Tuesday, December 31, 2013

रिक्क्षावाल्याचे 3 चाकी दु:ख : गाडी-बॉडी-इज्जत

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 31 डिसेंबर 2013


तांबूस वर्णाचा मध्यमवयीन, कुटूंबप्रमुख असलेला एक रिक्क्षावाला बोलत होता, ‘‘साहेब माझ्या रिक्क्षाला पकडून पोलिसांनी दंड लावला. मी माझा गुन्हा नाही हे परोपरीनं सांगत होतो. माझ्याजवळ दंडाचे पैसे नव्हते. शेवटी मी म्हणालो आम्हा दोघा रिक्क्षावाल्यात मिळून एक पावती फाडा. तर तो पोलिस मला म्हणाला, ‘साल्या दोघात मिळून पावती फाडा म्हणतो, दोघात मिळून एक बायको करशील का?’ सांगा साहेब आमची काही इज्जत उरली आहे का? आम्हाला का घरदार पोरंबाळं नाहीत का? गिर्‍हाईक तर खवळलेलंच राहतं आमच्यावर. अन् हे पोलिस. ’’
हा कुठलाही काल्पनिक प्रसंग नाही. प्रत्यक्ष माझ्या कार्यालयात माझ्या समोर घडलेला प्रसंग आहे. हे सांगणारे सोमनाथ पेरकर हे औरंगाबादचेच रिक्क्षा चालक आहेत.  रस्त्यांवरच्या खड्ड्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे हे लोक माझ्या संपर्कात आले. माझे वडिल रिक्क्षाने जात होते. रिक्क्षावाल्याने आपले दुखणे त्यांना सांगितले व म्हणाला, ‘वो खड्डेवाला आदमी किधर रहात मालूम नही’. माझे वडिल अभिमानाने म्हणाले तो माझा मुलगाच आहे. मी तूम्हाला त्याचा पत्ता फोन नंबर सांगतो तूम्ही जावून भेटा. रिक्क्षा चालक संघटनांचे पदाधिकारी आणि त्यांचे सभासद मला भेटले आणि एक वेगळेच विश्व माझ्या समोर उलगडत गेलं. चालकांची संघटना कुठलीही असो डाव्या चळवळीतील लाल बावटा असो, उजव्या चळवळीतील रिक्क्षा सेना असो, की विविध छोट्या मोठ्या संघटनांची मिळून तयार झालेली संयुक्त संघर्ष कृती समिती असो. सगळ्यांच्या दु:खाची ठणक सारखीच.
संयुक्त कृती समितीच्या निसार अहमद खान यांनी तर याचा फार व्यवस्थित अभ्यास केला आहे. सामान्य नागरिकांची अशी भावना असते की हे सगळे आपल्याला लुटायला बसले आहेत. हे रिक्क्षावाले सिटी बस बंद पाडतात. हे रिक्क्षावाले मीटर लावून घेत नाहीत. पत्रकार परिषदेत आम्ही रिक्क्षा चालक संघटनेचे पदाधिकारी, ग्राहक पंचायतीचे सदस्य, राजकीय पक्षाचे लोक, सामान्य नागरिक यांना समोरा समोर आणले. आश्चर्य म्हणजे आम्हाला मीटर बसवा, आम्हाला सचोटीने व्यवसाय करायचा आहे, गिर्‍हाईकाची किरकिर ऐकून घ्यायची आम्हाला अजिबात इच्छा नाही, आम्हाला इज्जतीनं जगायचं आहे ही मागणी खुद्द रिक्क्षावालेच करत होते. म्हणजे जो आरोप त्यांच्यावर केला जातो तो खरा नाही हेच सिद्ध होतं.
रिक्क्षा विकत घेतल्यानंतर त्याची नोंदणी परिवहन कार्यालयात होते. (आर.टी.ओ.) त्यावेळेस एकरकमी रस्ता कर (वन टाईम रोड टॅक्स) घेतला जातो. रिक्क्षावाले आमच्यापाशी त्यांची व्यथा सांगताना म्हणाले. ‘बघा साहेब आमच्याकडून रोडसाठी पैसे घेतले जातात. आणि रोड तर दुरूस्त होत नाही. रोड दुरूस्त नाही म्हणून आमचे परत नुकसान. बोले तो पैसे गये, गाडी गयी, बॉडीभी गयी, इज्जतका तो कचरा.’ रिक्क्षावाल्यांकडून गोळा केलेला रस्ता कर रस्त्यावर खर्च का होत नाही? हा अतियश साधा बाळबोध प्रश्न कुणालाही पडू शकतो. पण या साध्या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी रिक्क्षावाल्यांना कोणीच द्यायला तयार नाही. (सगळ्या तथाकथित विद्वानांना, याचे उत्तर द्यावे आसे  माझे आवाहन आहे.)
रिक्क्षावाल्याला कुठल्याही कारणाने बाजूला घेवून त्याच्याकडून दंड लावणारे आणि हप्ता वसूल करणारे पोलिस, रस्त्याचा निधी रस्त्यावर खर्च झाला नाही म्हणून कोणाची कॉलर पकडणार आहेत? पेट्रोलच्या प्रत्येक लिटर मागे दोन रूपये वेगळा कर रस्त्यांसाठी वसूल केला जातो. मग तो कुठे जातो? मिलींद मगरे या रिक्क्षावाल्याच्या  प्रश्नाला कुठे उत्तर आहे.
अजून एक आश्चर्यचकित करणारी बाब रिक्क्षावाल्यांशी केलेल्या चर्चेतून समोर आली. शहराची वाहतूक कशी असावी, त्यात सिटी बससाठी कोणते मार्ग असावेत, सहा आसनी रिक्क्षा कुठे चालवाव्यात, तीन आसनी रिक्क्षा कुठे चालवाव्यात याचा सगळा आराखडा खुद्द रिक्क्षा चालक संघटनेनेच तयार केलेला आहे. तो शासनाला सादरही केला. आजतागायत त्यावर विचार करायला शासनाला वेळ मिळाला नाही.
सहा आसनी रिक्क्षावाल्यांचीही बाजू या निमित्ताने समोर आली. काही कुठलाच धरबंध नसलेले लोक कुठूनही चोरीच्या गाड्या घेवून कुठल्याही परवान्याशिवाय धंदा करू लागतात याची खंत अजिनाथ नलावडे यांनी व्यक्त केली. त्यांची औरंगाबादला हडकोला सहा आसनी रिक्क्षा आहे. अतिशय कष्टाने त्यांनी आपलं घर पुढं आणलं. मुलगी पॉलिटेक्निकला तर मुलगा परदेशात तैवानला अभियांत्रिकीला शिकतोय. तेही शिष्यवृत्तीवर. दोन वर्षांपूर्वी लाखात मिळणारी रिक्क्षा आता दीड लाखांवर गेली आहे पण रिक्क्षाची दरवाढ गेली तीन वर्षे झालीच नाही हे त्यांचे निरिक्षण नेमकं आहे.
या सर्व रिक्क्षा चालकांची अस्थीरोग तज्ज्ञांकडून आम्ही तपासणी केली. सगळ्यांनाच पाठीचे मानेचे मणक्याचे कमरेचे आजार असल्याचं विदारक सत्य त्यातून बाहेर आलं. रिक्क्षा चालकांना बोलावून त्यांच्या रांगा लावून त्यांना क्रमाने तपासणीसाठी सोडणारा तरूण रिक्क्षा चालक शेख अकील असं म्हणाला, ‘साब टू व्हिलर वाला तो कैसा भी छूट सकता है. पर रिक्क्षावाला बोले तो उसका एक पहिया खड्डेमेच रेहता है ना !’ वाक्य अतिशय साधं होतं पण त्यातून रिक्क्षावाल्याचं दु:ख  ठणकत होतं. अजून एक जण सांगत होता की पाठीवर झोपताच येत नाही. एका अंगावर झोपावं लागतं.
सामाजिक समस्यांच्या संदर्भात काम करताना काय केलं पाहिजे? कुठली काळजी घेतली पाहिजे? असं मी  माझे वैचारिक गुरू, शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांना एकदा विचारलं होतं. त्यांनी साध्या शब्दांत सांगितलं, ‘काहीच नाही फक्त त्या समस्याग्रस्त लोकांपर्यंत जावून सरळ त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. मी स्वत: शेतकरी झालो. शेतकर्‍यांशी बोलायला लागलो तेंव्हा मला शेतीची समस्या उमजली.’ मला स्वत:ला रिक्क्षाचालक होणे शक्य नव्हते. पण त्यांच्यापाशी मी गेलो. त्यांची वेदना समजावून घ्यायचा प्रयत्न केला. एखाद्या जखमेवरची खपली काढताच रक्त उसळावं तसं समाजानं पांघरलेली ही खपली निघाली आणि रिक्क्षावाल्यांच्या समस्येचे रक्त वाहायला लागलं.
का सुटत नाहीत साध्या साध्या माणसांचे प्रश्न? मोठ मोठे समुह त्यांच्या मोठ मोठ्या समस्या सोडून द्या. कुठल्याही साध्या प्रश्नाला आपण प्रामाणिकपणे भिडलो की लक्षात येतं शासन नावाचा एक मोठा अक्राळविक्राळ  निगरगट्ट राक्षस सर्वांना व्यापून बसला आहे. रिक्क्षा चालक संघटनेच्या पदाधिकार्‍यांना घेवून एक समिती शासनाने तयार केली आहे. त्याचे अध्यक्षपद अर्थात जिल्हाधिकार्‍यांकडे आहे. पण त्यांना वर्षानुवर्षे ही बैठक घ्यायला वेळच नाही. आज औरंगाबाद शहरात पंचेवीस हजार रिक्क्षाचालक आहेत. म्हणजे जवळपास पंचेवीस हजार कुटूंब रिक्क्षावर अवलंबून आहेत. आणि त्यांच्या समस्या सोडवायला शासनाला वेळ नाही. खड्डा रस्त्याला पडलाय का धोरणाला हे कळायला मार्गच नाही.
आज मोठ्या शहरांची एक  विचित्र समस्या होवून बसली आहे. खराब रस्त्यांमुळे संध्याकाळी ज्येष्ठ नागरिक  वाहने चालवू शकत नाहीत. शहर वाहतूकीचे तीन तेरा वाजल्यामुळे व स्वतंत्र ऑटो परवडत नसल्यामुळे बाहेर पडता येत नाही. म्हणजे संध्याकाळ झाली की आपण आपल्या घरात स्थानबद्ध व्हायचं. आपलं घर म्हणजे आपल्यासाठी तुरूंग अशी स्थिती म्हातारा म्हातारीची झाली आहे. ही परिस्थिती एकीकडे आणि दुसरीकडे रिक्क्षावाले बेंबीच्या देठापासून ओरडत आहेत रस्ते दुरूस्त करा, वाहतुकीला शिस्त लावा, रिक्क्षाला मीटर लावा, आम्हाला इज्जतीनं व्यवसाय करू द्या.
शेतकरी चळवळीत एक घोषणा फार लोकप्रिय होती, ‘सरकार समस्या क्या सुलझाये, सरकार खुद समस्या है !’ ही घोषणा रिक्क्षांच्या बाबतीतही खरी ठरली आहे. म्हणजे काल ग्रामीण ‘भारत’ अन्यायाविरूद्ध आंदोलन करत होता, आज शहरी ‘इंडिया’ही त्याच स्थितीत येवून पोचला आहे.
खड्ड्यामुळे गाडी, बॉडी आणि इज्जत गेल्याची तीनचाकी वेदना रिक्क्षावाल्याच्या मनात ठसठसत आहे आणि आपण  मात्र ‘वाट माझी बघतोय रिक्क्षावाला’ गाण्यावर कुठल्याही लग्न समारंभात निर्लज्जपणे नाचत रिक्क्षावाल्यांच्या समस्यांची वाट लावतो आहोत.

