Wednesday, January 31, 2018

जाहिराती लाटणारी बांडगुळी वर्तमानपत्रे..


शासनाच्या वतीने वृत्तपत्रांना जाहिराती देण्यात येतात. त्यासाठी किमान अटी अशा आहेत की या वृत्तपत्रांची नोंदणी आर.एन.आय. खाली झालेली असावी. ही वृत्तपत्रे नियमित स्वरूपात प्रकाशीत होत असावीत. आता या अटींत आक्षेप घेण्यासारखे काय आहे?

शासनाने यादीतील काही वृत्तपत्रे कमी करून टाकली. आणि त्यांची सविस्तर कारणेही दिली आहेत. पत्रकारांचे नेते मा. एस.एम.देशमुख यांनी असा पवित्रा घेतला की ही कृती म्हणजे वृत्तपत्रांवर अन्याय आहे.  मुळात ही यादीच त्यांनी आपल्या लेखासोबत जोडली नाही. तसे असते तर त्यांच्या भूमिकेचे पितळ उघडे पडले असते.  शासनाने जी यादी तयार केली आहे त्यातील काही जिल्ह्यातील यादी वाचकांसाठी आम्ही समोर ठेवतो आहोत. सर्वसामान्य वाचकांनीच हे सांगावे की या वृत्तपत्रांना काय म्हणून शासनाने फुकट पोसावे? उलट आत्तापर्यंत जाहिरातींच्या मार्गाने जो निधी यांना दिला तो सव्याज वसूल केला जावा. तसेच ज्यांच्याकडे आर.एन.आय. नव्हता त्यांच्यावर गुन्हेगारी खटले दाखल करण्यात यावेत.
१९ जिल्ह्यातील अश्या एकूण १७४ वृत्तपत्रांची यादी

 




Wednesday, January 24, 2018

सांस्कृतिक पर्यावरण बदलत आहे...



(तेलंगणा मधील किन्नरी वीणा वादक दर्शनम मोगुलैया )
(दै. सामना संस्कृती पुरवणी २३ जानेवारी २०१८)


काळ बदलत आहे त्या प्रमाणे सांस्कृतिक-साहित्यिक कार्यक्रमांचे स्वरूपही बदलत चालले आहे. पण याची दखल ज्या प्रमाणात घेतली जायला हवी ती तशी घेतली जात नाही.

महाराष्ट्रात एके काळी व्याख्यानमाला अतिशय प्रसिद्ध होत्या (आजही त्या काही ठिकाणी आहेत). पण आता व्याख्यानमालांसोबतच मंचावरून सादरीकरणाचे वेगळे प्रयोग होत आहेत. विंदा करंदीकर-पाडगांवकर-कुसुमाग्रज यांच्या कवितांचे प्रत्ययकारक पद्धतीचे सादरीकरण होत आहे. प्रकाश नारायण संत-ल.म.कडू- बब्रूवान रूद्रकंठावर-भालचंद्र नेमाडे यांचे गद्य लिखाण अभिवाचनाद्वारे रसिकांपर्यंत उत्कटपणे पोचवले जात आहे. कविता-संगीत यांचे एकत्रिकरण करून काही प्रयोग केले जात आहेत.

शाहू पाटोळे सारखा एक लेखक दलित-ग्रामीण खाद्य संस्कृतीवर ‘अन्न हे अपूर्ण ब्रह्म’ असं पुस्तक लिहून वाचकांसमोर एक वेगळाच अस्सल झणझणीत प्रयोग ठेवत आहे. बब्रवान रूद्रकंठावार सारख्या लेखकाची ग्रामीण मराठी व इंग्रजी यांच्या मिश्रणातून तयार होणारी ‘इंग्राम’ भाषा समिक्षकांसमोर आव्हान म्हणून उभी आहे.

उर्दू साहित्यावरचा ‘सुखन’ हा प्रयोग ओम भूतकर सारखे तरूण रंगकर्मी मोठ्या जामाने सादर करत आहेत. त्याला तरूणांचा मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहन कालातील भाषा व संस्कृतीवर आधारीत ‘गाहा सत्तसई’ हा प्रयोग अधीश पायगुडे-लक्ष्मीकांत धोंड सारखे रंगकर्मी मोठ्या ताकदीने रंगमंचावर उभा करत आहेत.

