Wednesday, May 28, 2014

गावाकडील ताठ कण्याचे आई-वडिल !

दै. पुण्यनगरी, उरूस,  बुधवार  28 मे 2014 

आपल्याकडे कुणीही भेटले आणि थोडाफार जिव्हाळा त्याच्याबाबत वाटला की आपला स्वाभाविक प्रश्न असतो, ‘‘तूमचे गाव कुठले?’’त्याचे उत्तर मिळाल्यावर पुढचा प्रश्न समोर येतो, ‘‘गावाकडं कोण असतं?’’ भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रात गेल्या 50 वर्षात शहरीकरणाचा वेग फार मोठा राहिला आहे. शहरातील लोकसंख्या आता जवळपास 50 टक्के इतकी झाली आहे. पण अजूनही का कुणास ठाऊक बहुतांश मराठी माणसांचं मन (भारतीय देखील) गावातच अडकून पडलेलं असतं. गावाकडं कोण या प्रश्नाचं उत्तर मिळतं, ‘‘आई वडिल असतात.’’
गावाकडे आईवडिल असतात असं म्हटलं की समोर येणारं चित्र साधरणत: असं असतं. पक्की सडक सोडून गाव थोडासा आतमध्ये असतो. ही कच्ची सडक पुढे दुसर्‍या छोट्या गावाकडं गेलेली असते. फाट्यावर थोडीफार दुकानं, टपरीवजा हॉटेल. मोडक्या अवस्थेत बस स्टॉपचं पत्री शेड. जून्या खराब आणि आता सिमेंटच्या पक्क्या रस्त्यानं आत गेलं की एकमेकांना खेटून असलेली बसकी घरं लागतात. रस्त्याच्या बांधकामानं घरं खाली गेलेली असतात. 
सर्वसाधारण घरं साधी दगडा-मातीची ढासळलेल्या अवस्थेत दिसतात. दरवाजा जरा बर्‍या अवस्थेत असतो. त्यातून आत गेलो की खाटेवर पडलेले वडिल आणि स्वयंपाकघराच्या उंबर्‍याशी बसून काहीतरी निवडीत टिपत बसलेली म्हातारी आई. जनावरांचा गोठा ओस पडलेला. तिथली मातीची जमिन पूर्ण उखडलेली. बाकी घराच्या काही भागात जूजबी थोडंफार दूरूस्तीकाम करून घेतलेलं असतं. आईवडिल थकलेले असतात. वाड्यात जळमटं झालेली असतात. आर्थिक परिस्थिती खराब असेल तर घर म्हणजे वाडा नसून नुसतं पत्र्याचं छोटं शेड असतं. बाकी वरवरची सुबत्ता सोडता आई वडिल मात्र कुठल्याही गावाकडच्या घरातले थकलेले, उदास डोळ्यांचे, पोरंबाळं आता फिरकत नाही ही खंत बाळगणारे असतात.  त्यात फारसा फरक नाही.
बरेच आईवडिल गावाकडं अडकून पडतात ते केवळ मुलांच्या संसारात अडगळ नको म्हणून नाही. तर गावाकडचं घर आणि शेतीचा तुकडा, गावगाड्यातले रीतरिवाज परंपरा त्यांना बांधून ठेवत असतात. आपल्या देहाची माती गावच्या मातीत मिळावी असली काहीतरी समजूत मनाशी घट्ट बाळगून ते गावपांढरीशी चिटकून असतात.
पण शेत नाही, गावात जूनं घर नाही असा कुणी शहरातील मोठं घर सोडून गावाकडं निवृत्तीनंतर घर बांधून राहिल का? धनंजय चिंचोलीकर या आमच्या लेखक मित्राच्या आईवडिलांनी हा समज खोटा ठरवला. कन्नड सिल्लोड रस्त्यावरील चिंचोली लिंबाजी हे त्यांचे मुळ गाव. धनंजयच्या शिक्षक असलेल्या आईवडिलांनी (लक्ष्मीकांतराव व सुमन चिंचोलीकर) निवृत्तीनंतर गावाकडं उचं जोतं घेवून, मोठ्या उंचीचं छोटं तीन खोल्यांचं टूमदार घर बांधलं. परसात कडीपत्ता, लिंब, मोगरा अशी छोटीशी बाग धनंजयच्या आईनं मोठ्या हौसेनं पोसली आहे. स्वत: धार्मिक कर्मकांडांना महत्त्व न देणार्‍या या जोडप्यानं स्वखर्चानं दत्ताचं एक मंदिर विठ्ठल मंदिराच्या परिसरात उभारलं. औरंगाबाद शहरात स्थायिक असलेल्या दोन मुलं दोन मुलींचा आग्रह न जुमानता गावाकडं राहण्याचा निर्णय घेतला आणि गेली 20 वर्षे तो अमलात आणून दाखवला आहे.  मुलाबाळांच्या संसारातून बाजूला होण्याची "वानप्रस्थ" आश्रमाची परंपरा आपल्याकडे आहे. आधुनिक काळातील वानप्रस्थाचे उदाहरणच चिंचोलीकर काका-काकूंनि समोर ठेवले आहे.
त्यांच्या घरात देवीची एक मोठी मुर्ती पाहण्यात आली. कापडांत झाकून ठेवलेली होती. चौकशी केल्यावर लक्षात आलं की सार्वजनिक नवरात्र महोत्सवातील ही मूर्ती आहे. म्हणजे या उपक्रमांतही यांचा सहभाग मोलाचा असणार. शिवाय स्वाध्यायाचे वर्ग त्यांच्याकडे चालतात.
गावानेही या जोडप्याला मोठा आदर दिला आहे. दसर्याच्या पूजेचा मान त्यांना दिला जातो. घराबाहेर पडले कि कुणीही त्यांना बस स्थानका पर्यंत सोडते. सगळ्या उपक्रमात त्यांचा सल्ला घेतला जातो. त्यांचा निर्णय अंतिम मानला जातो.
गावचे ग्रामदैवत असलेल्या देवीचे विसर्जन त्यांच्या दारासमोरच्या आडात केले जाते. तो आड त्यांची चांगला व्यवस्थित बांधून घेतला आहे. त्यावर लोखंडाची जाळी बसवून कुणी पडू नये याचीही काळजी घेतलेली आहे. अंगणातील सामाजिक धार्मिक असो की परसातील बाग असो या जोडप्यानं कलात्मक दृष्टिकोन  जपत आपलं आयुष्य समृद्ध केलं आहे.

