Friday, September 1, 2017

राजू शेट्टींची शरद जोशींना गुरूदक्षिणा !



संबळ, दिव्य मराठी, शुक्रवार 1 सप्टेंबर 2017

अखेर राजू शेट्टी यांनी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा बुधवारी 30 ऑगस्ट रोजी पुण्यात केली. आपल्याकडे फोडणीत कढीपत्ता टाकला जातो. त्यानं एक खमंग अशी चव पदार्थाला येते. पण प्रत्यक्ष जेंव्हा पदार्थ खायला घेतला जातो तेंव्हा हा कढीपत्ता मात्र बाहेर काढून टाकला जातो. त्या प्रमाणे निवडणुकीच्या वेळेस भाजप-मोदी लाटेचा खमंगपणा हवा म्हणून राजू शेट्टी रा.लो.आ. बरोबर गेले. याचे फळ म्हणजे त्यांना खासदारकीची लॉटरी लागली. अगदी पाच लाखांच्याही पुढे मते मिळाली.

पण लगेच चार महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टींचा एकही आमदार निवडून आला नाही. गंमत म्हणजे नेमक्या किती जागा त्यांनी तेंव्हा लढवल्या हे त्यांनाही सांगता यायचं नाही. कारण सरळ आहे की त्यांनी कुठल्याही वैचारिक आधारावर ही युती केली नव्हती. ही राजकिय सौदेबाजीच होती हे नंतर स्पष्ट झाले. जनता सवाल विचारते आहे म्हणून आता सत्तेबाहेर पडले आहेत.

केंद्रात तर कुठलेच मंत्रिपद राजू शेट्टींच्या पक्षाला मिळाले नाही. महाराष्ट्रातही दोन वर्षांनंतर सदाभाऊ खोतांच्या रूपाने एक राज्यमंत्रीपद पदरात पडले. सदाभाऊ काही विधानसभेत निवडून आले नव्हते. मग त्यांना विधानपरिषदेवर निवडून आणावे लागले. मगच मंत्रिपदाची झुल त्यांच्या पाठीवर पडली.

सोयरिक मोडण्याची घोषणा मुलीच्या बापाने करावी, सगळे वर्‍हाडी परत निघून जावेत. आणि नवरीनं मात्र हट्ट करून नवर्‍यासोबत निघून जावे अशी गंमत घडली. जो एकमेव सत्तेचा तुकडा स्वाभिमानी पक्षाच्या पदरात पडला होता त्या सदाभाऊ खोतांनी मात्र मंत्रीपद सोडण्यास नकार दिला. त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्या गेली. स्वाभिमानी सत्ताधारी आघाडीतून बाहेर पण सदाभाऊ मात्र सगळा स्वाभिमान गुंडाळून सत्तासुंदरीच्या मोहात खुर्चीला चिटकून राहिले.

या सगळ्या घडामोडी गुरूपौर्णिमा (9 जूलै) ते राजू शेट्टी- सदाभाऊ यांचे गुरू शरद जोशी यांची जयंती (3 सप्टेंबर) या दरम्यान घडल्या.

सत्तेचा त्याग करून राजू शेट्टींनी आपल्या गुरूला मरणोपरांत गुरूदक्षिणाच दिली असे म्हणावे लागेल.

मग आता प्रश्‍न निर्माण होतो की मूळात राजू शेट्टी काय म्हणून भाजप सोबत गेले होते? सदाभाऊ खोत यांना जिल्हा परिषदेसाठी आपल्याच मुलाला तिकीट द्यावं वाटलं, त्याच्या विजयासाठी त्यांनी जिवाचं रान केलं. मग ते त्यांच्या गुरूपासून काय शिकले?

राजू शेट्टी यांनी शेतकरी संघटना सोडताना शरद जोशी जातियवादी पक्षांसोबत गेले असं सांगितलं होतं. मग मधल्याकाळात राजू शेट्टी यांनी भाजप आघाडीला गोमुत्र शिंपडून पवित्र करून घेतलं होतं की काय?

