Monday, February 26, 2018

गारपीटीचा झटका ग्रामीण भागालाच का?


उरूस, सा.विवेक, फेब्रुवारी 2018

मराठवाडा आणि विदर्भात फार मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. दुष्काळ/ गारपीट म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा समोर जे चित्र उभे राहते ते ग्रामीण भागाचे. कोरडा दुष्काळ असेल तर भेगा पडलेली जमीन, आभाळाकडे टक लावून बसलेला सुरकुतलेल्या भकास चेहर्‍याचा दाढीचे खुंट वाढलेला शेतकरी. दुसरे चित्र ओल्या दुष्काळाचे. सर्वत्र साचलेले पाणी. त्यात बुडालेल्या झोपड्या. झाडांवर बसलेली काही माणसे शेळ्या बकर्‍या वासरं. आणि चत्र आहे ते सर्वत्र पांढर्‍या गारांचा खच पडलेला. रब्बीचे उभे पीक झोपलेले. शेतकर्‍यांचे हुंदकेही गारांसारखेच गोठून गेलेले. 

गारपीट दुष्काळ ही काय फक्त ग्रामीण भागाची समस्या आहे? शहरी भागात गारपीट होत नाही का? दुष्काळ असत नाही का? या प्रश्नातच या समस्या मानव निर्मित किती आणि निसर्ग निर्मित किती याचे उत्तर मिळते. आजतागायत गारपीटीत गारठलेले शहर असे चित्र आपल्याला दिसले नाही. शहरात गारा पडल्याच्या बातम्या येतात. गारा वेचणारी मुले दाखवली जातात. एखाद्या दिवसांत काय कांही तासांत परिस्थिती परत पूर्वपदावर येते. खेड्यात मात्र असे होताना दिसत नाही. गारांच्या माराने तकलादू झोपड्या जमिनदोस्त होतात. शेतातील पीकांचे तर आतोनात नुकसात होते. नुकताच मोहोर लागू लागलेली आंबराई सगळा मोहोर झडून आख्खीच्या आख्खी ‘गार’ होवून जाते. वेलींना लगडलेली द्राक्षेही पूर्णपणे झोपतात. गारपीटीने झालेल्या नुकसानीचे काय करावे? त्याचे पंचनामे कधी होणार? त्यातून बाहेर येण्यासाठी तातडीची मदत कधी मिळणार? खेडे लवकर पूर्वपदावर येत नाहीत. कारण मुळात तिथली व्यवस्थाच कोलमडून पडलेली आहे.

तेंव्हा सगळ्यात पहिल्यांदा जो मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागतो तो हा की गारपीट/दुष्काळ हा निसर्ग निर्मित जेवढा आहे तसाच मानव निर्मितही आहे. आपली व्यवस्थाच अशी आहे की गारपीट/दुष्काळाची झळ बसली की ग्रामीण भाग होरपळून जावा. म्हणजे ज्या काही सोयी सवलती उपलब्ध आहेत त्या प्रामुख्याने शहरी भागासाठी आहे. पिण्याचे पाणी, चांगले रस्ते, चोवीस तास वीज, नियोजनाचा किमान आराखडा या बाबी सगळ्या शहरांसाठी आहेत. चारचाकी वाहनांसाठी कमी दराने कर्ज, कुठल्याही व्यवसायासाठी कर्जपुरवठा, विम्याचे संरक्षण, घर बांधणीसाठी कर्ज या सगळ्यांतून शहरातील उद्योग व्यवसाय नौकरी करणार्‍यांना आपत्ती पासून एक सुरक्षा कवच लाभते. पण याच्या उलट ग्रामीण भागाचा विचार केला तर या सगळ्यांतून त्यांना वगळलेले दिसून येते. याचा परिणाम असा होतो की जेंव्हा केंव्हा अशा आपत्ती येतात त्याची तीव्रता याच ठिकाणी जास्त जाणवते. आधीच कुठले संरक्षण नाही. मग आपत्तीत  सगळेच उघडे पडते. 

नैसर्गिक आपत्तीसाठी आधीपासून नियोजन करायला पाहिजे. पण आपण हे लक्षात घेत नाही. मग आपत्ती प्रत्यक्ष अंगावर कोसळला की ओरड सुरू होते. काही तरी जूजबी मदत दिली जाते. ज्यातून फारसे काहीच साधत नाही.

शहरांतल्या बहुतांश लोकांचा असा समज आहे की शेतकरी मुर्ख आहे. त्याने विम्याचे संरक्षण घ्यायला पाहिजे. पीकविमा ही अतिशय किचकट आणि भिषण गोष्ट आहे ही बाब यांना माहितच नसते. आता फेब्रुवारी महिना आहे. विम्याच्या पॉलिसी काढा म्हणून एजंट अक्षरश: पिच्छा करताहेत असे चित्र शहरात पहायला मिळते. गाडीचा विमा करायचा आहे किंवा दुकानाचा विमा करायचा आहे किंवा वैयक्तिक विमा करायचा आहे. सगळ्यासाठी ग्राहकाकडे चकरा मारणारे एजंट असे चित्र पहायला मिळते.

याच्या नेमके उलट ग्रामीण भागात आहे. शेतकरी विमा भरण्यासाठी बँकांमध्ये दिवसेंदिवस रांगा लावून उभे आहेत. पण त्यांचे काम होताना दिसत नाही. आणि अशी आपत्ती जेंव्हा येते तेंव्हा त्या विम्याचा फायदा मिळालेलाही दिसत नाही. याचे सरळ साधे कारण म्हणजे शेतमाल विमा हा पूर्णपणे तोट्यात जाणारा व्यवसाय आहे. तो करण्यास कुणीही तयार होत नाही. कारण आपल्याकडची बहुतांश शेती आभाळाखालची शेती आहे. तिला कुठलेही संरक्षण नाही. ती रामभरोसे असल्याने अशा शेतीच्या विमा व्यवसायात कुठल्या कंपनीला रस असणार? 

मुळात शेती तोट्यात आहे याचा सगळ्यात मोठा पुरावा हाच आहे की कुठलीही विमा कंपनी शेतमालाच्या विम्यासाठी पुढे येत नाही. मग आपण परत मूळ विषयापाशी येवून थांबतो. जर शेती तोट्याचीच राहिली किंवा ती तशीच रहावी म्हणून धोरणे राबविली तर नैसर्गिक आपत्तींपासून शेतीला वाचवायचे कसे? 

शेती तोट्यात जाणं ही वेगळी गोष्ट आहे आणि शेतीत तोट्यातच रहावी म्हणून प्रयत्न करणे ही वेगळी गोष्ट आहे. तेंव्हा हे लक्षात घेतले पाहिजे की शेतीला तोट्यात ठेवण्याचा उद्योग आता बंद केला पाहिजे.
सर्व पर्यावरण तज्ज्ञ सातत्याने सांगत आहेत की निसर्गाचे आचरण बदलत चालले आहे. चार महिने नियमित पाऊस, चार महिने थंडी आणि चार महिने ऊन असे चक्र आता नाही. वर्षभराचा पाऊस केवळ काही दिवसांतच पडून जातो आहे. अचानक थंडी वाढत आहे. अचानक उनाचा कडाका जाणवत आहे. मग या सगळ्यांना तोंड देणारी यंत्रणा शेतीत उभी करणार की नाही? 