वाडवडिलांची शेतवाडी घरदार काहीच नसताना या जोडप्याला गावाकडं का रहावं वाटत असेल? स्वतंत्र पेन्शन  असल्याने कुणावर अवलंबून राहण्याचीही गरज नाही. ही कुठली ओढ असेल? काकांच्या बोलण्यातून सतत साधेपणा आणि माणसांबद्दलचा जिव्हाळा वहात असतो.  काकू तर फारशा बोलतच नाहीत. त्या केवळ नजरेनंच बोलतात असं लक्षात आलं.
गावकर्‍यांना अडीअडणींना हे जोडपं मदत करत राहतं. खरं तर आपल्या पुढच्या पिढीतील किंवा त्याही पुढच्या पिढीतील कुणीच गावाकडं परतणार नाही हे माहित आहे. गावातली कुठलीच सत्ता त्यांच्यापाशी नाही. आपण काही फार मोठी समाजसेवा करत आहोत असा आव बोलण्यात वा कृतीत नाही. गावाला एकत्र बांधून ठेवायचं म्हणून धार्मिक उपक्रम आवश्यक असतात इतक्या साध्या विचारसरणीतून त्यांनी नवरात्र महोत्सव असो, दत्त मंदिर असो, स्वाध्याय असो की गावदेवीची जत्रा असो यांचे महत्त्व ओळखले. ज्या काळात पुरोगामी विचारवंत कुठल्याही जत्रा उत्सवांकडे हेटाळणीने पहायचे. आजही पाहतात. त्या काळात एक निवृत्त शिक्षक आपल्या बायकोला घेवून गावाकडं येतो आणि या सगळ्यात रस घेतो हे विलक्षण आहे. या उपक्रमांमुळे गावातील व्यसनांचे प्रमाण कमी होते हे त्यांचे निरिक्षण मोठं मार्मिक आहे.
अहिल्याबाई होळकर यांच्यावरील पुस्तकात विनया खडपेकर यांनी अहिल्याबाईंनी मंदिरं, नदिवरील घाट यांच्या उभारणीतून सामाजिक शांतता प्रस्थापित करण्याचे धोरण कस आखले याचे मोठे मार्मिक विश्लेषण केले आहे. युद्धामुळे प्रचंड नुकसान होते शिवाय आपण बाई असल्यामुळे आपल्याला मर्यादा आहेत. त्यापेक्षा आपण धार्मिक बाबींचा चांगला उपयोग समाजासाठी करून घेवूत हे ध्यानात ठेवून त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने धार्मिक स्थळांचा विकास केला. चिंचोलीकर काकांना हे सारं स्पष्टपणे कदाचित माहितही नसेल. पण त्यांनी एक छोटं प्रात्यक्षिक आपल्या गावात करून दाखवलं आहे. सामाजिक काम करताना किंवा धार्मिक कामांतही सहभाग नोंदवताना माणसं अतिशय कदरलेली असतात. वैताग दाखवत राहतात. उगाच हे सारं गळ्यात पडलं असा भाव त्यांच्या मनात असतो. पण चिचांलीकर काकांच्या आणि काकुंच्या वागण्या बोलण्यात हे काहीच दिसत नाही. अगदी सहजपणे ऐंशी वर्षाच्या वयातही ते या उपक्रमांमधून वावरत असतात. 
ज्या काळात प्रवास करणे मोठं जिकीरीचं काम होतं. त्या 1960 ते 80 च्या काळात या जोडप्याने जवळपास संपूर्ण भारत पालथा घातला आहे. हे मला समजलं आणि मोठं आश्चर्यच वाटलं. मिळेल त्या साधनांनी काका काकूंनी भारतभर मिळून प्रवास केला. स्वत:ची गाण्याची नाट्य संगीताची आवड जोपासली. आजही त्यांची नातवंडं आजीआजोबांची आठवण आली की गाडीत तबला पेटी घेवून गावाकडं जातात. आजीआजोबांना जमेल तसं गाणं ऐकवतात. स्वत: आनंद घेतात, त्यांना आनंद देतात. आयुष्याच्या निरस चित्रात कलेचा रंग भरून घेतात/देतात. 
धनंजयच्या सासुबाईंचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी देहदानाचा निर्णय घेतला होता. निर्णय घेणं सोपं असतं पण राबविणं महाकठीण. जमलेल्या लोकांना वाटले घरची म्हातारी माणसं अशा निर्णयाला परवानगी देतील का? पण धनंजयच्या आई-वडिलांनी पारंपरिक मतं बाजूला ठेवून सुनेच्या निर्णयाला पाठिंबा देवून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. 
हिंदू धर्मात उदारमतवादी विचारांची एक फार मोठी अशी परंपरा शतकानुशतके राहिलेली आहे. या परंपरेचे नेतृत्व मोठ मोठ्या संत महात्म्यांनी केलं हे खरं आहे. पण ही परंपरा बळकट करण्याचे महत्त्वाचे काम चिंचोलीकर काका- काकुंसारख्यांनी गावपातळीवर केलं आहे.   इंद्रजीत भालेराव यांनी आपल्या एका कवितेत वर्णन केले होते

