Friday, April 14, 2017

भीमजयंती आणि मिलींद महाविद्यालयाचे उद्ध्वस्त ग्रंथालय



उरूस १४ एप्रिल २०१७ 

बाबासाहेबांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला द्या म्हणून जो नामांतराचा लढा ज्या काळात जोरात चालू होता तेंव्हा एक युक्तीवाद असा केला जायचा. की बाबाहेबांनी मिलींद महाविद्यालयाची स्थापना या विभागात पहिल्यांदा केली. उच्चशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली तेंव्हा त्यांचे नाव विद्यापीठाला देणे उचितच आहे.

बघता बघता विद्यापीठाचा नामविस्तार होवून 23 वर्षे उलटली. त्यामागचे राजकारण काय असायचे ते असो. विरोध करणारे आणि पाठिंबा देणारे दोघेही आज कुठेही असो. आज तटस्थपणे विद्यापीठाकडे पाहिलं तर काय दिसतं? विद्यापीठ जावू द्या. पण ज्या मिलींद महाविद्यालयाने मराठवाड्यातील उच्च शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली तिची काय अवस्था आहे?

जानेवारी महिन्यात माझ्या एका छोट्या कामासाठी मिलींद विज्ञान महाविद्यालयाच्या ग्रंथालयात जाण्याचं काम पडलं. त्या ग्रंथालयाची भयानक अवस्था पाहून अक्षरश: डोळ्यात पाणी आले.

गेली दहा वर्षे तिथे ग्रंथपालाचे पद भरले गेलेले नाही. एकूण किती पुस्तकं आहेत त्याची नोंद नाही. बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा परिसर. पण आज त्याची अवस्था भयाण आहे. काही दिवसांपूर्वी पुराचं पाणी आलं. तेंव्हा कित्येक महत्त्वाच्या दुर्मिळ पुस्तकांचा अक्षरश: लगदा झाला. ती सर्व पुस्तके फेकुन दिल्या गेली. कोणती पुस्तके फेकली याचीही नोंद नाही.

मराठवाडा म्हणजे दलित अस्मितेचं राजकारण खेळायची रणभूमि. सगळ्यांनी आपल्या आपल्या सोयीनं ही चळवळ  वापरून घेतली. नामांतराला पाठिंबा देणारे शरद पवार असो की विरोध करणारे बाळासाहेब ठाकरे असो दोघांनीही आपली राजकीय पोळी मराठवाड्याच्या पाठीवर भाजून घेतली. याच दोन पक्षाला गेली 20 वर्षे सगळ्यात जास्त मतं या विभागात मिळाली.

पण यापैंकी कुणालाही या शिक्षण संस्थेच्या ग्रंथालयाची झालेली ही वाताहत चिंता करणारी बाब वाटली नाही. बाबासाहेबांचे नाव घेऊन राजकारण करणारे कित्येक लहान मोठे गट मराठवाड्यात आणि त्यातही परत औरंगाबादेत उदयाला आले. यातील एकालाही हे ग्रंथालय म्हणजे बाबासाहेबांचे खरे स्मारक म्हणून विकसित करावे असे वाटले नाही.

मुंबईच्या एशियाटिक सोसायटीचा आदर्श समोर ठेवून पिपल्स एज्युकेशन सोसायटीने बाबासाहेबांच्या स्मृती प्रित्यर्थ एक भव्य ग्रंथालय निर्माण करायला हवं होतं. ज्याचा उपयोग जगभरचे नाही तरी निदान महाराष्ट्रभरचे अभ्यासक घेवू शकले असते. आख्ख्या महाराष्ट्रातल्या विद्वानांसाठी ते एक तीर्थ क्षेत्र झाले असते.

या शिक्षण संस्थेला 167 एकराचा भव्य परिसर लाभला आहे. यातील बहुतांश जागी आता घाणीचे साम्राज्य पसरले आहे. काही ठिकाणी अतिक्रमणं झाली आहेत. कुठल्याही ज्ञानप्रेमी माणसाला ही अवस्था पाहून रडू फुटेल.

आज गावोगावी बाबासाहेबांचे पुतळे उभारणे, जयंतीवर प्रचंड पैसा खर्च करणे, अस्मितेचे राजकारण करून खंडणी वसूल करणे याचे पेव फुटले आहे. दलितांची भावी पिढी तर बाबासाहेब म्हणजे 14 एप्रिल, 6 डिसेंबरला मिरवणूक काढून डिजेच्या प्रचंड मोठ्या आवाजात डान्स करण्यापुरतेच आहेत असं समजत असेल. तर तो त्यांचा दोष नाही.