साहित्य संमेलनांची एक अतिशय मोठी अशी 140 वर्षांची परंपरा मराठीला आहे. (पहिले साहित्य संमेलन 1878 ला संपन्न झाले होते)  ही परंपरा अजूनही चालू आहेच. पण या सोबत ‘लिट-फेस्ट’ च्या नावाने साहित्य संमेलने वेगळ्या आणि आकर्षक पद्धतीनं तरूण वाचकांसमोर येत आहेत. कबीराचे दोहे तर कित्येक वर्षांपासून वाचले जात आहेतच पण आता हाच कबीर ‘कबीर बँड’च्या माध्यमांतून तरूणांसमोर येतो तेंव्हा त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो. अजून काही दिवसांनी मराठी संतांच्या रचनाही मराठी तरूण गिटावर मांडताना दिसले तर आश्चर्य वाटायला नको.

वाचनाचे स्वरूपही बदलताना दिसत आहे. कुणी कितीही टिका करो पण अजूनही मराठीत छापील वृत्तपत्रे मोठ्या प्रमाणत प्रसिद्ध होत आहेतच. पण सोबतच आता ब्लॉग लिहीणार्‍यांची संख्याही वाढत चालली आहे. या ब्लॉग लिखाणाला मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रविण बर्दापूरकर, निळू दामले यांचे ब्लॉग फार मोठ्या प्रमाणात वाचले जातात. भाऊ तोरसेकरांचा ब्लॉग तर 5 लाखाचा वाचक टप्पा पार करून गेला आहे.

हिंदी-मराठी चित्रपटांवर वेगळ्यापद्धतीनं लिहीणारी तरूण लेखक मंडळी सध्या तरूणांमध्ये लोकप्रिय होत आहेत. अमोल उदगीरकर, गणेश मतकरी, जितेंद्र घाटगे यांचे चित्रपटविषयक लिखाण जरूर ध्यानात घेतले पाहिजे.

मंचावरून सादर होणार्‍या नाटक-एकांकिका यांचे स्वरूपही बदलताना दिसत आहे. पुण्यात फिरोदिया करंडक मध्ये विविध कलांचे मिश्रण करून सादर होणार्‍या प्रयोगाला प्रोत्साहन दिले जाते. यात नृत्य-अक्षरलेखन-चित्रकला-संगीत-कठपुतली-लोककला यांचा जास्तीत जास्त उपयोग केला तर जास्त गुण मिळतात व त्या प्रयोगाला बक्षिस दिले जाते. सादत हसन मंटोच्या कथेवर अश्या सादरीकरणाला मागच्याच वर्षी बक्षिस मिळाले होते.

व्याख्यानमालांमध्ये व्याख्याते आता भाषणाला डिजीटल सादरीकरणाची जोड देत आहेत. प्रोजेक्टरच्या माध्यमातून विषय अजून परिणामकारकरित्या रसिकांसमोर येतो आहे. शिल्पकलेवर बोलणारे आशुतोष बापट, चित्रपटांवर बोलणारे प्रा. अभिजीत देशपांडे, पर्यावरणावर बोलणारे अभिजीत घोरपडे, पाणीप्रश्‍नावर तळमळीनं मांडणी करणारे प्रा. प्रदीप पुरंदरे हे अशा तंत्रज्ञानाचा मोठ्या कुशलतेने आपल्या व्याख्यानात वापर करून घेतात.
शास्त्रीय संगीतातसुद्धा अभिनव पद्धतीनं सादरीकरण होते आहे. वादकांची जुगलबंदी तर पूर्वीपासून चालूच होती. वादक आणि गायक यांची जुगलबंदीचेही प्रयोग आता सादर होत आहेत. पण या सोबतच अजून एक प्रयोग केला जात आहे. तो म्हणजे व्याख्यान आणि सादरीकरण यांचे एकत्रिकरण करून काही मांडणी केली जात आहे. ज्येष्ठ गायक सत्यशील देशपांडे आपल्या व्याख्यानात याचा वापर करून घेतात. संगीताचे गाढे अभ्यासक लेखक विनय हर्डीकर हे शास्त्रीय संगीतावर बोलताना काही कलाकारांना सोबत घेवून सादरीकरणाच्या माध्यमातून विषय उलगडून दाखवतात.