मी  पाहतो तुझा गाव
आणि तू येतोस माझ्या गावाला
उगाच नावाला  कौतुक करतो आपण
एकमेकांच्या आईबापाचे घरादाराचे
चौकटीवर बहिणींनी काढलेल्या
मोडक्या तोडक्या मोराचे
भाऊ भावजयांनी रोपलेल्या शेताचे
आणि गावकर्यांनी केलेल्या स्वागताचे
सगळ्यांची मेटे मोडलेली दिसत असताना.


याच्या नेमके उलट धनंजयच्या गावाकडे गेले की मेटे न मोडलेले 
म्हातारे पण  ताठ कण्याचे आईवडील दिसतात. आपल्या जवळच्या मित्राचे ते आईवडिल आहे या समाधानापेक्षा असा विचार करणारी माणसं आपल्या जवळ आहे हे समाधान वाटत राहते.    
  
   

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, May 20, 2014

‘नोटा’ चा सोटा ‘आप’च्या पाठीत !!



                                        दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 20 मे 2014 


मोदीलाटेत सारेच वाहून गेले. आधीच शस्त्र टाकून देणारी कॉंग्रेस सोडून द्या पण स्थिर बुद्धी ठेवून विचार करणारेही वाहून जात आहेत. खरे तर समोर आलेल्या आकडेवारीचा आभ्यास करून सारासार विचार करून काही एक मांडणी केली जायला हवी.  या निवडणुकीत वरिल पैकी कुणीही नाही (नन अबाव्ह द ऑल-नोटा) चा पर्याय मतदान यंत्रावर देण्यात आला होता. हा प्रयोग यापूर्वी दिल्ली, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ विधानसभा निवडणुकी झाला होता. या नोटाला मिळालेल्या मतांचा विचार करायला हवा. 
महाराष्ट्राचा विचार केल्यास  एकूण सरासरी मतदान 65 टक्के इतके झाले आहे. म्हणजे पहिलेच 35 टक्के लोक घरीच बसले. तरी एकूण मतदान पूर्वीपेक्षा दहा टक्क्यांनी वाढलेले आहे. अशी नेहमी मांडणी केली जाते की मतदारांना घरातून बाहेर काढणे मोठे कठीण काम आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांची फौज पाहिजे आहे. पैसे पाहिजे आहेत. इतकं करून हे लोक कुणाला मतदान करतील सांगता येत नाही. मोठे प्रस्थापित पक्ष साम-दाम-दंड-भेद वापरून मतदान करून घेतात हा आरोप छोटे पक्ष नेहमी करत आले आहेत. एखादा चांगला चारित्र्यवान बुद्धीमान उमेदवार नेहमीच असे सांगतो की आपल्यापाशी पैसे नाहीत. आपल्यापाशी ताकद नाही. आहे तो फक्त सामान्य  लोकांचा पाठिंबा. हे लोक घराबाहेर पडले आणि त्यांनी मतदान केले की आपला विजय नक्कीच आहे. 
आता हाच नेमका विचार करण्यासाखा प्रश्न आहे. मोठ्या पक्षांना मिळालेले मतदान सोडून देऊ. ते कुठल्यातरी अमिषाने पडले आहे किंवा जाहिरातींचा भडिमार झाला म्हणून पडले असे थोड्यावेळापुरते गृहीत धरू. पण जे लोक आपणहून घराबाहेर पडले. मतदान केंद्रापर्यंत गेले. त्यांची नावे गहाळ झाली नव्हती. त्यांना व्यवस्थित मतदान करता आले. आणि या लोकांनी सगळ्या उमेदवारांना नाकारून नोटा (पैसा) नाकारून नोटाचा (वरिलपैकी कुणी नाही) पर्याय निवडला त्यांचे काय? हे अपयश कुणाचे आहे? हा कुणाला इशारा आहे?
महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांसाठी निवडणुका झाल्या. यात थोड्या थोडक्या नाहीत तर तब्बल 17 जागांवर दहा हजारांपेक्षा जास्त लोकांनी नोटाचा पर्याय निवडला. हे मतदार संघ असे आहेत
बारामती- 14216, बुलढाणा-10546, दिंडोरी-10897, गडचिरोली-24488, हातकणंगले-10059, लातुर-13996, मावळ-11186, मुंबई पश्चिम-11009, नंदूरबार-21178, पालघर-21797, परभणी-17502, रायगड-20362, रत्नागिरी-12313, सातारा-10589, शिरूर-11995, सोलापुर-13118, ठाणे-13174. 
ही आकडेवारी पाहिली तर लक्षात येते की घराबाहेर पडून आग्रहाने मतदान करून गडचिरोली, नंदूरबार, पालघर या भागातील आदिवासी मागास लोकांमध्ये लोकशाहीवर विश्वास दाखवावा इतकी प्रगल्भता जरूर आहे पण सोबतच सर्वांनाच नाकारायची लोकशाहीची ताकदही ते दाखवून देतात. हे मोठे विलक्षण आहे. रायगड मुंबईला लागूनच आहे. त्यामानाने विकासाची फळे जास्त चाखायला मिळाली असा ग्रामीण भाग आहे. पण तिथेही नोटाचा पर्याय लोकांनी मोठ्या प्रमाणावर हाती घेतला आहे. परभणीत सतत शिवसेनेचा खासदार निवडून येतो आणि तो पक्ष बदलून कॉंग्रेसकडे जातो. त्यामुळे त्यांच्यावर लोकांचा राग आहे. कॉंग्रेसवर तर सर्वत्रच नाराजी आहे. शरद पवार यांच्या बारामतीत आणि छत्रपतींचे वंशज असल्याचा माज दाखविणार्‍या उदयन राजे यांच्या सातार्‍यातही नोटाला मिळालेली मते मोठी आहेत.
