Thursday, May 10, 2018

कश्मिरी संगीतानं महाराष्ट्र दिन साजरा


उरूस, सा.विवेक, 13-19 मे 2018

देवगिरी किल्ल्याच्या जवळ तळ्याच्या पायथ्याशी हिरण्य हुरडा पर्यटन केंद्र आहे. त्याच्या हिरवळीवर दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संगीताचा कार्यक्रम साजरा होतो. यावर्षी आयोजिक मेधा पाध्ये- सुनीत  आठल्ये या कलाप्रेमी जोडप्याने कश्मिरी कलावंतांना आमंत्रित केले होते. हे कुणी फारसे लोकप्रियता लाभलेले आंतरराष्ट्रीय कलाकार नव्हते. तर होते लोककलाकार. त्यांना कश्मिरी भाषेशिवाय इतर कुठली भाषाही फार सफाईने बोलता येत नव्हती. त्यांच्या वादनाविषयी काही माहिती सांगा म्हटलं तर त्यांनी लाजून ‘इससे अच्छा हमको और बजानेको बोलो’ अशी भावना व्यक्त केली. 

संतुर, सारंगी, रबाब आणि मटका असे चार वाद्य वाजविणारे हे चार कलाकार. ही सगळी वाद्यही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. संतूर तर केवळ आणि केवळ कश्मिरचेच वाद्य आहे. शिवकुमार शर्मा यांनी या संतुरला जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांनी या वाद्याला ज्या प्रमाणे शास्त्रीय वाद्य म्हणून मान्यता मिळवून दिली त्याचप्रमाणे कश्मिरी लोक संगीतातील काही धून वाजवून त्याही संगीताला लोकप्रियता मिळवून दिली. ‘कॉल ऑफ द व्हॅली’ हा तर त्यांचा प्रसिद्ध अल्बम आहेच. पण शिवाय इतरही काही अल्बम आहेत. 

कश्मिरी संगीत मुळ स्वरूपात सादर करणारे हे लोककलाकर. त्यांच्या वादनाने महाराष्ट्रीय श्रोत्यांना थक्क करून टाकले. दाक्षिणात्य संगीतात घटम चा उपयोग तालासाठी केला जातो. या कश्मिरी कलाकारांच्या संचात मटका वादक आहेत. हा मटका विशेष कलाकुसर केलेला आणि वेगळ्या पद्धतीचा असतो. त्याच्या वादनात ठेक्यासोबत मटक्याच्या उघड्या तोंडावर हाताने आघात करून एक वेगळाच घुमार निर्माण केला जातो. त्याने या संगीताची मजा अजूनच वाढते.  हा मटका कश्मिरी शालीसारख्या कलाकुसरीने नटलेला असतो. सारंगीवरही अशी कलाकुसर आढळून येते.  

रबाब हे अफागाणी वाद्य. हिंदी चित्रपटांतील कितीतरी गाण्यात अफगाणी संस्कृतीचा कलेचा स्वाद रसिकांना देण्यासाठी या वाद्याचा उपयोग केल्या गेला आहे. (अलिफ लैला मालिकेचे संगीत, यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी सारखी लोकप्रिय गाणी, काबुलीवाला चित्रपटाच्या संगीतात सलिल चौधरी यांनी केलेला रबाबचा वापर रसिकांच्या कानात अजूनही रेंगाळतो). पण हे कश्मिरी कलाकार जे रबाब वाजवितात ते जरासे वेगळे आहे. त्याला काही जास्तीच्या तारा लावून एक वेगळाच कश्मिरी रंग या कलाकारांनी भरला आहे. 