औरंगाबादला महागामी गुरूकुल गेली 8 वर्षे शारंगदेव समारोह भरवते आहे. यात जुन्या दूर्मिळ भारतीय वाद्यांचे सादरीकरण केले जाते, या कलाकारांना प्रोत्साहन दिले जाते. नविन अत्याधुनिक साधनांद्वारे परंपरा जतनाचा एक वेगळा प्रयोग केला जातो आहे. संगीतातील जून्या नोंदी नव्याशी ताडून पाहिल्या जात आहेत. त्याप्रमाणे आजच्या काळात सादरीकरण शक्य आहे का हे पण तपासले जात आहे. भरताच्या नाट्यशास्त्राप्रमाणे कोलकत्त्यातील पियल भट्टाचार्य यांच्या कलाकार समुहाने ‘संकिर्ण भाणक’चा प्रयोग मोठ्या जोरकसपणे सादर करून रसिकांना खिळवून ठेवले आहे.

अनुजा कामत ही तरूण कलाकार यु ट्यूब च्या माध्यमातून शास्त्रीय संगीताबाबत एक वेगळाच कार्यक्रम सादर करते. ती हिंदी चित्रपटांतील गाण्यांची उदाहरणं देत त्यांच्यावर असलेला विविध रागांचा प्रभाव स्पष्ट करून सांगते. तसेच अगदी पाश्चिमात्य संगीतावर असलेला शास्त्रीय संगीताचा त्यातील संकल्पनांचा प्रभाव दाखवून देते. हा कार्यक्रम तरूणांमध्ये मोठा लोकप्रिय आहे.

‘कोर्ट’, ‘कासव’, ‘लेथ जोशी’ हे केवळ नविन काळाचे चित्रपट आहेत असे नसून त्यांची भाषा, त्यांचे सादरीकरण, त्यांची हाताळणी हे पण वेगळे आहे. आधीच्या मराठी चित्रपटांचे संवाद, कॅमेराची हाताळणी यापेक्षा आताच्या चित्रपटांचे संवाद-हाताळणी यात मोठा फरक असलेला स्पष्टपणे दिसून येतो. लेथ जोशी या चित्रपटाचे संगीत सारंग कुलकर्णी या तरूण सरोद वादकाने केले आहे. त्याच्या सरोदचे पार्श्वभूमीवर वाजत राहणारे तुकडे चित्रपटाला एक वेगळाच आशय प्राप्त करून देतात. मनोज जोशी-चेतन ताम्हाणे-सचिन कुंडलकर हे नवे दिग्दर्शक वेगळी चित्रभाषा घेवून आले आहेत.

नाटकांच्या सादरीकरणातही आता बदल झालेला दिसतो आहे. रावबा गजमल हा ग्रामीण भागातील रंगकर्मी प्राण्यांची निसर्गाची वेगळी परिभाषा घेवून एकांकिका सादर करतो आहे.

साहित्य-संगीत-कला यांतून एक वेगळेपण समोर येत आहे. अगदी सामाजिक प्रश्‍नांवर भिडतानाही लेखक-कलावंत मंडळी वेगळं काही करू पहात आहेत. समलिंगी विषयांवरील चित्रपटांचा वेगळा महोत्सव ‘कशिश’ गेली 7 वर्षे मुंबईला भरत आहे. पुण्यातही असे चित्रपट महोत्सव आता होत आहेत. त्यात पुलकित खन्नासारखे नृत्य कलाकार कलेच्या माध्यमांतून समलिंगी संबंधाचा नाजूक विषय उत्कटपणे मांडत आहे.

कौशल इनामदार जेंव्हा ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ सारखं गाणं या तरूणांच्या ओठांवर ठेवतो तेंव्हा त्यांचे भान हरखून जाते हे महाराष्ट्राने बघितले आहे. हे प्रयोग अजून जास्त प्रमाणात झाले पाहिजेत. अजय अतूलच्या हलगीचा अस्सल मर्‍हाठी ठेका उभ्या महाराष्ट्रानेच नव्हे तर समस्त भारतीय रसिकांनी डो़क्यावर घेतला आहे. आणि यात बहुतांश तरूणांचाच समावेश आहे.

लघुपटांची एक वेगळी चळवळ आता मराठीत रूजू पहात आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतून लघुपट तयार करणारे तरूण पुढे येत आहे. ज्या ज्या समाज घटाकांतून ते येत आहेत तेवढे विषयाचे वैविध्य या लघुपटांतून दिसत आहे.

हे सगळं वेगळेपण आपल्याला समजून घ्यावं लागेल. अजूनही जून्याच पद्धतीनं सादर होणारे कार्यक्रम आणि त्यांना मिळणारा अत्यल्प प्रतिसाद बघितला की सगळे अशी टिका करतात की आता मराठी भाषेचं कसं होणार? मराठी संस्कृतीचं कसं होणार? त्यांनी ह्या नविन प्रयोगांकडे डोळसपणे बघायला हवे.