पण हे विश्लेषण एवढ्यावरच थांबत नाही. नोटाचा सोटा कुणाच्या पाठी? असे विचारले तर याचे उत्तर या निवडणुकी ‘आप’च्या पाठी असेच द्यावे लागेल. त्याचे कारणही तसेच आहे.
सर्व प्रस्थापित पक्षांवर टिका करत आम आदमी पक्षाची स्थापना झाली. शिवाय आम्ही वेगळे आहोत असं त्यांनी आग्रहाने सांगायला सुरवात केली. पहिल्या दिवसापासून ते तसे भासवत होते. दिल्लीत सरकार आल्यावर तर ‘आप’ला जास्तीचा जोर चढला. संपूर्ण भारतात सर्वात जास्त (कॉंग्रेस-414 आणि भाजप-415) 443 जागा आम आदमी पक्षाने लढविल्या होत्या. सर्व प्रस्थापित पक्ष (यात छोटे मोठे सर्व आले) मतदारांना आमिष दाखवतात. आणि निवडून येतात. साहजिकच ‘आप’च्या मताने जे विचारी समजदार लोकशाहीवर विश्वास असणारे मतदार आहेत ते सर्व त्यांचे मतदार आहेत. अगदी एकही जागा न जिंकू शकलेल्या बहुजन समाज पक्षावरही आरोप केला जातो की दलितांची विशिष्ट मते ते खेचून घेतात बाकी त्यांना काही कुणी मोजत नाही. घरातून बाहेर न पडलेल्या मतदारांवर टिका करणे सोपे आहे. पण जे घरातून बाहेर पडले. त्यांनी मतदान केले. मात्र हे मतदान ‘आप’च्या उमेदवाराला केले नाही याचे कोणते कारण ‘आप’ देऊ शकतो?
ज्या मतदारसंघात दहा हजारपेक्षा जास्त मते नोटाला मिळाली त्यातीलही परत दहा मतदार संघ असे आहेत की ज्या ठिकाणी आम आदमीच्या उमेदवारांपेक्षाही नोटाला जास्त मतदान लोकांनी केले. (उदा परभणी. आपच्या उमेदवाराला मिळालेली मते 4459 आणि नोटाला मिळालेली मते 17502). हिंगोली आणि रायगडमध्ये विजयी उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षा नोटाला मिळालेली मते जास्त आहेत.  
प्रस्थापित पक्ष म्हणजेच भाजप आघाडी आणि कॉंग्रेस हे तर नोटाचा विचारच करणार नाहीत कारण त्यांना तशी काहीच गरज नाही. निवडून येवो किंवा पडो त्यांना मिळणारी मते ही त्यांनी खेचून घेतलेली मते आहेत असंच आमचे तथाकथित विद्वान मानतात. म्हणजे आपणहून सामान्य मतदार लोकशाहीवर विश्वास ठेवून यांना मतदान करत नाही असाच यांचा आरोप असतो. इतर छोटे पक्ष यांनी आपआपले डबके तयार करून घेतले आहे. उदा. बहुजन समाज पार्टी. महाराष्ट्रात यांना ठराविक दलित मते मिळत राहतात. त्यांचा आपण विचार करण्याची काही गरज नाही असाच आव सर्वांनी आणलेला असतो. माध्यमांमधूनही बसपाची चर्चा होत नाही. ‘मनसे’ सारखे तोंडाळ आणि वाचाळ पक्ष म्हणजेच मुख्येत्वेकरून त्यांचे नेते सभेत मोठ मोठी भाषणं करत फिरतात, त्यांच्या मोठ्या बातम्या होतात. शिवसेनेलो पाडण्याचे पवित्र कार्य मागच्या निवडणुकात केल्यावर यावेळेस त्यांना लोकांनीच घरचा रस्ता दाखवला. तेंव्हा यांचाही या नोटाच्या पर्यायाशी काही संबंध नाही. त्यामुळे उरतो फक्त आम आदमी पक्ष. हे मतदान आपल्याकडे खेचण्यात आम आदमी पक्षाला अपयश आले. नोटाचा सोटा आम आदमी पक्षाच्याच पाठी बसला असेच म्हणावे लागते.  
महाराष्ट्रात जवळपास एक टक्का इतके मतदान नोटाला लोकांनी दिले आहे. बहुजन समाज पक्ष (2.6 टक्के) आम आदमी पक्ष (2.2 टक्के), मनसे (1.5 टक्के) शेकाप (1 टक्के), अपक्ष व इतर (3.3 टक्के) यांना मिळालेली मते बघितली तर नोटा ची काय ताकद आहे ते लक्षात येईल. म्हणजे महाराष्ट्रात स्वतंत्रपणे विचार करणारी आणि आपल्या विचारासाठी प्रत्यक्ष कृती करणारी माणसे चार लाख तेहतीस हजार एकशे ऐंशी आहेत हे तरी आपण मान्य करणार आहोत की नाही? 
भाजपने धार्मिक उन्मादाचे वातावरण निर्माण केले यात काही शंकाच नाही. कॉंग्रेसही यात कणभर मागे नाही. उलट कॉंग्रेसच्या अल्पसंख्यांक-लांगूलचालनाच्या धोरणामुळेच भाजपचे फावले हे स्पष्ट आहे. डाव्यांच्या नेतृत्वाखालची तिसरी आघाडी नावाची गोष्ट आजी आजोबांनी नातावांना सांगावी तशी ‘आटपाट नगर होते, तिथे एक गरीब तिसरी डावी आघाडी रहात होती’ अशी उरली आहे. अशावेळी महाराष्ट्रात चार लाखांपेक्षा जास्त लोक नोटाचा पर्याय निवडतात हे विचार करण्यासारखे आहे. 

