Tuesday, November 26, 2013

सहकारी साखरेची लाळ आणि स्वाभिमानी गुर्‍हाळ

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 26 नोव्हेंबर 2013 


नांदेड जिल्ह्यात मुदखेड-उमरी रस्त्यावर सिंधी म्हणून एक मोठे गाव आहे. त्या गावाजवळ ‘गुळ कारखाना’ अशी पाटी पाहून मी जरा चकित झालो. गुळाचे गुर्‍हाळ असते पण त्याला कारखाना कोणी म्हणत नाही. ज्या वैयक्तिक कामासाठी मी सिंधीला गेलो होते ते आटोपून गुळ कारखाना पाहण्यासाठी आवर्जून गेलो. 
फतेहखान नावाच्या उत्तर प्रदेशातील एका माणसाने 50 कामगारांना सोबत येऊन अर्धाएकरापेक्षा कमी जागेत हा कारखाना उभा केला आहे. कारखाना म्हणजे काय तर उसाचा रस काढायचे यांत्रिक चरक आणि गुळ तयार करण्यासाठी 7 मोठ्या कढया. गुळाच्या ढेपी ठेवण्यासाठी वीटांच्या कच्च्या भिंतीवर टाकलेल्या पत्र्यांचे एक शेड. उस मोजायला वजन काटा. बस! झाला कारखाना!! जेमतेम पाच लाख रूपयात 100 टन (एक लाख  किलो) उस एका दिवसात गाळायची यंत्रणा तयार. 
तिथे तयार झालेला गुळ मी खाऊन बघितला. त्याची चव, त्याचा रंग एकदम चांगल्या प्रतीचे होते. या गुर्‍हाळाचा उतारा किती असे विचारताच त्याने सांगितले की 13 टक्के. म्हणजे 100 किलो उसापासून 13 किलो गुळ मिळतो. साखरेचे प्रमाण महाराष्ट्रात 11 च्याही खाली आहे. शेतकर्‍याला किती भाव देता? त्यांनी सांगितले 1800 रूपये. 
त्या पूर्ण परिसरात कडक इस्त्री केलेल्या खळ लावलेल्या पांढर्‍या कपड्यातलं कोणी दिसत नव्हतं. साहेबांची वाट पहात त्यांच्या येण्याच्या दिशेने आपल्या गांधी टोपीचा कोन करून बसलेली लाचारांची गर्दी दिसत नव्हती. मोठ मोठ्या गाड्यांचा धुराळा उडत नव्हता. खिशाला  पेन लावलेले सफारीतले तुंदिलतनू अधिकारी दिसत नव्हते. दिसत होते मळकट कपड्यातले कष्टकरी लोक. ट्रॅक्टरने उस आणून टाकणारे शेतकरी. त्याचं माप होवून लगेच तो उस गाळल्या जात होता. शेतकर्‍याला पैसे जागच्या जागीच मिळत होते. 
इकडे नेमकं याच काळात उसाचे आंदोलन पेटले-पेटवल्या गेले आहे. एका सामान्य फतेहखान नावाच्या माणसाने दिलेलाच भाव हे सहकारी साखर कारखाने शेतकर्‍यावर उपकार केल्यासारखा देवू पहात आहेत. साखर कारखाना उभारायचा म्हटलं तर किमान 50 कोटी लागतात. या कारखान्याची गाळप क्षमता असते जेमतेम 1000 मे.टन. या कारखान्याला जागा लागते 200 एकर. इथे माणसे काम करतात 2000. आजूबाजूचा सगळा परिसर या सहकारी साखर कारखान्यामुळे प्रभावित होतो. आणि इतके सगळे करून हा कारखाना काही दिवसांतच मान टाकतो. त्याला जगवाय साठी वारंवार उपाय करावे लागतात. परत शेतकरी भाव मिळत नाही म्हणून आंदोलन करतात. त्यात प्रचंड मोठे नुकसान होते. शासनाला यासाठी साखर आयुक्त नेमावा लागतो.  कारखाने उभारण्यासाठी पैसे द्यावे लागतात. कारखाने बुडाले की ज्यांनी बुडावले त्यांनाच ते परत भंगार भावात विकावे लागतात. आणि इतकं सगळं करून हे कारखाने चालत नाहीत.
चार लाख मेट्रीक टना पेक्षा जास्त गाळप क्षमता महाराष्ट्रातील 173 साखर कारखान्यांची आहे. यातील केवळ 30 हजार मेट्रीक टन गाळप खासगी कारखान्यातून होते. म्हणजे आजही सर्व साखर उद्योग सहकाराच्याच विळख्यात अडकला आहे हे स्पष्ट होते. खासगी कारखाने कसे उभारले जावू नयेत असेच प्रयत्न महाराष्ट्रात होताना दिसतात. म्हणजे एकीकडे सहकाराच्या नावाखाली ज्या काही रसवंत्या (सहकारी साखर कारखान्यांना माझ्या एका मित्राने दिलेले नाव) सरकारने उभारल्या आहेत त्या नीट चालवल्या जात नाहीत. आणि दुसरं कोणी करू पहात असेल तर त्याच्यामागे प्रचंड मोठे लचांड लावून रोकण्यात येते. 
जो कोणी खासगी कारखाना शेतकर्‍यांना चांगला भाव देत असेल त्याला उस घालण्याचे स्वातंत्र्य शेतकर्‍यांना असले पाहिजे. आणि कारखाना काढण्याचे स्वातंत्र्य कुणालाही असले पाहिजे. यावर वाद असण्याचे काय कारण? साखर ही जीवनआवश्यक वस्तू आहे असं धादांत खोटं विधान सरकारी पातळीवर केलं जातं. कुठलाही वैद्यकीय व्यवसायिक साखरेला जीवनावश्यक मानत नाही. साखरेला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून आधी काढून टाकले पाहिजे. (कांद्याच्या बाबतीतही असेच आहे) साखरेवरची बंधनं काढली की साखरेचा प्रश्‍न सुटू शकतो.
