एक भारतीय म्हणून लाज वाटावी असा प्रसंग आहे. व्हिन्सेंट पासक्लिनी नावाचा 35 वर्षांचा फ्रेंच तरुण महाराष्ट्राच्या आणि विशेषत: औरंगाबाद परिसरातील ऐतिहासक स्थळांच्या प्रेमात पडून गेली 3 वर्षे नियमित भेट द्यायला येतो. इथल्या ऐतिहासिक पर्यटन स्थळांचा अभ्यास करताना त्याला अजिंठा परिसरातील दुर्लक्षित किल्ल्यांची माहिती मिळते. हे किल्ले बघण्यासाठी तो उत्सुक बनतो. गौताळा अभयारण्याला लागून असलेला अंतुरचा किल्ला पाहायचे तो ठरवतो. भारतीय मित्रांना सोबत घेऊन एक चारचाकी वाहन घेऊन निघतो. किल्ल्यापर्यंत जाणारा रस्ता अतिशय खराब. शेवटी तर 4 कि.मी. अंतरावर गाडी अडकतेच. तिथून किल्ल्यावर जायचे कसे? स्थानिक तरुणांना विनंती करून त्यांना मोटारसायकलवर सोडण्यासाठी कसेबसे तयार केले जाते. सोबतच्या मित्रांसोबत व्हिन्सेंट शेवटी अंतुरच्या किल्ल्यावर पोहोचतो. त्या किल्ल्याचे अप्रतिम मजबूत बांधकाम, 800 वर्षांपासून शाबूत भक्कम तटबंदी, पिण्याच्या पाण्यासाठीचे दगडी बांधीव तळे, कुठल्याही खांबाच्या आधाराशिवाय उभे असलेले 30 फूट रुंद आणि 50 फूट लांब असे देखणे सभागृह... हे सगळे पाहून तो चकित होतो. त्याहीपेक्षा या सगळयाबाबत असलेली भारतीयांची अनास्था पाहून तो दु:खी होतो. त्याच्या प्रश्नाने निरुत्तर व्हायला होते, ''व्हाय देअर इज नो बेटर ऍप्रोच रोड? व्हाय यू पीपल नॉट इंटरेस्टेड इन हिस्टरी? व्हॉट्स राँग विथ यू?''
व्हिन्सेंटच्या प्रश्नाला काय उत्तर देणार? इतिहासाचा विषय निघाला की आपण लगेच अस्मितेच्या तलवारी काढतो. पण काही वेळातच लक्षात येते की या तलवारीही निव्वळ बेगडी आहेत. आपण इतिहासाबद्दलही काही करायला तयार नाही.
जगप्रसिध्द अजिंठा लेण्यांच्या परिसरात एक-दोन नाही, तर अंतुर, सुतोंडा, जंजाळा, वेताळवाडी असे चार किल्ले आहेत. आपल्याला फक्त देवगिरीच माहीत असतो. अजिंठा डोंगररांगांत लपलेल्या या किल्ल्यांपर्यंत जायला धड रस्ते नाहीत. या किल्ल्यावरील ऐतिहासिक अवशेषांची अवस्था कठीण आहे. काही वस्तू तर चोरीला गेल्या आहेत. व्हिन्सेंटसारखे परदेशी पर्यटक मोठया उत्सुकतेने येतात, अभ्यास करू पाहतात आणि आपण त्यांना साधी साधनेही उपलब्ध करून देऊ शकत नाही, हे खरे दुर्दैव आहे.
अंतुरच्या किल्ल्यावर फारसी भाषेतील एक शिलालेख आणि एक मोठा दगडी स्तंभ आहे. त्यांचे वाचन अजून झाले की नाही याचीही माहिती नाही. यादवकाळात कुणा मराठा सरदाराने या किल्ल्याची निर्मिती केली, असे म्हणतात. पण त्याबद्दल कुठलाही ठोस पुरावा नाही. किल्ल्यावर दगडी कोरीवकामाचे अप्रतिम नमुने इतस्तत: पसरले आहेत.
उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांच्या सांध्यावरचा हा सगळा प्रदेश. त्यामुळे या परिसरातील किल्ल्यांना त्या काळात मोठे महत्त्व होते. मोगलांच्या काळात दक्षिणेच्या सुभ्याचे ठिकाण म्हणजे औरंगाबाद. बुऱ्हाणपूर म्हणजे उत्तरेतील शेवटचे मोठे ठिकाण, तर औरंगाबाद म्हणजे दक्षिणेतील पहिले महत्त्वाचे ठिकाण यांच्या दरम्यानचा हा प्रदेश.
अजिंठा परिसरातील किल्ल्यांचे आणखी एक वैशिष्टय आहे. हा सगळा परिसर अतिशय निसर्गसंपन्न आहे. ना.धों. महानोरांसारखे निसर्गकवी या प्रदेशात जन्माला येतात ते उगीच नाही. याच प्रदेशातील सरदार जाधवांसारख्या चित्रकाराला प्रेरणा मिळते ती उगीच नाही. अंतुरच्या किल्ल्याला लागून गौताळा अभयारण्य आहे. तेथील सीता धबधबा अतिशय मोहक आहे. शेकडो फूट दगडी कातळ कापत कापत दरीत झेप घेणारे पाणी निव्वळ नजरबंदी करून पाहणाऱ्याला खिळवून ठेवते. वेरूळ-अजिंठयाची माहिती आहे, पण बाकी स्थळांबाबत ओ की ठो माहीत नाही.
दोन आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक पर्यटनस्थळे जवळ जवळ असलेले संपूर्ण जगातले एकमेव ठिकाण म्हणजे औरंगाबाद. वेरूळ-अजिंठा या दोन्ही ठिकाणांना आंतरराष्ट्रीय मान्यता आहे. ही आपली मोठी सांस्कृतिक केंद्रे आहेत. महाराष्ट्राचा विचार करताना आपण औरंगाबादला पर्यटनाची राजधानी म्हणतो. मग या ऐतिहासिक स्थळांपर्यंत पोहोचायला आपण रस्ते का करू शकत नाहीत?
या किल्ल्यांची डागडुजी काही प्रमाणात केली जात आहे. काही ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे. पण त्याचबरोबर किल्ल्यांची माहिती असणारे फलक लावले गेले पाहिजेत. औरंगाबादलाच मोठे विद्यापीठ आहे. इथे इतिहास विभाग आहे. त्या विभागाला जबाबदारी देऊन या सगळया ऐतिहासिक स्थळांची माहिती लिहून काढली पाहिजे.
अजिंठा लेण्यांच्या पायथ्याशी अतिशय सुसज्ज असे पर्यटक माहिती केंद्र उभारले गेले. काही दिवसांतच ते बंद पडले. आकाश धुमणे या आपल्या भारतीय मित्रासोबत व्हिन्सेंट तिथे गेला, तेव्हा ते बंद पाहून त्याला धक्काच बसला. त्याने तशी तक्रार नोंदवली. वीज बील न भरल्याने या केंद्राचा वीजपुरवठा खंडित केला गेला होता, असे हे केंद्र बंद पडण्याचे कारण कळले. आता तो परत सुरळीत करण्यात आला आहे. वेरूळ लेण्यांजवळही असेच पर्यटक माहिती केंद्र आहे. पण पर्यटकांना त्याची माहितीच होत नाही. परिणामी तिथे कुणी जात नाही.