Tuesday, December 24, 2013

जमीन विकून पुरस्कार दिला। प्रेमे गौरविला कार्यकर्ता॥

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 24 डिसेंबर 2013
                                                                   पुरस्कार प्रदान सोहळा
डावीकडून - श्रीरंगनाना मोरे, शरद जोशी, ब.ल.तमासकर, भास्कर चंदनशिव, वामनराव चटप

कुठलाहि पुरस्कार म्हणजे कसे चित्र उभे राहते? एखादे अण्णासाहेब, दादासाहेब, रावसाहेब, नानासाहेब यांची शासकीय अनुदानावर पोसलेली संस्था असते. त्यातील कर्मचार्‍यांच्या पगरातून कपात करून हे दादासाहेब, रावसाहेब एखाद्या पुरस्काराचा जंगी फड लावतात. शिवाय यालाच समाजसेवा म्हणून सगळीकडे मिरवले जाते. पुरस्काराला येणारा पाहुणा या शासकीय पैशावर पोसलेल्या बांडगुळांच्या झगमगाटाला भुरळतो. आणि समाजाला अशा समाजसेवकांची कशी गरज आहे हे कंठशोष करून सांगतो. आपल्या मानधनाचे जाडजुड (त्याच्या दृष्टीने जाडजूड अन्यथा दादासाहेब, रावसाहेबांना ही रक्कम म्हणजे चिल्लर- एका रात्रीत उधळण्याइतकी) पाकिट स्विकारत आपल्या गावी परत जातो.
अंबाजोगाईच्या ज्ञानश्री प्रतिष्ठानचा ‘ज्ञानश्री’ पुरस्कार मात्र अतिशय वेगळ्या जातकुळीचा. जातकुळीचा म्हणायचे कारण मंचावरून प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा ज्येष्ठ शेतकरी नेते श्रीरंगनाना मोरे आपल्या भाषणात म्हणाले, ‘‘आम्ही तीन भावू. त्यातला मी थोरला.’’ ऐकणार्‍यांना वाटले नाना आपल्या कौटूंबिक बाबींबद्दल बोलत आहेत. ‘‘ माझ्यापेक्षा दोन वर्षांनी धाकले भास्कर भावू, आणि त्यांच्यापेक्षा 2 वर्षांनी धाकले शरद जोशी.’’ एक मराठा, एक माळी, एक ब्राह्मण हे तीन भावू. नुसती जातकुळीच नाही तर ‘‘माझे सहकारी अमर हबीब’’ म्हणत नानांनी धर्मकुळीही ओलांडली.
श्रीरंगनाना मोरे यांनी अंबाजोगाईला शरद जोशींच्याही आधी शेतकरी संघटना सुरू केली. त्यांनी शरद जोशींचे विचार ऐकले  आणि मोकळेपणाने, मोठ्या मनाने आपली संघटना शेतकरी संघटनेत विलीन केली. नानांनी आपली दोन एकर जमीन विकली. ती रक्कम बँकेत ठेवली आणि तिच्या व्याजावर दरवर्षी एक लाख रूपयांचा ‘‘ज्ञानश्री’’ पुरस्कार सुरू केला. नाना वारकरी घराण्यात जन्मले. ‘‘आजच्या काळात वारकरी म्हणजेच शेतकरी हे माझ्या लक्षात आले. आणि शेतकर्‍यांच्या दु:खाला वाचा फोडणारा शरद जोशी हाच आमचा विठ्ठल’’ इतकी स्वच्छ नितळ भावना नानांनी मनी बाळगली. पहिला पुरस्कार अर्थातच शरद जोशींना दिला. रा.रं.बोराडे यांच्या हस्ते देण्यात आला. दुसरा ‘‘ज्ञानश्री’’ पुरस्कार कोणाला देणार हा प्रश्न बोराडे सरांनी तेंव्हाच विचारला होता.
गेली तीस वर्षे तन (शरिर फाटके) मन(खंबीर) धनाची (खिसा फाटका) खर्‍या अर्थाने पर्वा न करता शेतकरी संघटनेत झोकून देणार्‍या ब.ल.तामसकर यांचे नाव निश्चित झाले आणि सर्वच कार्यकर्त्यांना मोठा आनंद झाला. मी ज्या ‘जातकुळीचा’ उल्लेख सुरवातीला केला आहे. त्याच पंगतीतले पुढेच नाव म्हणजे ब.ल.तामसकर. आजतागायत त्यांची जात जवळच्या लोकांना कळली नाही. अमर हबीब यांनी या संदर्भात मोठी करूण आठवण मला सांगितली. ब.ल. यांच्या आईचे निधन झाले त्यावेळी अमर हबीब औंढा नागनाथला ब.ल.च्या गावी गेले होते. अंत्यसंस्काराच्यावेळी ब.ल.ची जात उघडी पडली असं अमरनी डोळ्यात पाणी आणून सांगितले. ब.ल. तामसकर यांचे नाव बब्रुवान आहे हेही कुणाला माहित नाही. त्यांना सगळे ब.ल. असंच म्हणणार.
कुणाला कार्यकर्त्याची व्याख्या करायची असेल तर मराठवाड्यात ब.ल.पेक्षा लायक माणूस कोणीच सापडणार नाही. ब.ल. यांच्याकडे चारचाकी तर सोडाच पण दोन चाकीही गाडी नाही. सायकलही नाही. कोणालाही झापू शकणारी झणझणीत जीभ हे ब.ल. यांचे खरे भांडवल. भाषणात शरद जोशी यांनीही त्यांना विचारले, ‘‘तूम्ही सगळ्यांना शिव्या देता, कुत्र्या म्हणता. मलाही कदाचित कधी माघारी म्हणाला असाल.’’ निर्मळ मनाचा क्षोभक कार्यकर्ता असे वर्णन शरद जोशी यांनी त्यांचे केले आहे.
मंचावर पाहुण्यांच्यामध्ये चांगल्या कपड्यात बसलेले  ब.ल.खुप अवघडल्यासारखे दिसत होते. मला तर भिती वाटत होती की कुठल्याही क्षणी ते उठून सरळ चालायला लागतील.
1983 साली ब.ल.पहिल्यांदा माझ्या घरी आले तेंव्हा त्यांचे वर्णन कुसुमाग्रजांच्या कवितेमधल्या सारखेच होते, ‘‘कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी’’. बरं परत पैश्याच्या बाबतीतही कवितेत शोभणारीच स्थिती, ‘‘खिश्याकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला...वगैरे’’ अर्थात त्यांच्या बाबतीत एकटेपणाला जराही संधी नाही कारण ब.ल. सतत कशात तरी पूर्णपणे गुरफटलेलेच राहिले आहेत. ब.ल.यांना मिळालेला हा एक लाख रुपयांचा ‘ज्ञानश्री’ पुरस्कार पद्मश्री पेक्षाही मोठा आहे असं गुणवंत पाटील म्हणाले ते खरंही आहे. ब.ल.यांना तसे पैशाचे महत्त्व नाही. त्यांनी पोट भरण्यासाठी काय उद्योग केला हे कुणालाही माहित नाही. त्यांचे मराठवाडा विकास आंदोलनातले सहकारी नरहर कुरूंदकरांचे जावाई दीपनाथ पत्की यांनी मला एकदा सांगितलं होतं, ‘‘ब.ल.हा माझा जुना मित्र. त्याची नेहमी अडचण असायची. पण त्यानं मलाच काय पण कुणालाही पैसे मागितल्याचे माहित नाही.’’ माझी आजी तेंव्हा माझ्या वडिलांना गमतीने म्हणायची, ‘‘तूझ्या ब.ल.ला दोन दिवस सर्फ मध्ये बुडवून ठेव. म्हणजे जरा स्वच्छ होईल.’’ ब.ल. हे भणंग कार्यकर्त्यासारखे पायी, मिळेल त्या वाहनाने, कशाचीही पर्वा न करता फिरणार. मग कपड्यांना इस्त्री करायची कुठून? सर्वसामन्य जनतेत कायम रमणार्‍या माणसाने घामाचा वास आणि धुळीचा सहवास टाळायचा कसा?
मराठवाडा विकास आंदोलनात वसमत येथे 1974 रोजी लिपीकाच्या भरतीसाठी प्रचंड मोठी गर्दी जमा झाली होती. त्यात पोलिसांनी गोळीबार केला आणि 2 युवक ठार झाले. तेंव्हा या गर्दीचे नेतृत्व करीत होते ब.ल.तामसकर. त्यांच्या जहाल भाषणाने पोलिसांची डोकी भडकली. खरं तर ब.ल. तेंव्हा सर्वसामान्य बेरोजगार युवकांच्या काळजातील वेदना आपल्या शब्दांत मांडत होते.
‘शरद जोशींच्या शेतकरी संघटनेत आलो आणि मला मोठा कॅनव्हास मिळाला.’ असे मोठे अभिमानाने पुरस्कार स्वीकारताना त्यांनी सांगितले. शेतकरी संघटनेच्या अधिवेशनात उभं राहून भाषण न करू शकणारे शरद जोशी यांनी आज ब.ल.यांच्या पुरस्कार सोहळ्यात मात्र उठून भाषण केलं. त्यात श्रीरंगनाना यांच्याबद्दल जी आदराची भावना होती त्या सोबतच ब.ल.सारख्या सच्च्या कार्यकर्त्याच्या निष्ठेचाही भाग होता.
एरवी मोठी जहाल भाषणं करणार्‍या ब.ल.यांना यावेळेस मात्र बोलता आलं नाही. गहिवर दाटला म्हणजे काय याचं प्रात्यक्षिकच मंचावर दिसत होतं. शरिरात रक्त असेपर्यंत मी चळवळीचा झेंडा खाली ठेवणार नाही अशी घोषणाच त्यांनी केली. खरं तर ब.ल.यांच्याकडे पाहिल्यावर यांच्या शरिरात रक्त असेलच किती असा प्रश्न सहजच मनात येतो. कारण दिसतात ती फक्त हाडं. पण अशा कार्यकर्त्यांमध्ये उर्जा प्रचंड असते.
आज कार्यकर्ता म्हणजे नेत्यासाठी हप्ते वसूल करणारा आणि त्याचे हप्ते दुसर्‍यांना पोचविणारा दलाल असे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर साक्षात आपल्या नेत्याला शरद जोशींना, ‘‘तूम्ही तूमच्या गाडीनं जा. मला यायचे नाही. मी आपला माझ्या पद्धतीनं पायी फिरून प्रचार करतो आहे.’’ असं सुनावणारा ब.ल.तामसकर सारखा कार्यकर्ता ठसठशीतपणे उठून दिसणारच.
श्रीरंगनाना मोरे सारख्या एका निष्ठावान शेतकर्‍याला, वारकर्‍याला असं मनापासून वाटलं की आपण ज्या चळवळीत खस्ता खाल्ल्या, हाल सहन केले, कुठल्याही पदाची अपेक्षा बाळगली नाही त्या चळवळीतील कार्यकर्त्यासाठी कृतज्ञता म्हणून एक पुरस्कार सुरू करावा. ही भावना आजच्या काळात खरंच फार महत्त्वाची आहे.
सामाजिक क्षेत्रात निस्पृहपणे काम करणारे कार्यकर्ते आज मिळणं मुश्किल गोष्ट होवून बसली आहे. आणि समाजातील प्रश्न तर वाढतच आहेत. शेतकरी चळवळीनं भारत वि.इंडिया अशी मांडणी केली होती. इंडिया म्हणजे सगळे शहरी तोंडवळ्याचे नोकरदार लोक भारतातील शेतकर्‍याला लूटत आहेत. आज परिस्थिती अशी आली आहे की भारत तर लूटून कंगाल झाला. आता या नोकरदारांनी इंडियालाही लुटायला सुरवात केली आहे.
मला एका गोष्टीचे कोडे उलगडत नाही. 25 वर्षांपूर्वी कापुस आंदोलनात सुरेगाव (जि.हिंगोली) येथे गोळीबार झाला होता. 3 शेतकरी हुतात्मा झाले. त्यात माझ्या वडिलांना 10 दिवसांचा तुरूगवास परभणीला झाला होता. आज शहरात आलेला मी त्यांचा मुलगा शहरातल्या रस्त्यांसाठी आंदोलन करतो आणि मला हर्सूल तुरूंगात पाठविण्यात येते. काल जी स्थिती भारताची होती ती आज इंडियाची झाली आहे. अशा काळात ब.ल.सारखे कार्यकर्ते हवे आहेत. छोटं मोठं आंदोलन केलं की सगळ्यांना वाटतं, ‘‘कशासाठी केलं? आता निवडणुकीला उभं राहणार का? याला यातून काय भेटणार?’’ आणि वर्षानुवर्षे आंदोलन करणारे, तुरूंगात जाणारे, लाठ्या काठ्या खाणारे ब.ल.सारखे लोक पायी भणंग फिरत आहेत. त्यांच्याकडे पाहिलं की आपली आपल्यालाच लाज वाटते.

