Saturday, June 29, 2013

केदारनाथ आपत्तीची व्याधी । बुडाली शंकराचार्यांची समाधी ॥

दै. कृषीवल, उरूस सदरातील लेख 29 जून 2013 
-----------------------------------------------

केदारनाथच्या महाआपत्तीने प्रचंड मोठी हानी घडून आली आहे. मोठ्या प्रमाणात यावर चर्चा चालू आहे. याच ठिकाणी असलेली आदी शंकराचार्यांची योग समाधी बुडून गेली. शंकराचार्यांनी केदारनाथला योग समाधी घेतली असे काही जण मानतात तर काही जण याच ठिकाणी पाण्याच्या प्रवाहात त्यांनी देह सोडून दिला असंही समजतात. पण शंकराचार्यांचा शेवट केदारनाथला झाला यावर सर्वांचे एकमत आहे.

केदारनाथ मंदिराच्या डाव्या बाजूला दूरवर डोंगराच्या उतरणीवर (सध्याच्या हेलिपॅडच्या पलिकडे) एक छोटासा चौथरा होता. त्यावर महादेवाची एक पिंड स्थापन केलेली होती. ही जागा म्हणजे शंकराचार्यांनी योगसमाधी घेतली ती जागा असे सांगण्यात येते. आता तो चौथरा बुडून गेला. शिवाय मंदिराला लागून उजव्या बाजूला प्रदक्षिणा मार्गावरच शंकराचार्यांच्या नावानं एक मंदिर उभारलेलं होतं. त्यात त्यांची छोटी मूर्ती स्थापन केलेली होती. आता तेही सगळं बुडून गेलं. नष्ट झालं.
दोन वर्षांपूर्वी मी केदारनाथला सहकुटूंब गेलो होतो. त्या ठिकाणचे अद्भूत रम्य भिषण रौर्द्र आणि म्हणूनच कदाचित आकर्षित करून घेणारे सौंदर्य पाहिल्यावर मनाला पटले की शंकराचार्यांना या ठिकाणी समाधी का घ्यावी वाटली असेल. बहुतांश यात्रेकरू घाईघाईत केदरानाथ मंदिरात जावून दर्शन घेवून परतायच्या मागे असतात. आणि तेथील वातावरण पाहता ते स्वाभाविकच आहे.

दिवसभराचा पायी प्रवास करून मी अतिशय थकलेल्या अवस्थेत केदारनाथ मंदिराजवळ पोंचलो. डोंगर चढून मंदिरासमोरच्या सपाटीवर आल्यावर जे अप्रतिम दृश्य दिसले त्याने पाय खिळूनच गेले. तसेही ते श्रमाने थांबलेच होते. पावसाची भूरभूर संपून गेली होती. आभाळातले पांढरे ढगांचे पुंजके विरळ झाले होते आणि डाव्या बाजूच्या डोंगर कड्यावरून सुर्याची किरणं मंदिरामागच्या मेरूपर्वतावर पडले होते. पर्वताचा शिखराचा भाग अर्धचंद्राकृती आहे. मावळत्या सूर्याच्या किरणांनी तेवढाच भाग झळाळत होता. मागे निळसर आकाश. डोंगर पूर्ण पांढरा शुभ्र. हे वर्णन शिवतांडव स्तोत्रातील वर्णनाशी अतिशय जूळणारे होते.

जटाकटाह संभ्रम भ्रमन्नीलिम्पनिर्झरी । 
विलोलवीचिवल्लरी विराज मान मूर्धनी । 
धगद्धगद्धगज्ज्वलल्ललाट पट्ट पावके ।
किशोर चंद्र शेखरे रति प्रतिक्षणं मम ॥

(शंकराच्या तसराळ्यासारख्या आकारलेल्या जटांमधून गुरफटून फिरणार्‍या नदीतील चंचल लाटा वेलीसारख्या दिसत आहेत. अशा शोभिवंत मस्तकाने युक्त, धगधगणार्‍या जाज्वल्यमान अग्नीने ज्याचे ललाट प्रकाशित आहे, त्याने मस्तकावर चंद्राची किशोर कोर धारण केली आहे त्या शंकराच्या ठिकाणी माझी भक्ती जडली आहे)

रात्री मी या डोंगरातून खळाळत येणार्‍या मंदाकिनी नदीच्या काठावर जावून बसलो. स्वच्छ चांदणे पडले होते. या चांदण्यात हा डोंगर अद्भूत दिसत होता. आभाळातले ढग कोणते आणि बर्फाळ डोंगर कोणता हे कळू नये असे बेमालूम ते एकमेकात मिसळले होते.

संध्याकाळ आणि रात्र या दोन्ही वेळी या परिसराची अद्भूतता मी अनुभवली होती. शंकराचार्यांंनाही याचा अनुभव आला असेल का? नक्कीच आला असणार. ते  तर अतिशय प्रज्ञावान, शिवाय कवी. या सगळ्या पसार्‍यात मानवी देहाची नश्वरता त्यांना याच ठिकाणी जाणवली असणार.

पहाटेला उठून मी मंदिराच्या पलिकडे असलेल्या त्यांच्या समाधी ठिकाणाजवळ एकटाच चालत गेलो. तिथे कुणीही नव्हते. अलिकडच्या गढवाल मंडलच्या विश्रामगृहाच्या चौकीदाराला मी या ठिकाणाबाबत विचारले होते. त्याने सांगितले ते पलिकडे दिसते आहे तेच शंकराचार्यांचे समाधीस्थळ. मी तिथे गेलो. उजवीकडच्या डोंगराआडून सुर्याची कोवळी किरणे गवतावर पडली होती. त्या प्रकाशात पोपटी गवताने त्या सगळ्या परिसराला नितांत सुंदरता प्राप्त करून दिली होती. त्यावरची छोटी छोटी पिवळी जांभळी गवतफुले तर केवळ अप्रतिम दिसत होती. मंदाकिनी नदीचे छोटे मोठे प्रवाह खळाळत होते. संध्याकाळचे दृश्य, रात्रीच्या चांदण्यातील अद्भूतता आणि आता पहाटेच्या उन्हातील जीवनरसाने  भरलेले वातावरण याचे गारूड नक्कीच शंकराचार्यांवर झालेले असणार.

शंकराचार्य या ठिकाणी का आले याचीही एक कथा आहे. केदारनाथ हे ठिकाण पांडवांच्या स्वर्गरोहणाचे ठिकाण मानण्यात येते. पांडवांना असे वाटले की आपण आपल्याच लोकांची हत्या केली महायुद्धात. ते पाप कसे फेडायचे? आयुष्याच्या शेवटच्या पर्वात स्वर्गरोहण करताना पांडव केदारनाथच्या पायाशी आले आणि तिथे त्यांनी महादेवाच्या पिंडीची स्थापना केली मंदिर उभारलं व आपल्या पापातून मुक्ति मिळवली. या मंदिरात महादेवाची पिंड  घडवित असताना ती घडेचना. तेंव्हा साक्षात शिवाने त्यांना सांगितले की या ठिकाणी ही पिंड घडणार नाही. इथली माती ठिसूळ आहे. (आताच्या आपत्तीच्या संदर्भात हे लक्षात घ्या) हा जो मागचा पर्वत दिसतो आहे तो म्हणजेच मी स्वत: शिव आहे. तेंव्हा वेगळी पिंड घडवायची गरज नाही. मग त्यांनी त्या डोंगराच्या अकाराचीच ओबडधोबड रचना केली. तिचीच पुजा पिंड म्हणून करण्यात येते. या पिंडीवर अहिल्याबाई होळकरांनी सोन्याची छत्री करून बसवली. या ओबडधोबड रचनेला चांदीचा कठडा करून दिला. त्यावर सुंदर नक्षिकाम केलेले आहे.

शंकराचार्यांनी चार पिठांची स्थापना केली. ती ठिकाणं अशी-कर्नाटकातील शृंगेरी, गुजरातधमील द्वारका, ओडिशातील जगन्नाथ पुरी, उत्तराखंडयेथील बद्रीनाथ. बद्रीनाथ व केदारनाथ मिळून एक ज्योर्तिलिंग मानण्यात येते.

शंकराचार्य भारतभर फिरले त्यामागे एक विशिष्ट सुत्र होते. त्यांचे जन्मगाव कालडी हे केरळात आहे. हा सगळा परिसर जगातील विविध धर्ममतांसाठी भारतातील प्रवेशद्वार मानण्यात येते. इस्लाम व ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी इथूनच भारतात आपल्या धर्माचा प्रचार प्रसार सुरू केला होता. हा काळ शंकराचार्यांचाच काळ आहे. (शंकराचार्य जन्म इ.स.788-समाधी 820). त्या पार्श्वभूमीवर शंकराचार्यांना विविध मतमतांमध्ये विभागलेला हिंदू समाज अद्वैताच्या एका धाग्यामध्ये  गुंफायचा होता. आणि आपल्या 32 वर्षांच्या छोट्याशा आयुष्यात त्यांनी हे प्रचंड मोठे काम केले. (महाराष्ट्रासाठी या अद्वैताचा संबंध म्हणजे आपला वारकरी संप्रदाय याच अद्वैत मतावर आधारलेला आहे.)

