Wednesday, April 4, 2012

वाटचाल 28 वर्षांची


-----------------------------------------------------------
६ एप्रिल २०१२ पाक्षिक शेतकरी संघटक मधील अग्रलेख
-----------------------------------------------------------


शेतकरी संघटक या पाक्षिकाला 28 वर्षे पूर्ण झाली. हा कालावधी एक दीर्घ आणि विशेषत: भारतीय पातळीवर एक संक्रमणाचा कालावधी होता. जुनी व्यवस्था ज्याला शेतकरी संघटनेच्या परिभाषेचे आम्ही ‘लायसन्स-कोटा-परमीट राज’ म्हणतो ती मोडकळीस येत गेली. सरकारची इच्छा नसतानाही बर्‍याच क्षेत्रांमध्ये खुलेपणा 1991 नंतर स्वीकारावा लागला. त्याही गोष्टीला 21 वर्षे उलटून गेली आहेत.
‘शेतकरी संघटक’चा विचार केल्यास बंदिस्त व्यवस्थेपेक्षा खुल्या व्यवस्थेच्या काळातील आयुष्य मोठे आहे. शरद जोशी यांनी जास्तीत जास्त किंबहुना, जवळपास सर्वच लिखाण संघटकमधून केले. शेती, शेतकरी आणि शेतकरी आंदोलन याची फार मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. दखल घेतल्या गेली; पण या उलट 1991 पासून ज्या खुलीकरणावर आम्ही सातत्याने विचार मांडत आलो त्याबाबतीत श्रेय शेतकरी संघटनेला, शरद जोशींना आणि पर्यायानेच शेतकरी संघटकलासुद्धा दिल्या गेलं नाही याची खंतही नोंदवून ठेवावी वाटते. खुले धोरण राबविण्यासाठी जो एक दबाव या सरकारवरती निर्माण करण्याची गरज होती तिचा फार मोठा वाटा शेतकरी संघटनेने उचलला. या प्रवासात एक महत्त्वाचं वैचारिक हत्यार म्हणून ‘शेतकरी संघटक’चा उपयोग शेतकरी संघटनेला आणि शरद जोशींना झाला. याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. मोठ्या कठीण परिस्थितीत प्रसंगी चार पानांचे छोटे अंक काढून का होईना संघटकला जिवंत ठेवल्या गेलं.
दोन वर्षांपूर्वी काळाची पावले ओळखून नव्या आकर्षक स्वरुपात ‘शेतकरी संघटक’ प्रकाशित व्हायला लागला. साध्या झोपडीत राहणार्‍या माणसाला अचानक पंचपक्वान्नाचं ताट अंगभर चांगले नवे कपडे घालायला भेटावेत, तशीच काहीशी स्थिती खेड्यापाड्यात पसरलेल्या आमच्या वाचकांची झाली. विचाराच्या धनाने हा आमचा वाचक नेहमीच श्रीमंत राहिलेला आहे; पण हेच विचारधन त्याच्यापर्यंत आकर्षक स्वरुपात पाठवता आलं. याचेही थोडेसे समाधान आम्हाला वाटते. नवीन स्वरुपात संघटक सिद्ध करत असताना स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावणार्‍यांचे पाक्षिक असे बोधवाक्य आम्ही जाणीवपूर्वकच घेतले. शेतकरी संघटना आणि तिचा विचार हा फक्त शेतकर्‍यांपुरताच नसून सर्व स्वतंत्रतावादी व्यक्तींसाठी आहे हे आम्हाला आवर्जून नोंदवावेसे वाटते. साहजिकच शेतकर्‍यांइतकेच इतर सर्व नागरिकही संघटकचे वाचक म्हणून आम्हाला अभिप्रेत आहेत.
सध्याचा काळ हा एका मोठ्या बदलाचा काळ आहे. खुली व्यवस्था जगभराची एक अपरिहार्य अशी गरज बनली आहे. अमेरिकेतील मंदी आणि युरोपाच्या आर्थिक संकटाने एक वेगळाच संदेश जगभर पसरला आहे. रशियाच्या पतनानंतर सगळ्यांना असं वाटत होतं, की अमेरिकेची भांडवलशाही हीच खरी; पण तिचेही पितळ लवकरच उघडे पडले. स्वतंत्रतावादाची मांडणी करत असताना शरद जोशी यांनी शेतकरी संघटकमध्ये स्वतंत्रतेची मूल्ये या नावाने चार लेख लिहिले होते. त्यांमध्ये अर्क स्वरूपात स्वतंत्रतावादाची मांडणी करण्यात आली होती. हे सर्व विचार आज काळाच्या पातळीवर खरे ठरताना दिसत आहे. जीव छोटासा असतानाही शेतकरी संघटकने आपल्या विचाराची शुद्धता तर सोडली नाहीच, शिवाय मोठ्या धैर्याने विरोध होत असतानाही वैचारिक पातळीवरती लढणार्‍यांची बाजू लावून धरली.
