Sunday, October 25, 2015

बेगम अख्तर : गझलेचा झळाळणारा स्वर ।


उरूस, पुण्यनगरी, 25 ऑक्टोबर 2015

(रेखाचित्र वासुदेव कामात यांचे आसून राजहंस प्रकाशनाच्या अंबरीश मिश्र लिखित "शुभ्र काही जीवघेणे" या पुस्तकातून साभार )


उत्तरप्रदेशातील फैजाबाद गवातील स्वातंत्र्यापूर्वी 1920-22 सालची ही घटना. घरासमोरच्या पिंपळाच्या पारावर सात आठ वर्षांची एक मुलगी हिंदोळे घेत गाणं गात होती. हे गाणं एक तरणाबांड सैनिक तन्मय होवून ऐकत होता. त्या मुलीला कल्पनाच नव्हती. गाणं संपलं आणि त्या सैनिकाने खुशीत आपल्याजवळचे एक चांदीचे खणखणीत नाणे तिला बक्षिस दिले. पुढील आयुष्यात संगीत नाटक अकादमी, पद्मश्री सारखे कैक मानाचे पुरस्कार त्या मुलीला मिळाले. हजारो लोकांच्या मैफलीत तिनं गाणं सादर केलं. पण त्या एकट्या रसिकासाठी गायलेलं ते गाणं ‘सावरीया की मूरतिया’ आणि त्यानं बक्षिस म्हणून दिलेलं चांदीचं नाणं तिच्या कायम स्मरणात राहिलं. 

ही मुलगी म्हणजे पुढे विख्यात झालेली मलिका -ए-गझल पद्मश्री बेगम अख्तर. बेगम अख्तर यांचे जन्मशताब्दि वर्ष नुकतंच होवून गेलं. त्यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1914 चा आणि मृत्यू ऑक्टोबर महिन्यातीलच 30 ऑक्टोबर 1974 चा.

गझलगायक गुलाम अलींच्या कार्यक्रमा संदर्भात मोठा गदारोळ उठला आहे. या संदर्भात बेगम अख्तर यांचा एक किस्सा मोठा लक्षणीय आहे. 1961 ला युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा एक कार्यक्रम पाकिस्तानात कराची इथे आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम लष्कारातील जवान आणि अधिकार्‍यांसाठी होता. त्या कार्यक्रमात बाईंनी एक अप्रतिम असा दादरा गायला. त्याचे बोल ऐकताच पाकिस्तानी लष्कराचे डोळे पाण्याने भरून आले. तो दादरा होता, ‘हमरी अटरिया पे आवो सजनवा, सारा झगडा खतम हो जाये’. कलाकारानं त्याच्या कलेतूनच उत्तर द्यायचं असतं. पत्रकारांनी बेगम अख्तर यांना या दादर्‍याबाबत खुप छेडलं. बाईंनी काहीच उत्तर दिलं नाही. नुसतं स्मित हास्य करून तो विषय संपवून टाकला. 

बेगम अख्तर यांचा जन्म फैजाबादचा. त्यांच्या सुरवातीच्या सगळ्या रेकॉर्ड ‘अख्तरी फैजाबादी’ या नावानेच आहेत. बेहजाद लखनवी याची गझल, 

दीवाना बनाना है तो दीवाना बना दे
वरना कही तकदीर तमाशा न बना दे
ऐ देखनेवालो, मुझे हँस हॅसके न देखो
तुमको मुहब्बत कही मुझसा न बना दे..

अख्तरीबाईंनी गायली आणि ती तुफान लोकप्रिय झाली. पंडित जसराज यांनी या गझलेची एक सुंदर आठवण सांगितली आहे. त्यांच्या शाळेच्या रस्त्यावर एक छोटंसं दुकान होतं. तिथं ग्रामोफोनचा मोठा कर्णा लावलेला असायचा. रोज तिथं हीच गझल चालू असायची. जसराज तिथेच पायरीवर बसून ऐकत रहायचे. शाळा सुटायची वेळ झाली की घरी परत जायचे.  शेवटी शाळेतून त्यांचं नावच काढून टाकण्यात आलं. जसराज गमतीनं म्हणायचे अख्तरीबाईंमुळे माझं नाव शाळेतून काढलं गेलं. आणि म्हणूनच मी गाण्यात काहीतरी नाव काढू शकलो. नसता त्या शाळेच्या आणि पुढे करिअरच्या गुंत्यातच अडकून पडलो असतो. 

बेगम अख्तर यांचं घराणं म्हणजे गळ्यात पेटी अडकवून दारोदार गाणं गात फिरणार्‍या नटनी बेडनी चं घराणं. बैठकीत बसून गाणं म्हणणार्‍या तवायफ यांना आपल्यापेक्षा कमी लेखायच्या. बेगम अख्तर यांचा आवाज, गाण्याचा रियाज, गाण्यासाठीची तळमळ पाहून नर्गिस ची आई जद्दनबाई हीने त्यांना कलकत्त्याला बोलावून घेतलं. तिथल्या तवायफ बेगम अख्तर यांच्याबद्दल आकस बाळगून होत्या. जद्दनबाई यांनी मध्यस्थी केली. सगळ्या मोठ्या तवायफांची आपल्या घरी बैठक बोलावली. त्यात बेगम अख्तरला गायला लावलं. फुल बत्तासे वाटून त्यांच्यावर ओढणी पांघरली. सगळ्यांच्या पाया पडायला लावलं. आणि मग सगळ्या तवायफांनी बेगम अख्तर यांच्या गाण्याच्या मैफिलींना मान्यता दिली. पत्रकार अंबरिश मिश्रांनी आपल्या ‘शुभ्र काही जीवघेणे’ या पुस्तकात हा किस्सा मोठ्या रंजकतेनं लिहून ठेवला आहे.   

बेगम अख्तर यांनी काही चित्रपटांतून कामं केली. पण त्यांचे मन तिथे रमले नाही. चित्रपट सृष्टीनेही त्यांना स्विकारले नाही. 1942 च्या सुमारास आलेला ‘रोटी’ हा त्यांचा चित्रपट काहीसा गाजला. पण पुढे कारकीर्द मात्र बहरली नाही.

सांसारिक आयुष्यातही त्यांना सुख मिळू शकलं नाही. लग्नानंतर गर्भ राहिला पण  थोड्या काळातच गर्भपात झाला आणि एक स्वप्न विरून गेलं. बाई मग संसारात रमल्याच नाहीत. त्यांच्या पतीला त्यांच्या गाण्याची तळमळ कळली. अख्तरी फैजाबादी या नावानं आत्तापर्यंत त्यांची सांगितीक कारकिर्द बहरली होती. गर्भपाताच्या दु:खातून त्या बाहेर पडून गायल्या लागल्या ते नविन नाव घेवूनच. आता ‘बेगम अख्तर’ या नावानं त्यांची सांगितीक कारकीर्द सुरू झाली. 

दिवाना बनाना है या गझलेनं त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली होती. आता दुसर्‍या पर्वात शकिल बदायुनीच्या 

ऐ मुहोब्बत तेरे अंजाम पे रोना आया
जाने क्यों आज तेरे नाम पे रोना आया

या त्यांच्या गझलेने कहर माजवला. आजही ही गझल रसिकांच्या स्मरणात आहे. गझलेने  बाईंना  नाव दिले गझलेत त्यांचे योगदानही आहे पण त्यासोबतच उपशास्त्रीय संगीतातही त्यांचं मोठं योगदान आहे. ठूमरी, दादरा, चैती, कजरी या गानप्रकारांना त्यांनी सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. तवायफांच्या कोठ्यावर असलेलं हे गाणं बाहेर काढलं. संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारताना बाईंना आपल्या कलेचे चीज झाल्याचं एक वेगळंच समाधान वाटलं. एरव्ही ज्या काळात बेगम अख्तर गायच्या तेंव्हा गाण्याला प्रतिष्ठा नव्हती. गाण्यार्‍या बाईला तर केवळ तुच्छतेनं भोगवस्तू म्हणूनच पाहिलं जायचं. 
अख्तरीबाईंच्या गळ्यावर सत्यजीत रे सारख्या महान दिग्दर्शकाचा विश्वास होता. म्हणूनच जलसा घर नावाच्या आपल्या चित्रपटात जमिनदार छबी विश्वास याच्या हवेलीत गाणं गाण्यासाठी बेगम अख्तर यांनाच बोलावलं. स्वर तर बेगम अख्तर यांचा आहेच पण भूमिकाही त्यानीची केली आहे. या चित्रपटाट  त्यांनी  मिश्र पिलूतील ठूमरी ‘भर भर आयी मोरी आँखिया पियाबीन..’ गायली आहे. 

बेगम अख्तरवर लिहीताना अंबरिश मिश्र यांना काही संदर्भ लागत नव्हते. त्यांनी महान संगीतकार नौशाद यांना याबाबत विचारले. नौशाद यांनी दिलेलं उत्तर मोठं मार्मिक आहे. ते म्हणाले, ‘जहॉं जहॉं गॅप्स लगती है वहां वहां अख्तरी के गझलों के दिये रख दो. चारों ओर रोशनी ही रोशनी.’

बेगम अख्तर यांचा शेवटचा कार्यक्रम अहमदाबादला होता. त्यांच्या छातीत कळा येत होत्या. कोणी सुचवले की आपण विश्रांती घ्या. गाऊ नका. बाई म्हणाल्या ‘ये भी क्या मशवरा है? अगर गाते गाते ही मेरी मौत हो जाये, तो इससे बढकर मेरी खुशकिस्मती और क्या होगी?’. खरंच गाणं संपत असताना त्यांच्या  छातीतल्या कळा वाढल्या. भैरवी कशीबशी संपवली आणि त्यांना लगेच दवाखान्यात दाखल करण्यात आलं. माधव मोहोळकर यांनी आपल्या ‘गीतयात्री’ पुस्तकात या प्रसंगावर लिहीताना अख्तरीबाईंच्या पहिल्या गाजलेल्या गझलेच्या ओळींचा उल्लेख केला आहे. बेहजाद लखनवीची ती गझल आहे. त्यातील एक शेर असा आहे

मै ढूंढ रहा हूँ मेरी वो शमा कहॉं है
जो बज्म की हर चीज को परवाना बना दे
दीवाना बनाना है तो दीवाना बनाना दे..

व्यवस्थेचा बेगडी विरोध न करता प्रत्यक्ष कृती करण्यावर बेगम अख्तर यांचा भर होता. त्यांना आकाशवाणीत राष्ट्रीय प्रसारणासाठी बोलावण्यात आलं. त्यांनी गझल गायची तयारी केली तेंव्हा त्यांना सांगितलं की गझल गायला आकाशवाणीवर बंदी आहे. आपण ठूमरी दादरा किंवा इतर उपशास्त्रीय काहीतरी गा. बाईंनी बाणेदारपणे नकार दिला आणि तिथून न गाता परतल्या. प्रसारण मंत्र्यांना हे कळले आणि जेंव्हा आकाशवाणीच्या नियमात दुरूस्ती होवून गझल गायला परवानगी मिळाली तेंव्हाच बेगम अख्तर आकाशवाणीवर गायल्या.

याच महिन्यात जयंती आणि पुण्यतिथी असलेल्या या महान गायिकेला विनम्र अभिवादन ! 

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575  

Sunday, October 18, 2015

परदेशी संगीत देशी मातीत रूजविणारी तरूणाई


उरूस, पुण्यनगरी, 18 ऑक्टोबर 2015

रॉक बँड ची स्पर्धा चालू आहे. मंचावर चार तरूण जेमतेम 17-18 वर्षांचे गिटार, ड्रम, आवाजाच्या माध्यामातून समोरच्या तरूणाईवर जादू करत आहेत. त्यांना प्रतिसाद द्यायला त्या संगीताच्या पद्धतीप्रमाणे काही तरूण हेडबँग करत आहेत. हेडबँग म्हणजे केस वाढविलेली डोकी गोल गोल फिरवत स्टेजसमोर उभं राहून दाद देणे. जे काही संगीत चालू आहे ते रॉक मधील ‘क्लासिकल’ समजले जाणारे ‘मेटल’ संगीत आहे. याची जाणीव सर्वांना आहे. त्यामुळे शांतपणे ते ऐकल्या जातं आहे. गाणं संपताच टाळ्यांचा कडकडाट होतो. बाकी धांगडधिंगा करणार्‍या इतर बँडला मागे सारून रॉकमधील ‘मेटल’ वाजविणार्‍या या गटाला पहिलं बक्षिस मिळतं.  

ही कुठली जर्मनी, इटली, इंग्लंड, अमेरिका देशातील घटना नाही. भारतात, महाराष्ट्रात, मराठवाड्यातील औरंगाबाद शहरात मागच्या महिन्यात घडलेली घटना आहे. रॉक बँडची स्पर्धा रोटरी क्लबच्या दरवर्षी वतीने भरविण्यात येते. गेली दोन वर्ष ‘थर्स्टी ओशन’ हा बँड ग्रुप बक्षिस मिळवत आहे. मागच्यावर्षी दुसरं बक्षिस मिळवणारी ही मुलं या वर्षी पहिल्या क्रमांकाची मानकरी ठरली आहेत. नुसतं बक्षिस मिळवलं असतं तर त्याची फारशी दखल कुणी घेतली नसती. हाती गिटार घेवून मिरवले, धाड धाड ड्रम बडिविला की जवळपासची मित्रमंडळी विशेषत: मुली त्यांना भाव देतात. असाच आपला समज असतो. पण या मुलांचे वैशिष्ट्य म्हणजे हे कुठलीही भेसळ न करता, पाश्चात्य संगीतातील ‘क्लासिकल’ समजले जाणारे ‘मेटल’ संगीत वाजवत आहेत. सध्या बारावीत शिकणार्‍या या तरूण मुलांना याचाही अभिमान आहे की इतक्या लहान वयात हे संगीत वाजविणारे महाराष्ट्रात तरी तेच एकमेव आहेत. 

अमर ढुमणे-केतन कुलकर्णी-राहूल भावसार- सलिल चिंचोलीकर या चार तरूणांची ही कथा आहे. शाळेत असताना संगीताच्या प्रेमामुळे या चौघांची ओळख वाढत गेली दोस्ती गहरी होत गेली. दहावीच्या वर्षात शाळेच्या निरोप समारंभात आपण आपली कला आपल्या दोस्तांसमोर शिक्षकांसमोर सादर करावी असे त्यांना वाटले. आणि पहिल्यांदा चौघांनी आपली कला रसिकांसमोर सादर केली.  तसं तर हे संगीत कळणारी आपल्याकडे फारशी माणसं नाहीतच. अगदी घरचे किंवा जवळचे मित्रही या बाबत कसे कोरडे आहेत याचाच अनुभव या चौघांनाही येत गेला. पण यांची संगीतावरची निष्ठा अगदी शुद्ध. घरच्यांना हळू हळू यांचे या संगीतावरचे प्रेम जाणवत गेले. आणि यांना काहीसे अनुकूल वातावरण तयार झाले. 

रॉक संगीत दुसर्‍या महायुद्धानंतर अमेरिकेत जन्माला आले. त्याला पार्श्वभूमी महायुद्धाची होती. जगभरात एक बंडखोरी नविन पिढीत तयार होत होती. आणि या बंडखोरीला कलेतून व्यक्त होण्यासाठी रॉकचा जन्म झाला. याच रॉकमधून इंग्लंडमधून 1960 नंतर आणि अमेरिकेत 1970 नंतर मेटल संगीताची सुरवात झाली. मेटल या रॉक प्रकारात चार कलाकार असतात. एक लिड गिटारिस्ट, दुसरा बेस गिटारिस्ट, तिसरा ड्रमर आणि चौथा गायक. 

मेटल रॉक संगीतात ज्या बँड ग्रुपचे संगीत या  मुलांना जास्त आवडले त्या बँडचे नाव आहे मेटालिका. अमेरिकेतील कॅलिफोर्निया इथे 1981 मध्ये या बँडची सुरवात झाली. लार्स उलरिच (ड्रमर), जेम्स हेटफिल्ड (गायक), किर्क हॅमेट (लिड गिटारिस्ट), रॉबर्ट ट्रुजिलो (बेस गिटारिस्ट) हे चार कलाकार मेटालिका मध्ये आहेत. आत्तापर्यंत 8 वेळा ग्रॅमी अवॉर्ड त्यांना प्राप्त झालंय. संगीताच्या क्षेत्रातील जाणकारांना याची कल्पना आहे की हा या क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे. 

अमर-केतन-राहूल-सलिल या चौघांवर मेटालिकाच्या या चार कलाकारांचा त्यांच्या संगीताचा विलक्षण प्रभाव पडला. ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे की इतक्या लहान वयात आजूबाजूला पोषक वातावरण नसताना पाश्चिमात्य संगीतातील काही एक गंभीर प्रकार आवडावा आणि त्यासाठी ध्यास बाळगावा. 

ही तरूण मुलं ही कला केवळ नेटवरून माहिती मिळवत शिकत गेली. बाकी वाद्यांसाठी स्थानिक पातळीवर त्यांना इतर शिक्षकांची मदत मिळत केली. पण प्रामुख्याने या संगीताची साधना त्यांनी स्वत:च गुरूशिवाय केली हे विशेष. एकलव्याने द्रोणाचार्यांचा पुतळा समोर ठेवून साधना केली. ही मुलं नेट समोर ठेवून साधना करत आहेत. बाकी निष्ठा तशीच आहे. 
साधारणत: असं समज असतो की पाश्चिमात्य संगीत म्हणजे श्रीमंत घरातील लाडावलेल्या मुलांचे खुळ. पण ही चारही मुलं अगदी साध्या मध्यमवर्गीय घरातली आहेत. अजूनही त्यांची राहणी साधी आहे. इतक्या तरूण वयात मेटल सारखे गंभीर संगीत प्रकार हे वाजवितात हे पाहून पुण्याला त्यांना विशेष निमंत्रण देण्यात आले. महाराष्ट्रात अतिशय मोजके असे बँड आहेत जे गांभिर्याने संगीताची साधना करतात. त्यांना या मुलांच्या प्रतिभेची जाणीव झाली. 