अभ्यासकांनी शंकराचार्यांनी केलेल्या प्रवासाचा मार्ग संशोधनाने आता निश्चित केला आहे. कालडी (जन्मस्थान, केरळ)- ओंकारेश्वर (मध्यप्रदेश-गुरूमंत्र गोविंद भागवद्पाद यांचेकडून)-वाराणसी (उत्तर प्रदेश, वेदांवरील भाष्याचे लिखाण)-बद्रीनाथ (उत्तराखंड, बादरायणाच्या वेदांत सुत्रावरती भाष्य तसेच उपनिषद, भगवद् गीता यांच्यावरील भाष्य, विष्णु सहस्त्रनामाचे लिखाण)-प्रयाग (अलाहाबाद-उत्तरप्रदेश, कुमारील भट्ट यांच्याशी भेट)-महिष्मती (बिहार, मंडन मिश्रांची भेट व वादविवादात त्यांचा पराभव)-श्रीशैल (आंध्रप्रदेश)-गोकर्ण (गोकर्ण महाबळेश्वर महाराष्ट्र)- मुकांबिका (कर्नाटक)- शृंगेरी (कर्नाटक)- कालडी (केरळ, आईचा अत्यंविधी केला)-रामेश्वर (तामिळनाडू)-तिरूपती (आंध्रप्रदेश)-अमरावती (विदर्भ महाराष्ट्र)-द्वारका (गुजरात)-उज्जैन (मध्यप्रदेश)-कामरूप (आसाम, नवगुप्त या शाक्तपंथिय पंडिताला हरवले व व्यास सुत्रांवर भाष्य केले)- जगन्नाथ पुरी (ओडिशा)- श्रीनगर (कश्मिर)-बद्रीनाथ (शेवटचे दिवस)-केदारनाथ (योगसमाधी)

हा नुसता प्रवास बघितला तरी आचंबित व्हायला होतं. त्या काळचं वातावरण बघता सर्व प्रकारचे धर्मविषयक विचार भारतात प्रसार पावत होते व या सगळ्यांवर इथल्या मातीचा एक वेेगळा रंग चढत होता. अगदी आजही कोल्हापुरच्या क्रिश्चन वस्तीत ‘‘॥ श्री येशु ख्रिस्त प्रसन्न ॥ ’’ असं लिहीलेलं आढळतं. शंकराचार्यांच्या काळात केरळात एक चेरामन जामा मशीद या नावाची मशीद आहे. तिचे तोंड पूर्वेकडे आहे. या मशीदीत रोज दिवा लावला जातो. ही मशीद महंमद पैगंबर यांच्या हयातीत बांधली गेलेली भारतातील पहिली मस्जिद आहे. इथल्या प्रथेप्रमाणे प्रार्थना स्थळांचे तोंड पूर्वेला असते मग आमच्याही प्रार्थना स्थळाचे तोंड पूर्वेलाच ठेवा असं तेंव्हाचे धर्मप्रसारक म्हणाले.

हे सगळे शंकराचार्यांच्या आसपास घडत होते. बृहडेश्वराच्या मंदिरावर बुद्धाची अतिशय मोहक अधि पद्मासनातील मुर्ती याच परिसरात आहे. सेंट थॉमसने ख्रिश्चन धर्मप्रसाराला सुरवात याच परिसरातून शंकराचार्यांच्या काळात केली. हे सगळं समजून घेत शंकराचार्य भारतभर फिरले.

अशा या प्रतिभावंताला आपल्या प्रवासात शेवटी केदारनाथला तेथल्या वातावरणात मोक्षाचा आनंद प्राप्त झाला. तिथली धार्मिक महती (पांडवांचे स्वर्गरोहण) पाहता आपण येथेच येागसमाधी घ्यावी असे त्यांना वाटले असणे स्वाभाविक आहे. आयुष्यभर पांडित्यपूर्ण विवेचन करत फिरणार्‍या, तत्त्वज्ञानविषयक वादविवादात सर्वांना पराजित करणार्‍या या महान प्रतिभावंताने आयुष्याच्या शेवटी फक्त सहा श्लोकांचे  निर्वाणषटक लिहीले व आपली जिवन यात्रा संपवली.

शंकराचार्यांच्या समाधीजवळ मला जी प्रसन्नता अनुभवायला मिळाली त्यावरून मला असं वाटलं की नेमकी समाधी कुठे घेतली ते सांगता यायचं नाही पण त्यांनी निर्वाणषटक याच जागी बसून लिहीलं असणार हे नक्की. (शेवटी निर्वाणषटक व त्याचा अर्थ दिला आहे.)

आज ही समाधी वाहून गेली आहे. पूनर्निर्माण करताना शंकराचार्यांच्या या योगसमाधीस्थळाचीही सुंदर रचना केली जावी आणि तीही बंदिस्त नसावी. उघड्यावरती त्यांची सुंदर मूर्ती बसवून भोवती बाग करावी. मूर्तीपाशी निर्वाणषटक दगडात कोरून ठेवावे. कुणीही इथे बसला तर त्याला ती अनुभूती यायला हवी.        

निर्वाणषटकम्

मनोबुद्धयहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे ।
न च व्योमभूमिर्न तेजो न वायुश्चिदानंदरूप: शिवोऽहं शिवोऽहम् ॥

मन बुद्धी, अहंकार, चित्त यातील काहीही मी नाही; तसेच कान, जीभ, नाक, डोळे मी नाही; आकाश भूमी, तेज अथवा वायुही मी नाही (चित् म्हणजे ज्ञान) ज्ञान व आनंदरूप असा शिव मी आहे, मी शिव आहे

न च प्राणसंज्ञो न वै पंचवायुर्न वा सप्तधातुर्न वा पश्चकोश: ।
न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायुश्चिदानंदरूप: शिवोऽहं शिवोऽहम् ॥

प्राणसंज्ञक वायू, अथवा प्राण अपान इत्यादी पाच वायू मी नाही; रस, रक्त इत्यादी सात धातू (रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र) अथवा अन्नमयादी पाच कोष मी नाही ; वाणी, हात, पाय व इतर कर्मेंद्रिये मी नव्हे

न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभाव: ।
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष श्चिदानंदरूप: शिवोऽहं शिवोऽहम् ॥

मला कुणाबद्दल द्वेष नाही व आसक्ती नाही; लोभ व मोह मला नाही. गर्व मला कशाचाच नाही व कुणाबद्दल मत्सर नाही; धर्म, अर्थ, काम व मोक्ष या पुरुषार्थापैकी मला काही नको

न पुण्यं न पापं न सौख्यं न दु:खं न मंत्रो न तीर्थं न वेदा: न यज्ञा: ।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता श्चिदानंदरूप: शिवोऽहं शिवोऽहम् ॥

मला पुण्य नाही, पाप नाही, सुख नाही, दु:ख नाही, मंत्र, तीर्थ, वेद व यज्ञ यांच्याशी मला कर्तव्य नाही; मी भोजन-व्यापार नाही, भोज्य पदार्थ नाही व त्याचा उपभोग घेणाराही नाही

न मे मृत्युशङ्का न मे जातिभेद: पिता नैव मे नैव माता न जन्म ।
न बन्धुर्न मित्रं गुरूर्नैव शिष्यश्चिदानंदरूप: शिवोऽहं शिवोऽहम् ॥

मला मृत्यू नाही व मृत्यूची शंका व भिती नाही, जातिविषयक भेदभाव मला नाही; मला वडील आई नाही किंबहूना जन्मच नाही, कोणी नात्यागोत्याचे मित्र, गुरू वा शिष्य मला कोणी नाही.

अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि ।
सदा मे समत्त्वं न मुक्तिर्न बन्धश्चिदानंदरूप: शिवोऽहं शिवोऽहम् ॥

मी निर्विकल्प म्हणजे संकल्प, विकल्प, संशय यांनी रहित आहे, मी आकाररहित आहे, कारण सर्व ठिकाणी व सर्व इंद्रिये यांना मी व्यापून राहिलो आहे, मला कशाची आसक्ती नाही व म्हणून मुक्तिही नाही.