पहिली गोष्ट आता उघड्या आभाळाखालची शेती शक्य नाही. शेती बंदिस्त अशा  पॉलि हॉऊसमधून करावी लागणार आहे. त्यासाठी त्याची मोठी किंमत आम्हाला मोजावी लागणार आहे. दुसरी गोष्ट हवामान बदलाला टिकून राहणारे बियाणे आम्हाला तयार करावे लागेल. म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाची  कास धरावी लागेल. पाऊस लांबला तरी कोरड्या मातीत टिकून राहणारे बियाणे तयार करावे लागणार आहे. म्हणजे पावसाने ओढ दिली तरी दुबार पेरणी करण्याची गरज पडणार नाही. बंदिस्त शेतीत गारपीटीसारखे धोके कमी संभवतात किंवा किमान नुकसान होते.

बंदिस्त शेतीचा मोठा फायदा म्हणजे नियंत्रित हवामान. पिकांवर परिणाम करणार्‍या सगळ्याच घटकांचे नियंत्रण करणे शक्य होते. फळं, भाज्या, फुलं यांच्यासाठी बंदिस्त असे पॉलि हाऊस जास्त परिणामकारक ठरू पहात आहेत. यांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. या बंदिस्त व्यवस्थेत खते, किटकनाशके, जंतू नाशके, पाणी सगळ्याचे प्रमाण मोजून पुरवठा करणे शक्य होते. याचा परिणाम म्हणजे उत्पादन जास्त प्रमाणात मिळते, त्याचा विशिष्ट दर्जा राखणे शक्य होते. विशेषत: जेंव्हा आपण निर्यात करतो तेंव्हा शेतमालाचा विशिष्ट दर्जा राखणे अतिशय आवश्यक असते. ही गोष्ट आभाळाखालच्या शेतीत अवघड असते. 

अवकाळी पाऊस किंवा गारपीटीने मोठे नुकसान होते ते उघड्यावर साठवलेल्या शेतमालाचे. आपल्याकडे जवळपास कुठल्याच बाजार समित्यांमध्ये शेतमाल साठवणुकीची अत्याधुनिक यंत्रणा अस्तित्वात नाही. या दृष्टीने फारसे प्रयत्नही केल्या गेले नाहीत. बहुतांश शेतमाला व्यापार हा उघड्यावर होतो. हे चित्र बदलावे लागेल. 

गरपीट ही सहसा फेब्रुवारी महिन्यात होते. म्हणजेच रब्बीच्या हंगामात गारपीट होते. ही पिकं पाण्यावरची पिकं समजली जातात. ही पिकं जास्त नाजूक असतात. कोरडवाहू पिकांसारखी चिवट नसतात. यांना किंमतही जास्त मोजावी लागते. या पिकांच्या संरक्षणासाठी हवामान खात्यांकडून धोक्याची पूर्व सुचना मिळाल्यास काही अंशी यंत्रणा उभी करता येते. द्राक्षांच्या बाबतीत असे काही प्रयोग केल्या गेले आहेत. पण त्यांची व्याप्ती फारच मर्यादीत आहे.

गारपीट-दुष्काळ-पूर या न टाळता येणार्‍या नैसर्गिक आपत्ती आहेत. पण त्यांच्यावर मानवी बुद्धीचा वापर करून मात करता येवू शकते. वारंवार माणसाने हे सिद्धही करून दाखवले आहे. पण हतबलता तेंव्हा येते जेंव्हा या माणसाचे हात बांधले जातात. त्याला मुक्तपणे आपला व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य बहाल केले जात नाही. 

कायमस्वरूपी शहरी लोकांना स्वस्त द्यायचे, उद्योगांना कच्चा माल स्वस्त द्यायचा म्हणून आपण शेतीची जाणीव पूर्वक उपेक्षा करत राहू तर शेतीची समस्या आपल्याच मानगुटीवर येवून बसल्याखेरीज राहणार नाही. शेतीकडे उपेक्षेने पाहणार्‍यांनी लक्षात ठेवावे इतकी सगळी परवड होवूनही शेतीकर्जाची सगळी मिळून रक्कम जेमतेम तीन लाख कोटी पेक्षाही कमी आहे. पण तेच नागरी बँकांचे एन.पी.ए.चे प्रमाण तीन लाख कोटींचा टप्पा पार करून गेले आहे. म्हणजे ज्याला लूटले त्याच्यावर अन्यायाने लादलेल्या रक्कमेपेक्षाही ज्यांनी लुटले त्यांची अधिकृत दरोडेखोरीची रक्कम जास्त आहे. ग्रामीण भागात म्हण आहे ‘सतीच्या घरी बत्ती अन_ शिंदळीच्या घरी हत्ती’.. त्यातलाच हा प्रकार झाला.  

       श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, February 20, 2018

तरूणांच्या लेखणीतून उमटत आहेत बुद्ध कबीर तुकाराम


उरूस, सा.विवेक, फेब्रुवारी 2018

निळा रंग म्हणजे बुद्ध नव्हे 
प्रत्येक रंगातलं निळेपण बुद्ध आहे

ही अप्रतिम ओळ आहे रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात शिकणार्‍या विजयकुमार बिळूर या विद्यार्थ्याची. त्याही ही कविता प्रतिभा संगम साहित्य संमेलनात पहिल्या क्रमांकाची ठरली. 
आजच्या तरूणांबद्दल सतत तक्रार करणार्‍यांनी विजय सारख्यांच्या कविता त्यांची संवेदनशीलता खरंच प्रमाणिकपणे समजून घ्यावी. म्हणजे त्यांना कळेल आजचे तरूणही किती प्रगल्भ असा विचार आपल्या कवितेतून मांडत आहेत. विजयने आपल्या कवितेचा शेवट जो केला आहे तोही असाच आहे ...

बुद्ध तुमच्यात माझ्यात 
आपल्यात नक्कीच आहे
गरज आहे ती फक्त
आपापल्या देवळांची 
रचना बदलण्याची
तुम्हाला तुमच्या देवळातही
बुद्ध दिसेल..

बामियानाच्या बुद्ध मुर्ती तालिबान्यांनी पाडल्या त्याची तीव्र प्रतिक्रिया आज विजय सारख्या तरूणांच्या कवितेतून शांतपणे उमटताना दिसत आहे. केवळ विजयच नव्हे तर दुसरा क्रमांक पटकावलेला एम.जे. महाविद्यालय जळगांवचा गोपाल बागुल नामदेव ढसाळच्या कवितेशी आपले नाते सांगत लिहून जातो

गटारीत फेकुन मारलेली कविता
कुणाच्या कविसंमेलनात वाचायची?
ती जन्मजात होती
अभिजात 
मुक्तछंदात 
मग कुणी कापले 
तिचे स्तन, 
कुणी कापले तिचे हात
आकलनाने रचलेले शब्द
कसे बिथरले? 