नविन पिढीला सामाजिक समस्यांची जाणीव नसते असाही एक आरोप आपण करतो. पण ही मुलं यालाही अपवाद आहेत. मेटल सारखे संगीत तेंव्हाच्या युरोपातील सामाजिक अस्वथतेला व्यक्त करत होते. या मुलांना आजच्या भारतातील सामाजिक  अस्वस्थतेला आपल्या संगीतातून व्यक्त करावे वाटते. ही विशेष कौतुकाची बाब आहे. मेटल मधील जी गीतं असतात ती काल्पनीक नसून वास्तवदर्शी असतात. समाजाच्या प्रश्नांशी निगडीत असे हे संगीत आहे. म्हणून ते आम्हाला आजही जास्त भावून जाते ही या मुलांची भावना आहे. 

आपल्याकडे 1949 मध्ये सी. रामचंद्र यांनी ‘सरगम’ चित्रपटांतून पाश्चिमात्य रॉक संगीत मोठ्या प्रमाणात वापरले. पुढे आर.डी. बर्मन यांनी ‘तिसरी मंझील'मध्ये आणि अगदी 1990 नंतर ए.आर.रहेमाने ‘रोझा’ मध्ये पाश्चिमात्य संगीताचा वापर मोकळ्या हाताने केला. या तरूण मुलांना अशी भेसळ नको वाटते हे विशेष. त्यांचे म्हणणे भारतीय लोकसंगीत, शास्त्रीय संगीत, सुफी संगीत आणि पाश्चिमात्य संगीत अशी भेळ करू नये. जे वाजवायचे ते स्वतंत्र वाजवावे. 

आपल्याकडे अल्लादिया खां, अब्दूल करिम खां सारखे जयपुर किंवा किराणा घराण्याचे महान गायक आपल्या आपल्या घराण्यांबाबत किती अभिमानी आणि आग्रही होते याच्या दंतकथा आपण भरपूर ऐकत आलो आहोत. पण नविन 17 वर्षांची मुलांची पिढीही शुद्ध संगीतासाठी आग्रह धरते याचे कौतुकच केले पाहिजे. 

हे पाश्चिमात्य संगीत किंवा कुठलेही संगीत किंवा एकुणच कला यासाठी आपल्या शिक्षणात अजितबात पोषक वातावरण नाही असा तक्रारीचा सुर राहूल भावसारने व्यक्त केला. केतन कुलकर्णी सारखा तरूण ‘थर्स्टी ओशन’ नाव का घेतले याबाबत जागरूक आहे. पाणी असून पिता येत नाही अशी समुद्राची व्यथा यांना सांगायचीय. लिड गिटारिस्ट असलेल्या सलिलला रियाजाचे महत्त्व जास्त वाटते. या बँडमध्ये तालाची बाजू सांभाळणार्‍या अमरला चार जणांचा मिळून तोल सांभाळणे महत्त्वाचे वाटते. एकत्र असल्याने आपण काही निर्माण करू शकतो ही बाब इतक्या कमी वयात या मुलांना जाणवली हे विशेष.

या संगीताच्या प्रसारासाठी प्रस्थापित माध्यमे अपुरी पडतात. किंवा ते दखलच घेत नाहीत ही तक्रारही या मुलांनी व्यक्त केली. त्यांच्या मते सोशल मिडिया हाच खरा आम्हाला पाठिंबा देतो आमची दखल घेतो. मोठ मोठे रॉक बँड भारतात येतात त्यांची माहिती सोशन मिडियावर मिळते. त्यांच्या कार्यक्रमाची तिकीट विक्री ऑनलाईन होते. हजारो रसिक त्यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावतात. तिकीटं सहजा सहजी मिळतही नाहीत. आणि याची कसलीच खबर वर्तमानपत्रे, टिव्ही चॅनल यांना नाही. खरंच विचार करायला लावणारी बाब आहे. मराठवाड्यात बसून 17 वर्षाच्या मुलांना अमेरिकेतील संगीताची मोहिनी पडते. त्यासाठी ते आपली शक्ती खर्च करतात. आणि याची खबरही माध्यमांना नसते. यांन्नी या ग्रीक-अमेरिकन संगीतकाराची ताजमहालच्या परिसरात झालेली मेहफील हाच काय तो अलिकडचा अपवाद. बाकी माध्यमे उदासीन असतात. 

ज्ञानेश्वरांनी 16 व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहीली हे आपण नुसतं ऐकतो. पण हेच वर्य काहीतरी नविन सुचण्याचं आणि त्यासाठी वेडं होण्याचं आणि तशी कृती करण्याचं असतं हे लक्षात घेत नाहीत. हे वय प्रत्येकाच्या आयुष्यात येतं. या मुलांनी आपल्यातली ही उर्मी ओळखली. त्यासाठी प्रत्यक्ष कृती केली. आज बक्षिस मिळवलं. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन !!

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575      

Thursday, October 15, 2015

मराठी पुस्तके आणि पुरस्कार : कही पे निगाह है कही पे निशाना !!

दै. उद्याचा मराठवाडा दिवाळी 2013 

मराठी पुस्तकांसाठी आजकाल गल्ली पासून ते दिल्ली (साहित्य अकादमी) पर्यंत पुरस्कारांची प्रचंड दाटी झाली आहे. कुणालाही असं वाटतं की मराठी वाङ्मयासाठी काही करायचं असेल तर ते केवळ पुरस्कार देवूनच साध्य होवू शकेल. पुरस्कार देण्यास सुरवात होते. सुरवातील उत्साह टिकतो, चांगली पुस्तके निवडली जातात. मग बघता बघता त्यात गटातटाचे राजकारण शिरते. कुणाला पुरस्कार द्यावा या सोबतच कुणाला तो कसा मिळू नये याची व्यूहरचना काटेकोरपणे केली जाते. (मराठवाड्यात असं घडलं आहे की आदल्या दिवशी पर्यंत एका कविमित्राला पुरस्कार द्यायचं ठरलंं होतं, एका संस्थेने आपल्या पत्रिकांमध्ये तसं लिहिलं पण होतं पण दुसर्‍यादिवशी ऐनवेळेवर हा पुरस्कार दुसर्‍याच पुस्तकाला दिल्या गेला. मराठवाड्यातीलच एक कथाकार, एक कादंबरीकार आणि एक कवी यांच्या अतिशय चांगल्या पुस्तकांना शासनाचे पुरस्कार कसे मिळू नयेत याचे आटोकाट प्रयत्न केल्या गेले.)  परिणामी त्या पुरस्काराचे गांभिर्यच मग कमी होउन जाते. नंतर नंतर तर कुठल्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला हेच कुणाच्या लक्षात रहात नाही.

काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात वर्तमानपत्रे मर्यादित होती शिवाय त्यांची पानेही मर्यादितच होती. परिणामी एखाद्या पुरस्काराची बातमी सगळ्या महाराष्ट्रभर पसरायची. मग स्वाभाविकच महाराष्ट्रभरचे साहित्यप्रेमी त्याची नोंद घ्यायचे. आता मात्र गावोगावच्या स्वतंत्र आवृत्त्या निघू लागल्या आहेत. मग होते काय की पुरस्कार कितीही मोठा असो (पैशाच्या दृष्टीने) कितीही महत्त्वाचा असो (वाङ्मयीन दृष्टीने) कितीही काटेकोरपणे दिला जात असा (नि:स्पृहपणे काम करणार्‍या साहित्यीक कार्यकर्त्यांकडून) त्याची माहिती महाराष्ट्रभर होतच नाही. मग असा लेखक एखाद्या ठिकाणी जेंव्हा निमंत्रीत म्हणून जातो तेंव्हा कार्यक्रमापूर्वी आयोजकांपैकी एखादा होतकरू परिचय करून देणारा तरूण त्या साहित्यीकालाच विचारतो, ‘तूमचा काही छापिल परिचय असेल तर द्या किंवा पटापट सांगा मी लिहून घेतो.’ मग तो लेखक स्वत:ला मिळालेल्या पुरस्कारांची यादी सांगतो. तेंव्हाच इतरांना त्याला मिळालेले पुरस्कार कळतात.

बरं पुस्तकाला पुरस्कार मिळाला तर त्याचा खप वाढतो का? त्याला समीक्षक, रसिक वाचक यांच्या विशिष्ट वर्गात योग्य ती मान्यता मिळते का? तर तसा कुठलाही पुरावा नाही. उलट चांगलं पुस्तक हे वाचकापर्यंत बर्‍याचदा योगायोगानं किंवा एखाद्या चांगल्या वाचक मित्रानं सांगितलं, उपलब्ध करून दिलं म्हणूनच पोंचतं.
गल्लोगल्लीच्या पुरस्कारांचे निकष, त्यांचे स्वरूप यात गांभिर्य नसल्यामुळे त्यांचा विचार मी इथे करत नाही. फक्त साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ पुरस्कार यांचा मराठी पुरता विचार करतो.

साहित्य अकादमीची स्थापना 1954 ला झाली. 1955 पासून पुरस्कार द्यायला सुरवात झाली. आतापर्यंत (2014 पर्यंत) 1957 चा एकमेव अपवाद वगळता प्रत्येकवर्षी हा पुरस्कार एका मराठी लेखकाला मिळाला असून ही संख्या 59 आहे. (सोबतच्या परिशिष्टात ही यादी दिली आहे.) एवढी मोठी परंपरा असलेला इतका मोठा हा पुरस्कार, ज्यासाठी आपणहून पुस्तक पाठवता येत नाही, यासाठी एका मोठ्या समितीद्वारे निवड केली जाते. तीन पातळ्यांवर ही निवड करत करत शेवटी 3 जणांची अंतिम समिती निर्णय घेते. इतकं सगळं होवून हा पुरस्कार जाहिर होतो.

आता अशी अपेक्षा सर्वसाधारण वाचकांची किंवा साहित्य क्षेत्रातील जाणकारांची असेल की ही पुस्तकं खुप खपली असतील, सर्वत्र पोचली असतील. तर ते सपशेल खोटं आहे. सोबतच्या नावांवरून तूम्ही नजर टाका तूमच्या लक्षात येतील की यातील कित्येक पुस्तके अजूनही कुठल्याच जिल्हा ग्रंथालयातही उपलब्ध नाहीत. किंवा उलटही घडलेले आहे. की पुस्तक लोकांना माहित आहे. त्याचे महत्त्व लोकांना माहित आहे पण या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार आहे हेच माहित नाही.  त्याच्यापर्यंतही आम्ही पुरस्काराची महती पोंचवण्यास अपुरे पडलो.

विनय हर्डीकर यांच्या ‘जनांचा प्रवाहो चालिला’ या पुस्तकाला शासनाचा पुरस्कार जाहिर झाला. पण आणिबाणीतील त्यांची शासनाचा कठोरपणे निषेध करणारी भूमिका पाहून या पुस्तकाला पुरस्कार नाकारला गेला. मग लोकांनी वर्गणी करून त्यांचा सन्मान घडवून आणला. याच काळात रा.भा.पाटणकर यांना ‘सौंदर्यमिमांसा’ या ग्रंथासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहिर झाला. शासनाच्या निषेधार्थ हा पुरस्कार परत करा अशी मागणी दुर्गाबाईंनी केली होती. पाटणकरांनी आपले पुस्तक हे अराजकीय विषयावरचे आहे, साहित्य अकादमी ही संस्थासुद्धा अराजकीय आहे असं म्हणत पुरस्कार परत करायचं टाळलं.

गंगाधर गाडगीळ यांच्या ‘एका मुंगीचे महाभारत’ या आत्मचरित्राला अकादमी पुरस्कार मिळाला. खरं तर त्याकाळात गाडगीळ अकादमीचे अध्यक्षच होते. त्यांनी आपले पुस्तक शेवटच्या टप्प्यापर्यंत शर्यतीत राहिल याची काळजी घेतली. आपल्या पदाचे दडपण आणले. आणि प्रत्यक्ष पुस्तकाची निवड जाहिर करण्याच्या वेळेस मात्र राजीनामा देवून पद सोडले.

काही लेखकांच्या चांगल्या पुस्तकाला पुरस्कार मिळू नये अशीच योजना केली गेली मग उपरती होवून त्यांच्या दुय्यम पुस्तकांना हा पुरस्कार देवून भरपाई करण्याची तडजोड केली गेली. भालचंद्र नेमाडे यांचे ‘कोसला’ सोडून ‘टिकास्वयंवर’, ना.धो.महानोर यांचे ‘रानातल्या कविता’ सोडून ‘पानझड’, ग्रेस यांचे ‘संध्याकाळच्या कविता’ सोडून ‘वार्‍याने हलते रान’ पुरस्कार देण्यात आले. अशी काही उदाहरणं देता येतील.

साहित्य अकादमी पुरस्काराबाबत असा नियम आहे की जे कुठले पुस्तक पुरस्कारासाठी निवडण्यात येईल ते आधी कुठेही आणि कसल्याही स्वरूपात प्रकाशित झाले नसावे. शिवाय त्यातील एखादा भागही पुस्तक स्वरूपात प्रकाशित नसावा. पुस्तकाची अर्थातच पहिलीच आवृत्ती असावी. पण सुप्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार यांच्याबाबतीत डोळेझाक करण्यात आली. एलकुंचवार यांचे ‘वाडा चिरेबंदी’ हे नाटक मौज प्रकाशनाने प्रकाशित केले होते. त्यानंतर जेंव्हा वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी, युगांत ही तीन नाटके एकत्र करून ‘युगांत’ याच नावाने हे पुस्तक मौजेनेच प्रकाशित केले. आता जेंव्हा अकादमी पुरस्कारासाठी ‘युगांत’चा विचार झाला तेंव्हा वाडा चिरेबंदीच्या पूर्वप्रकाशनाकडे दुर्लक्ष केल्या गेले. आणि या पुस्तकाला पुरस्कार देण्यात आला. लेखक अतिशय प्रतिष्ठीत, प्रकाशन मोठे तेंव्हा कोणी आक्षेप घेण्याचा प्रश्नच नव्हता.  आणि तो घेतलाही गेला नाही. हेच जी.ए.कुलकर्णी यांच्याबाबतीत मात्र क्ष्ाुल्लक तांत्रिक बाब उपस्थित करून आक्षेप घेण्यात आला होता.

ज्या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त होतो त्या पुस्तकाचा इतर भारतीय भाषांमध्ये अनुवाद व्हावा अशी अपेक्षा असते. किंवा अकादमीचे हे कामच आहे. पण प्रत्यक्षात मराठीतील पुस्तकांबाबत हे घडले नाही किंवा घडू दिले नाही. एक तर मराठी पुस्तकांचे अनुवाद झाले नाही किंवा जे झाले ते अतिशय सुमार दर्जाच्या लोकांनी केले. तसेच मराठीत जे अनुवाद उपलब्ध आहेत इतर भाषांमधले त्यातही अशात येणारी बरीच पुस्तके अतिशय सामान्य दर्जाची आहेत. त्या उलट इतर प्रकाशन संस्था सध्या जी अनुवादाची कामं करत आहेत ती जास्त समाधानकारक आहेत. पूर्वी साहित्य अकादमीने ही कामं चांगली केलेली आहेत.

अकादमीच्या पुरस्कारांना एक प्रतिष्ठा आहे, 59 वर्षांची मोठी परंपरा आहे शिवाय एक मोठे अधिष्ठान या संस्थेला आहे तिथे हे हाल आहेत.

सर्वसामान्य वाचकांना ही पुरस्कारप्राप्त पुस्तके कुठली आहेत हे जाणून घेण्यात भरपूर रस असतो. पण त्याहीबाबत अकादमी कमी पडते. पुस्तकांची विक्री आपण स्वत: करायची आहे की विक्रेत्यांमार्फत करायची आहे हेच अजून अकादमीला उलगडले नाही. खरं तर खासगी विक्रेत्यांना हाताशी धरून विक्रीची अतिशय चांगली यंत्रणा उभी करणं सहज शक्य आहे. पण सरकारी खाक्याप्रमाणे इथेही कारभार चालतो. एखाद्या परिसंवादासाठी लाखो रूपये खर्च करणारी अकादमी पुस्तक विक्रीसाठी मात्र अतिशय कद्रूपणा दाखवते. आजही अकादमीचा एखादा प्रतिनिधी नियमितपणे महाराष्ट्रभर विक्रेत्यांकडे फिरतो आहे असे घडत नाही. चांगले अनुवादक हुडकून त्यांच्याकडून मराठीतून इतर भाषेत व इतर भाषेतून मराठीत पुस्तके आणली जात आहेत असंही घडत नाही. टी.शिवशंकर पिळ्ळे या मल्याळम भाषेतल्या मोठ्या लेखकाचे हे जन्मशताब्दि वर्ष आहे. त्यांची पुरस्कार प्राप्त कयर (रस्सी) ही कादंबरी इंग्रजी व हिंदीत अकादमीने छापली. ही मराठीत यावी म्हणून आम्ही जनशक्ती वाचक चळवळीच्या वतीने एक प्रस्ताव अकादमीकडे दिला. त्यांच्या होकारानंतर अनंत उमरीकर यांच्याकडून काही भाग अनुवादीत करून त्यांच्याकडे पाठवला. त्यांनी होकार दिल्यानंतर संपूर्ण 1000 पानाची ही महाकादंबरी अनुवाद करून त्याचे डिटीपी करून त्यांच्याकडे पाठवली. त्यांनी सुचवलेले बदल करून परत सगळा मजकूर पाठवला. यासाठी पूर्ण 2 वर्षे गेली. अकादमीच्या इतिहासात इतके मोठे काम इतक्या लवकर झाल्याचे हे पहिलेच उदाहरण. तरीही अंतिम टप्प्यात ही कादंबरी अकादमीकडून नाकारल्या गेली. आता त्यांनी केलेल्या कराराप्रमाणे मेहनतीचे तरी किमान पैसे द्यायला पाहिजे होते. पण तिथेही दप्तर दिरंगाईचा अनुभव आला. 1 वर्ष उलटून गेले अजून काहीही उत्तर अकादमी कडून आम्हाला मिळाले नाही. हे सगळं मराठवाड्याचाच माणूस अकादमीच्या मुंबई कार्यालयात सर्वेसर्वा असताना घडलं हे विशेष.

