Wednesday, January 29, 2014

कश्यासाठी पाडगांवकरांना महाराष्ट्र भुषण द्यायचं?

दैनिक कृषीवल दि. २९ मार्च २०१२
कवी मंगेश पाडगांवकर यांना नुकतेच एका आघाडिच्या वृत्तपत्राने महाराष्ट्र भुषण हा सन्मान देऊन गौरविले. आश्र्चर्याची गोष्ट म्हणजे कुणालाच याबाबत काही शंका उपस्थित करावी वाटली नाही. गेली वीस वर्षे पाडगांवकरांनी एकही चांगली कविता लिहीली नाही. कविताच कश्याला एक धड ओळही लिहीली नाही. ज्या पाडगांवकरांनी ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, ते तुमचं नी सेम असतं’ असल्या टूकार कविता लिहून वाचकांची अभिरूची बिघडवली, त्या पाडगांवकरांना महाराष्ट्र भुषण कश्यासाठी? अखिल भारतीय साहित्य संमेलनाची निवडणुक पाडगांवकरांनी कधी लढवली नाही. आणि याचंच भांडवल करून जेंव्हा त्यांच्याकडे विश्र्व संमेलनाचे अध्यक्षपद चालत आलं ते मात्र त्यांनी चटकन स्विकारलं. इतकंच नाही तर आपल्याला मानधन किती देता, व्यवस्था कशी करणार, ‘इतर’ सगळ्या सोयी आहेत ना हे सगळं व्यवहारिक पातळीवर पक्कं ठरवून घेतलं. असे पाडगांवकर ‘महाराष्ट्र भुषण’ कसे?
पाडगांवकर, बापट, करंदीकर यांनी बघे निर्माण केले असा आरोप दिलीप चित्र्यांनी केला होता. अजूनही हा आरोप पाडगांवकरांना खोडता आला नाही. जागोजागी पाडगांवकरांचे कार्यक्रम व्हायचे. (आता वयोमानानुसार होत नाहीत. नसता पाडगांवकर तयार असतातच.) मग पाडगांवकरांच्या कविता संग्रहांच्या किती आवृत्त्या निघाल्या? अलिकडच्या काळातील त्यांच्या कविता तर इतक्या सामान्य आहेत. की त्या पाडगांवकर हे नांव आणि मौज हे प्रकाशन या दोघांच्याही प्रतिमेला बट्टा लावणार्‍या आहेत. पण त्याचं पाडगांवकरांना आणि त्यांचं वाट्टेल ते छापणार्‍या मौज सारख्या दर्जेदार प्रकाशकांनाही काही वाटत नाही.
सन्मान आणि पुरस्कारांचा सध्या महाराष्ट्रात पुर आला आहे. याची सुरवात महाराष्ट्रात शरद पवार मुख्यमंत्री असताना 93-94 सालात झाली. तेंव्हा त्यांनी महाराष्ट्रातील नामांकित अश्या 100 लोकांना एक लाख रूपये, सन्मानिचिन्ह देऊन गौरविले होते. (संख्या अजून जास्त असावी मला नेमकं आठवत नाही) पावारांच्या या कृतीवर गोविंद तळवलकरांनी महाराष्ट्र टाईम्स मधून ‘पवारांचा रमणा’ असा अग्रलेख लिहून सणसणीत टिका केली होती. त्यावरून महाराष्ट्राने काय बोध घेतला माहित नाही पण खुद्द त्या वृत्तपत्रानेच काही बोध घेतला नाही हे स्पष्ट आहे. कारण त्यांनीच पाडगांवकरांना हा पुरस्कार देऊन सन्मानिले आहे. 
पुरस्कार देणार्‍यांचं एक मोठं बरं असतं. त्यांना साहित्य संस्कृति क्षेत्रात काही भरीव करण्यापेक्षा आपण काहीतरी केलं असं दाखवण्यातच मोठा रस असतो. मग यासाठी सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे या क्षेत्रात काम करणार्‍यांचा गौरव करायचा. प्रत्यक्ष त्या क्षेत्रासाठी काही करायची गरज नाही. कारण तसं करणं फार अवघड आणि किचकट काम असतं. त्याला वेळ लागतो. दमानं ही कामं करावी लागतात. त्यापेक्षा पुरस्कार देऊन टाकायचा. ‘तूमच्यासारख्याची देशाला, या क्षेत्राला गरज आहे’ अशी गुळगुळीत भाषा वापरायची. ‘आपले योगदान खुप मोठे आहे’ असं म्हणत त्या व्यक्तीला  भारावून टाकायचं. कार्यक्रम संपला की मग कुणीच त्या व्यक्तीकडे किंव त्याच्या क्षेत्राकडेही ढूंकूनही पहात नाही.
साहित्यीक कविता महाजन यांनी त्यांच्या ग्राफिटी वॉल या पुस्तकात पुरस्काराचा एक किस्सा सांगितला आहे. ‘‘समारंभ सुरू झाला. भाषणं झाली. छायाचित्रं घेतली गेली. समारंभ संपला. सगळं पांगले. हातातल्या पिशवीत पुरस्काराचे स्मृतिचिन्ह, मानपत्र, फुलांचा गुच्छ, श्रीफळ आणि शाल घेऊन मी जिना उतरले. दुसरा पुरस्कार मिळालेले लेखक आपल्या कुटुंबीयांसह गाड्यांमध्ये बसून निघून गेले. पाठोपाठ आयोजकांच्या गाड्या गेल्या. समारंभ पुण्यातला असल्यानं आयोजकांनी ‘कुठे येणार, कुठे राहणार, जेवणाचं काय?’ अशी विचारपूस करणं अपेक्षित नव्हतंच.’’  खरं तर पुणंच काय बर्‍याच मोठ्या शहरांमध्ये अशीच औपचारिकता उरलेली आहे.
आयोजकांच्या मानसिकतेवर काय बोलणार? पण पुरस्कार, सन्मान यांच्याबाबत स्वत: साहित्यीकांनी जागरूक रहायला नको का? पुरस्कार स्विकारून नेमकी कोणती संस्कृती आपण रूजवू पहात आहोत? आणि जर आपणाला पुरस्कार मिळाला आहे तर आपली जबाबदारी वाढली असं नाही का वाटत? 
पाडगांवकरांसारख्यांनी ‘बघे’ निर्माण केले हे त्यामूळेच पटते. कारण यांनी स्वत: वाङ्‌मयीन प्रांतात इतके सन्मान प्राप्त झाल्यानंतरही भरीव कामगिरी केली नाही. ही कामगिरी म्हणजे पुस्तकं लिहीणे असं नाही. कारण पुस्तकांच्या संख्येवरून साहित्यीकाचा दर्जा ठरत नाही. ‘बोरकरांची कविता’ असं एक अप्रतिम संकलन मौज प्रकाशनाने बोरकरांच्या  वयाला पन्नास वर्षे पूर्ण झाली म्हणून प्रसिद्ध केलं. त्या संग्रहात बोरकरांची अतिशय उत्कृष्ठ अशी मुलाखत पाडगांवकरांनी घेतली आहे. मग हे पाडगांवकर गेली वीस पंचेवीस वर्षे गेले कुठे? 
पाडगांवकरांनी शेक्सपइरच्या तीन नाटकांचे मुळाबरहुकूम अनुवाद केले तसेच बायबलचेही मराठी रूपांतर सिद्ध केलं. ही महत्त्वाची कामं पाडगांवकर अजूनही करू शकतात किंवा करून घेऊ शकतात. ज्या वृत्तपत्राने त्यांना पुरस्कार दिला त्यालाही ते ठणकावून सांगू शकले असते की ‘आजकाल तूमचा पेपर वाचकांसाठी उरला नसून बघ्यांसाठी उरला आहे.’ पण पाडगांवकर काय सांगणार? कारण तेच या ‘बघ्ये’ बनविणार्‍यांच्या टोळीत सामिल झाले आहेत.
एक अतिशय उथळ अशी ‘पुरस्कार’ संस्कृती आपण रूजवू पहात आहोत. देणार्‍यांना कसलीच बांधिलकी नाही. त्यांना आपले सार्वजनिक चारित्र्य प्रतिभावंतांना उपकृत करून स्वच्छ करून घ्यायचे आहे. भल्या भल्या प्रतिभावंतांनाही ही मोहिनी पडलेली आहे. त्या निमित्तानं आपला फोटो येतो, आजूबाजूचे लोक ओळखतात आणि आपण मोठे झाल्याचा साक्षात्कार होतो. 
विशेषत: वृत्तपत्रांमुळे एक मोठी घातक गोष्ट झाली आहे. त्यातील बातम्या लेख वाचून आणि फोटो पाहूनच समाजातला एक वर्ग आपले मत ठरवू लागला आहे. मी ज्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिकलो त्या महाविद्यालयातील सर्व माजी विद्यार्थ्यांचे एक स्नेह संमेलन मागील वर्षी 26 जानेवारीला पार पडले. वीस वर्षांनंतर भेटलेला एक मित्र मला म्हणाला, ‘‘उमर्‍या, साल्या तू तर मोठा माणूस झाला. तूझा फोटो बघतो मी पेपरात बर्‍याचदा.’’ माझा फोटो कश्यासाठी आला होता, मी कुठल्या क्षेत्रात काम करतोय, मी अश्यात काय लिहीलंय हे त्या मित्राला काहीच माहित नव्हतं. वाईट याचंच की त्याला ते समजून घ्यायचंही नव्हतं. अगदी त्यानं जो फोटो बघितला तो कुठल्या कार्यक्रमातला होता हेही त्याला आठवत नाही. मी जर साहित्यीक म्हणवून घेतो तर माझी कविता वाचून, लेख वाचून जो कोणी प्रतिक्रिया देईल ते मला महत्त्वाचं वाटायला पाहिजे. माझा फोटो पाहून नाही.
पाडगांवकर हे एक जबाबदार प्रतिष्ठित साहित्यीक आहेत. त्यांना मान सन्मान, प्रतिष्ठा, लोकप्रियता सगळं मिळालं आहे. मग आता त्यांच्यासारख्यांकडून अपेक्षा आहे त्यांनी अश्या उठवळ ‘पुरस्कार’ संस्कृतीपासून लांब रहावं. आणि ते जर राहणार नसतील तर मी संयोजकांनाही विचारतो अश्यांना सन्मान करून तूम्ही काय मिळवता अहात? जर पाडगांवकरांचं कतृत्व वाङ्‌मयात असेल आणि जर लोक वाङ्‌मय वाचत नसतील तर काय करायचं?
काही जण असं लंगडं समर्थन करू शकतात की उतारवयात पाडगांवकरांनी आता काय करावं? त्यांच्यापाशी चालत आलेले सन्मान त्यांनी स्वीकारावेत यात गैर ते काय? खरं तर याच काळात त्यांच्या वयोगटातील नेमाडे सारखे प्रतिभावंत अजूनही वाङ्‌मयीन दृष्ट्या कार्यरत आहेत. हिंदू सारखी प्रचंड मोठ्या आवाक्याची श्रेष्ठ कादंबरी त्यांनी सिद्ध करून दाखवली आहे. इतकंच नाही तर पुढील तीन कादंबर्‍यांचा खर्डा लिहून काढला आहे. मग हे पाडगांवकर आणि त्यांच्या झिलकर्‍यांना दिसत नाही का? 
आणि जर हे समजत नसेल तर पुढचा पुरस्कार मग ‘लव्ह लेटर म्हणजे, लव्ह लेटर म्हणजे’ लिहीणार्‍या संदीप खरेलाच द्यायला पाहिजे. कारण पाडगांवकर ते संदीप खरे यांच्यामध्ये कोणी ‘तश्या’ दर्जाचा कवी नाहीच ना!