Sunday, December 22, 2013

पाडगांवकरांनी फेडली महाभारताची वस्त्रे !

रविवार दि. २२ डिसेंबर  दै. म.टा. "संवाद" पुरवणी मधील लेख… 

राजहंस प्रकाशनाने त्यांच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त (60 वर्षे पूर्ण) महत्वाकांक्षी योजना म्हणून कथारूप महाभारताचे  दोन खंड प्रकाशीत केले आहेत. या कथारूप महाभारताची जाहिरात ‘‘पाडगांवकरांचे महाभारत’’ अशी ठळक स्वरूपात करण्यात आली. ज्या मुळ पुस्तकावरून हे महाभारत पाडगांवकरांनी बेतले आहे त्या कमला सुब्रह्मण्यम यांचे नाव बारीक अक्षरात टाकण्यात आले आहे. स्वाभाविकच राजहंसला या कथेतले पाडगांवकरांचे मोठे योगदान अधोरेखित करावयाचे असावे. 

या महाभारताच्या पहिल्याच पानावर ‘‘तिच्या मनातली लज्जा व्यक्त करणारे तिचे हात राजाने आपल्या हातात घेतले...’’ हे वाक्य वाचताच मी अडखळलो. कमला सुब्रह्मण याचे मूळ पुस्तक मिळवले. आणि लक्षात आले की पाडगांवकरांनी अक्षरश: शब्दश: भाषांतर केले आहे. शाळकरी मुलांनी इंग्रजी उतार्‍याचे ओळींवरून मराठी भाषांतर करावे असा हा प्रकार आहे. 

बरं हे भाषांतरही बर्‍याच ठिकाणी मुळ शब्दांना सोडून गेले आहे. ‘reluctant  चे भाषांतर लज्जा व्यक्त करणारे हात असं होईल की ‘आढेवेढे घेणार्‍या तिचे हात’ असे होईल?

गंगा अदृश्य झाल्यावर शंतनू राजाची मनस्थिती व्यक्त करताना पाडगांवकर लिहीतात, ‘ वेदनेने भरलेले क्षण अनेक घटका मनाने पुन्हा जगत राहिला राजा शंतनू : गंगेच्या सहवासातले अखेरचे काही क्षण !’ आता ही वाक्यरचना काय आहे? अशा पद्धतीने मराठी भाषेत वाक्यरचना संभवते का? 

आदिपर्वात ‘भीष्मप्रतिज्ञा’ नावाचे छोटे प्रकरण आहे. शीर्षकात प्रतिज्ञा हा शब्द वापरणारे पाडगांवकर संपूर्ण प्रकरणात मात्र ‘शपथ’ वापरतात. आता शपथ आणि प्रतिज्ञा यातला फरक पाडगांवकरांना कळत नाही का? ही प्रतिज्ञा तर हास्यास्पदच करून टाकली आहे. ‘‘ स्वर्ग  आणि पृथ्वी यांची, माझे गुरू भगवान भार्गवांची, माझी माता गंगा हीची, धर्माची शपथ घेऊन मी सांगतो की, मी लग्न करणार नाही!’’ 

आता मुळ पुस्तकात जो उतारा आहे त्यानुसार ‘‘स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ यातील सर्वांच्या साक्षीने, माता गंगा, े गुरू भार्गव व धर्माला स्मरून मी प्रतिज्ञा करतो की...’’ असे भाषांतर व्हायला हवे होते. पुढे सभापर्वात द्रौपदीवस्त्रहरण प्रसंगी.. ‘अर्जूनाने भीतीदायक शपथ घेतली. तो म्हणाला, मी गंभीरपणे प्रतिज्ञा करतो की....’ असा शपथ व प्रतिज्ञेचा घोळ पाडगांवकरांनी घातला आहे.  यातच पुढे अंबेची ‘शोकात्मिका’ असा शब्द आला आहे. पाडगांवकरांना शोकांतिका म्हणायचे  आहे का? पाडगांवकरांच्या समोर कोण गणपती बसला होता कोणास ठाऊक कारण त्यानं काहीही शंका न विचारता सारं निमूटपणे लिहून घेतलं आहे असं दिसतं आहे. 

बरं हे भाषांतर शब्दश: करता करता काही परिच्छेद पाडगांवकर कदाचित वृद्धापकाळामुळे असेल सहज विसरून जातात. सत्यवती भीष्माला लग्न करण्याचा आग्रह धरते या प्रसंगात भीष्माला  भूतकाळ आठवतो असे जे वर्णन आहे ते पाडगांवकर गाळून टाकतात. सुरवात एका परिच्छेदाची आणि बघता बघता दूसर्‍या परिच्छेदातील काही वाक्य जोडून ते शेवट करतात. (इंग्रजी महाभारत पृ. 18-19) 

लहान पाच पांडव हाती घेवून कुंती हस्तीनापूरला परत येते. कौरवांसोबत आता पांडव खेळायला लागतात या प्रसंगाचे वर्णन करताना दुर्योधनाच्या मनस्थितीचे वर्णन करणारा सुंदर परिच्छेद असाच पाडगांवकरांनी केवळ दुर्लक्षामुळे गाळला आहे (इंग्रजी महाभारत पृ. 36). या गाळा गाळीचा कहर ‘लाक्षागृह’ प्रकरणात झाला आहे. वारणावत नगरातील गोर- गरिबांसाठी कुंती अन्नदानाचा संकल्प करते. त्यासाठी लोक गोळा होतात. त्यात एक निषाद स्त्री आपल्या पाच पुत्रांसह येते. तिला भरपूर खाऊ पिऊ घालण्यात येते. ते सगळे तिथेच झोपी जातात. मग रात्री पांडव या घराला आपणच आग लावतात. आता अन्नदानाचा प्रसंग मूळ पुस्तकात आहे. पांडगांवकर मात्र तो गाळून पुढे जातात. बरं पुढे युद्धिष्ठिराच्या बोलण्यात हे मागचे संदर्भ येतात आणि तेही पाडगांवकर तसेच ठेवतात. (इं.म. पृ. 70)

गुरू द्रोणाचार्यांबद्दल सांगताना, ‘...द्रोण यांचे गुरू भार्गव. भार्गव हे महान ऋषी भारद्वाज यांचे पुत्र.’’ आणि लगेच पुढच्यात प्रकरणाच्या पहिल्याच परिच्छेदात, ‘ द्रोण भार्गवांना म्हणाले, माझे नाव द्रोण, मी भारद्वाजांचा पुत्र.’’ आता पाडगांवकर चुकले का राजहंस च्या संपादक मंडळाला डुलकी लागली?

या महाभारतात धनुष्याला ‘दोरी’ असते. ‘प्रत्यंचा’ हा जो शब्द मराठीत त्यासाठी खास करून वापरला जातो याची कल्पना कदाचित पाडगांवकर आणि संपादक मंडळाला नसावी. पुढे जरासंध प्रकरणात चंडकौशिक ऋषींचा उल्लेख चंद्रकौशिक असा आहे. आता चंड म्हणजे सूर्य. चंड आणि चंद्र सारखे कसे होतील? 