महाराष्ट्राचे सांस्कृतिक पर्यावरण बदलत आहे. आपण या बदलाला पोषक असे वातावरण करून दिले पाहिजे.   

मो. 9422878575


  

Sunday, January 14, 2018

सवाई गंधर्व महोत्सव : गर्दीसाठी की दर्दीसाठी?


उरूस, विवेक, 14-20 जानेवारी 2018

गेली 65 वर्षे सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव पुण्यात भरतो आहे. शास्त्रीय संगीताचा सर्वात मोठा उत्सव असं मोठ्या अभिमानाने या महोत्सवाबाबत सांगितलं जातं. भीमसेन जोशींनी त्यांचे गुरू रामभाऊ कुंदगोळकर उर्फ सवाई गंधर्व यांच्या स्मृतीप्रित्यर्थ्य हा महोत्सव सुरू केला. भीमसेन यांच्या मृत्यूनंतर त्यांचे नावही या महोत्सवाला जोडल्या गेले. 

महोत्सव सुरू झाला तेंव्हा भारतातील परिस्थिती अतिशय वेगळी होती. देश नुकताच स्वतंत्र झाला होता. आत्तापर्यंत विविध क्षेत्रात होत असलेली गळचेपी दूर होवून स्वातंत्र्याची आल्हाददायक झुळूक जाणवत होती. 

शास्त्रीय संगीत क्षेत्राची अडचण अशी होती की हे संगीत पूर्वापार राजे रजवाडे जमिनदार संस्थानिक यांच्या हवेल्यांत  अडकून पडले होते. दक्षिणेत मंदिरात धार्मिक उत्सवात गाणं सादर केलं जाई. या बंदिस्त संगीताला मोकळं करण्याचे दोन मोठे प्रयत्न 20 व्या शतकाच्या सुरवातीला झाले. भातखंडे यांनी शास्त्रीय संगीताला लिपीबद्ध करण्यात यश मिळवले तर पलूस्करांनी गांधर्व संगीत विद्यालयाच्या माध्यमातून तेंव्हाच्या अखंड भारतात शास्त्रीय संगीत प्रसाराची सुरवात केली. पहिल्यांदाच संगीत शिक्षणाची वाट सामान्य गायनेच्छूसाठी मोकळी झाली. कारण तोपर्यंत मोठ्या उस्ताद गुरूंच्या मर्जीवरच हे संगीत शिक्षण अवलंबून होते. 

या पार्श्वभूमीवर भीमसेन जोशींनी तिसरे महत्त्वाचे पाऊल उचलले ते म्हणजे सर्वसामान्य रसिकांना मोठ मोठे गायक वादक कलाकार ऐकायला मिळावे अशी सोय सवाई गंधर्व महोत्सवाच्या माध्यमातून करून दिली. त्यापूर्वी संगीत महोत्सव होत होतेच. पण त्यांचे स्वरूप वेगळे होते. एखाद्या तालेवार गायकाने आपली सगळी पूण्याई पाठिशी लावून यशस्वी करून दाखवलेला हा एकमेव महोत्सव होता. 

स्वत: भीमसेन भारतभर (आणि बाहेरही) प्रचंड दौरे करत. स्वत: ड्रायव्हिंग करत त्यांनी भारत उभा आडवा पिंजून काढला होता. त्यांना जागोजागचे आयोजक, गायक-वादक, रसिक यांची चांगलीच ओळख होती. कलाकाराला येणार्‍या आडचणी, आयोजकांच्या अडचणी, प्रयोजकत्व मिळवताना होणारी दमछाक हे सगळे ते जाणून होते. या सगळ्यावर मात करत सामान्य रसिकांसमोर उत्तमोत्तम कलाकारांची कला सादर होणे आवश्यक आहे हे त्यांनी ओळखले व त्या प्रमाणे स्वत:चा अनुभव पणाला लावून महोत्सवाची आखणी केली. 

आज या महोत्सवाला वाढलेली गर्दी सर्वांना दिसते पण त्यासोबतच वादक कलाकार, ध्वनीमुद्रण करणारे, वाद्य तयार करणारे कारागीर, छोटी छोटी रसिक मंडळे, संगीताचे शिक्षण देणार्‍या संस्था यांची मोठ्या प्रमाणात पुण्यात वाढ झाली हे कुणी फारसे लक्षात घेत नाही. फार कशाला संगीतकारांवर देखण्या दिनदर्शिका तयार करणारे सतिष पाकणीकर सारखे कलाकारही या महोत्सवातून रसिकांसमोर ठळकपणे आले. या महोत्सवाची ध्वनिमुद्रणे आलुरकर म्युझिक हाऊस सारख्या कंपन्यांनी बाजारात आणली. संगीतावर लिहीणारे उच्च दर्जाचे समिक्षक समोर आले. पुणे परिसरात एक सर्वांगीण अशी विकासात्मक वाढ शास्त्रीय संगीत क्षेत्राची होत असलेली आढळून येते. 

