Tuesday, September 19, 2017

ललीमावशी गेली......



(लेख श्रीकृष्णचा माझ्या मोठ्या भावाचा, कविता माझी)
 
ललीता कमलाकरराव  भंडारी, माझ्या आईची मावशी काल (१८ सप्टेंबर) वयाच्या ८२ व्या वर्षी गेली. असामान्य कर्तुत्वाची स्त्री होती ती. आजोबा लवकर गेले. त्यांच्या माघारी हिने दोन मुली आणि एक मुलगा वाढवले, शिकवले, मोठे केले. तिची नातवंडे, सुना, नातसुना, जावाई, लेक, लेकी सगळे उच्चशिक्षित उच्च पदस्थ आहेत. 

ती छोट्या खेड्यात ग्रामसेविका होती. अंधूक होत होत तीची दृष्टी गेली. तेव्हा मामा, मावशी शिकत होते. हिने न डगमगता तशाही परिस्थितीमधे नोकरी चालूच ठेवली. ईतर कर्मचारी रिपोर्ट्स वाचायचे. ते हिला पाठ असायचे. स्वतःच्या कामाचे अहवाल ती म्हणून दाखवायची. तिच्या गावात झालेल्या अधिकार्‍यांच्या बैठकित तिने कोण कुठे बसले आहे याची चौकशी करून रिकाम्या खुर्चीत जावून बसली आणि तिला विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत बैठकिचे काम पार पडले. तिला दिसत नाही अशी शंकाही कुणाला आली नाही!

ती दिसत नसले तरी सगळा स्वैपाक करायची. तिच्या हातून कधी तिखट मिठ कमी जास्त झाले नाही ना कधी सांडलवंड झाली ना दुध उतू गेले.

मी तीच्या घरी गेलो की तीच्या बाजूला न बोलता बसून रहायचो. ती विचारायची कोण आहे म्हणून. मी उत्तर देत नसे. ती चाचपडून पहायची. माझा हात सापडला की तो हातात घेवून स्पर्शावरून ओळखायची. जाड झालास, बारीक झालास म्हणायची. निघताना हातात पैसे ठेवायची. मला मुले झाली तरीही. 'अगं मी काय लहान आहे का आता?' असं म्हटलं तर म्हणायची माझ्यापेक्षा मोठा झालास? तीने कधिच मला शिरा न खाउ घालता वापस पाठवले नाही! 

अद्वितिय जिद्द तिच्या अंगी होती. त्या जिद्दीमुळेच ती ईथवर आली. तीचे पाठांतर, तीची स्वच्छता, काय काय सांगू? स्वतःच्या शारिरिक मर्यांदांवर मात करून संपन्न, समृध्द, समाधानी जिणे जगली ती.

गेली अनेक महिने ती अंथरूणावर होती. समज नव्हती. नूसता श्वास चालू होता. बाकी त्रास असा नव्हता काही. मामालाच ओळखायची शेवटी शेवटी. दिवाळीत तीच्या घरी गेलो तर तीच्या खोलीत गेलोही नव्हतो. त्या करारी जिद्दी आज्जीला अंथरूणावर गोळा होवून पडलेलं पहावत नव्हतं. तिचे आयुष्य केंव्हाच संपले असावे. केवळ जिद्दीपोटी ती जगत होती. मला खात्री आहे शेवटी आसपास घोटाळणार्‍या यमाची दया येवून तीने जगण्याची जिद्द सोडली असावी. आणि मगच त्याला तीचे प्राण ताब्यात घेता आले असतील.
त्या असामान्य आज्जीला तीच्या जिद्दीला कोटी कोटी प्रणाम


तू अष्टभुजा

परिस्थितीचा कठीण  कातळ फोडून तू
सळसळत्या उर्मीचा 
जगण्याचा जिवंत झरा शोधून काढलास बाई
आयुष्याच्या  छोट्या छोट्या लढाईत 
आम्ही हतबल होवून बसतो
सगळी शस्त्र बोथट झाली
असं मानतो
अन् तू तर काहीच हाती नसताना
अक्राळ विक्राळ काळाशी
दोन हात करत गेलीस

तूझे दोन आणि तूझ्या तीन लेकरांचे सहा हात
तू अष्टभुजा बनून 
समस्येच्या  महिषासुराचा वध केलास बाई
 
शंकर तर निघून गेला होता अर्ध्यातूनच
तू महाकाली बनून पचवलेस सगळे विष
आणि हसत राहिलीस 
बोळक्या झालेल्या चेहर्‍याने
निरागसपणे

बये तूझी ही चिवट झुंजणारी वृती
दे थोडी थोडी 
आम्हा नातवंडांमध्ये वाटून

आता घटस्थापनेला 
तूझाच बनवून चांदीचा टाक
पूजा करावी म्हणतो आहे..

मला खात्री आहे
तू पावशील नक्की...

- श्रीकांत उमरीकर 

1 comment:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete