Wednesday, January 25, 2017

नक्क्ष लायलपुरी : शब्दांशी ‘लॉयल’ गीतकार





















( गायिका रूना लैला, संंगीतकार जयदेव आणि गीतकार नक्श लायलपुरी)  

बुधवार 25 जानेवारी  2017 


‘आहिस्ता आहिस्ता’ चित्रपटात नक्क्ष लायलपुरी यांची गाणी आहेत. पण सोबतच निदा फाजली यांचीपण आहेत. या चित्रपटातील निदा फाजली यांचे एक गीत ‘कभी किसी को मुक्कमल जहां नही मिलता’ भुपेंद्र यांच्या आवाजात फार सुंदर आहे. यातील काव्य हीच नक्क्ष यांची नियती असेल असे खुद्द त्यांनाही वाटले नसेल. पण तसं घडलं खरं. त्यांना त्यांचं मुक्कमल जग हिंदी गाण्यांच्या प्रांतात भेटलं नाही.

जयदेव हे गुणी संगीतकार पण हम दोनो चा अपवाद वगळता त्यांची गाणी फारशी गाजली नाहीत. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या मान जायिए (1972) मधली नक्क्ष यांची दोन गाणी फार गोड आहेत. किशोर कुमारच्या आवाजातील ‘ये वोही गीत है जिसको मैने धडकन मे बसाया है’ हे गाणे जलाल आगावर चित्रित आहे. पण त्याचा ना आगाला फायदा झाला ना लायलपुरींना. किशोरचे करिअर मात्र बहरत गेले. दुसरे गाणे लताच्या आवाजात आहे. ‘ओ मितवा, बदरा छाये रे, कारे कारे कजरा रे, ओ मितवा अंग लग जा रे’ या शब्दांना चालही अतिशय गोड बांधलेली आहे. पण रेहना सुलतान आणि राकेश पांडे यांच्या सारखे अभिनेत गाण्याचे काय भले करणार? परिणाम सांगायची गरज नाही.

पुढच्याच वर्षी आलेल्या दिल की राहे (1973) मधील मदन मोहनच्या ‘रस्मे उल्फत को निभाये तो निभाये कैसे’ लायलपुरी यांचे हे सर्वात उत्तम गाणे. लताच्या आवाजाबद्दल काही बोलायचे कामच नाही. याही सिनेमात रेहाना राकेश हीच जोडी होती.  ‘दर्द मे डुबे हुये नग्मे हजारो है मगर, साज ए दिल टूट गया हो तो सुनाये कैसे’ असा एक सुंदर शेर या गीतात नक्क्ष यांनी लिहीला. पण नक्क्ष यांचे दुर्दैव म्हणजे हे गाणे राजा मेहंद अली किवा राजेंद्र कृष्ण यांचे असावा असाच गैरसमज रसिक करून घेतात. म्हणजे याला मिळणारी दादही नक्क्ष यांच्या पदरात पडत नाही. याच चित्रपटात लताचेच अजून एक गोड गाणे आहे, ‘आपकी बाते कहे या अपना अफसाना कहे, होश मे दोनो नही है किसको दिवाना कहे’. यात सतार, तबला आणि  लताचा आवाज इतक्यावरच गाण्याचा गोडवा पेलला आहे. याच चित्रपटात मन्ना डे आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात एक गाणे आहे, ‘अपने सुरों मे मेरे सुरों को बसा लो, ये गीत अमर हो जाये’. खरं तर नक्क्ष मदन मोहन सारख्या मोठ्या प्रतिभावंत संगीतकारांना हेच म्हणत होते की ‘अपने सुरां मे मेरे गीतों को बसा लो, ये गीत अमर हो जाये’. पण ते कोणी ऐकलं नाही.