Tuesday, January 28, 2014

भालचंद्र नेमाड्यांची सुवर्णमहोत्सवी ‘मगरूरी’

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 28 जानेवारी 2014


भालचंद्र नेमाडे हे मराठीतील ज्येष्ठ कादंबरीकार. त्यांच्या गाजलेल्या आणि गाजवलेल्या ‘कोसला’ या कादंबरीला 50 वर्षे पुर्ण झाली म्हणून एक विशेष आवृत्ती प्रकाशीत करण्यात आली. त्या निमित्ताने लिहीताना नेमाडे यांनी या कादंबरीच्या पहिल्या प्रकाशकाचा रा.ज.देशमुख यांचा उल्लेख ‘मगरूर’ प्रकाशक असा केला. सध्याचे देशमुख आणि कंपनी चे संचालक रवींद्र गोडबोले आणि संपादक सल्लागार विनय हर्डीकर यांना ही बाब खटकली. नेमाडेंच्या विधानाचा खरपुस समाचार घेत त्यांनी नेमाडेंचा देशमुखांशी असलेला पत्रव्यवहारच वाचकांसाठी खुला केला.
इतरांच्या टोप्या उडविणारे नेमाडे, आधीच्या पिढीच्या लेखक समीक्षकांना झोडपून काढणारे नेमाडे, आपली वादग्रस्त मते तलवारीसारखी सपासप चालवून समोरच्याला घायाळ करणारे नेमाडे हे विसरून गेले की आपलीही टोपी कोणी उडवू शकतो. साहित्यातील अड्ड्यांबद्दल नेमाडे यांचा आक्षेप असा होता, ‘अड्ड्यांची पहिली शपथ म्हणजे मिळून एकमेकांना ‘वर’ चढवणे किंवा मिळून एखाद्याच्या उथळपणाबद्दल मौन पाळणे.... एकमेकांच्या मोठेपणाचा प्रचार करणे, मानमान्यता मिळवून देणे इ. होत.’ आता हा लेख नेमाडे यांनी 1968 मध्ये लिहीला आहे. तोपर्यंत नेमाडे यांची कोसला प्रकाशित झाली होती.  आणि याच वेळी नेमाडे देशमुखांना पत्रात लिहीतात, ‘दावतरांना पत्र टाकले आहे. प्रत पाठवावी (कोसलाची). मीहि आता गेल्यावर ओलोचनेकरिता बी कवींच्या चांफ्यावर लिहून पाहिजे ना? मग कोसल्यावर लगेच छापा असं सांगतोच.’
म्हणजे नेमाडेंच्या कोसला कादंबरीवर परिक्षण वसंत दावतर ‘आलोचने’मध्ये छापणार असतील तर नेमाडे त्यांना बी. कवींच्या कवितेवर लेख लिहून देणार आहेत. आपल्या पुस्तकावर इतरांनी लिहावे या वृत्तीचा नेमाडेंनी नेहमीच उपहास केला आहे. असे नेमाडे रा.श्री. जोग यांच्या सारख्या ज्येष्ठ समीक्षकाबद्दल रा.ज.देशमुख यांना पत्रात लिहीतात, ‘जोगांना लिहिलेय तूम्हाला लवकरच प्रत मिळेल. आमची इच्छा आहे परंतु तुमचीहि असल्यास कुठेतरी कोसल्यावर लिहा.’ आता इतरांवर टिका करणारे नेमाडे रा.श्री.जोग यांना आपल्या कादंबरीवर लिहावे अशी गळ का घालत आहेत? आजचा एखादा नवा लेखक आपल्या पुस्तकाची प्रत मोठ्या लेखक समीक्षकांना आशेने पाठवतो आणि त्यांनी त्यावर लिहावे अशी अपेक्षा धरतो. यात आणि नेमाड्यांत काय फरक आहे?
 आर्थिक व्यवहारांत नेमाडे असे सर्वत्र पसरवत राहिले की देशमुखांनी त्यांना गंडवले. खरी परिस्थिती अशी आहे की 1963 ला पुस्तक प्रकाशित केल्यापासुन 1970 पर्यंत त्याचे कित्येक छापील फॉर्म्स बांधणी न करता देशमुखांच्या गोदामात तसेच पडून होते. शिल्लक सर्व प्रती, सुटे फॉर्म्स हे सर्व नेमाड्यांनी खरेदी केले. विक्री झालेल्या प्रतींचा रॉयल्टीचा हिशोब केला. मधल्या काळात नेमाड्यांना देशमुखांनी उसने पैसेही दिले होते. तसे सविस्तर पत्रच आहे.  हा सगळा हिशोब मिटवून 870 रूपयांचा डिमांड ड्राफ्ट नेमाड्यांनी देशमुखांना दिला. पुस्तकाच्या प्रती व छापील फॉर्म्स ताब्यात घेतले.
नेमाड्यांच्या पुस्तकांना प्रचंड मागणी होती आणि देशमुखांनी त्याचा फायदा करून घेतला असे काही वातावरण नव्हते. नेमाड्यांची कादंबरी सात वर्षे पडून होती. इतकेच नाही तर खुद्द नेमाडे यांनाही मराठी प्रकाशन व्यवसायाबद्दल कल्पना असावी. कारण ‘दुसर्‍या बाजीरावावर एक नाटक पुढच्या वर्षी मूड आल्यास लिहायचा विचार आहे. ते वाचून पाहून खपण्यासारखे असल्यास तुम्ही प्रकाशित करालच. परंतु खपण्यासारखे नसल्यास प्रकाशित कराल काय हे कळवा. नुसते बाड घेऊन प्रकाशकांची दारे हिंडणे बरे नव्हे. म्हणून लिहिण्याआधी प्रकाशक गाठावा हे बरे.’ जर काही शंका असतील तर नेमाडे यांनी दुसरा प्रकाशक गाठावा असे देशमुखांनी स्पष्टपणे लिहीले आहे. त्यावरही परत नेमाडे अहमदनगर येथून 1964 साली आपल्या पत्रात लिहीतात, ‘मी दुसर्‍या कोण्या प्रकाशकासाठी लिहावे असा मुद्दा तुम्ही उपस्थित केला, तो बरोबर नाही. आम्ही इतर प्रकाशकांशी गेल्या वर्षभर किती फटकून वागलो याच्या गोष्टी तुमच्या कानी आल्या असतील.’