भविष्यात शेतकरी संघटक हे भव्य आणि व्यापक असे वैचारिक व्यासपीठ व्हावे, असे आम्हाला मनापासून वाटते. समाजवादी व्यवस्था केव्हाच कोसळली. समाजातील विचार करणार्‍या सर्व वर्गाला आम्ही आव्हान करतो, की त्यांनी त्यांचे स्वतंत्रतावादी विचार आमच्या व्यासपीठावरती मांडावेत. आम्ही त्या विचारांना योग्य तो न्याय देण्याचा जरूर प्रयत्न करू. वैचारिक आदानप्रदान ही गोष्ट आम्हाला जास्त महत्त्वाची वाटते. मायाजालाने (इंटरनेट) सगळं जग जोडलं गेलं असताना वैचारिक देवाणघेवाण मात्र तुलनेने कमी होते. हे चित्र नक्कीच आशादायक नाही. हे बदलण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही आमचा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करतो आहोत. सुधाकर जाधव असोत, गिरधर पाटील असोत की अमर हबीब असोत हे आपले लिखाण त्यांच्या ब्लॉगवरती करत असतात आणि शक्य होईल त्यांच्यापर्यंत पोहोचवतात. हेच लिखाण जेव्हा आम्ही संघटकच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवतो तेव्हा त्याची परिणामकारकता जास्त झालेली आढळते. मानवेंद्र काचोळे, अजित नरदे, श्याम अष्टेकर, शेषराव मोहिते, ऍड. सुभाष खंडागळे यांनी अजून सातत्याने लिखाण पाठवावे असे आम्हाला वाटते. गंगाधर मुटे, श्रीकृष्ण उमरीकर व ज्ञानेश्वर शेलार चालू विषयांवरती मेहनत घेऊन लिखाण आम्हाला देतात. ते आमच्या परिवारातलेच असल्यामुळे त्यांच्यावर आमचा हक्कही आहे. महाराष्ट्रात वैचारिक पातळीवर उत्कृष्ट लिखाण करणार्‍या विनय हर्डीकरांचं नाव आघाडीवर आहे. त्यांनी संघटकसाठी अजून मोठं योगदान द्यावं ही आमची मनापासून अपेक्षा.
हलकं फुलकं लिखाण देण्याचा प्रयत्न अल्प स्वरुपात का होईना आम्ही केला आहे; पण यात सातत्य ठेवता आलेले नाही. ऍड. अनंत उमरीकर, शे. भ. प. थंडा महाराज देगलूरकर (रवींद्र तांबोळी) यांच्या मिश्किल लिखाणाने संघटकच्या वाचकांना हसायला लावले. गंगाधर मुटे यांनी साहित्यिक पातळीवरती अजून काही पैलू घेऊन लिखाण करावे असे सुचवावेसे वाटते.
कुठल्याही आस्थापनासाठी आर्थिक बाजू ही सगळ्यांत महत्त्वाची असते. आमचे जाहिरातदार महिको, संग्रो, बेजो शीतल यांनी हा भार आनंदाने उचलला. मोठ्या प्रमाणात वर्गणीदारांनी रुपये साठवरून रुपये दोनशे पर्यंतची वाढ विनातक्रार सहन केली. त्यांच्या आधारावरच इथपर्यंतची वाटचाल करता आली. अजूनही आम्हाला काही अडचणींना मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागते. महाराष्ट्रभर संघटकच्या विक्रीचे जाळे उभे करता आलेले नाही, तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून स्वतंत्रतावादाला पोषक असे लिखाण मिळवता आलेले नाही याची खंत वाटते. भविष्यात आपणाकडून असेच सहकार्य मिळावे ही अपेक्षा