सुरवातील भीमसेन जोशी भारतभर फिरून मोठ्या नावाजलेल्या कलाकारांसोबत नव्याने गाणारे उमेदीचे कलाकार हूडकून त्यांना आगत्याने बोलवायचे. त्यांचे गाणे  जाणकार रसिकांंसमोर सादर झाल्यावर त्याला एक मान्यता मिळायची. अगदी अलिकडचे उदाहरण म्हणजे आजचे आघाडीचे गायक उस्ताद राशीद खां यांना तरूणपणीच भीमसेनांनी आपल्या राहत्या घरी बोलवून त्यांची मेहफिल जाणत्यांसमोर घडवून आणली होती. परिणामी अगदी थोड्या काळातच राशीद खां यांचे नाव या क्षेत्रात सर्वत्र पसरले. कौशिकी चक्रवर्ती यांचेही उदाहरण असेच आहे. 

पण नंतर नंतर मात्र भीमसेन यांचे दौरे वयमानपरत्वे कमी झाले तस तशी नविन कलाकार हूडकून बोलावणे यावर मर्यादा पडली. आता नविन गाणारा काय आणि कसा आहे हे त्याच्याबाबत लॉबिंग करणाराच सांगायला लागला. त्याचा एक दबाव सवाई गंधर्व महोत्सवाच्या आयोजकांवर यायला लागला. मोठ मोठे कलाकार आपल्या विशिष्ट शिष्यांनाच पुढे करायला लागले. याचा एकत्रित परिणाम म्हणजे अगदी अस्सल तेच या मंचावर सादर होईल हा विश्वास लयाला गेला. 

आता उलटी परिस्थिती झाली. या मंचावरून ज्याला संधी भेटली तो इतरत्र त्या पात्रतेवरून मिरवायला लागला.  म्हणजे एकेकाळी मोठे कलाकार आणि नवोदित पण प्रतिभावंत गुणी कलाकरांमुळे हे व्यासपीठ ओळखले जायचे आता या व्यासपीठामुळे कलाकार ओळखला जायला लागला. 

महोत्सवाला जमा होणारी प्रचंड गर्दी ही तर सगळ्यांचाच चर्चेचा विषय झाली. खरं तर भारतीय शास्त्रीय संगीताचे  स्वरूप असे हजारोंच्या जामावात सादर व्हावे असे मुळातच नाही. दोन पाचशे इतक्या मोजक्या श्रोत्यांच्या संख्येत हे संगीत फुलू शकते. रवीशंकर सारख्या मोठ्या कलाकरांनी हे लिहूनच ठेवलं आहे की नविन काही सुचलेलं सादर करायचे असेल तर अगदी छोटी मैफलच कशी लाभदायी ठरू शकते. किंवा बर्‍याचदा छोट्या मैफलीतच कश्या नविन संकल्पना सुचू शकतात. कारण त्यात रसिकांशी संवाद साधता येतो. त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव वाचता येतात. पण आता जो हजारोंचा सागर समोर पसरलेला असतो त्याच्या चेहर्‍यावरचे भाव वाचणे अशक्य आहे. शिवाय हे सर्व रसिक एकाग्रतेने गाणं ऐकतात असेही नाही. मधुनच उठणे, मोबाईलशी खेळणे, खाणे, पेपर वाचणे हे अखंड चालू असते. इतकंच काय तर काही जण मंडपात चक्क झोपा काढतात. मग अशा माहौल मध्ये ‘याद पिया की आये’ रंगणार कसे? शास्त्रीय संगीतातील बारकावे समजून घ्यायचे असतील तर कमालीची एकाग्रता कलाकाराइतकी रसिकांनाही लागते. ही एकाग्रता झुंडशाहीत साधणार कशी? 