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, May 13, 2014

............ आईवर शक्य नाही कविता !!


          (Jan 18, 2009 - Mother With Child Painting by Padmakar Kappagantula)                                   

                                   दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 13 मे 2014 


मे महिन्याचा दुसरा रविवार जगभर ‘‘मातृदिन’’ म्हणून साजरा केला जातो. 11 मे रोजी हा दिवस यावर्षी साजरा केला गेला. आपल्या भारतीय परंपरेत तर आईचा महिमा किती वर्णन केला आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. आईवर भरपूर कविता आहेत. बहुतांश कविता अतिशय चांगल्या आहेत. ‘श्यामची आई ’ चित्रपटातील ‘आई कुणा म्हणू मी आई घरी न दारी । स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी॥ हे गाणे ऐकून (कवी : यशवंत) ढसाढसा रडल्याची कबूली खुपजण देतात. आईवर इतक्या कविता लिहील्या गेल्या त्याचे एक साधे आणि अतिशय काव्यात्मक कारण दासू वैद्य या आमच्या कविमित्राने देउन ठेवले आहे

प्रत्येक आईचा मुलगा
कवी असतोच असे नाही
पण प्रत्येक मुलासाठी त्याची आई
एक कविता असते.


यामुळे स्वाभाविकच आईवर भरपूर लिहील्या गेलं. इतकं लिहीलं जाऊनही आई परत शब्दांबाहेर शिल्लकच राहते. हिंदी/उर्दूमध्ये दोन कविता या दृष्टिने मला फार आवडतात. चंद्रकांत देवतालेंनी आपल्या कवितेत कबुलीच दिली आहे, 

मां के लिए संभव नही होगी 
मुझसे कविता
जब कोई मां छिलके उतारकर
चने, मूंगफली या मटर के दाने
नन्ही हाथेलियों पर रख देती है
तब मेरे हाथ अपनी जगह पर 
थरथराने लगते हैं ।

मां ने हर चीज के 
छिलके उतारे मेरे लिए
देह, आत्मा, आग और 
पानी तक के छिलके उतारे
और मुझे कभी भूखा
नही सोने दिया ।

मैंने धरती पर कविता लिखी है
चंद्रमा को गिटार में बदला है
समुद्र को शेर की तरह 
आकाश के पिंजरे मे
खडा कर दिया है
सूरज पर कभी भी
कविता लिख दूंगा
मां पर नही लिख सकता कविता ॥


प्रतिभावान कवी एखाद्या शब्दांत सारं काही सांगून जातो. ‘मां ने हर चीज के छिलके उतारे मेरे लिये’ इतक्या साध्या शब्दांत देवताले प्रचंड मोठा आशय सांगून जातात. आईवर कविता शक्य नाही ही कुण्या एका कविची मर्यादा नसून ती आई या विषयाची व्याप्ती आहे हे देवतलेंना सुचवायचे आहे. अतिशय लोकप्रिय कवी गीतकार नीदा फाजली यांनी आईवर एक गझल लिहीली आहे. आई म्हणजे संपूर्ण घर किंवा एक संस्कृतीच असते. तिची वेगळी अशी व्याख्या कशी करणार?