दुसरा महत्त्वाचा पुरस्कार दिला जातो तो म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार. फार जणांचा असा गैरसमज आहे की हा ही साहित्य अकादमीसारखा शासकीय पुरस्कार आहे. पण तसे नाही. ज्ञानपीठ ही संस्था स्वतंत्र आहे. टाईम्स या वृत्तपत्र समुहाची ही संस्था असून हीच्यावतीने सर्व भारतीय भाषांतील लेखकांना हा पुरस्कार दिला जातो.
मराठीत आत्तापर्यंत फक्त चारच लेखकांना हा सन्मान प्राप्त झाला आहे.
1. वि.स.खांडेकर 2. वि.वा.शिरवाडकर, 3. विंदा करंदीकर. 4. भालचंद्र नेमाडे

खरं तर मराठीत जी.ए.कुलकर्णी, विजय तेंडूलकर, श्री.ना.पेंडसे, गंगाधर गाडगीळ, बा.भ.बोरकर, पु.ल.देशपांडे, रंगनाथ पठारे, ना.धो.महानोर अशा साहित्यीकांना हा पुरस्कार मिळायला हवा होता. पण तो मिळू शकला नाही. ज्यांना मिळाला त्यांच्या मोठेपणाबद्दल तर कुठली शंका नाहीच.

या पुरस्कारासाठी ज्या पद्धतीने मोठं राजकारण दिल्लीत खेळलं जातं त्याबद्दल एक घटना एका पत्रकार मित्राने सांगितली. पु.ल.देशपांडे यांना हा पुरस्कार देण्याचे घटत होते. दुसर्‍या एका मोठ्या मराठी लेखकाने दिल्लीत ज्ञानपीठ समितीचे अध्यक्ष कन्नड लेखक यु.अनंतमुर्ती यांच्यासमोर पु.ल.देशपांडे हे बाळासाहेब ठाकरेंना कसे भेटायला जातात हे समोर पडलेले वर्तमानपत्र दाखवून निदर्शनास आणून दिले. लगेच अनंतमूर्तींच्या मनात पु.ल.जातीयवादी पक्षांशी जवळीक साधतात असे मत बनले. खरं तर बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा अपघातात गेल्यावर पु.ल.भेटायला गेले अशी ती बातमी होती. तीचा आमच्याच दुसर्‍या मराठी लेखकाने असा वापर करून मराठीचे ज्ञानपीठ दूर पळवून लावले.

बरं ज्या लेखकांना ज्ञानपीठ अथवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला ती पुस्तके किती खपतात? असे विचारले तर त्याही आघाडीवर भयाण शांतता आढळेल. ज्ञानपीठ अथवा साहित्य अकदमी प्राप्त पुस्तकांची विक्री हा आमच्या समोरचा विषयच नाही. ठाण्याच्या साहित्य संमेलनात त्यावर्षीचे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त अशोक केळकर यांचे ‘रूजुवात’ हे पुस्तक  विक्रीसाठी उपलब्धच नव्हते. बरं हे संमेलन महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एखाद्या बुद्रूक गावी भरले नव्हते. मुंबईलाच ज्या प्रकाशनाचे मुख्यालय आहे त्या लोकवाङ्मयगृहानेच हे पुस्तक प्रकाशित केले होते. मग ठाण्याला ते का उपलब्ध करू शकले नाहीत? का त्यांना गरजच वाटली नाही?

या मोठ्या पुरस्कारांची ही अवस्था आहे मग छोट्या छोट्या पुरस्कारांची स्थिती विचारायची सोयच नाही. सगळे पुरस्कार हे सर्वसामान्य वाचकांपासून वेगळ्या अर्थाने तुटून गेले आहेत. खुप चांगल्या पुस्तकांना पुरस्कार मिळाले नाहीत आणि सामान्य पुस्तकांना मिळून गेले. बनगरवाडी-व्यंकटेश माडगुळकर, कोसला-भालचंद्र नेमाडे, डोह-श्रीनिवास विनायक कुलकर्णी, संध्याकाळच्या कविता-ग्रेस, मांदियाळी-अनंत भालेराव, धार आणि काठ-नरहर कुरूंदकर, विठोबाची आंगी-विनय हर्डीकर, अंगारमळा-शरद जोशी, वनवास-प्रकाश नारायण संत, आम्ही काबाडाचे धनी-इंद्रजीत भालेराव, तरीही-दासू वैद्य, इडा पीडा टळो-आसाराम लोमटे ही चांगली पुस्तके आम्ही पुरस्कारांपासून वंचित ठेवली. परिणामी यांना इतर संस्थांनी पुरस्कार दिले किंवा सामान्य वाचकांनी गौरविले आणि त्यांचे महत्त्व अधोरेखित करून ठेवले.

तेंव्हा पुरस्कार पुस्तकांना न्याय देतातच असे नाही. किंबहूना जास्तीत जास्त वेळा त्यांनी न्याय दिला असे दिसत नाही. म्हणजे एकतर चुक पुस्तकांना पुरस्कार दिला जातो. आणि जर योग्य पुस्तकाला दिला असेल तर ते पुस्तक वाचकांपर्यंत पोंचविण्यात आपण अपयशी ठरतो. पुस्तक वाचकांपर्यंत पोंचते केवळ त्याच्या नशिबानेच असं म्हणावे लागते.