नेमाड्यांना दोन पत्रे देशमुखांनी लिहीली. त्यातील एका जास्त सविस्तर आहे. त्याला कारणही तसेच घडले. नेमाड्यांनी देशमुखांकडून उसने पैसे घेतले होते. त्यासाठी स्टँपवर सही द्यावी असा आग्रह देशमुखांनी केल्यावर नेमाडे यांना राग आला. नेमाडे 1965 मध्ये म्हणजे कादंबरी प्रकाशित झाल्यावर दोन वर्षांनी तक्रार करतात, ‘कॉन्ट्रॅक्ट न करता लेखकाजवळून कादंबरी घेणे व स्नेही म्हणून पैसे देऊन स्टॅपवर सही घेऊन अन्नदात्याबद्दल अविश्वास दाखवणे, ह्याचा अर्थ काय?’
आता मात्र देशमुखांमधला ‘देशमुख’ जागा झाला. लेखकांच्या पुस्तकांवर प्रकाशक जगतो. लेखक त्याचे अन्नदाते आहेत हे खरे आहे. पण नेमाड्यांसारखा नवा लेखक आणि ज्याच्या पुस्तकाचा खप अजून फारसा सुरू झाला नाही तो देशमुखांना आपली आर्थिक परिस्थिती सुधारली की लगेच वेगळ्या भाषेत बोलायला लागतो हे देशमुखांना खटकणारच. कुणालाही ते खटकेल.
रा.ज.देशमुखांकडे वि.स.खांडेकर, रणजित देसाई, पु.ल.देशपांडे, कुसुमाग्रज, चि.वि.जोशी, ग.त्र्यं. माडखोलकर यांच्यासारखे ‘खपाऊ’ लेखक होते. शिवाय पाठ्यपुस्तकांचा मोठा व्यवसाय त्यांच्या हाताशी होता. यांपैकी कुणी असा शब्द वापरला तर देशमुखांनी एैकून घेतला असता. यांच्यापुढे आर्थिक दृष्ट्या नेमाड्यांच्या कादंबरीचा काय पाड? आजही इतक्या वर्षांनी ‘कोसला’ च्या किती आवृत्त्या निघाल्या आहेत? तर पन्नास वर्षांत जेमतेम 25 आवृत्त्या. एक आवृत्ती हजार किंवा दोन हजारांची. नेमाड्यांच्या पुस्तकांची वाङ्मयीन गुणवत्ता इथे अभिप्रेत नाही. नेमाड्यांनीच मुद्दा ‘अन्नदाता’ असा शब्द वापरून आर्थिक दिशेने नेला आहे.
यानंतर म्हणजे 1965 ते 1970 देशमुख आणि नेमाडे हे संबंध ताणाताणीचे राहिले. आणि शेवटी हा व्यवहार नेमाड्यांनी 1970 मध्ये पूर्ण केला. पुस्तकांची दुसरी आवृत्ती स्वत: काढायला नेमाडे तयार झाल्यावर अगदी पंधरा दिवसांत देशमुखांनी हा व्यवहार संपवला. या आवृत्तीत नेमाडे पुरते आत आले हा भाग परत वेगळाच.
ह्याच नेमाड्यांनी दुसरी कादंबरी ‘बिढार’ लिहीली. त्यात देशमुख पती पत्नींचे व्यक्तीचित्र ‘कुलकर्णी प्रकाशक पती पत्नी’ असं विरूप करून रंगवले आहे. नविन पुस्तकाचे कौतुक करण्यासाठी देशमुख पती पत्नी गाडी करून औरंगाबादला आले. नेमाडे पती पत्नीला कपड्यांचा आहेर शिवाय मुलांसाठी खेळणी, फळांच्या करंड्या असा सगळा जामानिमा घेऊनच देशमुख आले होते. त्यांनी नेमाड्यांना (इतकं सगळं होवूनही) नविन कादंबरी छापण्यासाठी मागितली.  नेमाड्यांनी ती दिली नाही. नागपुरच्या अमेय प्रकाशनाला ती दिली. ते प्रकाशनही गुंडाळल्या गेले. मग नंतरची नेमाड्यांची सगळी पुस्तके भटकळांच्या पॉप्युलरकडे मुंबईला आली. कदाचित भटकळांना नेमाडे ‘मी तूमचा अन्नदाता’ असे म्हणू शकतात.
दुसर्‍यांच्या टोप्या उडवणार्‍या नेमाड्यांनी देशमुखांच्या बाबतीत संकुचितपणा दाखवत आपल्या विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडविले. सरस्वती भुवन संस्थेत नौकरी लावून द्या म्हणून देशमुखांकडे आग्रह धरणे, नंतर त्याच संस्थेवर टिका करणारी कादंबरी लिहीणे, आपल्याला लेखक म्हणून उभं करणार्‍या देशमुख पती पत्नीचे कादंबरीत व्यंगचित्र रेखाटणे या सगळ्याला काय म्हणावे? आता हर्डीकर/गोडबोले यांनी हा पत्रव्यवहाराद्वारे नेमाडेंची सुवर्णमहोत्सवी मगरूरी उघड केली आहे.
इतरांना शहाणपण शिकविणारे नेमाडे सगळे नियम वाकवून दुसर्‍यांदा साहित्य अकादमीचे अध्यक्षपद पटकावतात, व्यवस्थेला शिव्या देत साहित्य अकादमी पारितोषिक स्विकारतात, पद्मश्री स्वीकारतात. पद्मश्रीसाठी शिफारस महाराष्ट्रातून नाही तर हिमाचल प्रदेशातून झालेली असते आणि हे सगळं होताना नेमाड्यांच्याच जळगांवच्या जून्या स्नेही प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती म्हणून दिल्लीत बसलेल्या असतात. सिमल्याचे राष्ट्रपती भवन नेमाड्यांना मुक्तहस्ते वापरायला भेटते. हे सगळं म्हणजेच समृद्ध अडगळ असं सुजाण वाचकांनी समजून घ्यावे.  (ज्यांना नेमाडे-देशमुख पत्रव्यवहार वाचण्याची उत्सुकता आहे त्यांनी विनय हर्डीकर vinay.freedom@gmail.com व रवींद्र गोडबोले ravindragodbole@aquariustech.ne या मेलवर संपर्क करावा)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, January 21, 2014