राजू शेट्टी-सदाभाऊ हे तरूण सळसळत्या रक्ताचे पश्‍चिम महाराष्ट्रातील कार्यकर्ते शेतकरी संघटनेला लाभले तेंव्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष होते रघुनाथ दादा पाटील. याच कार्यकर्त्यांच्या बळावर 11,12 नोव्हेंबर 2000 ला शेतकरी संघटनेचे सहावे अधिवेशन मिरजला संपन्न झाले. त्यासाठी राजू शेट्टी- सदाभाऊंनी प्रचंड मेहनत घेतली होती. तेंव्हा केंद्रात वाजपेयी सरकार होते. या सरकारने शरद जोशींना कृषी कार्यबलाचा अध्यक्ष म्हणून नेमले होते. त्यांना केंद्रिय मंत्रिपदाचा दर्जा होता. शरद जोशी लाल दिव्याच्या गाडीतून अधिवेशनाला आले होते. तेंव्हा ते असे म्हणाले होते अधिवेशनात ‘‘मी तूमचा प्रतिनिधी म्हणून हे पद स्विकारले आहे. हा अहवाल तयार करून मी शासनाला सादर करेन. पण त्या शिफारशी अमलात आणण्यासाठी पाठपुरावा करण्याची जबाबदारी संघटनेच्या तूम्हा कार्यकर्त्यांची आहे. तूमची शक्ती पाठीशी आहे म्हणून हा लाल दिवा माझ्या डोक्यावर आहे.’’

याच वेळी पाशा पटेल भाजप मध्ये गेले होते. शंकर धोंडगे राष्ट्रवादीत गेले होते. शंकर धोंडगें अधिवेशनाकडे फिरकलेच नाहीत. पण पाशा पटेल मात्र आले. त्यांचा भ्रम होता की आपण संघटनेचे माजी अध्यक्ष आहोत. आपण भाजपमध्ये गेलो ते शेतकर्‍यांच्या भल्यासाठीच. तेंव्हा आपल्याला या अधिवेशनात मंचावरून सहज भाषण करता येईल. पण शेतकरी संघटनेच्या सामान्य कार्यकर्त्यांनी पाशा पटेलांचा निषेध केला. त्यांनी भाषण केले तर दगडं फेकून मारू असा संताप व्यक्त केला. विधानसभेचे उप-सभापती राहिलेले मा.आ. मोरेश्वर टेंमूर्डे यांनी कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेवून पाशा पटेलांना मंचावरून भाषण करण्याची परवानगी नाकारली.

हे सगळं राजू शेट्टी-सदाभाऊ यांच्या समोर घडत होतं. शरद जोशींनी ठरलेल्या मुदतीच्या दीड वर्षे आधीच आपला अहवाल तयार करून शासनाला सादर केला. लगेच पदाचा राजीनामा दिला. त्या पदाच्या अनुषंगाने येणारे सगळे फायदे बंगला-गाडी-भत्ते सगळं ताबडतोब सोडलं.

2004 च्या निवडणुकीत फार मोठ्या प्रमाणात डाव्या पक्षाचे खासदार संसदेत निवडून आले होते. इतकी मोठी संख्या डाव्यांची असण्याची ही पहिली वेळ. तेंव्हा त्यांना वैचारिक तोंड देण्यासाठी तूमची आम्हाला आवश्यकता आहे असे म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांनी शरद जोशींना राज्यसभेतील खासदारकी दिली. आपल्या पक्षाला मिळणार्‍या वेळेतला वेळ शरद जोशींना त्यांची मांडणी करण्यासाठी दिला. या पदाची मुदत संपताच दुसरी टर्मही देण्याची तयारी भाजपने दाखवली होती. पण शरद जोशींनी ती सपशेल नाकारली.