सहा वर्षांनी जयदेवच्याच ‘घरोंदा’ (1977) मध्ये ‘मुझे प्यार तुमसे नही है नही है’ हे गीत नक्क्ष यांनी दिले. रूना लैलाचा वेगळा मेटॅलिक आवाज, अमोल पालेकर जरिना वहाब यांना नैसर्गिक ताजा अभिनय असूनही नक्क्ष यांना फायदा झाला नाही. कारण याच चित्रपटातल्या गुलजारच्या ‘दो दिवाने शहर मे’ आणि ‘एक दिवाना इस शहर मे’ या गाण्यांनीच सगळी हवा करून टाकली. अगदी भुपेंद्र आणि रूना लैलाला पण रसिकांच्या मनात मोठी जागा मिळाली. जयदेवची पुसट कारकीर्द परत उजळली. मागे राहिले फक्त नक्क्ष लायलपुरी.

जयदेवचाच एक चित्रपट ‘तुम्हारे लिये’ 1978 मध्ये प्रदर्शीत झाला. संजीव कुमार, विद्या सिन्हा अशी तगडी स्टारकास्ट होती. यातील लताचे ‘तुम्हे देखती हू तो लगता है ऐसे, की जैसे युगों से तुम्हे जानती हू’ फार सुंदर आहे. संन्याशाच्या वेशातील संजीव कुमार आणि विद्यासिन्हा तळ्याच्या काठावर बसून गाणे म्हणत आहेत. आजही हे गाणे कुठे लागले तर ऐकणार्‍याचा पाय जागीच खिळून राहतो. जयदेवशी नक्क्ष यांचे नाते चांगलेच जूळले होते त्याचाच हा पुरावा.

खय्यामचा ‘नुरी’ 1979 मध्ये गोड गाणे घेवूनच आला. जां निसार अख्तर यांचे ‘ओऽऽ नुरी आजा रे’ हे गाणे अतिशय गाजले मग स्वाभाविकच यातली नक्क्ष यांची गीतं झाकोळली गेली. खरं तर ‘चोरी चोरी कोई आये’ हे लताच्या आवाजातले गाणे आजही परत परत ऐकावेसे वाटते. अशा भोसलेच्या आवाजातील मुजरा ‘कदर तूने ना जानी, बीत जाये जवानी’ पण अप्रतिमच. ‘चोरी चोरी कोई आये’ची तरी कदर झाली पण ‘कदर तूने’ ची झालीच नाही.

याच वर्षी ‘खानदान’ हा खय्यामचा अजून एक चित्रपट प्रदर्शित झाला. जितेंद्र, सुलक्षणा पंडित, बिंदीया गोस्वामी अशी नट मंडळी यात होती. या चित्रपटानेही यशाची बर्‍यापैकी चव नक्क्ष यांना चाखायला मिळाली. त्यांच्या सोबत दुसरा कोणताच गीताकर नव्हता. स्वाभाविकच सगळे यश त्यांच्याच पदरात पडले. लताच्या आवाजातील बिंदीया गोस्वामीवर चित्रित ‘ये मुलाकात इक बहाना है, प्यार का सिलसिला बढाना है’ आणि सुलक्षणा पंडितच्या आवाजातील ‘माना तेरी नजर मे तेरा प्यार हम नही, कैसे कहे की तेरे तलबगार हम नही’ ही गझल विशेष गाजली. ‘तन को जला के राख बनाया बिछा दिया, लो अब तुम्हारी राह मे दिवार हम नही’ असा एक उत्कट शेर या गझलेत आहे. हेच गाणे परत 1981 मध्ये आहिस्ता आहिस्ता चित्रपटात खय्याम यांनी का वापरले कळत नाही. आहिस्ता आहिस्ता मधील निदा फाजली यांची गाणी गाजली तशी लायलपुरी यांची नाही.

जयदेवबरोबर नक्क्ष यांचे सुर चांगले जूळले होते. ‘आयी तेरी याद’ (1980) या चित्रपटात भुपेंद्रच्या आवाजात  ‘फिर तेरी याद नये दीप जलाने आयी, मेरी दुनियासे अंधेरोको मिटाने आयी’ हे चांगले गाणे दिले आहे. भुपेंद्रच्या गंभीर आवाजाला शोभणारे व्हायोलीनचे सूर गाण्यात वापरले आहे.