आज हे सांगितले तर नविन पिढीला आश्चर्य वाटेल की शेतकर्‍यांना त्याच्या परिसरातील कारखान्यांनाच उस देण्याचे बंधन 20 वर्षांपूर्वीपर्यंत होते. युती शासनाच्या काळात औरंगाबादला शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी ही झोनबंदी उठवा म्हणून उपोषण केले. साखर कारखानदार आणि उसतोडणी मजूरांचे नेते म्हणवून घेणारे गांपीनाथ मुंडे हे तेंव्हा उपमुख्यमंत्री होते. त्यांनीच ही झोनबंदी उठविण्याची घोषणा केली व शरद जोशी यांनी उपोषण सोडले. या सहकारी साखर कारखान्यांनी तयार केलेली साखर लेव्हीच्या नावाखाली सरकार पडेल भावाने विकत घेत असे. त्यावर कारखान्याचा कुठलाही हक्क नसायचा. शिवाय कारखान्याकडे असलेली साखर त्यांनी किती आणि केंव्हा बाजारात आणायची हेही परत सरकारच ठरवित असे.
उसाच्या भावासाठी आंदोलन करताना शेतकरी संघटनेने मुळ मागणी अशी केली होती की साखर उद्योग नियंत्रण मुक्त व्हावा. बाजारपेठ खुली झाली तर आम्ही आमचा भाव मिळवून घेवू आम्हाला आंदोलन करायची वेळ येणारच नाही अशी ती स्वाभिमानी भूमिका होती. आता ‘स्वाभिमानी’ नाव लावणारे मात्र लाचार भूमिका घेत आहेत. आता साखरेवरची बरीच बंधनं उठली आहेत. अजून जी थोडीफार बंधनं (आयात निर्यात बंधने, कारखान्यासाठी लागणारे लायसन परमिट) आहेत ती जर उठली तर उसाच्या शेतकर्‍याला शासनाकडे हात पसरण्याची वेळच येणार नाही. 
सरकारी जोखडात उस अडकला तर शेतकरी लाचार राहतो. तो आपल्या दाव्याला बांधला गेला की मतासाठी त्याचा वापर करणे सहज शक्य होते हे राजकारणातल्या ‘टग्यांना’ चांगलेच माहित आहे. हेच उसाचे राजकारण याच ‘टग्यांवर’ मागच्या निवडणुकीत उलटले. दक्षिण महाराष्ट्रातून टग्या पक्षाचे खासदारकीचे उमेदवार पडले. ‘जातीचे’ नसलेले दुसरेच निवडून आले ते पाहून ‘टग्यां’चे पित्त खवळले. 
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बघ्याची भूमिका घेतली आहे. सध्याचे मुख्यमंत्री हे सहकारी साखर सम्राट नसल्यामुळे त्यांनी अशी भूमिका कदाचित घेतली असावी. 
या पार्श्वभूमीवर जेंव्हा शेतकरी छोट्याप्रमाणावर आपल्या शेतमालावर प्रक्रिया करू पहात असतील तर त्याच्याही मार्गात अडथळे आणले जातात. उस उत्पादक शेतकरी आपल्या शेतावरच उसाचा रस गाळणार असेल आणि त्यावर थोडी प्रक्रिया करून तो रस बाजारात आणणार असेल तर काय हरकत आहे? उसाच्या दहापट कमी साखर किंवा गुळ तयार होतो. मग या दहापट चिपाटाची वाहतून करा, त्यातून परत इतर समस्या निर्माण होणार, परत महागडे डिझेल यावर खर्च होणार, उसतोड कामगारांचा प्रश्न गंभीर होणार, परत त्या कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्याक्षेत्रातील लाभार्थी ‘एनजीओ’ गळा काढणार हे सगळं पाहिजेच कशाला? उसापासून कच्ची साखर तयार करणारी छोट्या प्रमाणातील यंत्रणा तयार व्हायला हवी.
फक्त उसासाठीच नाही तर इतरही शेतमालावर किमान प्रक्रिया करण्याची यंत्रणा छोट्या छोट्या गावांमधुन उभारल्या गेल्या पाहिजेत. त्यांना प्रोत्साहन तर सोडाच पण किमान विरोध तरी नको. इथे गुर्‍हाळावर कित्येकवर्षे बंदीच घालण्यात आली होती. कारण काय तर सहकारी साखर कारखाने जगले पाहिजे. आणि त्यातून अप्पासाहेब, नानासाहेब, तात्यासाहेब, दादासाहेब यांचे राजकारणी पोट फुगले पाहिजे.  
आज शेती फायद्याची राहिली नसल्याने त्यात कोणी भांडवली गुंतवणूक करायला तयार नाही. कोणी भांडवली गुंतवणूक करत नाही म्हणून परत शेतमालाला जास्त किंमत मिळण्याची शक्यता संपून जाते. आज 1800 रूपये किंमतीच्या उसापासून जी साखर तयार होते त्याला 3600 इतका भाव किरकोळ बाजारात मिळतो. म्हणजे ज्याने ते निर्माण केले त्याला सगळ्या मेहनतीच्या बदल्यात मिळणार तितकेच त्याच्या मालाशी जो खेळतो त्यालाही मिळणार. हा कुठला न्याय? हिंदी कवी धुमिल कविता आहे
एक आदमी रोटी बेलता है
एक आदमी रोटी खाता है
एक तिसरा भी आदमी है
वो न रोटी बेलता है न रोटी खाता है
वा सिर्फ रोटीसे खेलता है
ये तिसरा आदमी कौन है
मेरे देश की संसद मौन है. 