 साहित्य अकादमी पुरस्कारांची यादी

1955- वैदिक संस्कृतीचा विकास (इतिहास) -तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
1956- सौंदर्य आणि साहित्य (समीक्षा) -बा.सी.मर्ढेकर
1958- बहुरूपी (आत्मचरित्र)-चिंतामणराव कोल्हटकर
1959- भारतीय साहित्यशास्त्र-ग.त्र्यं.देशपांडे
1960- ययाती-वि.स.खांडेकर
1961- डॉ.केतकर (चरित्र)-द.ना.गोखले
1962- अनामिकाची चिंतनिका-पु.य.देशपांडे
1963- रथचक्र-श्री.ना.पेंडसे
1964- स्वामी-रणजित देसाई
1965- व्यक्ती आणि वल्ली - पु.ल.देशपांडे
1966- श्री शिवछत्रपती-त्र्यं.श्री.शेजवलकर
1967-भाषा:इतिहास आणि भूगोल-ना.गो.कालेलकर
1968-युगांत-इरावती कर्वे
1969-नाट्याचार्य देवल (चरित्र)-श्री.ना.बनहट्टी
1970-आदर्श भारत सेवक (चरित्र)-न.र.फाटक
1971-पैस-दुर्गा भागवत
1972-जेव्हा माणूस जागा होतो (आत्मचरित्र)-गोदावरी परूळेकर
1973-काजळमाया-जी.ए.कुलकर्णी
1974-नटसम्राट-वि.वा.शिरवाडकर
1975-सौंदर्यमीमांसा-रा.भा.पाटणकर
1976-स्मरणगाथा (आत्मचरित्रात्मक कादंबरी)-गो.नी.दांडेकर
1977-दशपदी-अनिल (आ.रा.देशपांडे)
1978-नक्षत्रांचे देणे-आरती प्रभू (चि.त्र्यं. खानोलकर)
1979-सृष्टी, सौंदर्य आणि साहित्यमूल्य-शरच्चंद्र मुक्तिबोध
1980-सलाम-मंगेश पाडगांवकर
1981-उपरा (आत्मचरित्र)-लक्ष्मण माने
1982-सौंदर्यानुभव-प्रभाकर पाध्ये
1983-सत्तांतर-व्यंकटेश माडगुळकर
1984-गर्भरेशीम-इंदिरा संत
1985-एक झाड आणि दोन पक्षी (आत्मचरित्र)-विश्राम बेडेकर
1986-खूणगाठी (कवितासंग्रह)-ना.घ.देशपांडे
1987-श्री विठ्ठल : एक महासमन्वय (समीक्षा)-रा.चिं.ढेरे
1988-उचल्या (आत्मचरित्र)- लक्ष्मण गायकवाड
1989-हरवलेले दिवस (आत्मचरित्र)-प्रभाकर उर्ध्वरेषे
1990-झोंबी (आत्मचरित्र)-आनंद यादव
1991-टीकास्वयंवर (समीक्षा)-भालचंद्र नेमाडे
1992-झाडाझडती (कादंबरी)-विश्वास पाटील
1993-मर्ढेकरांची कविता :स्वरूप आणि संदर्भ (समीक्षा)-विजया राजाध्यक्ष
1994-एकूण कविता-1 (कविता)-दि.पु.चित्रे
1995-राघववेळ (कादंबरी)-नामदेव कांबळे
1996-एक मुंंगीचे महाभारत (आत्मचरित्र)-गंगाधर गाडगीळ
1997-ज्ञानेश्वरीतील लौकीक सृष्टी (समीक्षा)-म.वा.धोंड
1998-तुकाराम दर्शन (समीक्षा)- सदानंद मोरे
1999- ताम्रपट (कादंबरी)-रंगनाथ पठारे
2000-पानझड (कवितासंग्रह)-ना.धों.महानोर
2001-तणकट (कादंबरी)-राजन गवस
2002-युगांत (नाटक)-महेश एलकुंचवार
2003-डांगोरा एका नगरीचा (कादंबरी)-त्र्यं.वि.सरदेशमुख
2004-बारोमास (कादंबरी)-सदानंद देशमुख
2005-भिजकी वही (कवितासंग्रह)- अरूण कोलटकर
2006-भूमी (कादंबरी)- आशा बगे
2007-महर्षी विठ्ठल रामजी शिंदे :जीवन व कार्य (चरित्र)-गो.मा.पवार
2008-उत्सुकतेने मी झोपलो (कादंबरी)-श्याम मनोहर
2009-चित्रलिपी (कवितासंग्रह)-वसंत आबाजी डहाके
2010-रुजुवात (समीक्षा)-डॉ. अशोक केळकर
2011-वार्‍याने हलते रान (लघुनिबंध)-ग्रेस
2012-फिनिक्सच्या राखेतून उडाला मोर (कथासंग्रह)-जयंत पवार
2013-वाचणार्‍याची रोजनिशी (संकीर्ण) - सतीश काळसेकर
2014-चार महानगरांतले माझे विश्व (आत्मचरित्र)- जयंत नारळीकर

(श्रीकांत उमरीकर,  मो. 9422878575
-------------------------------------------------------------
        

Monday, October 12, 2015

रविंद्र जैन : स्वरदृष्टी देणारा अंध संगीतकार !


उरूस, पुण्यनगरी, 11 ऑक्टोबर 2015

हिंदी चित्रपटांतील गाण्यांनी रसिकांच्या मनावर फार मोठं गारूड करून ठेवलं आहे. 80 च्या दशकातील काही गाणी आठवा. ‘घुंगरू की तर्‍हा बजता ही रहा हू मै’, ‘गीत गाता चल ओ साथी गुनगुनाता चल’, ‘जब दीप जले आना’, ‘दिल मे तूझे बिठा के’, ‘फकिरा चल चला चल’, ‘तोता मैना की कहानी’, ‘अखियों की झरोंकेसे’ अशा कितीतरी गाण्यांनी आपले कान आजही तृप्त होतात. आपल्या आयुष्यात रंग भरणार्‍या या गाण्यांचा संगीतकार स्वत: मात्र ही दुनिया आपल्या डोळ्यांनी पाहू शकला नाही असे सांगितले तर आपला विश्वास बसत नाही. पण हे खरं आहे. नुकतेच निधन पावलेले थोर संगीतकार रविंद्र जैन यांनी संगीतबद्ध केलेली ही गाणी आहेत. 

28 फेब्रुवारी 1944 ला अलिगढ येथे जन्मलेले रविंद्र जैन यांचे नुकतेच नागपुर येथे निधन झाले. (9 ऑक्टोबर 2015) आपल्या 71 वर्षाच्या आयुष्यात अतिशय मोजक्या पण मधुर गीतांनी रसिकांच्या मनात कायम घर करणार्‍या या संगीतकाराने आपल्या अंधत्वावर मात करून रसिकांच्या आयुष्यात सुरांचा प्रकाश पसरला, संगीताचे सप्तरंगी इंद्रधनुष्य निर्माण केले. 

1950 ते 1970 या  काळात सी. रामचंद्र, शंकर जयकिशन, नौशाद, एस.डी.बर्मन, ओ.पी.नय्यर यांचा फार मोठा प्रभाव हिंदी चित्रपट संगीतावर होता. 1970  नंतर लक्ष्मीकांत प्यारेलाल, आर.डी.बर्मन, कल्याणजी आनंदजी यांचा जमाना सुरू झाला. काही संगीतकार अतिशय मोजकी गाणी देवून लोकप्रिय झाले त्यात हेमंतकुमार, सलिल चौधरी, जयदेव, खय्याम, रवी, मदनमोहन, रोशन  ही नावे प्रमुख होती. रविंद्र जैन अशाच संगीतकारांमध्ये मोडतात. त्यांना मोजकेच चित्रपट मिळाले पण त्यांतील गाणी मात्र अतिशय लोकप्रिय झाली. रसिकांचे अलोट प्रेम त्यांना मिळाले. 

अमिताभ जेंव्हा हाणामारीवाला नायक म्हणून समोर आला नव्हता त्या काळात त्याचा ‘सौदागर’ नावाचा एक चित्रपट राजश्री प्रॉडक्शनच्यावतीने 1973 मध्ये प्रदर्शित झाला. रविंद्र जैन यांचा हा संगीतकार म्हणून पहिला चित्रपट. नुतन, अमिताभ, पद्मा खन्ना यांच्या भूमिका यात होत्या. नुतनवर चित्रित झालेले लताचे गोड गाणे ‘तेरा मेरा साथ रहे’ आणि पद्मा खन्नावरचे आशाचे ‘सजना है मुझे सजना के लिये’ हे लाडीक गाणे याच चित्रपटातील. खांद्यावर बांबुच्या कावडीला ताडीचे मटके बांधून विकायला निघालेला अमिताभ किशोर कुमारच्या आवाजात, ‘हर हसिन चिज का मै तलबगार हू’ हे मस्तीभरे गाणे गात निघाला आहे. रविंद्र जैन यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची बहुतांशी गाणी त्यांनीच लिहीली आहेत. 

लगेच आलेला दुसरा चित्रपट म्हणजे शशी कपुरचा ‘चोर मचाये शोर’. यातील ‘घुंगरू की तर्‍हा बजता ही रहा हू मै’ हे गाणं त्यावेळी फार गाजलं होतं. पण याच चित्रपटातील ‘ले जायेंगे ले जायेंगे दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या आशा भोसले व किशोर कुमारच्या गाण्यानं बीनाका गीतमालात 8 व्या तर ‘एक डाल पर तोता बोले एक डाल पर मैना’ या गाण्यानं 19 व्या क्रमांकावर स्थान मिळवलं होतं. आजही लग्नप्रसंगी बँडवाल्यांना ले जायेंगे ची आठवण होते. 

रविंद्र जैन यांचे खरे सुर जूळले ते राजश्री प्रॉडक्शन सोबत. दोस्ती, पिया का घर, जीवनमृत्यू, उपहार सारख्या राजश्रीच्या चित्रपटांना हिट संगीत देणाऱ्या लक्ष्मीकांत प्यारेलाल नंतर राजश्री च्या चित्रपटातून संगीत देणे सोपे नव्हते. शिवाय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची लोकप्रियता प्रचंड वाढलेली. अश्या वेळी नविन चेहरे, नविन गायक व रविंद्र जैन यांचे संगीत असा 1974 ते 1980 चा काळ राजश्री च्या चित्रपटांनी मोठा सुरीला बनवला.  ‘गीत गाता चल’ मधुन सचिन-सारिका सारखे नविन कोवळे चेहरे राजश्रीने पुढे आणले. जसपाल सिंग या नव्या गायकाच्या तोंडी असलेल्या ‘गीता गाता चल ओ साथी गुनगुनाता चल’ या गाण्याने तुफान हवा केली. बीनाका गीतमालातही त्या वर्षी हे गाणं चौथ्या क्रमांकावर होतं. आरती मुखर्जीच्या आवाजातील अतिशय गोड गाणं ‘श्याम तेरी बन्सी पुकारे राधा नाम’ हे गाणंही असंच लोकप्रिय होत बीनाकाच्या 8 व्या स्थानावर आलं. 

