Sunday, February 19, 2017

परदेशी चित्रपटांची साद । तरूणाईची दाद ॥


सामना उत्सव पुरवणी रविवार १९ फेब्रुवारी २०१७ 
(छायाचित्रात "रऊफ" चा गोड नायक) 

पाठीवर सॅक, मित्र किंवा मैत्रिणीच्या हातात हात, गळ्यात चित्रपट महोत्सवाचा प्रतिनिधी म्हणून पास लटकवलेला असे तरूण मुलांचे जत्थे औरंगाबादच्या प्रोझोन मॉलमधील मल्टिप्लेक्समध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पहायला मिळाले. बरं ही मुलं एखादा चित्रपट पाहून निघून जात होती असंही नाही. चारही दिवस विविध आंतरराष्ट्रीय चित्रपटांना गर्दी करत होती. चित्रपटांचे अभ्यासक शुभ्र दाढीधारी, एखाद्या ऋषीसारखे दिसणारे समर नखाते सर यांना घेरून शंका विचारत होते. त्यांना भंडावून सोडत होती. अज्ञानी प्रश्‍नांवर शकांवर त्यांच्याकडून कडक शब्दांत कानउघाडणी करून घेत होते.

निमित्त होतं नाथ उद्योग समुहाने आयोजित केलेल्या चौथ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे. दिनांक 3 ते 6 फेब्रुवारी 2017 ला औरंगाबादला चौथा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव संपन्न झाला. एकूण 29 चित्रपटांचे मिळून 31 शो दाखवले गेले. चित्रपट रसिकांचा प्रतिसाद इतका प्रचंड होता की उद्घाटनाचा टर्की चित्रपट ‘रऊफ’ आणि बाबा भांड यांच्या कादंबरीवर आधारीत मराठी चित्रपट‘दशक्रिया’ दोनदा दाखविण्यात आले. बाबा भांड यांच्या चित्रपटाला तरी स्थानिक संदर्भ होता. पण ‘रऊफ’ सारखा टर्कीश चित्रपटही गर्दी खेचतो म्हणजे आमच्या रसिकांची अभिरूची उंचावली हे मान्यच करावे लागेल. 31 पैकी 11 शो तर गर्दीनं ओसंडून गेले. हेही या महोत्सवाचे यशच. 

उद्घाटनाचा चित्रपट ‘रऊफ’ याचा खास उल्लेख करावा लागेल. टर्कीश भाषेतील हा चित्रपट रऊफ नावाच्या एका 11 वर्षाच्या मुलाची प्रेमकथा आहे. त्याचं जिच्यावर प्रेम आहे ती आहे 20 वर्षाची तरूणी झाना. रऊफ हा तिच्या सुतारकाम करणार्‍या वडिलांच्या हाताखाली काम करणारा छोटा मुलगा आहे. या कहाणीच्या पार्श्वभूमीवर आहे त्या प्रदेशातील लोकांचे कष्टप्रद जगणे. कुर्द बंडखोरांची चळवळ या चित्रपटात पुसटशी येते. त्यात झानाचा मृत्यू होतो. तिला गुलाबी रंगाचा स्कार्फ आवडतो म्हणून रऊफ त्या रंगाच्या शोधात असतो. पण त्याला त्याच्या छोट्याश्या बर्फानं वेढलेल्या गावात गुलाबी रंगच सापडत नाही. आणि शेवटी जेंव्हा वसंत ऋतूत डोंगराच्या पल्याड बहरलेल्या ट्युलीपच्या फुलांमध्ये तो सापडतो तर तोपर्यंत झाना मृत्यूमुखी पडलेली असते. बारीस काया आणि सोनेर कानेर या दिग्दर्शक जोडीची प्रतिभा अशी आहे की शेवटाची दहा मिनीटं वगळता चित्रपटभर कुठेच कॅमेरात गुलाबी रंग येत नाही. कुठेही फारसे संवाद न येता कॅमेराच्याच भाषेत बोलत जाणं हे दिग्दर्शकाचे खरे कसब. ते या जोडीने उत्तम पार पाडले आहे. सोनेर कानेर यानेच या चित्रपटाची पटकथाही लिहिली आहे.