व्हिन्सेंटने मोठया कष्टाने औरंगाबाद परिसराची माहिती गोळा करून ती फ्रेंच भाषेत लिहिली व फ्रेंच पर्यटनाच्या ऑॅनलाइन साइट्सवर द्यायला सुरुवात केली. कारण त्याला आढळले की जी माहिती पूर्वीपासून चालत आलेली आहे, ती अपुरीही आहे, शिवाय चुकीचीही आहे. देवगिरी किल्ल्याच्या अगदी समोर पुरातन 'हमामखाना' आहे. खुलताबादला जर जरी बक्ष दर्ग्याजवळ मलिक अंबरची कबर आहे. पण याची माहितीच नाही. अगदी वर्तमानपत्रेही चुकीची माहितीच प्रमाण मानून बातम्या देतात. औरंगाबाद शहरात असलेला बिबी का मकबरा किंवा दौलताबादला असलेली औरंगजेबाचे गुरू ख्वाजा जैनोद्दिन चिश्ती यांची कबर यांबद्दल चुकीची माहिती मान्यवर इंग्लिश/मराठी दैनिकांत प्रसिध्द झाली. ही माहिती नेटवर उपलब्ध असलेल्या चुकीच्या माहितीच्याच आधारावर दिली गेली होती. व्हिन्सेंटसारख्यांनी वर्तमानपत्रांत पाठपुरावा करून ही माहिती चूक असल्याचे निदर्शनास आणून दिले.
एका परदेशी नागरिकाची ही तळमळ पाहून आपण निदान एक गोष्ट करू शकतो आणि ती म्हणजे त्याच्यासारख्याला होईल तेवढी मदत करणे. त्याला प्रोत्साहन देणे.
संत एकनाथ महाराजांनी 12 वर्षे ज्या जागी तप केले, ती जागा म्हणजे शुलीभंजन. खुलताबादजवळील डोंगरात हे रम्य स्थळ आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, इथे जायला रस्ता खराब आहे म्हणून व्हिन्सेंटसारखा पर्यटक पोहोचू शकला नाही. या डोंगरावर दत्तमंदिर आहे. एकेकाळी बांधलेला रस्ता आता खराब झाला आहे. या ठिकाणच्या आध्यात्मिक परंपरांचा शोध घेण्यासाठी परदेशी पर्यटक मोठया प्रमाणात येऊ पाहत आहेत आणि आपणच त्यांच्या मार्गात अडथळे आणत आहोत.
सर्वप्रथम या परिसराची नीट माहिती गोळा करणे, ती पर्यटकांना कळावी यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करणे, सर्व ऐतिहासिक निसर्गसंपन्न स्थळांपर्यंत पोहोचण्यासाठी किमान रस्ते तयार करणे हे अतिशय गरजेचे आहे. हे विषय असे आहेत की कुणाला सांगायला जावे, तर सगळयात पहिल्यांदा विचारणाऱ्यालाच सुनावले जाते, ''मग तुम्हीच सांगा काय केलं पाहिजे?'' आता रस्ते खराब आहेत हे काय कुणाला कळत नाही? हे कुणी सांगितले तरच कळणार आहे काय? व्हिन्सेंटला हजारो किलोमीटवरवरून येऊन हे आपल्याला सांगावे लागते, याला काय म्हणावे!
औरंगाबाद परिसरातील ऐतिहासिक निसर्गसंपन्न पर्यटनस्थळांचा विचार केल्यास सगळयात पहिल्यांदा शासनाने या सर्व ठिकाणी पोहोचण्यासाठी चांगले रस्ते केले पाहिजेत. इतिहासप्रेमी, व्हिन्सेंटसारखे अभ्यासक परदेशी नागरिक, विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थी या सगळयांना हाताशी घेऊन या ठिकाणांचे संवर्धन, अभ्यास, माहिती संकलन यासाठी ठोस योजना आखल्या पाहिजेत.
सर्वसामान्य नागरिकांनी अगदी तातडीने अगदी आजपासून करावयाची गोष्ट म्हणजे या ऐतिहासिक स्थळांपाशी गेल्यावर तेथील दगडांवर आपले व आपल्या प्रेयसीचे/प्रियकराचे नाव न लिहिणे आणि या परिसरात कचरा न करणे. इतकी दोन पथ्ये पाळली तरी खूप आहे.
जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद.
9422878575