या तरूणांचा विचारांचा आवाका बघितला की खरंच आवाक व्हायला होतं. विजय किंवा गोपाल सारख्यांच्या कवितांना सामाजिक संदर्भ आहेत तसेच स्वप्निल चव्हाण सारख्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी अलगदपणे लिहून जातो उबदार माया करणार्‍या घराची कविता

ज्या घरांच्या भिंतीनाही जाणवतो स्पर्श
आपुलकी आणि जिव्हाळ्याचा
ज्या घरांतली माणसं आसुसलेली असतात
माणसांना आपल्यात सामावून घेण्यासाठी
ज्या घरांच्या स्पंदनांच्या लयीत
सहज विरघळत जातो गडद एकटेपणा
ज्या घरांतली माणसं परस्परांशी
माणसांसारखी वागतात
प्रेमाचा अभिनय न करता
एकमेकांवर नितांत प्रेम करतात

अशा घरांचे ‘ऍड्रेस’
‘बॅटरी डेड’ होईस्तोर
शोधत राहतो ‘गुगल मॅप्स’वर
कुणीतरी...

गेली 25 वर्षे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रतिभा संगम साहित्य संमेलन भरवित आहे. 16 वे प्रतिभासंगम नुकतेच पुण्यात संपन्न झाले. त्यात सहभागी तरूण कविमित्रांच्या या पारितोषिक प्राप्त प्रातिनिधीक कविता. 

मुलं वाचत नाहीत असा सर्रास आरोप केला जातो. पण अशा संमेलनांमधुन समोर येणारं चित्र य आरोपाच्या विपरीत अतिशय आशादायी आहे. मुलांना चांगलं वाचायचं आहे, ते आजूबाजूचे वर्तमान आपली नाजूक भावना, आपल्या तरूण मनाची स्पंदनं तरलपणे टिपू पहात आहेत. पण आपणच त्यांची योग्य दखल घेण्यास अपुरे पडत आहोत. 

विद्यापीठाच्या पातळीवर युवम महोत्सव भरवला जातो. पण त्याचे स्वरूप एक मोठ्या स्नेहसंमेलनासारखे गोंगाटी होवून गेले आहे. यात वाङ्मयीन उपक्रमांना फारसा वाव मिळत नाही. उदा. कवितेचाच विचार करावयाचा तर तरूणांनी आपल्या कविता लिहून आणल्या असतात. त्यांना त्या वाचायच्या असतात. त्यातील विषयांवर चर्चा करायची असते. अगदी प्राथमिक वाटतील अशा बाळबोध शंका विचाराच्या असतात. पण या सगळ्यासाठी मोठ्या झगमगाटी कार्यक्रमांत उसंतच मिळत नाही. मग अशा विद्यार्थ्यांना ‘प्रतिभा संगम’ हे हक्काचे व्यासपीठ वाटते.

या आयोजनाचे वेगळेपण म्हणजे इथे एक संपूर्ण दिवस गटचर्चा ठेवलेल्या असतात. 20-25 विद्यार्थ्यांचे गट केले जातात. हे विद्यार्थी आपल्या कविता प्रथितयश साहित्यीकांसमोर वाचतात. एकमेकांच्या कविता ऐकतात. चर्चा करतात. रात्री कविसंमेलनात मान्यवरांसोबतच निवडक विद्यार्थ्यांना कविता वाचण्याची संधी मिळते. प्रेमाच्या अवथर नाजूक तरल अशा कवितांपासून दाहक समाज वास्तवाचा अंगार शब्दांतून व्यक्त करणार्‍या कवितांपर्यंत सगळ्या प्रकारच्या कविता सादर होतात. आयोजकांनी राखलेल्या शिस्तीमुळे कवितेचे गांभिर्य राखले जाते परिणामी चांगली कविता तरूणांच्या मनापर्यंत व्यवस्थित पोचते. 

प्रतिभा संगमचे सगळ्या मोठे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण आयोजन हे महाविद्यालयीन तरूणच करतात. विजय सुतार सारखा तरूण चांगला कवी यावेळीस संमेलनाचा प्रमुख कार्यकर्ता होता. येवेळसचा विजेता पुढच्या वेळी संयोजकाच्या भूमिकेत जातो. ही एक चांगली प्रथा आयोजकांनी निर्माण केली आहे. 

काही उणीवांचा विचारही आता इतकी वर्षे झाल्यानंतर आयोजकांनी करायला हवा. अतिशय चांगले लिहीणारे कवि जसे आढळून आले तसे किमान दर्जाही नसलेली कविता फार मोठ्या प्रमाणावर आढळून आली. यासाठी विद्यापीठ पातळीवर काहीतरी गाळणी लावली गेली पाहिजे. मुळात महाविद्यालयीन पातळीवर वाचक मंच स्थापन करून निदान मराठीतील महत्त्वाची 100 पुस्तके उपलब्ध करून दिली गेली पाहिजेत. ही पुस्तके नीट वाचून त्यावर चर्चा घडवून आणल्या गेल्या पाहिजेत. ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत वाचक मंचचे उपक्रम जोरकसपणे महाविद्यालयीन पातळीवर चालले पाहिजेत. मग दिवाळी नंतर प्रतिभासंगम चे आयोजन साधारणत: डिसेंबर-जानेवारी महिन्यात जेंव्हा होणार असेल तेंव्हा या वाचक मंडळातील निवडक विद्यार्थ्यांना सहभागी करत हे साहित्य संमेलन महाराष्ट्र पातळीवर भरविण्यात यावे. 

दुसरी एक त्रूटी जाणवते ती म्हणजे विदर्भातील विद्यार्थी यात सहभागी झालेले दिसत नाहीत. विद्यार्थी परिषदेच्या रचनेत विदर्भ हा वेगळा प्रांत आहे हे इतर कार्यक्रमांसाठी समजल्या जावू शकते. पण साहित्य संमेलन सगळ्या मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी असल्याने विदर्भातील विद्यार्थ्यांचा प्रतिभा संगम मध्ये सहभाग आवश्यक वाटतो. 

कवितेसोबतच वैचारिक लिखाण, ब्लॉग, कथा कथन या स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. सगळ्या आयोजनात तरूण मुलं मुली ज्या खेळकर पद्धतीनं एकमेकांशी वागत बोलत होती ती खुपच आशादायी बाब जाणवली. सध्याच्या वातावरणात मुलं मुली एकमेकांत मिळून मिसळून काही एक सकारात्मक सांस्कृतिक काम करत आहेत ही खुपच दिलासा देणारी बाब आहे. 

विद्यार्थी परिषदेच्या लोकांनी आता या संमेलनाच्या आयोजनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली पाहिजे. 

