Friday, April 27, 2018

कर्नाटक निवडणुक अंदाजांनी पुरोगामी घायळ


उरूस, सा.विवेक, एप्रिल 2018

कर्नाटकात विधानसभेची निवडणुक होऊ घातली आहे. पुढच्या महिन्यात मतदान होवून नविन सरकार सत्तेवर येईल. या निवडणुकीच्या निकालांचे अंदाज इंडिया टूडे या प्रतिष्ठित वृत्तसंस्थेने जाहिर केले आहेत. या अंदाजांप्रमाणे कॉंग्रेसला जास्तीत जास्त 100 जागा मिळू शकतात. (आपण जास्तीच्याच जागा गृहीत धरू.) भाजपला कमीत कमी 80 जागा मिळू शकतात. (पुरोगाम्यांच्या सोयीसाठी भाजपच्या कमीच जागा गृहीत धरू.) माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाने  मायावतींच्या बहुजन समाजपक्षा सोबत युती केली आहे. त्यांना 35 जागा मिळतील असे हे सर्वेक्षण सांगते. शिल्लक 9 जागा अपक्ष व इतरांना मिळतील असा अंदाज आहे. (एकुण जागा 224 अधिक एक नेमलेला सदस्य). सध्या कॉंग्रेसच्या ताब्यातील हे एकमेव मोठे राज्य आहे. (पंजाब कॉंग्रसच्या ताब्यात आहे पण तिथे लोकसभेच्या केवळ 13 जागा आहेत. तर कर्नाटकात 28 आहेत.) 

आता या सर्वेक्षणानुसार कॉंग्रेसची सत्ता परत येईल का याची खात्री देणं मुश्किल झाले आहे. आणि यानेच पुरोगामी घायाळ झाले आहेत. या सर्वेक्षणाबद्दल संशय यावा अशी एक आकडेवारी यात आहे. ती म्हणजे सत्ता स्थापनेसाठी जास्तीत जास्त लोकांनी कॉंग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांनी एकत्र यावे असे मत व्यक्त केले आहे. 

सध्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे मुळचे भारतीय लोकदलाचे. मग ते जनता पक्षात गेले. पुढे देवेगौडा यांच्या सोबत जनता दलात राहिले. कर्नाटक जनतादल मंत्रीमंडळात अर्थमंत्री राहिले. अगदी उपमुख्यमंत्री सुद्धा राहिले. नंतर ते कॉंग्रेसमध्ये गेले आणि आमदार म्हणून निवडून आले. 2013 पासून ते मुख्यमंत्री आहेत. अशा या मुळच्या समाजवादी सिद्धरामय्यांचे देवेगौडा यांच्याशी जराही पटत नाही. 

नुकत्यात झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत देवेगौडांच्या पक्षाचे सात आमदार त्यांनी फोडले आणि कॉंग्रेसचा खासदार निवडून आणला. परिणामी देवेगौडांचा उमेदवार पराभूत झाला.

या सगळ्या पार्श्वभूमीवर जे निवडणुकपूर्व अंदाज प्रसिद्ध झाले आहेत ते पुरोगाम्यांसाठी काळजी करणारे आहेत. कारण देवेगौडा आणि सिद्धरामय्या यांच्यात विस्तव आडवा जात नाही. दुसरीकडून देवेगौडांचे चिरंजीव माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी जाहिर सभांमधून ‘कुठल्याही परिस्थितीत कॉंग्रेस सोबत जाणार नाही.’ असे ठासून सांगितले आहे. 

यात अजून दूसरी भर म्हणजे ओवैसी यांचा एम.आय.एम.पक्ष उत्तर कर्नाटकातील 50 जागा लढविणार असल्याची घोषणा केली आहे. हा पक्ष भाजपला मदत करतो असा आरोप पुरोगामी आणि कॉंग्रेसवाले करत असतात. तर दुसरीकडे स्वत: ओवैसी ‘कॉंग्रेस व इतर सेक्युलर पक्ष हेच भाजपला मदत करतात’ असा आरोप करत असतात. 