या नंतर आलेला चित्रपट म्हणजे ‘चितचोर’. येसुदास हा नवा आवाज हिंदी चित्रपटांत रविंद्र जैन यांनी आणला. या नविन आवाजाचं फार मोठं स्वागत रसिकांनी केलं. येसुदासचे ‘गोरी तेरा गांव बडा प्यारा’ हे अमोल पालेकरच्या तोंडी असलेलं गाणं तेंव्हाच काय आजही लोकप्रिय आहे. या वर्षीच्या बीनाकात आरडी बर्मनच्या खालोखाल पाच गाणी एकट्या रविंद्र जैन यांची होती. ‘चितचोर’ मध्ये येसुदासच्या आवाजात हेमलता या नव्या गायिकेनंही सूर मिसळला. त्या दोघांचे सुंदर गाणे ‘तू जो मेरे सूर मे सूर मिला दे’ याच चित्रपटात आहे.
पुढच्या शशि कपुर शबाना आजमी यांच्या ‘फकिरा’ चित्रपटाला त्यांनी दिलेलं संगीतही रसिकांनी डोक्यावर घेतलं. लताच्या आवाजातील ‘दिल मे तुझे बिठाकर’, महेंद्र कपुर व हेमलताच्या आवाजातील ‘फकिरा चल चला चल’, लता किशोरचे द्वंद गीत ‘तोता मैना की कहानी तो पुरानी पुरानी हो गयी’ ही गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत.

या नंतरच्या ‘काळात अखियोंकी झरोंकेसे’, ‘दुल्हन वोही जो पिया मन भाये’, ‘सुनयना’, ‘गोपालकृष्ण’ 'नादिया के पार' 'मान अभिमान'  'बाबुल' सारख्या चित्रपटांतून त्यांची गोड गाणी येत राहिली. 

लता, मुकेश, रफी, आशा, किशोर, मन्ना डे यांचे आवाज रविंद्र जैन यांनी वापरले पण सोबतच  येसुदास, (गोरी तेरा गांव बडा प्यारा, सुनयना सुनयना, जब दीप जले आना, ओ गोरिया रे) जसपाल सिंग (गीत गाता चल, कौन दिशा मे, होली है), हेमलता (अखियों की झरोंकेसे, ले तो आये हो हमे, बेपर्वा बेदर्दी पगला दिवाना) आरती मुखर्जी (श्याम तेरी बन्सी) शैलेंद्र सिंग (हॅपी न्यु इयर टू यू) महेंद्र कपुर (फकिरा चल चला चल) यांनाही मोठी संधी त्यांनी दिली. 

अमिताभचे मारधाड चित्रपट सुरू झाले आणि सगळी हिंदीचित्रपट सृष्टी मधुर गाण्यांपासून दूर गेली. चित्रपटांत गाणी होती पण त्यांच्यातले माधुर्य संपून ‘मेहबुबा मेहबुबा’ (शोले- आवाज आरडी बर्मन) चा धिंगाणा सुरू झाला. या काळात सचिन (गीत गाता चल, अखियोंकी झरोंकेसे, नादिया के पार),  अमोल पालेकर (चितचोर), परिक्षीत सहानी (तपस्या), प्रेमकिशन (दुल्हन वही जो पिया मन भाये) नासिरउद्दीन शहा (सुनयना) मिथून (ख्वाब) शशी कपुर (फकिरा) जितेंद्र (आतिश) राज किरण (मान अभिमान) प्रशांत नंदा (नैय्या) तपस पौल (अबोध) आणि याच चित्रपटांमधून नायिका म्हणून सारीका, जरीना बहाब, रामेश्वरी, रंजिता, नीतू सिंग, राखी, साधना सिंह, शबाना आझमी यांच्या तोंडी रविंद्र जैन यांची गोड गाणी असायची. माधुरी दिक्षित चा पहिला चित्रपट अबोध हा राजश्रीचा होता. त्यालाही संगीत रविंद्र जैन यांचेच होते. माधुरीसाठी हेमलताचा आवाज रविंद्र जैन यांनी वापरला होता.

कठिण काळात हिंदी चित्रपट गीतांचा गोडवा जपायचं काम रविंद्र जैन यांनी केलं. पण हा सगळा बहर 1980 नंतर मात्र ओसरला.  

रविंद्र जैन यांनी गाणी अतिशय चांगली दिली पण त्यांना मुख्य प्रवाहातले चित्रपट मात्र मिळाले नाही. ही खंत त्यांना कदाचित जाणवत असावी. पण आपल्या उतारवयात राज कपुर सारख्यांना रविंद्र जैन यांच्या प्रतिभेची कदर करावी वाटली. 1986 मध्ये ‘राम तेरी गंगा मैली’ हा चित्रपट राज कपुर यांनी रविंद्र जैन यांना दिला. आणि रविंद्र जैन यांनी त्याचे सोने केले. ‘राम तेरी गंगा मैलीची’ सर्वच गाणी गाजली. आत्तापर्यंत हुलकावणी देणारं फिल्म फेअर अवॉर्डही त्यांना या चित्रपटासाठी मिळालं. लता सोबत सुरेश वाडकर सारख्या तेंव्हाच्या नव्या गायकाला मुख्य गायकाची संधी देण्यास रविंद्र जैन चुकले नाहीत.

जैन यांच्या गुणाची कदर करत राज कपुर प्रॉडक्शनचा पुढचा चित्रपटही ‘हीना’ही त्यांना मिळाला. 1991 मध्ये या चित्रपटांतील मधुर गाण्यांनी भरपुर लोकप्रियता मिळवली. 

रविंद्र जैन यांना भारत सरकारने पद्मश्री देवून गौरविले. उत्तर आयुष्यात आपल्या गुणांची कदर झाली याचे त्यांना समाधान वाटले असणार. 

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ने दुरदर्शनवर अफाट लोकप्रियता मिळवली. त्याचे संगीत रविंद्र जैनच यांचे होते. तुलसी रामायणातील अतिशय सुंदर दोहे निवडून त्याचा योग्य उपयोग रविंद्र जैन यांनी केला. दादा दादी की कहानी, श्रीकृष्ण, अलिफ लैला, हेमामालिनी यांची मालिका नुपूर अशा कितीतरी दूरदर्शन मालिकांना त्यांनी संगीत दिले.

आपल्या पहिल्याच सौदागर चित्रपटात मन्ना डेच्या आवाजात एक आर्त गाणं त्यांनी दिलं आहे. ‘दूर है किनारा, गहरी नदी की धारा, ओ माझी खेते जावो रे’ या गाण्यातील एका ओळीत ते लिहीतात ‘आंधी कभी तुफा कभी, कभी मझधार, जीत है उसीकी जिसने मानी नही हार’ हे स्वत: त्यांनाच लागू पडतं. आपल्या अंधपणावर त्यांनी विजय मिळवला. त्यांचा आवाज लोकगायकांसारखा किनरा चढा अतिशय सुरेल होता. अशा या गुणी प्रतिभावंत संगीतकाराला विनम्र श्रद्धांजली.   
   
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, October 6, 2015

गोडसे @ गांधी.कॉम


उरूस, पुण्यनगरी, 4 ऑक्टोबर 2015

हिंदी नाटककार असगर वजाहत यांचे गोडसे @ गांधी.कॉम हे हिंदी नाटक सध्या चर्चेत आहे. या नाटकाचा मराठी अनुवाद झाला असून हे नाटक मंचावर सादर झाले आहे. असगर वजाहत यांनी गांधी विचारांबाबत अतिशय महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करून सर्वांनाच अंतर्मुख होण्यास भाग पाडले आहे.

नाटकाची कल्पना अशी आहे. गांधींना गोळी लागते पण त्यांचा मृत्यू होत नाही. या गोळीबारातून गांधी वाचतात. गोडसेला तुरूंगात टाकले जाते. खटला उभा राहतो तेंव्हा गांधी गोडसेच्या विरोधात कुठलीही साक्ष न देता त्याला माफ करून टाकतात. आणि इथूनच मोठी पंचाईत सुरू होते. गांधी आपले समाजसेवेचे व्रत बिहार मधील एका छोट्या गावात चालु करतात. गांधींच्या कामाने नेहरूंचे सरकार अडचणीत येते. ज्या परिसरात गांधींचा हा आश्रम आहे त्या परिसरातील लोक एकत्र येवून श्रमदान करतात, आपली कामे आपणच करतात, सरकार नावाची दिल्लीत बसलेली यंत्रणा नाकारतात. त्यांचा हस्तक्षेप नको म्हणतात. इतकेच काय निवडणुका न घेता आपले प्रतिनिधी आपणच बीनविरोध निवडून देतात. सरकार शाही बळकट करण्यात गुंंतलेल्या नेहरू- -पटेल-आझाद आदींना धक्का असतो. निवडणुकात गांधींनी कॉंग्रेसला पाठिंबा द्यावा असा त्यांचा आग्रह असतो. गांधी तर कॉंग्रेसच बरखास्त करा असा आग्रह धरतात. गांधी कॉंग्रेसचा त्याग करतात. शेवटी सरकार विरोधी करवाया केल्या म्हणून गांधींना अटक करण्यात येते.