   श्रीकांत उमरीकर, जशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575

Friday, February 16, 2018

शारंगदेव समारोह : समृद्ध संगीत परंपरांचा विलोभनिय अविष्कार


उरूस, सा.विवेक, 4-10 फेब्रुवारी 2018

विद्वान चर्चा करत होते की तेराव्या शतकात देवगिरी किल्ल्यावर यादवांच्या दरबारातील महान संगीतकार शारंगदेव याच्या संगीत रत्नाकर ग्रंथात वर्णन केलेली ‘किन्नरी विणा’ आता अस्तित्वात आहे का? कुणी ती वाजवत असेल का? आणि आश्चर्य म्हणजे तेलंगणातील सुदूर खेड्यात असा एक दलित वादक सापडला जो की आजही ही किन्नरी वीणा वाजवतो. या महान कलाकाराचे नाव दर्शनम मोगुलैय्या. या कलाकाराला तेलगु शिवाय कुठलीही भाषा येत नाही. संगीत अभ्यासक डॉ. इंद्राणी चक्रवर्ती यांनी हा कलाकार शोधून काढला. औरंगाबाद येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ‘शारंगदेव समारोह’ मध्ये दर्शनम मोगुलय्या यांच्या ‘किन्नरी वीणा’ सादरीकरणाने रसिक थक्क झाले. या वाद्यावर विदुषी डॉ. इंद्राणी चक्रवर्ती यांनी आपला निबंध वाचला तेंव्हा त्यावर चर्चा करताना इतर अभ्यासकांना प्रश्‍न पडला की या वाद्यावर सा रे ग म हे स्वर कसे वाजतात. ते वाजवून दाखविण्याचा आग्रह सगळे दर्शनम मोगुलय्या यांना करत होते. पण दर्शनम यांना इतरांची भाषा कळेना. त्यांना खुणेने जेंव्हा वाद्य वाजवून दाखविण्या सांगितले तेंव्हा त्यांनी ते खालून वर वाजवायला सुरवात केली. विद्वान सगळे चकित झाले की एरव्ही वरतून खाली तंतू वाद्य वाजविले जाते. त्याची सरगम तशी आरोहात्मक सांगितलेली आहे. मग हा कलाकार असे खालून वर का वाजवित आहे? 

राजस्थान मधील असेच एक वाद्य ‘रावणहत्था’ याचा अभ्यास करणार्‍या डॉ. सुनीरा कासलीवाल यांना हा प्रकार  लक्षात आला. त्यांनी शारंगदेवाच्या संगीत रत्नाकर ग्रंथाचा संदर्भ देत अवरोहात्मक वादनाचा उल्लेख केला आहे. हे लोककलाकार शिक्षीत नाहीत, त्यांना वाचता येत नाही पण परंपरेने त्यांनी 700 वर्षांनपासून  हे ज्ञान पक्कं आत्मसात केलं आहे. 

गेली 8 वर्षे औरंगाबादला महागामी गुरूकुल ‘शारंगदेव समारोह’ आयोजीत करते आहे. यात संपूर्ण भारतातील विविध नृत्य प्रकार, लोककला, लोकवाद्य, अभिजात कलाप्रकार, विविध वाद्य प्रकार यांचे सादरीकरण होते. याहून महत्त्वाचे म्हणजे या महोत्सवाचाच एक अतिशय मोलाचा भाग म्हणजे ‘शारंगदेव प्रसंग’. म्हणजेच संगीतातील विविध विषयांवर विद्वानांची भाषणं, निबंध वाचन, वाद्यांच्या निर्मितीवर कलेच्या विकासावर चर्चा घडवून आणली जाते. 


या गंभीर चर्चेचा परिणाम म्हणजे ‘किन्नरी वीणा’ सारखे वाद्य सापडणे आणि अवरोहात्मक संगीत व्याख्येचे कोडे उलगडणे. ही एक अतिशय मोठी उपलब्धी या समारोहाची आहे. 

संगीताची लिखीत जवळपास एक हजार वर्षांची मोठी परंपरा आपल्याकडे आहे. त्यातील ज्या नोंदी आहेत त्या प्रमाणे सादर होणार्‍या कला, वाजविली जाणारी वाद्य यांचे सादरीकरण हे अतियश अवघड काम आहे.

या वर्षी पियल भट्टाचार्य यांच्या कलकत्ता स्थित कलामंडळाने ‘मार्ग नाट्य’ हा एक हजार वर्षांपूर्वीचा नाट्याविष्कार मंचावर सादर केला. आधुनिक कलाविष्काराचा कोणताही प्रभाव न पडू देता भरताच्या नाट्यशास्त्राच्या आधारे रंगमंच सादरीकरण करणे हे अतिशय अवघड आहे. पण पियल भट्टाचार्य यांच्या तरूण सहकार्यांनी सादर केलेले हे ‘संकीर्ण भाणक’ (विविध भाषांचा उपयोग केलेले जसे की संस्कृत, पाली, बंगाली, मागधी इ.) रसिकांना खिळवून ठेवणारे होते.

राजस्थान येथील सुगना राम आणि त्यांचे सहकारी यांनी पारंपारिक ‘रावणहत्था’ या वाद्याचा प्रमुख वापर करून ‘झुमर’ हा लोककलेचा प्रकार सादर केला जो की रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला. व्हायोलीन हे आधुनिक पाश्चिमात्य वाद्य जे की गज फिरवून वाजवले जाते त्याची प्रेरणा या ‘रावणहत्था’तून आलेली असल्याचे आता विद्वानांनी संशोधनाने सिद्ध केले आहे. हे वाद्य वाजविणारे हे कलाकार जन्मजात वादक आहेत. त्यांच्या घराण्यात हे वाद्य 700 वर्षांपासून चालू आहे. हे वाद्य ते स्वत:च तयार करतात. लुप्त होत जाणारी ही कला आता शासनाच्या आणि कलाप्रेमींच्या आश्रयामुळे जागरूकतेमुळे वाचली आहे. या वाद्याचा वैशिष्ट्य म्हणजे याच्या गजाला घुंगरू बसविलेले असतात. म्हणजे तंतू वाद्य वाजविताना नादही आपोआप प्राप्त होतो. 

भारतीय कलांचा प्रभाव भारतीय उपखंडातील इतर देशांवरही पडलेला आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मलेशिया येथील प्रसिद्ध उडिसी नर्तक ‘रामली इब्राहीम’. त्यांना ओडिसी नृत्याचे विविध विभ्रम मंचावरून सादर करताना पाहून विश्वासच बसत नव्हता की यांचे वय 65 आहे. ओडिशी गुरू देवप्रसाद दास यांच्या नृत्य परंपरेचे गुरूकुल ते मलेशियात मोठ्या चिकाटीने चालवत आहेत. 

महागामी गुरूकुलाच्या संचालिका ओडिसी व कथ्थक नृत्यांगना सुश्री पार्वती दत्ता यांनी या महोत्सवात ‘धृपदांगी कथ्थक’ हा ऊर्जापूर्ण नृत्यप्रकार सादर करून रसिकांना संमोहित केले. कथ्थक म्हणजे वाजिद अली शाहच्या दरबारातून विकसित झालेला नृत्य प्रकार. हीच प्रतिमा सर्वत्र ठसलेली आहे. असं असताना कथ्थकला धृपदाशी जोडून त्याचे विविध अविष्कार रंगमंचावर सादर करणे हे फार अवघड आव्हान आहे. हे आव्हान पार्वती दत्ता यांनी लिलया पेलले. त्यांनी या प्रकारात सादर केलेली जगदंबा स्तूती नृत्य अभ्यासकांसाठी पर्वणीच होती. 