मराठी कवितेचे ‘रसाळ’ निरूपण

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 21 जानेवारी 2014 

प्रसिद्ध समिक्षक प्रा.डॉ. सुधीर रसाळ यांना परभणीच्या शब्द सह्याद्री प्रतिष्ठानचा ‘शब्द सह्याद्री साहित्य सन्मान’ ज्येष्ठ कथाकार प्रा.तु.शं.कुलकर्णी यांच्या हस्ते 14 जानेवारी रोजी प्रदान करण्यात आला. मराठी कवितेसाठी व्रतस्तपणे काम करणार्‍या एका ऋषीतूल्य व्यक्तिमत्वाचा गौरव या निमित्ताने झाला. निरलस अशा व्यक्तीमत्त्वाचा गौरव करण्याचे सुचले त्या शब्द सह्याद्री प्रतिष्ठानचेही कौतुक करायला हवे. 

‘संथ वाहते कृष्णामाई’ हे ग.दि.माडगुळकरांचे गाणे ऐकले की मला हमखास रसाळ सरांच्या संथ बोलण्याची आठवण येते. पुरस्कार स्विकारतानाही सरांनी आपल्या संथ लयीत कवितेवरील अप्रतिम भाषणांने श्रोत्यांना मुग्ध केले. सुधीर फडक्यांनी गायलेल्या या गाण्यासोबतच मला आठवण येते ती उस्ताद अमीर खॉं यांच्या संथ लयीतल्या ख्याल गायनाची. संथ लयीत शांतपणे सर एखादा विषय मांडत जातात. त्यांच्या उजव्या हाताची तर्जनी जरा वर येते आणि बाकीची बोटे अंगठ्याकडे झुकतात. ऐकणार्‍यावर त्यांच्या बोलण्याचा, देहबोलीचा असा काही प्रभाव पडतो की या शांत प्रवाहात आपण कधी वाहून गेलो हे कळतच नाही.

प्रत्यक्ष त्यांच्या वर्गातील इंद्रजित भालेराव, दासू वैद्य हे विद्यार्थी असो की वर्गाबाहेरील मी, रेणू पाचपोर, धनंजय चिंचोलीकर, श्याम देशपांडे -या सगळ्यांना कमी अधीक प्रमाणात हाच अनुभव आलेला आहे. सरांच्या बोलण्यावरून, त्यांच्या शांत शैलीवरून लगेच लक्षात येत नाही पण संपर्कात आल्यावर काही दिवसातच उमगत जाते की सर अतिशय ठामपणे आपली मतं मांडत असतात. 

त्यांचे ‘कविता आणि प्रतिमा’ हे पीएच.डी.च्या संशोधनाचे जाडजुड पुस्तक माझ्या हाती आले तेंव्हा माझी छाती दडपुनच गेली होती. हे पुस्तक आत्तापर्यंत फक्त तीन लोकांनी पूर्ण वाचले आहे एक रसाळ सर स्वत:, दुसरे प्रकाशक श्री.पु.भागवत व तिसरे या पुस्तकाचे मुद्रीत शोधन करणारे असं आम्ही विनोदाने म्हणायचो. पण त्यांचे दुसरे पुस्तक ‘काही मराठी कवी : जाणिवा आणि शैली’ हाती आले आणि माझा गैरसमज पार धुवून गेला. हे पुस्तक माझे अतिशय आवडते आहे. 

आपली मतं स्पष्टपणे मांडणे हे एक सरांचे वैशिष्ट्य. अगदी कुसुमाग्रजांच्या कवितेबाबत तीस वर्षांपूर्वी सरांनी लिहून ठेवले होते, ‘‘विशाखात ज्या जातीचा प्रत्यय त्यांची कविता देत होती, त्या जातीचा प्रत्यय नंतरच्या काळातील त्यांच्या कवितेने क्वचितच दिला. विशाखा नंतर त्यांच्या कवितांचा विकास थांबला.’’ किंवा नारायण सुर्व्यांवर लिहीताना, ‘‘सुर्व्यांजवळ सांगण्यासारखे खुप आहे. पण हे सांगण्यासारखे सतत गुदमरून जात आहे हे जाणवते.’’

