Friday, December 16, 2016

लोकमंगल पुरस्काराने पुरोगामी झाले ‘मंगल’


उरूस, मंगळवार 13 डिसेंबर 2016 

लोकांची स्मृती फार कमजोर असते पण ती इतकीही कमजोर नसते की नुकतेच घडलेलेही विसरून जावे. लोकशाही मार्गाने भाजपला लोकसभा निवडणूक 2014 मध्ये बहुमत मिळाले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. तरी कित्येक पुरोगामी अजून हे स्विकारायला तयारच नाही. मग त्यांनी या सरकारविरूद्ध निषेध करण्यासाठी कारणे शोधायला सुरवात केली. तशी विविध कारणं त्यांना मिळत गेली. दादरी येथील अखलाख प्रकरण किंवा कर्नाटकातील कलबुर्गी यांची हत्या किंवा हैदराबाद येथील रोहित वेमुला या विद्यार्थ्याची आत्महत्या. या तिनही ठिकाणी भाजपचे सरकार राज्यात सत्तेवर नव्हते. तरी मोदींच्या विरोधात ‘असहिष्णुतेचा’ आरोप करत पुरस्कार वापसीची लाट देशभर साहित्यीकांत पसरल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. काही साहित्यीकांनी साहित्य अकादमीचे पुरस्कार वापसही केल. 

याला पाठिंबा देणार्‍या मराठी साहित्यीकांची मोठी गोची झाले. काही केले तरी एकही मराठी साहित्यीक  अकादमी पुरस्कार वापस करायला तयार झाला नाही. मग काही पुरोगाम्यांनी राज्य शासनाने दिलेले पुरस्कार वापस केले. आता हे पुरस्कारच मूळात आपणहून अर्ज केल्याशिवाय मिळत नाहीत. मग जो पुरस्कार अर्ज करून स्विकारलेला असतो तो वापस कसा काय करणार? पण पुरोगामी असला की त्याला असले प्रश्‍न विचारता येत नाहीत.

यातच परत गोवा सरकारने (जिथल्या विधानसभेत भाजपला बहुमत असल्याने त्यांचेच सरकार आहे) ‘काव्यहोत्र’ नावाचा मोठा तीन दिवसांचा कविता महोत्सव भरविला. भाजपच्या सरकारने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले म्हणून तिथे उपस्थित कवींवर झोड उठविण्यात आली. यातील अंबाजोगाई येथील बालाजी सुतार यांनी आपल्या फेसबुकवर खुलासा केला होता. पण पुरोगाम्यांना तो कदाचित पटला नसावा. 

आता परत जी घटना घडली ती मोठी अतर्क्य आहे. याच भाजपचे सध्याच्या महाराष्ट्र सरकार मध्ये पणन मंत्री असलेले सुभाष देशमुख यांच्या ‘लोकमंगल’ समुहाने काही साहित्य पुरस्कार जाहिर केले. ते स्विकारणार नाही असे कोणीही पुरोगामी साहित्यीक म्हणाला नाही. इतकेच नाही तर एरव्ही असहिष्णुतेच्या गप्पा करणारे सगळे पुरोगामी यावेळेस गप्प बसून राहिले. 

नेमके असे काय घडले की आता भाजप-संघ-मोदी हे सगळे अचानक पुरोगाम्यांना स्विकारार्ह वाटू लागले आहेत? सुभाष देशमुख यांचा हाच समुह सध्या नोटाबंदीच्या प्रकरणात जुन्या नोटा सापडल्या म्हणून आरोपी आहे. अजून त्यांची सुटका झालेली नाही. असे असतानाही सुभाष देशमुख यांच्या समुहाकडून हा पुरस्कार पुरोगामी साहित्यीकांनी कसा काय स्विकारला?

सुभाष देशमुख पणन खात्याचे मंत्री आहेत. ज्यांना पुरस्कार दिला त्यातील एक साहित्यीक श्रीकांत देशमुख त्याच खात्यात सहकार उपनिबंधक म्हणून कार्यरत आहेत. मग बाणेदारपणा दाखवत श्रीकांत देशमुख यांनी हा पुरस्कार नाकारला का नाही? कारण हा प्रश्‍न नैतिकतेचा आहे. 

ज्या इतर दोन पुस्तकांना पुरस्कार देण्यात आला ती आणि एक दिवस- नसिरूद्दीन शहा, अनुवाद सई परांजपे (पाॅप्युलर प्रकाशन) आणि उजव्या सोंडेच्या बाहुल्या- प्रविण बांदेकर (शब्द प्रकाशन) ही पुस्तके सप्टेंबर 2016 मध्ये प्रकाशीत झाली आहेत. हा पुरस्कार नुकताच जाहिर झाला. व त्याचा प्रदान समारंभही पार पडला. जेमतेम तीनच महिन्यापूर्वी आलेले पुस्तक समितीने वाचले केंव्हा, त्यावर चिंतन केले केंव्हा आणि पुरस्कारासाठी अंतिम निवड केली केंव्हा? 