ग्वाल्हेर घराण्याचे गायक पंडित सत्यशील देशपांडे यांना गाण्यासोबतच या विषयातील अभ्यासू विद्वान म्हणून ओळखले जाते. शेवटच्या सत्रात त्यांचे गायन आणि दुसर्‍या दिवशी त्यांचे ख्याल गायनावर व्याख्यान असा दुहेरी लाभ रसिकांना मिळाला.

ख्यालाचे संदर्भ राजस्थानी संगीतातून आधीपासून सापडतात हे त्यांनी सोदाहरण दाखवून दिले. तसेच ‘खयाल’ पासून ख्याल शब्द आला असेच नसून तालाशी लयीशी केलेली क्रिडा म्हणजेच खेळ यापासूनही हा ‘खयाल’ शब्द आला असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. आपले गुरू कुमार गंधर्व यांच्या गायकिची उदाहरणे देत त्यांनी ग्वाल्हेर घराण्याच्या पारंपरिक बंदिशीही सादर केल्या.


ज्येष्ठ हिंदी कवी अशोक वाजपेयी यांनी आपल्या व्याख्यानातून परंपरा आणि शास्त्र यांच्यातील नाते उलगडून दाखवले. अशोक वाजपेयी यांनी आपल्या देशातील विविधांगी परंपरांचा मागोवा घेत शास्त्राचे जाणकार शास्त्राच्या मर्यादा उल्लंघून कसे पुढे जातात हे पं. कुमार गंधर्व यांचे उदाहरण देवून स्पष्ट केले. 

शारंगदेव समारोहात दरवर्षी एका संगीत विद्वान कलाकार व्यक्तिमत्वाचा गौरव ‘शारंगदेव सन्मान’ देवून केला जातो.  कथ्थक गुरू पद्मविभुषण पं. बिरजू महाराज, धृपद गायक उस्ताद झिया फरिद्दुन्नीन डागर, पं. हरिप्रसाद चौरसिया, भरतनाट्यम गुरू पद्मा सुब्रमण्यम आदींना यापूर्वी हा सन्मान देवून गौरविण्यात आले होते. या वर्षी हा सन्मान संस्कृत तज्ज्ञ, संगीतकार, अभ्यासक पद्मश्री डॉ. मुकुंद लाठ यांना देण्यात आला. मराठी लोकांसाठी अभिमानाची बाब म्हणजे डॉ. लाठ यांनी नामदेवांच्या हिंदी रचनांचा समीक्षात्मक अभ्यास केला असून त्यांचा ग्रंथ संदर्भ म्हणून अतिशय मोलाचा आहे. 

‘शारंगदेव समारोह’ एका वेगळ्या पद्धतीनं आयोजीत केला जातो आहे. संगीत रत्नाकर हा महान ग्रंथ शारंगदेवांनी जिथे लिहीला त्या देवगिरीच्या परिसरात हा समारोह साजरा होतो आहे याला एक वेगळे महत्त्व आहे. मकर संक्रांतीनंतर उत्तरायण सुरू होते त्या मुहूर्तावर या समारोहाचे आयेाजन केले जाते. महागामीचा सगळा परिसर गुरू पार्वती दत्ता यांनी अतिशय कलात्मक रितीने सजवला आहे. या परिसरात प्लास्टिकचा तुकडाही आढळत नाही (खुर्च्याही नाहीत. बसायचा लाकडी लोखंडी अथवा दगडी बाक आहेत. गवताच्या चटया आहेत. सुती सतरंज्या आहेत.). कलाकारांचे कपडे सुती-रेशमीच असतात. कृत्रिम धाग्यांना इथे बंदीच आहे. एकूणच काय तर सगळ्याच कृत्रिमतेला बंदी आहे. 


या महोत्सवाला शासकीय पातळीवर पाठिंबा मिळणे अतिशय आवश्यक आहे. युनेस्कोने गौरविलेले महाराष्ट्रातील हे एकमेव गुरूकुल आहे. या महोत्सवाला परदेशी पर्यटक सुद्धा मोठ्या संख्येने हजेरी लावतात. कारण त्यांना आपल्या परंपरा समजून घेण्यात रस आहे. ‘रावणहत्था’ वाद्याच्या अभ्यासक सुनीता कासलीवाल यांनी सांगितले की परदेशी अभ्यासक जेंव्हा हे वाद्य शिकतात तेंव्हा ते अगदी शाकाहारच घेतात आणि आवर्जून गंगेत स्नान करणे, मंदिरात जावून दर्शन घेणे हे पण करतात. परंपरा समजून घेताना आपणही परंपरेचा आदर करावा याचे भान ते बाळगून असतात.     

आपल्यालाच हे भान बाळगायची गरज सद्यकाळात निर्माण झाली आहे. 

     श्रीकांत उमरीकर, जशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575

Friday, February 9, 2018

‘पेशवाई’ शब्द राजवटीसाठी का वापरला जातो?



गो.स.सरदेसाई हे मोठे इतिहास तज्ज्ञ होते. त्यांनी मुसलमानी रियासत, मराठी रिसायत आणि ब्रिटीश रियासत असे 12 खंड लिहून प्रचंड काम करून ठेवले आहे. आजही त्या तसे काम कुणाला करता आलेले नाही. या ग्रंथांचे पुनर्मुद्रण पॉप्युलर प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.

सरदेसाई यांनी संपूर्ण 8 खंडांत शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठी साम्राज्याचा इतिहास मांडला आहे. या सर्व कालखंडाला ‘मराठी रियासत’ असे नाव दिले आहे. कुठेही ‘पेशवाई रियासत’ असे नाव दिलेले नाही. भीमा कोरेगांव प्रकरणानंतर ज्याला ‘पेशवाई’ म्हणून हिणवल्या जात आहे हा कालखंड नेमका कोणता?
पेशवे हे छत्रपतींचे मुख्य प्रधान होते. त्यांची ‘पेशवाई’ नावाची स्वतंत्र अशी राजवट नव्हती. अधिकार मोठ्या प्रमाणात पेशव्यांजवळ केंद्रित झाले होते हे जरी खरे असले तरी शिक्का चालायचा तो छत्रपतींचाच. दिल्लीचे तख्त फोडल्यावर त्यावर पेशवे किंवा शिंदे हे स्वत: जावून बसले नाहीत.

