समाजवादी विचारवंत ज्येष्ठ पत्रकार प्रा. जयदेव डोळे यांचा ‘उजवी उड्डाणे’ हा लेख लोकरंग पुरवणीत (21 मे 2017) प्रसिद्ध झाला. लेखातून सगळ्यात स्पष्टपणे काय जाणवते तर मोदींसह तमाम उजव्यांच्या बाबतीतली त्यांची पूर्वग्रहदुषित दृष्टी. डोळ्यांच्या डोळ्यात ‘मोदीबिंदू’ झाल्यानं त्यांना जगात सध्या काय चालले आहे ते स्पष्टपणे दिसत नाही. किंवा त्यांना ते समजून घ्यायचे नाहीये.
1991 मध्ये जागतिकीकरण (डाव्यांच्या भाषेत खासगीकरण उदारीकरण जागतिकीकरण खाउजा) पर्व सुरू झाले तेंव्हा जगाची दारे उघडत चालली आहेत म्हणून यांनीच आक्रस्ताळी टिका केली होती. आता मोदी, ट्रंम्प, ब्रेक्झिट, फ्रान्समध्ये मारी ल पेन यांना मिळालेली 25 टक्के मते यांमुळे जगाची दारे बंद होत चालली आहेत म्हणून हे परत टिका करत आहेत. यांचा नेमका काय आक्षेप आहे?
‘जगातिल कामगारांनो एक व्हा’ ही डाव्यांची मोठी लाडकी घोषणा. तिच्या सुरात सूर मिसळून डोळ्यांसारखे समाजवादीही कालपरवा पर्यंत हेच लिहीत बोलत होते. मग ‘जगातील ग्राहकांनो एक व्हा’, ‘जगातिल व्यापार्यांनो एक व्हा’, ‘जगातिल उद्योगांनो एक व्हा’, ‘जगातिल बाजारपेठ एक होवो’ असे काही होत असेल तर यांच्या पोटात नेमकं काय दुखत आहे?
कालपरवा पर्यंत परदेशी कंपन्या येवून तूमच्या गायीची कालवडही ओढून नेतील ही भाषा हे करत होते. प्रत्यक्षात झाले उलटे. अमेरिका असो, युरोप असो, इंग्लंड असो मोठ्या देशाने दारे उघडल्यावर मोठ्या प्रमाणावर तिसर्या देशांमधून कामगार तिकडे जायला लागले. खिडकी कधी एकाच बाजूच्या वार्यासाठी उघडता येत नाही. त्यातून वारे बाहेर जावू शकते तसे आतही येवू शकते. आज अमेरिका, इंग्लंड किंवा फ्रान्समध्ये जे काही घडत आहे ते यांच्या मताच्या अगदी उलटे घडत आहे हे तरी हे मान्य करणार की नाही?
‘जगाचा ताबा विशेषज्ञ, सल्लागार, तंज्ञज्ञ यांनी घेऊन नैसर्गिक नेतृत्वाचा अंत केला’ असे वाक्य डोळे आपल्या लेखात वापरतात. मग यात त्यांचा आक्षेप नेमका काय आहे? विशेषज्ञ, सल्लागार, तंत्रज्ञ यांने नेतृत्व नैसर्गिक नसते काय? नैसर्गिक नेतृत्व म्हणजे समाजवादी नेतृत्व काय?
भारतातील तरूण परत एकदा मोठ्या प्रमाणावर एम.पी.एस.सी./यु.पी.एस.सी.च्या मागे लागला आहे याचे कारण डोळे यांना काय वाटते? सरकारी नौकरांचे होत असलेले भलते लाड जागतिकीकरणाचे फळ नसून त्यांच्याच समाजवादी धोरणाची ही विषारी फळं आहेत. ती जागतिकीकरणातही भारत सरकारने कायम ठेवली म्हणून तरूणांचा ओढा अजूनही तिकडे राहिला आहे.
भारतातील सगळ्यात जास्त लोकसंख्येला समावून घेणारा व्यवसाय म्हणजे शेती. या शेतीची उपेक्षा केल्यावर त्यातील तरूणांची लोकसंख्या दुसरीकडे जाण्यासाठी धडपड करणारच. हीच लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर स्पर्धा परिक्षांच्या मार्गाने सरकारी नौकरीत जावू पहाते आहे हे वास्तव डोळे का दुर्लक्षित करतात?