द्रौपदीस्वयंवराच्या प्रसंगी जे धनुष्य वापरले त्याचे नाव ‘किंधूर’. त्याची दोरी पोलादाची होती असं लिहीलं आहे. आता पोलादाचा शोध कधीचा? बरं याच स्वयंवरात कर्ण पाच बाण मारतो पण केसाच्या अंतराने त्याचे पाचही नेम हुकतात असं लिहीलं आहे. मुक्तेश्वरांनी आपल्या महाभारतात कर्णाची फजिती झाली असंच लिहीलं आहे. याचा समाचार घेताना डॉ. ना.गो.नांदापुरकर यांनी आक्षेप घेत असं नोंदवले आहे की ‘‘कर्ण पण जिंकू शकेल अशी खात्री होती, त्याने धनुष्याला बाण लावला आणि तो बाण मारणात तितक्यात द्रौपदी म्हणते, नाऽहं वरयामि सूतम् (मुळ महाभारत 1/187/23). जर मुक्तेश्वर म्हणतात तसे असते तर द्रौपदीच्या वाक्याला काही अर्थच राहत नाही. आणि मग पुढचे सगळे नाट्यच संभवत नाही.’’ हा जो आक्षेप 70 वर्षांपूर्वी मुक्तेश्वरांवर नांदापुरकरांनी घेतला तो तसाच आज पाडगांवकरांवर घ्यायचा का? 
पुढे मयसभेच्या प्रसंगात, ‘आंधळ्या राजाचे पुत्रही अंध’ असे वाक्य द्रौपदीच्या तोंडी प्रसिद्ध आहे ते पाडगांवकरांनी घेतले नाही. बरं पाडगांवकर दंतकथा टाळत आहेत असं म्हणावं तर तसंही नाही. द्रौपदी वस्त्राहरणाच्या वेळेस मात्र कृष्ण वस्त्र पुरवल्याची दंतकथा घेतली आहे. पितामह भीष्म रणांगणात असेपर्यंत मी शस्त्र हाती घेणार नाही ही कर्णाची प्रतिज्ञा पाडगांवकरांनी गाळली आहे. म्हणजे काही एक धोरण पाडगांवकर अवलंबितात असेही नाही. काही घेतलं आणि काही गाळलं असंच हे प्रकरण आहे.

मयसभा प्रकरणांत मयासुर संपत्ती आणण्यासाठी कैलास पर्वताजवळील मैनाक पर्वताच्या हिरण्यश्रृंग पर्वतशिखराकडे जातो. तिथे त्याने संपत्ती पुरून ठेवली होती असा उल्लेख महाभारतात आहे. पाडगांवकरांचा मयासुर पर्वतशिखराच्या कपारीत संपत्ती पुरून न ठेवता सरोवरात पुरून ठेवतो. आता सोने नाणे रत्ने एकवेळ सरोवरात पुरता येतील पण बांधकामाचे साहित्य रंग हे सरोवरात कसे पुरणार?

या चुका मुळ कमला सुब्रह्मण्यम यांच्या महाभारतातही आहेत. दुर्योधनाच्या मन:स्थितीचे वर्णन करताना त्यांना अचानक शेक्सपिअरच्या वाङ्मयातले उतारे आठवतात. (इं.म. पृ.155) नशिब पाडगांवकरांनी त्याचेही भाषांतर करून या पुस्तकात दिले नाही.

जसंच्या तसं भाषांतर करण्याच्या नादात मराठीतील वाक्यरचना वेगळी असते हेही विसरल्या गेलं आहे.  Let them wait. Let them just wait ’ याचे भाषांतर ‘त्यांना थांबू द्या. त्यांना फक्त थांबू द्या.’ असं कसं होईल? (पृ.285)
‘खरखरीत सालीचे कपडे’ असं वर्णन करण्याऐवजी वल्कले असा शब्द वापरता आला असता नं! बरं परत ‘आपल्या  वस्त्राच्या खरखरीत कापडाने त्याने तिचे नाजूक डोळे पुसले’ असंही लिहीलं आहे. पुढे कर्णाला सूर्य भेटून इंद्राचा कट सांगतो आणि ‘तूझ्या शरिराची राख झाल्यावर तूझी ही राख उरेल’ असं म्हणतो. ही शब्दरचना कशासाठी? ‘सुगंधाची झुळूक’ का ‘सुगंधी झुळूक’? ‘तो वेगवेगळ्या राजांशी युद्ध करून त्यांना जिंकण्याच्या दौर्‍यावर गेला होता’(पृ.408). विराटपर्वात- ‘तो आपल्या बहिणीच्या राजवाड्यात गेला’ आता राजा आणि राणी यांचा राजवाडा वेगळा असतो का? इथे बहिणीच्या महालात गेला असं तरी हवं. ‘आपले हात घट्ट हातात घेतले गेले आहेत हे कीचकाला कळले’(पृ.420), ‘वासनांधतेमुळे त्याला दुबळीक आली होती’ (पृ. 421),  ‘त्यांची घबराट सुरूवात झाली आहे’ (पृ. 541). ‘युद्धिष्ठीर आपल्या सिंहासनावरून राज्य करीत होता’. (पृ. 481) मग कुठून राज्य करणार? ‘तू तूझ्या मातेच्या हृदयाला दु:ख करू नकोस’ (पृ. 568). मग काय मातेच्या फुफ्फुसाला दु:ख होत असतं? उद्योगपर्वात पांडवांच्या भेटीसाठी शल्य जातो. पांडवांचा मुक्काम उपप्लाव्य नगरीत असतो. आता ‘शल्य उपप्लाव्याकडे’ गेला असा शब्दप्रयोग कसा करता येईल? शल्य उपप्लाव्य नगरीकडे गेला असा करावा लागेल ना. ‘..माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझं माझ्यावर प्रेम आहे हे तू सांगितल्याबद्दल मी तुझा आभारी आहे.’ (पृ. 603), ‘माझं हृदय आज युद्धिष्ठीराकडे जाऊन भाऊ म्हणून त्यचा स्वीकार करायला ओढ घेतं आहे.’ (पृ.604) अशा कैक विचित्र वाक्यरचना या पुस्तकात विखुरल्या आहेत. 

उद्योगपर्वात पुढे संजय पांडवांच्या भेटीसाठी जातो. त्याला युद्धिष्ठीर म्हणतो, ‘दुर्योधन आणि त्याचे मित्र आमची जशी आठवण त्यांनी केली पाहिजे तशी करताहेत, अशी मला आशा आहे.’ (पृ.505) आता ही वाक्यरचना मराठीत कशी शोभून दिसणार?  मग ही अशी वाक्यरचना आलीच कशी? कारण मुळ इंग्रजीत, ‘ I only hope Duryodhana and his friends remember us as we ought to be remembered’ लिहीलेलं आहे म्हणून. याच उद्योगपर्वात दुर्योधन म्हणतो, ‘भीम म्हणजे गाय आहे.’ मुळ पुस्तकात ‘cow’ हा शब्द अवतरणात दिला आहे. याचा अर्थ स्वच्छ आहे की गायीसारखा भित्रा किंवा अत्यंत भयभीत झालेला. 
व्याकरणाची तर पार एैशी तैशी केली आहे. वनवसात युद्धिष्ठिर द्रौपदीला म्हणतो आहे, ‘संयम हा स्वच्छंदी स्त्री सारखा आहे. आपलं राहण्याचं ठिकाण म्हणून ती काही माणसांची निवड करते. तिची तूझ्यावर मर्जी नाही.’ आता यात संयम हा  पुल्लिंगी का स्त्रीलिंगी? संयम ही स्त्री निवड करते म्हणावे तर इतकी गुंतागुंतीची वाक्यरचना कशाला? याच प्रसंगात भीम युद्धिष्ठीराला आदारार्थी  संबोधून सुरवात करतो आणि बोलता बोलता मग एकेरी संबोधू लागतो. कृष्ण शिष्टाईसाठी हस्तीनापुरात आला असता विदूराला भेटतो तेंव्हा - 

‘आनंदाश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्यांनी कृष्णाचे स्वागत केले. कुंतीचे पुत्र कसे काय आहेत याची त्याने कृष्णाकडे चौकशी केली.’ (पृ. 557) पहिल्या वाक्यात ‘त्यांनी’ आणि दुसर्‍या वाक्यात ‘त्याने’.  पांडवांचा निरोप धृतराष्ट्राला देण्याचे जेंव्हा युद्धिष्टीर सांगतो तेंव्हा संजय म्हणतो, ‘आमच्या राजाचं विचारांचं मी केवळ वाहन आहे.’ (पृ. 516) म्हणजे संजय हा राजाचंपण वाहन आहे का? राजाच्या विचारांचे मी वाहन आहे असे वाक्य हवे होते.  

वनवासात द्रौपदीला सुगंधी फुलांचा मोह होतो व भीम तीच्यासाठी ती फुलं तोडून आणतो. ही फुलं म्हणजे ‘सौगंधी’ नावाचे कमळ. तसा उल्लेख मुळ महाभारतात आहे. पण इंग्रजी पुस्तकात नदीच्या पाण्यावरची फुलं असं लिहीलं आहे. आता नदिच्या पाण्यावर कुठलेच फुल येत नाही. मग भाषांतर करताना पाडगांवकरांनी नदीच्या काठावरची फुलं अशी तडजोड केली आहे. खरं तर ही सरोवरातील कमळं आहेत. 
विराटपर्वात राजपुत्र उत्तर याला अर्जून लढण्यास तयार करतो. तो त्याला आपण अर्जून असल्याचे सांगतो. लपवून ठेवलेली शस्त्रे दाखवतो. या शस्त्रांवर पांडवांच्या नावाची ‘अद्याक्षरे’ कोरली आहेत असं पाडगांवकर लिहीतात. म्हणजे अर्जूृनाच्या धनुष्यावर ‘A P ’ अर्जून पंडूराव पांडव असं लिहीलं असेल का? इंग्रजी पुस्तकांत monogram हा शब्द आहे. याचे भाषांतर अद्याक्षरं होईल का बोधचिन्ह होईल? 

याच विराटपर्वात आणि इतरत्रही दिवाणखाना, जनानखाना, कत्तल, बुरखा, मशहुर, सन्नाटा असे शब्द आलेले आहेत. हे शब्द महाभारत लिहीताना चालतिल का?  ‘शाब्बास ! उत्तम !! हे शब्द पांडवांच्या तंबूत घुमले.’ (पृ. 551) आता युद्धच सुरू झाले नाही तर मग तंबू कुठून आला?

कृष्ण शिष्टाईसाठी हस्तीनापुरला जातो तेंव्हा ‘विदूरा घरचं अन्नच मी खाईन’ (पृ. 560) असं म्हणतो. आता इथे ‘विदूराच्याच घरचं अन्न’ असं तरी हवं किंवा ‘विदूराने दिलेले अन्नच’ असं तरी हवं. 

या पुस्तकात फक्त वाक्यरचनेच्याच चुका आहेत असं नाही तर मजकुराच्याही मोठ्या चुका आहेत. मुळ 18 पर्वाचे महाभारत कमला सुब्रह्मण्यम यांनी 10 पर्वात बसवलं आहे असं संपादकियात सदानंद बोरसे हे लिहीतात. आता उर्वरीत जी 9 पर्व आहेत ती सर्व उपसंहारात गुंडाळली आहेत. त्यांच्या नावांचे उल्लेख तरी करायचे. ही गाळलेली नावे अशी- सौप्तिक पर्व, स्त्रीपर्व, शांतीपर्व, अनुशासन पर्व, आश्वमेधिक पर्व, आश्रमवासिक पर्व, मौसल पर्व, महाप्रस्थानिक पर्व, स्वर्गारोहण पर्व. 