याच महोत्सवात ‘प्ले ग्राउंड’ सारखा लहान निरागास मुलांमधील क्रुरता चितारणारा चित्रपटही दाखवला गेला. पोलंडचा हा चित्रपट शेवटाकडे जातो तेंव्हा अक्षरश: मुलांमधील क्रुरता बघवत नाही. आपल्याच एका मित्राला ठेचून ठेचून मुलं मारून टाकतात तेंव्हा अंगावर काटा येतो. बार्टसोज कोवलस्की या दिग्दर्शकाची खरेच कमाल. 

2008 नंतर अमेरिका आणि युरोप मध्ये मंदिचे मोठे सावट आले. अनेक जणांना आपली घरे सोडावी लागली. ‘ऍट युवर डोअरस्टेप’ हा याच विषयावरचा स्पॅनिश चित्रपट. घर गमवाव्या लागलेल्या कुटूंबाची वाताहत इतक्या साधेपणाने मांडली आहे की बघता बघता ही साधी भासणारी समस्या आपल्याला मनात घर करून बसते. आपलेच घर गमावले आहे इतके आपण त्यात गुंतत जातो. नौकरी गमावलेला नवरा, शाळेत जाणारी गोड छोटी मुलगी, घरकाम करून घराला सावरू पाहणारी आई अशा कुटूंबाची ही कथा. भारतातील एखाद्या छोट्या शहरातील कुटूंबाची शोभावी अशी ही कथा. आपल्याकडेही मोठ्या सामाजिक समस्या आहेत. जसे की शेतकरी आत्महत्या. पण त्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट आजतागायत बनला नाही. 

शेवटी अनेक कुटूंबं बँकांच्या विरूद्ध रस्त्यावर एकत्र येवून उढा उभारतात असं अंगावर येणारं दृश्य यात आहे. लोकशाहीत लोकांना रस्त्यावर उतरल्याशिवाय आपले प्रश्‍न सोडवून घेता येवू नयेत हे कटू सत्य प्रखरतेने समोर येतं.

‘समर टाईम’ सारखा फ्रेंच चित्रपट समलिंगी आणि त्यातही परत लेस्बियन संबंधावरचाया महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरला. अलिकडेच प्रदर्शित झालेला ‘अलिगढ’ सारखा चित्रपट आणि त्याला झालेला विरोध पाहता असे चित्रपट निर्माण करणं हे धाडसच आहे. आजही हा विषय आपण वर्ज्य समजतो. आणि केवळ भारतातच नाही तर जगभरात अजूनही समलिंगी संबंधांना पुरेशी मान्यता नाही. प्रतिष्ठा तर दुरचीच बाब आहे. 

स्पॅनिश भाषेतील ‘ला जोटा’म्हणजे खरं तर चित्रपट नव्हेच. ला जोटा हा एक पारंपारिक लोकनृत्याचा स्पॅनिश प्रकार. फ्लॅमेन्को, टांगो सारखे सांगितिक चित्रपट देणार्‍याने कार्लोस सौरा या दिग्दर्शकाने हा विषय हाताळला आहे. एक जूना नृत्यप्रकार पूर्वी कसा होता, आता कसा आहे, गाण्यातून कसा समोर येतो, नृत्यातून, वाद्यांमधून हे अतिशय प्रभावीपणे चित्रित केलं आहे. यात कुठेही कसलीही कथा नाही. कसलेही संवाद नाहीत. केवळ या एका नृत्य प्रकारावर आधारीत दृश्य आहेत. म्हणजे रूढ अर्थाने हा चित्रपट नाहीच. 

हा पाहताना आपल्याकडे असे कितीतरी चित्रपट बनू शकतात हे लक्षात आलं. पारंपारिक, शास्त्रीय अशा नृत्यांचा, लोककलांचा आपल्याकडे खजाना आहे. वाद्य वाजविणार्‍यांची पिढ्यान् पिढ्यांची मोठी परंपरा आहे. मग यांच्यावर आपण असे चित्रपट का नाही काढू शकत? स्पेन देश केवढा, भारत केवढा. खरंच आपली लाज वाटते. 