मराठीच्या प्रांतात मोठ्या लेखकांनी स्वत:ला साहित्यीक संस्थांपासून कायम दूर ठेवलेले मोठ्या प्रमाणात आढळते. रसाळ सर मात्र याला अपवाद आहेत. थोडी थोडकी नाही तर जवळपास 50 वर्षे सरांनी मराठवाडा साहित्य परिषद व तिचे मुखपत्र प्रतिष्ठान यासाठी खर्ची घातली आहेत. संपादनापासून ते साहित्य महामंडळाचे अध्यक्षपद भुषविण्यापर्यंत त्यांनी आपली जबाबदारी यशस्वीरित्या निभावली आहे. 

आजही एखाद्या पुस्तकाला प्रस्तावना तर सोडाच पण पाठराखण म्हणून मलपृष्ठावर छोटा मजकूर लिहायचा म्हटले तरी सर ते सगळे पुस्तक वाचून त्यावर सांगोपांग विचार करून मगच लिहून देतात.

आपल्यापेक्षा मोठ्यांशी गप्पा मारताना बहुतांश वेळा नाळ जूळतच नाही. पण रसाळ सरांचे तसे नाही. आम्ही कोणी साहित्यप्रेमी त्यांच्या कडे गेलो तर सर दिलखुलास गप्पा मारतात, घरात इतर कोणी नसेल तर आपल्या हाताने चहा करून पाजतात. समोरचा कितीही लहान असो त्याला ‘आहो जाहो’ करून संबोधतात. सरांचा कवितेवरचा अभ्यास पाहून बर्‍याचजणांना असे वाटते की ते फक्त कविताच वाचतात की काय. सरांचे वाचन मराठी, इंग्रजी अगदी अद्यायावत आहे हे त्यांच्या निकटवर्तीयांखेरीज फारसे कुणाला माहित नाही. विशेषत: सामाजिक प्रश्नांबाबत त्यांचे आकलन तर अतिशय उच्च दर्जाचे आहे. मागील वर्षी बब्रुवान रूद्रकंठावार यांना बी.रघुनाथ पुरस्कार सरांच्या हस्ते देण्यात आला. सामाजिक उपरोध लिहीणार्‍या बब्रुवानच्या पुस्तकावर सर काय बोलतात याची आम्हाला खुप उत्सुकता होती. ज्वलंत विषयावर राजकीय भाष्य करण्याची बब्रुवानची नेमकी ताकद हेरून सरांनी मोजक्या शब्दांत अशी काही मांडणी केली की सगळे सभागृह भारावून गेले. त्यांच्या भाषणावर टाळ्यांचा कडकडाट झाला. ‘गांधी विरूद्ध गांधी’ लिहीणारे प्रतिभावंत नाटककार अजीत दळवी नंतर आम्हाला म्हणाले, ‘‘सामाजिक प्रश्नांबाबत सरांची मांडणी फार महत्त्वाची आहे. सरांनी या विषयांवर लिहीलं पाहिजे.’’

समिक्षा लिहीणार्‍या सरांनी ललित लेखनही फार मोजके पण अप्रतिम केले आहे. त्यांची व्यक्तिचित्रे एकत्र करून एक पुस्तक तयार करावे यासाठी फार दिवसांपासून मी त्यांच्या मागे आहे. अनंत भालेराव यांच्या ‘मांदियाळी’ या पुस्तकाला सरांनी लिहीलेली प्रस्तावना याची साक्ष आहे. आपल्या वडिलांचे तसेच गुरू वा.ल.कुलकर्णी यांचे त्यांनी रेखाटलेले व्यक्तिचित्रही फारच उत्कट आहे. सरांचे वडिल न.मा.कुलकर्णी हे उत्कृष्ठ शिक्षक म्हणून प्रसिद्ध होते. आपल्या शिकविण्याच्या कामासोबतच साहित्य क्षेत्रात त्यांनी प्रकाशन संस्था काढून मोलाचे काम त्या काळी केले. वा.रा.कांतांचा रूद्रवीणा हा पहिला कवितासंग्रह सरांच्या वडिलांनी स्वत: प्रकाशित केला होता. 

त्यांच्या अशातच प्रसिद्ध झालेल्या ‘वाङ्मयीन संस्कृती’ या महत्त्वाच्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळायला हवा होता अशी भावना कित्येक रसिकांची आहे. बा.सी.मर्ढेकर यांच्या कविता व कादंबर्‍यांवर त्यांनी विस्तृत लिखाण केले आहे. जवळपास 900 पानांचा हा मजकूर आता तीन पुस्तकांच्या मधून प्रकाशित होतो आहे. 

वैयक्तिक संबंधांबाबत सरांचे वागणे मोठे अकृत्रिम व सच्च्या माणुसकीला जागणारे आहे. नरेंद्र चपळगांवकर हे त्यांचे जवळचे मित्र. चपळगांवकरांच्या मुलीच्या लग्नात सकाळी पाहुण्यांना नाष्टा द्यायचा होता. काम करणारे लोक येईपर्यंत त्यांनी वाट न पाहता रसाळ सरांनी भरा भर उपम्याच्या ताटल्या भरून पाहुण्यांना द्यायला सुरवात केली होती. कोणीतरी ते पाहून त्यांना थांबवले आणि ते काम आपल्या हाती घेतले. आपल्या पदाचा तेंव्हा सर विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख होते कोणताही दबाव सरांनी स्वत:वर येवू दिला नव्हता. 

आपल्या लेखणीने समिक्षेचे नवे मापदंड निर्माण करणारे आणि कृतीने साहित्यीक संस्थांच्या व्यवस्थापनाचा आदर्श समोर उभे करणारे सरांसारखे लोक आज फार दुर्मिळ झाले आहेत. साहित्य संस्कृती मंडळाने त्यांना गौरववृत्ती देवून सन्मानिले, त्यांच्या पुस्तकांना शासनाचे पुरस्कार मिळाले, आज हा शब्द सह्याद्री पुरस्कार त्यांना मिळाला आहे पण या कशाचाच सरांवर परिणाम होत नाही. आजही ते शांतपणे सकाळी बागेत झाडांना पाणी देणे असो, स्वत:चा चहा स्वत: करून घेणे असो सोडत नाहीत. आपल्या लिखीत मजकूराचे वाट्टोळे डि.टी.पी.करताना होते हे पाहून सर स्वत: उतरत्या वयात डि.टी.पी. शिकले. आज सर स्वत:चे सगळे लिखाण स्वत:च संगणकावर टाईप करतात. पार्श्वभूमीवर किशोरी आमोणकरांचा एखादा राग चालू असतो. आणि सरांची बोटे की बोर्डवर लयीत चालत असतात.

मला खात्री आहे हा लेख वाचल्यावर, प्रत्यक्ष भेटीत सर मजेदार हसून फक्त एवढंच म्हणतील, ‘‘चांगला लिहीलात लेख...’’