मराठेशाहीचे जे सरदार होते ते सर्व छत्रपतींच्या नावानेच आपला कारभार करायचे. पुढे पेशवे दुबळे झाले तेंव्हा इंदूर सारखे संस्थान आणि अहिल्याबाईंसारखी कर्तबगार स्त्री स्वतंत्र निर्णय घेवून कारभार करत राहीली. पण तिच्या राजवटीला ‘अहिल्याशाही’ असे नाव कुणी दिले नाही. याच प्रमाणे ग्वालेरच्या राजवटीला ‘शिंदेशाही’ किंवा बडोड्याच्या राजवटीला ‘गायकवाडी’ असे संबोधले गेले नाही. शिंदेशाही किंवा गायकवाडी असे उल्लेख स्थानिक संदर्भातच फक्त येतात. संपूर्ण राजवटीसाठी कधीच नाही.

शिवाजी महाराजांच्या आधी शहाजी राजे निजामशाहीत सरदार होते. मलिक अंबर हा निजामशाहीचा वजीर होता. त्यानेच प्रामुख्याने निजामशाही जिवंत ठेवली, वाढवली. औरंगाबाद सारखे उत्तम नगर रचना असलेले शहर 16 व्या शतकात निर्माण केले. गनिमी काव्यासारखी युद्धनिती इथल्या सैनिकांना शिकवली. मोगलांविरूद्ध दक्षिण भारताची अस्मिता जागृत केली. पण असे असले तरी या कालखंडाला ‘मलिकशाही’ म्हणून संबोधले जात नाही. हा कालखंड निजामशाही म्हणूनच संबोधला जातो. इतकेच काय पण मुतूर्जा निजाम या निजामाच्या नातवाला मांडिवर घेवून शहाजी राजांनी स्वतंत्र कारभार करण्यास सुरवात केली. पण त्याही कालखंडाला ‘शहाजीशाही’ असे कुणी संबोधत नाही.

मादण्णा आणि आकण्णा हे दोघे बंधू कुतूबशहाचे वजीर म्हणून कार्यरत होते. शिवाजी महाराजांनी जेंव्हा गोवळकोंड्याला भेट दिली तेंव्हा तो सगळा भेटीचा योग याच बंधूंनी घडवून आणला होता. पुढे शिवाजी महाराज श्रीशैल्यंम च्या देवस्थानला गेले. मराठेशाही आणि कुतूबशाही यांच्यात सलोखा निर्माण करण्यात या मादण्णा आणि अक्कण्णा यांच फार मोठा वाटा मानला जातो. पण या कालखंडाला ‘मादण्णाशाही’ म्हणून संबोधले गेलेले नाही. याला कुतूबशाहीच म्हणतात.

पुढे कुतूबशाही मोगलांनी बुडवल्यानंतर मीर कमरूद्दीन यांस मोगलांनी दक्षिणेचा सुभेदार बनवले. मोगलांच्या दुफळीचा फायदा घेत त्याने स्वत:ची स्वतंत्र राजवट स्थापन केली. त्याला ‘असफजाही’ राजवट असे संबोधल्या गेले.  पण कमरूद्दीन जेंव्हा मोगलांची चाकरी करत होता त्या काळाला ‘असफजाही’ म्हणत नाहीत.

कमरूद्दीनने स्वत:ला ‘निजाम’ ही पदवी धारण केल्या मुळे बर्‍याचदा या कालखंडाला ‘निजामी’ राजवट असेही बोली भाषेत संबोधले जाते.

या प्रमाणे पेशव्यांनी पुण्यात कुठल्याही स्वतंत्र राज्याची स्थापना केली नाही. कुठल्याही नविन पेशव्याची नेमणुक ही सातार्‍याच्या छत्रपतींच्या आदेशानेच होत होती.

आजही सातारची गादी, कोल्हापुरची गादी इतकेच काय पण मराठेशाहीचे सरदार म्हणविल्या गेलेले होळकर, गायकवाड, पवार या संस्थानच्या गाद्या आहेत. त्यांचे त्यांचे वंशज गादीवर आहेत. त्यांच्या त्यांच्या प्रचंड प्रमाणातल्या जायदादी आहेत. पण पेशव्यांची कुठलीही गादी नाही. पेशव्यांची कुठेही डोळ्यात भरावी अशी स्थावर जंगम मालमत्ता नाही. असे असतानाही ‘पेशवाई’ या नावानं उपहास का केला जातो?

मराठेशाहीच्या अतिशय बिकट अशा कालखंडात संभाजीपुत्र शाहू यांना मोगलांच्या कैदेतून सोडवून सातारा येथे छत्रपती म्हणून प्रस्थापित करण्याचे काम पेशव्यांनी केले. सामान्य जनतेच्या मनात असलेले छत्रपतींचे स्थान प्रत्यक्षात गादी वाचवून बळकट केले. आजही सातार्‍यात छत्रपतींचे वंशज आहेत. छत्रपतींची गादी आहे. कोल्हापुरलाही राजाराम महाराजांची गादी आहे. आजही मराठी माणूस या गाद्यांना मुजरा करतो.

पेशवाई म्हणून हिणवत असताना फुले काळातील ब्राह्मणेतर चळवळीचा संदर्भ दिला जातो. जो आता पूर्णत: गैरलागू झाला आहे. आताची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. ज्या गावगाड्यांत जाती जातींचे संघर्ष तीव्र होते, आजही काही प्रमाणात का होईना संघर्ष आहेत त्या गावगाड्यांतून ब्राह्मणसमाज स्थलांतरीत झाला आहे.
आज महाराष्ट्राचा जर विचार केला तर तालूक्याचे गांव अथवा नगर पालिकेचे  गांव वगळ्यास इतर ठिकाणी ब्राह्मण औषधालाही सापडत नाही. ज्या शहरी व्यवस्थेत ब्राह्मण स्थलांतरीत झाले आहेत तेथील समस्या जातींवर आधारीत नसून त्या नागरिकीकरणाच्या नविन काळातल्या अशा वेगळ्यात आहेत. तेथे इच्छा असो अगर नसो जातीला तुलनेने दुय्यम स्थान आपोआपच प्राप्त झाले आहे.

म्हणजे ज्या ब्राह्मणी वर्चस्वावर आजही पुरोगामी नेते विचारवंत टिका करत राहतात त्या गावगाड्यात ब्राह्मण शिल्लकच नाही. आणि जिथे ते मोठ्या संख्येने एकवटलेले आहेत तेथिल समस्या या जून्या पद्धतीच्या जातींवर आधारलेल्या व्यवस्थेसारख्या नाहीत.

मग हे समजून घेणार की नाही? शहरातील ब्राह्मण आज ज्याला पुरोगामी म्हणता येईल अशी विचारसरणी अवलंबणारेच जास्त संख्येने आहेत. मग परत त्याच्या समोर ‘मनुस्मृती’, ‘पेशवाई’ ही तुणतूणी का वाजवली जातात?

आज मनुस्मृती प्रमाणे आचरण कुठे शिल्लक आहे? मुळात ‘पेशवाई’ म्हणजे काय हे स्पष्ट झाले पाहिजे. पेशव्यांनी संपूर्णत: कारभार छत्रपतींना स्वामी मानूनच केला. मग छत्रपतींची कारकीर्द ही मनुस्मृती प्रमाणे होती असे मानावयाचे का?  उत्तर पेशवाईच्या काळात दलितांवर अत्याचार झाले हे पूर्णत: खरे आहे. पण त्यासाठी संपूर्ण ब्राह्मण जातीलाच दोष देत बसणे यातून काय साध्य होणार आहे?