Sunday, June 16, 2013

नुसतेच वाळलेले गवत

लोकसत्ता लोकरंग पुरवणी दि १६ जून २०१३


मिलींद बोकील यांच्या ‘गवत्या’ कादंबरीने दोन बाबी प्रामुख्याने अधोरेखीत केल्या. 1. मिलींद बोकील हे कादंबरीकार नसून त्यांचा पिंड कथाकाराचाच आहे. 2. एक लेखक म्हणून आता बोकीलांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या असून त्या ते ओलांडतील ही शक्यता दिसत नाही.     
‘उदकाचिये आर्ती’ आणि ‘झेन गार्डन’ या दोन कथासंग्रहांच्या पलिकडे त्यांचे कुठलेच पुस्तक आतापर्यंत गेलेले नाही. ‘शाळा’ सारख्या कादंबरीतून वेगळा विषय मांडायचा ते आव आणत असले तरी त्यांचा मूळ पिंड लपत नाही.
आणिबाणीच्यानंतर बर्‍याच राजकीय कार्यकर्त्यांनी स्वयंसेवी संस्था सुरू केल्या. या एनजीओ’ज ना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर बर्‍यापैकी पैसा प्राप्त होवू लागला. 1978 ते 2008 म्हणजे 30 वर्षे हा खेळ बर्‍यापैकी चालला. अमेरिकेतील आर्थिक घोटाळ्यानंतर आणि युरोपातील आर्थिक आणिबाणीनंतर यावर मर्यादा आल्या. आणि आता या स्वयंसेवी संस्थांचा खेळ आटोपत आला आहे. मिलींद बोकीलांच्या जवळपास सगळ्याच पुस्तकांवर या स्वयंसेवी संस्थांची छाया आहे. कधी स्पष्ट तर कधी अस्पष्ट.
सर्वोदयी सेवक संघाचे सचिव घारपुरे यांच्या सोंडूर गावच्या केंद्रावर नौकरी साठी नायक येतो. शहरातल्या विविध छोट्यामोठ्या नौकर्‍या करून कंटाळलेला हा नायक पंडितराव या सीए असलेल्या दुरच्या नातेवाईकामुळे सोंडूर गावी नौकरी साठी येतो. तो ज्या संस्थेत काम करतो त्याचे नेमके स्वरूप काय हे शेवटपर्यंत लेखक स्पष्ट करत नाही आणि त्याला करावेही वाटत नाही. शशिकांत सावंत यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे दीर्घ वर्णनं यात येत रहातात. कादंबरी म्हणून येणारी विविध पात्रं, प्रसंग, त्यातील भव्य नाट्य, ताण-तणाव असं काहीही घडत नाही. ही कादंबरी नसून एक कथाच आहे हे परत परत जाणवत रहातं.  
सगळ्यात मोठा आक्षेप तर हा आहे की नायक हा सगळं नाकारणारा, भौतिक पातळीवरच्या सगळ्यांना नकार देणारा रंगवत असताना कादंबरीचा शेवट मात्र अशा नायकाला अमेरिकेतून बोलावणं येतं. कुणी धनाढ्य माणूस (हे नेमकं काय दुखणं डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांचं आहे कळत नाही. यांना समाजसेवा तर करायची पण ती शासनाच्या पैशानं किंवा कुणा धनाढ्य माणसाने दिलेल्या देणगीतून परत त्यानं कसल्याही अटी घातल्या नाही पाहिजेत. ज्याला तत्त्वश: विरोध करायचा त्याच्याच पैशावर यांच्या गमज्या.) मोठी देणगी देतो, त्या संस्थेत काम करायला नायकाला आमंत्रण असतं. 
चेतन भगत याला तद्दन व्यवसायिक लेखक म्हणून समिक्षक हिणवतात मग आता प्रश्न असा पडतो की मिलींद बोकील सारखा लेखकही चेतन भगत सारखाच व्यूह आपल्या लिखाणात रचत असेल तर त्याला काम म्हणावे? चेतन भगतच्या कादंबरीवर आधारीत थ्री इडियट चित्रपटात अमिर खान सकृतदर्शनी व्यवस्थेत बसण्यास कसा अयोग्य आहे हे दाखवत दाखवत त्यालाच पहिला नंबर मिळतो असं दाखवलं जातं. आणि जो कायम धडपडत असतो त्याला दुसरा नंबर. शिवाय त्याच्यावर शेवटी अमिर खान पाशी येऊन लाचारी करण्याची वेळ कशी आली हेच रंगवलं जातं. इथे नायकाला अमेरिकेचं आमंत्रण आल्यावर घरचं वातावरण कसं बदलतं. सगळ्यांना याच्या बुद्धिमत्तेचा कसा साक्षात्कार होतो वगैरे वगैरे चित्र रंगवलं जातं. हा मोह बोकीलांना कसा आणि का पडला?
यापेक्षा ‘माचिवरचा बुधा’ मधील गो.नि.दांडेकरांनी रंगवलेला बुधा कितीतरी प्रामाणिक आणि खरा आहे. तो म्हातारपणी माचिवर रहायला येतो. कुठलीही समाजसेवा करायला येत नाही. तिथल्या निसर्गात रममाण होतो. आणि शेवटी तिथेच खांबाला टेकून प्राण सोडतो. त्याच्या देहाला मुंग्या लागतात असा अप्रतिम शेवट करून एक उंची दांडेकरांनी गाठली आहे. बोकीलांच्या नायकाची प्रेरणा काय? आणि जर अमेरिकेतच जाण्यात इतकी इतिकर्तव्यता आहे तर मग त्यासाठी धडपडणारे त्याच्या शहरातील इतर लोक दुय्यम कसे? त्या सगळ्यांच्यापोटी नायक कायम तूच्छता, उदासिनता का दाखवत रहातो?
एक गुरूजी नावाचे पात्र नायकाला गुरूस्थानी, आदरस्थानी वगैरे वगैरे रंगवलेले आहे. मुलगा, सुन शेतकरी असलेली ही एक व्यक्तीरेखा. खरं तर ज्या पद्धतीनं त्याच्याबद्दल आत्मियता बोकीलांनी रंगवली आहे ते पहात तेच खरे या कादंबरीचे नायक शोभतात. नायकाच्या दृष्टीकोनातून गुरूजी जो आला आहे त्यातूनच लेखकाची दृष्टी कळते. पण परत बोकीलांवर त्यांच्यातील युवा संघर्ष वाहिनीचा कार्यकर्ता आरूढ होतो. वसंतराव देशपांड्यांसारख्या गायकासारखं जमत चाललेलं आपलंच गाणं विस्कटून टाकण्याची बुद्धि लेखकाला होते. म्हणून बहुतांश लिखाणातून ज्या खेड्यांबद्दल त्यांना आत्मियता आहे केवळ तिथेच राहणारा, सर्व प्रेरणा त्याच वातावरणातून घेणारा आणि तिथेच इतिकर्तव्यता मानणारा नायक त्यांना रंगवता येत नाही इच्छा असूनही. इतकंच नाही तर दुसरीही एक अडचण बोकीलांची होते. त्यांना पूर्णपणे झोकून देणार्‍या निसंगपणे काम करणार्‍या कार्यकर्त्याबद्दल पूर्ण आत्मियता आहे (उदकायिचे आर्ती या कथेतील नायिका जी मेधा पाटकरांवरून रंगवली आहे, बाकी इतिहास कथेतील नायक) पण सोबतच तथाकथित ‘करिअर’चे आणि शहराचे आकर्षण त्यांचे संपतच नाही. जसं ग्रामीण कादंबर्‍यांमधून नायकाला कायम महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नौकरी मिळण्याची आस असते. (‘बारोमास’ सारखी अकादमी पुरस्कर विजेती कादंबरी कुठल्याही पानावर ‘...आणि त्याला महाविद्यालयाचा शिक्का असलेला खाकी लिफाफा आला. ज्यात त्याच्या नौकरीच्या कायमस्वरूपी आदेशाचे पत्र होते.’ हे वाक्य टाकले की संपून जाते). या द्वंद्वात हा नायक मग नेहमीच छोटं गाव, खेडं सोडून तरी जातो की त्याचा रस हळू हळू संपून तरी जातो. 