उसाच्या भावाशी खेळणारेच संसदेत जावून बसले आहेत त्याला कोण काय करणार?        
      
      श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575.

Tuesday, November 19, 2013

हे शहाणपण ‘शहाणी’ माणसे दाखवतील ?

उरूस, दैनिक पुण्यनगरी, मंगळवार 19 नोव्हेंबर 2013

शेतकरी संघटनेच्या अधिवेशनातील प्रसंग आहे. एक मळकट कपड्यातला फाटका म्हातारा शेतकरी पुस्तकांच्या स्टॉलवर आला. वीस रूपयांचे नवीन छोटे पुस्तक त्याने खरेदी केले. आधीची सगळी पुस्तके त्याच्याकडे आहेत असं त्याचं म्हणणं होतं. शेतकरी संघटक पाक्षिकाची 200 रूपयांची वार्षिक वर्गणी त्याने भरली. आणि एक त्याच्याकडे नसलेले मोठे पुस्तक हातात घेऊन चाळू लागला. त्याने ते खाली ठेवले. परत हाती घेतले. परत थोडावेळाने खाली ठेवले. तोपर्यंत दुसर्‍या एका माणसाने इतर पुस्तके घेता घेता ते पुस्तकही घेतले, पैसे दिले निघूनही गेला. हा म्हातारा तसाच उभा. शेवटी मी न राहवून विचारले, ‘‘काका, काय झाले? काय पाहिजे तूम्हाला?’’. तो कसंनुसं हसत म्हणाला, ‘‘गावाकडं जायपुरतेच पैसे आहेत. ही शेगांवची स्मरणिका पाहिजे होती.’’ मी म्हणालो, ‘‘काही हरकत नाही. तूम्ही घेवून जा. पैसे नंतर पाठवा. तूमच्या छातीवर शेतकरी संघटनेचा बिल्ला आहे. माझा तूमच्यावर विश्वास आहे.’’ त्याचे डोळे उजळले. पण नेमक्या त्या स्मरणिकेच्या प्रती संपल्या होत्या. आता मलाच हळहळ वाटायला लागली. तरी मी त्याला म्हणालो, ‘‘तूमचा पत्ता द्या. मी पोस्टाने पाठवून देतो.’’ त्याने उत्साहाने 'अरूणभाऊ भांबुरकर, मु.पो. बिहीगाव बुद्रूक, ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती 444705' हा आपला पत्ता चांगल्या अक्षरात मला लिहून दिला. औरंगाबादला येताच आठवणीनं त्याला पुस्तक पोस्टाने पाठवून दिले. आश्चर्य म्हणजे त्याच दिवशी त्याची मनीऑर्डरही आली.
हा बर्‍याचवेळा आलेला अनुभव आहे. अतिशय सामान्य असलेले दहावी पास नापास शेतकरी आवर्जूृन पुस्तकं वाचतात, त्यावर चर्चा करतात. काही खेड्यांमध्ये मी पाहिलं आहे की आढ्याला तारेला टोचून 'शेतकरी संघटक' चे जूने अंक या शेतकर्‍यांनी जपून ठेवले आहेत. ही सामान्य दिसणारी माणसं विचाराने इतकी श्रीमंत कशी? ज्याला परत जायला जेमतेम पैसे आहेत तो शिल्लक थोड्याशा पैशातून पुस्तकं घेवू पहातो आहे याला काय म्हणावे?
लहान मुलांच्या बाबतीतला एक अनुभव असाच मोठा विलक्षण आहे. परभणीला शालेय मुलांसाठी एक प्रदर्शन 14 नोव्हेंबरला बालदिनाच्या निमित्ताने आम्ही भरविले होते. ‘नॅशनल बुक ट्रस्टचे’ सापांवरचे एक छोटे पुस्तक आमच्या प्रदर्शनात होते. त्याच्या मोजक्याच प्रती शिल्लक राहिल्या होत्या. एका मुलाने पुस्तकांच्या ढिगात बरीच शोधाशोध केली. त्याला ते सापडेना. त्यानं आमच्याकडे त्या पुस्तकाची मागणी केली. आम्हालाही ते सापडेना. मी त्याला सांगितले की तू उद्या ये, रात्री आवरताना ते सापडले तर आम्ही वेगळे काढून ठेवतो. रात्री पुस्तके आवरताना ते आम्हाला सापडले नाही. दुसरे दिवशी प्रदर्शन उघडण्यापूर्वीच एक दुसरा मुलगा आधीपासून बंद दरवाज्यापाशी पायरीवर येवून बसला होता. प्रदर्शन उघडताच तो आत शिरला व दोन मिनीटात ते पुस्तक घेवून काउंटरवर आला. आम्ही चकितच झालो. जे पुस्तक काल त्या मुलाला सापडले नाही, आम्हाला सापडले नाही ते या पोराला कसे काय सापडले. मी त्याला विचारताच तो म्हणाला, "मला माहित होते हे संपून जाईल म्हणून. मी टेबलावरच्या चादरीखाली ते लपवून ठेवले होते."
सामान्य शेतकरी असो की लहान मुलं असो यांचा आजही अक्षरांवर/ पुस्तकांवर जीव आहे. आणि याच्या उलट तथाकथित मोठी माणसे, मराठीचे प्राध्यापक, लेखक हे पुस्तकांचे  शत्रू बनलेले निदर्शनास येते. 
आम्ही प्रकाशन सुरू केल्यावर महाराष्ट्रातील मान्यवरांची यादी केली आणि त्यांना पुस्तके अभिप्रायार्थ पाठवायला सुरवात केली. 80 पैकी फक्त 7/8 मान्यवर पुस्तके मिळाल्याचे सांगायचे. क्वचित कोणी त्यावर प्रतिक्रिया द्यायचे. एका मान्यवर लेखकाने तर स्पष्टच कळवले तूमची पुस्तके पाठवत जावू नका म्हणून.
एका कवीमित्राच्या घरी गेल्यावर मी त्याला आमचे नविन पुस्तक सप्रेम भेट दिले. त्याने ते घेतले आणि टेबलावर ठेवून दिले. त्याच्याकडची इतर पुस्तके न्याहाळत असताना ते आमचे पुस्तक तिथे मला दिसले. हे पुस्तक काही महिन्यांपूर्वी त्याला पोस्टाने आलेले होते. पण त्याने ते तर कळवले नाहीच. शिवाय आत्ता मी देत असताना त्यानं हे सांगायचेही सौजन्य दाखवले नाही.
औरंगाबादच्या एका मान्यवर संस्थेला वाङ्मयीन पुरस्कार द्यायचे होते. त्यांनी दोघा साहित्यीकांची समिती नेमली. आता पुरस्कार जाहिर करायची वेळ आली पण यांनी काही अहवाल दिलाच नाही. त्यातील एकजण माझ्याकडे आले आणि म्हणाले, की ही आलेली पुस्तके आम्ही काही वाचलीच नाहीत. तूम्ही वाचली आहेत का? असली तर कुणाला पुरस्कार द्यायचा ते सांगाल का? मी तयार झालो. त्याप्रमाणे त्यांना पुस्तक निवडून दिलेही. परत ते म्हणाले, जर कोणी यावर बोला म्हणाले तर काय करायचे? मी म्हणालो, मी बोलायला तयार आहे. शिवाय याच पुस्तकाला का पुरस्कार दिला ते सांगायलाही तयार आहे,
माझ्याकडे एका कादंबरीचे हस्तलिखीत आले. ही कादंबरी कशी छापण्यालायक नाही हे मी त्या उत्साही लेखकाला समजावून सांगत होतो. त्यानं मला सांगितले, ‘‘पण मी अमूक अमूक मान्यवर साहित्यीकाकडे हे पाठवले होते. तेंव्हा त्यांनी तर याची स्तूती केली. शिवाय छापा म्हणून सांगितले. त्यांनी मला तसे पत्रही पाठवले.’’ मी त्या मान्यवरांशी संपर्क साधला. त्यांना विचारले, ‘‘अहो या सामान्य संहितेची तूम्ही कशी काय शिफारस करता?’’ तर ते मला म्हणाले, ‘‘अहो मी ती वाचलीच नाही.’’
मी सुरवातीच्या काळात स्वत: पुस्तकांचे गठ्ठे घेवून महाविद्यालयांमध्ये जायचो. मराठी विभागातील सर्व प्राध्यापकांना भेटायचो. त्यांना पुस्तके दाखवायचो. ते घ्यायचे नाहीत ही गोष्ट वेगळी. पॉप्युलर प्रकाशनाने साहित्यीकांचा माहिती कोश प्रकाशीत केला होता. त्याचे खंड मी त्या विभागप्रमुख मान्यवर साहित्यीकाच्या हातात दिले. त्यांनी ते सगळे चाळले. आणि हे काम किती फालतू झालं आहे म्हणून टिका केली. मला कळेचना इतकं चांगलं काम हे फालतू का म्हणताहेत. कारण उशीरा कळाले. त्यात त्यांची माहितीच समाविष्ट नव्हती. मग ते ही पुस्तके घेतील कशाला?
म्हणजे ही मोठी माणसे वाचणार नाही, शिवाय इतरांनी केलेली मोठी आणि महत्त्वाची कामं निव्वळ वैयक्तिक स्वार्थी दृष्टीकोनातून तपासणार. याला काय म्हणावे?
‘म.पैगंबर आणि जात्यावरच्या ओव्या’ या लेखावर एका प्राध्यापक मित्राचा फोन आला, की हे फार महत्त्वाचे आहे. यावर एक लेख सविस्तर तूम्ही लिहून द्या. आमच्याकडच्या एका मासिकात मी तो छापतो. मी आवाक झालो. डॉ.ना.गो.नांदापुरकर हे मराठीचे विद्वान प्राध्यापक. त्यांनी केलेले हे संशोधन 70 वर्षांपूर्वीचे आहे. ते प्रकाशितही आहे. सामान्य वाचकांसाठी म्हणून मी तो लेख लिहीला होता. पण ज्यांचा हा अभ्यासाचा विषय आहे त्या मराठीच्या प्राध्यापकांनी डॉ. नांदापुरकरांचे काम वाचले नसेल तर कसं होणार?
आज मराठी ग्रंथव्यवहारात जी विचित्र परिस्थिती आलेली दिसते आहे त्याला पूर्णपणे हे 6 व्या वेतन आयोगावर गब्बर झालेले बांडगुळी प्राध्यापक जबाबदार आहेत. मराठीत जी वाङ्मयीन पुस्तके येत आहेत त्याची किमान नोंद घेणे, त्यांचे परिचयात्मक परिक्षण लिहीणे, नंतर महत्वाच्या पुस्तकांवर चर्चा घडवून आणणे, विशिष्ट कालखंडातील महत्त्वाच्या पुस्तकांच्या याद्या तयार करणे हे कोणाचे काम आहे?
एका साध्या शेतकर्‍याला कळते आहे की आपण आंदोलनाचा विषय समजून घेण्यासाठी पदराला खार लावून वाचले पाहिजे. एका छोट्या मुलाला कळते आहे की आपण खाऊचे पैसे वाचवून वाचले पाहिजे. 6 डिसेंबर व 14 एप्रिलचा अनुभव आहे की नागपुर व मुंबईला आंबेडकरी साहित्य मोठ्या प्रमाणात विकले जाते. छोट्या छोट्या पुस्तिका मोठ्या आत्मियतेने दलित जनता घरी घेवून जाते. याच्यापासून काहीच बोध आम्ही घेणार नाही का?
एक निवृत्त प्राध्यापक आमच्या ग्रंथव्यवहारातील मित्राला नियमितपणे फोन करून नविन आलेली पुस्तके आणुन देण्यास सांगायचे. सुरवातीला आमचा मित्र उत्साहाने नेवून द्यायचा. नंतरच्या काळात तो त्यांचा फोन आला की पुस्तकच नाही, मला येणं शक्य नाही अशी काहीतरी कारणं सांगायला लागला. एकदा माझ्यासमोर त्यांचा फोन आला आणि त्यानं पुस्तक नसल्याचे सांगितले. पुस्तक समोरच पडलेले होते. मी म्हणालो अरे काय झाले? पुस्तक तर आहे ना. तो म्हणाला कोण हमाल्या करणार? यांना पुस्तके फुकट हवी असतात. कधीच खरेदी करत नाहीत. मी नेवून देणे बंद करून टाकले आहे. 
  आपण ज्यांना तथाकथित मोठी माणसं म्हणतो तीच पुस्तकांची खरी शत्रू आहेत असं खेदाने म्हणावे वाटते. पुस्तकाबाबतचे शहाणपण वेड्या कमी शिकलेल्या पागल माणसांना असते पण तथाकथित शहाण्या माणसांना बर्‍याचदा नसते हेच खरे.         
     
      श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575.

Sunday, November 17, 2013

या ‘सुफी’चं आता करायचं तरी काय?


उरूस, दैनिक कृषीवल, २५ नोव्हेंबर २०१२ 

मुंबईच्या प्रसिद्ध अशा हाजी आली दर्ग्याबाबत एक बातमी आली आणि एक मोठं वादळ निर्माण झालं. बाळासाहेब ठाकरे यांचे निधन आणि नंतर कसाबची फाशी यामुळे ही बातमी सध्या जरा दबल्या गेली आहे. या दर्ग्याच्या गर्भगृहात स्त्रीयांना जाण्यास बंदी करणारा फतवा कट्टरपंथी उलेमांनी काढला. आणि या वादाला सुरूवात झाली. आयबीएन लोकमत वर या प्रश्र्नी मोठी चर्चा निखिल वागळे यांनी घडवून आणली. 
या निमित्ताने इस्लामधील पुरातन कट्टरपंथीयांनी परत जूने काही मुद्दे उगाळावयास सुरवात केली आहे. त्यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘सुफी’ संप्रदायाला विरोध. याची सुरवात कशी झाली? मुळ कुराण मध्ये नाच गाणे मुर्तीपूजा यांना निषिद्ध मानलं गेलं आहे. जगभरात ज्या ज्या ठिकाणी इस्लाम स्वीकारला गेला त्या त्या समाजाच्या मुळच्या काही चालीरीती होत्या. त्यात अर्थातच गाणं नृत्य आदी प्रकार होतेच. त्यांचं करायचं काय? या परंपरा कमी अधीक प्रमाणात तशाच शिल्लक राहिल्या. मग या संगीतातून देवाच्या उपासनेला काय म्हणायचं? तर त्यांनी हळू हळू ‘सुफी’ नाव धारण केलं. इस्लामच्या तत्त्वज्ञानाची मांडणी करताना धर्म समजून घेताना दोन प्रकार सांगितले जातात. ते असे. इल्म सफीना म्हणजे कागदावर सांगितलेला धर्म. म्हणजे अर्थातच कुराण, हदीस आणि हजरत पैंगबरांनंतरचे चार आदर्श खलिफा यांच्या चरित्रावरून मिळालेली शिकवण हे सगळं म्हणजे इल्म सफीना. सफा म्हणजे पान. म्हणजेच कागदावर सांगितलेला धर्म. तर दुसर्‍याला म्हणतात इल्म सिना. अर्थातच सर्वसामान्य लोकांच्या हृदयात ज्या भावभावना आहेत त्यांना मूर्त करणारा तो धर्म. जर सामान्य लोकांना गावं वाटलं, नाचावं वाटलं तर काय करायचं. तर त्यांनी गायचं. आणि मग अशी व्यवस्था करून ‘सुफी’ संप्रदायाने एक सोय करून ठेवली. 
कट्टर पंथियांनी याला वारंवार विरोध केलेला आहे. पण जगभरात आणि विशेषत: भारतात हा सुफि संप्रदाय जोमाने फोफावला. कारण साधं आहे. जरी भारतात मोठ्या प्रमाणात इस्लामचा स्विकार इथल्या सामान्य जनांनी केला तरी त्यांच्या जुन्या धर्मामधील परंपरा ते विसरले नाहीत. परिणामी गाण्याची पुजेची नवसांची जी एक परंपरा होती तिचे जतन त्यांनी नव्या स्वरूपात करण्यास सुरवात केली. 
याला फार मोठ्या प्रमाणावर विरोध झाला नाही कारण अकबरासारख्या शहेनशहाने खुल्या मनाने सुफींना आश्रय दिला. इतकंच नाही, अजमेरचे सुप्रसिद्ध सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांना अकबर मानायचा. ज्या औरंगजेबाला मुस्लिम कट्टरपंथी मोठा मान देतात त्या औरंगजेबाचे गुरूही सुफीच होते. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तीच्या संप्रदायातील 22वे संत ख्वाजा जैनुद्दीन चिश्ती यांची समाधी खुलताबादला आहे. त्याच्याचजवळ मलाही दफन करा अशी औरंगजेबाची अंतिम इच्छा होती आणि त्याप्रमाणे औरंगजेबाची कबरही ख्वाजा जैनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याजवळ बनवण्यात आली आहे. या पार्श्र्वभूमीमुळे सुफींना मोठा विरोध मनात असूनही भारतात होऊ शकला नाही. अकबराच्या काळात दक्षिण भारतात खुलताबादेत सुफींचं एक मोठं केंद्र होतं. देवगिरीच्या किल्ल्यावरील हिंदू संत चांदबोधले यांनी सुफी संप्रदायाचा स्वीकार केला. सुफींच्या कादरी परंपरेतील ते संत होते. संत एकनाथांचे गुरू संत जनार्दन स्वामी हे चांदबोधले यांचे शिष्य. तसेच त्यांचे दुसरे शिष्य म्हणजे सुप्रसिद्ध मुस्लिम मराठी संत कवी शेख महंमद. या चांदबोधले यांची कथा मोठी विलक्षण आहे. हिंदू असूनही त्यांनी सुफी वेष परिधान केलेला असायचा. ज्याचा मलंग वेष असं संबोधलं गेलेलं आहे. हे चांदबोधले दत्तावतारी पुरुष मानले गेले. एकनाथांना गुरूदत्तात्रयांनी मलंग वेषात जे दर्शन दिलं असं समजण्यात येतं. ते म्हणजे चांदबोधले यांनी दिलेलं दर्शन. ज्या ठिकाणी हे दर्शन दिलं, त्या शुलीभंजन इथे मोठं मंदिर उभारण्यात आलेलं आहे आणि ज्या शिळेवर बसून एकनाथांनी तपश्र्चर्या केली ती शिळाही तेथे मोठ्या आदराने पुजिली जाते. या चांदबोधले यांचे शिष्य असलेले शेख मोहम्मद यांची जे अभंग आहेत ते अतिशय उत्कृष्ट असे आहेत. ज्याप्रमाणे वारकरी संप्रदायात ज्ञानाचा एका । नामयाचा तुका ही उक्ती आढळते तिलाच जोडून कबीराचा शेका असंही म्हटल्या गेलेलं आहे. म्हणजेच शेख महंमद यांचे नाते कबीराशी जोडल्या गेलेलं आहे. शेख महंमद यांनी जन्माने मुसलमान असूनही कडव्या धर्मांधतेच्या खाणीत निपजलो असूनही शुद्ध परमार्थाची कास धरून आहोत असे स्पष्टपणे आपल्या कवितेत सांगितले आहे.
बाभळीचे झाडा । आंबे आले पाडा ।
अपरोक्ष निवाडा । शेख महंमद
याती मुसलमान । मर्‍हाष्ट्री वचने
ऐकती आवडीने । विप्र क्षुद्र
याच शेख मोहंमद यांनी देव-देवतांच्या मुर्ती ज्या फोडण्यात आल्या त्याबद्दलही अतिशय सुंदररीत्या विवेचन केलेले आहे. मूर्ती फोडणार्‍यांचा तर त्यांनी निषेध केलाच; पण त्याचबरोबर फक्त मूर्तीतच देव नाही, तर तो सर्वत्र आहे हीच शिकवण परत एकदा अधोरेखित करून आपणच खरे अद्वैतवादी वेदांती आहोत हे गौरवाने सांगितले आहे. शेख मोहम्मद म्हणतो :
मूर्ती लपविल्या । अविंधी फोडिल्या
म्हणती दैना झाल्या । पंढरीच्या
अढळ न ढळे । ब्रह्मदिका न कळे
म्हणती आंधळे । देव फोडिले
चराचरी अवीट । गुप्त ना प्रगट
ओळखावा निकट । ज्ञानचक्षे
हरी जीत ना मेले । आले ना ते गेले
हृदयात रक्षिले । शेख महंमद
शेख महंमदाचा ज्ञानचक्षू सदैव उघडा असल्यामुळे अशी रोखठोक रचना ते लिहू शकले.
या शेख महंमद यांनी आपले गुरू चांदबोधले यांची समाधी देवगिरीवर बांधली. सुफी संप्रदाय स्वीकारला म्हणून हिंदू त्या समाधीस समाधी म्हणायचा तयार नाहीत. तर जन्माने हिंदू असल्यामुळे मुसलमान त्यांना मानायला तयार नाहीत. अशा परिस्थितीत आजही ही समाधी सुफी संप्रदायाचे भक्त दर्गा म्हणून पूजतात याला काय म्हणावे?
भारतातील विविध जाती आणि त्यांच्या रुढी-परंपरा ही मोठी विचित्र गोष्ट आहे. चांदबोधले हिंदू होते; पण त्यांनी सुफी तत्त्वज्ञान स्वीकारले. याच्या नेमके उलट अंबड तालुक्यातील (जि. जालना) शहागड येथील शहामुनी यांचा किस्सा सांगण्यासारखा आहे. या शहामुनींनी मुसलमान असून महानुभाव संप्रदाय स्वीकारला. त्यांचा सिद्धांतबोध हा ग्रंथ महानुभाव भाविक आदराने कपाळी लावतात. चातुर्मासात या ग्रंथाचे सामुदायिक वाचन होते. 
नव्हे यातीचा ब्राह्मण । क्षत्रिय वैश्य नोहे जाण
क्षुद्रा परिस हीण वर्ण । अविंध वंशी जन्मलो
ऐसे खाणीत जन्मलो । श्रीकृष्ण भक्तीसी लागलो
तुम्हा संताचे पदरी पडलो । अंगिकारावे उचित
या शहामुनींनी इ. स. 1808 मध्ये शहागड येथे समाधीचा स्वीकार केला. या समाधी मंदिराजवळ त्यांच्या वारसदार पाच मुसलमानांची घराणी राहतात. तेवढेच फक्त या समाधीला पूजतात. इतकेच नाही तर ही मुसलमान घराणी मांस, मद्य वर्ज्य मानतात. कृष्णोपासना करतात आणि महानुभाव महंतांकडून गुरूपदेश घेतात. चैत्र वैद्य सप्तमीला शहामुनींच्या पुण्यतिथीचा साजरा होतो. या उत्सवात अन्य मुसलमान भाग घेत नाहीत.
अशी कितीतरी उदाहरणं भारतभर विखुरलेली आहेत. सुफींना विरोध करणार्‍यांना भारतातली ही गेल्या सातशे-आठशे वर्षांतली उदार परंपरा समजणार आहे काय? किंवा खरं म्हणजे ही समजून घ्यावी अशी त्यांची मानसिकता आहे काय?


Thursday, November 7, 2013

शरद पवार, आता तूम्हीच लाजेखातर नाही म्हणा

उरूस, गुरूवार 7 नोव्हेंबर 2013

वसमत येथे 35 वे मराठवाडा साहित्य संमेलन भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. या संमेलनाचे उद्घाटन कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. पवारांनी होकार दिला की नाही हे माहित नाही पण निमंत्रण पत्रिकेवर त्यांचे नाव आहे. अजून काही दिवसांतच साहित्य-नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाची ‘‘सेंच्युरी’’ शरद पवार ठोकतील असे दिसते. साहित्य संस्थांच्या पदाधिकार्‍यांना याबाबत बोलून काही होईल असे वाटत नाही. तेंव्हा आता आम्ही शरद पवारांनाच विनंती करतो की त्यांनीच लाजेखातर साहित्य संमेलनांची निमंत्रणे नाकारावीत. आपल्याकडे म्हणतात ना ‘‘करणार्‍याला लाज नसेल तर निदान बघणार्‍याने तरी लाजावे !’’ तसाच हा प्रकार आहे.
हे वारंवार का घडते ? गेली 12 वर्षे मराठवाड्यात आणि एकूणच महाराष्ट्रात साहित्य-नाट्य चळवळीत राष्ट्रवादीचीच नेते मंडळी का पुढाकार घेत आहेत? आणि या सगळ्यांना परत उद्घाटनासाठी शरद पवारांनाच का बोलवावे वाटत आहे? आतापर्यंत शरद पवारांनी ज्या ज्या साहित्य-नाट्य संमेलनांची उद्घाटने केली ती सर्व भाषणं तपासून पहा. या सगळ्यांत साहित्य विषयक काय वेगळं चिंतन आहे ते तपासण्यासाठी एखादी समिती उत्तम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली नेमा. म्हणजे नसलेल्या चिंतनातून काही तरी अर्थ ते काढून दाखवतील.
महाराष्ट्रात तरी असे चित्र आहे की एकही राजकारणी अगदी तो गल्लीतील नगरसेवक का असेना साहित्य संस्थांच्या दारात आपणहून जात नाही. आपणहून एकही आमंत्रण साहित्य महामंडळ किंवा त्यांच्या घटक संस्थांकडे येत नाही. आमंत्रणं लावून घ्यावी लागतात हे उघड गुपित आहे. एखाद्या छोट्या मोठ्या शहरात साहित्यीक संस्थेची शाखा चांगली चालवली जाते, सतत चांगले उपक्रम आखले जातात, त्या भागात वाचन संस्कृतिची जोपासना चांगल्या पद्धतीने होत आहे मग आता तिथे साहित्य संमेलनाचा मोठा उत्सव आपण घेवूयात असं काही घडतं का?
याच्या नेमकं उलट ज्या ठिकाणचा राजकीय नेता निधी खेचून आणण्यात प्रबळ आहे तिथे साहित्य संमेलन मात्र संपन्न होताना दिसते आहे. जिथे साहित्य संमेलन झाले तिथे परत काही वाङ्मयीन उपक्रम होतात का? किंवा ते होत असतील तर त्यात कोणाचा हात आहे? म्हणजे संमेलन होणार असले की वेगळीच मंडळी पुढे येते. त्या काळात चमकत राहते. आणि संमेलन संपून गेलं की हे कुठे गायब होतात ते आजतागायत कळलेलं नाही. मग त्या भागातले लोक जे साहित्यीक उपक्रम आपल्या पद्धतीने चालवत असतात त्याला उलट धक्का बसतो. कालपर्यंत कमी पैशात, अपुर्‍या साधन सामग्रीत चालणार्‍या या चळवळी अचानक ‘‘हायफाय’’ पैसेवाल्या होवून बसतात. कालपर्यंत एखाद्या निरलस कार्यकर्त्याच्या घरात उतरणारा, घरचे जेवण करणारा पाहूणा अशा मोठ्या संमेलनानंतर ‘‘धाबेवाला’’ होवून बसतो. कार्यक्रमा नंतरच्या कार्यक्रमाला महत्त्व येते आणि कार्यक्रमाच्या खर्चापेक्षा नंतरच्या ‘‘बसण्याचा’’ खर्च प्रचंड वाढतो.
राजकीय नेते संमेलनास येणार म्हटले की त्यांच्या पक्षाचे त्या भागातले सगळे चमचे साहेबांना तोंड दाखवायला तिथे गोळा होतात. त्यांना फक्त साहेबांमध्ये रस असतो. बाकी साहित्याशी त्यांचे काहीच देणेघेणे नसते. बर्‍याचदा साहेबांचे हे चमचे विविध महामंडळांवर असतात. मग त्या महामंडळाच्या बैठका संमेलनाच्या तारखांना लागून जवळपास आयोजित केल्या जातात. आमदार खासदार किंवा मंत्री पदावर असलेले आपल्या खात्याच्या बैठका या संमेलनाच्या तारखांना लागून ठेवतात.
ही सगळी फुगवलेली गर्दी साहेब गेले की निघून जाते. मग मंडप रिकामा होवून जातो. आयोजक आमदार/खासदार/मंत्र्याचाही रस संपून जातो. नंतरच्या कार्यक्रमाला तो हजर राहिलच याची खात्री नसते. त्याच्यासाठी त्या भागात राबणारी मंडळी भरपूर असतात. ते पाहूण्यांची ‘‘सगळी’’ व्यवस्था करण्याची जबाबदारी घेतात. आणि संमेलन ‘‘थाटात’’ पार पाडल्याचं छापून आणतात.
बरं यात साहित्यीकांचा विचार केल्यास त्याही आघाडीवर आनंदी आनंद आहे. ज्येष्ठ विचारवंत साहित्यीक नरहर कुरूंदकर कुठेही व्याख्यानाला जायचे असेल तर एस.टी. महामंडळाच्या साध्या बसने प्रवास करायचे. असा प्रवास करून जागजागीच्या व्याख्यानमालांची किर्ती त्यांनी वाढवली. इतकी व्याख्याने दिली, इतके कार्यक्रम केले पण त्यासोबतच त्यांचे लिखाण कुठेही कमी पडले नाही. आपल्या विद्यार्थ्यांना हाताशी धरून त्यांनी लिखाण केले. म्हणजे कुरूंदकर सांगायचे व भु.द.वाडीकरांसारखे लेखक ते लिहून घ्यायचे. आजकालचे ‘‘स्टेजबहाद्दर’’ नुसते हवेत फिरल्या सारखे महाराष्ट्र गाजवत फिरतात. त्यांचे लिखाण कुठे आहे म्हणून विचारले तर कुणालाच सांगता येत नाही.
एरव्ही निमंत्रण आले तर मागणीची भली मोठी यादी आयोजकांसमोर सादर करणारी ‘‘स्टेजबहाद्दर’’ मंडळी संमेलनाला अपुर्‍या मानधनावर येतात. त्याचं कारण विचारलं तर एक प्रसिद्ध वक्ता/कवी/विदूषक/एकपात्री प्रयोग करणारा बहाद्दर म्हणाला, ‘‘एका संमेलनात पुढची भरपूर आमंत्रणे मिळत असतात. शिवाय येतानाच मी चार ठिकाणचे कार्यक्रम करून आणि जाताना दोन ठिकाणची आमंत्रणे स्विकारून आलो आहे.’’ आता अशांच्यामुळे साहित्य संस्कृतीचे काय भले होणार आहे.
जे राजकीय नेते संमेलनात येतात त्यांना साहित्य संस्कृतीबद्दल किती आवड आहे, त्यांचे वाचन किती चांगले आहे, प्रतिभावंतांची त्यांना किती कदर आहे याची ग्वाही त्यांचे पंटर नेहमी देत असतात. साहित्य संस्कृतीबद्दल कळवळा असणारे एक मोठे राजकीय नेते या बैठका आपल्या घरी घ्यायचे. बैठकीसाठी सगळे जमले की त्यांना निरोप जायचा. ते जिन्यावरून हळू हळू उतरत खाली बैठकीत यायचे. त्यांच्या हातात नेहमी एखादे त्या त्या वेळी चर्चेत असलेले पुस्तक असायचे. मी एका वैठकीला हजर होतो. हे राजकीय नेते खाली येत होते त्या पायर्‍यांजवळच्याच खूर्चीवर मी बसलो होतो. त्यांच्या हातात नेहमीप्रमाणे पुस्तक होते. पुस्तकातल्या एका पानावर त्यांनी बोट ठेवले होते. माझ्या जवळून ते गेले तेंव्हा लक्षात आले की पुस्तक उलटे धरले आहे.
राजकारणी साहित्य संस्कृतीत रस घेत आहेत तर मग उलट आमचे साहित्यीक सामाजिक राजकीय प्रश्नांबात बाबतीत काय रस दाखवत आहेत? दिसतं असं की आजही मोठ मोठ्या सहित्यीकांना राजकीय सामाजिक प्रश्न कळत नाहीत, त्याबाबत ते भूमिका घेत नाहीत. कळालं तरी ‘कशाला साहेबांच्या विरूद्ध बोला. आपला एखादा पुरस्कार, महामंडळांवरच्या नियुक्त्या, सन्मान हुकतील ना !’ याची त्यांना काळजी असते व ते शांत बसणे पसंद करतात.
औरंगाबाद शहरात रस्त्यांवरच्या खड्ड्यांसाठी सामान्य माणसे रस्त्यावर उतरली. मी स्वत: त्यात सामिल होतो. इतकंच नाही तर त्यासाठी हर्सूल तुरूंगाची हवाही खावी लागली. (30 ऑक्टोबर ‘उरूस’) हे सगळं प्रकरण संपल्यावर परवा दिवाळीत एका प्रकाशक मित्राकडे लक्ष्मीपुजनासाठी आम्ही काही साहित्यीक जमलो होतो. साहित्य क्षेत्रातील मोठी  माणसं उपस्थित होती. ‘‘ख्या ख्या खी खी’’ करण्यावर त्यांनी समाधान मानलं. एकानेही जे काही घडलं त्याबाबत अवाक्षरही काढलं नाही. उलट माझ्याशीच इतर पांचट गोष्टी करून स्वत:चे समाधान करून घेतले.
खरं तर साहित्यीकाच्या शब्दाला किती महत्त्व असते. औरंगाबाद शहरात एका राजकीय नेत्याने वर्तमानपत्रांत आपल्या कामाची स्तूती करणारी ‘‘डायरी’’ प्रकाशीत करायला सुरवात केली. त्याचा उपहास करणारी एक छोटीशी फाटकी तुटकी ‘‘डायरी’’ एका व्यंगकाराने लिहीली. मोठ मोठ्या बदनामीच्या बातम्यांने जे साधणार नाही ते काम एका साध्या उपहासाने झाले. त्या राजकीय नेत्याला ही व्यंगमालिका इतकी खुपली की त्याने व्यवस्थापनाला सांगून ती बंद पाडली. ही ताकद शब्दांची असते.
राम हनुमानाला सीतेच्या शोधात लंकेला पाठवतो. लंकेचे लखलखीत वैभव पाहून हनुमान भूलून जातो आणि तो सीतेचा शोध घ्यायच्या ऐवजी रावणाचा पाहूणचार घेत तिथेच रावणाच्या पदरी त्याचा गोंडा घोळत राहतो. असं घडलं असतं तर रामायण घडलं नसतं. मानवी व्यथा-वेदनांच्या सीतेचा शोध घेणारे आमचे साहित्य क्षेत्रातले महान लोक या राजकारण्यांच्या वैभवाला भुलून त्यांच्याच पदरी गोंडा घोळण्यात स्वत:ला धन्य मानत आहेत. कुणीही संमेलन घ्या, आम्हाला बोलवा की न बोलवा, आमचे नाव पत्रिकेत असले तर आम्ही लाळ घोटत तिथे हजर. आम्ही तर लाज सोडली आहेच.
आता पवार साहेब, तूम्हीच संमेलनाचे उद्घाटन करण्यास नकार देवून या क्षेत्राची लाज राखा.       
         
     
      श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575.