स्वत: ब्राह्मणांचे तर काही नुकसान होण्याची सुतराम शक्यता नाही. कारण त्यांनी गावगाड्याच्या जून्या व्यवस्थेतून केंव्हाच अंग काढून घेतले आहे. जे सतत ही भाषा वापरतात त्यांची मानसिकता आता विकृत होत जाताना दिसत आहे.  मनुस्मृती पेशवाई चा घोष जेंव्हा नविन पिढी ऐकते आणि ती शोधू पहाते की असा ब्राह्मण आपल्या आजूबाजूला कुठे आहे? तर त्यांना तो जवळपास आढळतच नाही. ‘भ भटजीचा’ असे फक्त जून्या बाराखडीच्या पुस्तकातच होते. आता तसा भटजी लग्न समारंभ आणि काही धार्मिक सोहळे सोडले तर कुठेच दिसत नाही. (मुळात भटपण करणे ही ब्राह्मणांच्या जातीतील केवळ एका अल्पसंख्य पोटजातीचे काम आहे. सगळ्या ब्राह्मणांना पुजा सांगण्याचा आणि दक्षिणा मागण्याचा अधिकार नाही. हे बर्‍याच जणांना माहित नाही. अगदी आत्ता आत्तापर्यंत पुजा सांगणार्‍या ब्राह्मणांसोबत इतर ब्राह्मण बेटी व्यवहार करत नव्हते.तीच स्थिती मरणोत्तर विधी करणारे ब्राह्मण. हे विधी करण्याचा हक्क सर्व ब्राह्मणांना नाही.)  आजच्या तरुणाला सोबतच्या ब्राह्मण मित्रांच्या गळ्यात न जानवे असते ना ते मांसाहाराला नाही म्हणतात ना त्यांची भाषा वेगळी असते. मग या तरूण मुलांना हे उलगडत नाही की ही टीका नेमकी कुणावर केली जात आहे?

(या लेखावर टीका करणार्‍यांना कडक सुचना. माझे मित्र आणि माझ्या मुलांचे मित्र मैत्रिणी इतर जातींचे मोठ्या प्रमाणावर आहेत. शिवाय माझ्या नातेवाईकांमध्ये 22 विवाह आंतर जातिय -आंतर धर्मिय- आंतर देशिय झालेले आहेत. तेंव्हा जीभ वाट्टेल तशी उचलून टाळ्याला लावताना विचार करावा.)




  

Tuesday, February 6, 2018

चित्रपट साक्षरतेसाठी प्रयत्नांची गरज


उरूस, सा.विवेक, 16-22 जानेवारी 2018

48 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात नोव्हेंबर 2017 ला पार पडला. पुण्याचा चित्रपट महोत्सव सुरू आहे. औरंगाबादला 18 ते 21 जानेवारीत होत आहे. नागपुर-सोलापुरला पण चित्रपट महोत्सव रूजले आहेत. मुंबईत स्थापन झालेले ‘प्रभात चित्र मंडळ’ आता आपला सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे. 5 जूलै 1968 ला या फिल्म सोसायटीची स्थापना झाली. 

बर्‍याचजणांना असे वाटते की आपल्याला डोळे आहेत. तेंव्हा चित्रपट पाहणे यासाठी वेगळं काही करण्याची गरजच काय? तसाही भारतात सिनेमा हे अतिशय लोकप्रिय माध्यम राहिलं आहे. चित्रपट तुफान चालतात. नायक-नायिकांना अतोनात पैसे मिळतात. रसिकांचे प्रेम मिळते. मग या सगळ्यात फिल्म सोसायटी काढून महोत्सव भरवून वेगळं असं सांगण्याची काय गरज? 

आधी चित्रपट पाहायचा तर टॉकिजवर जावे लागायचे. आता टिव्ही मुळे तो आपल्या घरात शिरला आहे. इतकेच काय मोबाईलमुळे आता तर तो अगदी हाताच्या मुठीतच आला आहे. मनोरंजन म्हणून चित्रपटाकडे पाहणार्‍यांचा काही प्रश्‍नच नाही. त्यांना काही म्हणून प्रश्‍न पडतच नाहीत. दोन एक तास फुल्ल करमणुक झाली की विषय संपला. वर्षातून असे निदान पाच दहा चित्रपट तरी हिंदीत निघतातच. बाकी हॉलिवूडला तर गल्लाभरू चित्रपटांची भरमसाठ संख्या असते. बिनडोक करमणुकवाल्यांची गरज भागते. 

पण या शिवाय चित्रपट ही एक कला आहे. जागतिक पातळीवर या कलेकडे गांभिर्याने पाहणारे लोक आहेत. विविध प्रयोग जगभर निर्माते दिग्दर्शक करत आहेत. गेल्या शंभर दिडशे वर्षांपासून जगभर चित्रपटांचा प्रवास चालू आहे. हे चित्रपट पाहताना त्यातील कलात्मकता काही लोकांच्या लक्षात यायला लागली.  मग चित्रपट कसा पहावा? त्याची म्हणून वेगळी चित्रभाषा असते ती कशी समजून घ्यावी? अभिजात चित्रपट कसा असतो? हे प्रश्‍न जास्तच तीव्रतेने पडायला लागले आहेत. यासाठी जगभर ‘फिल्म सोसायटी’ची चळवळ वाढीस लागली. मुंबईत आणि तेही परत मराठी माणसांच्या पुढाकाराने ‘प्रभात चित्र मंडळ’ स्थापन झाले.
सत्यजीत राय यांचे नाव सर्वांना माहित असते. त्यांच्या चित्रपटांची माहिती असते. त्यांचे काही चित्रपट पाहिलेलेही असतात. त्यांच्या चित्रपटांवर चांगले लिखाण अगदी मराठीतही आता आले आहे. पण याच सत्यजीत राय यांनी बंगालीत चित्रपट सोसायट्यांची मोठी चळवळ राबविली याची फारशी माहिती नसते. 

महाराष्ट्रात जी विभागीय केंद्र शोभावीत अशी मोठी गावी आहेत निदान तिथे तरी चित्रपट सोसायटी ‘फिल्म क्लब’ स्थापन झाले पाहिजेत. वर्षभर विविध चित्रपट, त्यांच्यावर चर्चा, तज्ज्ञांची भाषणे, माहिती मिळाली पाहिजे चिकित्सा झाली पाहिजे. वर्षभर अशा उपक्रमांची परिणीती म्हणजे मग त्यातून एक वार्षिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरवला गेला पाहिजे. 

बर्‍याचजणांना वाटते की चित्रपट काय कुठेही पहायला मिळतात. पण तसे होत नाही. अजूनही बरेच चांगले दर्जेदार चित्रपट यु ट्यूब वर किंवा इतरत्र कुठेच उपलब्ध नाहीत. शिवाय चांगल्या चित्रपटांची माहितीही उपलब्ध होत नाही. खरे तर आता जी संपर्काची साधने आहेत त्यांचा वापर करून चांगल्या चित्रपटांची सविस्तर माहिती रसिकांपर्यंत पोचवता येते. 