शांतीपर्वास महाभारताचे सार मानले गेले आहे. मग या पर्वावर स्वतंत्र प्रकरण का लिहावे वाटले नाही? महाभारत म्हणजे फक्त युद्ध नसून प्रचंड मोठी अशी तत्त्वचर्चा त्यात केलेली आहे. जशी गीता महाभारताचा भाग आहे तसंच भीष्मानी मृत्यूपूर्वी म्हटलेले विष्णुसहस्रनामही आहे. युद्धाची वर्णनं तर अतिशय साचेबद्ध पद्धतीनं केलेली आहेत. प्रत्येकजणच शुरपणे लढतो आणि प्रत्येकजणच दुसर्‍याच्या धनुष्याचे दोन तुकडे करतो. 

युद्ध संपल्यानंतरच्या शेवटच्या रात्री अश्वत्थामा पांडवांच्या शिबीरात शिरतो. धृष्ट्यदुम्नाला लाथ मारून उठवतो. त्याचा गळा दाबून प्राण घेतो. त्याच्या शवाला लाथ मारून पुढे जाते. असे वर्णन आहे. या पुस्तकातला अश्वत्थामा, ‘अश्वत्थाम्याने धनुष्याची दोरी धृष्टद्युम्नाच्या गळ्यातभोवती आवळून त्याचा जीव घेतला. त्याचा जीव जाईपर्यंत तो त्याच्यावर लाथांचा प्रहार करीत होता.’ (पृ. 982) आता गळा दाबताना लाथा कशा मारायच्या? जीव गळा दाबल्याने जाणार आहे का लाथा मारल्याने? 

वाक्यरचनेच्या ज्या चुका आहेत त्या मुळात पाडगांवकरांच्याच आहेत कारण त्यांनी केलेली इतर भाषांतरेही अशीच दोषास्पद आहेत. ज्यूलिअस सीझर मधील या ओळी पहा, ‘खरंच ब्रूटस, थोर आहेस तू, तरी मला वाटतं, जरी उंची धातूची तुझी थोरवी असली तरी तिला ज्याची संगत त्या हीणकस धातूचा आकार देता येईल.’ (ज्यूलिअस सिझर, पृ. 107, मौज प्रकाशन गृह). पाडगांवकरांचा कबीराचा अनुवादही असाच फसला आहे. बायबलचे त्यांनी केलेले भाषांतर तर इतके रूक्ष आहे की वाचवत नाही. त्याऐवजी फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांनी राजहंस साठीच केलेले बायबल वाचावे. ते अतिशय रसाळ व चांगले उतरले आहे. कदाचित राजहंस च्या संपादकांची ‘नजर’ त्यावरून फिरली नसावी म्हणून ते चांगले उतरले. 
पाडगांवकरांनी मनोगतात असे लिहीले आहे की कॉलेजमध्ये असतांना त्यांना महाभारतकार व्यास आणि नाटककार शेक्सपिअर ने अक्षरश: भारून टाकले होते. त्यांनी त्याच वयात हे भाषांतर केले असते तर निदान ते प्रामाणिकपणे तरी उतरले असते.

मराठीत अनुवाद/भाषांतराची अतिशय चांगली पुस्तके आहेत. राम पटवर्धन (मार्जोरी रोलिंग्ज- पाडस), जी.ए.कुलकर्णी (कॉनराड रिश्टर-रान,गाव,शिवार), उमा वि.कुलकर्णी (भैरप्पांची पुस्तके), भारती पांडे (काळी-पर्ल बक) ही चांगल्या अनुवादाची काही सहज आठवली ती नावे. मग पाडगांवकरांनी असा खडबडीत अनुवाद का केला असावा?
महाभारतावरची तर कितीतरी पुस्तके मराठीत आहेत. मुक्तमयुरांची भारते-डॉ.ना.गो.नांदापुकर, व्यासपर्व-दुर्गा भागवत, युगांत-इरावती कर्वे, व्यासांचे शिल्प-नरहर कुरूंदकर, महाभारताचे वास्तव दर्शन-अनंत महाराज आठवले, महाभारत : संघर्ष आणि समन्वय- रवींद्र गोडबोले,  धर्मक्षेत्रे कुरूक्षेत्रे- विश्वास दांडेकर ही काही ठळक नावे. शिवाय रा.शं.वाळिंबे यांनी सिद्ध केलेले महाभारताचे 11 खंड, प्राचार्य द.गो. दसनूरकर यांचे दहा खंडाचे ‘आपले महाभारत’ ही संपूर्ण महाभारताची कथा सांगणारे बृहत ग्रंथही आहेत. या सगळ्यांचा आधार घेवून पाडगांवकरांना एक महाभारत लिहीता आले असते.    

पण तसे न घडता या पुस्तकाच्या निर्मितीकडे ‘मोठ्या माणसांची गद्य अमर चित्रकथा’ या दृष्टीने पाहण्यात आले आहे असे जाणवते. पुस्तकाचे मुखपृष्ठ रवी परांजपे यांनी अतिशय बाळबोध केले आहे. महाभारत म्हणजे सिंहासन, धनुष्य बाण, सारीपाट-सोंगट्या, पडदे त्यांना संगीत नाटकासारखे गोंडे, मोडलेला रथ, बाणांचा भाता, ज्वाळा, ढाल इतकी ढोबळ संकल्पना सामान्य रसिकांची असावी असा समज रवी परांजपे यांचा दिसतो आहे. शिवाय महाभारताचे सिंहासन गुलाबी, निळ्या रंगात रंगवून महाभारताचा संघर्ष फारच ‘रोमँटिक’ होता असे वाटते. आतली चित्रेही याला पुरक आहेत. 
महाभारतावर अतिशय चांगली पुस्तके मराठीत होती आणि आताही येत आहेत. नुकतेच देशमुख आणि कंपनीने रवींद्र गोडबोले यांचे ‘महाभारत- संघर्ष आणि समन्वय’ हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. अतिशय चिकित्सकपणे त्यांनी महाभारताचा अभ्यास यात मांडला आहे. द्युत म्हणजे काय? ते कसे खेळले जाते? याची वेगळी माहीती यात दिली आहे. बेहड्याच्या टणक बियांच्या सहाय्याने हा द्युत खेळल्या जातो. याचे एक अतिशय मोलाचे विश्लेषण रवी गोडबोले देतात. हे सगळं कदाचित पाडगांवकरांच्या गावीही नाही. त्यांच्याच काय पण चित्रकार रवी परांजपेंच्याही गावी नाही. मग सापशिडी, किंवा ल्युडो खेळताना ज्या सोंगट्या वापरतात तसा काहीसे ठोकळेबाज चित्र या महाभारताच्या मुखपृष्ठावर रंगवले गेले आहे.

अतिशय पोरकटपणे हे महाभारताचे प्रकरण पाडगांवकरांनी हाताळले आहे. आणि पाडगांवकरांचा शब्द म्हणजे देवाचा शब्द असे प्रमाण मानून संपादकांनी त्यावरून नुसतीच नजर फिरवली आहे असे दिसते. 

असले पोरकट महाभारत जे की पोरांनाही समाधान देवू शकत नाही प्रकाशीत करून राजहंस ने आपल्या हिरक महोत्सवात आणि पाडगांवकरांनी आपल्या सहस्रचंद्रदर्शन वयात काय मिळवले तेच जाणो.

(कथारूप महाभारत, राजहंस प्रकाशन, मुळ इंग्रजी- कमला सुब्रह्मण्यम, अनुवाद -मंगेश पाडगांवकर, पृष्ठे 1080, मुल्य 600.)