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, January 14, 2014

कडूबाईने कडू केली दारूवाल्यांची तोंडे

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 14 जानेवारी 2014


कोण ही कडूबाई? औरंगाबाद नाशिक जून्या रस्त्यावर कसाबखेड्याच्या पुढे पिंपळगांव दिवशी म्हणून गाव आहे (गंगापुर तालूका). त्या गावातील ही एक दलित विधवा. या गावात एका शेतकरी मेळाव्यासाठी महेश गुजर पाटील यांच्या सह्याद्री युवा प्रतिष्ठानने मला बोलावले होते. कार्यक्रमात बोलायचे जे ठरले होते ते राहिले बाजूला. सत्कार हार शाली नारळ सगळं राहिलं बाजूला. महेश पाटील म्हणाले या महिलांची एक समस्या आहे ती समजून घेणार का? मी तातडीने होकार दिला. त्यांचे म्हणणे आम्ही ऐकू लागलो. कडूबाईने दारूच्या विषयाला तोंड फोडले. फुटाण्यासारखी ही बाई ताड ताड बोलत राहिली. ऐकणारे सगळे आवाक. त्या गावात अवैध दारूचे दुकान आहे. त्याचा त्रास सगळ्यांनाच होत होता. या विरूद्ध आवाज कोण उठवणार? हाच कळीचा प्रश्न होता.  ‘‘सांगा भाऊ काय करायचे? आम्ही गरीबानं कसं जगायचं?’’ या तिच्या प्रश्नावर कोणालाच काय बोलावे ते कळेना. मी म्हणालो तूम्हीच सांगा मावशी काय करायचे ते. ती म्हणाली ‘‘आत्ता तूम्ही सगळे चला आपण दारू विकणारीला समजावून सांगू.’’
खरं तर अशावेळी आलेला पाहूणा काहीतरी कारणे सांगून चालढकल करतो. आपले भाषण पूर्ण करतो. शाली श्रीफळ मानधनाचे पाकिट (मिळणार असेल तर) स्वीकारून आपल्या गावी सटकतो. पण मी पडलो चळवळीतला कार्यकर्ता. मी लागलीच सारं बाजूला सारून तिच्यासोबत उठलो. तूम्ही पुढं व्हा मी गावातून बायका घेवून येते म्हणून कडूबाई निघाली. तिच्या सोबत इतरही बायका उठल्या आणि मोठ्या उत्साहाने आता काहीतरी होवू शकेल या आशेने निघाल्या.
बघता बघता त्या दारूच्या दुकानासमोर पन्नास एक महिला आणि जवळपास शंभर पुरूष, तरूण पोरं गोळा झाले. कडूबाईने तिला दुकान बंद कर म्हणून समजावून सांगितले. सगळा गाव गोळा झाला तरी दारू विकणारी बाई मात्र ताठ होती. ती गावापुढे वाकायला तयार नव्हती. तीच कडूबाईला म्हणाली, ‘‘अगं खुशाल जा पोलिसाकडे. मीच तूला भाड्याचे पैसे देते. माझ्या कडून हप्ते घेणारे काय तूझी कंप्लेन ल्येहून घेत्येत. मी बघतेच...जाय तू खुशाल जाय..’’ कडूबाई भडकली. तिच्यासोबतच्या बायका दुकानात शिरल्या. बायकांनी सगळ्या दारूच्या बाटल्या ताब्यात घेतल्या. आम्ही बायकांच्या मागेच उभे होतो. माझ्याकडे वळून कडूबाई म्हणाली, ‘‘सांगा भाऊ आता काय करायचे?’’
मी म्हटलं ‘‘आता आपण इथेच रस्त्यावर बसून राहू. पोलिस येतील आणि जी काही कारवाई करायची ती करतील. तोपर्यंत आपण हा रस्ता आडवू.’’ आणि बघता बघता वातावरण आंदोलनाचे बनले. सगळ्या बायका दारूच्या बाटल्या घेवून रस्त्यावर बसल्या. मी सोबतच्या मंगेश पाटील या पाहूण्यासोबत आणि गावच्या तरूण पोरांसोबत बायकांच्या पाठीशी रस्त्यावर बसलो.
तासाभरात रस्त्यावर वाहनांची रांग लागली. आपोआपच रस्ता रोको झाला. पोलिस लगेच धावत पळत आले. पोलिसांना वाटले काही तरी पक्षाचे संघटनेचे लोकं आहेत. ते शहरातून आले आणि गावच्या लोकांना त्यांनी भडकावले व रस्ता रोको आंदोलन घडले. पण पोलिसांचे आकलन चुक होते. आंदोलन गावच्या महिलांमधून अचानकपणे उभे राहिले होते. आम्ही फक्त त्याला दिशा दिली. आणि प्रत्यक्ष रस्त्यावर उतरण्याची कृती केली.
दारूच्या दुकानाविरूद्ध पोलिसांना जनरेट्यामुळे कारवाई करावी लागली. हा तूमचा मार्ग चुक आहे. रस्त्यावरून उठा. कायदा हातात घेवू नका असे पोलिस इन्स्पेक्टर सांगत होते. त्यांना वाटले हे शर्ट पँटवाले इनवाले शहरी लोक म्हणजे नेते असणार तेंव्हा ते आम्हालाच बोलायला लागले. मी त्यांना सांगितलं साहेब तूम्ही हे सगळं या बायकांना सांगा. आंदोलन त्यांचे आहे. आम्ही फक्त भाऊ म्हणून त्यांच्या पाठिशी आहोत. कायदा हातात घेवू नका असे पोलिस बायकांना सांगताच बायका भडकल्या.
कडूबाई पोलिसांना म्हणाल्या, ‘‘साहेब ही बाई ढवळ्या दिवसा दारू विकून राहिली. हीच्या दुकानाला लायसेन बी नाय. तीला तूमी काही बोलना झाले. आनी आमाला कायद्याचं शानपन कामून शिकविता? आगूदर तिला बंदी घाला. आन् आज नाय तर कवाच हीतं दारू विकली जानार नाय असं कागदावर लिवून द्या. मग आमी उठतो.’’
पोलिसांना लक्षात आलं की हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही. जनता खरंच भडकली आहे. तरी सरकार म्हणजे इतकी सोपी गोष्ट नसते. त्यांनी त्यांचे डोके लावून आम्हा दोघा तिघांना त्यांच्या दृष्टीनं नेते वाटणार्‍यांना 20 कि.मी. अंतरावरील लासूरच्या पोलिस स्टेशनला बोलावले. आम्ही तिकडे गेलो की इकडे पोलिस इन्स्पेक्टर गावात शिरले. त्यांना जाणून घ्यायचे असावे की हे आंदोलन काय आहे. कोणी भडकावले. इकडे आम्हाला फुकटची वारी झाली. पोलिस स्टेशनला कोणीच नाही पाहून परत गावात आम्ही आलो. तोपर्यंत गावात बायकांनी पोलिसांना गराडा घालून अडकवून ठेवले होते.
आम्ही पोचताच बायकांना हायसे वाटले. आम्ही पोलिसांना समजावून सांगितले, ‘‘साहेब हा जनक्षोभ आहे. आम्हाला या बायकांची नावे माहित नाही. त्यांनाही आमची नावे माहित नाहीत. ही जी तूमची विचारसरणी असते की एखादा पक्ष संघटना चळवळ काहीतरी शहरात बसून ठरवते आणि मग गावात येवून आंदोलन उभं राहते. तसं काहीच नाही. आम्हाला इथे येईपर्यंत काहीच माहित नव्हते. बघता बघता हे आंदोलन उभं राहिलं आहे. लोकांना कायदा हातात घ्यायचा नाही. पण ज्यांनी घेतला त्यांच्यापर्यंत तूमचा हाता पोंचत नाही .’’ पोलिस इन्स्पेक्टरना ही सगळी परिस्थिती कळली असावी.
कडूबाई त्यांना म्हणाली,‘‘साहेब मी तर जयभीम हाय. पन दारू विकनारी तर मोठ्या घरची हाय ना. तीनं असं कामून करावं? माझा नवरा दारू प्यायचा मला मारायचा. तो मरून गेला. मी रांडमुंड बाईनं पोराला मोठं केलं. पोरगा दारू प्यायला लागला. सुनेला बडवायला लागला. सुन आता रॉकेल ओतून मरायची मला धमकी देती. असं कायी इपरित घडलं तर तूमीच मला बेड्या घालताल की नाय?’’ कडूबाईच्या प्रश्नावर पोलिसांपाशी काहीच उत्तर नव्हते. पोलिस सांगत होते,‘‘हे बघा काळजी करू नका. पुढं असं होणार नाही. काही घडलं तर आम्हाला सांगा. फोन करा.’’ पोलिसांना वाटलं आता हा विषय संपेल. पण बायका मोठ्या वस्ताद. अनुसया बाई आता पुढे सरसावल्या. त्या म्हणाल्या, ‘‘साहेब तूम्हाला संागितलं की तूमचा हवालदार येईन. त्यो तर कायी दारू बंद करनार नायी. पन उलटा हप्ता घेईन आनी वरून दारूबी पिउन जाईन.’’
दारूचे दुकान बंद झाले. पोलिसांनी कारवाई केली. आंदोलन संपले. गावातल्या बायकांना आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहिल्यामुळे मोठा हुरूप आला. पोलिसांना वाटले यात दलित सवर्ण असा काही रंग दिसतो का ते तपासावे. पण आश्चर्य म्हणजे दारू दुकानाविरूद्ध बोलणार्‍या दलित कडूबाईच्या पाठिशी गावातील सवर्ण तरूण आणि बायका मोठ्या प्रमाणात उतरल्या होत्या. 
थोडीशी चौकशी केल्यावर या सगळ्या प्रश्नाचा वेगळाच पैलू समोर येत गेला. महेश गुजर मला सांगत होते की गंगापुर साखर कारखाना चालू होता तेंव्हा या गावातील बर्‍याच जणांना रोजगार मिळाला होता. कारखाना सहकारी तेंव्हा तो का बंद पडला हे वेगळं सांगायची काही गरजच नाही. ज्याचे दारूचे दुकान होते त्याची कारखान्यातली नोकरी गेली. मग साहजिकच तो दारूच्य धंद्याकडे वळला. गावाकडे दारू पिणार्‍यांची जी संख्या वाढली त्यात या कारखान्याने बेरोजगार केलेल्या बर्‍याच लोकांचा समावेश आहे. आज ग्रामीण भागात भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीचे पुरते शोषण केल्यामुळे रोजगार निर्मिती बंद पडली आहे. आणि दुसरे जे शहरी रोजगार आहेत त्यांची मर्यादा आता स्पष्ट झाली आहे. परिणामी गावोगावी बेकार तरूणांचे तांडे कोपर्‍या कोपर्‍यावर पडून आहेत. असा मोठा वर्ग दारू आणि मग इतर अवैध धंदे, अस्मितेचे राजकारण यांना बळी पडतो.
सकाळी गेलेलो आम्ही. परतायला आम्हाला संध्याकाळ झाली होती. दिवस मावळताना कडूबाईच्या डोळ्यात मात्र सुर्य उगवताना दिसला. काळीसावळी सुरकूतल्या चेहर्‍याची विधवा कडुबाई देवगिरी किल्ल्याच्या परिसरात राहणारी, तिला कल्पनाही नसेल पाचशे वर्षांपूर्वी नाथांनी याच ठिकाणी लिहीलं होतं, ‘दार उघउ बया दार उघड । नवखंड पृथ्वी तूझी चोळी । सप्त पाताळी पाउले गेली । एकवीस स्वर्गे मुकूटी झळाळी । दार उघड बया दार उघड ॥ प्रस्थापित व्यवस्थेला पुरूष लवकर शरण जातो पण बाई नाही हे नाथांना माहित होतं. म्हणूनच पुढे पंचवीस वर्षातच जिजाउने स्वराजाच्या धडा महाराजांकडून गिरवून घेतला. आताच्या काळात बाहेरच्या नाही तर आपल्यातच असलेल्या राक्षसांविरूद्ध लढण्यासाठी आता सामान्य स्त्री मधल्या महाकालीला जागे व्हावे लागणार आहे हे नाथांना कुठे माहित होते. पण कडुबाईला मात्र ते निश्चितच कळले आहे.  