बेसन की सोंधी रोटी पर
खट्टी चटनी-जैसी मॉं 
याद आती है चौका-बासन
चिमटा, फुकनी-जैसी मॉं 
 
बान की खुर्री खाट के ऊपर
हर आहट पर कान धरे
आधी सोयी आधी जागी
थकी दोपहरी-जैसी मॉं

बीबी, बेटी, बहन, पडोसन
थोडी-थोडी-सी सब में
दिन भर इक रस्सी के ऊपर
चलती नटनी-जैसी मॉं

बॉंट के आपना चेहरा, माथा
आँखे जाने कहॉं गयी
फटे पुराने इक अल्बम में
चंचल लडकी-जैसी मॉं


निदा फाजली यांची कविता भाषा सोडली तर आपलीच आहे  हे भारतातील कुठल्याही प्रांतातल्या माणसाच्या सहज लक्षात येईल. भावूक पातळीवर कविता लिहीणारे तर आईच्या प्रेमात आंधळे होणारच. पण महान तत्त्ववेत्तेही यातून सुटलेले नाहीत. शंकराचार्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग अतिशय विलक्षण आहे. त्यांना संन्यासाची परवानगी देताना आईनं अट घातली की माझ्या मृत्यूसमयी तू माझ्याजवळ हवा आहेस. त्याप्रमाणे आईचा मृत्यूप्रसंग त्यांनी अंतर्ज्ञानाने जाणला. आणि त्यासमयी ते लांबचा प्रवास करून पोचले. तीच्या देहांतानंतर अंत्यविधी करण्यासाठी कर्मठ ब्राह्मण आईच्या देहाला शंकराचार्यांना हात लावू देईनात. यांनी सन्यास घेतला त्यामुळे आता ते धर्मदृष्ट्या आईचा मुलगा नाहीत. सर्वांना धर्म शिकविणार्‍या तत्त्वज्ञ शंकराचार्यांनी कर्मठ ब्राह्मणांचे ऐकले नाही. आईचा अंत्यविधी आपणच करणार असे आग्रहाने प्रतिपादले. इतरांनी अंत्यविधीवर बहिष्कार टाकला. तरी शंकराचार्य डगमगले नाहीत. त्यांनी कुर्‍हाडीने आईच्या देहाचे तुकडे करून पोत्यात भरले. आणि ते पाठकुळी घेवून नदीकाठी सरणावर ठेवले. त्यांचा विधीवत अंत्यसंस्कार केला. 
आईवर लिहीताना अजून एक गोष्ट लेखकांना खुणावत असते आणि ते म्हणजे आपले बालपण. आई म्हणजे नुसती आई नसून तिच्या आठवणींसोबत आपले बालपणही घट्ट बिलगलेले असते. बर्‍याचदा तर असे होते की आई, लहानपणीचे घर, घरातली माणसे, आपण राहतो ती गल्ली हे सारेच आईत एकजीव होऊन जाते. जॉं निस्सार अख्तर सारख्या प्रतिभावंत बापाच्या पोटी जन्मलेले जावेद अख्तर यांचा वडिलांवर कायम राग होता. आई गेल्यावर ते वडिलांशी भांडून घराबाहरे पडले. याच जावेद यांना लहानपण आठवते ते आईच्या आठवणींना लगटूनच. 

मुझे यकीं है सच कहती थी 
जो भी अम्मी कहती थी
जब मेरे बचपन के दिन थे 
चांद में परियां रहती थी

एक ये दिन जब सारी सडके
रूठी रूठी लगती है
एक वो दिन जब ‘आओ खेले’
सारी गलियॉं कहती थी

एक ये दिन जब लाखों गम
और काल पडा है आंसू का
एक वो दिन जब एक जरा सी
बात पे नदियॉं बहती थीं


आईवर लिहीण्याचा प्रयत्न आजवर खुपजणांनी केला. तरी आई नावाच्या संज्ञेची व्याख्या कुणाला करता आली नाही. आईनं आपल्यासाठी सोसलेल्या असंख्य कळांपैकी एकजरी कळ तीच्यासाठी सोसता आली तर आई नावाच्या संज्ञेची व्याख्याही करता येईल. 