Tuesday, December 17, 2013

कुठे ‘शशांका’चे स्वरचांदणे, कुठे बाजारू गर्दीची पैंजणे

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 17 डिसेंबर 2013

औरंगाबाद शहरात एकाच आठवड्यातील शास्त्रीय संगीताच्या दोन मैफलींमधला हा प्रसंग. पहिली मैफिल होती स.भु.शिक्षण संस्थेने भरविलेल्या गोविंदभाई श्रॉफ स्मृति संगीत समारोहातील. चाळीशीतला प्रौढ तरूण गायक मंचावर आला. त्यानं आपली बैठक जमविली. पहिल्या आलापीतच राग मालकंस गाणार असल्याचे लक्षात आले. ग्वाल्हेर घराण्याची दमदार खानदानी गायकी सिद्ध करत अतिशय तयारीने त्याने आपलं गाणं सादर केलं. बघता बघता समोरच्या मोजक्याच दर्दी श्रोत्यांवर त्याची जादू पसरली. नेमक्या जागी लोकांनी दाद दिली तसं तसं त्याचं गाणं फुलत गेलं. त्या गायकाचं नाव शशांक मक्तेदार. संगीतात डॉक्टरेट मिळविणारा हा प्रतिभावंत गायक आता गोव्यात संगीताचा प्राध्यापक आहे. पंचेविस वर्षांपूर्वी याच स.भु.च्या परिसरात या गायकाचा कोवळा सुर उमटला होता.  मी तेंव्हा त्याच महाविद्यालयात विद्यार्थी होतो. विज्ञानाची प्रात्यक्षिक परिक्षा आटोपून पायर्‍या उतरत असताना शशांकच्या तोडीचे सूर कानावर पडले. त्या सुरांकडे मी ओढला गेलो. जालान सभागृहात शशांक गात होता. त्याची निवड तेंव्हा केंद्रिय युवक महोत्सवात झाली होती. तेंव्हा तो 18 वर्षांचा एक महाविद्यालयीन तरूण होता. पुढे  त्याला अतिशय मानाची आय.टी.सी.ची शिष्यवृत्ती मिळवून भारतात पहिला आला. कलकत्त्याला पं.उल्हास कशाळकरांकडे गाणं शिकला.आज त्याचा प्रौढ सुंदर आवाज कौतूकाच्या पलिकडे जावून प्रस्थापितांच्या रांगेत बसला आहे. ज्या मातीत त्याची पावलं रांगली त्याच मातीत तयारीचा गायक बनून त्यानं मैफल रंगवली. गाणं भरात असताना चंद्रकोर लिंबाआडून  काव्यात्म वाटावी अशी दिसत होती. ठरवूनही अशी स्थिती निर्माण करता येणार नाही.
या मैफलीला श्रोते मोजकेच होते. गाणं संपल्यावर गायकाला भेटणे तसे फारसे अवघड नव्हते. लोकंही आपल्या परिसरात मोठा झालेल्या या प्रतिभावान गायकाला कौतुकाने भेटत होते. असा तो सगळा जिव्हाळ्याचा प्रसंग. बरं या गायकानेही आपली सांगितिक जबाबदारी ओळखून कवी जयदेवाची अष्टपदी बहार रागातून मांडण्याची अवघड किमयाही करून दाखविली. अतिशय स्वच्छ व स्पष्ट उच्चार आणि गाण्याबाबत पूर्ण गांभिर्य दिसून येत होतं. म्हणजेच आपलाच बाळ्या म्हणून त्याचं कौतुक करावं असंही त्यानं काही शिल्लक ठेवलं नाही. एखाद्या मोठ्या तयारीच्या गायकासारखं गावून आपली पात्रता सिद्ध केली होती.   
दुसरा प्रसंग त्या मानाने फारच मोठा प्रचंड म्हणावा असाच. पद्मविभुषण पं. शिवकुमार शर्मा व पद्मभुषण उ. झाकीर हुसेन यांची मैफल प्रोझोन मॉलच्या हिरवळीवर आयोजित केली होती. मैफिलीला प्रचंड गर्दी झालेली. खुर्च्याही संपल्या. कार्यक्रमाला प्रायोजकांचीही गर्दी. भरपूर पैसे खर्च करून आयोजित केलेला कार्यक्रम. आधी तर घंटाभर कार्यक्रम सुरूच झाला नाही. मग सुरू झाल्यावर बराचवेळ शिवकुमार शर्मा यांनी संतुर जुळवण्यात घातले. त्यांनी मारूबिहाग राग वाजवायला सुरवात केली. त्यातले बारकावे इतक्या मोठ्या समुहात समजुन घेणे अवघडच जात होतं. शिवाय गर्दीमुळे प्रत्यक्ष मंचावरचे काही दिसतच नव्हते. बाजूला लावलेल्या पडद्यांवर पाहूनच समाधान मानून घ्यायची वेळ श्रोत्यांवर आली. बरं जे लब्ध प्रतिष्ठित मोठ मोठे लोक समोर बसले होते त्यांना गाण्यातले काही कळतं होतं का? हा प्रश्नच होता. त्यामुळे नेमक्या जागी दाद मिळत नव्हती.
कुठलाही नविन प्रयोग न करता, कुठलीही नविन रचना सादर न करता शिवकुमार शर्मा आणि झाकिर हुसेन यांनी कार्यक्रम संपवला. मधल्या काळात आम्ही ‘लिजेंडस’ च्या कार्यक्रमाला गेलो होतो, त्यांना प्रत्यक्ष पाहिलं असं सांगू पाहणारी नटवी गर्दी ओसरली होती. लोक मध्येच उठून गेले होते. शिल्लक असलेले बरेच जण हाता पॉपकॉर्न, कॉफी, आईसक्रीम सोबत संगीतही पचवून टाकू पहात होते.
कार्यक्रम संपल्यावर माझ्या मुलाला कलाकारांची सही घ्यायची होती म्हणून मी धावतपळत त्याला घेवून मंचाच्या पाठीमागे गेलो. तिथेही प्रचंड मोठी झुंबड. शिवकुमार शर्मा सोबत लोकांचा मोठा जत्था आला आणि ते बघता बघता गाडीत बसून निघूनही गेले. दोन्ही कलाकार गेले असतील या समजात लोक थोडे पांगले. पण उस्ताद झाकिर हुसेन मागेच होते. या संधीचा फायदा घेवून मी त्यांना गाठलं. मुलाला पुढे केले. त्यांनी त्याच्याशी दोन शब्द बोलून त्याच्या वहीवर काहीतरी रेघोट्या मारल्या. मी त्यांना 30 वर्षांपूर्वी परभणीला मी याच वयात तूमची स्वाक्षरी घेतली होती. आता मुलगा घेतो आहे हे सांगताच ते जरा थबकले. माझ्याकडे पहात हसत ‘क्या बात है’ असं म्हणत ते निघूनही गेले.
30 वर्षांपूर्वी उस्ताद झाकीर हुसेन पं. हरिप्रसाद चौरसिया यांचेसोबत परभणीला आले होते. ज्या नुतन संस्थेत त्यांचा कार्यक्रम झाला त्याच्या जवळपास चहाची काहीच सोय नव्हती. मग जवळ असलेल्या माझ्या आजीच्या घरी त्यांना संयोजक असलेले माझे वडिल व त्यांचे मित्र ऍड. वसंतराव पाटील घेवून आले. सगळ्यांशी बोलत हसत खेळत त्यांनी चहा बिस्कीटं घेतली. मला माझे नाव लिहून शुभेच्छा देत सही दिली. त्या छोट्याशा कृतीने मी आवर्जून शास्त्रीय संगीत ऐकायला लागलो. गळ्यात नाही पण कानात मात्र गाणं पुरतं घुसून बसलं.
आजच्या या बाजारू वातावरणात माझ्या मुलाच्या वाट्याला ही कृती आली नाही. त्याला कलाकाराला धड भेटताही आलं नाही. व्यावसायिकतेच्या नावाखाली आम्ही मैफलिंचा इव्हेंट केला. गावभर कार्यक्रमाचे मोठ मोठे होर्डिंग लावले. प्रत्यक्षात कार्यक्रमातून संगीत रसिकांच्या हाती फारसे काही पडले नाही.
याच्या नेमके उलट स.भु.संस्थेच्या कार्यक्रमात काहीतरी फार सुंदर आणि महत्त्वाचे आपण ऐकत आहोत ही भावना श्रोत्यांची झाली. इतकंच काय दोनच वर्षांपूर्वी याच स.भु.शिक्षण संस्थेने उ. राशिद खान यांची मैफल आयोजित केली होती. विजय घाटे सारखा अव्वल दर्जाचा तबलेवाला त्यांच्या साथीला होता. ते गाणं आजही श्रोत्यांच्या कानात ताजं आहे.
मोठे कलाकार बोलवायचे तर त्यांना प्रचंड मोठी बिदागी द्यावी लागते. मग कार्यक्रम वाढत जातो. त्याला व्यवसायिक टेकू द्यावा लागतो आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे संगीताची हत्या होते.
भारतीय संगीत ही प्रचंड मोठ्या समुहात फुलणारी कला नाही. ती छोट्या समुहात बहरणारी कला आहे. त्यासाठी श्रोत्यांचीही थोडी तयारी असावी लागते. हे संगीत ठराविक पद्धतीचे नोटेशन्स लिहून तयार झालेलं संगीत नाही. प्रत्येक मैफलीत ठराविक चौकटीत हे गाणं नव्यानं फुलत असतं. आज गायलेला वाजवलेला राग उद्या नसतो. आणि ते शक्यही नाही. आणि म्हणूनच हे संगीत नित्य नुतन राहिलेलं आहे. प्रचंड मोठ्या समुहात तयार असलेलं संगीत जशाला तसं सादर करता येऊ शकतं. त्यात फार काही प्रयोग किंवा बदल संभवत नाहीत. शिवकुमार शर्मा यांनी राग मारु बिहाग किंवा नंतरचा मिश्र कौसी रागातील दादरा यांचीच निवड केली. यातून त्यांच्यासारख्या प्रचंड ताकदीच्या कलाकाराचीही अडचण सिद्ध होते. खरं तर त्यांच्या ‘‘म्युझिक ऑफ द माउंटन’’ या गाजलेल्या अल्बम मधील एक रचना आपल्या अभंगासारखी आहे. ‘जावू देवाचीया गावा । घेवू तेथेची विसावा ॥ हा तुकारामांचा गाजलेला अभंग. त्यांनी हा वाजवला असता तर श्रोत्यांना एक वेगळा आनंद मिळाला असता. पण हे सांगणार कोण? आणि हे त्या प्रचंड जनसमुहात शक्यही नाही.
कुसुमाग्रजांची विशाखा मधली एक सुंदर कविता आहे
नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परी स्मरते आणिक करते व्याकुळ केंव्हा
त्या माजघरातील मंद दिव्याची वात
वार्‍यावर येथील रातराणीही धुंद
टाकता उसासे चरणचाल हो मंद
परी स्मरतो आणि करीतो व्याकुळ केंव्हा
तो परसामधला एकच तो निशिगंध

(‘विशाखा’, प्रकाशक कॉन्टिनेंटल पुणे.- अशोक शहाणे नोंद घ्या. मी प्रकाशकाचे नाव दिले आहे.)
प्रोझोन मॉलधमील नवलाख तळपणार्‍या दिव्यात झगमगाटातले संगीत काही मनाला भावले नाही. स.भु.च्या माजघरातील शशांक मक्तेदारचा दिव्यासारखा तेजाळणारा मालकंस मात्र मनात रूतून बसला आहे.
 
            श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575.