सारंगी हे तसे उत्तर भारतात लोकप्रिय वाद्य. साथीचे वाद्य म्हणून हे जास्त ओळखले जाते. कोठ्यावरचे वाद्य किंवा मुजरा गाण्यांसाठी साथीचे वाद्य अशी याची जास्त ओळख आहे. पण कश्मिरच्या कलाकारांची सारंगी जरा वेगळी आहे. ती एक तर कलाकुसर असलेली आहेच. पण शिवाय तिच्या तारांची लांबी नेहमीच्या सारंगीपेक्षा जास्त आहे. परिणामी तिचा आवाज वेगळा उमटतो. केवळ करूणच नव्हे तर इतर रस व्यक्त करण्यासाठी पण सारंगीचा वापर हे कलाकार करून घेतात. 

या कश्मिरी कलाकारांच्या वादनाची शैली मोठी मोहक आहे. रबाब किंवा सारंगी वाला एक चाल इतरांसाठी देतो. त्या अनुषंगाने संतूरचे स्वर उमटत राहतात. सारंगी पार्श्वभूमीवर स्वरांचा पडदा धरून ठेवते आणि त्यावर इतरांचे सूर काही सांगितिक चित्र रेखाटत जातात असा विलक्षण अनुभव हे संगीत ऐकत असताना येत राहतो. 

सुरवातील ज्याला आपण मंगलाचरण असे म्हणतो त्या प्रमाणे एक धुन ते कुठेही गेले तर वाजवत राहतात. मग त्यानंतर विविध प्रसंगी वाजविण्यात येणार्‍या धून सादर केल्या जातात. जसे की लग्न समारंभ, प्रियकारानं प्रेयसीची केलेली आळवणी किंवा परदेशी प्रियकराच्या दु:खात होरपळत गेलेल्या प्रेयसीची आर्त वेदना, निसर्गात सर्वत्र फुलं फुललेली असताना होणारी आनंदाची भावना, बर्फाळ दिवस संपून ऊन पडून लख्ख दिवस उजाडतो तो आनंद अशा कितीतरी भावना या लोकधूनांमधून व्यक्त केल्या जातात.

हे कलाकार वागायलाही अतिशय साधे असे आहेत. त्यांंच्या संगीतावर बोलायलाही ते तयार होत नाहीत. प्रियकराची भावना व्यक्त करणारी धून समजावून सांगताना संतूर वादक उमरचे गाल गुलाबी होवून गेले होते. अधीच कश्मिरी  माणसांचा रंग गोरा गुलाबी. 

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम साजरा झाला हे पण एक वैशिष्ट्य. ज्या कश्मिरमधून हे कलाकार देवगिरीच्या जवळ आले त्याबाबत एक सुंदर माहिती लक्ष्मीकांत धोंेड यांनी या कार्यक्रमात सांगितली. आठशे वर्षांपूर्वी कश्मिरातून एक कुटूंब देवगिरीच्या यादवांच्या दरबारात आले. त्या कुटूंबातच पुढे महान संगीत तज्ज्ञ शारंगदेवाचा जन्म झाला. ज्याने ‘संगीत रत्नाकर’ या संगीतातील अद्वितीय ग्रंथाची निर्मिती याच परिसरात केली. आजही हा ग्रंथ संगीत क्षेत्रात प्रमाण मानला जातो. लिपीबद्ध शास्त्रीय स्वरूपातील संगीताला आपल्याकडे ‘मार्गी’ संगीत असे संबोधले जाते. तर याच्या शिवाय जे मौखिक परंपरेत चालत आले आहे, ज्याचे नियम कायदे अजून कुणी कागदावर मांडू शकलेले नाही अशा संगीताला ‘देशी’ समजले जाते. खरे तर देशीतूनच मार्गी विकसित होत जाते. आठशे वर्षांपूर्वी आलेल्या शारंगदेवाने इथे येवून ग्रंथ रचना करत मार्गी संगीताचा पाया रचला. तर आज त्याचा पाठलाग करत हे लोककलाकार ‘देशी’ परंपरेतील त्याच प्रदेशातील संगीत इथे येवून सादर करत आहेत. 

एक विलक्षण अशी गोष्ट म्हणून अभ्यासकांना न सापडलेल्या कितीतरी सांगितीक बाबींचा खुलासा या लोककलाकारांच्या संगीतातून होतो. 