रसिकांनी काही पथ्ये कडकपणे अशा महोत्सवात पाळायला हवीत. आपले मोबाईल बंद ठेवले पाहिजेत. खाण्याचे पदार्थ आणि लहान मुलांना सोबत नाही नेले पाहिजे. आयोजकांइतकीच ही रसिकांचीही जबाबदारी आहे. पु.ल. देशपांडे यांनी ‘पूर्वी संगीत लोकाभिमुख करण्याचा कुणी प्रयत्न करत नव्हते तर संगीताभिमूख लोकच चांगलं गाणं शोधत फिरत असायचे’ असे म्हटले आहे. त्यातील व्यंग उपहास सोडून द्या. पण रसिकांची संगीत परंपरेची तिच्या गांभिर्याची बूज ठेवायला हवी.

खरं तर शास्त्रीय संगीताचा आस्वाद सामान्य रसिकांना चांगल्या पद्धतीनं घेता यावा म्हणून काही वेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आयोजीत केले पाहिजेत. अनुजा कामत ही तरूण गायिका यु-ट्यूब वर शास्त्रीय संगीत-त्यावर आधारीत हिंदी चित्रपट गीते-पाश्चिमात्य लोकप्रिय गीते असा एक सुंदर कार्यक्रम सादर करते. तो तरूणांमध्ये लोकप्रियही आहे. या माध्यमातून संगीताचा कान तयार होण्यास हातभार लागू शकतो.  
हा महोत्सव केवळ पुण्यातच न घेता सुरवातीला महाराष्ट्रभर आणि नंतर भारतभर त्याचे आयोजन केले जावे. महाराष्ट्राचा विचार केला तर पुण्या-मुंबईच्या बाहेर पडून उत्तर महाराष्ट्रात नाशिक-जळगांव, विदर्भात अमरावती-नागपुर, मराठवाड्यात औरंगाबाद-नांदेड, पश्‍चिम महाराष्ट्रात कोल्हापुर-सोलापुर असे आयोजन करण्यात यावे. पुढे मग महानगर पालिका असलेल्या शहरांमध्ये त्याची व्याप्ती वाढविली जावी. हेच भारतभर करता येईल. 

यासाठी स्वतंत्रपणे काही करायची गरज नसून ज्या संस्था आणि व्यक्ती या क्षेत्रात सर्वत्र काम करत आहेत त्यांना जोडून घेण्याचे काम करावे. ‘स्पिकमॅके’ (सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ इंडियन क्लासिकल म्युसिक अमांग युथ्स) सारख्या संस्था आजही मोठ्या चिवटपणे शास्त्रीय संगीत तरूणांपर्यंत पोचावे म्हणून काम करतात. त्यांना बळ दिलं गेलं पाहिजे. म्हणजे भीमसेनजींचे स्वप्न खर्‍या अर्थाने साकार होवू शकेल. नसता हा महोत्सव म्हणजे  केवळ भव्य ‘इव्हेंट’ ठरेल. त्यातून शास्त्रीय संगीताच्या आणि रसिकांच्या पदरात फारसं काही पडणार नाही. 

           श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Thursday, January 4, 2018

त्या शरदाची (जोशी) भाषा या शरदाच्या (पवार) तोंडी


उरूस, विवेक, 1-7 जानेवारी 2018

काळ ही एक मोठी विचित्र गोष्ट आहे. ती कुणाला कशी कोंडीत पकडेल आणि त्याच्याकडून काय वदवून घेईल सांगता येत नाही. आता हेच पहा ना. 12 डिसेंबर ही तारीख म्हणजे जाणते राजे शरद पवार यांचा वाढदिवस. याच दिवशी विधान सभेचे हिवाळी अधिवेशन नागपूरला भरलेले. याच दिवशी विरोधी पक्षांचा ‘हल्लाबोल’ मोर्चा निघाला. या मोर्चात शरद पवार यांनी शेतकर्‍यांना सल्ला दिला, ‘सरकारी कर्ज भरू नका, वीज बील भरू नका, सरकारी देणी देऊ नका.’

बरोबर याच दिवशी विदर्भातच शेगांवला शेतकरी नेते शरद जोशी यांच्या समर्थकांनी मेळावा भरवला होता. निमित्त होते शरद जोशी यांच्या दुसर्‍या पुण्यस्मरणाचे. 12 डिसेंबर हीच तारीख म्हणजे शरद जोशी यांची पुण्यतिथी. या मेळाव्यात जमलेले हजारो शेतकरी मागणी करत होते ‘स्वातंत्र्याची’. 