चित्रपट महोत्सवात केवळ नवेच चित्रपट दाखविले जातात. त्यातील बरेच चित्रपट तर पुढे प्रदर्शित होतही नाहीत किंवा कुठे/केंव्हा प्रदर्शित होतात हेही कळत नाही. मग असे चांगले चित्रपट गोळा करून ते चित्रपट सोसायट्यांच्या माध्यमांतून दाखवता येऊ शकतात.  

असाही आरोप केला जातो की आजकालची तरूण पिढी चांगले दर्जेदार चित्रपट पहातच नाही. त्यांना काहीतरी अश्‍लील बिभत्स हाणामारी पाहण्यातच रस असतो. औरंगाबादला मागच्या वर्षी उद्घाटनाच्या सत्रात ‘रऊफ’ हा तुर्की भाषेतला चित्रपट दाखवला गेला. एका 12 वर्षाच्या मुलाचे मोठ्या मुलीशी असलेले एकतर्फी प्रेम आणि पार्श्वभूमीवर त्या प्रदेशातील युद्धजन्य परिस्थिती असा गंभिर विषय होता. पण त्याला तरूणांनी प्रचंड प्रतिसाद दिला. इतकंच नाही तर सगळ्यांनी आग्रह करून संयोजकांना या चित्रपटाचा अजून एक खेळ ठेवण्यास भाग पाडले.

चित्रपट साक्षरता असा एक शब्दप्रयोग या क्षेत्रातील तज्ज्ञ करतात. त्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. अगदी अलीकडे मराठीतसुद्धा ‘कोर्ट’, ‘कासव’, ‘लेथ जोशी’ सारखे वेगळी चित्रभाषा असलेले चित्रपट येत आहेत. हे कुठल्याच रूढ अर्थाने मराठी चाकोरीबद्ध चित्रपट नाहीत. ‘लेथ जोशी’ या अजूनही प्रदर्शित न होवू शकलेल्या चित्रपटात पार्श्वसंगीतासाठी सारंग कुलकर्णी या तरूण कलाकाराच्या सरोद वादनाचे तुकडे अप्रतिम रित्या चपखल असे वापरले आहेत. तरूण दिग्दर्शक मंगेश जोशी यांनी संपूर्ण चित्रपटाची हाताळणी अतिशय वेगळी केली आहे. (हा चित्रपट अगदी अलीकडचा आहे म्हणून हा उल्लेख केला.)

जागतिक पातळीवर मुव्ही, म्युझिक, मॅथेमॅटिक्स या तीन ‘3 एम‘ ची भाषा आंतरराष्ट्रीय म्हणून ओळखल्या जाते. आपल्याकडे संगीत आणि गणित यांची फार मोठी परंपरा आहे. पण तसे चित्रपटांच्या बाबतीत मात्र म्हणता येत नाही. खरं तर भारतीय चित्रपटांची जननीच आपला महाराष्ट्र आहे. भारतीय चित्रपट सृष्टीचे पितामह म्हणून दादासाहेब फाळके या मराठी माणसाची ओळख आहे. परेश मोकाशी यांनी ‘हरिश्चंद्राची फॅक्ट्री’ हा अतिशय सुंदर चित्रपट फळक्यांवर बनवला आहे. पण हा अजूनही फारसा पाहिला गेला नाही. 

दादासाहेब फळक्यांवर जया दडकरांनी अतिशय मोलाचा ठरावा असा चरित्र ग्रंथ लिहीला आहे. ‘दादासाहेब फाळके : काळ आणि कर्तृत्व’ या नावाचा हा ग्रंथराज मौज प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. पण आपण अजूनही हा ग्रंथ सर्वत्र पोचविण्यात अपुरे पडलो आहोत. (पहिली आवृत्ती 22 डिसेंबर 2010). 

चित्रपट संस्कृती म्हणत असताना त्यात चित्रपट सोसायट्या, चित्रपट महोत्सव, चित्रपटांवरील चांगले लिखाण, चित्रपटांवर चर्चा, मोठ्या प्रयोगशील दिग्दर्शकांशी संवाद, चित्रपट विषयक मासिके या सगळ्यांचा आतंरभाव आहे. विष्णुपंत दामल्यांवर ‘दामले मामा’ (लेखिका मंगला गोडबोले, आवृत्ती जून 2013) हे अतिशय चांगले महत्वाचे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. असे लिखाण अजून कितीतरी चित्रपट क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तिमत्वांवर होणे गरजेचे आहे. 

‘वास्तव रूपवाणी’ या नावाने चित्रपट विषयक एकमेव मराठी नियतकालीक (संपादक प्रा.अभिजीत देशपांडे) प्रभात चित्रमंडळाच्या वतीने प्रसिद्ध होते आहे. करोडोंची उलाढाल असलेल्या या चित्रपट व्यवसायात चित्रपट महोत्सव, चित्रपट सोसायट्या, चित्रपट विषयक नियतकालिके अशा उपक्रमांसाठी मात्र पैसे नसतात ही एक शोकांतिका आहे. ‘वास्तव रूपवाणी’ चालविण्यासाठी साहित्य संस्कृती मंडळाचे अनुदान घ्यावे लागते. अजूनही ते दर महिन्याला ‘मासिक’ स्वरूपात निघू शकत नाही. ही गोष्ट आपली बौद्धिक दिवाळखोरी जाहिर करते. प्रभाकर पेंढारकर यांनी ‘दो आंखे बारा हाथ’ चित्रपटाच्या निर्मितीवरच एक पुस्तक लिहीले आहे. अशा प्रयत्नांना आपण किती पाठबळ देतो?

या सगळ्याचा विचार करता चित्रपट महोत्सवांची संस्कृती रूजविणे म्हणजेच चित्रपट साक्षरता वाढविणे. अजूनही आपण चित्रपटांना अस्मितेचा विषय बनवून विरोध करतो, चित्रपट न पाहताच आपल्या अस्मितेच्या तलवारी उपसल्या जातात, तळपू लागतात. समलैंगिकतेवर चित्रपट आला की आपण त्याला बंदी घालतो. (अलिगढ या चित्रपटाचे प्रदर्शन या गावातच रोकल्या गेले.) याला काय म्हणावे?

बदलत्या काळात खुप वेगळ्या प्रकारचा चित्रपट समोर येतो आहे. जागतिक पातळीवर त्याची एक भाषा बनत चालली आहे आणि जगभरचे रसिक त्याला प्रतिसाद देत आहेत. इराण, तुर्की, चिनी, भारतीय सिनेमाला जगभरातून प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो आहे. तेंव्हा आपण सगळ्यांनी मिळून एक सकारात्मक प्रयत्न ही संस्कृती रूजविण्यासाठी करायला हवा.  

 श्रीकांत उमरीकर, जशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575