आपल्याकडे तसेही वसंतोत्सव साजरा करण्याची परंपरा आहेच. महाराष्ट्र दिन वसंतातच येतो. तेंव्हा महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने काही एक वेगळे संगीत ऐकविण्याची संयोजकांची धडपड विलक्षणच म्हणावी लागेल. या पूर्वीही वीणेसारखे दूर्मिळ वाद्य, जलतरंग सारखे फारसे परिचित नसलेले वाद्य या कार्यक्रमात सादर झाले आहे. 

निसर्गात संगीत ऐकणे हा पण एक विलक्षण अनुभव आहे. पौर्णिमा आदल्याच दिवशी होवून गेली होती. त्यामुळे स्वच्छ आभाळात हसणारा पूर्ण चंद्र, वसंतातील सुगंधीत हवा आणि कानावर पडणारे कश्मिरी संगीत याचा एक वेगळाच अनुभव रसिकांना येत होता. या परिसरात लिंबाची झाडं खुप मोठ्या प्रमाणात आहेत. लिंबाच्या माहोराचा एक मादक सुगंध वसंतात अनुभवायला येतो. 

बहाव्याची पिवळीजर्द झुंबरासारखी फुलं याच काळात फुलतात. गुल्मोहराची लाल मोहिनी याच काळात पसरायला सुरवात झाली असते. थोडसं आधी पळसाच्या रंगांनी होळीच्या दरम्यान कमाल करून टाकलेली असते. या वातावरणात संगीत-नृत्य यांचे महोत्सव साजरे होणं खरंच संयुक्तिक आहे. जागतिक नृत्य दिवसही 29 एप्रिलला असतो. त्या निमित्ताने काही आयोजन विविध ठिकाणी केलं जातं. 

1 मे हा जागतिक कामगार दिवस आहे. दिवसभर श्रमणारे लोक संध्याकाळी एकत्र जमून नाच गाणी म्हणतात अशी आपल्याकडे परंपरा आहे. खरं तर लोकसंगीत हे कष्टकर्‍यांनीच जिवापाड जपले आहे. तेंव्हा या कामगारांनी जपलेले हे लोकसंगीत आता वेगळ्या स्वरूपात सादर होणे आवश्यक आहे. जगभरात लोककलांना मोठ्या आस्थेने जपले जाते. जगभरचे पर्यटक विविध ठिकाणच्या लोककला महोत्सवांना आवर्जून हजर राहतात. हे आपल्याकडे होणे गरजेचे आहे.  शासकीय पातळीवरून होणार्‍या प्रचंड खर्चिक कोरड्या महोत्सवांपेक्षा असे छोटे उपक्रम खुप चांगले आहेत.  

देवगिरीच्या परिसरात पळस, लिंब, गुलमोहर, बहावा ही झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. तेंव्हा हा नृत्य संगीतासोबत रंगाचाही उत्सव होवून जातो. अजिंठ्याच्या रूपाने चित्रांची एक मोठी परंपरा या परिसरात होती याचा जागतिक पातळीवरचा पुरावाच उपलब्ध आहे. वेरूळचे जगप्रसिद्ध कैलास लेणंही एकेकाळी केवळ दगडाचे नसून संपूर्ण रंगीत होते. तेंव्हा असा संगीत-नृत्य- रंग महोत्सव मोठ्या प्रामाणात होणे आवश्यक आहे. 23 एप्रिल शेक्सपिअर दिवस आहे. तेंव्हा नाट्याचीही जोड याला देता येईल.  

(1 ते रोजी सादर झालेल्या कश्मिरी संगीताच्या कार्यक्रमात हे कलाकार सहभागी होते- गुलाम मोहम्मद लोन (रबाब), जहूर अहमद भट (सारंगी), उमर माजीद (संतूर), गुलजार अहमद गाश्रु (मटका).  याच कार्यक्रमात सुस्मिरता डावळकर चे सुमधुर  शास्त्रीय संगीत सदर झाले.) 
           श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

No comments:

Post a Comment