            श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575.

Tuesday, January 7, 2014

इंदिरा संतांच्या जन्मशताब्दीची दखलही नाही... !

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 7 जानेवारी 2014

कवियत्री इंदिरा संत यांची जन्मशताब्दी 4 जानेवारील 2014 ला संपली. ‘माजघरातील मंद दिव्याची वात’ असं कुसूमाग्रजांच्या कवितेची ओळ घेवून ज्यांचं वर्णन करावं लागेल अशा या श्रेष्ठ कवियत्रीचा जन्म 4 जानेवारी 1914 ला झाला. (मृत्यू 13 जूलै 2000) इंदिराबाइंची जन्मशताब्दी (जानेवारी १३ ) सुरु झाली तेंव्हा  चिपळूणला साहित्य संमेलनाचे पडघम वाजत होते. इंदिरा संतांची दखल घ्यावी असं साहित्य महामंडळाच्या लोकांना तेंव्हा वाटलं नाही. साहजिक आहे कारण इंदिरा संत काही महाराष्ट्रात राहत नव्हत्या. त्या होत्या बेळगावला. एरव्ही बेळगावच्या नावाचं वारंवार गळा काढणं आम्हाला आवडतं. बेळगाव महाराष्ट्रात आला पाहिजे असं आजही घसा कोरडा करून आम्ही ओरडतो. प्रत्येक साहित्य संमेलनात तसा ठरावही केला जातो. पण याच बेळगावच्या प्रतिभावंत कवियत्रीची जन्मशताब्दी मात्र आम्ही विसरून गेलो. 
इंदिरा संतच काय पण बर्‍याच साहित्यीकांच्या जन्मशताब्दीला आम्ही विसरत चाललो आहोत. बी.रघुनाथ आणि त्या पाठोपाठ वा.रा.कांत यांची जन्मशताब्दीही नुकतीच संपून गेली. साहित्य संमेलनांत यांची कुणाला आठवण झाली नाही. बी.रघुनाथ तसे या तिघांत नशिबवान. त्यांचे स्मारक परभणीला उभारले गेले. तिथे दरवर्षी त्यांच्या नावाने साहित्य उत्सव भरतो.  परभणीची माणसे त्यांची आठवण जागी ठेवतात. पण ते भाग्य वा.रा.कांत आणि इंदिरा संत यांच्या वाट्याला नाही.
जुन्या कवींची नावे काढली की काही जणांच्या कपाळाला आठ्या चढतात. आता या जुन्यापान्या कवींची झेंगटं आमच्या गळ्यात कशाला असा तो भाव असतो. इंदिराबाईंची शरदातील दुपारचे वर्णन करणारी एक अतिशय सुंदर अशी कविता आहे. 

ही निळीपांढरी शरदांतील दुपार :
तापल्या दुधापरि ऊन हिचे हळुवार
दाटली साय की स्निग्ध शुभ्र आकाशी
फिरतात तशा या शुभ्र ढगांच्या राशी

त्या ऊन दुधाचे घुटके घेत खुशाल
सुस्तीत लोळतो खाली हिरवा माळ
अन् बसल्या तेथे गाई करित रवंथ
वारीत शेपट्या कोणी चरती संथ

आता ही कविता आजच्या काळात समजून घ्यायला, जवळची वाटायला काय अडचण आहे? आज गायी नाहीत का? आज दुधाचा वापर नविन मोबाईल इंटरनेटच्या जमान्यात होत नाही का? आजच्या फेसबुकच्या काळात निळा पांढरा हे रंग फेसबुकच्या पहिल्या पानावर जे दिसतात ते आभाळात दिसत नाहीत का?
सध्या साहित्य संमेलनाचे दिवस आहेत. बरोबर 20 वर्षांपूर्वी परभणीला साहित्य संमेलन भरलं होतं. त्या संमेलनासाठी इंदिरा संत यांनी उभं रहावं असा प्रस्ताव घेवून मी व इंद्रजित भालेराव इंदिरा संतांना भेटायला गेलो. कवियत्री ललित लेखिका वासंती मुझुमदार यांच्या दादर, शिवाजी पार्क मुंबई येथील घरी इंदिराबाई उतरल्या होत्या. ‘तूम्ही फक्त अर्जावर सही करा. बाकी आम्ही सगळं करतो. तूम्हाला निवडून आणतो.’ या आमच्या अग्रहाला इंदिराबाईंनी मुळीच भीक घातली नाही. जळगांव साहित्य संमेलनातला पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता.  त्यांनी शांत पण ठामपणे आपला नकार दिला. ‘तेवढा विषय सोडून काय बोलायचे ते बोला’ असं त्या म्हणाल्या. आम्ही काहीसे नाराज झालो. पण मग बघता बघता कवितेचा विषय निघाला. साहित्यीक विषय निघाले. त्यात संमेलनाचा विषय वाहून गेला. शुभ्र केस, पांढरे फिक्या-जांभळ्या फुलांचे पातळ, बारीक लुकलुकते डोळे, हळू बोलणे. वासंती मुझुमदारांच्या कलात्मक सजवलेल्या दिवाणखान्यात दिमाखदार सोफ्यावर बसलेल्या इंदिरा बाई स्वत:च एक कविता भासत होत्या.मी सोबतच्या ‘मृण्मयी’ या त्यांच्या निवडक कवितांच्या संग्रहावर त्यांची स्वाक्षरी घेतली. 18 फेब्रुवारी 1994 अशी त्यावर तारीख आहे. म्हणजे त्यांचे वय तेंव्हा 80 होते. सहस्रचंद्र त्यांनी आयुष्यात पाहिले होते. कष्टमय आयुष्य भोगलेल्या इंदिराबाईंनी आपली कविताविषक भूमिका साध्या शब्दांतून पण किती समर्पकपणे व्यक्त केली आहे 

रक्तामध्ये ओढ मातिची
मनात मातीचे ताजेपण
मातीतुनी मी आले वरती
मातीचे मम अधुरे जीवन

इंदिरा संतांबद्दल बर्‍याच जणांनी लिहून ठेवलं आहे. पण त्यांचं एक अतिशय सुंदर आणि मनोज्ञ चित्रण त्यांच्या मुलाच्या प्रकाश नारायण संत यांच्या लिखाणात उमटलं आहे. प्रकाश संतांच्या चारही कथा संग्रहातून लंपनची आई दुर्गा हीचे जे वर्णन आहे ते सर्व इंदिरा संत यांच्यावरच बेतलेले आहे. इंदिरा संत आणि त्यांच्या भगिनी ना.सी.फडके यांच्या पत्नी कमला फडके या दोघीच अपत्य त्यांच्या आईवडिलांना. मग इंदिरा बाईंच्या आईने आपलाच नातू इंदिरा संत यांचा मुलगा दत्तक घेतला. भालचंद्र दिक्षीत असं नाव या मुलाला मिळालं. पुढे चालून जेंव्हा त्यानं सुंदर असे कथा लेखन केले तेंव्हा परत आपले जुने नाव ‘प्रकाश नारायण संत’ धारण केले व लेखक आई वडिलांचे ऋण फेडले.
बोरी बाभळीची झाडे सर्वत्रच फोफावली असतात. पण त्यातले सौंदर्य कुणाला जाणवत नाही. इंदिराबाईंची बाभळीवरची एक सुंदर कविता पूर्वी अभ्याक्रमाला होती. बाभळीच्या झाडातही एक सौंदर्य असते हे त्यांच्या कवितेतूनच प्रथमच व्यक्त झाले.

लवलव हिरवी गार पालवी
काट्यांची वर मोहक जाळी
घमघम करती लोलक पिवळे
फांदी तर काळोखी काळी

कुसर कलाकृती अशी बाभळी
तिला न ठावी नागर रिती
दूर कुठेतरी बांधवरती
झुकून जराशी  उभी एकटी.

गावाबाहेर दूर उभं राहणार्‍या बाभळीचे सौंदर्य आणि उपेक्षा झाल्याची वेदना जशी इंदिरा बाईंनी ओळखली तशी अजून एका  मनाची वेदाना त्यांनी ओळखली. प्रेम म्हटलं की राधा-कृष्ण ही जोडी भारतीयांच्या मनात पहिल्यांदा येते. कुष्णाचीच दुसरी जोडी रूक्मिणीच्या सोबतची. ती तर आम्ही विठ्ठल-रूक्मिणी रूपात पूजतोही. उत्तर भारतात मीरेच्या कृष्णप्रेमाची मोठी महती गायली जाते. पण इंदिरा बाईंना जाणवलेले कृष्णासोबतचे हे प्रेम कुणाचे आहे?

अजून नाही जागी राधा
अजून नाही जागे गोकुळ
अशा अवेळी पैलतिरावर
आज घुमे का पावा मंजूळ

मावळतीवर चंद्र केशरी
पहाटवारा भवती भणभण
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती
तिथेच टाकुन अपुले तनमन

विश्वच अवघे ओठां लावुन
कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यामधुनी थेंब सुखाचे
‘‘हे माझ्यास्तव... हे माझ्यास्तव....’’

कुब्जेचे प्रेम कुणाला समजले नव्हते ते इंदिराबाईंच्या कवीमनाने टिपले. आता या सगळ्या कवितां आज जुन्या वाटतात का? अशा रसरशीत, काळावर टिकणार्‍या कविता लिहीणार्‍या कवियत्रीची जन्मशताब्दी आम्ही विसरून जातो हे त्यांचे का आमचे दुर्दैव? संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात ‘‘सल असल्याशिवाय अस्सल कविता लिहीता येत नाही’’ हे म्हणणं सोपं आहे. पण प्रत्यक्षात अस्सल कविता लिहीणार्‍यांना आम्ही विसरतो ही सल कुणाला सांगायची फ.मु.शिंदे...बोला जरा...

 
            श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575.