वास्तव असे आहे की जागतिकीकरण ही प्रक्रिया 1991 पासून नाही तर दुसर्या महायुद्धानंतर म्हणजे 1945 ला सुरू झाली. जपानवरच्या अणूहल्ल्यानंतर सगळे जग हादरले. सगळ्यांच्याच लक्षात आले की परत हे असले संहारक युद्ध होणे नाही. हे कोणाच्याच हिताचे नाही. म्हणून जागतिक व्यापार परिषदेची स्थापना झाली. (डब्लू.टि.ओ.) पण हा विचार खुमखूमी असलेल्यांच्या पचनी पडणे शक्य नव्हते म्हणून 1945 ते 1990 असा तब्बल 45 वर्षे शीतयुद्धाचा खेळ चालला. याच काळात जागतिक व्यापारासाठी फेर्यांवर फेर्या होत गेल्या. शेवटी अंतिम तारीख ठरवून 1991 ला जगातील बहुसंख्य राष्ट्रांनी जागतिक पातळीवर व्यापार सुरळीत करण्याच्या कराराव सह्या केल्या. त्यात भारतही होता. 1991 ते आत्तापर्यंत अमेरिकेतील 9/11 च्या हल्ल्यानंतरही जागतिक व्यापारात जग पुढे पुढेच जात राहिलेले आहे. आता ही वाट परत फिरणे नाही.
रशिया नंतर आता बंदिस्त चीनही मोकळा होवू लागला आहे. नुकतीच चीनने जागतिक व्यापार सुरळीत होण्यासाठी रस्ते रेल्वे बंदरे यांच्या बांधणीचा मोठा आराखडा जगासमोर ठेवण्यासाठी जागतिक परिषद घेतली आहे. याचा उल्लेखही डोळे यांनी टाळला आहे. कदाचित त्यांच्या तो सोयीचा नसावा. इंग्लंडपर्यंत रेल्वे नेण्याची चीनची योजना आहे. मग या मार्गातील इतर राष्ट्रं काय हातावर हात देवून बसणार आहेत?
जगातिल व्यापाराचा प्रवाह आता कुणाची इच्छा असो नसो, कितीही ट्रंप येवो, कितीही मोदी राष्ट्रवादाचा जप करो थांबू शकत नाहीत. पाणी उतराचा वेध घेत धावत जातं तद्वतच भांडवल अनुकूल बाजार उत्पादन शोधत धावत जातं. आणि त्याला रोकता येणे अशक्य आहे.
आणि काय म्हणून डोळे कायमस्वरूपी नौकर्यांच्या भाकड गोष्टींची भलावण करत आहेत? या कायमस्वरूपी नौकर्या जेमतेम गेल्या 50 वर्षांतीलच देण आहेत ना? ही व्यवस्था कोसळून पडली तर असे काय आभाळ पडणार आहे?
काटकसर आणि कंजुषी यातील फरक बहुराष्ट्रीय कंपन्यांना कळत नाही हे डोळे कुठल्या आधारावर लिहितात? ‘मेरे पास बाजरपेठ है’ हा तद्दन फिल्मी संवाद यासाठी आहे की आजही भारत हा जगाच्या व्यापारपेठेच्या 1 टक्के इतक्याही हिश्याइतका नाही. मग डोळ्यांचा सलिम जावेद असले संवाद कोणत्या आकडेवारीच्या आधारावर लिहितो? आज बाजारपेठ म्हणून जगाला भारताची जेवढी गरज आहे त्याच्या 100 पट भारताला जगाची गरज आहे हे डोळ्यांनी डोळे उघडे ठेवून आणि उजव्या डोळ्यांतील ‘मोदीबिंदूची’ शस्त्रक्रिया करून पहावे.
कायमस्वरूपी नौकर्या, पेन्शन व्यवस्था, मुजोर कामगारशाही, उत्तरदायीत्व नसलेली नौकरशाही ही सगळी समाजवादी विचारसरणीची देण आहे. हे सगळे कोसळून पडत आहे हे डोळे यांचे खरे दु:ख आहे. गंमत म्हणजे ज्या उजव्यांवर टिका डोळ्यांसारखे डावे विचारवंत करत आले आज त्यांच्याच राष्ट्रवादाच्या मांडीला मांडी लावून यांनी आपली पत्रावळ मांडली आहे. काळ सुड उगवतो तो असा.
1991 मध्ये जगाची दारं उघडी होत असताना विरोध करत यांची बस हुकली होती. आता परत बंद होत जाणारी दारे ही तात्कालीक प्रतिक्रिया खरी आहे असं समजून टिका करत असताना यांची बस परत हुकत चालली आहे. व्यंकटेश माडगुळकर यांच्या सत्तांतर कादंबरीत मेलेले मुल थानाला लावून फिरणार्या माकडीणीची एक हृदयस्पर्शी गोष्ट आली आहे. त्यात माडगुळकर लिहितात मुल मेलं तरी हीचं आईपण मरत नव्हतं. तसं डोळे यांचे झाले आहे. समाजवादाचे मेलेले मुल हे थानाला लावून फिरत बसले आहेत.
श्रीकांत उमरीकर,जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद.
जयदेव डोळे यांच्या लेखाची link
http://epaper.loksatta.com/1215264/loksatta-pune/21-05-2017#page/17/2