अजूनही डाव्या पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही. बाजूच्या केरळात डाव्यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सत्तेत आहे. त्यांचा प्रमुख विरोध कॉंग्रेस प्रणीत आघाडी आत्तापर्यंत करत आलेली आहे. याचा स्वाभाविक परिणाम म्हणजे कर्नाटकात कॉंग्रेसला कसलेही सहकार्य करू नये असा मतप्रवाह कर्नाटाकातील डाव्या गटांमध्ये आहे. त्यांचा कल देवेगौडा-मायावती युतीकडे आहे. ज्या तत्परतेने मायावती यांनी निर्णय घेवून प्रत्यक्ष अंमलबजावणी केली आहे ती तशी करण्याची हिंमत अजूनही डाव्या पक्षांनी केली नाही. 

डाव्यांचा हीच नीती त्यांच्या अंगाशी येत असते. गुजरातमध्ये भाजपच्या विरोधात इतकी राळ उडवून दिली गेली होती पण एकाही डाव्या पक्षाने प्रत्यक्षात तिथे कॉंग्रेससोबत युती केली नाही. आज बेळगांव भागात सभा घेणारे शरद पवार यांनीही गुजरातेत कॉंग्रेसला कात्रजचा घाट दाखवत स्वतंत्र निवडणुका लढविल्या होत्या. 

भीमा कोरेगांवनंतर देशभरच्या दलित राजकारणावर वर्चस्व मिळवू पाहणारे प्रकाश आंबेडकर अजूनही कर्नाटकात फिरकले नाही. गुजरातेत त्यांनी दौरे केले होते. प्रत्यक्ष निवडणुकीत यांनी कसलीच सक्रिय भूमिका घेतली नाही. आता तर तेवढेही त्यांनी कर्नाटकाच्याबाबत केलेले नाही. 

त्रिपुरात मार्क्सवाद्यांची सत्ता होती. त्या ठिकाणी सगळे पुरोगामी एकवटून त्यांनी प्रचार केला असता तर शक्यता होती मार्क्सवाद्यांचा पराभव झाला नसता. तसेही भाजप आणि मार्क्सवाद्यांच्या मतांत फारसा फरक नाही. पण पुरोगामी मोदी द्वेषाने इतके पछाडलेले आहेत की त्यासाठी ते स्वत:चा नाश करून घ्यायला नेहमीच उत्सूक असतात. 

आता कर्नाटकात त्रिशंकु विधानसभा अस्तित्वात आली तर त्यात व्यवहारिक पातळीवर देवेगौडा किंवा कुमारस्वामी हे नितीशकुमार यांच्या पायावर पाय ठेवून भाजप सोबत जाण्याची जास्त शक्यता आहे. 

सर्वेक्षणाप्रमाणे कॉंग्रेस आणि देवेगौडा यांचीच युती होईल हे आपण गृहीत धरू. मग दुसरा प्रश्‍न समोर येतो. भाजपच्या सध्याच्या 40 जागा आहेत त्या वाढून 80 होत आहेत. याचे विश्लेषण काय करणार? कारण गुजरातेत कॉंग्रेसच्या 20 जागा वाढल्या तर त्याचे वर्णन ‘नैतिक विजय’ असे केले गेले होते. मग आता भाजपच्या तर 40 जागा वाढत आहेत. मग त्याचे वर्णन ‘दुप्पट नैतिक विजय’ असे करणार का? 

साधारणत: जानेवारीपासून कर्नाटकाच्या लगतच्या राज्यातील भाजप कार्यकर्त्ये त्या त्या लगतच्या कानडी प्रदेशात   कामाला लागले आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघानुसार आखणी केल्या गेली आहे. 2008 ला पहिल्यांदा भाजपने कर्नाटकात सत्ता मिळवली होती. त्यानंतर सत्ता गमावली पण दुसरा क्रमांक शाबूत ठेवत विरोधीपक्षनेते पद पटकावले होते. आताही किमान दोन नंबरचा पक्ष भाजपच असेल हे सर्वच मान्य करत आहेत. 