शरद पवार जी भाषा बोलले नेमकी तीच भाषा शरद जोशी यांनी बरोबर 38 वर्षांपूर्वी वापरून शेतकर्‍यांना संघटित करायला सुरवात केली होती. 1979 ला शेतकरी संघटनेची सुरवात झाली तेंेव्हा मुख्यमंत्रीपदी शरद पवारच होते. केंद्रात जनता पक्षाचे सरकार होते. ‘शेतकर्‍याचे मरण हेच सरकारचे धोरण’ अशी घोषणा तेंव्हा शेतकरी संघटनेची होती. ‘आमच्यावरचे कर्ज हे सरकारी धोरणाचे पाप आहे. तेंव्हा हे कर्ज आम्ही फेडणार नाही. कर्जमाफी नव्हे मुक्ती हवी.’ अशी मांडणी शरद जोशींची असायची. आणि शरद पवार सत्तेत असताना हे सगळे नाकारायचे. 

पुढे पवारांची सत्ता गेली. ते विरोधी पक्षात येवून बसले. त्यांनी 1984 ची लोकसभा आणि 1985 ची विधानसभा ‘पुरोगामी लोकशाही दल’ या नावाने आघाडी करून लढवली. त्याला शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला. लोकसभेचे चार खासदार आणि विधानसभेत 104 आमदार पुलोदचे निवडून आले होते. शरद पवार तेंव्हा शेतकरी संघटनेची भाषा बोलत होते. पण सत्तेचा विरह त्यांना फार काळ सहन झाला नाही. 1986 ला कापसाचे आंदोलन मराठवाडा विदर्भात पेटले होते. तेंव्हाच शरद पवारांना सत्ताधारी पक्षात जायचे डोहाळे लागले होते. 

नोव्हेंबर 1986 ला सुरेगांव (जि. हिंगोली) येथे कापूस आंदोलक शेतकर्‍यांवर सरकारने गोळीबार केला. त्यात 3 शेतकरी शहीद झाले. आणि त्याच मुहूर्तावर शरद पवार याच मराठवाड्यात औरंगाबादला पंतप्रधान राजीव गांधी यांच्या साक्षीने कॉंग्रेंसवासी झाले. शरद पवारांची भाषा बदलली. ते आता सरकारच्या शेतकरी विरोधी जिभेने बोलायला वागायला लागले. पुढे शरद पवार एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तीनदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. केंद्रात वजनदार मंत्री म्हणून राहिले. पण त्यांनी शेतकरी हिताचा चकार शब्द काढला नाही. 

1999 ला सोनिया गांधी यांच्या विदेशीजन्माचा मुद्दा पुढे करत पवार परत कॉंग्रेसबाहेर पडले. 1999 ची निवडणुक त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस स्थापन करून लढवली. त्यांना शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला. त्यांच्या सोबत निवडणुक लढवली. नांदेडला शरद जोशी समवेतच्या मेळाव्यात त्यांनी शेतकरी संघटनेचीच भाषा उच्चारली.

निकाल लागले आणि सत्तासुंदरीने शरद पवारांना आपल्या झपेटमध्ये घेतले. बघता बघता शरद पवार कॉंग्रेससोबत युती करून सत्तेत जावून बसले. परत पहिले पाढे पंच्चावन्न. सत्तेत असताना वेगळीच भाषा आणि सत्तेतून बाहेर पडल्यावर वेगळीच भाषा. 

12 डिसेंबर 2015 ला शरद जोशी यांचे निधन झाले. त्याच्या वर्षभर आधीच देशात सत्तांतर झाले. राज्यात सत्तांतर झाले. परत शरद पवार सत्तेच्या बाहेर फेकल्या गेले. गेली तीन वर्षे महाराष्ट्रातल्या सरकारला राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाहेरून पाठिंबा दिलेला आहे. राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते आहेत. पण त्यांच्या पाठिंब्याने सरकार तरले आहे. अशी एक विचित्र परिस्थिती सध्या महाराष्ट्रात आहे. 

12 डिसेंबरला शरद पवार ज्या भाषेत बोलत आहेत ती सगळीच्या सगळी शेतकरी संघटनेची परिभाषा आहे. खरं तर शरद पवारांना इतकी शेतकरी हिताची चाड आहे तर त्यांनी या सरकारचा जो छूपा पाठिंबा आहे तो काढून घ्यावा. सरकार विरोधात प्रत्यक्ष रस्त्यावर उतरावे. सगळे शेतकरी त्यांना साथ देतील. 

आज पवार म्हणत असतील की शेतकर्‍यांनी सरकारी देणी देवू नयेत तर त्यांनी हे कबूल केल्यासरखेच आहे की आम्ही आत्तापर्यंत सरकार म्हणून शेतकर्‍यांना लूटत आलो आहोत. 