‘चिठ्ठी’, ‘दशक्रिया’, ‘डॉक्टर रखमाबाई’ हे मराठी चित्रपट या महोत्सवात होते. ‘बोकुल’ सारखा बंगाली चित्रपट होता. मराठी चित्रपट बघताना आपण दिग्दर्शन आणि कॅमेरा या दोन्हीमध्ये खुप कमी पडता हे जाणवत राहते. रऊफ आणि दशक्रिया दोघांचेही नायक सारख्याच वयाची लहान मुलं आहेत. पण रऊफला कुठेच फारसे संवाद नाहीत. केवळ त्याचे डोळे, पापण्या, चेहर्‍यावरचे हावभाव, हालचाली यातून परिणाम साधला जातो. उलट दशक्रिया मध्ये छोट्या भान्याच्या तोंडी भरमसाठ संवाद दिलेले आहेत. ही आपली मर्यादा आपण लवकरात लवकर ओलांडली पाहिजे. कर्ंचे’ सारखा लघुपटही रसिकांनी प्रचंड डोक्यावर घेतला. 

या महोत्सवात या वेळी एक वेगळा प्रयोग म्हणजे विविध महाविद्यालयांतून आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा आस्वाद या विषयावर प्रा. अभिजीत देशपांडे, पटकथाकार अमोल उद्गीरकर यांची व्याख्यानं आयोजित करण्यात आली होती. त्याचा एक परिणाम म्हणजे तरूण विद्यार्थ्यांच्यात निर्माण झालेली उत्सुकता आणि त्यांनी केलेली गर्दी. पाचशे प्रतिनिधींनी शुल्क भरून या महोत्सवाची (प्रत्यक्ष आकडा 498) नोंदणी केली होती. त्यातील 312 तर महाविद्यालयीन विद्यार्थी होते. 

दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे या महोत्सवात फ्रेंच चित्रपटांचा विशेष विभाग करण्यात आला होता. त्याला लक्ष ठेवून व्हिन्सेंट पास्कीलिनी या फ्रेंच तरूणाने पुढाकार घेवून त्या काळात औरंगाबाद शहरात आलेल्या परदेशी विशेषत: फ्रेंच नागरिकांना मुद्दाम आमंत्रित केले. व्हिन्सेंट गेली दोन वर्षे अधून मधून औरंगाबाद शहरात येवून इथे राहून इथे परदेशी पर्यटकांना जास्तीत जास्त महिती कशी मिळेल, त्यांची सोय कशी होईल, त्यांच्या अडचणी कशा दूर होतील यासाठी स्वयंस्फुर्त पद्धतीनं काम करतो आहे. तो गांधींच्या विचाराने भारला जावून शुद्ध शाकाहारी तरी बनला आलेच, त्याही पुढे जावून व्हेगन म्हणजे प्राण्यांना त्रास देवून मिळवलेले पदार्थ जसं की दुध दही मध हेही खात नाही. एक परदेशी नागरिक आपल्याकडे येवून पर्यटनासाठी झटतो आणि आपण उदासिन असतो हे लाजिरवाणे आहे.

औरंगाबादच्या चित्रपट महोत्सवाने मराठी तरूणांमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपटांची परिभाषा रूजत चालल्याचे संकेत दिले. हे एक फार मोठे यश या महोत्सवाचे मानावे लागेल. चित्रपट रसिकांची अभिरूची उंचावण्यासाठी असे प्रयत्न नियमितपणे करावे लागतील. 

औरंगाबाद सारख्या शहरात चित्रपट संस्कृती रुजावी यासाठी नाथ उद्योग समूहाने जे प्रयत्न केले त्याला दाद दिली पाहिजे. 

                 श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, संभाजीनगर मो. 9422878575

No comments:

Post a Comment