चांगल्या प्रकारे समजते; पण त्यांना स्वत:ला काहीच समजून घ्यायचं नाही, असं खेदानं म्हणावं लागेल. शेतकरी समाज जो या देशाचा कणा आहे त्याच्या सहनशीलतेवर, शांतपणावर आणि कष्टाळू वृत्तीवर ही सगळी व्यवस्था तोलल्या गेली आहे. जेव्हा केव्हा त्याचा तोल ढळेल तेव्हा ही व्यवस्था कोसळायला क्षणाचाही विलंब लागणार नाही. आताच शेती सोडणार्‍यांचे प्रमाण फार मोठे बनत चालले आहे. स्वाभाविकच शेती उत्पादनांचे पुढे काय होणार? हे सांगायची गरज नाही. मग किती जरी उपाय केले, तरी शेतीतून बाहेर पडलेला माणूस परत शेतीत जाणे शक्य नाही. मग कुठलीही पॅकेजेस कामाला येणार नाहीत. कुठल्याही योजना उपयोगी ठरणार नाहीत आणि कुठलंही अनुदान द्यायला माणसं शिल्लक राहणार नाहीत. यासाठी आज साधी गरज आहे सहानुभूतीने शेतकरी समाजाचं दुखणं समजून घेणं, त्यांच्या मागण्यांना यथोचित न्याय देणं किंवा शेतकरी चळवळ जे कित्येक वर्षांपासून म्हणते आहे, त्याप्रमाणे ‘तुम्ही आमच्यासाठी काहीच करू नका, आमच्यासाठी म्हणून जे काही करता आहात ते थांबवा. आमचं काय भलं करायचं, ते आमचं आम्ही पाहून घेऊत!’ ही भाषा जर सरकारला कळत नसेल तर आता कुठल्या भाषेत त्यांना सांगायचं?