सत्ता असली की भाषा वेगळी आणि सत्ता गेली की भाषा वेगळी हे असं का घडतं? आणि असंच जर सगळ्यांच्या बाबत घडत असेल तर शरद जोशी यांनी केलेली मांडणी ‘शेतकर्‍याचे मरण हेच सरकारचे धोरण’ खरी ठरते हे मान्य करावे लागेल. 

आज डावे पक्ष स्वामिनाथन आयोगाचा पदर धरून फिरत आहेत. शरद पवार कृषी मंत्री असताना हा अहवाल सादर झाला होता. पवारांनी याचे उत्तर द्यावे की हा अहवाल त्यांनी का नाही मंजूर केला. या अहवालातील शेतमालाचे दर ठरविताना उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा ही शिफारस मंजूर करता येणे शक्य आहे का? 

सरकारने जो काही भाव मंजूर केला असेल तो मान्य करून तेवढ्या भावाने सर्व शेतमालाची खरेदी करण्याची यंत्रणा कागदोपत्री तरी सरकार कडे आहे का? जगातील कुठलेही सरकार शेतकर्‍याने पिकवलेला सर्व माल एखाद्या ठराविक भावाने (मग तो कमी असो की जास्त) खरेदी करू शकते का? 

पवार कृषी मंत्री होते. पवार शेतीचे तज्ज्ञ आहेत. मग त्यांनी या शिफारशी अमान्य आहेत हे तरी जाहिरपणे का नाही सांगितले? 

रामायणातील एक प्रसंग आहे. राम-लक्ष्मण-सीता वनवासात असताना एका प्रदेशातून जात होते. अचानक लक्ष्मणाची भाषा बदलली. तो रामाला वाईट बोलायला लागला. भांडायला लागला. त्याची कृतीपण योग्य नव्हती. काही दिवसांतच परत परिस्थिती पहिल्यासारखी सुरळीत झाली. सीता या सगळ्याने चकित झाली. तिने रामाला याचे कारण विचारले, तेंव्हा राम उत्तरला ‘अगं त्या प्रदेशाची हवाच तशी आहे. तिथल्या लोकांची मानसिकता तशी असल्याने तेथून जाणाराही तसाच वागू लागतो. यात नवल नाही.’

आपल्याकडे सत्ता ही अशीच गोष्ट आहे. विरोधात असताना शेतकर्‍यांबाबत जी भाषा केली जाते त्याच्या नेमकी उलटी कृती सत्ता मिळाली की केली जाते. 

महत्मा फुले यांना असे वाटत होते की शेतकर्‍याचा पोरगा सत्तेत गेला तर तो आपल्या बापाचे दु:ख समजून घेईल. भट कारकुनाऐवजी बहुजन कारकून असला तर तो आपल्या समाजाची वेदना जाणेन. पण प्रत्यक्षात घडले ते उलटेच. शेतकर्‍याचा पोरगा मंत्रालयात सहाव्या मजल्यावर गेला की धोरणाच्या पात्याने बापाचा गळा कापायला तो कमी करत नाही. 

2010 मध्ये शरद जोशी यांचा 75 वा वाढदिवस होता. त्यांच्या अमृत महोत्सवा निमित्त त्यांची एक मुलाखत ज्येष्ठ पत्रकार सदा डुंबरे यांनी घेतली होती. त्यांनी एक प्रश्‍न विचारला होता, ‘शेतकरी एरव्ही तूमच्या मागे असतो पण निवडणुकीत तूम्हाला मते देत नाही. हे कसे काय?’

त्याला दिलखुलास पद्धतीने उत्तर देताना शरद जोशी असे म्हणाले होते की, ‘शेतकर्‍याला आपले प्रश्‍न सोडविण्याासाठी या शरदाची (जोशी) गरज असते हे खरे आहे. पण राजकीय मुद्दे समोर आले की त्याला तो शरद (पवार) सोयीचा वाटतो.’ 

आता शरद जोशी गेले आणि शरद पवारांचीही सत्ता गेली. आता इतक्या वर्षानंतरही शेतकर्‍यांना आपल्या मदतीसाठी परत शरद जोशींच्या विचारांचाच आधार घ्यावा लागतो. आणि हीच भाषा शरद पवारांनाही वापरावी लागते आहे. काळानं पवारांना कोंडीत पकडून त्यांच्याकडून शेतकरी प्रश्‍नावरचे सत्य वदवून घेतले असेच म्हणावे लागेल. 

           श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575