भाजपला सत्ता न मिळता त्याच्या जागांची संख्या दुप्पट झाली तरी त्यांचा फायदाच आहे. पण कॉंग्रेसची जर सत्ता यदा कदाचित गेलीच तर ती हानी कॉंग्रेस कशी भरून काढणार आहे? 

आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी स्वत: हारल्या होत्या. पण लगेच त्यांनी कर्नाटकातील चिकमंगळूर येथून पोटनिवडणुक लढवली आणि दणदणीत विजय मिळवत राजकारणात पुनरागमन केले. हा दैदीप्यमान इतिहास कॉंग्रेसचे कार्यकर्ते विसरू पहात असतील तर पक्षासाठी ते मुश्किल आहे. सिद्धरामय्या समाजवादी चळवळीतून राजकारणात आले. कॉंग्रेस तर सेक्युलर राजकारणाचे पेटंट आपल्याकडेच आहे अशा तोर्‍यात असते. मग याच कॉंग्रेस सरकारने लिंगायत धर्माच्या स्फोटक मागणीला निवडणुकीच्या तोंडावर हवा का दिली? समोर भाजपकडे येदूरप्पांच्या रूपाने हुकमाचा लिंगायत एक्का असताना ही खेळी खेळण्यात नेमका कुठला राजकीय शहाणपणा होता? 

1989 पासून सतत मिळणारी मते आणि जागा यांचे संतुलन भाजप राखत आला आहे असे सखोल विश्लेषण सुहास पळशीकर यांच्यासारख्या राजकीय अभ्यासकाने केले आहे. देश पातळीवरील हे विश्लेषण कर्नाटकातही गेल्या वीस वर्षांपासून बाबतीत दिसून येते आहे. दक्षिणेतील पहिली लोकसभेची जागा भाजपने इथूनच जिंकली होती. याच राज्यात पहिल्यांदा स्वत:च्या बळावर  सरकारही स्थापन केले होते. आज सर्वेक्षण करताना त्यांना किमान दोन नंबरच्या जागा आणि कॉंग्रेसच्या बरोबरीने मते ही वस्तुस्थिती अभ्यासकांना मान्य करावी लागते आहे. 

खरं तर भाजपचे यश चिवटपणे सातत्याने राबणारे हजारो लाखो कार्यकर्ते यांच्यामुळे आहे. भाजपवर मात करावयाची असेल तर असे नि:स्वार्थी कार्यकर्ते तयार करावे लागतील. त्यांना सतत विधायक कार्यात गुंतवून ठेवावे लागेल. त्यासाठी सामाजिक संस्थांची मोठ्या प्रमाणात उभारणी करावी लागेल. पण हे काहीच न करता भाजपच्या नावाने बोटे मोडत राहणे येवढा एकच उद्योग पुरोगामी करत आहेत. अगदी कुमार केतकरांसारखे विद्वानही ‘2019 मध्ये भाजप जिंकल्यास देशात लोकशाही उरणार नाही’ असली बीनबुडाची विधानं करत आहेत. याचा परिणाम इतकाच होतो की काठावरचा मतदारही भाजपकडे झुकतो.

सर्वेक्षणात कुणालाच स्वत:च्या बळावर सत्ता मिळणार नाही असे भाकित आहे. आणि हीच पुरोगाम्यांना घायाळ करणारी बाब आहे. कारण इतरांसोबत जूळवून घेणे हे यांच्या डिएनए मध्येच नाही. असं नेहमी गमतीत म्हटलं जातं की दोन डावे मिळून तिन पक्ष स्थापन करतात.  (सट्टेबाजांनी भाजप ला पसंती दिली आहे)        

   श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

No comments:

Post a Comment