बोकीलांच्या लिखाणात कायम शहरातून खेड्यात काम करायला येणारा स्वयंसेवी संस्थातील कर्मचारी, कार्यकर्ता दाखवला जातो. किंवा या सगळ्या कामाबद्दल आस्था असणारा नायक रंगवला जातो. हा खेड्यात जातो. त्याला तिथल्या जनजिवनाबद्दल आस्था असते. मग तो खेड्यातील मुख्य व्यवसाय असलेल्या शेतीबद्दलच नेमका अनभिज्ञ कसा असतो? याला आदिवासींबद्दल आकर्षण आहे. तो त्यांच्या वस्त्यांवर जातो, सण समारंभात सामिल होतो. त्यांच्याबरोबर दारू पितो. सगळं काही. पण हेच शेतकर्‍यांबाबत का नाही करत? प्रत्यक्ष शेतीवर जाउन तिथली सगळी समस्या समजून घेण्याबाबत याला अनास्था का आहे? डाव्या चळवळीत असल्यामुळे एखादी मुस्लिम व्यक्तिरेखा ही हवीच. मग हा त्यांच्या घरात कसा जातो आणि त्या मित्राच्या आईच्या हातची बिर्याणी कशी खातो आणि ती कशी चविष्ट असते, त्या मित्राची चुलत बहिण कशी याला आवडते, तिच्याशी भेटायला हा दर्ग्यावर कसा जातो वगैरे वगैरे साचेबद्ध चित्रण बोकीलांसारखा लेखक करत जातो तेंव्हा कळत नाही हे कशासाठी आहे. किंवा उलट कळत जाते की हे सगळे डाव्यांची तथाकथित खोटी उदारमतवादी वृत्ती दाखविण्यसाठीच आहे.  
जो काळ बोकील रंगवतात तो 1975 नंतरचा काळ आहे. म्हणजे साधारण: आणिबाणी आणि त्या नंतरचा काळ. नेमकं याच काळात शेतकरी आंदोलन सुरू झालेलं आहे. म्हणजे तिकडे शेतकरी आपल्याभावासाठी लढत आहेत, त्या प्रश्नाची शास्त्रशुद्ध मांडणी केली जात आहे. आणि याच काळात बोकील त्यांच्या कादंबरीतील आदिवासींना विहीरीवर मोटर बसवून पाणी कसं उपसता येईल आणि शेती कशी करता येईल या खटाटोपात दिसतात. आता जर शेती हे कलमच मुळात तोट्याचं असेल तर ते अडचणीत असलेल्या आदिवासीनी कसं काय फायद्याचं ठरू शकेल? आणि फक्त पोटापुरता विचार केला तर 1972 च्या दुष्काळानंतर आजतागायत कधीही संपूर्ण भारतात अन्नधान्याची टंचाई उरलेली नाही. शासनाची गोदामं भरून अन्न सडून गेल्याची उदाहरणं आहेत पण अन्नाचा दुष्काळ पडल्याचं एकही उदाहरण नाही. हे बोकीलांना समजून घ्यायचं आहे की नाही? बोकीलांचे सृजनात्मक लिखाण सोडा त्यांच्या इतर लिखाणातही शेतकरी मध्यवर्ती येत नाही. (‘कातकरी व्यवस्थापन आणि विस्थापन’, ‘मेंढा गावची गोष्ट’ वगैरे पुस्तकं)
स्वयंसेवी संस्थांतील डाव्या विचारांचा शहरी कार्यकर्ता हा बोकीलांच्या लिखाणाचा मध्यवर्ती नायक आहे. हे व्यक्तिमत्व मुळातच दुभंगलेलं आहे. नेहरूप्रणित समाजवादी व्यवस्थेचे सगळे फायदे शहरांनी आणि त्यात रहाणार्‍या मध्यवर्गीयांनी उचलले. त्यासाठी ग्रामीण भागाचे आणि शेतीचे प्रचंड शोषण केले. हे समजणारा एक वर्ग असा तयार झाला की त्याला अपराध गंड निर्माण झाला. त्यातून यांनी खेड्यात कामं करण्याचा ध्यास घेतला. खेड्यात जाताना तिथल्या समस्येची कॅन्सरची गाठ असलेला शेतीचा प्रश्न यांच्या गैरसोयीचा होता म्हणून मग यांनी नेमका तो सोडून बाकी सगळ्यावर आपली शक्ती खर्च करायला सुरवात केली. सुरवातीला यात असलेला प्रामाणिकपणा संपून परदेशातून मिळणार्‍या प्रचंड आर्थिक देणग्यांमुळे व्यवसायिकता आली. या सगळ्याला दिलेला साहित्यीक कलात्मक मुलामा म्हणजे बोकीलांचे लिखाण.
‘उदकाचिये आर्ती’ आणि ‘झेन गार्डन’ या दोन कथा संग्रहातून हा अनुभवाचा ऐवज वापरून नितांत सुंदर लिखाण करणारा हा लेखक स्वत:तच अडकत गेला. त्यांची नुकतीच प्रकाशित झालेली ‘महेश्वर’ नावाची दिर्घकथा वाचा. म्हणजे आपण ‘गवत्या’ ही कादंबरी वाचतो आहोत की ‘महेश्वर’ ही दीर्घकथा वाचतो आहोत हे कळणारच नाही इतका गोंधळ लेखकाने करून ठेवला आहे. लग्न संसार व्हायच्या आधीचा ‘गवत्या’चा नायक आणि सगळं संपून भोगून निवृत्त झालेला ‘महेश्वर’ चा नायक एकाच जागी आलेले आहेत. (‘शोधयात्रा’ या पुस्तकात अरूण साधूंनी हा व्यूह वापरलाही आहे.)  ही या नायकांची मर्यादा नसून लेखकाचाच आवाका संपल्याची खुण आहे.
पुस्तक मौज प्रकाशनाने काढले हेही एक बरेच झाले. म्हणजे हे या प्रकाशनाचेही अपयश आहे हे सिद्ध होत आहे. नेमाडे यांच्या वयाला 75 वर्षे पूर्ण झाली शिवाय ‘कोसला’लाही 50 वर्षे झाली. अशी कादंबरी आपल्या प्रकाशनाकडून आली नाही याची खंत श्री.पुं.नी व्यक्त केली होती. नविन साहित्यीक प्रवाहांना समजून आणि सामावून घ्यायला तर ‘मौज’ प्रकाशन कमी पडलेच पण नविन हाती आलेल्या लेखकांना मुक्तपणे वाढू न देता त्यांना खुरटं करण्याचे काम मौजेने केले असेच म्हणावे लागेल. आपल्या भावविश्वाशी प्रमाणिक राहून लिखाण करणार्‍या प्रकाश नाराण संत, आशा बगे, सानिया अशा लेखकांचे दर्जेदार साहित्य समोर आणता आणता कुठं झोपडपट्टीत जा, कुठे खेड्यात जा, कुठं मुसलमानांच्या वस्त्यांत जा असं करायला लावून मोनिका गजेंद्रगडकर, मिलिंद बोकील सारख्या लेखकांना लेखक म्हणून संपवून टाकण्याचं काम मौजेनं केलं आहे.
विनय हर्डिकरांनी मौजेवर जे आरोप 30 वर्षांपूर्वी केले होते ते बोकीलांच्या ‘गवत्या’ने आजही खरे आहेत हे सिद्ध केलं आहे. जर बोकीलांच्या लिखाणात मौजेच्या संपादकांचा आणि हस्तलिखित वाचणार्‍या तथाकथित तज्ज्ञांचा हात नसेल तर मात्र हे अपयश पूर्णपणे बोकीलांचे आहे असं म्हणावं लागेल. असं म्हणलं तर परत पंचाईत की मग मौज आजकाल लेखकाच्या हस्तलिखितात फार ढवळाढवळ करत नाही म्हणावं लागेल. मग परत गोची ही की पुस्तक प्रकाशित करायला उशीर का होतो हे सांगता यायचे नाही. पुस्तकं प्रकाशित करायला होणारा उशीर ही लंगडी सबब मौजेला आजकाल सांगायला जागा तशीही उरली नाही. कारण अच्युत गोडबोले आणि मीना प्रभूंची पुस्तकं ज्या झपाट्याने मौजेने काढली आणि त्याच्याही दुप्पट झपाट्याने ते लेखक मौजेतून पसार झाले त्यावरून हे सिद्ध झालेच आहे. 
इवलासा मजकूर चारशेपानांपर्यंत रंगवून ठूमरीला ख्यालासारखं रंगविण्याचा प्रयत्न मिलिंद बोकीलांनी केला आहे. आणि त्याच्या तोडीस तोड चंद्रमोहन कुलकर्णी यांनी पुस्तकाची सजावट सुंदर केली आहे. ते काय काहीच साहित्य मुल्य नसलेल्या संदीप खरेंच्या पुस्तकाची सजावटही नितांत सुंदर करू शकतात. फक्त अडचण इतकीच आहे की यापुढे मला आवडलेल्या पुस्तकाचेच मुखपृष्ठ मी करतो हे म्हणण्याचा हक्क त्यांनी गमावला आहे.
‘गवत्या’च्या निमित्ताने पन्नासहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या ‘मौज’सारख्या प्रकाशनाच्या वाङ्मयीन गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत हे नक्की. 