Tuesday, December 10, 2013

आजचा ‘ज्ञानोबा’ | बांधतो गोदाम । मिळावया दाम | शेतमाला ॥

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 10 डिसेंबर 2013

कालच्या ज्ञानोबांनी जनतेस भक्तिमार्गाला लावले. ज्ञानेश्वरी, अमृतानुभाव, चांगदेव पासष्टी लिहीली. भिंत चालवली. रेड्यामुखी वेद वदवले. इ.इ. हे काही कुणाला सांगायची गरज नाही. ज्ञानेश्वरांचे गाव पैठणजवळचे आपेगांव. त्यांना आपल्या आजूबाजूला जे शेतकरी आहेत त्यांची दयनिय अवस्था दिसत होती. त्यांनी त्यांच्या परिभाषेत शेतकर्‍याचे दु:ख मांडले.
रात्रं दिवस वहातसे चिंता ।
केशव धडौता होईन मी ॥
खिरजट घोंगडे फाटके ते कैसे ।
वेचिले तैसे भोगिजे ॥
वित्त नाही गाठी जिवित्वा आटी ।
उघडी पाठी हीव वाजे ॥
घोंगडे देईल तो एक दाता ।
रखुमादेविवरा मागो रे आता ॥
शेतकर्‍याची दयनीय अवस्था वर्णन करून वीटेवरी उभा असलेला आपल्याला देईल तेंव्हा त्यालाच मागू अशी मांडणी केली. ती सगळी त्या काळाला शोभणारीच होती. कालचे ज्ञानोबा कवी होते म्हणून त्यांनी ओवी लिहीली. पण आज जर ज्ञानोबा असते तर? त्यांनी काय केले असते शेतकर्‍यासाठी?
आजच्या एका ज्ञानोबाने मात्र एक अतिशय साधी पण वेगळीच कृती करून कुणब्यास सुख समाधान देण्याचे काम केले आहे. आजच्या युगातील हा ज्ञानोबा कवी नाही. उस्मानाबादचे ज्ञानोबा मोरे हे तेरणा महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. मित्रांसोबत रामलिंग डोंगरात नियमित फिरायला जाण्याचा त्यांचा परिपाठ. या फिरण्या फिरण्यात गप्पा मारण्यात एक विचार त्यांच्या डोक्यात आकाराला आला. नुसतं बोलणे फिरणे यापेक्षा काहीतरी कृती आपण केली पाहिजे. मग त्यातून बचत गटाची कल्पना पुढे आली. बचत गट राहिला मागे मग सहकारी पतपेढी मुर्तरूपात सुरू झाली. प्रभात पतपेढी एक लाख चाळीस हजाराच्या भांडवलात सुरू झाली. पाचशे रूपये भाड्याने एक गाळा त्यांनी घेतला, पाचशे रुपये महिन्याने एका होतकरू मुलास कामाला लावले. ही पतपेढी शासनाच्या कुठल्याच योजनेत सुरू झाली नसल्याने व शिवाय सहभागी सगळे अगदी साधारण कुटूंबातली माणसे असल्याने काटकसरीने काम सुरू झाले.
हे आजच्या काळातले ज्ञानोबा पडले अर्थशास्त्राचे प्राध्यापक. तेंव्हा त्यांना डोक्यातले विचार शांत बसू देईनात. स्वत:ची शेती असल्याने शेतमालाबाबत ते विचार करायला लागले. शेतीतली मेहनत जो शेतकरी करतो त्याच्या हातात शेतमाल विक्रीची सुत्रे  अजिबात नाही हे त्यांच्या लक्षात आले. शेतकर्‍याचा माल एकाच वेळी मोठ्या प्रमाणात बाजारात येतो व त्याचे भाव पडतात. काही काळात हे भाव चढे होतात तेंव्हा शेतकर्‍याकडे मालच शिल्लक राहिला नसतो.
याची दोन साधी कारणं जी शेतकरी चळवळीत मांडली गेली होती ती ज्ञानोबा मोरे यांनी समजून घेतली. शेतकर्‍याकडे आर्थिक ताकद नसते शिवाय माल ठेवायला जागा नसते.  परिणामी तो जास्त काळ माल जवळ ठेवू शकत नाही. यासाठी आंदोलन, रस्ता रोको, रेल रोको, मोर्चा हे सोडून अर्थशास्त्राच्या दृष्टीने काय केले पाहिजे? आजच्या काळात आंदोलन चळवळी कशाप्रकारे केल्या पाहिजेत? जर बाजारवादी व्यवस्थेचे दिवस असतील तर डोक्याने नसून खिश्याने विचार केला पाहिजे हे सुत्र ज्ञानोबा मोरे यांना लक्षात आले.
त्यांनी तेरणा साखर कारखान्याचे गोदाम वीस हजार रूपये महिना या दराने भाड्याने घेतले. या गोदामात शेतकर्‍याचे धान्य साठवायला सुरवात केली. शेतकर्‍याने आपल्या शेतातील धान्य इथे आणून ठेवायचे. लगेच त्याला बाजारभावाच्या 80 टक्के इतकी रक्कम रोख स्वरूपात देण्याची व्यवस्था पतपेढीद्वारे केली. आणि काही दिवसात मालाला जरा जास्त भाव मिळतो आहे असे दिसताच तसे शेतकर्‍याला सांगितले. शेतकर्‍यांनी आपला माल जास्तीच्या दराने बाजारात विकला. मागच्यावर्षी सोयाबीनच्या एका पोत्यामागे (100 किलो म्हणजे एक क्विंटल) पाचशे रूपये जास्तीचे शेतकर्‍यांना मिळाले. या सगळ्यासाठी पतपेढीने शेतकर्‍यांकडून 180 रूपये खर्चापोटी घेतले. शिवाय धान्याचा विमाही काढला गेला. (वार्षिक खर्च 38 हजार रूपये)
या वर्षी सोयाबीनला एक हजार रूपये जास्तीचे मिळत आहेत. त्यांच्याकडे 6000 क्विंटल पेक्ष जास्त धान्य आजच जमा झाले आहे. सरळ साधा हिशोब आहे. या आधुनिक ‘ज्ञानोबा’ मुळे उस्मानाबादच्या शेतकर्‍याकडे जास्तीचे साठ लाख रूपये जमा झाले. म्हणजे हे गोदाम नसले असते तर या शेतकर्‍यांना जितकी रक्कम मिळाली असती त्यापेक्षा जास्तीचे साठ लाख रूपये उस्मानाबादच्या बाजारात आले. म्हणजेच लोकांची क्रयशक्ती तेवढी वाढली. यासाठी त्यांना आलेला खर्च आहे अकरा लाखाच्या जवळपास.
या सगळ्या प्रकरणाचे वैशिष्ट्य म्हणजे कुठेही शासनाची योजना नाही. कुठेही सुट-सबसिडी नाही. शेतकरी चळवळीत एक घोषणा होती. ‘सुट सबसिडीचे नाही काम । आम्हाला हवे घामाचे दाम ।’ साधा माणूस काय करू शकतो याचे जिवंत उदाहरण  ज्ञानोबा मोरे यांनी समोर ठेवले आहे.
महाराष्ट्रात शेतमालावर किमान प्रक्रिया करणे, त्यांची साठवणूक करणे, त्याची विक्री करणे यात अनंत अडचणी शासनाने उभ्या करून ठेवल्या आहेत. यात कुणी भांडवली गुंतवणूक करायला तयार नाही कारण केंव्हाही शासनाची लहर फिरली की सगळे धोरण बदलते व गुंतवणूक करणाराचे नुकसान होते.
कृषि उत्पन्न बाजार समितीच्या जाचक अटितून फळे व भाजीपाला यांना वगळण्याचे सुतोवाच महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी केले आहे. पण अजून तसा काहीच ठोस निर्णय शासनाने घेतला नाही.
ज्ञानोबा मोरे यांनी सहकारी तत्त्वावर हा उपक्रम उभारला. त्याला शेतकर्‍यांनी चांगला प्रतिसाद दिला. अडचण अशी असते की जेंव्हा दुसरीकडे असं काही लोक करू पाहतील तेंव्हा त्यात असंख्य अडथळे उभे केले जातात. सामान्य माणूस यामुळे निराश होतो. व हाती घेतलेले काम थोडीफार झिज सहन करून सोडून देतो.
शेतकर्‍यांनी आपल्या शेतातील भाज्या जर ग्राहकांना सरळ विकल्या तर शासनाच्या का पोटात दुखतं? आपल्या उसाचा गुळ काढला तर असा कोणता देशद्रोह त्यानं केला असं होतं?
एकेकाही बजाजची स्कुटर (चेतक) विकत घ्यायचं म्हटलं तर भारतीय पैसे चालायचे नाहीत. त्यासाठी अमेरिकन डॉलर लागायचे. कारण ही गाडी पूर्णपणे निर्यात करण्यासाठीच तयार केली होती. आणि त्यासाठी शासनाने नको ती आणि नको तेवढी मदत प्रोत्साहन बजाजला दिले होते. पण आमचा बजरंग जेंव्हा आपल्या शेतातला कापूस परदेशात पाठवतो म्हणतो तेंव्हा मात्र शासन लगेच त्याच्यावर बंदी आणते. बजाजची चेतक स्कुटर विकली की शासनाला डॉलर मिळायचे आणि कापूस विकला की काय चिंचोके मिळायचे? याचं उत्तर शेतकर्‍याच्या पोटी जन्मलेले जे राज्यकर्ते आहेत ते आजही द्यायला तयार नाहीत.
ज्ञानोबा मोरे यांच्यामुळे उस्मानाबादच्या बाजारपेठेत जास्तीचे पैसे शेतकर्‍यांकडे आले. त्याचे निश्चितच चांगले परिणाम शेतीउद्योगावर दिसतील. धान्याच्या साठवणूकीची अशी गोदामे (खासगी, कुठल्याही शासकीय योजनेखाली नको) उभी राहिली तर शेतमालाच्या भावात जो चढउतार होतो त्यावर शेतकर्‍याचा अंकूश राहिल.
फळे आणि भाजीपाला या बाबत तर भयानक स्थिती आहे. जवळपास 40 टक्के इतका माल साठवणुकीची व्यवस्था नसल्यामुळे सडून नासून जातो. म्हणजे जर हा शेतमाल साठवायची यंत्रणा खासगी क्षेत्राला उभारू दिली तर आजच्या किमतीतच जवळपास दुप्पट फळे व भाजीपाला उपलब्ध होईल. म्हणजेच जवळपास त्याचे भाव अर्ध्याने उतरतील.
हे साधे आकडे जितके साधे वाटतात तितके ते नसतात. कारण सरळ आहे त्यांच्याशी खेळणार्‍यांचे सगळे स्वार्थ त्यात अडकलेले असतात. पोशिंद्यांची लोकशाही असा एक शब्दप्रयोग मा. शरद जोशी यांनी केला होता. ज्ञानोबा मोरे यांची कृती म्हणून पोशिंद्यांच्या लोकशाहीच्या दिशेने उचललेले एक पाऊल आहे असे मला वाटते.
(ज्ञानोबा मोरे यांना संपर्क साधायची खुप जणांची इच्छा असेल. त्यांचा नंबर त्यांच्याच परवानगीने मी देतो आहे. जरूर त्यांच्याशी बोला. 9423340092. पत्रकार राहूल कुलकर्णी यांनी पहिल्यांदा ज्ञानोबा मोरे यांची दखल टिव्ही चॅनल एबीपी माझा वर घेतली. त्यांनीही या लेखासाठी सहकार्य केले. त्यांचे आभार)    
            श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575

Tuesday, December 3, 2013

हे आंबेडकर किती दलितांना माहित आहेत?

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 3 डिसेंबर 2013 


माझ्या अतिशय जवळच्या मित्राने प्रकाश भेरजे याने घर बांधले. त्याची जात माहित नसल्याच्या शाळेकरी चड्डितल्या दिवसांची आमची मैत्री. त्यानं मला मोकळेपणाने घराच्या नावाबद्दल विचारलं. तो बौद्ध धर्माचा (बौद्ध परिभाषेत धम्माचा) अनुयायी असल्यामुळे बौद्ध तत्त्वज्ञानातील, आंबेडकरांच्या लिखाणातील एखादे नाव शोधण्याचा मी प्रयत्न करत होतो. त्याच्या अगदी जवळच्या मित्रांमध्ये सगळ्या विविध जातीचे मित्र आहेत (ब्राह्मण, मराठा, ओबीसी). ही त्याची समन्वयाची दृष्टी लक्षात घेवून मी ‘कनिष्क’ हे नाव त्याला सुचवले. 

कनिष्काबद्दल माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘बौद्ध ऍण्ड हिज धम्मा’ या पुस्तकातच आहे. भिक्षु  नागसेन यांच्याशी  झालेल्या ऐतिहासिक प्रश्नोत्तरानंतर ग्रीक राजा मिलींद बौद्ध बनला.  नंतर कुशाणांनी ग्रीकांवर विजय मिळवला. भारतात येण्यापूर्वीच कुशाणांची बौद्ध धर्माची ओळख झाली होती. इ.स.78 मध्ये कुशाण सम्राट ‘कनिष्क़’ यास बौद्धधर्माविषयी सुरुवातीस सहानूभूती नव्हती. पण नंतर तो बौद्ध बनला. त्यानेच बौद्ध भिक्षूची  परिषद बोलावली होती. ती चतुर्थ धर्म संगीती या नावाने ओळखिली जाते. या धर्मसंगीती मागचा कनिष्काचा उद्देश बौद्धधर्मग्रंथाचे विवेचन करणे हा होता. या विवेचनामागची भाषा पाली नसून संस्कृत होती. (भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, मराठी आवृत्ती, प्राक्कथन, पृ. 17)

मित्राला "कनिष्क" हे नाव मी सुचविले पण त्या निमित्ताने ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या पुस्तकाचे वाचन करण्याचा योग आला. बुद्धीवर आधारीत असलेल्या एक नव्या रसरशीत धर्माची वेगळी ओळख बाबासाहेबांनी करून दिली आहे असं लक्षात आले. बाबासाहेबांनी सांगितलेला बुद्ध हा पारंपरिक बुद्ध नाही. श्रीमद् भागवतात मानल्या गेलेला विष्णूचा नववा अवतार असा हा बुद्ध नाही.