सहसा अशी पद्धत असते की पुरस्कारासाठी एका विशिष्ट कालखंडातील पुस्तके विचारात घेतली जातात. म्हणजे उदाहरणार्थ इ.स. 2015 मधील पुस्तके म्हणजे जानेवारी ते डिसेंबर 2015 या कालखंडातील पुस्तके. किंवा आर्थिक वर्षातील पुस्तके. म्हणजे एप्रिल 2015 ते मार्च 2016 या कालखंडातील पुस्तके. आता आधेमधेच सप्टेंबर मधील पुस्तकांना लगेच डिसेंबर मध्ये पुरस्कार देण्याची काय घाई? यापेक्षा मागच्या वर्षी (डिसेंबर 15 पर्यंत किंवा मार्च 16 पर्यंत) जी पुस्तके प्रकाशीत झाली असतील त्यांचा विचार व्हायला हवा होता. 

या पुरस्काराच्या कार्यक्रमात एक परिक्षक असे म्हणाले की सई परांजपे यांची दोन पुस्तके समोर होती. त्यांची पत्नी त्यांना म्हणाली की दोन्ही पुस्तकांना पुरस्कार देऊन टाका. आता या समितीत हे परिक्षक एकटेच असताना त्यांची पत्नी कुठून आली? का सुभाष देशमुख यांनी परिक्षक नेमताना मेहुण नेमण्याचा नवा पायंडा महाराष्ट्रात पाडलेला आहे? 

संपूर्ण कार्यक्रमावर सुभाष देशमुख यांचा वचक चांगलाच जाणवत होता. कारण ते सभागृहात आले की लगेच अर्धे सभागृह उठून उभा राहिले. उभे राहणारच कारण ते सर्वच जवळपास त्यांच्या लोकमंगल समुहाचेच कर्मचारी होते. त्यांनीच खुर्च्या व्यापल्यामुळे बर्‍याच साहित्य रसिकांना परत जावे लागले. 

सुभाष देशमुख भाषणात सुरवातील असे म्हणाले की चिठ्ठी येण्याच्या आतच मी भाषण आटोपते घेईन. पण त्यांचेच पैसे, त्यांचेच कर्मचारी, त्यांचाच पुरस्कार मग त्यांना चिठ्ठी पाठविण्याची हिंमत कोण करणार? भले ते कितीही का जास्त बोलेनात. सुभाष देशमुख साहित्य विषयावर जास्त बोलले तरी हरकत नव्हती. पण ते बोलले नोटाबंदी प्रकरणात त्यांच्या संस्थेवर आलेल्या बालंटाबद्दल. त्यासाठी साहित्यीक व्यासपीठ वापरायची काय गरज होती? 

सई परांजपे एरव्ही सडेतोड वागण्या बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण इथे त्यांनीही सुभाष ‘बापुं’च्या कार्याची महती गाऊन उपस्थित साहित्य प्रेमींना चकित करून सोडलं. 

या सगळ्यातून सिद्ध एकच झालं की सुभाष देशमुख यांचा मुख्य उद्देश जो होता, त्यांच्यावरचे नोटाबंदी भानगडीचे बालंट दूर व्हावं. यासाठी प्रतिष्ठीत साहित्यिकांनी त्यांच्या भलेपणाचे कौतुक करावे. म्हणजे त्यांची प्रतिमा उजळून निघेल. तर त्यांनी साहित्यीकांना ‘खिशात’ घालण्याचे काम (खरं तर साहित्यीकांच्या खिशात घालण्याचे) यथासांग पार पाडले. 

सगळे तमाम पुरोगामी आता शांत आहेत. सगळी असहिष्णुता संपली आहे. सुप्रसिद्ध भाषातज्ज्ञ साहित्यीक गणेश देवी यांनी सुरू केलेली दक्षिणायन चळवळ महाराष्ट्राच्या दक्षिणेला सोलापुरातच पुरोगाम्यांनी थंड पाडली. गणेश देवी सर सांगा आता काय करणार? 
पुढचा लोकमंगल पुरस्कार गणेश देवी यांनाच प्रदान करण्यात आला आणि त्यांनी तो स्वीकारला तर कोणी आश्चर्य वाटनू घेवू नये...  
  
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575