Saturday, June 15, 2013

मुसा के डासां भौत हे मगर । गोमती के मच्छर नकूच नकू ॥

दै, कृषीवलच्या ‘उरूस’ सदरातील माझा लेख दि. १५ जून २०१३

स्वातंत्र्यापूर्वी हैदराबाद राज्यात निजामाच्या दरबारात दोन गट पडलेले होते. स्थानिक भाष बोलणारे, स्थानिक रिती रिवाज परंपरांचे जतन करणारे लोक यांचा एक गट. आणि हैदराबाद राज्याच्या बाहेरून आलेले, फारसी मिश्रीत उर्दू ही सर्वश्रेष्ठ भाषा मानणारे उत्तरप्रदेशातून आलेले लोक यांचा दुसरा गट. उत्तरप्रदेशातील गोमती नदीच्या काठावरील हे बाहेरचे लोक आणि हैदराबाद मधून वाहणार्‍या मुसा नदीच्या काठचे लोक असा तो सुप्त संघर्ष होता. हैदराबाद राज्यात जी भाषा बोलली जाते तीला दखनी म्हणतात. ही भाषा म्हणून उर्दूची लोकभाषा आहे असा एक गैरसमज आहे. वस्तूत: ही भाषा याच परिसरातील स्वतंत्र भाषा असून तिचे व्याकरण बहुतांश वेळा मर्‍हाठीप्रमाणे चालते हे श्रीधरराव कुलकर्णी यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. या भाषेत डासांना डासच म्हणतात मच्छर म्हणत नाहीत. झाडाला झाडच म्हणतात. पेड म्हणत नाहीत. बाहेरून आलेले लोक स्वत:ला जास्त शहाणे समजातात म्हणून त्यांना मारलेला हा टोमणा आहे,
मुसा के डांसा भौत है मगर । गोमती के मच्छर नकूच नकू ॥
या दखनी भाषेबाबत श्रीधर रंगनाथ कुलकर्णी यांचे एक मोठं सुंदर पुस्तक आहे. ‘दखनी भाषा : मर्‍हाटी संस्कृतीचा एक अविष्कार’ या नावाचे. त्यांच्याच ‘साहित्यसेतू’ या पुस्तकाचा संदर्भ मी मागच्या लेखात दिला होता (मराठी ही हिंदीची उपभाषा नसून हिंदीला समृद्ध करणारी भाषा आहे, 1 जून 2013). दखनी भाषेवरचे हे पुस्तक राज्य मराठी विकास संस्थेनेनेच प्रकाशित केले आहे. या पुस्तकात श्रीधररावांनी मोठ्या चिकाटीनं संशोधन करून दखनी भाषा ही मर्‍हाटी संस्कृतीचा एक अविष्कार कसा आहे हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
आधुनिक भारतीय भाषांचा साहित्यातील प्रारंभ साधुसंतांच्या कवनांनी झालेला आहे. ही भाषा कोणती होती? आपआपल्या परिसरात बोलली जाणारी भाषा समजून घेवून साधुसंतांनी त्या भाषेत रचना केल्या. महाराष्ट्रातील मराठवाडा, कर्नाटकातील बीदर, रायचूर, गुलबर्गा हे तीन जिल्हे आणि आंध्र प्रदेशातील तेलंगणा विभाग यांचे मिळून हैदराबाद राज्य होते. या प्रदेशात साधुसंतांनी ज्या भाषेत रचना केली त्या भाषेला ‘बैरागी’ भाषा म्हटले जाते. गोरखनाथादी सिद्ध आणि त्यांची ‘बैरागी’ भाषा यांचे उल्लेख ‘लीळाचरित्रात’ आलेले आहे.
या दखनी भाषेला उर्दूची बोलीभाषा म्हणून संबोधले जाणे हे मुळातच चुक आहे. दखनी भाषेत उर्दूच्या तीनशे वर्षे आधी काव्यरचना झालेली आहे. म्हणजे बोली भाषा आधी आणि प्रमाण भाषा नंतर असे कसे होईल? या दखनी साहित्याचा प्रारंभ बहामनी राजवटीत ( 1347 -1527) या काळात झाला. 1707 मध्ये मृत्यू पावलेला वली औरंगाबादी हा दखनीचा शेवटचा कवी. वली औरंगाबादीचे आपल्या दखनी भाषेवर विलक्षण प्रेम होते. त्याचबरोबर त्याचा दक्षिण प्रदेश व या परिसरातील मराठी लोक यांच्यावरही विलक्षण जीव होता. त्याची एक रचना मोठी सुंदर आहे.
आज माशुक लडका मरहटा है ।
मिठाई बंद शकरसूं मीठा है ।
सजन है सांवला सजका सजीला ।
कटीवा होर हटीला लटपटा है ।
दखनी भाषेचा मराठी अनुबंध केवळ वरवरचा नाही. तर साधुसंतांच्या काव्यात जे आध्यात्म मराठी संतांनी सांगितले तीच रचना दखनी भाषेतही करण्यात आली.
संत रामदासांच्या ‘मनाच्या श्लोका’चा अनुवाद शाह तूराब यांनी दखनीत केला ही एक फार महत्त्वाची घटना आहे. शाह तुराब (इ.स.1695 ते 1787) या तामिळनाडूतील वेल्लोर  येथील सूफी संताने (याच सुफी संतांची कबर परभणी येथे आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात तिथे मोठा उरूस भरतो. अजमेरच्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तीच्या उरूसानंतर याच उरूसाचा नंबर लागतो. या सदराचे नावही मी याच संताच्या फेब्रुवारी महिन्यात भारणार्‍या उरूसावरून ‘उरूस’ ठेवले आहे. )
आत्माराम ओळखावा हे रामदासांच्या श्लोकांचे मर्म शाह तुराब यांनी आपल्या भाषेत मोठे सुंदर मांडले आहे
कही देवपूजे कूं मंदिर बनाते
कंही तोड देवल मशीत उंचाते
जिनके आत्मराम का घर पछाना
अरे मन नको रे नको हो दिवाना
तुराब ने नही झूट ये बात बूजा
महादेव होर राम मे नही है दूजा
आपस तो आपी आप को करता है पूजा
पुछो रामदास और को जा ॥
फक्त संतांच्या रचनेतच दखनी शब्द आहेत असं नाही. तर सगनभाऊ सारख्या शाहिरांच्या लावण्यातही दखनी भाषा आणि शब्द आले आहेत. म्हणजेच ही भाषा जनसामान्यांची या परिसरातील भाषा होती हे सिद्ध होते.
दाद कोई नही देता मै तो जोगिन होउंगी ।
राख लावा माझ्या अंगी ॥
हाल हाल फकीरी लेऊ धूंडत बन बन मे जाऊ ।
सख्याला दृष्टीने पाहू ।
प्रीतम प्यारे हो गये न्यारे  बिडा किसे देऊं ।
कोण्या समजूतीने समजाऊ ।
सगनभाउंच्या या रचनेत तर मराठी आणि दखनी ओळी एकमेकांच्या आड आलेल्या आहेत. दखनीत भाषेत जी शब्दांची रूपं येतात ती रूपं सरळ सरळ मराठीसारखीच आहे. मी काय पाप केले म्हणून असा नवरा मिळाला (दखनी-मै क्या पाप करी बोलके ऐसा शोहर मिल्या.) त्याने मी येत नाही म्हणून सांगितले. (उन्ने मै नई आताउ बोलके कह्या.) त्यांना घोडा मिळाला नाही म्हणे (उनकू घोडा नई मिल्या कते.)
इतकंच काय पण वाक्प्रचारही तसेच आहेत. इकडे आड तिकडे विहीर, (इधर बाई उधर कुवां), गर्भगळित होणे (गरब गलना), नाव टाकणे/सोडणे (नांव छोडना), साटे बुद र्‍हाटे (साठी बुद्धी नाठी). आपल्या पुस्तकात श्रीधररावांनी दखनीमध्ये येणार्‍या मर्‍हाटी शब्दांची प्रचंड मोठी यादीच दिली आहे. म्हणजे दखनीचे व्याकरण मराठीप्रमाणे चालते, शब्दांना प्रत्यय मर्‍हाटीप्रमाणे येतात, वाक्प्रचार, म्हणी मराठीसारख्या आहेत. स्वाभाविकच दखनी ही मर्‍हाटी संस्कृतीचा एक देखणा आविष्कार आहे.
या वर्षी औरंगाबादमधली 20 मुलांना तैवानच्या विद्यापीठात अभियांत्रिकी शिक्षणासाठी निवडले गेले. त्यांच्यातला एक विद्यार्थी आकाश धुमणे माझा मित्र आहे. त्याच्याशी एकदा व्हिडीओवर बोलत असताना अचानक माझ्या कानावर ‘रोडां पे मजाका नही करते रे.’ हे वाक्य आले. मी आकाशला विचारले तूझ्या बाजूला कोण मुलगा आहे? तो कुठला आहे? त्याने सांगितले त्याचे नाव अब्रार असून तो औरंगाबादचाच आहे. त्याची ही भाषा आम्हाला खुप आवडते. इतकंच नाही तर या दखनी भाषेतील ‘अंग्रेज’ हा चित्रपट सध्या आम्हा दोस्तांमध्ये हिट आहे.
बहामनी साम्राज्यात विकसित झालेली दखनी आजच्या काळात परदेशात शिकणार्‍या 19-20 वर्षांच्या मुलांनाही खुप आवडते. इतकंच नाही तर या भाषेत चित्रपटही निघतात. ते लोकप्रियही होतात. अशा एका भाषेत आपल्या मर्‍हाटी भाषेचे मोठे योगदान असते हे आमच्या लक्षातच येत नाही. आजच्या मराठी मुलांनाही या भाषेचे आकर्षण आहे.
मध्यंतरी प्रसिद्ध मर्‍हाटी पटकथाकार अभिनेते अरविंद जगताप याने अभिनेता सयाजी शिंदे सोबत आपला एक फोटो फेसबुकवर टाकला. ‘फलकनुमा पॅलेस मध्ये मी सयाजी सोबत’ असं त्या फोटोखाली लिहीलं होतं. फलकनुमा पॅलेस म्हणजे हैदराबाद हे माझ्या लक्षात आले. मी त्याच्यावर गमतीने दखनी भाषेत एक शेरा टाकला, ‘क्या मियां, सफेद शर्टा, जिन्स के पँटा पहेन के फलकनुमा पॅलेस मे क्या करे? वेटर ने रात की बिर्यानी सुबह गरम करके दी तो नही बोले और वेटरां को फल्ली का सुखा सालन (शेंगदाण्याची कोरडी चटणी) मांग मांग के परेशान किये..’ या शेर्‍यावर बहुतांश मर्‍हाटी तरूण मुलांनी आपल्या आवडीची मोहोर उमटवली.
आज भाषा नविन संपर्काच्या साधनांनी जगभर अतिशय कमी वेळात पोचत आहे. आपल्या मनातील भाव व्यक्त करायला आधुनिक तंत्रज्ञान शिकणार्‍या अब्रारसारख्या विद्यार्थ्यालाही ‘रोडां पे मजाकां नही करते’ हेच शब्द वापरावे वाटत असतील आणि त्याच्या मित्रांनाही ती भावना याच शब्दांतून तंतोतंत समजून येणार असेल तर आपण काय म्हणणार? आपण हे समजून घेणार आहोत की नाही?