सर्वांना परिचित असलेली गोष्ट म्हणजे राजपुत्र सिद्धार्थाने मृत देह, मराणांत वेदनांनी कळवळणारा रूग्ण व जख्ख म्हातारा मनुष्य पाहिला. आणि त्याने सन्यास घेण्याचे ठरविले. (बौद्ध परिभाषेत परिव्रज्या) बाबासाहेबांनी याला हास्यास्पद म्हणून उडवून लावले आहे. खरं तर या मिथकावर जी.ए. कुलकर्णी सारख्या लेखकाने मोठी गोष्ट लिहीली. ती शालेय अभ्यासक्रमात एकेकाळी होती. हे नाकारताना बाबासाहेबांनी दिलेला तर्क बुद्धीला पटणारा आहे. ते म्हणतात, ‘वरवर पाहताही हे उत्तर हास्यास्पद वाटते. बुद्धाने आपल्या वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी परिव्रज्या ग्रहण केली. ह्या तीन दृश्यांची परिणती म्हणून जर त्याने परिव्रज्या ग्रहण केली असली तर ही तीन दृश्ये तत्पूर्वी त्याला कधी कशी दिसली नाहीत? ह्या शेकड्यांनी घडणार्‍या नेहमीच्या घटना आहेत. आणि त्या तत्पूर्वी बुद्धांच्या सहजच नजरेस न येणे असंभव आहे.’

या सन्यासाच्या संदर्भात जो प्रसंग घडला आहे त्याची अतिशय वेगळी आणि बुद्धिला पटणारी मांडणी बाबासाहेबांनी केली आहे. वयाची वीस वर्षे पूर्ण झालेल्या युवकाला शाक्य संघाची दिक्षा देण्यात येत असे. राजपुत्र सिद्धार्थाने ही दिक्षा घेतली त्याला आठ वर्षे उलटून गेलेली होती. म्हणजे शाक्य संघाच्या कामाचा त्याला आठ वर्षे इतका अनुभव होता. संपूर्ण माहिती होती. 

शाक्य आणि कोलिय (जवळपासचे दोन राज्ये) यांच्यात रोहिणी नदीच्या पाण्यावरून तंटा उत्पन्न झाला. (नगर-नाशिक आणि औरंगाबादच्या लोकांना या प्रश्नाच्या तीव्रतेबाबत काही सांगायची सध्या गरज नाही. गोदावरीचे पाणी त्याचे साक्षी आहे) शाक्यांच्या सेनापतीने सभेत युद्धाचा ठराव मांडला. सिद्धार्थ गौतमाने याला विरोध दर्शविला. ‘युद्ध करून हेतू सफल होत नाही.  प्रथम दोष कोणाचा हे समजून घ्यावे. आपल्या लोकांनीही आक्रमण केले असल्याचे मी ऐकतो.’ असे सिद्धार्थाने मांडले. 

वादविवादात ठराव मतास टाकल्या गेला. (तेंव्हा राजदंड पळविणे, प्रत्यक्ष मतदान न होऊ देता गोंधळ घालणे, टिव्ही चॅनलवरून बाईट देऊन वातावरण भडकविणे असल्या गोष्टी त्या काळच्या लोकांना येत नव्हत्या असे दिसते.....) फार मोठ्या बहुमताने ठराव सिद्धार्थाच्या विरोधात संमत झाला. 

युद्धाची निश्चिती झाल्यावर सैन्यभरती सुरू झाली. त्याला सिद्धार्थाने विरोध केला व युद्ध करण्याचे नाकारले. हा संघाच्या नियमाचा भंग होता. त्याला ज्या शिक्षेला सामोरे जावे लागणार होते त्यात 1. देहांत शासन 2. देशत्याग 3. कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार ओढवून घेऊन मालमत्तेची जप्ती. यांचा समावेश होता.  

सिद्धार्थाने देहांत अथवा देशत्यागाची शिक्षा स्विकारण्याची तयारी दाखविली. स्वत:च्या निर्णयाची शिक्षा कुटूंबाला नको अशी त्याची भूमिका होती. पण ही शिक्षा देण्यास संघ तयार झाला नाही. तेंव्हा बुद्धाने परिव्रजेचा मार्ग सुचविला. मी आपणहून सन्यास घेतो व देश सोडून जातो. पण त्यातली अडचण म्हणजे घरच्यांची परवानगी घेतल्याशिवाय असे करता येत नाही. तेंव्हा ही परवानगी घेवून अथवा न मिळाल्यास तसेही परिव्रज्या स्विकारून देश सोडण्याचे वचन सिद्धार्थाने दिले आणि हा तिढा सोडवला. 

घरच्यांची परवानगी घेताना शेवटी पत्नी यशोधरा हीने ज्या धैर्याने सिद्धार्थाला उत्तर दिले त्याचा उल्लेख फारसा कुठे येत नाही. बाबासाहेबांनी नेमकी हीच जागा हेरून त्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. यशोधरा सिद्धार्थाला म्हणते आहे, ‘ज्या अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिव्राजक होत अहात त्या अर्थी आपण एक असा नवीन जीवनमार्ग शोधून काढा की, तो सकल मानवजातीला कल्याणकारी ठरेल.

पुढे ज्या भांडणाचे कारण होवून सिद्धार्थाने संन्यास घेतला ते कारणच नष्ट झाले. तो तंटा मिटविण्याचा निर्णय झाला व लोकांनी  सिद्धार्थास परत येण्याचे विनविले. पण ‘युद्धामुळे मी घर सोडले हे खरे. पण शाक्य व कोलीय यांच्यातील युद्ध संपले असले तरी मी घरी जाऊ शकत नाही. मला आता असे दिसून येते की, माझ्यापुढील समस्येने विशाल रूप धारण केले आहे. या सामाजिक संघर्षाचे उत्तर मला शोधून काढले पाहिजे.’ असा निर्धार करून सिद्धार्थाची ‘बुद्ध’ बनण्याची वाटचाल सुरू झाली. 

बाबासाहेबांनी सोप्या पद्धतीने बुद्ध चरित्राची मांडणी केली आहे. यात कुठेही चमत्काराला जागा नाही. कुठेही कर्मकांडाचा विषय नाही. कुठेही भाकड कथा नाहीत. हे सगळं टाळून बाबासाहेब ही मांडणी करत जातात. 
बाबासाहेबांनी हे नाकारणे याला एक खास अर्थ आहे. त्यांना जो बुद्ध धर्म मांडायचा आहे तो वेगळा आहे. तो जसा आहे तसा ते स्विकारायला तयार नव्हते. बुद्ध आत्मा अमान्य करतात पण कर्म आणि पुनर्जन्म मान्य करतात. हा विरोधाभास होय अशी टिका बौद्ध तत्त्वज्ञानावर केल्या जाते. त्याचेही अतिशय सोपे विश्लेषण बाबासाहेबांनी केले आहे. अंब्याची कोय असते. कोयीतून आंब्याचा वृक्ष निर्माण होतो. आंब्याच्या वृक्षाला आंब्याची फळे येतात. हा आंब्याचा पुनर्जन्म आहे. अशा भाषेत बाबासाहेब हा गहन विषय सोपा करतात.
पण असा हा बुद्धीवर आधारलेला बुद्ध धर्म आज किती जणांना हवा आहे? मुळात तो दलितांना तरी हवा आहे का असा प्रश्न आहे. बाबासाहेबांनी घटना समितीसाठी दिलेले योगदान प्रचंड मोठे आहे. आपल्या परंपरेतील लोकशाही तत्त्वे शोधून तसेच इतर देशातील लोकशाही तत्त्वे यांचा अभ्यास करून त्या सगळ्याचा समावेश त्यांनी त्यात केला. ही घटना  मानवी दु:खाचे मुळ शोधायला बाहेर पडलेल्या आणि विविध पंडित विद्वानांशी ऋषींशी चर्चा करणार्‍या राजपुत्र सिद्धार्थाशी जूळणारीच आहे. आपण ते समजून घेत नाहीत हेच खरे दुर्दैव आहे.
6 डिसेंबरच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने दलितांचे उद्धारकर्ते म्हणून सोडा पण एक अतिशय बुद्धीमान महामानव म्हणून तरी आम्ही बाबासाहेबांना समजून घेणार आहोत का? 

माझे वडिल वकील आहेत. त्यांच्या बैठकीच्या खोलीत बाबासाहेबांचा मोठा फोटो लावला आहे. मला वाटायचे इतरांसारखे त्यांनाही आपण दलितांचे कैवारी असल्याचा देखावा करायचा असावा. पण मी कधी त्यांना विचारले नाही. त्यांच्या अतिशय जवळच्या मित्राने त्यांना एकदा  न राहवून विचारले, ‘‘हा आंबेडकरांचा फोटो तू काय म्हणून लावून ठेवला आहेस? बरं इतर कुणाचाही फोटो तूझ्या घरात नाही.’’ माझे वडिल काय उत्तर देतात हे मी उत्सूकतेने मधल्या खोलीत बसून ऐकत होतो. त्यांनी दिलेलं सहज उत्तर मला थक्क करून गेलं. ‘‘हे बघ मी वकील आहे. आमच्या क्षेत्रातला सगळ्यात मोठा माणूस म्हणजे डॉ. आंबेडकर. तेंव्हा मी त्यांचा फोटो लावणं यात तूला काय खटकतं?’’ त्यांचे मित्र निरूत्तर झाले. 'दलितांचा कळवळा' हे गुळगुळीत उत्तर देवून त्या आधारावर दलितमित्र पुरस्कार ते मिळवून घेवून शकले असते. तेवढं त्यांचं सामाजिक वजन आहेही.

स्वाभाविकपणे आंबेडकरांना स्वीकारायची वृत्ती दाखवून त्यांनी अजून मोठी उंची गाठली असंच मला वाटलं. आज बुद्धीच्या तर्कावर आधारलेला बुद्ध धम्म स्वीकारणारे बाबासाहेब आम्ही (दलित आणि सवर्ण दोघेही) स्वीकारणार आहोत का हा खरो प्रश्न आहे.