हे सगळं उदाहरण समोर असताना शरद जोशींचे शिष्य म्हणूवन घेणारे सदाभाऊ सगळा स्वाभिमान सोडून सत्तेला चिटकून राहतात, आपल्याच मुलाला तिकीट देवून घराणेशाहीचे विकृत दर्शन घडवतात, पोराच्या लग्नात डोळ्यात भरावी अशी उधळपट्टी करतात याला काय म्हणावे?

राजू शेट्टींनी उशीरा का होईना सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला हे बरे झाले. पण ते ज्या मागण्या समोर ठेवत आहेत त्या मोठ्या विचित्र आहेत.

‘सरकार समस्या क्या सुलझाये सरकार खुद समस्या है’ अशी शेतकरी संघटनेची घोषणा आहे. शिवाय ‘भीक नको हवे घामाचे दाम’ ही दुसरी घोषणा आहे. मग राजू शेट्टी काय म्हणून परत स्वामिनाथन आयोगाच्या रूपाने सरकारी हस्तक्षेपाची हमी भावाची मागणी पुढे रेटत आहेत?

डॉ. अशोक गुलाटी यांनी नुकतेच आकडेवारीसह हे सिद्ध केले आहे की किमान हमी भावाच्या नावाखाली भारतीय सरकारने गहु आणि तांदुळाच्या शेतकर्‍यांचे शोषण केले आहे. हे हमी भाव जागतिक बाजारपेठेतील भावापेक्षा कमीच राहिलेले आहेत. म्हणजे सरकारी हमी भाव कमीच राहतात. इतकेच काय तर तूरीच्या बाबतीत तर असेही सिद्ध झाले आहे की हमी भाव अधिक 50 टक्के नफा ही रक्कमही जागतिक बाजारातील भावापेक्षा कमी राहिलेली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचे भाव वाढून काही एक नफा मिळण्याची संधी निर्माण होताच हे शासन परत कांद्याला  निर्यात बंदी लावणे आणि कांदा आयात करून भाव पाडण्याचा अघोरी खेळ सुरू करत आहे. मग हा मुद्दा राजू शेट्टींना का नाही उचलावा वाटत?

राजू शेट्टी सत्तेतून बाहेर पडले याला खरे कारण समोर येणारा उसाचा हंगाम आहे. उसाचे पीक या वर्षी भरपूर आहे. त्यामुळे उसाचा प्रश्‍न गंभीर बनणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे भाव पडले आहेत. त्यामुळे यावेळी उसाला भाव मिळण्याची अजिबात शक्यता नाही. अशावेळी जर सत्तेत राहिलो तर हे आपले शेतकरी आधी आपल्याच टाळक्यात ऊस हाणतील ही भिती आहे. उसाचे आंदोलन छेडताना आता राजू शेट्टींना आपल्या गुरूची शिकवण समजून घ्यावी लागेल. शरद जोशींनी मूळ मागणी केली होती साखर उद्योग नियंत्रण मुक्त करा. सहकारी साखर कारखानदारीच्या निमित्ताने सरकारचा होणारा हस्तक्षेप तातडीने संपवा. साखर काही जिवनावश्यक वस्तू नाही. तेंव्हा या साखरेला जिवनावश्यक वस्तू यादीतून पहिले बाहेर काढा.

राजू शेट्टी तूम्ही सत्ता त्यागून शरद जोशींना  गुरूदक्षिणा दिली आहेच. पण आता साखर उद्योग नियंत्रण मुक्त करा अशी दीर्घ मूदतीत फायदेशीर ठरणारी मागणी आग्रहाने करा. तरच तूम्ही शरद जोशींचे खरे वारसदार ठराल. बिल्ल्याचा लाल रंग आणि नावात शेतकरी संघटना इतकं ठेवल्याने शरद जोशींचा वारसा मिळाला असं होत नाही. पंचा नेसला म्हणजे कुणी गांधी ठरत नाही हे लक्षात घ्या.

श्रीकांत उमरीकर, जशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575

No comments:

Post a Comment