Sunday, June 9, 2013

नांदापुरकर । तूम्हास स्मरणे । मराठी कारणे । अनिवार्य॥

दैनिक महाराष्ट्र टाइम्स दि. ९ जुन २०१३ मधील लेख 

मराठवाडा साहित्य परिषदेच्या औरंगाबाद येथील सभागृहास डॉ. नांदापुरकरांचे नाव दिलेले आहे. त्यांचे एक तैलचित्र तिथे लावले आहे. शिवाय ‘माझी मराठी मराठाच मीही’ ही नांदापुरकरांची ओळ मराठवाडा साहित्य परिषदेच्या बोध चिन्हावर बोधवाक्य म्हणून विराजमान आहे. साहित्य परिषदेतील एका कार्यक्रमात एक तरूण पत्रकार मला बाजूला घेवून दबक्या आवाजात म्हणाला, ‘‘सर माफ करा पण हे नांदापुरकर कोण होते हो? मला खरेच माहित नाही.’’ मी त्याला थोडक्यात माहिती दिली. त्याच्याशी बोलताना माझ्या प्रकर्षाने लक्षात आले की नांदापुरकरांनी मराठीसाठी बाळगलेला ध्यास पाहता त्यांची आठवण आजच्या काळात परत तीव्रपणे येते आहे.
डॉ. नारायणराच नांदापुरकर तेंव्हाच्या हैदराबाद राज्यातील मराठीचे पहिले पीएच.डी.मराठी विषयात संशोधन करण्याची सोय तेंव्हा या प्रदेशात नव्हती. नांदापुरकरांनी ही डॉक्टरेट नागपूर विद्यापीठातून मिळवली. नांदापुरकरांच्या या कतृत्वाने संपूर्ण मराठवाड्याला आनंद झाला. त्यांचे सत्कार करण्यात आले. परभणीच्या जनतेने त्यांचा भव्य सत्कार करून त्यांना रू. 1000/- ची थैली त्या काळी अर्पण केली.
नांदापुरकरांचा जन्म नांदापुर या गावी (तेंव्हाचा परभणी जिल्हा, ता. कळमनुरी) 14 सप्टेंबर 1901 रोजी झाला. गावातील प्राथमिक शिक्षणानंतर हैदराबाद येथे माध्यमिक शिक्षण त्यांनी घेतले. परभणीतून मॅट्रिकची परिक्षा दिली.  आणि हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून बी.ए.ची पदवी मिळवली. नांदापुरकरांचा औरंगाबादशी पहिल्यांदा निकटचा संबंध आला तो त्यांच्या नौकरीच्या निमित्ताने. औरंगाबाद येथे इंटरमिजिएट महाविद्यालयात त्यांनी अध्यापकाची नौकरी काही काळ केली. त्यानंतर उस्मानिया विद्यापीठात त्यांची प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. काही काळानंतर त्यांची नियुक्ती मराठी विभाग प्रमुख म्हणून झाली. आयुष्याच्या शेवटपर्यंत ते उस्मानिया विद्यापीठाच्या मराठी विभागातच कार्यरत होते.
डिसेंबर 1995 मध्ये परळी वैजनाथ येथे भरलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. नांदापुरकरांनी भूषविले होते. आपल्या अध्यक्षीय भाषणाचा समारोप करताना नांदापुरकर म्हणाले होते, ‘...मराठवाडा स्वत:चे कांही वैचारिक, तांत्रिक, साहित्यीक धन एकंदर महाराष्ट्रास देऊ शकतो. एकंदर जनता जरी मागासलेली असली तरी तरुण सुशिक्षित वर्ग एकंदर महाराष्अ्रांतील तरुणांची सर्वच प्रकारांत समानतेने स्पर्धा करणारा दिसून येईल. संधी आणि साधने मिळाल्यास एकंदर महाराष्ट्रीय समाजांत एकरूप होऊन जाण्यास कांहीच अवकाश नाही.’नांदापुरकरांचा हा आशावाद आजही वास्तवात उरतलेला नाही. तो अजूनही आशावादच उरला आहे हे वेगळे सांगायची काही गरजच नाही.
नांदापुरकरांबद्दल सामान्य मराठी जनांना आस्था वाटायची त्याचे कारण त्यांची विद्वत्ता हे तर होतेच पण त्याहीपेक्षा त्यांनी लोकगीतांसंदर्भात केलेले काम हे आहे. मराठवाड्यात सर्वत्र फिरून नांदापुरकरांनी लोकगीते गोळा केली. जात्यावरच्या ओव्यांमधून आख्खे रामायण उभे करण्याचा त्यांचा प्रकल्प तर केवळ अप्रतिम. जागतिक वाङ्मयातील ही एकमेव घटना आहे. आभिजात वाङ्मय म्हणविल्या गेलेले रामायण, सर्वसामान्य बायकांच्या तोंडी असलेल्या अलिखित ओव्यांमधून पूर्णपणे उभे कसे राहते, त्याचे विविध मानवी पैलू कसे समोर येतात हे थक्क करणारे आहे.
जनाबाईच्या गंगाखेड परिसरात जनाबाई, विठ्ठल आणि रूक्मिणी यांच्यावरील अप्रतिम ओव्या नांदापुरकरांना सापडल्या आहेत. स्त्रीच्या मत्सरग्रस्त स्वभावानुरूप रूक्मिण विठ्ठलाला विचारते, ‘इठ्ठलाचे पाय ।  रूक्मिण दाबी राग । खरं सांगा इठ्ठला । जना तूमची कोन लाग ॥ याला विठ्ठलाने दिलेले उत्तर बायकांनीच ओव्यात सुंदररित्या मांडलं आहे. ‘इठ्ठल मनीती । नको रक्मिनी राग करू । जना धर्माचं लेकरू । आलं थार्‍याला पाखरू ॥
 नांदापुरकरांनी गोळा केलेल्या या ओव्यांतून ‘मराठवाड्यातील स्त्री रचित रामकथा’ हा ग्रंथ डॉ.सौ. उषा जोशींनी संकलीत केला आणि हैदराबादच्या मराठी साहित्य परिषदेने त्याचे 1990 मध्ये प्रकाशन केले. बरं या ओव्या नुस्त्या माहितीपर नाही. तर त्यातून एक कलात्मक जाणिवही नांदापुरकरांनी दाखवून दिली आहे.
दारी मांडव ग घाला । फुलासगट जाईचा । छंद रामाच्या आईचा ॥