राजेश खन्ना, हेमा मालिनी, पुनम धिल्लन अशी तगडी स्टार कास्ट असलेल्या ‘दर्द’ (1981) मध्ये सगळी गाणी नक्क्ष यांचीच होती. याला संगीत अर्थात नक्क्ष यांचे लाडके संगीतकार खय्याम यांचे होते. या चित्रपटाने यशाची एक सुखद झुळूक नक्क्ष यांना अनुभवायला मिळाली. ‘न जाने क्या हुआ, जो तूने छू लिया’ हे लताच्या आवाजातील गाणे याच चित्रपटाचे. हेमा यात दिसलीही आहे अतिशय छान. याचे बोलही अर्थात अप्रतिमच आहेत. आशा आणि किशोरच्या आवाजातील ‘प्यार का दर्द है मिठा मिठा प्यारा प्यारा’ याही गाण्याला चांगली लोकप्रियता लाभली. थोडा म्हातारा वाटणारा राजेश खन्ना आणि तारूण्याने मुसमुसलेली पुनम या गाण्यात आहेत. भुपेंद्रच्या आवाजात एक फार चांगली गझल खय्याम यांनी दिली आहे. ‘अहले दिल यु भी निभा लेते है, दर्द सीने मे छूपा लेते है’. खय्याम यांचे गझलवर किती प्रेम आहे हे याच काळात आलेल्या ‘उमराव जान’ ने सिद्ध केले होतेच. गझलेचा वापर खय्याम मदन मोहन इतका नेमका कुणीच केला नाही. बाकीचे संगीतकार गझलेला गाण्यासारखी वागणूक देतात. हेच गाणे लताच्या आवाजातही आहे. पण भुपेंद्रची मजा त्यात नाही.

याच यशाचा अनुभव परत नक्क्ष यांच्या वाट्याला पुढच्याच वर्षी आला. खय्याम यांनी दिल-ए-नादान या राजेश खन्ना जयाप्रदाच्या चित्रपआत त्यांच्या रचना वापरल्या. लता किशोरच्या आवाजातील ‘चांदनी रात मे एक बार तूझे देखा है’ गाणे बर्‍यापैकी लोकप्रिय झाले. बाकी इतर गाणी विशेष नाहीत.

यानंतर मात्र नक्क्ष यांची गाणी जवळपास नाहीशीच झाली. 1991 मध्ये राज कपुरच्या हिना मध्ये रविंद्र जैन यांनी ‘चिठ्ठीये नी दर्द फिराक बलिये’ या गाण्यासाठी त्यांचे शब्द वापरले. लताच्या आवाजातील हे गाणे श्रवणीय आहे. नाना पाटेकर, रेखा आणि दिप्ती नवल यांचा यात्रा (2007) हा एक वेगळा चित्रपट. यात खय्यामनी तलत अजीज च्या आवाजात ‘साज ए दिल नगमा ए जान’ ही सुंदर गझल दिली आहे.

जयदेव आणि खय्याम यांच्याशीच नक्क्ष लायलपुरी यांचे सुर जूळले असं दिसून येतं. त्याशिवाय मदन मोहनचा एक अपवाद वगळता त्यांची गीतं इतर संगीतकारांनी वापरली नाहीत. रवी, सपन जगमोहन, रोशन यांच्याकडे त्यांची काही गाणी आहेत. पण ती विशेष नाहीत. हिंदी चित्रपटांतील गाण्यांची एक अडचण अशी आहे की संगीतकारांचे ज्याच्याशी सूर जूळले तेच गीतकार विशेष गाजले. त्यांच्या काव्यात प्रतिभा किती हा दुसरा मुद्दा. नक्क्ष लायलपुरी आपल्या शब्दांशी पूर्ण ‘लॉयल’ होते. पण त्यांना मोठी संधी या क्षेत्रात मिळाली नाही हे वास्तव आहे. जी काही थोडीफार संधी त्यांना मिळाली त्यात त्यांनी जीव ओतला. खय्याम सोबतची गाणी तेवढी गाजली. आजही ती रसिकांच्या लक्षात आहेत.

(नक्क्ष लायलपुरी यांची इतर माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. ती परत इथे दिली नाही. )
  
        श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

 
   

No comments:

Post a Comment