   श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Tuesday, May 6, 2014

रस गळतो | अंबा छळतो । दिल्लीचा राजा | झिम्मा खेळतो ||


                                      दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 6 मे 2014 

भारतीय हापुस अंब्याला युरोपात बंदी घातल्यची बातमी आली आणि मोठा गदारोळ माजला. फार मोठी आपत्ती कोसळली आहे, भारतीय मालाला बंदी घालून भारतावर काहीतरी अन्याय केला गेला आहे, भारतीय शेतकर्‍यांचे फार मोठे नुकसान होत आहे, यांना आपणही बंदी घालून चांगला धडा शिकवला पाहिजे असे अकलेचे तारे तोडल्या गेले. नेमके किती अंबे युरोपात जातात? एकूण अंब्याच्या बाजारपेठेत त्यांचा वाटा किती याची जरा जरी तपासणी केली असती तर वस्तूस्थिती समजली असती. पण तशी समजून घेण्यात आपल्याला मुळीच रस नसतो. परिणामी काहीतरी शुल्लक गोष्टीवर गदारोळ माजविला जातो. एकूणच दिल्लीचे धोरण शेतमालाच्या भावाशी झिम्मा खेळण्याचेच असल्याने हे खरेही वाटते.
मागच्या वर्षी युरोपात एकूण 3250 व अमेरिकेत 175 असा जवळपास 3500 टन अंबा निर्यात केला गेला. भारतातील हापूसची सगळ्यात मोठी घावूक बाजारपेठ म्हणून वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाहिल्या जाते. एकट्या वाशीमध्ये दररोज सहा हजार टन अंबा येतो. एकूण सिझन मध्ये अंब्याचा व्यापार जवळपास साडे तीन लाख टन इतका होतो. म्हणजे एकूण व्यापाराच्या केवळ एक टक्का अंबा युरोपला जातो. आता जर यावर बंदी आली तर असे काय मोठे आभाळ कोसळले? शंभरातील एक रूपयाच्या व्यापाराची अडचण निर्माण झाली. पण बाकी नव्व्याण्णव रूपयाचे व्यवहार तर आधीसारखेच चालू आहेत ना त्यांचे काय? म्हणजेच जो अंब्याचा इतर व्यापार चालू आहे त्याबद्दल कोणी काहीच बोलायला तयार नाही. आणि युरोपच्या एक टक्का व्यापाराबाबत मात्र गोंधळ सुरू आहे.
अंब्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ ही हापूसची नसून इतर गावठी अंब्यांची आहे. आणि ही किमान हापूसच्या व्यापाराच्या वीस पट आहे. भारतभर कित्येक गावठी जातीचे अंबे तयार होतात आणि जवळपासच्या बाजारात विक्रीला येतात. या अंब्याला फार दुरवरची बाजारपेठ परवडत नाही. कारण वाहतूक व्यवस्था, साठवणुकीसाठी शीतगृह, पॅकिंग इत्यादी बाबत आपल्याकडे आनंदी आनंद आहे. परिणामी स्थानिक फळांना स्थानिक बाजारेपठ हाच व्यवहार्य पर्याय उपलब्ध असतो.
दुसरी बाब म्हणजे अंब्याच्या बाबतीत ताज़्या फळांपेक्षा प्रक्रिया केलेल्या अंब्याच्या गराचा (मँगो पल्प) व्यापार प्रचंड मोठा बनला आहे. ताजे अंबे निर्यात करायचे म्हणजे मोठी किचकट प्रक्रिया आहे. त्या अंब्याचा रंग, त्याची चव, त्याचा आकार याबाबत प्रचंड काळजी घ्यावी लागते. त्याचे पॅकिंग विशिष्ट पद्धतीने व्हायला हवे. विशिष्ट दिवसांमध्ये हा अंबा विकला गेला तरच त्याचे पैसे मिळतात. या उलट मँगो पल्पसाठी मात्र तूलनेने दुय्यम स्थितीतला अंबाही चालतो. शिवाय हा पल्प तयार करून हवाबंद डव्यांत वर्षभर विकता येतो. त्याला दिवसांचे बंधन नाही. शितपेय (माझा वगैरे) उत्पादनांत मँगोपल्पला फार मोठी मागणी आहे. भारतभरच्या रसवंत्या (ज्यूस सेंटर) मध्ये सगळ्यात जास्त मागणी मँगो पल्प पासून केलेल्या मँगो मिल्क शेक ला आहे. परिणामी ही बाजारपेठ विस्तारली असून ती ताज्या फळांच्या कैकपट आहे.
युरोप अमेरिका सोडा, पण दुबई सारखे जवळपास 91 देश आहेत त्यांना आपण फळं निर्यात करतो. ही पण बाजारपेठ युरोपपेक्षा कित्येक पट मोठी आहे.
द्राक्षांच्या बाबतील 2010 मध्ये मोठा झटका आपल्या द्राक्ष उत्पादकांना बसला होता. पण नुसते रडत न बसता आणि वर्तमानपत्रे/टीव्ही वाहिन्यांवर चर्चा करत न बसता द्राक्ष उत्पादकांनी त्यावर मार्ग काढला. गेली चार वर्षे द्राक्षांची निर्यात नियमित चालू आहे. याच पद्धतीने अंब्याच्या अडचणीवरही अंबा उत्पादक मार्ग काढतील. पुढच्या वर्षीपासून अंब्याची निर्यात युरोपात सुरळीत होण्याची आशा आहे. या बाबी चर्चा करणारे लक्षात घेत नाहीत.
खरा प्रश्न आहे फळं आणि भाजीपाला यांची भारतीय बाजारपेठ सुधारणार की नाही? कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये मोजमाप करायला इलेक्ट्रॉनिक्स तराजू हवे आहेत, मालाची ने आण करण्यासाठी शीतपेट्या हव्या आहेत, मालाची प्रतवारी करणे (ग्रेडिंग), शीतगृहांमध्ये (कोल्ड स्टोरेज) साठवणुक करणे यासाठी आवश्यक ती संरचना (इन्फ्रास्ट्रक्चर) उभी करायला हवी. भारतभर साडेचारलाख खेडी आहेत. जळपास पन्नास हजार आठवडी बाजार आहेत. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फळे, भाजीपाला विक्रीला येतो. या आठवडी बाजारांच्या ठिकाणी किमान पिण्याचे पाणी, मालाच्या विक्रीसाठी ओटे इतकी तरी व्यवस्था आपण केली आहे का? शेतातून बाजाराच्या ठिकाणी माल नेण्यासाठी किमान व्यवस्था तरी आहे का?
फळे, भाजीपाला यांचे बीट (घावूक उलाढाल करण्याचे ठिकाण) जिथे चालते तिथे एखाद्या सकाळी सूर्य उजाडण्यापूर्वी जावून पहावे. म्हणजे चर्चा करणार्‍यांच्या डोळ्यांसमोर खरे चित्र उभे राहिल. मोसंबीचा ढिग समोर ओतलेला असतो आणि त्याचा नजर लिलाव होतो. म्हणजे या ढिगाची किंमत किती याची बोली लावली जाते. मोसंबी किती नग आहे किंवा किती वजनाची आहे हे मोजल्या जात नाही. केळाची खरेदी वजनाने होते आणि विक्री मात्र नगाने होते. भाजीच्या जुड्या मोजताना काही जूड्या वर न मोजता देवून टाकाव्या लागतात. अशा कितीतरी बाबी आहेत ज्यांची चर्चा आजही होत नाही. इतर अन्नधान्य सोडा पण फळे, भाजीपाला, फुले यांची मोठी बाजारपेठ स्वत: भारतच आहे. त्यासाठीच्या सुधारणा कधी होणार? त्यासाठी आवश्यक ती राजकीय इच्छाशक्ती आपण बाळगणार की नाही?
एक भिती घातली जाते की भारतीय शेतीमालाच्या बाजारपेठेवर परकिय आक्रमण होवू शकते म्हणून. किंवा आपला माल बाहेर जावू नये असा कट रचला जातो आहे. ज्याला विचार करता येत नाही, अभ्यास करायचा नाही अशीच माणसे असा वाह्यात आरोप करू शकतात. आज जगभरात विविध उत्पादनांसाठी जीवघेणी स्पर्धा सुरू आहे हे खरे आहे. पण शेतीमालाबाबत मात्र परिस्थिती काहीशी विपरीत आहे. कुठल्याच पुढारलेल्या देशात शेती करायला कोणी तयार नाही. युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान सर्वत्र शेतीवरील लोकसंख्या ही फक्त 5 ते 10 टक्के इतकी मर्यादीत आहे. आणि ही लोकसंख्या शेतीवर टिकावी म्हणून त्यांना विविध अमिषं दाखवावी लागतात, अनुदानं द्यावी लागतात, त्यांच्या मालाची काळजी शासनालाच घ्यावी लागते. याच्या नेमकी विरूद्ध स्थिती आपली आहे. आपल्याकडे शेतीवरची लोकसंख्या जवळपास 65 टक्के इतकी आहे. इतक्या लोकांना आपण कुठलीच सुट सबसिडी देवू शकत नाही. फक्त ती दिल्याचा खोटा खोटा देखावा मात्र उभारू शकतो. त्यामुळे आपल्याकडे शेतीत जे मनुष्यबळ उपलब्ध आहे, शेतीत राबण्याची जी वृत्ती भारतीय माणसांमध्ये आहे, शेकडो वर्षांपासून शेती करण्याचे व्यवहारिक पारंपरीक ज्ञान आपल्याकडे आहे आणि शिवाय नैसर्गिक रित्या जी स्थिती आपल्याला उपलब्ध आहे ती जगात फार थोड्या ठिकाणी आहे (आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेचा काही भाग) त्यामुळे आपल्या मेहनतीला तोड नाही. जे लोक आपल्याला ही भीती घालतात ते फसवणूक करीत आहेत.
युरोपच्या निमित्ताने भारतीय फळं आणि भाजीपाल्याच्या बाजारेपेठेबाबत नविन धोरणं आखण्याची गरज निर्माण झाली आहे. नविन रचना केली नाही तर ‘रस गळतो । अंबा छळतो । दिल्लीचा राजा । झिम्मा खेळतो ॥ हेच म्हणत टाळ्या वाजवीत बसावे लागेल. शेतमालाशी झिम्मा खेळण्याची दिल्लीच्या राजाची (केंद्र सरकार) सवय अजूनही गेली नाही. इतर बाबीत हेच आहे. पण शेतीच्या बाबतीत जास्तच आहे. 

   श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575