या ओवीतील रामाची आई कौसल्या नुसत्या मांडवाचा आग्रह धरत नसून फुलासगट जाईच्या मांडवाचा आग्रह धरते आहे. दशरथाला मिळालेले दान त्याने पायसाचे तीन वाटे करून तीन राण्यांना दिले. त्याचे चार पुत्र कसे झाले याची एक सुंदर कथा बायकांनी रचली आहे.
कैकयी रूसली । मागल्या मानासाठी । पिंड घारीनं झपाटिली । नेली आकाशाच्या पोटी ॥
पिंड घारीनं झपाटिली । पडली अंजनीच्या हाती । त्याचे जन्मले मारोती ॥
कौसल्या सुमित्रानं । पिंड वाटून दिले । येका पिंडा दोघं झाले । भरत शत्रुघ्न ॥
बायकांच्या या रचनांमधील सौंदर्य नांदापुरकरांना सापडले. त्यांनी ते मोठ्या मेहनतीनं गोळा केलं आणि जगाच्या नजरेसमोर आणले. या कामासाठी त्यांच्याबद्दल सामान्य जनांना आस्था वाटत राहिली.
‘मायबोलीची कहाणी’ नावाची एक गद्य कविता नांदापुरकरांनी लिहीली. ती तर केवळ अप्रतिम. आजही मराठी भाषेसंदर्भात असले गद्य काव्य दुसरे निर्माण झाले नाही. गद्य भाषेत जी एक नितांत सुंदर लय असते त्याचा अनुभव नांदापुरकरांच्या या रचनेत येतो. मराठीमध्ये लीळाचरित्राचे गद्यकाव्याचे सगळ्यात मोठे उदाहरण आहे. गद्य काव्याचे प्रयोग फार थोडे झाले आहे. अगदी अलिकडच्या काळात भालचंद्र नेमाडेंच्या हिंदूमध्ये हा प्रयोग नेमाडेंनी मोठ्या ताकदीने केला आहे.
नांदापुरकर मराठी भाषेची जन्म कथा सांगताना लिहीतात,
‘देवाने तिच्यासाठी महाराष्ट्राचा पाळणा केला. त्यावर आपल्या कृपेचा चांदवा केला. त्याला सह्य आणि सातपुड्याची खेळणी लटकाविली. चांदव्याच्या भवती वनश्रीची झालर लाविली. कृष्णा-गोदा यांचा गोफ विणून पाळण्याला हालविण्यासाठी दोरी केली. इकडून मातापुरवासिनी रेणुका आली. तिकडून तुळजापुरची आई भवानी आली. त्यांनी पाळणा म्हटला. साधुसंतांनी तिचे नाव ’मराठी’ असे ठेविले. बाळांनो, हीच तुमची माय मराठी- आमची कहाणी थोडी, तिची अवीट गोडी.
ही कहाणी ऐकल्याने काय होते? अंगीचा आळस जातो, कर्तृत्वाचा कळस होतो. मोठ्यांचा दूरभिमान जातो. लहानाअंगी स्वाभिमान येतो. देशाचे दारिद्य्र दूर होते. काशीची कावड रामेश्वराला जाते. गंगथडीचा हुरडा काबुलात भाजतो. काबूलचा मेवा परसात पिकतो. ’
मराठी भाषेची महती सांगताना विश्वात्म भान नांदापुरकर विसरले नाहीत. गंगथडीचा हुरडा काबुलात भाजतो म्हणत त्यांनी हे धागे जोडले आहेत.
डॉ. ना.गो.नांदापुकरांचे समग्र साहित्य त्यांच्या जन्मशताब्दि वर्षात प्रकाशित करण्याचा प्रकल्प हैदराबादच्या मराठी साहित्य परिषदेने हाती घेतला. त्याला काही अडथळे आले तेंव्हा प्रकल्पाचे मुख्य संपादक प्रा.द.प.जोशी यांनी माझ्यापाशी हे काम पूर्ण होते की नाही याबद्दल खंत व्यक्त केली. मी स्वत: हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी घेतो म्हणून त्यांना आश्वासन दिलं व त्याप्रमाणे कामही सुरू केलं. योगायोगाने महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पासाठी वेगळा निधी मंजूर केला. आम्ही सादर केलेला वेगळा प्रस्ताव मागे घेवून मी त्या प्रकल्पात सह-संपादक म्हणून सामिल झालो. ऑक्टोबर 2004 मध्ये समग्र नांदापुरकरांच्या दोन्ही खंडांचे प्रकाशन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाले. आज नांदापुरकरांचे सर्व साहित्य अभ्यासकांना उपलब्ध आहेत. वाईट याचेच वाटते नविन पिढीत नांदापुरकरांच्या साहित्याचा अभ्यास करणारे फारसे कुणी आढळत नाहीत.
आम्ही नांदापुकरांच्या नावे सभागृह केले, त्यांच्या नावाची व्याख्यानमाला चालवून साहित्य परिषद आपले कर्तव्य चोखपणे पार पाडते आहे. पण त्यांच्या साहित्याचे काय? त्याचा अभ्यास कोण करणार?
9 जून 1959 रोजी नांदापुरकरांचे निधन झाले. त्यांनी मराठीसाठी बाळगलेला ध्यास, मेहनतीने लोकगीते गोळा करून केलेले काम याचे महत्त्व आजही वाटते. जी ओळ मराठवाडा साहित्य परिषदेचे बोधवाक्य झाली आहे त्या कवितेतील काही ओळी कायमच्या स्मरणात राहणार्‍या आहेत.

माझी मराठी असे मायभाषा हिच्या कीर्तिचे तेज लोकी चढे
गोडी न राहे सुधेमाजि आता, पळाली सुधा स्वर्गलोकांकडे

आम्ही मराठे हिचे पुत्र लोकी कधी भ्यावयाचे मुळी ना कुणा
आकंठ प्यालो हिचे दुग्ध अंगी पहा रोमारोमांतुनी या खुणा
तोडा चिरा दुग्ध धाराच येती न हे रक्त वाहे शरीरातूनी
‘माझी मराठी मराठाच मी ही’ असे शब्द येतील हो त्यातुनी

मराठीचा द्वेष करणार्‍या निजामी राजवटीच्या काळात नांदापुकरांनी आपले भाषाभान जागते ठेवले आणि भाषेसाठी काम केले. आज कमालीची अनुकूलता असताना आणि स्वभाषा राजभाषा कसताना आम्ही काय करतो हा प्रश्न प्रत्येकालाच पडला पाहिजे. त्यासाठीच म्हणावे वाटते
नांदापुरकर । तूम्हास स्मरणे । मराठी कारणे । अनिवार्य ॥
  
 