सरकार किमान असावे असा गांधींचा आग्रह होता. ही बाब नेमकी नेहरूनीतीच्या विरोधात जाणारी आहे. आज गांधी आणि नेहरू यांच्यात मतभेद होते असं म्हटलं तर कोणी कबुल करत नाही. गांधींना गोडसेने मारले तेंव्हा गोडसेला सावरकरांना भाजप मोदीला संघाला शिव्या देणे सोपे असते.  आपण मात्र गांधी विचारांचे पालन करत नाहीत. उलट त्यांच्या काहीसे विरोधीच आहोत हे इतर सर्व विचारसरणीचे लोक लपवून ठेवतात.

असगर वजाहत यांनी पुढे आणलेला हा किमान सरकारचा मुद्दा आज तपासून पाहिला तर असे लक्षात येईल की गांधींचा उदो उदो करणार्‍या नेहरू आणि पुढे इंदिरा गांधी, राजीव गांधी ते अगदी अलिकडे सोनिया गांधी प्रणीत मनमोहन सिंग या सर्वांनी गांधी विचारांना हरताळ फासलेला आहे. गोडसेने तर गांधींची शारीरिक हत्या केली. या सर्वांनी गांधी विचारांची राजरोस हत्या केली आहे. सरकार नावाची प्रचंड यंत्रणा उभी केली जी की एकुण उत्पन्नाच्या 70 टक्के इतका वाटा अधिकृत रित्या पगाराच्या रूपाने खावून टाकते. 

याचा परिणाम आज काय झाला? आज जेंव्हा शासन पुर्णपणे कर्जबाजारी बनले आहे तेंव्हा शासनाने हात झटकायला सुरवात केली आहे. महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान सुरू केले. याचा अर्थ काय होतो? आम्ही निर्माण केलेली न्यायदानाची यंत्रणा अपुरी , कुचकामी वेळखावू ठरली आहे. तेंव्हा आता लोकांनी पुढे येवून आपआपसातले भांडण-तंटे मिटवून घ्यावेत. शासनाकडे येवू नये. मग गांधी तरी काय सांगत होते. आमच्या गावात आमचे सरकार हेच तर गांधींचे म्हणणे होते. 

गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान. याचा अर्थ असा की आम्ही ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण केल्या आहेत.  त्या तूमच्या गावाची/शहराची स्वच्छता करण्यास असमर्थ आहे. तेंव्हा आता तूम्ही तूमची स्वच्छता तूमच्याच पैशाने करून घ्या. मग गांधी काय म्हणत होते. आमचे गाव आम्हीच स्वच्छ करणार. 65 वर्षानंतर आपण परत गांधींपाशीच येवून पोचलो आहोत.

गांधीं हे अ-सरकारवादी होते. पण आजचे सगळे डावे समाजवादी सरकारी हस्तक्षेपाची वारंवार मागणी करतात. महात्मा गांधींच्या नावाने मनरेगा योजना सरकारने काढली. या योजनेत एका मजुराला एका दिवसाला मिळाणारा रोजगार हा 180 रूपयांच्या आसपास आहे. आणि खुल्या बाजारात कुठल्याही जिल्ह्याच्या गावी सकाळी मजुरांचा बाजार भरतो तिथे कुठल्याही मजुराला किमान 250 रूपये रोजाने रोजगार उपलब्ध आहे. मग आता सामान्य लोकांवर विश्वास ठेवणारा  गांधीविचार  यशस्वी ठरला की डाव्या समाजवाद्यांचा सरकारी हस्तक्षेप यशस्वी ठरला? 

या नाटकात महात्मा गांधींना सरकार विरोधी हालचालींसाठी तुरूंगात टाकल्यावर ते गोडसेच्याच बराकीत राहण्याचा आग्रह धरतात. पुढे गांधी आणि गोडसे यांचा संवाद चालत राहतो. गांधी गोडसेला मुलभूत प्रश्न विचारतात. तूम्ही हिंदू आहात का? अर्थातच गोडसे उत्तर देतात हो. मग गांधी विचारतात तूम्हाला आत्मा अमर आहे हे मंजूर आहे का? यालाही गोडसे होकार देतात. मग गांधी विचारतात माझ्या आत्म्याची हत्या न करता तूम्ही माझ्या शरीराची हत्या करून काय साधणार होता? या प्रश्नावर गोडसे निरूत्तर होतात.

अखंड भारत प्रश्नावर गांधींनी गोडसेची घेतलेली फिरकी तर अफलातून आहे. गांधी गोडसेला विचारतात, तूमचे अखंड भरतावर प्रेम आहे मग तूम्ही हा अखंड भारत फिरून बघितला आहे का? माझ्या गुरूंनी मला भारत फिरण्यास सांगितले होते तेंव्हा मी तो फिरून बघितला आहे. गोडसेला यावर उत्तर देता येत नाही. मग अखंड भारताचा गोडसेचा नकाशा पाहून गांधी विचारतात, तूमचा हा भारत तर अशोकाच्या भारतापेक्षाही लहान आहे. तूम्ही हिंदूत्वाला इतके संकुचित का करता? गांधींच्या या प्रश्नावरही गोडसेला काही उत्तर सापडत नाही. 

नाटकाचा शेवट अप्रतिमरितीने असगर वजाहत यांनी केला आहे. गांधी आणि गोडसे या दोघांचीही तुरूंगातून एकाच दिवशी सुटका होते. दोघे जेलच्या दारातून बाहेर पडून दोन दिशांनी चालायला सुरवात करतात. दोघांचीही एकमेकांकडे पाठ आहे. अचानक गांधी थांबतात. गोडसेही थांबातात. मागे वळून न पाहता गांधी हात मागे करतात. गोडसे वळून गांधीकडे येण्यास निघालेला असतो. 

सगळ्यांना परत गांधी विचारांकडेच परतावे लागते असा एक संदेश असगर वजाहत यांनी दिला आहे. 
या नाटकाचा शेवट बदलून एक संहिता नुकतीच औरंगाबाद येथे सादर झाली. या बदललेल्या नाटकात शेवटी गोडसे गांधीवर गोळ्या घालतो व त्यांना मारतो असे दाखवले आहे. आता जर हेच दाखवायचे तर नाटक संभवतच नाही कारण मूळात गांधींना गोळ्या घातल्या गेल्या व त्यात त्यांचा मृत्यू झाला हे सत्य आहे. यावर चर्चा करताना दिग्दर्शकाने मुद्दा उपस्थित केला होता की आज दाभोळकर-पानसरे-कलबुर्गी यांची हत्या केल्या गेली तो संदर्भ मला जोडावा वाटला. 

त्याला प्रश्न विचारला गेला की दाभोळकर, कलबुर्गी हे ठीक आहेत पण ज्यांनी हिंसेचे समर्थन केले, ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही त्या कम्युनिस्ट चळवळीतल्या गोविंद पानसरे यांना गांधीविचारांच्या रांगेत कसे उभे करायचे ? आणि असे असेल तर हाही एक प्रकारे गांधी विचारांचा डाव्यांवर मिळवलेला विजय म्हणावा लागेल.

असगर वजाहत यांच्या या नाटकाने तथाकथित डाव्या आणि उजव्या दोघांचीही गोची करून ठेवली आहे. गरिबांसाठी काय करायला पाहिजे असे विचारले असता गांधीजी म्हणाले होते, ‘गरीबांचे भले करण्याच्या नावाखाली त्यांच्या छातीवर तूम्ही बसला आहात. ते आधी उठा.’ आज विविध योजनांच्या नावाने गरीबांच्या छातीवर बसून आपला फायदा करण्यात नोकरशाही, डावे समाजवादी एनजीओ वाले आणि आता भाजपवालेही पुढे आहेत. 

अमेरिकेत फेसबुकच्या कार्यालयास भेट दिल्यावर त्यांच्या भिंतीवर भाजपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गांधींचा अहिंसेचा विचार लिहावा लागला हाही एक काळाने उगवलेला सुडच म्हणावा लागेल. 
दुष्यंतकुमार या हिंदी कविच्या ओळी फार सुंदर आहेत. 

कल नुमाईश मे मिला वो चिथडे पहने हुए
मैने पुछा के नाम तो बोला के हिंदुस्थान है

सामान कुछ नही है फटेहाल है मगर
झोले मे उसके पास कोई संविधान है

एक बुढा आदमी है मुल्क मे या यु कहो
इस अंधेरी कोठरी मे एक रोशनदान है

अंधार्‍या खोलीत एक दिवा असावा असे महात्मा गांधी. त्यांना त्यांच्या जयंतीदिनी विनम्र आदरांजली !

 श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575