हा आपल्या सगळ्यांचा दोष आहे. सगळ्यात पहिल्यांदा दलितांमधील जे मध्यमवर्गीय, नोकरदार, व्यावसायीक, किमान उत्पन्न असणारे आहेत त्यांनी जागे होण्याची गरज आहे. आज तातडीने पिपल्स एज्युकेशन सोसायटी मधील सर्व महाविद्यालये, शाळा येथील ग्रंथालये अद्यायावत करण्याची गरज आहे.

नालंदा, तक्षशीला ही विद्यापीठं म्हणजे ज्ञानाची पवित्र तीर्थक्षेत्रं होती. बौद्धधम्माचे ‘ज्ञान लालसा’ हे एक मोठे लक्षण राहिले आहे. बुद्धिप्रमाण्यवादी असा हा जगातला एकमेव धर्म आहे. तो वेगळा आहे म्हणूनच तर त्याला धर्म न म्हणता धम्म हा शब्द वापरला जातो. आणि आज त्याचे अनुयायी किंवा इतरही हिंतचिंतक मिरवणूका, घोषणा, पुतळे, विद्यापीठाला नाव असल्या उठवळ गोष्टींमध्येच अडकून पडले आहेत. हे बाबासाहेबांच्या आत्म्याला (बाबासाहेब आत्मा मानत नसत) प्रचंड दु:ख देणारं आहे.

आज बाबासाहेबांची 126 वी जयंती आहे. आपण सगळे मिळून एक पण केला की निदान एक ग्रंथालय मिलींद परिसरात सुसज्ज असे उभारू तर ही फार मोठी गोष्ट ठरेल.

माझ्या एका मित्राने मला विचारले हे सगळं ठिक आहे पण तू लिहायची काय गरज? आणि आजच लिहायची काय गरज? त्याला म्हणायचे होते तू ब्राह्मण आहेस, आज बाबासाहेबांंची जयंती आहे. मग कशाला असला कडूपणा करतोस. तूझा सामाजिकदृष्ट्या काय फायदा?

मी खरं तर जातीयवादी पक्ष संघटना संस्था यांपांसून कटाक्षाने दूर राहिलो आहे. आजतागायत जातीयवादी व्यासपीठावर गेलो नाही. अगदी माझ्या जातीच्याही. मला माझ्या पोटजातीचा मिळालेला पुरस्कार पण नाकारला,  पण जर कुणी माझ्या जन्मजातीचाच दाखला आणि संदर्भ देवून बोलणार असेल तर हेही स्पष्टपणे सांगतो. मी ब्राह्मण म्हणून जन्माला आलो आहे म्हणूनच कदाचित मला ज्ञानाची अस्मिता जातिच्या, व्यक्तिच्या अस्मितेपेक्षा मोठी वाटते. ज्ञानाची लालसा मला तर आहेच. पण ज्या ज्या कुणाला आहे त्याच्यापोटी मला आत्मियता वाटते. बाबासाहेब मला त्यासाठीच जास्त वंदनीय आहेत. आणि त्यांच्यासाठी चांगल्या ग्रंथालयाची निर्मिती हीच योग्य आदरांजली असेल.

                 श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद.9422878575

3 comments:

  1. खुप छान लिहले आहे.. हे आसे लिहिण्याचे धाडस तुम्ही निर्भीडपणे नेहमी दाखवतात... मला या लेखातील सर्वात जास्त ही बाब आवडली की, "ब्राह्मण म्हणून जन्माला आलो आहे म्हणूनच कदाचित मला ज्ञानाची अस्मिता जातिच्या, व्यक्तिच्या अस्मितेपेक्षा मोठी वाटते...ज्ञानाची लालसा मला तर आहेच. पण ज्या ज्या कुणाला आहे त्याच्यापोटी मला आत्मियता वाटते. बाबासाहेब मला त्यासाठीच जास्त वंदनीय आहेत... "

    ReplyDelete
  2. खूप छान सर.. खरं तर समाजातील शिक्षित लोकांनी समोर येउन ह्याबद्दल प्रयत्न करायला हवेत... राजकीय नेते फक्त भडकावू भाषण देउन आणि अस्मितेच्या गप्पा मारून आपला राजकीय स्वार्थ साधून घेतात...

    ReplyDelete
  3. आहो माझे खरेच कुठेच कसलेच राजकीय हितसंबंध नाहीत. मला राजकीय पदांची महत्वाकांक्षाही नाही. शरद जोशी माझे वैचारीक गुरू आहेत. त्यांनी आम्हाला स्वतंत्रतावाद शिकवला. त्यामुळे मी असं लिहू शकलो.

    ReplyDelete