Saturday, June 1, 2013

मराठी ही हिंदीची उपभाषा नसून हिंदीला समृद्ध करणारी भाषा आहे


दै. कृषिवल, उरूस सदरातील माझा लेख, दि. 1 जून 2013


‘मराठी ही हिंदीची उपभाषा आहे’ अशी चर्चा सध्या माध्यमांमधून सुरू आहे. हिंदीचे मोठेपण ठरवित असताना मराठीला दुय्यम स्थान देण्याची खरे तर काही आवश्यकता नाही. कुठलाही मराठीभाषाप्रेमी हे सहन करू शकत नाही. या संदर्भात काही पुस्तके चाळत असताना मला श्रीधर रंगनाथ कुलकर्णी यांच्या ‘साहित्यसेतू’ या पुस्तकाची आठवण झाली. मराठी संतांच्या हिंदी काव्याची मीमांसा असे या पुस्तकाचे उपशीर्षक आहे. मराठी ही हिंदीची उपभाषा तर सोडाच पण हिंदीतील भक्तीसाहित्याची निर्मितीच मुळात नामदेवांपासून झाली असा सिद्धांत श्रीधरराव कुलकर्णी यांनी मांडला आहे. म्हणजे आत्तापर्यंत बचाव करण्याच्या मानसिकतेत मराठी भाषीक होते पण आता तर हे सगळे संदर्भ बचावाचे नसून उलट हिंदीला मराठीने जे योगदान दिले त्याचे आहेत. शिवाय मराठीची परंपरा स्वतंत्र आणि समृद्ध आहे.
12 व्या शतकापर्यंत सिद्धसंप्रदाय भारतभर अस्तित्वात होता. आदीसिद्ध सरहपा हे आठव्या शतकातील. गोरखनाथांनी यांच संप्रदायास लोकाभिमुख करत पुढे नेले. ज्ञानेश्वरांना हीच गुरूपरंपरा लाभली. नामदेव याच परंपरेचे पाईक. त्यांनी सिद्धांच्या भाषेत रचना केली. ते भारतभर फिरले. नामदेवांची हिंदीसदृश्य काव्याची  भाषा व कबीरांची भाषा यात विलक्षण साधर्म्य आहे. पुढे कबीर व नानक यांनी नामदेवांचा केलेला जो गौरव आढळतो त्यावरून हे अधोरेखीत होते.
डॉ. रामकुमार वर्मा यंाच्या ग्रंथातील मत श्रीधररावांनी दिले आहे, ‘इस प्रकार कहा जा सकता है कि उत्तर भारत मे संतसंप्रदाय का जो उत्थान वैष्णव भक्ति को लेकर हुआ उसका पूर्वार्ध महाराष्ट मे विठ्ठल संप्रदाय के संतो द्वारा प्रस्तूत हो चुका था, जिन मे ज्ञानेश्वर और नामदेव प्रमुख थे.’
भारतातीलच नव्हे तर परदेशातील विद्वानांनीही उत्तर भारतातील संत साहित्याचा अभ्यास करताना आपले निष्कर्ष नामदेवाच्या बाजूने मांडले आहेत. कलव्हर्ट यांनी हिंदी पदांची पुरातन हस्तलिखिते गोळा केली. त्यात नामदेवांची 258 पदे असून आपल्या प्रस्तावनेत त्यांनी पंजाब-राजस्थान या भागातील भक्तिसाहित्यातील भाषेच्या तुलनेत या पदांची भाषा पुरातन असल्याचा निर्वाळा दिला आहे.
खुद्द कबीरानेच आपल्या दोह्यात नामदेवांची महती वर्णन केली आहे.
तन मन कौ खोज हु रे भाई, तन तूहे मन कहां समाई ।
सनक सनंदन जैदेव नामा, भगति करि मन उनहूॅन जाना ॥ (कबीरग्रंथावली 77)
बर्‍याच मराठी संतांनी त्यात एकनाथ, रामदास, तुकाराम यांचा समावेश आहे हिंदी रचना केल्या आहेत. आपण ज्याला आज हिंदी भाषा म्हणतो ती तेंव्हा अस्तित्वात नव्हती. नागरी हिंदी म्हणून जी भाषा आहे ती एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी अस्तित्वात आली. हिंदीच्या जवळची ‘खडी बोली’ ही भाषा पूर्वी अस्तित्वात होती. अमीर खुस्रो हा या खडी बोलीचा पहिला कवी समजण्यात येतो. अमीर खुस्रोची भाषादेखील सोळाव्या-सतराव्या शतकानंतरची भाषा आहे. हिंदी भाषेचे प्रादेशिक भेद असलेल्या व्रज, अवधी या भाषांतूनदेखील नामदेवांच्या काळात साहित्यनिर्मिती झाली नव्हती.
आपल्या भाषेसोबत आपल्या गुरूच्याही भाषेत काव्यरचना करण्याची परंपरा फक्त मराठीतच आढळते. इतर भाषांतील संतसाहित्यात अशी द्विधारा आढळत नाही. त्यामुळे नामदेवांनी आपली गुरू परंपरा मानून सिद्धांच्या भाषेत काव्यरचना केली. आपले कार्य आपल्या भाषेपुरतेच मर्यादित न राहता ते विश्वात्मक रहावे ही भावना नामदेवांची होती याचा हा पुरवाच होय.
नामदेवांनी इ.स. 1350 मध्ये समाधी घेतली. नामदेवांनी आयुष्याची जवळपास शेवटची चाळीस वर्षे महाराष्ट्राबाहेर घालवली. राजस्थान आणि पंजाब या भागात त्यांना मोठा शिष्यसंप्रदाय लाभला.
नामदेवांच्या नंतर संत एकनाथांनी या भाषेत मोठी महत्त्वाची रचना करून ठेवली आहे. म्हणजे हिंदी संत साहित्यात मराठी संतांचे मोठे योगदान आहे हेच आम्हाला माहित नसते.
हिंदू तुर्क संवाद नावाची रचना एकनाथांची मोठी प्रसिद्ध आहे
ब्राह्मण म्हणे अहो जी स्वामी । वस्तुत: एक तुम्ही आम्ही ।
विवाद वाढला न्याती धर्मी । जात परब्रह्मी असेना ।
तुरक कहे वो बात सही । खुदा कू तो जात नही ।
बंदे खुदा नही जुदाई, वोक्या रसुलिल्ला हजरत परदे ।
सर्व धर्म ज्याचा निमाला । मनोधर्म तुरक ऐकिला ।
आनंद परम झाला । मंत्र उपदेश केला ॥
गाडगेबाबांच्या एका अशा किर्तनाचे मोठे सुंदर वर्णन गो.नि.दांडेकरांनी केले आहे.
एकनाथांच्यानंतर दासोपंतांनी सिद्धांच्या भाषेत किंवा हिंदीसदृश्य भाषेत रचना केल्या आहेत. न तू जुदा या नावाची त्यांची अद्वैताची मांडणी करणारी रचना तर अप्रतिम आहे.
न तू है जुदा न तुझ मे है जुदाई
जुदाई बुझे तब दिगंबर खुदाई ॥
या ओळी तर नितांत सुंदर आहेत.निर्गूण तत्त्वज्ञान सांगणार्‍या इस्लामला तंतोतंत लागू पडतात. जेंव्हा जुदाई संपते तेंव्हाच खुदाई भेटते हाच अद्वैताचा संदेश आपल्या संतांनी इस्लामच्या परिभाषेत इथल्या सामान्य जनतेलाही समजावून सांगितला. जेंव्हा की इस्लामला अद्वैत मंजूर नाही असा वरवरचा निष्कर्ष काढला जातो.
तुकाराम महारांनी तर ही भाषा वापरलीच पण आपल्या भाषेतील शब्दप्रयोग वापरून मातृभाषेचा गौरवही दुसर्‍या भाषेत नेला आहे.
मेरे राम के नाम जो जो लेवे बराबर ।
त्या के पाऊ मै तन की पैजार ॥
जातन सु मुजे कछू नही प्यार ।
आसते के नहि हिंदू धेड चांभार ॥
कातड्याचे जोडे करून तूमच्या पायी घालेन हा मराठी वाकप्रचार तुकाराम तसाच हिंदीत वापरतात. त्याप्रमाणेच आमच्यात (वारकरी संप्रदायात) जातपात न मानण्याची रीत नाही याचाही स्पष्ट उल्लेख ते करतात. 
रामदासांनी हिंदीसदृश भाषेत रचना करताना रागांचाही विचार केला आहे. म्हणजे तेंव्हा जी परिभाषा प्रचलित होती व्रज भाषेत रागांच्या चीजा रचण्याची त्याचीही जाण रामदासांनी होती. म्हणजे आमचे संत सामाजिक दृष्ट्या तर या रचना करीतच होते पण त्यांना कलेचीही जाण होती.
खमाज रागातील रामदासांनी रचना मोठी सुंदर आहे.
ये भाई काहे कू लडते, लडते सब पडते ॥
एक ही जमीन एक ही पानी एक आतश आसमान ।
येक मे हूं अलम चलाता ये ही चांद सुभाना ।
गैबी सोही एक इलाही पंचभूत भूतखाना ।
अजब महजब इस मे है रे ये तो सब कुफराना ।
अलामिया एक जुदा नही रे गैबी बाट सूं जावे ।
कुफराना म्हणजे पाखंड, अधर्म.हिंदू मुसलमान हा भेद पाळणे म्हणजेच पाखंड आहे असा सणसणीत टोला रामदास मारतात. 
नामदेव सारख्या एका मराठी संताला हिंदी भक्तीकवितेचा आद्य कवी मानण्यात येते. हिंदी भाषेबाबत मराठीचे हे जे मोठे योगदान आहे त्याबाबत आपल्याला जाणीव नसते.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्या पार्श्वभूमीवर श्रीधरराव कुलकर्णींचे संशोधन मोलाचे ठरेल असे मला वाटते. श्रीधरराव कुलकर्णींचे ‘साहित्यसेतू’ पुस्तक मराठी ही हिंदीची उपभाषा नसून मराठी ही हिंदीलाही समृद्ध करणारी समर्थ भाषा आहे ही जाणीव करून देते.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद.